Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

MH370 - फ्लाईट डीलेड..

ग
गवि
Tue, 03/11/2014 - 09:49
💬 265 प्रतिसाद
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे. जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन. १९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी. हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?! फोटो आभारः विकीमीडिया बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू. त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते: -रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट. -याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी. बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः - रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही. - रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे". - आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते. MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे. बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी. जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्‍याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं. या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं. वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते. कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये. रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत. अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः शक्यतासंच एकः - जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे. - विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत. - अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं) - हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्‍या दोषामुळे नाही. शक्यतासंच दोनः -या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्‍यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो. पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा. या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो. कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल. ......... जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट. केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव. आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो. फोटो आभारः विकीमीडिया.

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (265)
आ
आनन्दा Fri, 03/14/2014 - 07:34 नवीन
गविंचे मत घेणेच योग्य..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन कुलकर्णी
ग
गवि Fri, 03/14/2014 - 08:15 नवीन
केबिन प्रेशर अचानक शून्य होण्याचे कारण घेऊन त्या बेसिसवर तर्क लावले जात आहेत. ही एक सर्वाधिक शक्यतांपैकी असलेली थिअरी आहेच. विमान ३५ हजार फुटांवर उडताना बाहेरील हवेचे अत्यंत कमी प्रेशर आणि त्याहून अत्यंत कमी ऑक्सिजन लेव्हल ही मानवी शरीराच्या दृष्टीने तात्काळ मारक आहे. अशा वेळी अचानक पूर्ण कॅबिन प्रेशर नष्ट झालं तर साधारण ६ सेकंदांचा "यूजफुल कॉन्शसनेस" म्हणजे काही विचार करुन अ‍ॅक्शन करण्याइतकी शुद्ध लाभते. त्यानंतर कन्फ्युजन आणि बेशुद्धी, मग कोमा आणि मृत्यू. या सुरुवातीच्या सेकंदांच्या काळात पायलटला ऑक्सिजन मास्क लावता आला नाही तर पुढे तो लावण्याइतके को ऑर्डिनेशन त्याच्याकडे राहात नाही (म्हणूनच विमानात इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा असं सांगतात.) हळूहळू केबिन प्रेशर लॉस झाला तर पायलट्सना ते स्वतः हळूहळू बेहोष / बेभान होताहेत हे कळतच नाही. हळूहळू ऑक्सिजन लेव्हल घटत जाते. पायलट्स असंबद्ध वागतात इत्यादि. या केसमधे अचानक केबिन प्रेशर लॉस झाला असं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती ?!) धरुन पायलटला काही सेकंदच अ‍ॅक्शन करायला मिळाली असं समजून त्याने काय केलं असेल याचं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती?!) मांडून त्याच्यापुढे विमान ऑटोपायलटवर शेवटच्या ट्रॅजेक्टरीत जात राहिलं आणि इंधन संपून कोसळलं अशी थिअरी धरली गेली आहे. आता ती ट्रॅजेक्टरी नेमकी मादागास्करच्या दिशेनेच होती आणि शेवटी विमान नेमके मादागास्करनजीक कोसळले असा अंदाज व्यक्त करताना अमेरिकन सूत्रांनी त्यांच्याकडे तसे क्लूज आहेत याखेरीज काहीच पक्की कारणमीमांसा / पुरावे दिले नसल्याने पुढे काही बोलता येत नाही. पण इतका प्रचंड खर्च करुन आपली विनाशिका बोट आणि हेलिकॉप्टरे त्या मूळ ठिकाणापासून इतक्या दूरच्या ठराविक ठिकाणी डिप्लॉय करण्याचा अमेरिकेचा निर्णय अनमानधपक्याने असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Sat, 03/15/2014 - 05:37 नवीन
एक छोटी पुरवणी -- साधारण ३५००० फुटावर उडताना युजफुल कॉन्शसनेस हा अर्धा ते एक मिनिट असतो . तोच पन्नास हजार फुटावर ६-ते १० सेकंद इतका कमी असतो. ३५-३६००० फुट हि उंची साधारण विमानासाठी उत्तम समजली जाते कारण कमी उंचीवर हवेचा रोध जास्त असतो आणी वातावरणातील असमतोल यामुळे विमान धक्के खाते. उंची जितकी जास्त तितका हवेतील ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे विमानाच्या इंजिनाची कार्यक्षमता कमी होत जाते. हा युजफुल कॉन्शसनेस जेंव्हा लष्करी विमान (उदा मिग २९ किंवा सुखोई ३०) एकदम सरळ(VERTICAL ASCENT) वर चढते तेंव्हा फार महत्त्वाचा ठरु शकतो. गवी साहेब यावर जास्त चांगले भाष्य करू शकतील. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 03/15/2014 - 07:45 नवीन
उंची जितकी जास्त तितका हवेतील ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे विमानाच्या इंजिनाची कार्यक्षमता कमी होत जाते.
जेट ईंजिन, टर्बो किंवा सुपरचार्ज्ड ईंजिन्स काँप्रेसर च्या तत्वावर काम करतात. जेट ईंजिनांमधे आत घेतलेली हवा वेंचुरी ईफेक्ट नी काँप्रेस केली जाते. काँप्रेस केल्यामुळे हवेची घनता वाढते, अर्थातच हेवेतील ज्वलनशिल प्राणवायुचे प्रमाण वाढते. ह्यामुळे उंचीचा आणि त्यामुळे बदलणार्‍या प्राणवायुचं प्रमाणाचा ईंजिनावर होणारा परिणाम कमी होतो आणि ईंजिनाची ताकद आणि कार्यक्षमता वाढते. आणि एक प्रश्ण. केबिन प्रेशर कमी होताना बाकीची काही वैद्यकीय ल़क्षणे दिसतात का? जसे की डोकं दुखणं, चक्कर येंणं, मळमळण, नाकातुन अथवा कानातुन अचानक रक्त येणं किंवा रक्तदाब ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 03/15/2014 - 08:10 नवीन
साहेब, सर्वच जेट विमाने हवा दाबून इंजिनात ढकलतात. त्यामध्ये जमिनीच्या पातळीला हवेचा दाब जास्त असतो पण हवेचा रोद्धी जास्त असतो जितकी उंची तुम्ही वाढवता तितका हा रोध कमी होतो परंतु एका विशिष्ट उंचीनंतर हवेतील ओक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने हवा जास्त दाबली तरीही इंधन आणी हवेचे मिश्रण यात ऑक्सिजन कमी होऊन इंधन अर्धवट जळते आणी इंधन फुकट जाते आम्हाला हवाई वैद्यकशास्त्र शिकवताना असे सांगितल्याचे आठवते कि प्रवासी विमाने साधारण ३५ ते ३६ हजार फुट उंचीला उडवतात यात हवेचा रोध कमी आणी ओक्सिजनचे प्रमाण वाजवी असते त्यामुळे इंधनाची सर्वात जास्त काटकसर होते. अवांतर :- लष्करी विमाने हि याहून जास्त उंचीवरून उडू शकतात. मिग २५ तर ८५००० फुटावरून उडू शकत असे आणी ते क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त वेगाने जात असे (३. २ MACH) .(MIG 25 CAN OUTRUN A MISSILE) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
भ
भटक्य आणि उनाड Sat, 03/15/2014 - 18:59 नवीन
मिग २५ चा रेकोर्ड आहे फ्लोन अबोव्ह १,००,००० फीट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुनील Fri, 03/14/2014 - 07:42 नवीन
गूढ वाढतच चालले आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी असेच एक विमान दक्षिण अमेरीकेतील अँडीज पर्वतरांगात कोसळले होते. परंतु, त्यातील काही व्यक्ती जिवंत राहिल्या होत्या. बर्‍याच काळानंतर शोधपथकाला त्यांचा शोध लागला होता.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 03/15/2014 - 00:41 नवीन
खायप्याय्ची व्यवस्था नाही, अपघात झालेला दिसला नाही, अपहरणाची जबाबदारी नाही, रडार वरून गायब झाल पण रोल्स रोइसलामात्र डेटा ट्रांसमीट होत होता ... कमाल आहे कुछ तो गड़बड़ है दया.... कालिंग 221b बेकर रस्ता.
  • Log in or register to post comments
म
मराठीच Sat, 03/15/2014 - 05:56 नवीन
आगाऊ एप्रिल फुल करतायत काय?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/15/2014 - 06:51 नवीन
गविंची उत्तम माहितीपूर्ण लेखन आणि प्रतिसाद. सर्व प्रवाशी सुरक्षित असावेत, राहावेत अशा प्रार्थनेशिवाय दुसरं काय करु शक्यतो. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 03/15/2014 - 07:31 नवीन
मटा ऑनलाइन वृत्त । क्वालालंपूर मलेशिया एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाला अपघात झालेला नसून त्याचं अपहरण झाल्याची दाट शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करून त्याचं अपहरण केलं असल्याचा अंदाज मलेशिया सरकारनं व्यक्त केला आहे. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशी जिवंत असल्याचं बोललं जातंय. मलेशियन विमानाच्या अपहरणाबाबत आजूनपर्यंत कुठल्याही मागण्या समोर आलेल्या नाहीत. तसंच हे विमान नेमकं कुठे आहे, याचाही पत्ता लागलेला नाही, असं मलेशियाच्या एका अधिकाऱ्यानं नाव न घेता स्पष्ट केलं. विमानाचं अपहरण झाल्याचा प्रकार फार काळ लपवता येऊ शकत नाही, असंही तो म्हणाला. बेपत्ता विमानाचा उड्डाणानंतरचा प्रवास पाहता ते रडावर येऊ नये म्हणून या विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच या विमानाला अपघात झालेला नाही तर त्याचं अपहरण करण्याच आलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. बेपत्ता विमानाचं अपहरण !
  • Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी Sat, 03/15/2014 - 07:32 नवीन
मलेशियाच्या शोधपथकाने (अधिकृतपणे) विमानाचे अपहरण झाले असू शकते असे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी Sat, 03/15/2014 - 07:48 नवीन
Malaysian PM Razak on MH370: Based on new data, location of last communication was at possibly at border of Kazakhstan and Turkmenistan.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 03/15/2014 - 09:28 नवीन
गविंचा माहीतीपूर्ण धागा आणि आलेल्या प्रतिसादांतून बरंच काही नविन वाचायला मिळालं. सध्या काही नविन माहीती मिळाली आहे का या विमानासंदर्भात??
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/15/2014 - 14:15 नवीन
विमानांची विमानतळांची संख्या भारतात आणि जगभर वाढती आहे. एकीकडे प्रकाश योजने दूर असलेली अंतराळ याने लीलया नियंत्रीत केली जाताहेत दुसरी कडे MH ३७० सारख्या घटना अजूनही टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापनातील गॅप्स दाखवताहेत. विमाने पडूच नयेत पडलीच तर १०० वर्षापूर्वीपर्यंत समूद्र वाळवंटात जंगलात पडली असती तर ठिक होते. एखादे मोठे विमान एखाद्या मोठ्या तेलवाहू नौकेवर पडले तर काय होईल किंवा एखाद्या हाय डेन्सिटी शहरात अथवा भोपाळ टाइप कारखान्यावर पडले तर काय होईल ? निसर्ग आणि जिवीत हानी अन इमॅजीनेबल असू शकते. भारताकडेही उपग्रह आहेत रडार आणि युद्ध नौका आहेत. इतर देश प्रोअ‍ॅक्टीव्हली इन्व्हेस्टीगेट करताना दिसताहेत. आमच्या प्रायमरी रडारवर विमान दिसल अथवा दिसलच नाही अशी क्लिअर कॉमेंट भारत सरकार कडून येताना दिसत नाही. याचा अर्थ मिडिया फ्रेंझीत पडाव असा नाही. अशी इनव्हेस्टीगेशन्स स्वतःच्या टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापन गॅप्स शोधण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी वापरली जावयास हवीत, या प्रकरणात मलेशियाच्या विनंतीवर तोंडदेखल्या सहभागा खेरीज, इन्व्हेस्टीगेशन साईडला भारतीय एजन्सीजचा (सरकारी) स्वभाव आपल्याला काय देणे घेणे असाच आहे का याची शंका वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 03/16/2014 - 11:12 नवीन
भारतीय एजन्सीजचा (सरकारी) स्वभाव
एकंदरच हे प्रकरण बघता भारताने जाणीवपुर्वक कानाडोळा केला आहे की काय अस साँशय येतो ? (हलगर्जीपणा न्हवे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आयुर्हित Sat, 03/15/2014 - 18:42 नवीन
If the flight did enter the Andaman Sea, on way to the Bay of Bengal, Indian air defence radars should have ideally detected it. If MH370 made it to Andaman Sea, did Indian radars fail to detect it?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 03/16/2014 - 14:58 नवीन
source: bbc news Missing Malaysia plane: Malaysia requests countries' help Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आत्मशून्य Sat, 03/15/2014 - 19:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 03/15/2014 - 21:33 नवीन
कोई ये बताये कि ये कारण तो नही? Sun, 29 Sep 2013 11:46 PM (IST) मलेशिया के प्रधानमंत्री के अनुसार, 'वैसे तो कट्टरपंथ सबको प्रभावित कर रहा है लेकिन इसके चलते इस्लाम धर्म में आस्था रखने वाले सबसे ज्यादा नुकसान उठा रहे हैं।' मुसलमानों के अच्छे भविष्य के लिए रजाक ने कट्टरपंथियों के खिलाफ जंग छेड़ने की अपील की। प्रधानमंत्री रजाक के मुताबिक कट्टरपंथी अपने फायदे के लिए शांति और सहिष्णुता के सिद्धांत पर आधारित इस्लाम धर्म की व्याख्या तोड़मरोड़ कर करते हैं। उन्होंने कहा कि कट्टरपंथियों को हाशिये पर लाया जा सकता है। इसके लिए संयम और प्रतिबद्धता की जरूरत है जो इस्लाम में है। उन्होंने आगाह किया कि संयम को हमारी कमजोरी नहीं समझना चाहिए। अपनों से ही मुस्लिमों को सबसे बड़ा खतरा
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 03/15/2014 - 22:05 नवीन
स्ट्रोब टॅलबोट्ट (क्लिंटनच्या काळातील डेप्यूटी सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि परराष्ट्र धोरणातले तज्ञ) यांची ट्वीट... Malaysian plane mystery: Direction, fuel load & range now lead some to suspect hijackers planned a 9/11-type attack on an Indian city.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 03/16/2014 - 01:19 नवीन
विमान अपघाताचे चिन्ह नाही कोणत्याही मागण्या नाहीत सर्व संपर्क यंत्रणा एकाच क्षणी बंद, हे सर्व जरी खरे असले तरी हवाइ हल्यापुर्वी चक्क ५ तास विमान गायब केले जाउन शेजारील देशामधे त्याबद्दल अलर्टनेस निर्माण केला जाण्याची शक्यता नाही. आजच्या जमान्यात मोबाइल सारखी संपर्क साधने असताना ? (SOS काम करेल मोबाइल फ्लाइटमोडवर असेल तरी) असा हवाइ हल्ला यशस्वी करायचा असेल तर अतिशय कमी वेळेचे धक्का तंत्र अत्यावश्यक आहे व म्हणुनच अशा देशाची एअर स्पेस आत्मघाती विमानाकडून चुकुनही ओलांडली जाउ नये अथवा कमीत कमी मिनीटात/सेकंदात पार करता यावी याची काळजी घेतली जाइल. हे जर कोणत्याही कारणाने घडवलेले अपहरण असेल तर अपहरणकर्त्यांचे दोन अंदाच चुकलेच असावेत, १) विमानाचा शोध कितपत घेतला जाइल याची शक्यता २) रोल्स रॉइसला आपोआप मिळणार्‍या लॉग बद्दल अनभिज्ञता आणी आता हल्ला करणे मात्र शक्य नाही कारण आवश्यक अलर्टनेस आला आहे. अन तरीही अभाळातुनच हल्ला झाला तर आपली तीच लायकी आहे हे नक्कि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आत्मशून्य Sun, 03/16/2014 - 01:24 नवीन
असा हल्ला केला तर बहुदा सरळ मलेशीयावरच करायचा प्लान असावा. पायलटने पध्दतशीरपणे विमान त्या दिशेने वळवुन संपर्क यंत्रणा बंद झाल्यावर हल्लेखोरांचा प्लान उधळण्यासाठी जाणीवपुर्वक विमान भरकटवले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
व
विकास Sun, 03/16/2014 - 03:56 नवीन
संशयाची सुई पायलट आणि को-पायलटकडेच बोट दाखवत आहे. त्यामुळे पायलटने मुद्दामून वळवले असण्याची शक्यता कमी असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
म
माहितगार Sun, 03/16/2014 - 04:39 नवीन
या विमानाच्या मुख्य पायलट पॉलीटीकल माइंडेड होता आणि आदल्या दिवशी मलेशियाच्या विरोधीपक्ष नेत्याच्या अटकेमुळे अपसेट होता अशी बातमी येते आहे . मलेशिया क्रॉनीकल.कॉमचा दुवा मलेशियन सरकार ही बाब चर्चेत येण्यापासून दाबू पहात होते असे दिसते.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 03/16/2014 - 05:51 नवीन
स्टेट्स अजुन ही ऑनलाईन दाखवत आहेत्,तसेच विमानातील काही लोकांचा मोबाईल वर रिंग देखिल वाजत होत्या. मग हे नवीन टेक्नॉलॉजीने ट्रॅक करता येणार नाही काय?
  • Log in or register to post comments
भ
भाते Sun, 03/16/2014 - 07:08 नवीन
जेव्हा मी डेस्कटॉपवरून ब्राऊसर मधुन सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता फक्त ब्राऊसर बंद करतो तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. तीच गोष्ट मोबाईलची. मी ऑफिसमधुन वाय-फाय वरून सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता ऑफिसमधुन बाहेर पडल्यावर वाय-फाय नेटवर्कशी संबंध तुटल्यामुळे मला सोशल साईट वापरता येत नाहीत. पण तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. मी प्रत्यक्षात लॉग आउट केलेले नसल्याने टेक्निकली मी ऑनलाईनच असतो. अर्थात नविन टेक्नॉलॉजीने हे ट्रॅक करणे सहज शक्य आहे. बहुतेक पोलिस तपासात हे तंत्र वापरले जाते असे बातम्यांमधुन समजते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 03/17/2014 - 03:00 नवीन
मला वाटते मलेशियन सरकारने बेजबादारपणे हे प्रकरण हाताळले आहे. त्यांच्या रडारवर हे विमान दिसले होते तर त्यांनी ती माहिती वेळीच द्यायला हवी होती. कालच्या बातमीनुसार विमान भारतावरून गेले आणि लक्षात आले नाही, असे झाले असेल तर प्रकरण गंभीर आहे. (बहुदा भारतावरून गेले नसावे असे वाटते.) एकुणच सर्वच घडामोडी चमत्कारिक आहेत हे मात्र खरे. आजच्या बातमीनुसार दहशतवादी हल्ला झाला असावा असे गृहीत धरले जाते आहे. कुण्या पकडलेल्या दहशतवाद्याने असे सांगितले की त्याने मलेशियन पायलटला बुटातली स्फोटके दिली होती आणि हा हायजॅकचाच बेत होता. त्यामुळे हे विमान कुठे तरी उतरवले गेले असावे असे आता काही लोक मानताहेत. हे विमान उतरायला ४५ मिटर रुंद १५०० मिटर्स लांब धावपट्टी पुरेशी आहे म्हणे. विमान परत उडवायचे नसेल तर मातीच्या धावपट्टीवरही उतरू शकते. असे असले तरी मोबाईल आणि डिजिटल कॅमेर्‍यांच्या युगात 'विमान उतरलेले कळणार नाही' असा कोणता प्रदेश असेल? रोज येणार्‍या नवनवीन बातम्या आणि शक्यतांमुळे नातेवाइकांच्या भावनांचा काय खेळ होत असेल ते तेच जाणोत. आता बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांद्वारे मलेशियन एयर विरुद्ध दावे दाखल केले जातील का? केल्यास असे खटले कुठे लढले जातील? लंडनला? - कारण इन्शुरन्स तेथला आहे. क्वलालंपूर ? - कारण कंपनी तेथे आहे चीन? - कारण चीनी हद्दीत गायब झाले आहे की जेथे विमान उतरले असेल तेथे? विमान बनवणारी कंपनी अमेरिकन, आणि इंजिने बनवणारी रोल्स रॉइस युरोपीय, हे पण प्रतिवादी होऊ शकतील का? माझ्या ऐकीव माहितीनुसार एयर फ्रान्स ४४७ क्रॅश वरुन सुमारे ४७५ मिलियन डॉलरचे दावे क्लास अ‍ॅक्शनद्वारे दाखल झाले होते. त्यातले बरेच कोर्टाबाहेर मिटवले गेले व उरलेल्यांना १८२ मिलियन या एकरकमी तडजोडीत निकाली काढले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/17/2014 - 08:52 नवीन
उपग्रहांनी पाठवलेली छायाचित्रे आंतरजालावरून सामुहीक पद्धतीने (क्राऊडसोर्सींग) शोधण्याचा डिजीटल ग्लोबवर तर्फे www.tomnod.com वर प्रयत्न चालू आहे. त्यात मी एक अनुभव घ्यावा म्हणून वेगवेगळ्या मॅपच्या जवळपास ११०० टाइल्सच्या आसपास रँडमली शोधल्या. त्यात मिळालेला ४ वाजून १४ मिनीटांचा ह्या नकाशात एका विषीष्ट पॅटर्न मध्ये पाण्यावर तरंग आणि शिंतोडे असावेत असे वाटते. पावसाचे असते तर वर ढग राहीले असते. हे कशाचे असू शकतील ? आपल्याला www.tomnod.com ने केवळ मर्यादीत टॅगींग सुविधा दिली आहे त्यामुळे कॉमेंट टाकणे अथवा संपर्काची काही सुविधा दिसली नाही. http://www.tomnod.com/nod/challenge/malaysiaairsar2014/map/682517 या नकाशा बाबत तुम्हाला काय वाटतं ?
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Mon, 03/17/2014 - 12:24 नवीन
हे विमान शोधण्यासाठी ज्योतिषतज्ञ किंवा एखादे सिद्धीप्राप्त बाबा / महाराज ह्यांची मदत होऊ शकते का?
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Mon, 03/17/2014 - 16:51 नवीन
फक्त आता तो म्हणायचा कोणी नक्की? मलेशियन एअरलाईन्स च्या अधिकार्यांनी की नेत्यांनी की कोणी? जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
अ
अप्पा जोगळेकर Mon, 03/17/2014 - 17:44 नवीन
कृपया धाग्याचे गांभीर्य घालवू नये. सव्वा दोनशे माणसे मिसिग असताना यावर विनोद करणे तुम्हाला पटते काय. दंगा करायला इतर धागे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/17/2014 - 17:46 नवीन
+१,०००,०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ल
लंबूटांग Mon, 03/17/2014 - 18:48 नवीन
मी सिरीयसली विचारला होता प्रश्न ! जर मंत्र म्हणून ते विमान आणि प्रवासी सापडणार असेल तर व्हाय नॉट? धागा माहितीपूर्ण आहे यात वादच नाही आणि काही प्रतिसादही. पण बर्‍याच प्रतिसादांत इकडून तिकडून बातम्यांच्या लिंका पेस्टवून/ स्वतःच्या कॉन्स्पिरसी थीअरीज टंकून जे विनोद झाले आहेत त्याचे काय? असो मला पहिल्यापासूनच त्या वाईट झालं, माझ्या प्रार्थना/ शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत वगैरे फेसबुकी छाप भाषा झेपत नाही त्यामुळे तसा प्रतिसाद दिला नाही. असो, कोणीतरी असा प्रतिसाद देईल असे वाटलेच होते. तुम्ही दिलात. संपादकांनी प्रतिसाद उडवायचा तर उडवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 05:42 नवीन
धाग्यावर जाण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
प
प्रदीप Tue, 03/18/2014 - 06:23 नवीन
हे आपल्या नजरेत आलेले दिसत नाही. जगातील बहुतेक सर्व प्रमुख वर्तमानपत्रांतून हे आले होते; त्याचा व्हिडीयोही जालावर मिळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
K
kurlekaar Mon, 03/17/2014 - 18:05 नवीन
Russia “Puzzled” Over Malaysia Airlines “Capture” By US Navy EU Times च्या १४ मार्च च्या लेखान्वये रशिया चं GRU (सैन्याचे हेर खाते) बुचकळ्यात पडलंय की अमेरिकन नौदलाने या मलेसिअन एअर लाईन्ज चं ३७० या उड्डाणाचा ताबा घेऊन व त्याचा मार्ग बदलून त्याला अमेरिकेच्या दीएगो गार्सिया या भारतीय महासागरात असलेल्या सैनिकी तळाकडे का वळवले. हे उड्डाण GRU च्या नजरेखाली होतं कारण त्यात एक संशयास्पद कार्गो होता व या कार्गोचा संबंध सीशेल्स या देशाशी व अमेरिकेच्या MV Maersk Alabama या व्यापारी जहाजाशी जोडला होता. GRU ने या बाबतीत चीनच्या Ministry of State Security (MSS) शी देखिल संपर्क साधला होता व त्यांना सांगण्यात आलं की चीनच्या वायुहद्दीत आल्यानंतर या कार्गोची चौकशी केली जाईल पण असंहि कळलंय की चीन देश हे विमान बीजिंग ऎवजी त्यांच्या हैनान बेटावरील Haikou Meilan इथल्या आंतर राष्ट्रीय विमानतळावर उतरवून घ्यायच्या तयारीत होता. . या Boeing 777-200ER aircraft विमानात fly-by-wire (FBW) system असल्याने त्याला electronic interface असतो व त्याच कारणाने हे एका ड्रोन विमानाप्रमाणे दुरून देखिल कंट्रोल केलं जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 05:37 नवीन
विमानाच्या कार्गोत केवळ (मलेशीयन) फळे होती अस मलेशीयन मंत्र्याच विधानाच रिपोर्टींग झाल आहे. स्वतःच्या कमर्शियल विमान कंपनीची क्रेडिबीलीटी धोक्यात घालून मलेशिया सरकार मलेशियन विमान कंपनी असे काही करू देण्याची शक्यता कमीच. लोकांना भरपाई म्हणूनच त्यांचा कोट्यावधीनी खर्च होणार आहे. कोणत्याही सरकारला किमती कार्गो पाठवायच असेल स्पेशल विमानाने पाठवणही शक्य असत त्याच्या करता कमर्शियल फ्लाईटची गरज नाही. आमेरीकी सरकार गुप्तचर कारवाया करत नसेल असे नाही पण जगाच्या महासत्तेला असल कोणतीही काम लपवून करण्याची मुळात गरज असेल अस वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kurlekaar
क
कल्पक Tue, 03/18/2014 - 06:32 नवीन
हे जर खरं असेल तर खूपच धक्कादायक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kurlekaar
K
kurlekaar Mon, 03/17/2014 - 18:21 नवीन
Source http://www.whatdoesitmean.com/index1753.htm
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 07:52 नवीन
Secretive Beijing demands transparency over missing jet
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 08:09 नवीन
तुमच्या हातात सुपर कॉम्प्युटर आहे उपग्रहातून मिळणारी छायाचित्रे आहेत. आकाश बर्‍याच अंशी निरभ्र आहे. एक विमाना सारखा ऑब्जेकट आहे ज्याची काळ काम वेगाची गणित बांधून कोणत्याही क्राऊड सोर्सींग शिवाय सुद्धा चार नाही सहा दिवसात विमानाच काय झाल याच उत्तर अगदी मलेशियाच्या मदती शिवाय आमेरीका रशिया चीन भारत या सर्वच देशांना देण जमायला हव. दुसर्‍या देशाच्या मुव्हींग मिसाईल्सचा बरोबर वेध घेऊन पाडता येतात, एका भल्यामोठ्या विमानाचा शोध घेता येत नाही ? टेक्नॉलॉजी गॅप नाही पण टेक्नॉलॉजीच्या वापरातला गॅप म्हणता येईल आणि मग नाही नाही त्या थेअरीज येऊ लागल्या आहेत. इतर देशांच माहित नाही भारताकरता याचा अर्थ एवढाच होतो की चिनने किंवा इतर देशांनी पाठवलेल इंटर काँटीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल ट्रॅक करण्याकरता वाटेत हाणून पाडण्या करता आम्ही अजून मागे आहोत २१व्या शतकात भारताकडे उपलब्ध साधन क्षमता लक्षात घेता अजिबात भूषणावह वाटत नाही. मी भारतातील आलतूफालतू विरोधी पक्ष नेता असतो तरी या टेक्नॉलॉजी गॅपकरता भारताच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागीतला असता आजी माजी केंद्रीय मंत्र्यांना निवडणूका लढण्यापासून बाद करण्याची मागणी केली असती.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 03/18/2014 - 08:39 नवीन
भारताला इतके कमी लेखणे बरोबर नाही. असे ही असू शकेल की : विमान hijack झाले असून मलेशिया, चीन, भारत वगैरे देशाच्या उच्च अधिकार्‍याना याची कल्पना असेल व अतिरेक्यांबरोबर वाटाघाटी चालू असतील. काही गुप्त कारणामुळे ही माहिती आपल्यापर्यंत उघड केली नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 09:55 नवीन
तस नाहीए हो, मी भारताला कमी लेखत नाहीए. सत्तेतल्या लोकांना काय गुप्त खलबत करायचीत ते करू दे ना ! येता जाता दुहाई देणारे विरोधी पक्ष रोखठोक प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या भूमीकेत कमी पडत नाहीत ना असाही प्रश्न आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 10:57 नवीन
सिएनएनच्या या वृत्तातील खालील तर्क पटण्या जोगा वाटतो.
There's another possible wrinkle, experts say. Some countries may be hesitant to reveal what they've seen on radar. "They want to protect their own capabilities," Beatty said. "Their intelligence services are not going to want to publicize exactly what their capabilities are."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ग
गवि Tue, 03/18/2014 - 08:40 नवीन
आता सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे आणि कालापव्यय झाल्यामुळे विमान सापडण्याची शक्यता बरीच विरळ झाली आहे. या काळात शेकड्यांनी नवनव्या थियरीज पुढे आल्या आहेत. यापैकी बरीचशी तर्कटे केवळ एक शक्यता म्हणून मांडली गेलेली आहेत. कोणत्याही खास माहितीविनाही असे अंदाज करता येतात. उदा. विमानात असलेल्या संवेदनशील कार्गोमुळे विमान अन्यत्र नेले गेले. किंवा ते अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या तळावर उतरवले गेले. किंवा भारतावरुन पूर्ण प्रवास या विमानाने सिंगापूर एअरलाईन्सच्या त्याच वेळी प्रवास करणार्‍या कायदेशीर विमानाच्या मागेमागे अत्यंत जवळून उडत केला, ज्यामुळे रडार्सवर त्या दोन्हीचा मिळून एकच ठिपका दिसला असणार आणि तीही फ्लाईट सिंगापूर एअरलाईन्सच्या सावलीत क्लियर झाली. एअरबॉर्न कोलिजन अव्हॉईडन्स सिस्टीममुळे जवळजवळ उडणार्‍या विमानाची वॉर्निंग एरवी सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानाला मिळाली असती, पण MH370ने आपल्या सिस्टीम्स बंद करुन ते टाळलं इत्यादि. या थियरीज म्हटलं तर केवळ तात्विकदृष्ट्या शक्य आहेतच, पण प्रत्यक्षात कितपत घडू शकल्या असतील याविषयी मोठी शंका घेता येईल. एकूण काही संकीर्ण मुद्दे खाली नोंदवतो आहे. - मलेशियाने अधिकृतरित्या असं जाहीर केलं होतं पायलट्सकडून आलेला शेवटचा संदेश "ऑल राईट, गुड नाईट" हा विमानाची ACARS सिस्टीम मॅन्युअली बंद करण्यापूर्वी / आपोआप बंद होण्यापूर्वी आलेला नसून ती बंद केल्यावर / झाल्यावर आला होता. याचा अर्थ पायलट्सनी एक सिस्टीम बंद होऊनही कोणताही दुरित संदेश न देता संभाषण संपवलं होतं. पण आज मलेशिया म्हणते की वरील माहिती अयोग्य असून आता आम्ही असे म्हणतो की पायलट्सचा "ऑल राईट गुड नाईट" हा शेवटचा संदेश हा सिस्टीम बंद होण्यापूर्वी आलेला नव्हता. याचा अर्थ अजूनही होय होय- नाही नाही असा प्रकार आणि माहितीच्या बाबतीत यू टर्न्स चालू आहेतच. -शेवटचा संदेश को पायलटच्या आवाजात होता. म्हणजे एकट्या मुख्य पायलटवर संशय घेऊन भागणार नाही. - मुख्य पायलट हा "पोलिटिकली अ‍ॅक्टिव्ह" होता, आणि तो विरोधी पक्षप्रमुखाचा खंदा समर्थक होता, आणि तो फ्लाईटपूर्वी या प्रमुखावर चाललेल्या खटल्याला हजर राहिला होता, आणि त्याबद्दल अस्वस्थ होता. अशी माहिती जाहीर झाली आहे. मुख्य पायलटचे काही फोटो जाहीर झाले आहेत. त्यात त्याने "डेमॉक्रसी इज डेड" असा संदेश परिधान केलेला दिसतो आहे. पण एकूण माहितीवरुन थेट पायलटवर संशय घेणं अत्यंत हीनतेचं वाटतं. समजा डेमॉक्रसीचा गळा घोटला जात आहे अशा मताची व्यक्ती असली तरी तरी या प्रकारच्या व्यक्तीच्या विचारधारेचा कडवा सपोर्ट डेमॉक्रसीला म्हणजे लोकशाहीला असणार. अशा वेळी ही व्यक्ती अन्य काही लोकशाहीच्या तत्वाने प्रतिकार करेल.. अतिरेकी मार्गाने विरोध का व्यक्त करेल? त्या विरोधी पक्षनेत्यानेही पायलटवर घेतल्या जाणार्‍या संशयाविषयी अतिशय तीव्र निषेध केला आहे. हायजॅक किंवा अपहरणाची थियरी मानण्यात अत्यंत मोठा धोंडा म्हणजे मोटिव्ह, अर्थात उद्देशाचा अभाव. कोणताही मोटिव्ह दुरुनही नजरेत न येणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. आठ दिवसांत पॅसेंजर्स किंवा पायलट्स किंवा अपहरणकर्ते यांच्याकडून कोणताही संपर्क नसणं हे न पटण्यासारखं आहे. अपहरणकर्त्यांना आठ दिवस गप्प बसून अडीचशे लोकांना गुप्तपणे विमानासह दडवून ठेवणं हे अशक्यप्राय आहे. याचाच अर्थ विमान आता अस्तित्वात नसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. माझ्यामते विमानाचा ब्लॅक बॉक्स भविष्यात कधीच मिळणार नाही (न मिळण्याची फारच मोठी शक्यता आहे..) कारणे: विमानाचा क्रॅश झालाच असेल तर तो त्याच दिवशी इंधन संपताक्षणी झाला असणार. म्हणजे त्याला ९-१० दिवस झाले. विमान इन्टॅक्ट पाण्याखाली गेलं नसेल तर विमानाचे तरंगणारे हलके भाग म्हणजे खुर्च्यांची कुशन्स, बॅगा, कपडे इत्यादि. हे गेल्या दहा दिवसांत मूळ ठिकाणापासून शेकडो किलोमीटर रँडमली भरकटले असणार. पण ब्लॅक बॉक्सेस मात्र मूळ जागीच पाण्यात बुडाले असणार. त्यामुळे आता तरंगणारे अवशेष जरी सापडले तरी ब्लॅकबॉक्सचा थांग त्यावरुन लागणार नाही. जर हिंदी महासागरात ते बुडाले असतील तर त्यांचे संदेश पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता बहुतांश भागांत शून्यवत आहे. आणि हे जे काही संदेश ट्रान्समिट होतात ते ३० दिवसांपर्यंतच होतात. बॅटरी तेवढीच असते. पूर्ण हिंदी महासागर तळातून सावडणे जवळजवळ अशक्य आहे. आणि तसं केलं तरी महिन्याभरात तिथे पोचणं त्याहून अशक्य. जाणार्‍या प्रत्येक दिवसासोबत समुद्रतळाशी विसावलेले ब्लॅकबॉक्स आणि इतर पार्ट्स वाळूखाली गाडले जाण्याची शक्यता जास्तजास्त. वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही. त्यामुळे खरंच बाकी काही कळो न कळो, या लोकांचं काय झालं याचा निकाल मात्र नक्की लागू दे अशी तीव्र इच्छा..
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 03/18/2014 - 08:56 नवीन
वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही. +१ आपले परिचित अशा दुर्दैवी घटनांत असतात, त्यावेळी बातमी फक्त बातमी राहात नाही :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुहास झेले Tue, 03/18/2014 - 11:30 नवीन
अगदी अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
म
माहितगार Tue, 03/18/2014 - 10:08 नवीन
सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे
सर्च एरीआ अमर्याद वाढला म्हणजे काय ? उपग्रहातन काहीच छायाचित्र मिळत नसती विमान त्यात न दिसण्या एवढ छोट असत तर वेगळी गोष्ट होती. विमान निघाल्या वेळे पासूनचा उपग्रहछायाचित्रातून प्रत्येक मिनीटाचा मागोवा घेता येत असणार. विमान कोणत्याही दिशेला वळल तरी ३६० बाय ३६० अँगल मध्ये वळल तरीही उपग्रह छायाचित्रातून सुटण्याच काहीच कारण नाही (केवळ ढगांच परसेंटेज फार मोठ असेल आणि विमान त्यातच अडकून वेदरमुळे खाली कोसळल तर वेगळा भाग पण प्रत्यक्षात वेदर बर्‍यापैकी स्वच्छ होत अस दिसतय, मी स्वतः टॉमनॉड डॉट कॉम वरील छायाचित्र शोधात सहभाग घेतला मला तरी आभाळ बर्‍यापैकी स्वच्छ वाटल अर्थात टॉमनॉड डॉट कॉमवालेही लॉजीकली काम करताना दिसत नाहीत म्हटल्यावर मी सहभाग बंद केला). फक्त सुयोग्य कोऑर्डीनेट्सची छायाचित्र एका नंतर एक लावण्याची आवश्यकता असावी ते आमेरीकन टॉमनॉड कंपनीन केल नाही पण भारतासहीत इतर महासत्ता झोपल्या सारख्या वागतात याच आता प्रचंड आश्चर्य वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 03/18/2014 - 10:34 नवीन
समुद्रतळाशी सर्च आणि छुप्या ठिकाणांची सर्च याविषयीचा तो उल्लेख आहे. केवळ तरंगणारे अवशेष उपग्रहामार्फत शोधण्याचा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा