कलादालन

प्लस-व्हॅली...

Primary tabs

समोर प्रचंड खोल दरी... नजर जिथपर्यंत भिरकावता येईल तिथपर्यंत सृष्टीचं अमाप सौंदर्य... आजुबाजुला उत्तुंग कडे... वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट... निखळ एकांत... हे सगळं अनुभवत मी प्लस-व्हॅलीच्या टोकावर उभा होतो... Image removed. त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं... झाडं, दगडगोटे, पक्षी, प्राणी, हवा आणि मी ह्यांच्यात काहीच फरक नव्हता... मी म्हणजेच हे सगळं आणि हे सगळं म्हणजेच मी असं वाटून गेलं... मग कसलं जंगल? आणि कसलं रान?, सगळच ओळखीचं झालं आणि कसलीच भिती उरली नाही... खऱ्या अर्थानं विमुक्त झालो... "The soul of the universe is one with your own soul and every other soul that exists " असं Paulo Coelho का म्हणतो ह्याचं उत्तर मिळालं... पुण्याहून प्लस-व्हॅलीकडे जाताना मुळशीच्या पुढे पळसे नावाचं गाव लागतं... हे गाव मागे टाकून पुढचा रस्ता धरला आणि रस्त्याच्या दुतर्फा बहरलेल्या पळसाच्या झाडांनी आमचं स्वागत केलं... पळसाला इंग्रजीत "Flame of the forest" असं सुद्धा म्हणतात... पळसाच्या फुलांमधे भरपूर मध असतो आणि तो खाण्यासाठी पळसाच्या झाडावर पक्ष्यांची खूप गर्दी असते... बहरलेल्या पळसाच्या झाडा खाली पडलेला फुलांचा सडा बघून मन एकदम हरखून गेलं... फुलांचा तांबडट-केशरी रंग सकाळच्या उन्हात फारच उजळ दिसत होता... लहान मुल आईच्या कुशीत शांतपणे निजावं अगदी तशीच फुलं मातीच्या कुशीत निजली होती... Image removed. Image removed. निवे गाव आणि लोणावळ्याचा फाटा मागे टाकून थोडं पुढे गेलो की घाटातून प्लस-व्हॅली दिसते... चार दऱ्या एकत्र येऊन अधिकच्या आकाराचं चिन्ह तयार झालयं म्हणून ह्या दरीला प्लस-व्हॅली असं म्हणतात... Image removed. दाट झाडीतून दरीत उतरायला साधारण एक तास लागतो... (दरीत उतरताना डाव्या हाताला भिरा धरण दिसतं) Image removed. देवानं स्वर्गाचं दार उघडून,"जा बाबा! हवं ते पहा... हवं तसं भटक..." असं म्हंटल्या सारखं वाटलं... (ओढ्यातलं नितळ पाणी) Image removed. (दरीतून दिसणारा देखावा) Image removed. Image removed. पक्ष्यांची गाणी ऐकत, ओढ्यातल्या नितळ पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब बघत दरीच्या टोकापर्यंत पोहचलो... दरीच्या अगदी टोकावर खूपच नितळ आणि गार पाण्याचं कुंड आहे... Image removed. पावसामधे प्लस-व्हॅलीच्या चारी सोंडांमधून वाहणारं पाणी ह्या कुंडात पडतं... ह्या कुंडातूनच पाणी शेवटी खाली दरीत कोसळतं... Image removed. असं अफाट सौंदर्य पाहून निव्वळ वेड लागल्यागत झालं... कितीही वेळा पाहिलं तरी ते डोळ्यामधे सामावत नव्हतं... दरीची खोली, रानाची हिरवाई, ओढ्यातलं पाणी आणि एकांत ह्यामुळे मनाची लगाम सैल्ल होत होती... कधी ते फुलपाखरां सोबत उडत होतं तर कधी कुंडातल्या माश्यांसोबत पोहत होतं... बराच वेळ दरीच्या टोकावर बसलो... नकळतच सारखे देवाचे आभार मानत होतो... उन्हं कलल्यावर शुध्दीवर आलो आणि हे सगळं जपलं पाहिजे अशी जाणीव परत झाली... निसर्ग न मागता सगळंच आपल्याला देत असतो, पण आपण मात्र हवरटा सारखे ‘एकदम सगळी सोन्याची अंडी मिळावी म्हणून कोंबडीच कापायच्या विचारात असतो’... हे चुकतयं ह्याची आपल्याला जाणीव आहे... कळतयं पण वळत नाही अशी अवस्था आहे... खरंच हे सगळं जपलं पाहिजे... आता आपण सर्वांनीच ह्या साठी धडपड केली पाहिजे... Man has been endowed with reason, with the power to create, so that he can add to what he's been given. But up to now he hasn't been a creator, only a destroyer. Forests keep disappearing, rivers dry up, wild life's become extinct, the climate's ruined and the land grows poorer and uglier every day. ~ Anton Chekhov विनंती: मित्रांनो भटकून आलो की मला त्या जागे बद्दल लिहायला, इतरांना सांगायला आवडतं, पण मग भिती देखील वाटते की ‘तिथे गर्दी होणार, कचरा होणार आणि त्या जागेचं सौंदर्य टिकून राहिल की नाही? ’. माझी एक फार नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी निसर्ग/वन्यजिवन ह्यांच्या संवर्धनासाठीची जाणीव आपल्या ओळखीच्या लोकांमधे निर्माण करावी. जाणीव निर्माण झाली तर संवर्धन देखील होईलच. विमुक्त http://www.murkhanand.blogspot.com/
सहज

नितळ मनातून आलेला अतिशय पारदर्शी लेख.

निसर्गाच्या सानिध्यात राहून तू खरचं एक मुक्त जीव झाला आहेस.

तुला लवकरच भेटले पाहीजे.

(काँक्रीटच्या जंगलातला) सहज

गणपा

जबरा रे विमुक्ता..
बाकी तुझ्या कॅमेर्‍याबरोबरच तुझी लेखणीही झक्कास चालते हो.
जियो (मालकांकडुन सभार)

समंजस

व्वा!!!! छान! सुंदर! अप्रतिम!
छायाचित्रे आणि लेखन सुद्धा!!

प्रचेतस

विमुक्ता,
फोटोज बघुन मस्त वाटले.
मी पन कितीदातरी त्या दरीत उतरण्याचा संकल्प केला पण अजुन प्रत्यक्षात नाही आला.
मला सांग कि त्या दरीतुन सिनेर खिंडीत जाता येते का?
तसेच तो मार्ग म्हणजेच अंधारबन घाट आहे का? किंवा तो नसल्यास अंधारबन घाटात जण्यासाठी नेमके कुठुन जायचे?

विमुक्त

नाही, ह्या दरीतून सिनेर खिंडीत नाही जाता येत... पहिल्या फोटोत मी जिथे उभा आहे त्याच्या मागे खोल दरी आहे...
पुण्याहून ताम्हिणी घाटाने येताना आधी निवे गाव लागतं आणि मग उजव्या हाताला लोणावळ्याकडे जाणारा फाटा लागतो... तो रस्ता पकडायचा... मग पिंपरी गावच्या जवळ सिनेर खिंड आहे...
नक्की माहिती नाही, पण सिनेर खिंडीतून खाली दरीत जी वाट जाते तीच अंधारबन घाट असावा... तिथे खूप प्रचंड जंगल आहे....

जबरा..
प्लस व्हॅली खरेच भारी आहे....

तु ताम्हिनी घाट उतरुन मग परत भिरा डॅम कडुन चालत आला काय ?
आम्ही ताम्हीनी घाटातुनच म्हणजे तुझा ४था जो फोटो आहे त्या डोंगरावरुन खाली उतरलो होतो...
रस्ता शोधताना वाट लगली होती...

binarybandya™

मेघवेडा

च्यामारी कसले जबरे फोटो आहेत.. एकदम चाबूक!!! आणि लिखाणही तितकंच दर्जेदार.. मजा आली!! आत्ता लगेच जायला निघावं असं वाटलं क्षणभर!

तुझे हे लेख वाचून आणि फोटो पाहून मन लगेच भूतकाळात जातं आणि मी केलेली भटकंती आठवते आणि आज ही अशी भटकंती करता येत नाहीये म्हणून मन हळहळतंही.. विमुक्ता .. तुझा फार हेवा वाटतोय रे आज!! उगाच न ठरवता कोकणची ट्रिप काय .. कधी प्लस व्हॅली काय... व्वा! हे लेख आवडले म्हणून तुझे यापूर्वीचे लेखही काढून पाहिले! अहाहा! सुंदर!! फोटो बघून जो आनंद झाला तो शब्दात सांगणं कठीण आहे! असाच भटकत राहा आणि आम्हालाही सफर घडवत राहा..

--

(एकेकाळी विमुक्त असलेला) मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

रेवती

खरच भन्नाट!
पुण्याहून एखाद दोन दिवसात करण्याच्या कितीतरी सहली आहेत हे तुझ्यामुळे आम्हाला समजतय. जर कधी आम्ही गेलो तरी तिथे कचरा टाकणार नाही. :)

रेवती

अनामिक

तुझा हेवा करुनही थकलोय आता.
जेवढे सुंदर फोटो, तेवढेच सुंदर लेखन!

-अनामिक

प्रभो

मस्त रे
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

सुनील

सुंदर फोटो आणि वर्णन. शेवटची विनंती मान्य!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदू

अप्रतिम फोटोज, सुरेख लिखाण्... नेहमी प्रमाणे.
हे पण सचित्र प्रवासवर्णन आवडलं.

नंदू

क्रान्ति

नावासारखाच विमुक्त आहेस खरा! कुठं कुठं आणि किती किती फिरतोस! तुझ्या या भटकंतीमुळे आमचीही हौस न फिरताच पूर्ण होते. कधी कधी तुझा खरंच हेवा वाटतो! :''(
नेहमीसारखंच सहज सुंदर वर्णन आणि छायाचित्रं! =D> असाच फिरत रहा.
तुझी संदेशवजा विनंती मनापासून पटली आणि आवडली. :)

क्रान्ति
अग्निसखा

हर्षद आनंदी

विमुक्ता, मित्रा तुला ऊंच आकाशात विहार करणार्‍या गरूड पक्षाची उपमा देणेच योग्य ठरेल. मुक्त होऊन सह्य पर्वताच्या कड्या कपारीत फिरताना आम्हालाही बसल्या जागी, अलौलीक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आनंद तु मिळवुन देतोस. त्याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार!!

असाच सह्य पर्वताच्या कड्या-कपार्‍यांतुन भटकत रहा, ह्याच शुभेच्छा..

आम्ही हिंदूत्ववादी !!

ऋषिकेश

अगदी झकास! फोटो सुंदर आले आहेत
शेवटच्या वाक्याशी लाख सहमत.

"डोंगरांमधे पाऊलखूणांशिवाय काहिहि ठेऊ नये आणि आठवणींवाचून काहिहि नेऊ नये" - आनंद पाळंदे

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.