मी, मनोज आणि त्याची पत्नी मधु अश्या तिघांनी भटकायला जायचे ठरवले (अर्थातच बाकीच्या मित्रांना वेळ नव्ह्ता). ताम्हिणी घाटात जायचा बेत ठरला.३ ऑक्टोबर ०९ ला आम्ही तिघांनीही सकाळी १०.३० वाजता पुणे सोडले तेही अर्थातच मनोजच्या स्विफ्ट गाडीने. आकाश अंशत: ढगाळ होते. पिरंगुट, पौड मागे टाकून आम्ही दीड तासात मुळशी ला पोहोचलो.सर्व परिसर तेरड्याच्या जांभळ्या आणि सोनकीच्या पिवळ्या सोनेरी फुलांनी भरून गेला होता. पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे अशी गावे पार करत आम्ही ताम्हिणी घाटाच्या तोंडावर जाऊन पोहोचलो.