सूर्यसावलीत अडकले रथचक्र
वटवृक्षाच्या सावलीत
खुरटी झालेली झुडपे
बघताना
उगाचच
हरीलाल समोर येतो
अन
सुर्वेमास्तरांच्या सावलीत
कोमेजलेली नासकी
फळे आठवतात.
जगणं हे असचं
असतं का ?
एक सूर्य
अन त्याचे ग्रह
त्यांचे असंख्य उपग्रह
काही शोधलेले तर
काही काळकुपीच्या
मागे दडलेले
पुढे कधीतरी
परप्रकाशित उजेडात
सामोरे येणारे.
संभाजीही असाच
होता का ?
सूर्याचा ग्रह
काहीच माहिती नाही
पण
सूर्यापासून सूर्यप्रकाश
घेवूनही
स्वप्रकाश पसरवून गेला,
काय वाटले असेल त्याला ?
मयूर सिंहासनाची
धूळदाण बघताना
कधीतरी सूर्यापोटी जन्म
घेतल्याचा त्यास
पश्चाताप झाला असेल का ?
मिसळपाव