Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

MH370 - फ्लाईट डीलेड..

ग
गवि
Tue, 03/11/2014 - 09:49
💬 265 प्रतिसाद
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे. जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन. १९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी. हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?! फोटो आभारः विकीमीडिया बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू. त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते: -रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट. -याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी. बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः - रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही. - रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे". - आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते. MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे. बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी. जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्‍याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं. या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं. वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते. कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये. रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत. अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः शक्यतासंच एकः - जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे. - विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत. - अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं) - हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्‍या दोषामुळे नाही. शक्यतासंच दोनः -या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्‍यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो. पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा. या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो. कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल. ......... जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट. केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव. आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो. फोटो आभारः विकीमीडिया.

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (265)
प
प्रदीप Tue, 03/11/2014 - 15:16 नवीन
लेख आवडला. मलेशियन एयरलाईन्स्च्या विमानात घातपात घडवण्यामुळे नक्की कुठल्या दहशतवादी संघटनेस काय मिळणार आहे, ह्याविषयी मी साशंक आहे. तेव्हा ही शक्यता मलातरी कमी वाटते. राहता राहिल्या तीन, ज्या गविंनी लेखात उल्लेखिलेल्या आहेत-- पहिली तांत्रिक बिघाड, दुसरी विमानचालक क्रूमधील कुणीतरी हे मुद्दाम करणे (१९९७ मधे सिल्क एयरच्या विमानाचा इंडोनेशियामधे झालेला अपघात ह्या कारणामुळे होता, असे म्हटले जाते. ह्याविषयी जाणकारांचे एकमत मात्र नाही). तिसरी ते विमान कुठेतरी इतरस्त्र गेले असावे-- तसे असल्यास आतापर्यंत त्याविषयी काहीतरी समजले असते, तेव्हा ही शक्यता अंधूक वाटते. विमानाच्या प्रवाश्यांच्या व क्रूच्या नातेवाईकांवर अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवला आहे. चिनी व मलेशियन प्रवाश्यांचे नातेवाईक/ आप्तेष्ट निदान तिथल्या तिथेच आहेत, पण मुळच्या मुंबईच्या कोळेकर कुटुंबियांपैकी मोठ्या मुलाच्या मनस्थितीची कल्पनाच करवत नाही. परवा मुंबईच्या एका वर्तमानपत्रात म्हटले होते, की कोळेकर पति- पत्नि, व त्यांचा दुसरा मुलगा, बीजिंगमधे दोन वर्षांपासून स्थाईक झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाकडे चालले होते. हा मुलगा तिथे एकटाच असणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बंडा मामा Tue, 03/11/2014 - 14:49 नवीन
उत्कृष्ट लेख! तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने फार आवडला लेख. काही वर्षापुर्वी बहुतेक रिओ डी जनेरो वरुन फ्रान्सला जाणारे असेच एक बोइंग बेपत्ता झाले होते. जवळ्पास २-३ वर्षानी त्याचा शोध लागला होता. त्यावेळीही अनेकांना कोड्यात टाकले होते. त्याच्याशी ह्या घटनेचे साधर्म्य किती आहे ह्यावर काही माहिती देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 03/11/2014 - 15:05 नवीन
गवि सविस्तर उत्तर देतीलच. पण आजच New York Times मधे ह्या दोन दुर्घटनांची तुलना करण्यात आली आहे, त्यानुसार एयर फ्रान्सचे ते विमान एका क्षणी गायब झाले तेव्हा ते अटलांटिकवर होते, त्या भागाची समुद्रखोली सुमारे ४,००० मीटर्स इतकी आहे. ह्याउलट सदर विमान जिथून गायब झाले, त्या येथील समुद्र बराच उथळ आहे (बातमीनुसार सुमारे ८० मी.). ह्यामुळे एयर फ्रान्सच्या विमानाचे अवशेष सहजी वर आले नाहीत. इथे, उथळ समुद्रामुळे असे होणार नाही, विमान त्या समुद्रात बुडले असते तर आतापर्यंत अवशेष दिसू लागले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
क
कुसुमावती Wed, 03/12/2014 - 07:21 नवीन
एअर फ्रान्स चे विमान अटलांटिक महासागरावरून उडताना गायाब झाले, जिथे पाणी खोल आहे त्यामुळे विमानाची दुर्घटना कळायला, विमानाचे अवशेष मिळायला वेळ लागला. इथे तसे नाहिये, विमान ज्या समुद्रावरून उडत होत तो उथळ आहे. त्यामुळे विमान समुद्रात पडले असते तर,विमानचे अवशेष एव्हाना मिळायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/13/2014 - 03:44 नवीन
काल एका बातमीमध्ये एका तज्ञाचे मत वाचले की केवळ तेथील समुद्राची खोली कमी असणे हा घटक शोधकार्य सोपे करेलच असे आवश्यक नाही. नेमका तो दुवा आता पुन्हा मिळाला नाही. पण नॅशनल जिऑग्राफिक मधील ही बातमी वाचून या विषयावर बरीच माहिती मिळत आहे.
But shallow waters have their own challenges, Gallo says. "The currents are stronger. Visibility can be horrible, because you are nearer to land and runoff from rivers."
दुवा - Why It's Taking So Long to Find Missing Malaysia Airlines Plane
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुसुमावती
द
दिव्यश्री Tue, 03/11/2014 - 14:51 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/malaysia-military-tracks-missing-jet-to-strait-of-malacca-398848/
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 03/11/2014 - 15:26 नवीन
ह्या दुर्घटनेनंतर काही भारतीय वर्तमानपत्रे बेजबाबदारपणे बातम्या देतांना दिसून आल्या. दुसर्‍या दिवशीच त्यांनी 'हे विमान व्हिएतनाम व मलेशिया ह्यांमधील सामुद्रधुनीत कोसळले आहे' असे वृत्त प्रसिद्ध केले. इतरस्त्र (बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स इ.) जबाबदार वर्तमानपत्रे ह्यावेळी असे म्हणत नव्हती.ती आताही तसे म्हणत नाहीत. आताच थोड्या वेळापूर्वी सदर वर्तमानपत्रांनी 'काही बातमीस्त्रोतांचा हवाला देत, विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीमधे असल्याची बातमी दिली'.(तश्या मथळ्यासकट). पुन्हा इतर जबाबदार साईट्स असे अजूनही म्हणत नाहीत, तसे ध्वनितही करीत नाहीत. मी 'मिड-डे', 'हिंदूस्तान टाईम्स' व मटा ह्या तीन साईट्स पाहिल्या तिथे वरील अनुभव आले. तिन्ही साईट्स एकाच प्रकारे, जवळजवळ एकसदृश्य शब्दरचना करीत होती, तेव्हा ती कुठल्यातरी भारतीय वृत्तसंस्थेवरून ह्या 'बातम्या' घेत असाव्यात.
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Tue, 03/11/2014 - 19:52 नवीन
सी एन एन ने ही बातमी आता कन्फर्म केली आहे. जबाबदार वृत्तसंस्था पूर्ण शहानिशा झाल्यावरच बातमी देतात. पण ही म्हणजे आश्चर्याची हद्द झाली. विमान मागे वळून मलेशियाची भूमी पार करून पलिकडच्या सामुद्रधुनीवरून उडू लागलं, आणि हे एअरलाईनच्या लक्षातदेखिल आलं नाही, आणि आता तीन दिवसांनी समजलं???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
च
चिन्मय खंडागळे Tue, 03/11/2014 - 19:59 नवीन
दुरुस्ती. सी एन एन ने फक्त विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून उडताना शेवटचं ट्रेस झाल्याचंच लिहिलं आहे, सापडल्याचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
ग
गवि Wed, 03/12/2014 - 06:22 नवीन
सेकंडरी रडारचा विमानातला ट्रान्स्पाँडर बंद करुन ते अदृश्य करणं शक्य आहे आणि तसं झालं असेलही. पण प्रायमरी रडार मात्र थेट वस्तूवरुन परावर्तित होणार्‍या सिग्नल्सवरुन माहिती मिळवत असल्याने त्यात हे दिसत राहणार. नेव्हीचे रडार प्रायमरी असल्याने त्यांनी मूळ संपर्क तुटण्याच्या ठिकाणानंतरही सव्वा तास ते विमान ट्रॅक केलं अशी बातमी आल्याने खरोखर वेगळंच वळण लागलं होतं. कारण जिथे मुळात संपर्क तुटला तिथून पुढे वेगळ्याच दिशेत उलटे वळून तब्बल साडेतीनशे किलोमीटर्स अंतर या विमानाने पार केल्याचं यावरुन सिद्ध झालं असतं. म्हणजेच तांत्रिक बिघाड किंवा जागीच डिसइंटिग्रेट हे दोन्ही ऑप्शन्स निकालात निघाले असते. शिवाय प्रायमरी रडारवर विमानाची उंची कळत नाही. त्याउपर, विमान एका विशिष्ट उंचीच्या खाली नेले तर प्रायमरी रडारपासून मुक्त होते. तर या मलाक्का सामुद्रधुनीतल्या पॉईंटनंतर ते अगदी जमिनीलगत उडवले गेले (पाण्यावर) असाही अंदाज करता आला असता. पण... आता मलेशियन नेव्हीने असे मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ट्रॅक केलं असल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे हा सर्व अँगलच नष्ट झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
ड
डँबिस००७ Tue, 03/11/2014 - 15:39 नवीन
ह्या विमानाचा पायलट एक टेक गीक होता, त्याने स्वता:च्या घरी ह्या विमानाचा कॉकपीट उभारला होता, सिम्युलेशन सिस्टीम सकट. जर वैमानीकच ह्यात सामिल झाला असला तर आणि तरच ईतक मोठ विमान नाहीस होऊ शकत. दुसरी शक्यता, आजकाल परग्रहावरचे लोक(एलियंस) ईथे पृथ्वीवर येत आहेत आणि त्यातल्याच कोणी तरी हया विमानाच अपहरण केलेल असाव !! हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/11/2014 - 15:48 नवीन
प्रगत तंत्रातही काही त्रुटि आहेत हे महाशक्तीँना मान्य करावे लागेल अथवा त्यांना जे कळले आहे ते प्रकरण त्यांवरच शेकणारे असेल .या दोनपैकी पहिली गोष्ट लोकांना सांगणे कमी त्रासाचे असावे .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/11/2014 - 15:54 नवीन
जो पायलट उघडपणे खाजगी यंत्र ठेवतो तो प्रामाणिक असावा .परंतु यासाठीच याला टार्गेट करून हे वाईट काम करवून घेतले असेल .
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 03/12/2014 - 06:27 नवीन
फ्लाईट सिम्युलेटर हे अत्यंत कायदेशीर उपकरण असून ते पायलट प्रशिक्षणासोबतच गेम/ छंद म्हणूनही कोणी ठेवू शकतो (परवडत असल्यास). या पालयटचा उड्डाणानुभव १८ हजार तासांच्या वर होता आणि तो १९८१ पासून मलेशिया एअरलाईन्ससोबत नोकरी करत होता. त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण दिसत नाही हे मान्य. उलट तो आपल्या कामावर अत्यंत प्रेम करणारा होता हेच त्या सिम्युलेटरवरुन सिद्ध होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
भ
भाते Tue, 03/11/2014 - 16:12 नवीन
सुमारे २० वर्षांपुर्वी बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल हि विजय देवधर आणि बाळ भागवत (बहुदा अनुवादित) यांची पुस्तके वाचलेली असल्यामुळे याची थोडीफार माहिती आठवत आहे. बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल पद्धल गविंकडुन सविस्तर माहिती जाणुन घ्यायला आवडेल. MH370 संबंधी दहशतवाद्यांकडुन अपहरण किंवा कदाचित बर्म्युडा ट्रँगल सारखे काहीतरी असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 03/11/2014 - 17:05 नवीन
अगदी परवाच मला माझ्या मित्राने विचारलेलं, गविंना विचार ना त्याचं काय मत आहे ह्या फ्लाईटच्या गायब होण्याबद्दल. आता येऊन खरडवहीत लिहायला जाणार आणि हा लेख दिसला... काय कारणे असावीत की काहीच अवशेष किंवा ट्रेस सापडत नाहीत. तिथे गर्द रेन फॉरेस्टसुद्धा आहेत.... काही दैवी चमत्कार होऊ देत हीच प्रार्थना _/|\_ आणि गवि लिहित रहा हो :)
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 03/11/2014 - 17:14 नवीन
प्रचंड अस्वस्थ करणारा लेख... :-(
  • Log in or register to post comments
स
सखी Tue, 03/11/2014 - 18:23 नवीन
वर बंडामामाने म्हटल्याप्रमाणे तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने ब-याच गोष्टी कळल्या, मुख्य म्हणजे यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत हे माहीती नव्हते. त्यांच्या घरच्या लोकांची अवस्था किती कठीण असेल याची फक्त कल्पना करु शकतो आपण. खरचं काहीतरी चमत्कार घडु दे आणि ते सर्व जीव सुखरुप असु देत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 03/11/2014 - 18:45 नवीन
गविंच्या लिखाणाबद्दल वादच नाही. बाकी अन्य काय लिहिणार अशा धाग्यावर? विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!! :(
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/11/2014 - 23:38 नवीन
विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विकास Tue, 03/11/2014 - 18:58 नवीन
आत्ता सीएनएनवर आलेल्या बातमीप्रमाणे विमानातून आलेला शेवटचे कम्युनिकेशन हे कुठून आले यासाठी ट्रेस केले. त्यावरून असे लक्षात आले आहे की शेवटच्या संवादाच्या वेळेस हे विमान त्याच्या नेहमीच्या उड्डाणमार्गापेक्षा शेकडो कोस/योजने दूर असलेल्या एका लहान बेटाजवळ होते. "If the Malaysian Air Force data cited by the source is correct, the aircraft was flying the opposite direction from its scheduled destination and on the opposite side of the Malay Peninsula from its scheduled route." सध्या या शोधकार्यात अमेरीका-चीन-मलेशिया व्यतिरीक्त थायलंड, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलीया, सिंगापूर, न्यूझीलंड हे देश देखील सामील आहेत. त्यातील अमेरीका-ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड यांच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. शोधकार्याचे नेतृत्व मलेशियाकडे आहे. त्या व्यतिरीक्त डिजिटल ग्लोब हे उपग्रहावरून मिळणार्‍या छायाचित्रांवर काम करणारी सेवा सामान्यांच्या मदतीने उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे. कुणास उत्सुकता असल्यास येथे लॉगईन तयार करून सामील होऊ शकता. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 03/11/2014 - 19:45 नवीन
बिजिंगकडे निघालेलं विमान इतकी अद्ययावत यंत्रणा असूनदेखील बँकॉकच्या दिशेने उडालं? म्हणजे मग "गल्ली चुकलं काय वो हे, पीयेल?" बघा, कदाचित येव्हाना मद्रासमध्ये लॅन्डपण झालं असेल! आणि आपल्याला पत्ताच नसेल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आनन्दा Tue, 03/11/2014 - 19:58 नवीन
ख्खिक्क!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्पंदना Tue, 03/11/2014 - 23:46 नवीन
बरीच माहिती मिळाली जी कन्फ्युज करत होती. या आधी एक विमान इंडोनेशियाच्या जवळ्पास कोसळल होतं. अन फक्त एका खुर्चीच्या हातासह तरंगणारा मानवी हात एव्हढच मिळु शकल होतं त्याची आठवण झाली. बरेच नातेवाईक समुद्र किनार्‍यावर जाउन फुले वाहून येत होते. तेंव्हा सुद्धा असच अस्वस्थ वाटल होतं. http://en.wikipedia.org/wiki/Adam_Air_Flight_574 येथे अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 03/12/2014 - 04:39 नवीन
मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला. मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे. जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे. साभार:बेपत्ता विमानाचा गुंता सुटेना
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 03/12/2014 - 08:42 नवीन
को पायलट फरिक अब्दुल हमीद लहान मुलांना,प्रवाशांना(विशेष करून तरूण मुलींना) कॉकपीट पाहण्याची परवानगी देत असे कळले आहे.विमान चालू असताना सिगरेट पीत गप्पा मारणे असे प्रकारही चालायचे. ह्याचा घटनेशी संबंध असेलच असे नाही पण हमीद ह्यांच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जावू शकतो? hameed
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 03/12/2014 - 10:37 नवीन
माझा भाऊ भारतात टुर लीडर आहे , तो महिन्यातून एकदा मलेशिया किंवा चीन आणि जगभरात टुर घेऊन हिंडत असतो. ह्या लेखाचा शेवटची वाक्ये वाचली आणि माझे हात पाय गार झाले. ह्या लेखाच्या आधारावर आता आमच्या जर्मन लोकांमध्ये ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलता येईल जय लखू रिसबूड
  • Log in or register to post comments
V
vrushali n Wed, 03/12/2014 - 11:04 नवीन
http://mh370lost.tumblr.com/?og=1,अस घडलेले असु शकते कय
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 03/12/2014 - 15:14 नवीन
सदर विषयातील माहितगाराने लिहीलेले दिसते. सुंदर माहिती व उहापोह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
थ
थोर्लेबजिराव Wed, 03/12/2014 - 11:50 नवीन
विमनत कोनि महत्वचि व्यकि होति का? कोनि शास्त्रज्ञ व्यक्ती
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 03/12/2014 - 16:14 नवीन
बातमी वाचल्यापासून अस्वस्थ आहे. आता गविंचा माहितीपूर्ण लेख वाचल्यावर आणखीनच अस्वस्थ!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/13/2014 - 01:38 नवीन
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात. आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/13/2014 - 06:35 नवीन
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. जर असं असेल तर... चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? असा विचार करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चिरोटा गुरुवार, 03/13/2014 - 07:23 नवीन
ते अवशेष विमानाचे नाहीत म्हणत आहेत्.चीनने १० उपग्रह त्या दिशेने वळवल्याची बातमी होती. चीनने क्षेपणास्त्र डागले असेल तर ते पुढाकार घेणार नाहीत संशोधनाच्या कामात. China will not give up
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेताळ गुरुवार, 03/13/2014 - 07:37 नवीन
असा खोडसाळपणा करणार नाहीत... अन ते लपणार पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सुहास झेले गुरुवार, 03/13/2014 - 09:19 नवीन
ही शक्यता कमी असली, तरी चिनी सरकारला त्यांच्या नागरिकांची इतकी चिंता नसावी... एक अपघात म्हणून पण सांगायला ते कमी करणार नाहीत.. पण आपण प्रार्थना करत राहूच की चांगली बातमी येवो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नांदेडीअन गुरुवार, 03/13/2014 - 03:21 नवीन
Oil rig worker says he saw Malaysia Airlines Flight MH370 burst into flames http://mobile.news.com.au/world/oil-rig-worker-says-he-saw-malaysia-airlines-flight-mh370-burst-into-flames/story-fndir2ev-1226853302184
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१ गुरुवार, 03/13/2014 - 05:12 नवीन
या मलेशिया एअर लाइन्स ने २-४ वेळा प्रवास केला आहे..अत्यंत वाईट अनुभव..दर वेळेस फ्लाईट डीले, चेक-इन बॅग न मिळण, व्हेज फूड सांगितलेल असताना ते न मिळण अस काही ना काही घडल होतं..तेव्हापासुन मी सगळ्यांना ही एअर लाईन अजिबात घेऊ नका असा सल्ला देते..एकदा तर टोकीयोला जात असताना फ्लाईट तब्बल १८ तास डीले झाली. क्वालालंपूर मधे मुक्काम करावा लागला होता आहे त्या कपड्यांनिशी..माझा नवरा देखील त्या वेळी असच "फ्लाईट डीले" स्टेटस पहात बसला होता..विमानातल्या त्या प्रवाश्यांच काय झाल असेल कोणास ठावूक?? सुखरुप असावेत ही एक वेडी अपेक्षा!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/13/2014 - 07:37 नवीन
आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अ‍ॅनलिसिससाठी लागतो. तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.) हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 03/13/2014 - 08:25 नवीन
तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. कोणत्याही दिशेला...?? म्हणजे खालती समुद्रात पण असू शकेल काय? अपघातामुळे विमान एका जागी पडून इंजिन चालू राहीले असेल अशी शक्यता असू शकेल काय? एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत? http://www.flightradar24.com ह्या वेबसाईटवरून प्रत्येक flight ची real time position दिसते. असे असेल तर ब्लॅक बॉक्स किंवा विमानाचे last GPS co-ordinates मिळाले नसतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आनन्दा गुरुवार, 03/13/2014 - 08:55 नवीन
एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत?
इतके सोपे नाही ते. जीपीएस विदा पाठवणे म्हणजे प्रायव्हसी चा भंग होउ शकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
माहितगार गुरुवार, 03/13/2014 - 12:29 नवीन
रोल्स रॉईसकडे इंजिनाचा डाटा जातो वगैरेची कल्पनाच नव्हती. इंजीनाचा मॅन्युफॅक्चर असला तरी अशा पद्धतीने डाटा मॅन्युफॅक्चरने परस्पर मागवणे डाटा लिंकेज स्थापणे कितपत रास्त समजावे. एखाद्या देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तिच्या विमानाचे इंजीन किती तास चालू होते ह्याने फारशी रिस्क नाही पण ऑपोजीट प्रकारचा डाटा लिंकेज करून विमानांची इंजिने नियंत्रित करणे उपग्रहाच्या स्टाईल मध्ये तांत्रिक दृष्ट्या अशक्य नसेल पण सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारचे परीणाम असू शकतात असा प्रश्न मनात उपस्थित होतो आहे. अर्थात मूळ विमान हरवल्याच्या प्रश्नापुढे उपरोक्त प्रश्न सध्यातरी गौणच समजावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मराठीप्रेमी Fri, 03/14/2014 - 07:51 नवीन
कदाचित परस्पर नसावे, म्हणजे विमाने विकताना जे काही कॉन्ट्रॅक्ट केले असेल त्यात याचा उल्लेख असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चिरोटा गुरुवार, 03/13/2014 - 09:52 नवीन
खाली म्हंटल्याप्रमाणे MH370 मधून डेटा दोनदा आला आहे,टेक ऑफच्या वेळी व बीजिंगच्या दिशेने जाताना.हा डेटा उपग्रहामार्फत रोल्स रॉईसकडे जातो. या शिवाय दर अर्ध्या सेकंदाला हवेतील विमाने आपले co-ordinates जमीनीवर transponder मार्फत पाठवत असतात. MH 370
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/13/2014 - 10:00 नवीन
वाचतो आहे. पण एकूणच सर्व प्रकार डोके सुन्न करणारा आहे. गविंचे अपडेट्स महत्वपूर्ण आणि त्यांच्या अनुभवामुळे विश्वासार्ह आहेत. एवढ्या गंभिर प्रसंगात, २३९ प्रवाशांच्या नातेवाईकांची मनःस्थिती आणि दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन उथळ प्रतिक्रिया टाळाव्यात ही विनंती.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 03/13/2014 - 12:27 नवीन
लिहल्याप्रमाणे अचानक तयार झालेल्या कृष्णविवरातुन प्रवास करुन हे विमान गायब झाले असावे काय? पाण्यात विमानाची इंजिन सुरु रहाणे शक्य नाही.बाकी आपण सर्व कल्पना व्यक्त करु शकतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/13/2014 - 14:33 नवीन
अतिशय दुर्दैवी घटना. प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक यांना शुभेच्छा देण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. या धाग्यामुळे आणि मेडियातल्या बातम्यांमुळे बरीच माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 03/14/2014 - 06:43 नवीन
हे पहा
  • Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी Fri, 03/14/2014 - 07:29 नवीन
मागे गविंनी अशाच एका अपघाताची कहाणी सांगितल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सचिन कुलकर्णी Fri, 03/14/2014 - 07:30 नवीन
ए ऐवजी एक वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन कुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा