गडांचा राजा, राजियांचा गड..!!
Primary tabs
इतो राजगडं गत्वा गृहीतं राजदर्शनम्||
वर्षत्रयमितो गत्वा भवद्भिर्यगनुष्ठितम्||
शिवरायांच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड आणि राजगड या दोन्ही गडकोटांना नक्की जायचं हि फारा दिवसांपासूनची इच्छा मनात होती. पैकी गेल्यावर्षी इथल्याच मित्रमंडळींसोबत रायगडला जायचा योग अनपेक्षितरित्या जुळून आला होता. अनं त्यानंतरही सहा महिन्याच्या अंतराने पुन्हा जाणे झाले होते. त्यानंतर मात्र महाराजांच्या आवडत्या अशा राजगडला जाण्याचे वेध मनाला लागले होते. राजगड म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी परत अशातला किल्ला नक्कीच नव्हे. राजगड म्हणजे तीन बाजूस तीन संरक्षक माच्या आणि मध्ये बालेकिल्ला! आणि तो पाहायचा असेल तर निवांत मुक्काम ठोकूनच पाहावा लागतो. संपुर्ण गड बारकाईने पाहायला किमान दोन संपुर्ण दिवस तरी हाताशी लागतात. आणि एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असणार्या गडावर जायचे म्हटल्यास सोबत एखादी जाणकार व्यक्ती ही हवीच. या अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून आपले मिपावरच्या आणि शिवकालाची इंत्यभूत माहीती असणार्या मालोजीरावांना सोबत येण्याविषयी माझा सारखा तगादा सुरू होता. अखेरीस ऑक्टोबरच्या १९ आणि २० तारखेला सुड, मी, मालोजीराव आणि अल्पेश इतक्यांचे राजगडला जायचं नक्की ठरले!
१९ च्या सकाळीच मी आणि अल्पेश पुण्याला पोहचलो. सुड आम्हाला शिवाजी नगर स्टेशनला भेटला. आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे मालोजीरावांना निघायला थोडा उशीर झाला. कात्रजला त्यांना भेटल्यानंतर सकाळी ११ वाजता तीन दुचाकींवरून आम्ही ५ जणांनी राजगडाला प्रयाण करण्यासाठी कात्रज घाटाच्या दिशेने गाड्या वळवल्या. पुणे ते राजगड(पायथ्याचे भोसलेवाडी) हे अंतर साधारण ६० किमीचे आहे. पुणे-बेंगलोर हायवेला आल्यानंतर खेड-शिवापूर पासून काही किमीवर नसरापूर फाटा लागतो. तिथून उजवीकडे वळाल्यानंतर आपण राजगडच्या मार्गाला लागतो. फाट्यावरून आत वळल्यानंतर बनेश्वर हे त्याच नावाचं महादेवाचं अतिशय पुरातन मंदिर असणारं गाव लागतं. मालोजींचा सासवडवरून येणारा मित्र करंजावणे गावी येऊन आम्हाला मिळाला तोपर्यंत दुपारचे दोन वाजत आले होते. तिथून पुढे दुपारच्या टळटळीत उन्हात ३ वाजता राजगडच्या पायथ्याशी असणार्या वाजेघर मार्गे पाल(पुर्वीचे शिवापट्टण) या गावी आम्ही पोहचलो तेव्हा माथ्यावरचं ऊन चटका देत होतं पण समोरच दिसणार्या राजगडाच्या दर्शनाने अंतर्मनाला एक थंडावा मिळाला होता. पाल गावातून आम्ही पुढे भोसलेवाडीत पोहचलो आणि गड चढायला सुरूवात केली. याच पाल गावात पुर्वी एक राजवाडाही होता, जिथे शिवरायांच्या पत्नी सईबाई निवास करायच्या. मृत्यूनंतरची त्यांची समाधीही आपल्याला तिथेच पाहता येते. राजगडावर येणार्या बहुतेक लोकांना बालेकिल्ल्यावर सईबाईंची समाधी असल्याची चुकीची माहीती दिली जाते.
राजगडावर जाण्यासाठी तशा ४ ते ५ वाटा सध्या आपल्याला पाहता येतात. पैकी त्यातली एक वाट गडाच्या पायथ्याशी असणार्या वाजेघर या गावातून जाते. या वाटेने गेल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पाली दरवाज्याने आत शिरतो. या वाटेला राजमार्ग असेही म्हणतात कारण हा मार्ग बराच प्रशस्त असा आहे. दुसरी वाट म्हणजे मार्गासनी गावातून जाणारी वाट. नसरापूर फाट्यावरून आत वळल्यानंतर वेल्ह्याकडे जाताना एकए ठिकाणी राजगडला जाण्यासाठी आपल्याला डावीकडे वळावे लागते तेच मार्गासनी हे गाव होय. मार्गासनी या शब्दाचा विग्रह केला असता आपल्याला मार्गातील आसन म्हणजे वाटेत मांडलेले आसन-तळ असा अर्थ आढळून येतो. राजगडखाली असणार्या पायदळ सैन्याच्या तळाकडे जाण्याचा हाच मार्ग असावा. अर्थात तळाचा मुक्काम हा गुंजवणे नदीच्या काठीच असावा असं म्हणता येईल. मार्गासनी गावातून साखर मार्गे गुंजवणे गावात आपल्याला जाता येते. या गावातून एक वाट गडावर जाते. हि वाट बरीच बिकट असून या वाटेने गडावर पोचायला किमान अडीच ते तीन तास लागतात. याच गावातून घनदाट जंगलातल्या एक वाटेने गुप्तदरवाज्यामार्गे आपल्याला सुवेळा माचीवर पोचता येते.
राजगडाच्या डोंगरांचा इतिहास पाहू गेलं तर आपल्याला हा डोंगर सातवाहनपूर्व म्हणजे २००० वर्षांपुर्वीपासून असल्याचे आढळून येतं. दंतकथानुसार ब्रम्हर्षी ऋषींचे वास्तव्य आणि त्यावरून स्थापन झालेले ब्रम्हेश्वराचे मंदिर यावरून हा डोंगर बराच जुना असावा. याच ब्रम्हेश्वराच्या नावावरून आधी बिरमदेवाचा डोंगर मग बहामनी राजवटीत मुरूंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखलं जात होतं. मावळ भागात स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी शिवरायांना एका बुलंद, बेलाग, बळकट जागेची आवश्यकता होती आणि त्यासाठी हा मुरूंबदेवाचा डोंगर अतिशय दुर्गम असून स्वराज्याच्या राजधानीसाठी योग्य आहे हे शिवरायांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. १६४७ च्या सुमारास हा किल्ला महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर, तोरण्यावर मिळालेल्या धनाचा सदुपयोग करत त्यांनी या गडाच्या बांधकामाला सुरूवात केली आणि टप्प्या-टप्प्याने बांधकाम पुर्ण करत १६६२-६३ साली राजगड पुर्णत्वाला नेला. याच्या बांधकामावेळी महाराजांना अनंत अडचणी समोर उभ्या ठाकल्या. डोंगराच्या तीन सोंडांना बांधून त्यांना पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी असे नाव दिले तर मधल्या बुधल्यावर बालेकिल्ला वसवला आणि स्वराज्याची पहिली वाहीली राजधानी म्ह्णून निवड केली. किल्ल्याच्या प्रचंड विस्तारा मुळे त्याला एकाऐवजी पद्मावती, सुवेळा, संजीवनी आणि बालेकिल्ला असे चार किल्ले म्हणून गृहीत धरायचे. आणि प्रत्येकाची वेगळी व्यवस्थाही होती, जसे की सरनौबत, बंकी, सबनीस आणि सदरही वेगळी ठेवण्यात आली होती.
१. स्वराज्य स्तंभ : नसरापूर फाट्यापाशी आत वळण्याआधी डावीकडे थोडी चढण चढून गेल्यावर आपल्याला हा स्वराज्य स्तंभ पाहायला मिळतो. छत्रपती शिवरायांनी मावळ खोर्यातून तोरणा किल्ला जिंकत आपल्या स्वराज्य स्थापनेची सुरूवात केली. या घटनेला ३०० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्यपुर्व काळात तत्कालीन भोरचे राजे श्रीमंत रघूनाथराव पंडीत यांनी हा स्वराज्य स्तंभ बांधला.
२.
३. मार्गासनी गावातून पुढे निघाल्यानंतर झालेले राजगडचे दर्शन
४. बालेकिल्ला आणि त्याखाली दिसणारी पद्मावती माची.
५. वाजेघर या गडाच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर गडाच्या वाटेवरून दिसणारा राजगड.
६. थोडे पुढे गेल्यानंतर डावीकडे दिसणार्या पद्मावती माचीसह बालेकिल्ल्याचा बुधला.
७. गडाच्या वाटेवर अर्धी चढण चढून गेल्यानंतर आपल्याला संपुर्ण तोरणा पाहायला मिळतो. डावीकडे दिसणारं बुधलामाचीचे टोक, उजवीकडे झुंजारमाची अनं थोडं पुढे मध्यभागी बालेकिल्ला.
८. बालेकिल्ल्याचा बुधला आणि वरच्या बाजूस दोन्ही टोकांना दिसणारे उत्तर दक्षिण बुरूज.
९. वाजेघर मार्गे निम्म्यावर गेल्यानंतर आपल्याला पायर्या सुरू होतात.
१०. संजीवनी टोक.
११. पद्मावती टोक.
१२. जवळ जवळ तासाभराची चढाई केल्यानंतर दृष्टीक्षेपात आलेला म्यान दरवाजा.
१३. या म्यान दरवाज्याची रचनाच अत्यंत वैशिष्ठ्यपुर्ण अशी आहे. खालच्या पाल उर्फ शिवापट्टण या गावातून येतेसमयी किल्ल्याचे मुख्य द्वार नेमके कुठे आहे याची शत्रूला कल्पना नसावी या हेतूने हा दरवाजा मुद्दामून आतल्या बाजूस दक्षिणाभिमुख बनवण्यात आला. या दरवाज्यापर्यंत जाणारी वाटही तशीच वळणावळणाची बनवण्यात आली आहे. यदाकदाचित शत्रू दरवाज्यापर्यंत पोहचलाच तरी त्याला आजूबाजूला किंवा मागेपुढे सरकण्यास बिलकूल वाव मिळत नाही आणि तो मागच्या बाजूने बालेकिल्ल्यावरून आणि पुढून पाल महाद्वाराच्या तटबंदीतील जंग्यांमधून अशा दुतर्फा मार्यात अडकला जातो. या दरवाज्यापाशी असणारा पहारेकरी हा गडामध्ये प्रवेश करणार्याची प्राथमिक चौकशी करून त्याची माहीती पुढील महाद्वाराच्या दौलतबंकीकडे पोचवत असे.
१४. बालेकिल्ल्यावरील बुरूजाच्या टप्प्यात येणारा म्यान दरवाजा.
१५. या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे असणारा पहारेकर्यांचा कक्ष. या कक्षावर एक सज्जाही आहे जिथून खालच्या संपूर्ण रहाळावर नजर ठेवता येते.
१६.
१७. बर्यापैकी सुस्थितीत असलेला राजगडाचा राजदरवाजा. खाली असणार्या पाल उर्फ शिवापट्टण या गावातून येणारी वाट असल्यामुळे याला पाल दरवाजा असेही म्हटले जाते. म्यान दरवाजा ते या महाद्वारापर्यंतचा मार्ग गोमुखी पध्दतीचा दिसतो. जाताना डावीकडे असणार्या तटबंदीच्या जंग्यामधून पद्मावती माचीच्या चढणीच्या मार्गाने येणार्या शत्रूकडे लक्ष ठेवता येते.
१८. राजदरवाजा बाहेरील बाजूने.
१९. राजदरवाजा आतील बाजूने. आणि याच दरवाज्यात उभे राहीले असता आपल्याला समोरच स्वराज्याचं प्रथम तोरण म्हणजेच तोरणा किल्ला दृष्टीस पडतो.
शिवरायांना राजधानीसाठी एक असं ठिकाण हवं होतं, जे बाकीच्या किल्ल्यांपासून अगदी जवळच्या अंतरावर असेल आणि
जिथून त्यांना आपल्या संपुर्ण प्रदेशावर लक्षही ठेवता येईल. आणि म्हणूनच त्यांनी राजगडाची निवड केली. राजगडावरून आपल्याला तोरणा, सिंहगड, पुरंदर, रायगड, प्रतापगड, लिंगाणा, वज्रगड, रोहिडा, रायरेश्वर, लोहगड-विसापूर, शिवथरघळ ते पार महाबळेश्वरापर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो.
२०. महादरवाज्याने आत शिरल्यानंतर उजवीकडे हा अस्पष्टसा शिलालेख पाहायला मिळतो.
२१. तसंच उजव्या अनं डाव्या बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. पैकी त्यातल्या उजव्या बाजूस गडाच्या दौलतबंकीची म्हणजे सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पहारेकर्यांच्या मुख्य अधिकार्याची चौकी आपल्याला पाहायला मिळते. दौलतबंकी म्हणजेच तटसरनौबताच्या हाताखालील अधिकारी होय.
२२. डाव्या बाजूची पहारेकर्याची देवडी.
** पद्मावती माची **
गडाचा राजदरवाजा पार केला तेव्हा संध्याकाळचे पाच वाजत आले होते. आदल्या दिवशी सुवेळा आणि पद्मावती माची आणि दुसर्या दिवशी उरलेली संजिवनी माची अनं बालेकिल्ला पाहायचा असं आमच्या सेनापतींनी उर्फ मालोजीरावांनी आधीच ठरवलं होतं. त्यानुसार आमचा कार्यक्रम सुरू होता. मुक्काम पद्मावती माचीवर असणार्या पद्मावती देवीच्या मंदिरात करायचं आधीच ठरवलं होतं. त्यानुसार मंदिराच्या दिशेने झपाझप पावले उचलायला आम्ही सुरूवात केली. गडावर मुक्कामची सोय तशी पर्यटकांसाठी असणार्या निवासातही करता येते, तशीच ती देवीच्या मंदिरातही होते. एकाच वेळी अंदाजे १०० लोकं मुसळधार पावसात अंगावर एक थेंबही न पडता आणि थोडासाही वारा न लागता देवीच्या मंदिरात आरामात राहू शकतात इतकं ते मंदिर सुरक्षित आहे.
२३. महादरवाजातून आत शिरल्यानंतर पद्मावती माचीकडे जाताना आपल्याला हा राणीवसा नावाचा तलाव दिसतो. या तलावाच्या ईशान्येस माता जिजाऊसाहेबांचे निवासस्थान होते.
२४. दिशा दाखवणारा साधारण स्वरूपातील नकाशा.
२५. पद्मावती माचीवरील देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूस असणारे रामेश्वराचे पुरातन मंदिर.
२६. पद्मावती देवीचे मंदिर.
देवीच्या स्थापनेबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, पुराणकाळात ब्रम्हदेवाचा एक शिष्य या डोंगरावर वास्तव्यासाठी आला. मग त्याने त्या डोंगराच्या सर्वात उंच ठिकाणी आपल्या देवाची म्हणजेच ब्रम्हाची स्थापना केली आणि डोंगराच्या एका बाजूचे सोंडेवर जिथे सपाट आणि विस्तृत जागा होती, तिथे ब्रम्हाच्या पत्नीची म्हणजेच पद्मावतीची स्थापना केली. काळानुसार मंदिरात अनेक बदल झाले असतील, परंतू देवीचे स्थान मात्र आहे त्याच ठिकाणी राहीले. मंदिरातील सध्याची मुर्ती ही भोर संस्थानातील राजाने स्वातंत्र्यपुर्व काळात बसवली आहे. त्याच्याच बाजूला शिवरायांनी स्थापन केलेली मुर्ती आपल्याला पाहायला मिळते. सध्यस्थितीतील मुर्ती ही जुन्या मुर्तीनुरूप बनवण्यात आली आहे. चतुर्भूज असणार्या या
देवीच्या उजव्या हातात मुद्गल, डाव्या हातात चक्र, एक हात कटीबध्द तर दुसरा अर्पणमुद्रा अवस्थेत आहे.
२७. भोरच्या राजाने प्राणप्रतिष्ठा केलेली गाभार्यातील मुर्ती आणि डाव्या बाजूस शिवराय स्थापित पद्मावती देवीची मुळ मुर्ती.
२८. आत्ता दिसणारे बांधकामही भोरच्या राजानेच केलेलं आहे.
२९. मंदिराच्या डावीकडे, खालच्या बाजूस थोडं उतरून गेल्यास आपल्याला पद्मावती तलाव दिसतो. हा तलाव राजगडावरील आकाराने सर्वात मोठा तलाव आहे. देवीच्या नावावरून माचीला तसेच या तळ्यालाही नाव पडले. तलावाच्या दोन्ही बाजूस तटबंदीयुक्त बांधकाम केलेले असून दोन्ही बाजूस तलावात जाण्यासाठी द्वार बनवले आहेत.
३०.
३१.
३२. गडावर असणारे अठरा कारखाने.
३३. पद्मावती तळ्याच्या खालच्या बाजूस हा चोरदरवाजा दिसतो. गुंजवणे गावातून येणार्या वाटेने आपण या दरवाज्यापाशी येऊन पोचतो. या वाटेने गड चढण्यासाठी जवळ जवळ तीन तास लागतात.
३४.
३५.
इतर दोन्ही माच्यांच्या तुलनेत पद्मावती माची ही गडावरची एकमेव प्रशस्त आणि महत्वाची माची असल्यामुळे तेथे गडावरील शासकीय अधिकार्यांची निवासस्थाने, अठरा कारखाने, महाराजांचा राहता राजवाडा, अंबरखाना, सदर इत्यादी इमारती बांधल्या गेल्या. राजगडाचे स्थापत्य विशारद मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीरांचा वाडा, निळोपंत मुजूमदारांचा वाडा या शिवकालीन अधिकार्यांची निवासस्थाने सध्या पाहायला मिळतात.
३६. अंबरखाना
३७. राजवाड्याचे अवशेष
३८. पद्मावती माचीवरील तटसरनौबत सदर. गडाच्या प्रत्येक माचीवर न्याय निवाड्यासाठी एक सदर बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. गाव पंचायतीतील अनेक प्रकाराचे तंटे या सदरेवर सोडवले जात. आणि वादी-प्रतिवादींचे इथेही समाधान झाले नसल्यास त्यांचा न्यायनिवाडा दिवाण-ई-आम मध्ये होत असे. शिवकाळात १६६१ ते १६६५ या कालावधीत कडतोजी गुजर हा या माचीचा तटसरनौबत होता. या सदरेखालीच एक छोटेसे तळघर आहे जे गुप्त खलबतींसाठी बनवले गेले. काही जणांच्या मते हे तळघर गुप्त खलबतखाना नसून निवाडा झालेल्या गुन्हेगार व्यक्तीला कच्च्या कैदेत ठेवण्याची जागा होती.
३९. तळघर.
४०. याच सदरेच्या बाजूस सुवेळा माची आणि बालेकिल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे.
** सुवेळा माची **
बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूने सुवेळा माचीकडे जाण्यासाठी एक चांगली पायवाट आपल्याला पाहायला मिळते. या वाटेने जाताना काही अंतर गेल्यानंतर गुंजवणे दरवाजा लागतो, या दरवाज्यावर असणार्या गजान्तलक्ष्मीच्या शिल्पामुळे आणि एकुणच हेमांडपंथी पध्दतीच्या बांधणीमुळे हे यादवकालीन बांधकाम वाटते आणि राजगड हा शिवकालीन नसून यादवकालीन म्हणजेच दोन हजार वर्षे जुना असल्याची साक्षच पटते. राजगड ताब्यात आल्यानंतर महाराजांनी पुर्वेकडे असणार्या निमुळत्या सोंडेंवर भक्कम बांधकाम करून तिला सुवेळा असे नाव ठेवले. इतर दोन्ही माच्यांच्या तुलनेत सुवेळा माची अत्यंत कमी रूंदीची आणि टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसते. असे असले तरी लष्करी संरक्षणाच्या दृष्टीने विचार करता या माचीवर तीन टप्पे आहेत जिथून शत्रूवर सहजरित्या मारा करता येऊ शकेल.
४१. कमी रूंदीची आणि पुर्वेकडे निमुळती होत गेलेली सुवेळा माची.
४२. सुवेळाच्या वाटेवर....बालेकिल्ला संपल्यांनतर थोडीशी सपाटीची जमिन सुरू होते, जिथून आपल्याला संजिवनी माची पाहता येते. इथेच सुवेळावरील तटसरनौबताची थोडी कमी उंचीची सदर आहे. पद्मावतीवर कडतोजी गुजर तर सुवेळावर संताजी सिलिंबकर हा तटसरनौबत पदावर होता.
४३. सुवेळावरून दिसणारं गुंजवणे गाव आणि आजूबाजूचा परीसर.
४४. माचीवरचा पहिला टप्पा म्हणजे हा झुंजार बुरूज. वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून, लष्करी संरक्षणाच्या दृष्टीने आणि टेहळणीसाठी अतिशय उपयुक्त! या बुरूजावर तोफेसाठीच्या जागेवर उभे राहीले असता आपल्याला त्या तोफेच्या पल्ल्याचा अंदाज येतो. आकार नसलेल्या खडकावर कौशल्य पणाला लावत अतिशय उपयुक्त असा बुरूज मोरोपंतांनी उभा केला आहे. म्हणूनच माचीच्या टोकावरून पाहीले असता आपल्याला हा बुरूज हत्तीप्रस्तरवरील अंबारीच भासते.
४५. झुंजार बुरूजाच्या उजवीकडील पायर्या उतरल्यानंतर एक दरवाजा ओलांडून आपण तटबंदीच्या वाटेला लागतो. तिथेच उजव्या बाजूस तटबंदीमध्ये श्रीगणेशाची शेंदूरलेपीत मुर्ती पाहायला मिळते. याच्याच खाली दोन हात उंचीचा एक घडीव दगडी चौकोन पाहायला मिळतो, जो सुवेळा माचीचे तटसरनौबत संताजी शिळीमकर यांचा वीरगळ आहे. १७०३ च्या लढाईत औरंगाजेबासोबत प्राणपणाने झुंज देताना त्यांना वीरमरण आले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा वीरगळ तिथे सुवेळा माचीवर आपल्याला पाहायला मिळतो. या दगडी चौकोनाच्या अग्रभागी दिवली ठेवण्यासाठी एक खोबण केलेली असते.
४६. गणपती मुर्तीच्या थोडे पुढे गेल्यास हे आपात्कालीन द्वार आहे.
४७.
४८. झुंजारमाचीखालील हत्तीप्रस्तर. नैसर्गिक खडक आहे पण समोरच्या बाजूने पाहीले असता याचा आकार हत्तीसारखा दिसतो म्हणून याला हत्तीप्रस्तर म्हणतात. यात एक नैसर्गिक नेढंही आहे.
४९. बिनीच्या बुरूजावरून दिसणारा हत्तीप्रस्तर आणि त्यावर अंबारीवत भासणारा झुंजार बुरूज!! आहे की चमत्कार?!!
५०. लांबून काढलेला फोटो. सांयकाळच्या संधीप्रकाशात हत्तीप्रस्तर, मागे डुब्याचा डोंगर आणि बालेकिल्ला!
५१. सुवेळा माची, शेवटचा बिनीचा बुरूज, कातरवेळ आणि सहा मावळे!! :)
सुवेळाच्या शेवटच्या टोकावर पोचलो तेव्हा सुर्य अस्तास गेला होता. माचीच्या टोकावर भणाणत्या गार वार्यात त्या कातरवेळी डोळे मिटून काही क्षण निवांत बसून राहीलो. मनातून एक प्रकारचा आनंद ओसंडून वाहत होता. राजगड दौर्याची आजच्या दिवसाची सांगता पद्मावती आणि सुवेळाच्या सोबतीने झाली होती. सांयकाळच्या त्या अंधुकश्या प्रकाशात माचीवरील चुन्याचे हौद, शेतखाने, पाण्याची टाकी, तटबंदीतील भुयार, माचीचा गुंजवणे कडील दरवाजा इत्यादी ठिकाणे पाहून मुक्कामाच्या ठिकाणी परत निघालो. पौर्णिमेनंतरचा दिवस होता पण अजून चंद्रोदय झाला नसल्यामुळे सार्या आसमंतात काळोख पसरला होता.
५२. उगवली शुक्राची चांदणी...
५३. चंद्रोदय
पद्मावतीवर पोहचेतो चंद्रोदय झाला अनं संपुर्ण राजगड चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाहून निघाला. मंदिरापास पोहचल्यानंतर त्यांच्या प्रांगणात आमच्या गप्पांना जोरदार ऊत आला. व्हॉट्सअॅपवरील बॅनरबाजी, मोबाईलच्या नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या या विषयांवर बरीच चर्चा झाली. मग 'होऊ दे खर्च' म्हणत सगळ्यांसाठी चहा सांगण्यात आला. चहा आणि वर्ल्डका सबसे ज्यादा बिकनेवाल्या बिस्कुटांचा फडशा पाडल्यानंतर मंडळी परत गप्पांमध्ये दंग झाली. मधल्या काळात मालोजीरावांनी रात्रीच्या जेवणासाठी मंदिरातल्या मावशींकडे झुणका-भाकरीची ऑर्डर देऊन टाकली. तोपर्यंत चांदोमामाही बराच वर आला होता.
५४.
गप्पागोष्टी करत रात्री साडेदहाला जेवणे झाली अनं आमच्या काही बहाद्दरांनी लगेचच अंथरूणं टाकत निद्रादेवीची आराधना करायला सुरूवात केली. थोडासा बाहेर फेरफटका मारावा या हेतूने अस्मादिक, सुड आणि अल्पेश पद्मावती तळ्याच्या खालील बाजूस मोकळ्या जागेत येऊन थांबालो. तो आधीच तिथे दोघेजण बॅटर्या घेऊन 'काहीतरी' करत होती. आम्ही चोर दरवाज्याकडे जायला निघणार तोच त्यातल्या एकाने बॅटरीचा उजेड आमच्या डोळ्यावर टाकत "पुढे धोका आहे" असा इशारा दिला. पहिल्यांदा मला काहीच कळेना, मग आमच्या॑ भाषाप्रभूंनी आम्हाला त्या शब्दांमागचा 'खरा' अर्थ समजावून सांगितला. सुधांशू महारांजाना हसता हसता पुरेवाट झाली. मग रात्री मंदिरात जावून जे झोपलो ते पहाटे साडेचारलाच जागा झालो. मंडळी उठायची बाकी होती मग मी आणि सुड पहाटेच्या त्या गार वातावरणात सुवेळाकडे फेरफटका मारायला गेलो. परत आलो तोवर बर्यापैकी उजाडू लागलं होतं. आम्ही परत येईतो बाकीची मंडळी उठून बसली होती, मग सकाळचा चहा आणि बिस्कीटे घेऊन मंदिरामागच्या तटबंदीवर जावून बसलो. समोर तोरणा निवांत पहुडला होता आणि त्याच्या मस्तकी चंद्र आपली रात्रपाळी पुर्ण करून विश्रांतीला निघाला होता.
५५.
५६.
इकडे तांबडफुटी झाली अनं पुर्वेकडून सुर्यनारायणही जमिनीच्या गर्भातून हळूहळू वर येत आपला गडद केसरी रंग संपुर्ण आसमंतात मुक्तहस्ते उधळू लागले.
५७.
५८. गगन सदन तेजोमय....
** बालेकिल्ला **
पहाटे सहाला सगळं उरकून आम्ही सर्वांनी बालेकिल्ल्याच्या दिशेने आमचा मोर्चा वळवला. पद्मामती माचीवरील तटसरनौबताची सदर ओलांडल्यानंतर उजवीकडे एक मार्ग आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो. या मार्गावरून थोडे पुढे गेले असता झेंड्याच्या निशानाची जागा आपल्याला पाहता येते. तिथून उजवीकडचा मार्ग संजिवनीमाचीकडे तर डावा मार्ग बालेकिल्ल्याकडे जातो. डाव्या मार्गाने थोडं पुढे गेल्यास मध्येच आपल्याला परवानगी दरवाजाचे अर्ध अवशेष पाहायला मिळतात. शिवकालात हा दरवाजा अतिसंरक्षित असा मानला जाई. योग्य दस्तावेज आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र असणार्यांनाच कडक चौकशीअंती या दरवाज्यातून आत सोडले जाई.
५९.
पंधरा-वीस मिनिटे सरळ वाटेने चालल्यानंतर खडकात खोदलेल्या एक ते दिड फुटाच्या उभ्या चढणीच्या पायर्या सूरू होतात ज्या पार बालेकिल्ल्याच्या महाद्वारापर्यंत आहेत. बालेकिल्ल्याचं महाद्वार आजही चांगल्या स्थितीत असल्याचं आढळून येतं. जवळ जवळ साडेचार हजार फुट उंचीवर इतका प्रचंड दरवाजा अनं तो ही दोन करड्या पंचकोनी बुरूजांसह बांधणे यासारखं दुसरं आश्चर्य नसावं ये देशी. तत्कालीन सत्ता, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि राजगडाच्या निर्मितीवेळी शिवरायांची आर्थिक स्थिती यांची तुलना करू गेलो तर शिवराय आणि त्यांचं स्थापत्यशास्त्रातलं ज्ञान हे जास्त सरस ठरेल यात शंका नाही.
६०. सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांत झळाळून उठलेलं पंचकोनी बुरूजांसह बालेकिल्ल्याचं महाद्वार!
६१. कमानीदार प्रवेशद्वार त्यावरील शुभ चिन्हांसह.
६२.
६३. आतील बाजूने
६३.
६४. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर समोरच जननी देवीचे मंदिर दृष्टीस पडते.
जननी देवीच्या मंदिरापुढे गेल्यास डावीकडे एक सोपान मार्ग लागतो. तो वर चढून गेल्यानंतर समोरच अर्धवर्तूळाकार तळे दिसते. या तळ्याचा आकार हा अष्टमीच्या चंद्रासारखा दिसतो म्हणून त्याला चंद्रकोर तळे असे संबोधले जाते. या तळ्याच्या उजव्या बाजूस अतिशय पुरातन असे ब्रम्हेश्वराचे मंदिर आहे. जे साधारण दोन हजार वर्षे जुने असावे. ब्रम्हेश्वर मंदिराच्या अगदी मागेच आपल्याला बांधकामचे काही अवशेष पाहायला मिळतात. तिथे लावलेल्या पाटीवरून ती जागा बाजारपेठ असावी असं सांगण्यात येतं. पद्मावती माचीवर प्रशस्त जागा असताना एवढ्या उंचीवर बाजारपेठ असणं हे काही मनाला पटत नाही. ते बांधकाम बाजारपेठ नसून बालेकिल्ल्यातील खाश्या लोकांसाठी लागणार्या अन्नधान्य जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजारी, कडधान्ये साठवण्याची जागा होती.
६५. चंद्रकोर तळे
६६. आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात उतरलेला चंद्रकोर तळ्याचा आणखी एक फोटो.! या फोटोची एक गंमत आहे, जी नीट निरखून पाह्यलं की तुम्हाला कळून येईल. बघा बरं जमतंय का? :)
६७. ब्रम्हेश्वराचे मंदिर
६८. अन्नधान्याचा साठा करण्याची जागा असलेल्या बांधकामाचे अवशेष
६९. दिवाण-इ-खास
७०. बालेकिल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष १
७१. बालेकिल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष २
७२. पाण्याची टाकं, दासींची निवासस्थाने आणि मुदपाकखाना
७३. संजीवनी माची रक्षक बुरूज
७४. याच बुरूजाच्या जंग्यांमधून पाह्यले असता म्यान दरवाजा बरोबर नजरेच्या टप्प्यात येतो.
७५. खजिनागृह उर्फ रत्नशाळा. दुर्दैवाने तिथे कोणीतरी दारूगोळा कोठाराची पाटी लावली होती. सामान्यतः राजवाडा,
राणीवसा, दफ्तरखाना अश्या महत्वाच्या ठिकाणांजवळ दारूगोळ्याची जागा नसते, मग हे कोठार कुठून येणार?
बालेकिल्ला पाहून आम्ही खाली उतरलो आणि पुन्हा त्या मार्गाशी आलो जिथून उजवीकडे संजिवनी माचीकडे मार्ग जातो. परत येईतो नऊ-साडेनऊ वाजत आले होते आणि पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली. मग पुन्हा पद्मावतीवर जाऊन नाश्ता करून परत यावं कि तसंच संजीवनीवर जावं या गोंधळात विचारविनिमय करत असतानाच मागून आलेला आमचा सुपरमॅन सरळ संजीवनीच्या वाटे चालू लागला. मग आमच्यापुढे दुसरा पर्यायच उरला नाही! :)
** संजीवनी माची **
राजगडावरील इतर दोन्ही माच्यांपेक्षा ही माची सर्वाधिक लांबीची आहे, याची लांबी जवळ जवळ अडीच किलोमीटर इतकी आहे. राजगडाच्या निर्मितीस सुरूवात झाल्यानंतर आधी सुवेळा माची बांधली गेली आणि त्यानंतर या माचीच्या बांधकामाला सुरूवात झाली. सरते शेवटी या माचीचे बांधकाम १६६२ मध्ये पुर्ण झाले. एकुण तीन टप्प्यात माची विभागली गेली आहे आणि प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरूज बांधले आहेत. एकुण १९ बुरूज या माचीवर आपल्याला बांधलेले आढळतात. इतर दोन्ही माचींप्रमाणे या माचीवरही तटसरनौबताची सदर आहे. या माचीचे वैशिठ्य म्हणजे तीन तिहेरी बुरूज. त्यावेळच्या युध्दशास्त्रानुसार पाहायला गेलं तर या तीन बुरूजांच्या बांधकामाचे महत्व खुप आहे. तिहेरी तटबंदी बांधलेले हे बुरूज गडाखालील शिवापट्टण, मार्गासनी, वेल्हे या गावांवर नजर ठेवण्याचे काम अतिशय चोख करत.
७६. संजीवनीवरील तटसरनौबताची सदर
७७. झुंजार बुरूज
७८. पाण्याचं टाकं आणि दुरवर पसरलेली संजीवनी
७९. मधल्या टप्प्यातील बुरूजावरून...बिनीचा बुरूज!
दुसर्या झुंजार बुरूजाने खाली उतरून डावीकडे वळत दोन तटबंदींच्या मधून सरळ चालत गेल्यास आपल्याला संजीवनी माचीचा मुख्य आळ दरवाजा लागतो. प्रामुख्याने मळे, भुतोंडे या गावातून गडावर येण्यासाठी ही वाट वापरली जायची. आतील बाजूने याच्या दर्शनी भागावर एक शिल्प आपल्याला पाहायला मिळते ज्यात एका हरणाला जमिनीवर उताणे पाडून त्याच्यावर आपले पुढील दोन्ही पंजे ठेवत दोन वाघ अतिशय गर्वाने पाहत आहेत. १५६५ ला तालीकोटच्या लढाईत निजामशाही आणि आदिलशाही या दोन सत्तांनी विजयनगरचे हिंदू साम्राज्य धुळीस मिळवले. याची दर्पोक्ती म्हणून या दोन्ही सत्तांच्या हद्दीत असणार्या बिरमदेवाच्या डोंगरावर त्यांनी हे शिल्प लावले. उताणे पडलेले ते हरण म्हणजे विजयनगरचे हिंदू साम्राज्य आणि त्यावर पंजे रोवून उभे राहीलेले ते वाघ म्हणजे निजामशाही आणि आदिलशाही सत्ता!
८०. आळ दरवाजा.
८१. आळ दरवाज्यावरील वाघांचे शिल्प
८२. बाहेरील बाजूने हा दरवाजा झुंजार बुरूजाच्या मार्यात येतो.
८३. बाह्यभाग. याच्या अग्रभागी पिसारा फुलवलेल्या मोरासारखे चित्र दिसते.
८४. दुहेरी तटबंदीमधून आळ दरवाज्याकडे येणारा मार्ग
८५. बिनीच्या बुरूजावरून...दोन्ही झुंजार बुरूज आणि पाठीमागे बालेकिल्ला! एकाचं संरक्षण करणारा दुसरा अनं दुसर्याचं संरक्षण करणारा तिसरा.!
८६. तोरण्याच्या पार्श्वभूमीवर मानाने डौलत असलेला जरीपटका!
८७. शेवटचा बिनीचा बुरूज आणि पुन्हा एकवार सहा मावळे! :)
८८. परत जातेवेळी डाव्या बाजूच्या तटबंदीमध्ये आढळलेली वीरमारूती आणि व्याघ्रमुख, मकरमुखाची शिल्पे.
८९.
९०.
९१. चिलखती बुरूज क्रं ५ मधील परकोट भुयारी मार्ग
९२.
९३. चिलखती तटबंदीयुक्त संपुर्ण संजीवनी माची.
संजीवनी माची संपुर्ण पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा पद्मावतीकडे निघालो ते परतीच्या प्रवासासाठी. संजीवनी ते बालेकिल्ल्याच्या पायवाटेवर खालच्या म्यान दरवाज्याचे एक दोन सुरेख फोटो आम्हाला मिळाले ते घेऊन थेट पद्मावतीच मंदिर गाठलं. भुक लागली होती तेव्हा तिथल्या काकूंनी बनवलेल्या पोह्यांवर तुटून पडलो आणि मग दुपारी एकच्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागलो.
९४.
९५. आणखी जवळून
९६.
९७. वरचाच फोटो थोडा झुम करून..
९८. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी झेंड्याच्या निशानाची जागा.
जवळ जवळ २४ वर्षे म्हणजे आपलं निम्मं आयुष्य शिवरायांनी राजगडावर वास्तव्य केले. या काळात त्यांना अनेक कडू-गोड अनुभवांना सामोरे जावे लागले. १६६६ च्या सप्टेंबरात आग्र्याहून बादशाहच्या मगरमिठीतून सुटून काही निवडक लोकांसह वैराग्याच्या वेशात ते इथेच राजगडावर जेव्हा पोचले होते तेव्हा जिजाऊ माँसाहेबांना झालेला आनंद शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही. बादशाही फौजांनी सिंहगड ताब्यात घेतल्यानंतर इथल्याच दिवाण-ए-खास मध्ये बसून त्यांनी तानाजी मालूसरेंना सिंहगड घेण्याचे आदेश दिले होते. १६७० च्या फेब्रुवारीला सोयराबाईंच्या पोटी जेव्हा राजाराम महाराज गडावर जन्मले तेव्हा महाराजांनी आपल्या खाश्यांना दिलेल्या दावतीही इथेच झडल्या होत्या. होळी, दसरा यांसारखे सण आधी गडावर साजरे व्हायचे आणि विधी, प्रसादवाटप झाल्यानंतर तोफांना बत्ती दिली जायची. तोफेच्या आवाजानंतरच मग संपूर्ण मुलखात सण साजरा केला जायचा. १६७१-७२ ला राजधानीसाठी रायगडाची निवड केल्यानंतर शिवरायांनी आपली राजधानी राजगडाहून रायगडाकडे हलवली.
तोरणा हे जर घारीचे घरटे असेल तर राजगड ही सिंहाची गुफा आहे हे कुठेतरी वाचलं होतं अनं राजगड पाह्यल्यानंतर या वाक्याची पुरेपूर प्रचिती आली. त्या सिंहाने आपली गुहा इतकी बुलंद आणि बळकट केली होती की शत्रूला त्या गुहेपर्यंत पोचणं कदापी शक्य झालं नसतं.गडावरच्या माच्या,तटबंदी,दरवाजे अजूनही बरेच शाबूत दिसतात याचे कारण म्हणजे मोगलांनी तोडफोड केल्यानंतरच्या काळात संभाजी महाराजांचे पुत्र शाहू छत्रपति यांनी महिना सुवेळा माची ला ३०० रुपये ,संजीवनीस १०० रुपये , पद्मावती माचीस ५०० रुपये आणि देवीच्या साडीचोळीस १०० रुपये आणि ५ गावे असा सरंजाम दिला आणि किल्ल्याची डागडूजी केली. राजगडावर युध्दशास्त्रानुसार त्यातल्या बारकाव्यांना लक्षात घेता केलेल्या एकुण बांधकामावरून शिवरायांचं स्थापत्यशास्त्रातलं असामान्य ज्ञान पाहून मनोमन त्यांना मुजरा घातला जातो.
_/\_
**राजगडाच्या एकुण दौर्यासाठी आणि काही बहुमुल्य माहीतीसाठी मालोजीराजे यांचे विशेष आभार.
अप्रतिम
दंडवत स्विकारा मुवि, फक्त तीन मिनिटात १०० फोटो पाहून एवढं सगळं वाचल्याबद्दल.
आणि भात जर तुमच्यासारख्या बल्लवाने केला असेल तर, नुसता सुवास पण पुरतो...
कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल हों !! ;)
आयला हे बरे आहे....
बिर्याणीच्या नुसत्या वासावरून बिर्याणी कशी आहे? हे सांगता यायला पाहिजे.
आता त्यानंतर शांतपणे आस्वाद घेणे....
"लेख आणि फोटो अप्रतिम" हे सांगायला २/३ मिनिटे पुरतात.
तरी बरे,
मी लेख लिहीतो आणि प्रतिसाद पण देतो, तरी तुम्ही आमच्यावर सुड उगवून आसूड ओढला...
काही जण तर फक्त स्वलेखनमात्र आणि वाचनमात्र आणि स्वब्लॉग जाहीरातमात्र मिपाकर असून पण चालते.
असो....
ह्यालाच खर्याची दुनिया न म्हणता, मिपा दुनिया म्हणावे काय?
हा प्रतिसाद फक्त सूड ह्यांनाच असून, इतरांनी जास्त विचार करू नये.ह्या उप-प्रतिसादांचे काय लोणचे घालायचे? ते बघायला मी आणि सूड समर्थ आहोत.
जिथे तिथे खरे डॉक्टरांना मधे आणत असतात ;)
कमाल फोटो आणी माहितीही !
खतरनाक फोटो आणि झकास वृतांत
क्लास फोटो आहेत.
ओझरतं वाचलं.
सुंदर च आहे. आलो की राजगडाचं दर्शन. बास्स्स!
भारीच रे.... प्रचंड सुंदर वर्णन केलंय. अगदी भन्नाट लेख झालाय. वाचनखूण साठवला आहे :)
फोटो आणि माहिति दोन्हि.
आपला अत्यन्त आभारि आहे.
सुंदर लिखाण ... गेलंच पाहिजे आता राजगडावर :)
झकास !!
णिषेध...
मला कल्पना न देता गेल्याबद्दल...
भा हा री ही ही!
वर्णन, प्रचि दोन्ही झकास! ६६ आणि ९२ एकदम मस्त!
किसन देवा,
आमच्यासाठी न कंटाळता लिहिल्या बद्दल आभार. राजगडावर बर्याच वेळा जाणे झाले आणि प्रत्येक वेळी तो तितकाच आवडतो. एकदा गेल्यावरच राजगडाचे व्यसन लागते आणि आयुष्य्भर ते सुटत नाही.
तुमच्या लेखा मुळे आणि अत्यंत सुंदर फोटोंमुळे राजगडाची परत एकदा सफर झाली.
त्या ६६ नंबरच्या फोटो मध्ये काय मज्जा बघायची ते सांगाना? मला पाण्यात पडलेल्या ढगांच्या प्रतिबिंबात एक चेहरा दिसला. दुसरे काहि असेल तर सांगा.
या वाक्याशी १००% सहमत. पहिल्याच भेटीने राजगडाने एवढी भुरळ घातली की दोन दिवस थांबून, मुक्काम करून पाहीला तरी मनाचे फारसे समाधान झालं नाही.
त्या तळ्याचा एक टोक जिथे बाजुच्या दगडाशी जुळलं गेलंय तिथे एक दोन क्षण एकटक पाह्यल्यानंतर आपल्याला त्या तळ्यात पाणी नसून आकाशाचाच भाग वाटू लागतं आणि डावीकडचा तळ्याचा दगडाशी जुळलेला कठडा हा एखाद्या कमानीसारखा किंवा पुलासारखा भासतो.
अत्यंत सुंदर फोटोज आणि वर्णन.. निव्वळ सुखावलो.. जाणकार व्यक्तिंसोबत राजियाचा गड पाहीलात हे तुमचे सुदैव, आणि तो सुखानुभव तुम्ही आमच्यापर्यंत पोहचवलात, हे आमचं.. :-)
सध्या नुसते फोटोच पाहिले. वर्णन सवडिने वाचीन. मला पण अश्या एखाद्या गडावर रहायला आवडेल. किस्न्या येत्या मार्च मधे काहि प्लॅन करता येईल काय?
खुपच सुंदर..
फोटो बघूनच थक्क झालो, वाचल्यावर काय होईल?
एक विनंती: सहा मावळ्यापैकी कोणता कोण, हे आमच्यासारख्या बाहेरगावी राहणार्यांना कळणार कसे? तेंव्हा तेवढं लिहा.
अप्रतिम फोटो आणि यथासांग लेखनासाठी,
किसनदेवांना मानाचा मुजरा,व सादर प्रणाम!!! __/\__
निवांत बसून शब्द आणी शब्द वाचला, फोटो आणी फोटो निरखला.
शिवाजी महाराज की जय!!
वीस वर्षापूर्वी गेलो होतो. आता बरेच काही बदलले दिसले. जुन्या गोष्टीना उजाळा मिळाला.
भरपुर वेळा राजगडावर गेलो पण एवढी माहिती नव्ह्ती
आजुन एक कारण मिळाले राजगडावर जायला ...........
सुंदर आणि डिट्टेलवार लेख रे.
'मसिरे आलमगिरी' मध्ये मुघल इतिहासकार साकी मुस्तैदखान म्हणतो-
Its circuit is twelve kos. Imagination cannot estimate its height. Its thorny jungles and spectre-haunted chasms can be traversed only by the wind. Nothing can descend on it except rain ! In former days,the 'Adilkhani kings possessed it. The infernal Shiva after gaining possession made terraces three sides around it on a lower level [machi] and there built three strong forts, namely Suvel and Padmavati situated towards Kokan uplands, and Sanjivani on the side of Kokan lowlands ;
he thus made its capture by an enemy impossible.
--
MAASIR-I-ALAMGIRI
A History of the Emperor Aurangzib-'Alamgir
(reign 1658—1707 a.d.)
laird into English and annotated by
JADUNATH SARKAR
बाकी उगा काही -
तो डोंगर त्याहूनही लै लै जुना. किमान १० कोटी वर्षापूर्वीचा नक्कीच. सह्याद्रीच्या जन्मानंतर थोड्याच कालावधीत अस्तित्वात आला असावा. बाकी डोंगरावर बांधकामाच्या काही जुन्या खुणा आढळून येतात त्या सातवाहन कालखण्डातील असाव्यात पण तरीही त्याचे नक्की अनुमान करता येत नाही. पण किमान १००० वर्षे जुने नक्कीच असावे. ब्रह्मर्षींचे मंदिर शिवकालीन पण त्यापूर्वी ब्रह्मर्षींचे मंदिरवजा ठाणे असावे.
राजगडावर अठरा कारखाने कधीच नव्हते. विस्ताराने प्रचंड असूनही गडावर सपाटीची आणि सलग अशी प्रशस्त जागा फार कमी. त्याशिवाय १८ कारखान्यांमधले पीलखाना, उष्ट्रखाना इत्यादी कारखाने गडावर असणे शक्यच नाही.
यादवकालीन नक्कीच असावा. पण यादवकाल म्हणजे ११०० वर्ष जुना. गजान्तलक्ष्मीची शिल्पे बरीच प्राचीन आहेत. त्यामुळे गजान्तलक्ष्मी म्हणजेच यादवकाळ हे गृहित धरता येत नाही. गुंजवणे दरवाजाची बांधणी हेमाडपंती नाही. किंबहुना कुठल्याही गडाच्या दरवाजांची बांधणी कधीच हेमाडपंती नसते कारण तशा बांधणीमुळे गडाला आवश्यक असलेली मजबूती येत नाही.
ह्याला वीरगळ न म्हणता स्मारक शिळा (memorial stone) म्हणणे जास्त उचित ठरेल.
अशा नावांचे तत्कालीन दाखले आहेत का? महाराज सरकारी कचेर्यांना अशी नावे देतील असे वाटत नाही.
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद रे वल्ली. त्या नावांचे दाखले आहेत कि नाही याबद्दल मला फारसे ठाऊक नाही. पण राजगडसंबधीच्या माहीतीमध्ये हे शब्द वाचल्याचं आठवतंय.
संक्षिप्त की विस्तृत नक्कि काय??
विरगळ होती पूर्वी आता फक्त दिवाबत्ती चा दगडी छोटा खांब शिल्लक आहे
अतिशय उत्तम लेख आणि फोटो. पहिला फोटो डेस्क टॉप वर बैक्ग्राउण्ड म्हणून लावला गेला आहे. मला वाटते मिपाच्या भटकंती विभागाचा हा एक आदर्श नमुना म्हणून गणता येईल. यापुढील लेख इतक्या विस्ताराने लिहावे असा मापदंड असावा.
आज सकाळी सकाळी प्रथम हा लेख उघडला आणि काम विसरून प्रत्येक शब्द वाचला, चित्र न चित्र निरखून पाहिले... आजचा दिवस सार्थकी लागला. शिवाजी राजांची पहिली राजधानी लवकरच दोन दिवस तेथे तंबू ठोकून प्रत्यक्ष पाहिलीच पाहीजे अशी खूणगाठ बांधली आहे. तोपर्यंत या व्हर्च्युअल सफरीसाठी किसन शिंदे यांना अनेकानेक धन्यवाद !
सहमत आहे
काय मजा आलीय राव हा धागा ऑफिसमधे काम करता करता असा एखाद्या पेयासारखा घोट घोट अनुभवताना. क्या बात है. आमची राजगड वारी स्टार्ट टू एन्ड आठवली. काय मजा आलेली. काय स्थान आहे... अवर्णनीय! केवळ अवर्णनीय. माझ्या मते, भव्यतेची परिभाषा म्हणजे राजगड !
चला बास झालं यार फोनाफोनी करतो आता ठरवायलाच हवी पुन्हा राजगडवारी.... कान्ट वेट.
खलास फोटो ! आहाहा! सगळेच... सगळेच.
फक्त फोटो पाहिले . माहिती टप्प्याटप्प्याने वाचण्यात येईल.
फोटो अर्थातच सुरेख आले आहेत. किल्ल्यांची अन वास्तूची दुर्दशा पाहून खेद वाटला.
मस्त रे.......!!!
इतक्या व्यवस्थित फोटोसह आणि तपशीलवार माहिती.. अर्थात त्याला मालोजीराजांचा मोठा हातभार असणार म्हणून त्यांनाही धन्यवाद!
५७ क्रमांकाचा फोटो सर्वाधिक आवडल्या गेला आहे..
अतिशय अप्रतिम लेख आणि एकूण फोटो..
सर्वच फोटो killing आहेत. माहिती टप्प्याटप्प्याने वाचण्यात येईल.
मला विशेष आवडले ते नं ८६ , ९२
६६ क्र . च्या फोटो चे वैशिष्ट मला असे जाणवले कि ते तळे चंद्रकोर आकारासारखे आहे.
६५ व्या फोटोच्या वर तळ्यासंबंधीची माहीती दिली आहे. :-)
निव्वळ अप्रतिम ...
फिरत रहा ..
ऑल टा ई म क्लासिक
सर्वच फोटो अन वर्णन छान आहे.
फोटो क्र. ६६ चे आणखी काय वैशिष्ट्य आहे? काही जाणवले नाही.
किसन द्येवा, विश्वरूप दर्शन झाले. सर्व तलावांचे ,दरवाज्यांचे बुरूजांचे फटू मस्त आलेत. माहितीही ओघवती आहे. मागे सकाळ मधेच एक पॅनोरामिक फोटो आला होता ज्यात एकाच फोटो मधे दहा बारा गडकोटांचे दर्शन होत होते. तुम्हालाही
असा चानस होता . का प्रयत्न केला नाही ?. की दूरवर चे गड अस्प्ष्ट दिसत होते ?
बाकी मला हा गड पहाण्याची फार इच्छा आहे. खुद्द गोनिदा नी हा गड " सोडू" नको असे बजावले आहे. यास्तव तुमचा
हेवा करावा तेवढा थोडाच !
प्रयत्न होता बालेकिल्ल्यावरून तसा…धुकं फार असल्याने किल्ले नीट दिसत नव्हते, फक्त तोरणा,सिंहगड पूर्ण विजीबल होते.
नाईतर पुरंदर-वज्रगड,रायगड,लिंगाणा,रायरेश्वर,कावळा,मोहनगड,पाचगणी, महाबळेश्वर,रोहीडा हमखास दिसतात
किसन देवा, लेख आवडला. सचित्र वर्णन आणि इतिहास वाचतांना मजा आली. \
गडावर जाण्याचा योग यावा.
-दिलीप बिरुटे
फोटो महान आले आहेत! आणी वर्णन पण झकास!! अप्रतिम धागा!!!
फोटो व लेख दोन्ही आवडले..!
मस्त वर्णन आणि अप्रतिम फोटो!
अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिमच.... :)
छान माहिती आणि वर्णन! वल्लीचा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे.
तुमच्या सर्वांच्यात जे स्पिरिट आहे त्याला अभिवादन. अशीच उदंड संरक्षक उर्जा तुम्हाला प्रत्येक गडांमधुन मिळत राहो आणि आम्हा मिपाकरांना तुमच्या माहितीचा लाभ मिळो.
लेख आणि फोटो दोन्ही खूप आवडले.
सुंदर फोटो. राजगड माझा सगळ्यात आवडता गड आहे.
जय भवानी, जय शिवाजी
किसन भाउ
तुमच्या मेहनतीला सलाम !
तुमच्या फ़ोटोग्राफ़ीला सलाम !
तुमच्या रसिकतेला सलाम !
किसन भाउ
तुमच्या मेहनतीला सलाम !
तुमच्या फ़ोटोग्राफ़ीला सलाम !
तुमच्या रसिकतेला सलाम !
किसन भाउ
तुमच्या मेहनतीला सलाम !
तुमच्या फ़ोटोग्राफ़ीला सलाम !
तुमच्या रसिकतेला सलाम !
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
तुमच्या कॅमेर्याला सलाम
कॅमेरा धरणार्या तुमच्या हातांना सलाम
कॅमेर्या मागच्या तुमच्या नजरेला सलाम,
तुमच्या बरोबर आलेल्या सहा मावळ्यांना सलाम,
आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार्या मालोजीरावांना सलाम
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
राजगडाला सलाम, राजगडाच्या सगळ्या वाटांना सलाम
गुंजवणी, वाजेघर, वेल्हे गावांना सलाम
गडावरच्या बुलंद माच्यांना सलाम
अभेद्य बुरुजांना सलाम, डौलाने फडकणार्या भगव्याला सलाम,
तटबंदीला सलाम, तटबंदीवरच्या जंग्यांना सलाम
पायर्यांना सलाम, चोरदरवाज्यांना सलाम, देवड्यांना सलाम, भरभक्कम दरवाज्यांना सलाम,
आणि त्या दरवाज्यांचे रक्षण करणार्या शिवबाच्या मावळ्यांना सलाम
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
गडावरच्या देवळांना सलाम, देवळातल्या सर्व देवांना सलाम,
ब्रम्हेश्वराला सलाम, पद्मावतीला सलाम, मारुतिला सलाम,
रामेश्वराला सलाम, जननी देवीला सलाम,
चोरदरवाज्या जवळच्या गणेशाला सलाम
बालेकिल्याला सलाम, कारखान्यांना सलाम, दिवाणखान्याला सलाम,
सदरेला सलाम, अंबरखान्याला सलाम, तळघराला सलाम
हत्ती प्रस्तराला सलाम, नेढ्याला सलाम,
चंद्रकोर तळ्याला सलाम, तळ्यातुन दिसणार्या पुलाला सलाम
राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला सलाम
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
गडावर जाणार्यांना सलाम, आणि न जाणार्यांनाही सलाम,
नुसतेच फोटो बघुन समाधान मानणार्यांना सलाम,
गडावर कचरा करणार्यांना सलाम, दारु पिणार्यांना सलाम
भिंतींवर, दगडांवर नावे कोरणार्यांना सलाम
गैरवर्तन करणार्यांना सलाम, ते गैरवर्तन मुकाट बघणार्यांना सलाम
गडाच्या चौकिदाराला सलाम,
आणि गडावरचा कचरा खाली उचलुन आणण्याचा प्रयत्न करणार्यांना सलाम
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
शिवबाचा जयजयकार करणार्यांना सलाम आणि न करणार्यांनाही सलाम
शिवबाला जातीपातीच्या हीन राजकारणात अडकवु पाहाणार्यांना सलाम
त्यांचे असे करणे निमुट सहन करणार्या सामान्य जनतेला सलाम
शिवबाचे विचार पुढे नेउ पहाणार्या शाहिरांना सलाम
स्वराज्याला सलाम, स्वराज्याच्या प्रत्येक नागरीकाला सलाम,
दादोजी कोंडदेवांना सलाम, रामदास स्वामिंना सलाम, तुकाराम माहाराजांना सलाम
शंभुराजांना सलाम, सईबाईना सलाम, सोयराबाईना सलाम,
शिवबाच्या सर्व सरदारांना सलाम, अष्टप्रधानांना सलाम,
स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणार्या सर्व मावळ्यांना सलाम
शिवबला शिवाजीराजे बनवणार्या मासाहेबांना सलाम,
आणि सगळ्यात शेवटी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुर्ण करणार्या त्या जाणत्या राजाला त्रिवार सलाम
सलाम प्यारे किसन भाउ तुम्हाला सलाम
बुवा, दंडवत स्विकारा आमचा. _/\_
छान आणि भरपूर फोटो किसनराव .या सुंदर राजगडाचा कचऱ्याचा डोंगर कोण करतात ? २००५ डिसेंबरमध्ये कचरा साफ करण्यासाठी सकाळी स्वारगेटहून एसटीने नऊला गेलो .गुंजवणे येथे असलेल्या हॉटेल्सच्या मागच्या बाजूला खंडीभर पेले ताटल्या आणि बॉटल्स पडलेल्या होत्या .पुढल्या पायवाटेवर गुटखा पाकीटे . चारपाच छत्रीच्या तारा टोके करून नेल्या होत्या .एका काठीला तार बांधली ,टोकत पाकिटे ,ताटल्या वेचल्या .वाटेत एक गाववाला भेटला 'कशाला गोळा करताय ?द्या दरीत लोटून .खाली गावात नका आणू .परवा पुण्याच्या ज्ञानवर्धिनी शाळेच्या मुलांनी पाण्याच्या बॉटल वेचल्या .आता सुट्टया आहेत शनिवार रविवार हजार बाटली पडते .' वरती गेलो .देवळाजवळचा वहीत येणाऱ्यांची नावे लिहून घेणारा सरकारी पगारी माणूस म्हणाला 'रोज मीच कचरा गोळा करतो .' चारच्या बसने परत आलो .मी तरी ठरवले राजगडावर कधिच जायचे नाही .आताची परिस्थिती माहित नाही .गडावरचे भरपूर पाणि आणि निवारा याचा दुरुपयोग होतोय .भिँतींवरच्या नावाचे तर विचारूच नका .
छान आणि भरपूर फोटो किसनराव .या सुंदर राजगडाचा कचऱ्याचा डोंगर कोण करतात ? २००५ डिसेंबरमध्ये कचरा साफ करण्यासाठी सकाळी स्वारगेटहून एसटीने नऊला गेलो .गुंजवणे येथे असलेल्या हॉटेल्सच्या मागच्या बाजूला खंडीभर पेले ताटल्या आणि बॉटल्स पडलेल्या होत्या .पुढल्या पायवाटेवर गुटखा पाकीटे . चारपाच छत्रीच्या तारा टोके करून नेल्या होत्या .एका काठीला तार बांधली ,टोकत पाकिटे ,ताटल्या वेचल्या .वाटेत एक गाववाला भेटला 'कशाला गोळा करताय ?द्या दरीत लोटून .खाली गावात नका आणू .परवा पुण्याच्या ज्ञानवर्धिनी शाळेच्या मुलांनी पाण्याच्या बॉटल वेचल्या .आता सुट्टया आहेत शनिवार रविवार हजार बाटली पडते .' वरती गेलो .देवळाजवळचा वहीत येणाऱ्यांची नावे लिहून घेणारा सरकारी पगारी माणूस म्हणाला 'रोज मीच कचरा गोळा करतो .' चारच्या बसने परत आलो .मी तरी ठरवले राजगडावर कधिच जायचे नाही .आताची परिस्थिती माहित नाही .गडावरचे भरपूर पाणि आणि निवारा याचा दुरुपयोग होतोय .भिँतींवरच्या नावाचे तर विचारूच नका .
आता परिस्थिती बरीच सुधारली आहे
जुन्या आठवणी जाग्या झाल्या तसेच छायाचित्रावरुन सुद्धा गडावर बरेच बदल झाले आहेत असे जाणवते,कारण आयुष्यात सर्वात पाहिलेला पहिला गड हा राजगड होता,पुनश्च धन्यवाद.
सुंदर लिखाण ... अप्रतिम ...
उध्दव ठाकरेने "महाराष्ट देशा" पुस्तक प्रकाशित केले त्यामध्ये "तोरणा हे जर घारीचे घरटे असेल तर राजगड ही सिंहाची गुफा आहे"हा उल्लॆख केला आहे. पुस्तक पण खुप छान आहे विशेष करून photography
राजगडवरचं हे पुस्तकचं आहे हो....
अप्रतिम !
एका लेखात संपुर्ण गडाची सफर घडवलीत किसनरावजी शिंदे पाटील !
आता वीकांती प्रत्यक्षात गडावर जाण्याची वाट पहात आहे :)
किसनरावजी शिंदे पाटील हल्ली लिहित नाही. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा लिहितं व्हावं आणि इतिहासाची सफ़र त्यांच्या चाहत्यांना घडवावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.
गडाची सफर राजियांच्या काळात घेऊन गेली !
बेस्ट च......