Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं. ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत वीरगर्जना कडक घुमली; लोकं थिरकली; लोकं शहारली. या वादनाची मी टिपलेली काही छायाचित्रं इथे देत आहे. सहभागी होण्यासाठी फेसबुक ग्रूपचा पत्ता हा ब्लॉग दुवा हा 1 2 3 4 5 6 7 8 9
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हेच बोल्तो. आजकाल दर दोन दिवसांनी मिरवणूका, ढोल ताशे, स्पीकर्सच्या भिंती दिसतात. आज काय एक शिवजयंती, उद्या दुसरी, पर्वा गुढिपाडवा, तेरवा तमुक कुठली तरी जयंती... रोज वैताग तिज्यायला...

का बरं? फॅड कसलं आणि? मान्य की आधी या मिरवणुका/स्वागतयात्रा नसायच्या. पण असं बघा की आता या असायलाच हव्यात. काय आहे माहित्ये का? गप्प राहणा-याला नगण्यच धरलं जातं. गूगल 'नवरोज़' चं डूडल काढतं, पण पारशांपेक्षा कित्येक पटीने अधिक संख्येने असलेल्या हिंदूंच्या नववर्षाचं डूडल काढत नाही. गूगल चं एक झालं. पण एकंदरितच जो कलाकलाने वाढणारा आपल्या इंपॉर्टन्सचा, रेकग्निशन चा प्रश्न आहे तो आटोक्यात ठेवायला शोभायात्रा हव्यातच असं माझं मत आहे. ट्विटर वर 'व्हाट आय हेट अबाउट मुंबई इज द नॉइजी फेस्टिव्हल्स' अशा कमेंट्स करायचं डेअरिंग करणारी लोकं बघितली की वाटतं पाहिजेतच स्वागतयात्रा. पाहिजेतच. होऊदे कल्ला.

शोभायात्रा असाव्यात की नसाव्यात हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा पण पारशांनी वेगवेगळ्या प्रकारे शोभायात्रा काढून आपला इंपॉर्टन्स, रेकग्निशन वाढविलाय का लोकोपयोगी कामे करुन ?

त्यांनी इंपॉर्टन्स/रेकग्निशन कसं वाढवलंय माहीत नाही. पण गूगल ने दखल त्यांची घेतली ना?...आपली नाही. .... तोही मुद्दा अलाहिदा. नेहमी आपणच फ्याड, गोंगाट, इत्यादीचा विचार का करावा? मला नाही वाटत स्वागतयात्रेत काही गैर. Or any festivals for that matter. Even If; I say even if I agree that excessive festivities can be a nuisance at times, but I believe that if nuisance IS the way people claim their spot, which is a true statement for our country, then I am in favor of such nuisance done by our people.

if nuisance IS the way people claim their spot, which is a true statement for our country, then I am in favor of such nuisance done by our people
हे म्हणजे "ते" दिवसात ५ वेळा भोंगे वाजवतात तर आपण ३ वेळा आरती करू (हे वाक्य कुठेतरी वाचलेले)...आजूबाजूला शाळा, हॉस्पिटल आहेत याकडे कोणाचेच लक्ष नसते (देव न करो पण घरातले कोणी हॉस्पिटल मध्ये असल्याशिवाय कळणार नाही हा आवाजाचा त्रास किती असतो...विशेषतः लहान बाळे आणि वयोवृध्द माणसे) irrespective of country...nuisance IS never a sane the way people claim their spot and if educated and literate ppl like u still support above statements then nuisance will be the only way people will claim their spot वरच्या प्रतिसादात लिहिलेले बरोबरच आहे...पारशी लोक इतके कमी असून सुध्धा गुगलने नवरोजची दखल घेतली...गुढीपाडव्याचीसुध्धा घेतील पण त्यासाठी गोंगाट करायची गरज नसावी राहिले ढोल पथकाचे...ढोलपथक सुध्धा कमी आवाज करून "लयबध्ध...तालबध्ध" वाजवू शकतातच की...कालच बघितलेले ठाण्यात...कलर्स वाहिनीचे नव्या सीरिअलची जाहिरात करत जात होते पण मी लिहिलेले पटणार नाहिच...कारण आवाज मोठा केल्याशिवाय "आपण मोठे" हे दाखवताच येत नाही कुणाला...त्यामुळे माझा पास

टाईम विल टेल, सर. तुम्ही जी मतं मांडलीत ती आयडियलिस्टिक.. ती पटतात..... पण ती रियलिस्टिक नव्हेत. आणि म्हणून मला ती 'इथे' पटत नाहीत किंवा योग्य वाटत नाहीत. I hope Im clear. बर, पण हे काय? हे कळलं नाही.
राहिले ढोल पथकाचे...ढोलपथक सुध्धा कमी आवाज करून "लयबध्ध...तालबध्ध" वाजवू शकतातच की...कालच बघितलेले ठाण्यात...कलर्स वाहिनीचे नव्या सीरिअलची जाहिरात करत जात होते

आज ठाण्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी ढोल पथके आहेत...ती ज्यावेळेस राजकीय संघटनांच्या हातात जातील तेव्हा गुढीपाडव्याचा दहीहंडी व्हायला वेळ नाही लागणार (तो दिवस पण जास्त दूर वाटत नाही) कारण सामान्य माणसे मेंढरासारखी या पक्षांच्या नादाला लागण्यात काहीही चुकीचे समजत नाहीत आणि कमी आवाजातले ढोल म्हणजे तुलनेने कमी जोरात वाजवणे

तुमच्या माहितीसाठी.. गुगल ने आज १४ एप्रिल च्या निमित्ताने बाबासाहेबांचे डुडल काढले आहे.

नेहमी आपणच आपल्याच सण समारंभांच्या स्वरूपात तडजोड करायची. का? दिवाळीत फटाक्यांवर झोड उठवतात. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? ३६५ दिवस होणारं प्रदूषण नगण्य. चार दिवस वाजणारे फटाके मात्र वाईट. वा रे वा.

चार दिवस
दंगा चारच दिवस असेल तर काहीच तक्रार नाही. पण या मिरवणूका दर २-३ दिवसांनी येतात. कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव. ते डोक्यात जायला लागलं आहे.

राजकीय मिरवणुकांचं समजू शकतो. पण बाकी कुठल्या येतात २-३ दिवसांनी? आता तर म्हणे भिक्षावळीला बंदी आहे. परवानगी घ्यावी लागते पोलिसांची. म्हणजे मला प्रश्नच पडतो की आपण राहतो कुठे? भिक्षावळीला बंदी वगैरे हा टोट्टल चावटपणा आहे.

आत्ता दोन शिवजयंत्या झाल्यात. दोन्हीच्या मिरवणुका. आदल्या दिवशी बारा वाजता बाईक रॅली, हॉर्न वाजवत. मग दिवसा डोल्बीवर पोवाडे. संध्याकाळी मिरवणुका. मग होळी. धुळ्वडीला परत डोल्बीच्या भिंती. बर सगळे धुळ्वडीला रंग खेळतात असं नाही. रंगपंचमीला परत तेच. मग संभाजी पुण्यतिथी. तेव्हा परत पोवाडे वगैरे... मग गुढीपाडवा. त्याच्याही मिरवणुका. आता आंबेडकर जयंती येइल थोड्या दिवसांत. परत तेच. मग लग्नाचा सीजन. मग श्रावणात दहिहंडी आहेच. नंतर गणपती, नवरात्र, दिवाळी... थोडक्यात काय पब्लिकला रस्त्यावर फु़कटात धिंगाणा घालायला निमित्त हवं असतं. मग ओकेजन काहिही असो. सणांचा अभिमान वगैरे सेकंडरी.

आता बघायचं संभाजी ब्रिगेड वाले, पतीत पावन वाले, रामदास आठवले वगैरे गूगलच्या अमेरिकेतल्या हेड ऑफिसवर कधी मोर्चा काढतात ते.

सहमत. हे सगळे धरून सध्या तीसेक दिवस बिनडोकपणा चालू असतो. याशिवाय आमच्या भागातल्या दोन शैक्षणिक (?) संस्थांचे ग्यादरिंग, माजी विद्यार्थी (?) मेळावा, पदवीदान, क्रीडा महोत्सव आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाचे पुण्य (!) स्मरण धरून वर्षाचे चौसष्ठ दिवस धुमाकूळ ! कुणी नगरसेवक झाला / कसल्या समितीवर गेला तर काढ मिरवणूक. एव्हढ्यावर झालं म्हणता? छे! वेगवेगळी एफेम च्यानल्स / जाहिरात कंपन्या त्यांचे रियालिटी शोज ट्रकवर संगीत (!)घेऊन दिवसभर बाप मेल्यागत ठो-ठो करत असतात. रुग्ण आणि परीक्षा यांचं भान कुणालाही नाही! कुणाच्या घराजवळ लग्नाची लॉन असेल तर तो गेलाच कामातून! यामध्ये कंत्राटदार आणि व्यावसायिकांचा काळा पैसा येत असल्याने कारण मिळाले तर वर्षाचे सर्व दिवस उत्सव /मिरवणुका काढू शकतील हे निश्चित. नाचायला येणारे रिकामटेकडे वर्षभर उपलब्ध आहेत. माहितीतल्या एका व्यक्तीचा इमारत थरथरुन -अति आवाजाने मृत्यू झालेला आहे. झोपमोडीमुळे वाढलेल्या रक्तदाबाचे रुग्ण तर हजारो सापडतील. तुमची चाळीशी उलटल्यावर तुम्ही याचं समर्थन कराल असं वाटत नाही. बाकी तुम्ही आत्मसात केलेले स्किल कौतुकास्पद आहे, पण ते योग्य प्रकारे वापरण्याची अक्कल सध्या समाजात नाही. तेव्हा कांही वर्षे हे उत्सव दडपशाहीने बंद करणे आवश्यक झाले आहे. न्यायालयाचा आदेश दहा मिनिटे तरी मोडणे हे या विकृत लोकांच्या मोठेपणाचं मोजमाप झालं आहे. उत्सव शिस्तीत आणि ठरलेल्या वेळेत कसे साजरे करतात हे युरोपात कार्निव्हलच्या वेळी पहावे! चांगलं असेल तर दखल आपोआप घेतली जाते !

मी मुसलमान नसलो तरी ती बांग मी "गोंगाट" या कॅटेगरीमध्ये नाही पकडणार...त्या बांगेतसुध्धा एक लय असते असे माझे निरिक्षण आहे

बरोबर आहे. ढोल आणि ताशे वाजवायला कुठे लय आणि ताल लागतात, नाही का!! लोक उगाच प्रॅक्टिस वैगरे करतात. घाम आटवतात. वेडे कुठले!! :)

फोटो म्हणून छान आहेत. nuisance च्या बाबतीत वर टका यांच्याशी सहमत. फटाके दिवाळीत चार दिवस वाजवायला हरकत नाही. पण त्यामुळे कानाचे पडदे फाटण्याइतका आणि एखाद्या आजाऱ्याला अ‍ॅटॅक येण्याइतका मोठा आवाज असू नये. शिवाय ते जर लग्न, बारसं, वाढदिवस, क्रिकेट मॅच अशा प्रसंगात म्हणून महिन्यातून वीस दिवस वाजू लागले, तर nuisance च तो.

एकदम बरोबर. एक परंपरा ह्या लोकंनी जिवंत ठेवली आणि तम्ही फोटोंच्या माध्यमातून ती आमच्यापर्यंत पोचवली ह्याबद्द्ल धन्यवाद.

हम्म.. उगी आपला एक प्रश्न - शोभायात्रा सकाळी असते.लोक जर शोभायात्रेला येतात तर घरी सैपाक कोण करत ? मी तर 11 वाजता जेवण करुन मस्त दुपारची झोप काढली. (शांताता प्रेमी)जेपी

कधी न दिसणारे सुंदर मुखडे पाहायचे सोडून तुम्हाला जेवण आणि झोप महत्वाची वाटते. नटण्या, मुरडण्यासाठी २-२ तास खपून वेळ वाया घालवला आणि तुम्हाला कौतुकच नाही बघा. कधीतरी डोळे मोठे करून आणि तोंड उघड ठेवून सौंदर्य पाहा जरा.

घ्या. जिकडे बघायचे तिकडे तुमच लक्ष नाही, तुम्ही शूजचे ब्रान्ड बघत बसलाय. तिकडे लग्नाच्या धाग्यावर आमच जुळत नाही म्हणून बोंबाबोंब चालली आहे लोकांची.

फोटू आवडले, फेट्याचा लाल रंग आवडला, मात्र टका यांच्याशी थोडीशी सह्मत. भिक्षावळीवरील बंदी, त्या परवानग्या काढणे हे मलाही खटकले. पण लोकही भिक्षावळीला ढणढणाट करायला लागले तर अशा मुंजी सत्राशे साठ होतात. सारखे कुठे सहन करणार! ढोल ताशे मला आवडतात पण वर्षातून एकदा बप्पा विसर्जनाला ठीक आहे. रोज व्हायला लागले तर नको वाटते. दहीहंडी हवी पण ते थर लावून बक्षिसे व त्यातला राजकीय हस्तक्षेप नको म्हणजे हे प्रस्थ होणार नाही. मिरवणुकी, जत्रा, पथके चालतील पण त्यानिमित्ताने वेगळेच लोक हात धुवून घेतात त्याचा त्रास होतो. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, अचरट लोकांचे जमावाने थांबणे, अस्वच्छता, तब्येतीला हानिकारक आवाज, राजकीय हस्तक्षेप नको. यांचा विचार पाहिजे बाकी कै नै.

बाकी शहरांतलं माहीत नाही, पण पुण्यात याचा अतिरेक आहे. विसर्जनादिवशीसुद्धा मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या मिरवणुका बघण्यासारख्या असतात बाकीच्यात काही राम नसतो. पण आता याला फ्याड ठरवून पार थांबवायच्या गोष्टी होतात तेव्हा खटकतं येवढं नक्की. बाकी चालू देत!! :)

पुण्यात याचा अतिरेक होतो. भयानक सहमत. वर लोक्स विचारतात की पुण्यात जाऊन कोणते गणपती बघू? "अरे बाबांनो जाऊच नका ना!" असे म्हणावेसे वाटते. ;)

सहमत , पुर्वी जनजागृती,मनोरंजन इत्यादी साठी गणेश मंडळांचा मोठा आधार जनतेला होता, आता घरबसल्या सगळ उपलब्ध असताना त्याची गरज काय? संस्कृती जपण्याचा नावाखाली बहुतांश ठिकाणी जो गोंधळ चाललेला असतो त्याने उलट विचार करनारी जनता संस्कृती पासून दूर तर जात नाही ना याचा विचार व्हायला हवा.

आमच्या सुदैवाने गणपती विसर्जनाच्या दिवशी, सकाळी तुळशीबाग आणि रात्री दगडूशेठ साठी वाजवतो.. लैच जबरा फिलींग असतं राव.. हजारो पब्लिकचे डोळे आणि कान आपल्याकडे असतात... मात्र लहान पोरांची, पोरींची सादरीकरण पथकं भाव खाउन जातात...

गणपतीची मिरवणूक हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. माझी सोसायटी आणि विसर्जनाचे ठिकाण यामधे अर्धा कीलोमीटरचे अंतर आहे. त्यासाठी ८० हजाराचा खर्च करणे कीती बरोबर आहे? याविरूद्ध आवाज उठवल्यावर झूंडशाही वापरण्याचा प्रयत्न झाला. विसर्जनावर होणारा जादा खर्च म्हणजे निव्वळ उधळ्पट्टी आहे.

परवा आमच्या सोसायटीतल्या कोणालातरी कुठल्याश्या मॉलच्या बक्षिसात गाडी मिळाली. ती गाडी हॉर्न वाजवत आणि पुढे मागे ढोल ताशे वाजवत त्याने सोसायटीत आणलीन. ढोल ताशा वाजवण्याएवढं त्याचं काय कर्तृत्व होतं? जर आनंदच साजरा करायचाय तर पेढे वाटा की? दणदणाट कशाला? पण कोण बोलणार ? काळ सोकावतो तो असा.

@वेल्ला भट - तुम्हाला मी सज्जन माणुस समजत होतो. तुम्ही तर अगदी सर्वसानान्य माणसाला त्रास देणार्‍या राजकारणी कॅटेगरीतले निघालात.