Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

MH370 - फ्लाईट डीलेड..

ग
गवि
Tue, 03/11/2014 - 09:49
💬 265 प्रतिसाद
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे. जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन. १९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी. हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?! फोटो आभारः विकीमीडिया बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू. त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते: -रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट. -याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी. बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः - रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही. - रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे". - आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते. MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे. बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी. जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्‍याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं. या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं. वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते. कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये. रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत. अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः शक्यतासंच एकः - जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे. - विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत. - अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं) - हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्‍या दोषामुळे नाही. शक्यतासंच दोनः -या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्‍यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो. पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा. या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो. कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल. ......... जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट. केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव. आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो. फोटो आभारः विकीमीडिया.

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (265)
व
विकास गुरुवार, 08/06/2015 - 15:43 नवीन
विंडोज् , कुशन्स पण सापडल्या :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/06/2015 - 18:25 नवीन
कि मुद्दाम तिथे सापडावं अशी तजवीज करण्यात आलि ?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 08/06/2015 - 20:25 नवीन
कुशन्स आणि विंडोज् म्हणत असाल तर तसे वाटत नाही. बाकीचे पार्ट पण तिथे मुद्दामून आणून ठेवणे केवळ मलेशियाला जमू शकेल असे वाटत नाही. आणि इतरांनी मदत करण्याइतकी इंटरनॅशनल कॉन्स्पिरसई करणे गोपनियता ठेवण्यासाठी अवघड होऊ शकले असते. एक (गंमतशीर म्हणता येत नाही म्हणून) विचित्र प्रकारः त्यांना म्हणे तो पार्ट ७७७ चा आहे हे कळले तरी तो मलेशियन विमानाचाच आहे का याची खात्री करून घेयची होती. पण आजपर्यंत एक MH270 सोडल्यास दुसरे कुठलेच ७७७ हरवलेले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मंदार कात्रे गुरुवार, 03/03/2016 - 11:39 नवीन
http://www.hindustantimes.com/world/mh370-traced-high-possibility-mozambique-debris-from-boeing-777-malaysia/story-DP4eqfGskNtu6V5x5S3slJ.html
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/03/2016 - 12:23 नवीन
ला रियुनियन बेटांवरही सापडला होता एक भाग. मोझांबिकमधेही एकच तुकडा सापडलाय बहुधा. रियुनियनवाल्या तुकड्यालाही असंच परीक्षणांसाठी पाठवलं. हाही पाठवतील. काळ जातोच आहे. प्रत्यक्ष उकल कितपत होतेय ते बघूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/03/2016 - 23:32 नवीन
या बातमीतला ब्लेन गिब्सन हा माणुस गेल्या एक वर्षापासून स्वखर्चाने या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधत फिरत आहे. Tourist who found debris was searching for MH370
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
अ
अत्रन्गि पाउस Wed, 01/18/2017 - 11:36 नवीन
http://beta1.esakal.com/global/three-year-search-malaysia-airlines-flight-370-ends-२६६४०
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 01/19/2017 - 11:15 नवीन
सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली. __/\__ नियती पुढे काही चालत नाही
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 08/16/2023 - 10:10 नवीन
मित्रहो, हा धागा वर काढतो आहे. इच्छुक व्यक्तीनी पुन्हा सर्व घटनाक्रम वाचावा म्हणून.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 08/16/2023 - 10:19 नवीन
Video 1 - FLIR Footage: https://youtu.be/bpiFfp-0abI?t=68 Video 2 - Satellite Perspective: https://www.youtube.com/watch?v=KS9uL3Omg7o Side-by-side comparison of both videos: https://imgur.com/p7NMOTX Original video via Wayback machine: http://web.archive.org/web/20140525100932/http://www.youtube.com/watch?v=5Ok1A1fSzxY काही दिवसांपूर्वी हे पूर्णपणे विस्मृतीत गेलेले व्हिडिओ खोदून वर काढले गेले आहेत. हे व्हिडिओ डिबंक करायला जितकं अधिक खोलात जाऊ तितकं जटील होत आहे. इतकं की हे व्हिडिओ एकतर जगातील बेस्ट होअक्स आहे किंवा निखळ ढळढळीत वर्स्ट सत्य!!! दोनच शक्यता. जर हे बेस्ट होअक्स असेल तर ज्या कुणी हे व्हिडिओ डॉक्टर केले आहेत ती व्यक्ती अल्ट्रा लेव्हल जिनियस म्हणावी लागेल. लवकरच मी या दिवाळी अंकात यावर विस्तृत लेख लिहित आहे. सध्यातरी मी केवळ थक्क झालो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
ग
गवि Wed, 08/16/2023 - 10:57 नवीन
व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण फेक असण्याचा संशय दाट होण्यासाठी काही मुद्दे कारणीभूत ठरत आहेत. १. विमानाच्या नाकाचा आकार आणि व्हरटिकल स्टाबिलयझरचा स्लोप, आणि इंजिन प्लेसमेंट यावरून कोणते तरी एक "बोईंग" कंपनीचे विमान आहे इतके दिसते आहे. पण योगायोग इथे संपतो. २. पहिल्या व्हिडिओ बाबत: तो स्थिर जागेवरून / stable perspective ने चित्रित केलेला आहे. ज्या प्रकारे विमानाचा आकार आणि पूर्ण वळसा दिसतो त्यानुसार जर खरोखर हे शूटिंग आकाशात केलं गेलं असेल तर ते किमान काही किलोमीटर दुरून केलं गेलं आहे. अशा वेळी एक बूम टाइप शॉक वेव्ह इतक्या दूरवर आणि थेट कॅमेऱ्यावर येणे हे अत्यंत कृत्रिम वाटत आहे. ३. दुसऱ्या व्हिडिओ बाबत. हा साटेलाईट perspective म्हटला गेला आहे. पण विमानाचे पृष्ठभाग आणि त्यांचे orientation पाहता तो व्हिडिओ विमानाच्या खालून शूट केला गेला आहे. पहिल्या व्हिडीओत अंधारातील चित्रीकरण आहे. म्हणजे विमान त्या वेळी अंधारात होते. अशा वेळी एखादा उपग्रह जरी सूर्यप्रकाशात असेल तरी विमानाचे चित्रण अंधारातच असले पाहिजे होते आणि ते इतके स्पष्ट (resolution नव्हे, प्रकाश या दृष्टीने) नसले पाहिजे. दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे. या दोन व्हिडीओत असलेले केवळ perspective चे सातत्य पाहता ती एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये तयार केली गेलेली रील वाटते. आणि त्यामुळेच त्यात पॅच वर्क किंवा पिक्सेल अनियमितता सापडू शकत नसावी. अर्थात यात तथ्य आढळल्यास खूप मदत होईलच काय गूढ आहे त्याचा शोध लावण्यात. आणखी एक. मूळ व्हिडिओ जर मार्च १४ मधेच आला होता आणि समजा कोणीतरी सरकार / लष्कर पातळीवर तो काढून टाकला, तर मग आर्काइव्ह डॉट ऑर्ग वरून cached कंटेंट न काढून टाकणे अगदीच दूधखुळेपणाचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
ग
गवि Wed, 08/16/2023 - 10:58 नवीन
ता.क. दिवाळी अंकातील लेखाबद्दल उत्सुकता आहे. वाचनीय असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 08/16/2023 - 14:35 नवीन
विमानाच्या नाकाचा आकार आणि व्हरटिकल स्टाबिलयझरचा स्लोप, आणि इंजिन प्लेसमेंट यावरून कोणते तरी एक "बोईंग" कंपनीचे विमान आहे इतके दिसते आहे.
हा सुपरइंपोज केलेला फोटो. Image removed.
दुसऱ्या व्हिडिओ बाबत. हा साटेलाईट perspective म्हटला गेला आहे. पण विमानाचे पृष्ठभाग आणि त्यांचे orientation पाहता तो व्हिडिओ विमानाच्या खालून शूट केला गेला आहे. पहिल्या व्हिडीओत अंधारातील चित्रीकरण आहे. म्हणजे विमान त्या वेळी अंधारात होते. अशा वेळी एखादा उपग्रह जरी सूर्यप्रकाशात असेल तरी विमानाचे चित्रण अंधारातच असले पाहिजे होते आणि ते इतके स्पष्ट (resolution नव्हे, प्रकाश या दृष्टीने) नसले पाहिजे.
सॅटेलाईट नेमके काय असावे यावर खूप खल झाला आहे. क्रॉप केलेला व्हिडिओ असल्याने त्यात सॅटेलाईटचे नाव अर्धेच आले आहे. तरीही ते बहुतेक NROL-22 असावे असा कयास आहे. Image removed. दुसरी गोष्ट म्हणजे मूळ व्हिडिओ हा स्टेरिओस्कोपिक थ्रीडी असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार NROL-22 हा फक्त रिले सॅटेलाईट म्हणून वापरला आहे असे ध्यानात येते. म्हणजे मूळ व्हिडिओ एक किंवा दोन इतर सॅटेलाईटनी घेतलेला आहे. कदाचित SBIRS-GEO 1 (aka USA 230) or SBIRS-GEO 2 (aka USA 241). किंवा USA-184 आणि USA-200 असण्याची देखील शक्यता आहे. अंधाराबाबत पुन्हा संदिग्धता आहे. यावर अजून काही स्पष्ट अ‍ॅनालायसिस आलेले नाही.
२. पहिल्या व्हिडिओ बाबत: तो स्थिर जागेवरून / stable perspective ने चित्रित केलेला आहे. ज्या प्रकारे विमानाचा आकार आणि पूर्ण वळसा दिसतो त्यानुसार जर खरोखर हे शूटिंग आकाशात केलं गेलं असेल तर ते किमान काही किलोमीटर दुरून केलं गेलं आहे. अशा वेळी एक बूम टाइप शॉक वेव्ह इतक्या दूरवर आणि थेट कॅमेऱ्यावर येणे हे अत्यंत कृत्रिम वाटत आहे.
हा थर्मल व्हिडिओ एका मिलीटरी ड्रोन ने घेतलेला आहे. मूळ व्हिडिओ ग्रेस्केल असण्याची शक्यता आहे. MQ-1C Gray Eagle
त्यामुळेच त्यात पॅच वर्क किंवा पिक्सेल अनियमितता सापडू शकत नसावी.
त्यात अनियमितता आहे. पण ती का आहे हे ताडायला गेले तर व्हीएफएक्स वाल्यांनी यावर प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनत घेतलेली दिसतीय. कारण व्हिडिओ कशाचे आहेत हे जर पाहिले तर व्हीएफएक्स वाल्यांना काय सिम्युलेट करावं लागतंय हे पाहा. १. ३डी लेयर २. स्पाय सॅटेलाईट रेकॉर्डिंग ३. रिले सॅटेलाईट डिटेल्स ४. 6fps ने एका मोठ्या क्षेत्रफळावर नॅव्हिगेशन ५. हा मोठा व्हिडिओ पॅन करायला कर्सर हलवणे दाखवायला कस्टम सॉफ्टवेअर ६. रिमोट डेस्क्टॉप स्ट्रीम वेगळ्या रिझॉल्युशनला ७. त्याचे स्क्रीन कॅप्चर
आणखी एक. मूळ व्हिडिओ जर मार्च १४ मधेच आला होता आणि समजा कोणीतरी सरकार / लष्कर पातळीवर तो काढून टाकला, तर मग आर्काइव्ह डॉट ऑर्ग वरून cached कंटेंट न काढून टाकणे अगदीच दूधखुळेपणाचे वाटते.
मूळ व्हिडियोला तसेही फार लोकांनी पाहिले नव्हते. ते अजूनही तसेच आहेत. आर्काइव्ह वरुन सहजासहजी कंटेट काढता येतो का ते माहित नाही. कदाचित तसा प्रयत्न झाला देखील असेल. परंतु एक लक्षात घेतले पाहिजे. युएसेस निमित्ज चा फ्लिर व्हिडिओ २००८ च्या दरम्यान लीक झाला होता. तेव्हाही तो फेक आहे असे लोक सांगत होते. न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्धी देताना पेंटॅगॉन ने जवळ जवळ साताठ वर्षांनी व्हिडिओ लीक खरे आहेत असे मान्य केले. त्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही. मलेशियन एअरफोर्स चीफ रोदझाली यांनी ' unidentified blobs on military radar ' पाहिल्याचे सांगितले आहे.
दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे.
कदाचित ते तितकंच क्रॅपी असू शकेल. नाहीतर व्हिज्युअलचा बाप माईस्त्रो Guillermo del Toro त्याने पाहिलेल्या तबकडीवर म्हणालाच आहे : त्याच्याच शब्दात : "It was horribly designed. It was a flying saucer. So clichéd, with lights going like this. It’s so sad. I wish I could reveal they’re not what you think they are. They are what you think they are." हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 08/16/2023 - 14:48 नवीन
दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे.
अजूनएक म्हणजे, विमान गायब होण्याआधी तापमान कमी करणे, ऑर्ब फिरताहेत ते पूर्ण ३डी गोलाकार (निव्वळ एकाच प्रतलात फिरणे नव्हे) फिरणे, त्यांच्या तापमानातले फरक दाखवणे इत्यादी इत्यादी.. दोन्ही व्हिडीओ वेगवेगळ्या काळात अपलोड केलेले आहेत. सॅटेलाईट्सचा अभ्यास, विमानाच्या एअरोडायनॅमिक्सचा अभ्यास, वरती व्हीएफएक्सचा अभ्यास म्हणजे कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. गायब होताना अगदी ढगांवर पाठीमागून रिफ्लेक्ट झालेला लाईट असो, किंवा लहा छिद्र असोत, अगदी बारीक बारीक तपशीलही सोडले नाहीत!! इतक्या बारीक गोष्टींचा विचार करणार्‍याला अगदी अदभुत टेलिपोर्ट दाखवता आलाच असता की! त्यामुळे मला स्पेशल इफेक्ट स्पेशलच असावा असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
ट
टर्मीनेटर Wed, 08/16/2023 - 10:38 नवीन
लवकरच मी या दिवाळी अंकात यावर विस्तृत लेख लिहित आहे.
🙏 (आधी पाहिला नसल्यास) National Geographic चा MH370 विषयक Malaysia Airlines (Full Episode) | Drain the Oceans हा व्हिडीओ पण पाहुन घ्या असे सुचवतो, चांगली माहिती आहे त्यात. नॅशनल जिओग्राफिकची 'ड्रेन द ओशन्स' ही माझी आवडती मालिका आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा