Welcome to misalpav.com
लेखक: चिनार | प्रसिद्ध:
बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे. वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली. "तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?" "मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?) "अरे वा! कुठल्या कंपनीत काम करता?” "क्ष कंपनीत" "कधी नाव ऐकलं नाही. नवीन आहे का?” "नाही. ३५ वर्ष जुनी आहे." "अच्छा! तसा मी १९८४ चा डिप्लोमा होल्डर आहे मेकॅनिकल! मला ही इंडस्ट्री चांगलीच माहिती आहे. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं” "तुम्ही कोणत्या कंपनीत होतात?” "नाही नाही ! मी पहिलेपासून रेल्वेतच आहे." च्यामारी! आम्ही सहा -सात वर्षापासून घासतोय तरी या इंडस्ट्रीचा आवाका अजून कळेना अन ह्याला डिप्लोमा घेऊन अख्खी इंडस्ट्री कळली! एकदा कंपनीत चर्चा सुरु होती. आमचे एक अत्यंत अनुभवी वरिष्ठ (ईलेकट्रीकल इंजीनियर), साईटवरचे अनुभव सांगत होते. आम्ही सगळे भक्तीभावानी ऐकत होतो. "अरे रात्रभर त्या ट्रान्सफॉर्मर चे ईरेकशन सुरु होतं. २५००० KVA चा होता तो......" तेवढ्यात एक नुकताच साईट वरून आलेला मॅनेजर पचकला. "काहीही नका सांगू हो. ट्रान्सफॉर्मर लावणं एवढं कठीण असतं होय? आम्ही तर असं हातांनी झेलत झेलत लावायचो ट्रान्सफॉर्मर !" ते वरिष्ठ एकदम स्तब्ध झाले. आणि शांतपणे म्हणाले. "ट्रान्सफॉर्मर डिझायनिंगचं पुस्तकसुद्धा असं हातात झेलता येत नाही. तू ट्रान्सफॉर्मर लावला की खोलीतला टेबलफॅन?” एकदा घरी एक ओळखीतले गृहस्थ आले होते. त्यावेळी नुकतंच कपिल देव ला "विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेन्चुरी" हा पुरस्कार घोषित झाला होता. त्या गृहस्थांच आणि कपिल देवचं काय वाकडं होतं कोणास ठाऊक पण या घटनेवर झालेली चर्चा खालील प्रमाणे " अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा ?" "का हो ? असं का म्हणताय ?" "कपिल देव ची लायकीच नाहीये !" (अरे बापरे...माझ्या एका श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला होता!) "असं तुम्हाला वाटतं!" "मी सुद्धा क्रिकेट खेळलोय म्हटलं..महाराष्ट्राच्या रणजी टीम मध्ये होतो. कपिल देव आयुष्यभर खेळला ते फक्त एका मॅचच्या भरवश्यावर.. ती पण झिम्बाब्वे विरुद्ध ..१७५ काढले होते" "म्हणजे त्याआधी आणि त्यानंतर, तो कधीच चांगला खेळला नाही???” "नाही..!!" "तुम्ही किती वर्ष खेळला महाराष्ट्राकडून?" "एक सीझन खेळलोय. त्यातही एका मॅचमध्ये प्लेयिंग एलेव्हन मध्ये होतो" देवां.....ज्या मॅचच्या भरवश्यावर कपिल देव आयुष्यभर खेळला असं म्हणतायेत त्यात तो कॅप्टन होता हो...आणि वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळी आपण ! आणि हे एका सीझन च्या भरवश्यावर विस्डेन च्या ज्युरींना अक्कल शिकवतायेत ! माझ्या एका मित्राला तर बढाया मारण्याची सवयच जडली होती. कोणताही विषय काढला की तो सुरु व्हायचा. बोलण्याचा सूर साधारण असा असायचा ," माझे एक काका US ला आहेत ..वगैरे वगैरे..." त्याचे काका किंवा मामा जगातल्या सगळ्याचं देशांमध्ये होते. ते कमी पडलेच तर दादा आणि ताई तर अगणित होत्या. एकदा असंच कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. तो घाईघाईने म्हणाला. "चल मी निघतो." "अरे कुठे चालला एव्हढ्यात." "अरे मला दादाकडे जायचंय." (एवढी चांगली संधी मी कशी सोडणार !) "अरे थांब ...संध्याकाळी US साठी कोणतीच फ्लाईट नाहीये !!! "
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

शेवटच्या प्रसंगावरून एक विनोद आठवला …. करता करविता माहित नाही म्हणून प्रथम पुरुषी एकवचनी मध्ये लिहितो … एका परिचित काकूंना कोणी काही बोलले कि "अगदी आमच्या ह्यांच्यासारखे " म्हणायची सवय होती जणूकाही त्यांच्या 'ह्यांनी'' जगातले सगळे पराक्रम केले आहेत . म्हणजे बघा मी: सुहासने तिसाव्या वर्षी घर घेतले काकू : अगदी आमच्या ह्यांच्यासारखे . . . मी: विनिताचा नवरा टीवी घरीच दुरुस्त करतो. खूप हुशार आहे काकू : अगदी आमच्या ह्यांच्यासारखा मी: हो का ? . मी : काल विनोदच्या लग्नाच्या वरातीची गाडी मधेच पंक्चर झाली काकू : अगदी आमच्या ह्यांच्यासारखी मी: हो का ? . . मी : काल मी झू मध्ये माकड पाहिले काकू : अगदी आमच्या ह्यांच्यासारखे मी: हो ना … काकू : …………… (काकूंचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर आलाच असेल )

कंपनीतल्या एकाने तर कहर केला होता. शाळेत असताना ते हॉकी खेळायचे म्हणे. आणि कर्मधर्मसंयोगाने धनराज पिल्ले त्यांचा वर्गमित्र होता. (खरं - खोटं माहिती नाही!) एकदा ते म्हणाले " हा धन्या खरंच नशीबवान निघाला" "का हो ?" "अरे आम्ही सोबत खेळायचो. मी कॅप्टन होतो शाळेचा" "बरं मग ?" "अरे दहावी पास झालो.. नंतर माझी हॉकी सुटली. आणि हा खेळत राहिला. अभ्यासाच्या नावाने बोंब होती त्याची. झाला भारताच्या टीममध्ये सिलेक्ट " " अहो पण नशिबाचा काय संबध ? कॅलिबर होतं त्याचं तेवढं" "कसलं कॅलिबर डोंबल?? मी खेळणं थांबवलं आणि हा सिलेक्ट झाला !!"

गण्या :- अरे माझे बाबा फार पॉवरफुल आहेत,त्यांनी एक फाईट मारली की समोरचा जमिनीत अर्धा गाडला जातो. रघु :-हे तर काहीच नाही... माझे बाबा तर तुझ्या बाबां पेक्षा जास्त पॉवरफुल आहेत...त्यांनी एक फाईट मारली की समोरचा डायरेक्ट पाताळात जातो... झंप्या :- गण्या :- काय रे झंप्या गप्प का आहेस ? रघु :- अरे बोल ना... झंप्या :- फायटिंग करायची असेल आणि समोरच्याला पार गायब करुन टाकयचे असेल तर, माझे बाबा डायरेक्ट रजनिकांतला फोन लावतात ! :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

माझे काही नातेवाईक असे आहेत, त्यातला माझ्या आत्याच्या मुलाचा एक कीस्सा सांगते. मी फ्लॅट घेतला तेव्हा त्यानेही सांगितले की त्याने फ्लॅट घेतलाय एक वर्षाने पझेशन मिळेल , एका वर्षाने म्हणाला कलर लावला होता फ्लॅटला तो आवडला नाही म्हणुन फ्लॅट विकुन टाकला आत दुसरा घेतो, नंतर दुसरा घेतल्याची बोंब पुन्हा शिफ्ट कधी होणार विचारलं तर म्हणे फर्निचर बनवलं होतं ते आवडलं नाही म्हणुन विकुन टाकला, मग पुन्हा घेतल्याची बोंब , भेटल्यावर म्हणाला भाडेकरुल फ्लॅट खुपच आवडला तो सोडायलाच तयार नाही मग त्याला विकुन टाकला, आता जिथे घेतलाय त्या बिल्डरची कोर्टात केस आहे त्यामुळे त्याचं बांधकाम अडकलंय. माझा फ्लॅट घेउन ९ वर्षे झाली पण अजुन पर्यंत त्याच्या थापा संपत नाहीत.

चीटिंग आहे राव!! आमच्यासारख्या बढाया मारणार्‍या लोकांनी कुठे जायचं मग? अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?