भटकंती
एकच - लिंगाणा
Primary tabs
दुर्गराज राजगड आणि स्वराज्याचे तोरण - तोरणा किल्ला यांच्या मधोमध, सह्याद्रीच्या कुशीत लपलेला प्रचंड सुळका - लिंगाणा. हा किल्ला शिवरायांनी १६४८ मध्ये चंद्रराव मोरेना पराभूत केल्यानंतर बांधला. सुळक्याचा आकार हा शिवालीन्गाशी बरेच साधर्म्य दाखवत असल्याने त्याचे नाव लिंगाणा असे पडले. या किल्ल्याचा मुख्य वापर हा तुरुंग म्हणून होई. मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेल्या कैद्यांना शिड्यांच्या मदतीने सुळक्यावर चढवण्यात येई आणि शिड्या काढून घेत. सुळका योग्य उपकरणे (किमान एक दोरी) असल्याशिवाय उतरणे शक्य नाही. अर्थात हे कैदी तहान-भुकेने किंवा खाली उतरण्याच्या प्रयत्नात दरीत पडून मृत्युमुखी पडत.
लिंगाणा - वाटेवरून
इतिहासात मिळणाऱ्या काही उल्लेखानुसार लिंगाणा व रायगड हे दोन्ही किल्ले महाराजांनी पुरंदरच्या तहात स्वराज्यात ठेवले होते. ब्रिटिशानी १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचीही खूप नासधूस केली.
आज तांत्रिक rock climbing साठी लिंगाणा हा सह्याद्रीतील सर्वात कठीण ठिकाणापैकी एक मानला जातो. महाराष्ट्रातील बऱ्याचशा climbers साठी हे एक मोठं स्वप्न असतं.
अशा या लिंगाण्यावर स्वारी करण्याची संधी मला फेब्रुवारी २०१२ च्या पहिल्या शनिवार-रविवारी मिळाली.
रायलिंगाच्या पठारावरून - खाली सिंगापूर गाव
आम्ही १५ जण ४ तारखेला संध्याकाळी पुण्याहून निघालो. वेळे मार्गे मोहरी या लिंगाण्यापासून अगदी जवळच्या गावी पोहचलो. येथे रात्री विश्रांती घेतली.
५ तारखेला पहाटे ३ ला उठून सर्व आवरून ४ वाजता चालायला सुरुवात केली. अंधारातच गावापासून चालत रायलिंगाच्या पठारापर्यंत पोहोचलो. त्यानंतर तेथूनच खाली जाणाऱ्या 'बोराट्याची नाळ' या घळीतून जवळपास १ किलोमीटर खाली उतरलो आणि खालून रायलिंगाच्या पठाराला वळसा घालून लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
बोराट्याची नाळ
लिंगाण्याच्या गुहेतून - रायलिंगाचे पठार
येथून साधारणतः ४५० फुट चढून गेल्यावर लिंगाण्याच्या गुहेपाशी येऊन पोहचलो.(दगडं होतीच)
गुहेशेजारची 'वाट'
येथून पुढे अतिशय कठीण चढण सुरु होते. सुरुवात होते जवळपास ४०-५० फुटी कड्याने!
तसेच सुळक्यावरून पुढे जाताना दोन्हीबाजुनी दिसणारी २५०० फुटाची दरी अतिशय भीतीदायक होती.
दुपारी १२ वाजायच्या सुमारास आम्ही सुळक्याच्या शिखरावर पोहोचलो. येथून समोर रायगड आणि मागे तोरणा दिसतो.
शिखरावर
विजयी वीर
यानंतर आम्ही rappelling करून खाली उतरायला सुरुवात केली.
पाण्याचे टाके
३.३० च्या दरम्यान सर्व खाली पोहोचलो. जेऊन, झोपून घेतलं. जवळच्याच पाण्याच्या टाक्यावरून पाणी भरून घेतले. संध्याकाळी ५ वाजता शेवटचा ४५० फुटी टप्पा उतरायला सुरुवात झाली.
rappelling
हा टप्पा दोन उपटप्प्यामध्ये उतरायचा होता. १५० + ३००. येथे काही नवखे सदस्य घाबरले होते. त्यामुळे उतरणीला अपक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. मी खूप उशिरापर्यंत बसून होतो. ७ वाजता जेव्हा मी पहिल्या १५० फुटाला ला सुरुवात केली, तेव्हा जवळपास अंधार झाला होता. अर्ध्यात उतरलो तेव्हा अजून ७-८ जण खाली जायचे शिल्लक होते. रात्र झाल्याने उतरायला खूप वेळ जात होता. खुप वेळ बसून मी शेवटून दुसरा (माझ्या मागे दोरी सोडवणारा) उतरलो. खाली आलो तेव्हा ९.३० होऊन गेले होते.
सर्व लोक खाली आल्यावर आम्ही दोऱ्या गुंडाळल्या, एक एक दोरी गळ्यात अडकवली आणि १०.२० च्या आसपास पळायला सुरुवात केली. रायलिंगाच्या पठाराला वळसा घालून बोराट्याच्या नाळेतून वरच्या पठारावर आम्ही ११ वाजता पोहोचलो. तसेच पुढे पळत १२ च्या दरम्यान मोहरी गावात पोहोचलो.
परत येताना गाडीत डुलक्या काढत ६ तारखेच्या पहाटे ४.३० ला पुण्यात घरी आलो.
[आणि ७.३० ला उठून ९ वाजता कार्यालयात हजर झालो.]
हे मी.पा. वर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले [माझे नसलेले] चलचित्र.
हा इंग्रजीत सविस्तर लेख.
आपल्या धाडसाचे कौतुक वाटते !
अमोल केळकर
फोटो जरा मोठे टा़कले असते तर अजुन मजा आली असती
असो... रोचक धागा :)
लिंगाणा...जबरदस्त सुळका ...तोरणा ते रायगड वाटेवर प्रत्येक नजरेचा वेध घेणारा !
काही वर्षांपूर्वी एका संस्थेतर्फे हा लिंगाणा सर करायची (सर केला म्हणण्यापेक्षा आम्ही घाबरत होतो म्हणून हाणून मारून चढवलं वर :P ) संधी मिळालेली...लीन्गाण्यावरून चहुबाजूला दिसणारे दृश्य जबरदस्तच !
मस्त वर्णन !
-मालोजीराव
.
धन्य आहे तुमची
__/\__
हार्दिक अभिनंदन!
१९८२ मध्ये आम्ही जेव्हा बोराट्याची नाळ उतरलो होतो, तेव्हा लिंगाण्याच्या अवघडपणाची पुरेशी कल्पना आलेली होती. मात्र एवढ्या लव्याजम्यानिशी तुम्ही चढून गेलात ह्याचे कौतुक वाटते.
लिंगाण्यावरील गुहेतून काढलेला रायलिंगाच्या पठाराचा फोटो अफलातून आहे.
जरा मोठा देता आला तर खरोखरीच अंगावर येऊ शकेल!
लवकरच मोठे फोटो टाकतो.
अभिनंदन. सुरक्षेचा विचार करून तुम्ही लिंगाणा सर केलात त्याबद्दल परत एकदा अभिनंदन.
ब्रॅव्हो !!!
सुरक्षितपणे गड सर करून आल्याबद्दल! थरारक चढाई. मला कोणी दोरीने बांधून नेलं तरी मी इथे जायला तयार होणार नाही!
असेच म्हणते.
बापरे...पाहुनच पाचावर किंवा दहावर धारण बस्ते...तो कडा/किल्ला तुंम्ही सर करुन आलात..? सर...! कोपरापासुन नमस्कार सर...! खरच भेटाल तेंव्हा दंडवत घालिन... :-)
अजून थोडे
नमस्कार, शतशः नमन तुम्हाला, कधी तरी अशा ठिकाणी जावं अशी इच्छा आहे पण ....
पन्नासराव पन बीन...टाकू नका...
औंदाच्या वखताला आपन बी लीन्गाना सर करू कि...मी कळवतो तुमास्नी...मस्त दोर्या बिर्या लावून शिड्या टाकून वर जाऊत !
- मालोजी
चढताना सगळ्यात आधी वल्ली, ५० फक्त आणि मी आणि उतरताना सगळ्यात शेवटी मी, ५० आणि वल्ली.
असं असेल तर आणि तरच आम्ही येणार.
मी येणार आहे.
मालोजीराव,
मलाही घेऊन जाणार का ? पण काम जोखीमीचे होईल. विचार करा......आणि मग सांगा.
होय सायबानु अपुन सगले च्या सगले जाऊ...पण जल्ला येताना वल्ली ला वरच गुहेत ठेऊ...आनी शिड्या दोर काडून खाली उतरून पलून जाऊ...
...वल्लीला आनायला धा दिवसांनी अजून एक मोहीम काडण्यात येईल....जाताना वजनकाटा घेऊन जाण्यात यईल...याची सर्व शिवप्रेमी आनी वल्लीप्रेमी कार्यकर्त्यांनी नोंद घेने !
- मालोजी
:)
जबरस्त फोटो आणि जबरदस्त धाडस.
बाकी लिंगाणा हा अतिप्राचीन किल्ला आहे. शिवाजीमहाराजांनी मात्र तो बांधलेला नाही. गुहा, पाण्याचे टाके आदी संरचना सातवाहनकाळाची समानता दर्शवतात. हा किल्ला नसून प्राचीन घाटवाटेची एक संरक्षक चौकी असेच याचे स्वरूप आहे.
थरारक..
तुमच्या चिकाटीला आणि जिगरबाजपणाला सलाम.
जबरस्त फोटो :-)
जोरदार मोहीमेबद्दल अभिनंदन. वाटेतला काही भाग फारच थरारक वाटला. शेवटुन तिसरा फोटो मस्त! चढकर्यांनी उत्तम रचना केली आहे.
मस्त.. कधी जायचा योग येतोय काय माहित :) :)
तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे..
लिंगाण्यावरील गुहेतून काढलेला रायलिंगाच्या पठाराचा फोटो अप्रतिमकच ..