पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे.
'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे.
आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.
पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.
खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.असे एखादे उदाहरण आहे का जगाच्या इतिहासात..? (सिरीयसली विचारलेला प्रश्न आहे - उपरोध नाहीये)...पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने... ;(आ) पाकिस्तानचे नागरी शासन लष्कराचे बाहुले असल्यामुळे आणि (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती; या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. शिवाय अशी उघड कारवाई करण्यासाठी जो आर्थिक खर्च, मनुष्यहानी आणि जागतिक विरोध होईल तो सोसण्याची ताकद आणि धाडस आजमितीला कोणत्याही एका देशाकडे वा संयुक्त राष्ट्रसंघाकडेही नाही. हे जेवढे जगाला माहित आहे तेवेढेच ते "अतिरेकी + पाकिस्तानी लष्कराला"ही माहित आहे; म्हणूनच सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि भारतासारखे देश भरडले जात आहेत आणि पाश्चिमात्य देश "स्वतःची कातडी बचावली, खूप झाले" असा पवित्रा घेऊन आहेत. दुसर्या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. कुवेत व पूर्व टिमोर या दोन छोट्या देशांत वर दिलेल्या कारणांच्या अभावाने असे शक्य झाले. याविरुद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधिल अमेरिका/राष्ट्रसंघाचे भूतकाळातले आणि अजूनही चालू असलेले अनुभव या दृष्टीने मार्गदर्शक आहेत. काही रोग बळावलेल्या अवस्थेत गेले की त्यांचा आक्रमक पद्धतिने उपचार करण्याने रोग्याला मूळ रोगापेक्षा जास्त धोका संभवतो. शिवाय काही रोगांवर आजमितीला उपाय सापडलेले नाहीत. पाकिस्तानातील सद्य परिस्थिती हा जगाला झालेला याच प्रकारातिल रोग आहे. ------------------------------- * यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे : यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे म्हणजे पायदळाने सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे होय. हे युद्धाचे उद्दिष्ट्य साध्य केले तरच त्या भूमीवरच्या सर्व विरोधी/अतिरेकी कारवायांचा नायनाट करणे शक्य होते. दुसर्या महायुद्धात हे यशस्वीपणे केले गेले. यात जर्मनी आणि जपान या दोन देशांमधिल सामाजिक-राजकिय-धार्मिक परिस्थितीचेही योगदान आहे. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे. बांगलादेश युद्धात शत्रुराष्ट्राकडून लेखी शरणागती लिहून घेतल्यानंतरही सुरुवातिला दिलेल्या कारणांमुळे भारताच्या सेनेने बांगलादेश व्यापणे आणि त्याच्यावर संपूर्ण ताबा ठेवणे तर सोडाच पण त्या देशाला स्वतंत्र करूनही त्याला आपला भरवश्याचा मित्रदेश बनवणेही शक्य झाले नाही. -------------------------------दुसर्या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही....त्याचा अर्थ तोच आहे. ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलेत. इतकेच :) शिवाय प्रत्येक युद्धात स्थानिक लोकांच्या मनोवृत्तीचा प्रचंड प्रभाव कोणत्याही युद्धाच्या वाटचालीवर आणि निकालावर असतो. जर्मनी, जपानमध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्याने झालेले युद्धाच्या युद्धोत्तर चिरफाडीचे विश्लेषण आणि त्यावरचे उपाय इराक, अफगाणिस्तानमधल्या युद्धानंतर दृष्टीपथात असलेल्या भविष्यातल्या स्वप्नातही शक्य आहेत काय ?