पाककृती

मिळगाई / मिलगाई / मलगा /मोलाहा पोडी / मुळगंपुडी

Primary tabs

Image removed. साहित्य: १ वाटी चणा डाळ १ वाटी उडदाची डाळ १/२ वाटी पांढरे तीळ ८-१० लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) भरपूर कढीपत्ता ८-१० काळीमिरी १ टीस्पून हींग मीठ चवीनुसार १ टेस्पून तेल Image removed. पाकृ: एका पॅनमध्ये कोरडेचे काळीमिरी भाजून घ्यावी व एका प्लेटमध्ये काढून ठेवावी. त्याच पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून लाल सुक्या मिरच्या व कढीपत्ता परतून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा. त्यात आता चणा डाळ सोनेरी रंगावर परतून घ्यावी, तसेच उडदाची डाळ ही सोनेरी रंगावर परतून घेऊन , प्लेटमध्ये काढून ठेवावी. Image removed. आता त्यात तीळ भाजून घ्यावे. सगळे गार झाले के एकत्र करावे. त्यात हींग व चवीपुरते मीठ घालावे. तळलेल्या मिरच्या व कढीपत्ता घालून मिक्सरवर भरडसर वाटून घेणे (कोरडेच) Image removed. हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. ही चटणी तुम्ही कोरडीच सर्व्ह करु शकता किंवा तीळाचे अथवा खोबर्‍याचे तेल घालून ,मिक्स करून इडली, डोसा, उत्तप्पा, अडई बरोबर सर्व्ह करु शकता. Image removed. तिखट असल्यामुळे ह्याला गन पावडर असे ही म्हणतात. मिरच्यांचे प्रमाणा आवडीनुसार कमी- जास्त करावे. काही लोकं ह्यात मोहरी ही घालतात.
पक पक पक

एकदम खमंग .... :tongue: मि अजुन एक 'मुळ्गा पुडी ' हा शब्द पण ऐकला होता... :)

हो आम्ही पण मुळगंपुडीच म्हणतो :) (आईच्या तामिळ मैत्रीणीने सांगितले होते हे नाव व ही पाकृ पण त्यांची आहे)
दक्षिण भारतात ह्या चटणीला वेग-वेगळ्या नावांनी ओळखलं जातं, काहीजण चटणी पोडी / इडली पोडी असेही म्हणतात :)

'मुळगं' म्हणजे मिरची (लाल) + 'पुडी' म्हणजे पावडर. 'मुळगंपुडी' म्हणजे लाल तिखट.

हिरव्या मिरचीला 'पच्चं मुळगं' म्हणतात.

बॅटमॅन

तमिऴ /मलयाळम मध्ये म्हणतात का असे? कारण कन्नडमध्ये मिरची म्हणजे "मेणशिनकाई" होते.

मल्याळम मध्ये मुळगं म्हणतात.

'पुडी' शब्दाचा एक अर्थ चटणी (कोरडी) असाही आहे.

बॅटमॅन

गनपावडर इडली हा आयटम जंम रोडवरच्या दक्षिणायनमध्ये खाल्ला होता, तेव्हापासून प्रेमात पडलोय या पदार्थाच्या :)

सूड

आयला दक्षिणायन!! पुरलं का ? त्यांची टीचभर वाढण्याची पद्धत बघून साऊथ इंडियन हा एवढासाच भात खातात का असा प्रश्न पडला होता. पहिल्याच भेटीत हे ठिकाण मनातून उतरलं.

बॅटमॅन

क्वांटिटीबद्दल सहमत. पण पुण्यात तरी अशी क्वालिटी अन्यत्र कुठेच नाही पाहिली. जर अन्य कुठे अशी क्वालिटी असेल तर सांग, मला जायला नक्की आवडेल :)

बॅटमॅन

तिकडे कुठे रे?? (बैदवे माटुंग्यातील मद्रास कॅफेमधील रसम इडली छान आहे.)

प्रचेतस

मी हैद्राबादच्या चटनीज् मध्ये हा आयटम खाल्ला होता. लै भारी.
बाकी दक्षिणायनबद्दल सूडशी सहमत.

बाकी गनपावडरची चव बरीचशी आपल्या मेतकूटासारखीच लागते.

रेवती

अगदी भारी!
मला याची पाकृ हवीच होती.
धन्यवाद.
अवांतर- त्या इटुकल्या बरणीचा आकार छान आहे.

Mrunalini

मस्त... परवाच मी इडली सोबत खायला केली होती. मी ह्यात वाटताना एक छोटी चिंच पण टाकली. त्यामुले मस्त चव लागते आंबट-तिखट. next time करुन बघ. :)

शिल्पा ब

हे मेतकुटासारखं खाता येतं का? कसं लागतं चवीला?

इरसाल

एक्दम जबरा चटनी आहे ही.

ह्या च्या बाजुलाच प्रॉन्सची कोरडी चटणी पावडर पण पाहिली इथल्या सुपर मार्केटात.

५० फक्त

इपुड्डे पोडे पोडे पोडे - याचा अर्थ - वाढा चटणी चटणी चटणी असा होत असावा बहुतेक.

वीणा३

रेसिपी सोपी दिसत्ये, नक्की करून बघेन.
अवांतर: तुमचे फोटो नेहमीच छान असतात. खाद्य पदार्थांव्यातीरिक्त अजूनही काही फोटो काढले असतील तर ते पण टाका ना.

रेवती

ही पोडी केली. तू दिलेल्या प्रमाणाच्या निम्मी केली.
मृने सांगितल्याप्रमाणे त्यात घालण्यास चिंच नव्हती म्हणून पेरभर आमसूल घातले.
स्वातीताईने सांगितलेल्या इडल्या केल्या.
खूपच छान तोंडीलावणे आहे हे. पुढच्यावेळी सुधारणा म्हणून आतापेक्षा आणखी बारीक वाटणार आहे.

कवितानागेश

माझी आवडती 'पोडी'. :)
अशा चटणीत कढीलिंबाची पाने सुकवून/ तळून घालायची, आणि एकत्र पूड करायची. ती चटणी पण मस्त लागते.