Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला ! तो थोडासा वाटुन घेता यावा म्हणुन इथे प्रकाशित करत आहे परत :) ) ************************************************************** सकाळचे साधारण साडेचार वाजलेत .
"प्रभाते मनी राम चिंतित जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा । सदाचार हां थोर सांडू नये तो । जनी तो ची तो मानवी धन्य होतो ॥"
.....थंडीने कुडकुडणाऱ्या स्वरात उमटणारे काही श्लोक ...... असपष्ट धूसर सा संधीप्रकाश..आणि काही साखरझोप मोड़णारे गजर..... इतक्यात एक हाक

"जय जय रघुवीर समर्थ "

मग मी -" आज्जी ,चैतन्य आलाय ,आम्ही गडावर चाललोय , परत येवू की नाही माहीत नाही...." आज्जी -"जास्त नाटकं नको .....गडावर रहाणार असल तर फ़ोन करून कळवा " मी -" हां हां हां :D " "जय जय रघुवीर समर्थ " ******************************************************************************** "जय जय रघुवीर समर्थ " "जय जय रघुवीर समर्थ.....प्रसाद, दर वेळी लेट करतोस ...अता चल पटा पट ...नाहीतर प्रातः पूजा चुकेल." "सज्जनगडाचं ना काहीतरी गणितच वेगळ आहे". "काही तरी अनामिक ओढ़ आहे यार..." "हो यार ... अरे कधी तरी यार शिवथर घळित जायच आहे ." " हो. आणि निवांत वेळ काढून एकदा पावस ला जाऊं येवुया " It is the best place for saadhanaa !! अशाच काही तरी गप्पा होत होत आम्ही समर्थ महाद्वारापाशी येतो अन् गप्पांचा ओघ आपोआप थांबतो ...भक्तिभावाने आपोआप मान झुकते . कुठे तरी इतिहासात मन पार डुंबुन जातं..... " इथं समर्थ असतील तेव्हा काय जागा असेल ही !" यावर चैतान्याच उत्तर- "...................................................................." मी -" अरे बोल की " चैतन्य ...कुठेतरी खोल विचारात गढुन गेलेला -" ...............परब्रह्म आदिअंति अनुर्वाच्य ........" मी -" ..............................................." ************************************************************************** ध्यानमंदिर एक प्रकारचा 'गंभीर' अंधार अन् अशात समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघालेली समर्थांची समाधी !! "आता सद्गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शु शकेना । ते स्वरुप मज अज्ञाना । काय कळे ।। श्री राम ।। " तय गंभीर आवाजाने सार वातावरण भारुन टाकलय... "उपमे द्यावा जरी मेरु। तरी तो जड़ पाषाण कठोरु । तैसा नव्हे की सद्गुरु । कोमल दिनांचा ।। श्री राम ।।" हे सगळं इतक भावोत्कट की अंगावर रोमांच उभे राहिलेत ! हां अनुभव ही कसा कधी कोठे विरून जातो लक्षातच येत नाही !! "म्हणोनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेची माझी वर्णना । अंतर्स्थितिचिये खुणा । अंतर्निष्ठ ची जाणती । । श्री राम । ।" एक शब्दातीत शांतता ....एक अनुर्वाच्च आनंद ! ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ *********************************************************************************** मग आम्ही धाब्याच्या मारुती कड़े जातो ... समोर पसरलेला उरमोडीचा जलाशय . इथे का कोणास ठावुक पण मन पार अंतर्मग्न होता . बोलावासचाच वाटत नाही.....मगाचचे सद्गुरुस्तवनातले श्लोक मनात रेंगाळत रहातात .... समोर पसरलेल्या निळ्याशार जलाशयाकड़े बघत कधी भावसमाधि लागते कळतच नाही.... पण मग थोड्यावेळाने पोटातले कावळे कावकाव करायला लागले की आपोआप सामाधी मोडते.... मग भोजनप्रसादगृहात भोजनबंधुंच्या भाऊगर्दीत प्रसाद घेताना लक्षात येत की गडाच्या महाद्वाराशेजारी असं का लिहिलय..... "तू विवंचना मुक्त होण्याचे स्थान आहेस ....पण ....पुन्हा तूच विवंचना युक्त आहेस !!!!!" असो ! इतकंच बोलून सगळेच भक्त त्या विवंचना विसरून जातात ...आणि त्या सगळ्याच भक्तातले आम्हीही एक असतो! मग सरळ आम्ही श्रीधर कुटीत जातो ..... श्रीधर स्वामींच्या विचाराने आणखीनंच कसंसं होतं . " चैतन्य ,आपण असं ,श्रीधर स्वामींसारखं का नाही रे करू शकत ?" " तेवढी पुण्याई अजुन जमली नाही मित्रा !अजुन खूप लहान आहोत रे ! पण तुझं ही खरं आहे रे .... अजुन कित्ती दिवस दूर रहायचं बाप्पापासून ? अजुन कित्ती दिवस ? सद्गुरु सद्गुरु .......? " सद्गुरु विण जन्म निर्फळ। सद्गुरुविण दू:ख सकळ। सद्गुरु विण तळमळ। जाणार नाही ॥ श्रीराम॥ मग पुन्हा एकदा तीच गंभीर शांतता मनाला भारुन टाकते. पण मनात कुठेतरी खोलवर चालु असलेली विचारांची द्वंद्व चालूच रहातात . मग आम्ही दोघे ठार मुक्यासारखे चुपचाप गड उतरु लागतो . *********************************************************************************** संध्याकाळी घरी पोहचतो तेव्हा तस्साच तो संधीप्रकाश पुन्हा भरून राहिलेला असतो. आज्जी -" आलात का महाराज ! काय खायला काही पोहे ,उप्पीट करू ?" मी न कळत काही तरी उत्तर देवून जातो ! माझ्या ही लक्षात येत नाही ! आज्जी देवा पुढे दिवा लावते ...मग स्वयंपाक घरात जाते .... कंद्यापोह्याच्या वासाने पोटातले कावळे परत जागे होतात . आज्जी काहीतरी गुणगुणत पोहे आणून देते . आज्जी चे गुणगुणणारे शब्द स्पष्ट होता जातात ......
"कल्याण करी रामराया । देवराया ,कल्याण करी रामराया ॥ जनहित विवरी ,कल्याण करी रामराया ॥ "
************************************************************************************ ( अवांतर : सज्जनगड ! मनाच्या कोपर्‍यात कोठेतरी घर करुन बसलेला ! आज कोठुन तरी ह्याने डोके वर काढले . अन आठवणींचे मोरपीस कोणीतरी अलगद हातावरुन फिरवावे तसे काहीसे झाले ! असेच आमच्या बालपणीच्या मित्राविषयी - अजिंक्यतार्‍याविषयी - कधीतरी निवांतपणे - आठवणींना मोरपीस सापडल्यावर :) ) ( अन्यत्र अन्य नामाभिधानांनी पुर्वप्रकाशित )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छान आहे लिहिलेले.. आमच्या ही आठवणी अश्याच रायगडाशी जोडलेल्या आहेत.. कधी जा मन प्रसन्न .. भारावलले.. रोमांचीत... नटलेले सौंदर्य .. मनाची आरास... रायगडाचा कन अन कन शहारीत करणारा... एक मात्र आहे.. या सर्व जागा.. मग लोहगड असु द्या नाहीतर रायगड.. जाण्यासाठी सोप्प्या करण्यात आल्याने आजकाल निव्वळ गडप्रेमी..शांतता प्रेमी..निसर्गप्रेमींपेक्षा.. साध्या प्रेमींनीच अलोट भरली जात आहेत... आता तर ऐकले आहे, की मनरंजन पर्यंत पक्का रस्ता होणार आहे.. डायरेक्ट पायथ्यापर्यंत गाडी जाणार ... त्या आधी एकदा राजमाची ला गेले पाहिजे

असेच छान मला पुण्यातल्या पर्वती आणि त्याच्या मागच्या पर्वती पांचगाव च्या वनविहारात गेले की वाटते. थोडे पुढे चालत जर तळजाईकडे गेलो तर अजून छान वाटते.

सुरेख लिहिलंय. काही काही जागांची जादूच अशी असते. कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकात आणि कलकत्त्याला रामकृष्ण परमहंसांच्या मठात असा भावातीत ध्यानाचा अनुभव घेतला आहे. शब्दात सांगणं कठीण आहे.

भावनाबंबाळ गोग्गोड लिखाणाचा नमुना म्हणून हा लेख इथे आता टाकला असावा असं दिसतंय. तरीही तुमचा हा अनुभव आणि त्यावेळची भावना खरी असावी असे समजून प्रतिसाद दिला आहे. ते तसे नसेल तरीही माझ्या आयुष्यातल्या काही सुवर्णक्षणांची आठवण या लेखानिमित्ताने करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!

होय ;) तुर्तास फक्त भावनाबंबाळ गोग्गोड लेखन =)) बाकी भावना खरीच आहे , सगळेच अनुभव शब्दात शेयर करा येत नाहीत , जेवढे जमेल तेवढे अ‍ॅप्प्रोक्षिमेशन करत असतो ... असो अजुन येत आहेत असे काही भावनाबंबाळ लेख ! तयार रहा !! =))

गैरसमज नसावा यशोधरातै ! :) खर्‍याखुर्‍या भावना अशा ओपन फोरम वर मांडायच्या नसतात असे मला कळुन चुकले आहे

सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि ||

मेरी गल्ली चुक्याच. स्वगत कधी सुधारणार रे नाखु तू ?? पडलास ना एकटा!! सज्ज न गडकरी

या लेखामुळे तुम्हाला तुमचा एक सुंदर अनुभव आठवला, आणि तो तुम्ही इथे सगळ्यांसोबत वाटून घेतलात. हेचं महत्त्वाचं!

लोकांना जे आवडते तेच बोलावे, मनातील ठेवावे आपल्यापाशी,मनातच...

सज्जन्गडावर कधी गेलेलो नाही तरी काही छायचित्रे असल्यास बघायला आवडतील. का कोण जाणे पण शाळेतला वाचलेला आणि अजूनही मनात घर करून राहीलेला 'कातरवेळ' हा धडा आठवला. लेखक आठवत नाही कदाचीत अरविंद गोखले असावेत.

शाळेत असताना राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळेंबरोबर सज्जन गडावर १५ दिवस राहिलो होतो त्याची आठवण झाली. आयुष्याच्या हरएक टप्प्यावर सज्जन गडावर भेट दिली आहे त्या मधली सगळ्यात काळजाजवळची आठवणः कन्येचा जन्म झाला आणि कहा महिन्यात्च "ही" ने सज्जन्गडावर जायचेच असा घोषा लावला.कन्या जेमतेम ८-१० महिन्यांची आणि सुपुत्र ७ वर्षांचे. आधी गोंदावले येथे मुक्काम करून दुसर्या दिवशी सज्जनगड असा सज्जड दमच होता. शेवटी म्.रा.प. च्या बशीने गोंदावले (पिंपरीहून सकाळी ६.३० लाच बस होती)आणि गोंदावले गाठले दुपारी (२.००) दुपारचे भोजन सर्व राममंदीरांची भेट करून मुक्काम.दुसरे दिवशी सकाळी चौकशी केल्यावर थेट बस नाही तुम्हाला. असे उत्तर मिळाल्यामुळे हिरमुसली. यष्टीमामांनी तुम्हाला एक आड्मार्गे जाणारी बस सातार्‍याच्या अलिकडे सोडेल तिथून सातार्‍याला जायला यष्टी मिळेल असा सल्ला दिला. आज गडावर जायचेच असा निर्धार असल्याने लगेच तयार झालो. सकाळी ९ ला निघालेलीअतिशय कच्या रस्त्यावरून ही बस मजल दरमजल करीत सुमारे १.०० चे सुमारास शेवटच्या ष्टाप्ला पोहोचली तिथून सातारा आणि मग सज्जन्गड पायथा दुपारी २.३० ते ३.०० फेब्रुवारीचे ऊन आणि दोघा बछड्यांना उच्लून घेऊन गड चढला. भर प्रवासात रडणारी लेक आता एकदम शांत राहिली आणि चक्क दादाशी खेळत होती.सगळ्या अडचणींनतर दर्शन घेतले. आणि भोजन कक्षाची वेळ संपेल म्हणून आधी क्षुधा शांती केली आणि पुन्हा ध्यान मंदीरात पोहोचलो. कन्या गरमा-गरम भात खाल्याने बाबाचे खांद्यावर झोपी गेली. ध्यानमंदीरात बसल्यावर जप पूर्ण झाल्यावर हिच्याशी बोलायला गेलो तर डोळ्यांतून घळघळा पाणी. मला कळेना काय झाले ते.मी अगदी गप्प बसलो. शेवटी राहवेना म्हणून विचारले काय झाले? "समर्थांची ईच्छा असावी म्हणूनच सगळ्या अडचणी येऊनही दर्शनाला येता आले".(आणि खरेच होते आमच्या दर्शनानंतर मुख्य मंदीराचे दार बंद झाले आणि भोजनकक्षातही आम्ही सेवकांच्याच पंक्तीला होतो) जय जय रघुवीर समर्थ

लेख आवडला. मी सज्जनगडावर लहानपणी सातवीत असताना गेलो होतो. त्यावेळी माझी आई व शेजारच्या काकु दासबोध अभ्यास व समीक्षण करायचे. ७ दिवस गडावर राहिलो. त्यावेळी ध्यानधारणा किंवा मनःशांती वगैरे काही कळायचे नाही पण तिथे एक प्रकारची अनामिक शांतता लाभली. संपुर्ण वातावरण कसे प्रसन्न होते. परत जुन्या आठवणी जाग्या केल्यात तुम्ही. परत कधीतरी नक्की जाईन.

अगदी असेच म्हणतो. शिवाय गडाच्या पायर्‍यांवर बसून प्यालेले ताकही आठवले.

हो ते ताक म्हणजे ताक फ्लेवर्ड पाणी असते :-\ बाकी पावसाळ्यात गडाखाली भजी खायला मजा येते . अवांतर : आपण सातार्‍याचा प्लान ठरवला आहे त्यात सज्जनगडला जाऊ नक्कि !

नक्कीच. प्लान मुक्कामीच आहे त्यामुळे फिकर नॉट. कास तलाव, सज्जनगड, पाटेश्वर, यवतेश्वर, माहुली संगम. त्याचबरोबर भुईंजजवळील किकली गावातले यादवकालीन शिल्पसमृद्ध भैरवनाथ मंदिर.

पण ह्या पावसाळ्यात नक्की आहे ! आणि वरील वल्ल्याच्या लिस्ट मधे औंधाचेम्युजियम्म राहुन गेले आहे , मला तिकडे जायचे आहे , फार लहानपणी गेलेलो आठवते !

वल्ली ह्यात लिंब गावची पायर्‍यांची (खरे तर मजल्यांची) विहीर अ‍ॅड कर.. मस्त ठीकाण आहे.. आणी म्हणे ASI ने किकलीचे मंदीर परत बांधायला काढले आहे.. आता ह्या संस्थेचा एकूण कारभार बघता ते काम सुरु व्हायच्या आत बघावे लागेल. -- आता मुळ लेखाविशयी.. प्रगो.. सुंदर आठवण..अतीशय प्रामाणीक भावतेतून लिहीले आहेस.. काहीतरी आहे तिथे खासच.. किल्ला, निसर्ग, धार्मीक वातावरण, काहीही असो, तिथे गेल्यावर एक वेगळीच अनुभूती येते हे खरे.. अशीच अनूभूती मला रायगडावर भवानी टोकावर गेल्यावर येते.

हो. लिंबची विहीर राहिलीच. बाकी ASI परत जीर्णोद्धार करतेय हे त्यातल्या त्यात बरे. गावकर्यांनी केला तर फारच वाईट. अगदी ऑइल पेण्टच देतात राव.

परस्पर ठरवा आणि मग ? व्रुत्तांत टाकून आम्हाला - स्वगत :भेंडी किमान शंभर्-दोनशे जणांचा कंपू बनवावा काय?

अंतर्मनात डोकवायला लावणारे. असं शंभर टक्के शरणागतीचा अनुभव मला देणारे स्थळ म्हणजे नरसोबाची वाडी. वाडीच्या इंच इंच भूमीत तनामनातील तणाव ओसरवण्याचे सामर्थ्य आहे.