Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अल्लाल शेती

द
दादा पेंगट
Sat, 01/24/2015 - 21:38
🗣 114 प्रतिसाद
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही. अधिक, धुर्‍यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते. आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्‍यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्‍याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो. ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो. मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात. १) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? २) वर्‍हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्‍हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का? ३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है? ४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्‍या बाजूचे शेतकर्‍यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो? असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..

प्रतिक्रिया द्या
21994 वाचन

💬 प्रतिसाद (114)
र
रेवती Sat, 01/24/2015 - 21:52 नवीन
:) प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. तुमची लिहिण्याची शैली छान, निवांत म्हणावी अशी आहे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 01/24/2015 - 22:49 नवीन
उत्तरे माहीत नाहीत, सध्याचा तसा ज्वलंत चर्चा-विषय असणार्‍या शेतीविषयी अनुभवाधारित विना-अभिनिवेश लिहिण्याची शैली खूप आवडली. (तुमचं हे इथलं पहिलंच लिखाण दिसतं आहे, तुम्ही लिहिलेलं आणखी बरंच वाचायला आवडेल. खाली मधुराताईंनी म्हंटलंय तसं एकांगी लिखाणच वाचायला मिळतं संस्थळांवर, त्याला असं संतुलित पण प्रामाणिक लिखाण हाच उतारा ठरेल.) पूर्व महाराष्ट्रातील चार टोकाचे जिल्हे म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. यातील बहुतेक ठिकाणी नक्षली चळवळ्यांचा प्रभाव शेतीवर कसा पडतो तेही वाचायला आवडेल. (जाता जाता: माझं अज्ञान दाखवतोय, पण धान म्हणजे भात ना?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 09:42 नवीन
धानाची शेती म्हणजेच भातशेती. धान म्हणजे भात नाही आमच्याकडे. भात म्हणजे शिजलेला तांदूळ. धान म्हणजे ओंब्यावर येते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
न
नरेंद्र गोळे Wed, 01/28/2015 - 05:07 नवीन
एका माणसाने विचारले सत्तू म्हणजे काय? सत्तू म्हणजे अनेक धान्यांच्या भाजणीचे पीठ. त्यात दूध साखर घालून खायचे. म्हणजेच अवघड रेसिपी आहे. त्यावर तो म्हणाला, "सत्तू मलमत्तू कब घोले, कब खाए, कब पिए! धान भाई भले, कुटे, खाए, चले!!" झटपट खायला तयार होते ते धान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 09:40 नवीन
या धाग्यावर उत्तरे मिळतील हीच अपेक्षा ठेवून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मधुरा देशपांडे Sat, 01/24/2015 - 22:12 नवीन
अगदी प्रामाणिकपणे, शेतीविषयक लेख, त्यातही विदर्भातील शेती याबद्दल येणारे इतर लेख डोक्यात असल्याने, साशंक मनाने वाचायला सुरुवात केली. पण सकारात्मक लेखन आवडले. प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. चौथ्या प्रश्नाबद्दल -
शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात?
संस्थळांवर वावरणार्‍या शेतकर्‍यांच्या काही तथाकथित पुढार्‍यांनी जे एकांगी लेख लिहिले हे एक कारण नक्कीच आहे. सतत फक्त सरकारवर दोषारोपण, परिस्थितीला दोषी दर्शवणे, आत्महत्त्यांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन एवढेच दिसले. दुसरी बाजु जर समोर आली तर कदाचित ही मतं थोड्या प्रमाणात बदलु शकतील.
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 10:24 नवीन
म्हणूनच प्रत्येक भागातल्या लोकांनी इकडे आपले अनुभवकथन करावे असे वाटते. मला वाटते इकडे अनेकांना शेतीचा काही-ना-काही अनुभव असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
म
मधुरा देशपांडे Sun, 01/25/2015 - 19:24 नवीन
प्रत्येक भागातील लोकांचे अनुभव वाचायला सगळ्यांनाच आवडतीलच. सुरुवात तुम्ही करा. तुमचे अनुभव अजुन विस्तारीत स्वरुपात लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट
म
मुक्त विहारि Sat, 01/24/2015 - 22:27 नवीन
आमचा पास...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/25/2015 - 09:01 नवीन
+ १/२ आमचा मासिकपास! ;-) (सामासिक पास वाला) आत्मू! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आदूबाळ Sat, 01/24/2015 - 22:38 नवीन
फार छान लिहिलं आहे. प्रश्नही आवडले. एक शंका : या झाडीपट्टी जिल्ह्यांत बल्लारपूर इंडस्ट्रीज, एसीसी, कोल इंडिया वगैरे मोठे उद्योग आहेत ना?
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 09:47 नवीन
उद्योग आहेत, पण हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यातला कामगारवर्गही स्थानिक कमी आहे, बाहेरचे जास्त. नव्या संधी खूप कमी आहेत. आता तिरोड्यात अदानीचा विद्युत प्रकल्प आलाय त्यामुळे थोडा रोजगार आलाय त्या भागात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कंजूस Sat, 01/24/2015 - 23:50 नवीन
तुमचे आणि तुमच्या गावाकडचे लोकांचे विचार एकदम बरोबर आहेत. दुसऱ्याने कर्ज काढून बांधलेला बंगला पाहून चिडून स्वत:ची झोपडी जाळत नाहीत. शेती हा व्यवसाय मानला तर त्याचे नफातोटागणित करायलाच हवे हे पटले. मी जरी शेती करत नसलो तरी शेतीचे कार्यक्रम पाहतो. त्यातले समजून घेतो. नकदी पिके, तिप्पट उत्पन्नाचे वाण पिकवायला लावणेआणि इतर व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना खर्च करायला लावणे हे एक मोठे जाळे, फास, रैकेट आहे. बिटि कापूस, स्ट्रॉबेरी लागवड, इमू पालन, वांझोटे आले लागवड, सोयाबिन लागवड, ही काही उदाहरणे आहेत. मोठ्या कंपन्यांकडून खरेदीच्या अपेक्षेने केलेली कोको, सोयाबिन, कापूस, कोरफड, सफेद मुसळी लागवड भाव पडल्याने आतबटटयाची झाली आहे. आपल्याकडे शेतीकडे हेटाळणी करून पाहिले जाते परंतू शेतीचं उत्पन्न आयकरमुक्त असल्याने कागदोपत्री शेती दाखवून 'इतर' ठिकाणाकडूनचे उत्पन्न विनाकर पांढरे करता येते यासाठी शेतजमीनीचे भाव वाढताहेत.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 01/25/2015 - 03:14 नवीन
लेख आवडला.खरंच हा विचार का करत नसावेत शेतकरी?त्यामागे काय कारणं असतील की तोटा,कर्ज सगळं डोक्यावर घेऊन नगदी पिकं घेतली जातात,बेभरवशी पावसाच्या जीवावर.तेही सध्या शेतकरी अनेक ठिकाणाहून मोफत मार्गदर्शन घेऊ शकत असताना?
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 01/25/2015 - 04:07 नवीन
अल्लाल लेख आवडां मेरेकू. झाडीपट्टीचे जिल्हे हे जिव्हाळ्याचा विषय आहेत. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/25/2015 - 04:24 नवीन
लेख खूप आवडला. कोकणातले लोक पण असेच मस्त रहाणारे आहेत. जमीन खूप उंचसखल आणि खडकाळ असल्याने शेतीयोग्य जमीन मुळात कमी. कष्ट खूप करतात. पण त्यातून श्रीमंत होण्याइतके पैसे कमवता येतील अशी शक्यता खूप कमी. घरात पाहिजे तेवढे पीक झाले तरी खूप. उडीद, भाज्या असे काही काही करतात. नाही असे नाही. पण तेही घरच्या उपयोगासाठीच. बहुधा घरातले बाकी लोक मुंबईला जातात आणि एखादा काका काकू शेती बघतात. एक मात्र आहे, कोकणी माणूस हा तसा ऋण काढून सण करणारा नव्हे. शिक्षणाचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे खाजगी सावकाराच्या विळख्यात कोणी शेतकरी अडकत नाही. बँकांची शेती कर्जे सुद्धा अगदी बाबापुता करून गळ्यात घालायची वेळ येते. मुळात आधी निव्वळ शेतीवर सगळे घर अवलंबून आहे असा प्रकार नसतो. एखादा भाऊ नोकरी करणारा आणि एखादा घरचे बघणारा. अशी वाटणी कित्येक पिढ्या सुखाने चालत आलेली आहे. विहिरींना पाणी भरपूर असते. पण दोन पिके घेत नाहीत. कोकणात जोडधंदा म्हणून गायीम्हशी ठेवणेही हसण्याची गोष्ट आहे. त्या म्हशीला एखादा लीटर दूध आले तर लै मोठी गोष्ट झाली. आंबे काजू आहेत पण ते कंत्राटावर कोणा आंबेवाल्या पटवर्धनाला देऊन मोकळे होतील. राहिलेल्या वेळात कोडतात केशी चालवणे हा आवडता छंद आहे. मात्र मिळतंय त्यात, आहे त्यात समाधानी असतात. माझ्यात पण हा सुशेगाद रहायचा गुण इथल्या मातीतूनच आला आहे. त्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी धडपड करावी असे वाटतच नाही! भात खाऊन किती झोप येते हे तुम्हाला माहीतच असेल दादा! मग भाताचे एक पीक घेऊन कोकण आणि विदर्भातले शेतकरी मजेत रहातात. एवढंच नव्हे तर सरकारच्या मदतीकडे पण बघत नाहीत आणि आत्महत्यांच्या वाटेलाही जात नाहीत यात काय नवल?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 01/25/2015 - 05:37 नवीन
कोकणातील शेती अगदी अशीच आहे हे स्वानुभावाने सांगतो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 07:13 नवीन
अतिशय छान वर्णन केले पैसाताईंनी कोकणातल्या शेतीचे आणि लोकांचे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
उ
उडन खटोला Sun, 01/25/2015 - 10:01 नवीन
कोकणातील शेती आणि शेतकर्याचे यथार्थ वर्णन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
राही Sun, 01/25/2015 - 10:12 नवीन
प्रतिसाद आवडला. पण एक सांगणे जरूरीचे आहे. कोंकणात पाणी भरपूर आहे ही समजूत सध्या तित्कीशी खरी राहिलेली नाही.तीव्र उताराच्या जमिनींमुळे आकाशातून जितके पाणी पडते तितके भर्रकन वाहून जाते.उन्हाळ्यात विहिरी आटतात. नद्यांमधून गोड्या पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे नदीमुखे खूप आतपर्यंत खारी होतात.विकासाच्या कामांमुळे डोंगर ढासळत चालले आहेत आणि ही धुपणारी माती नद्यानाल्यांत जाऊन खाड्या ओहोरताहेत. समतल जमिनीची वानवा असल्यामुळे शेततळी वगैरे संकल्पना बाद आहेत. हिरवा चारा फक्त काही महिनेच मिळू शकतो. त्यामुळे गुरेपालन बाद. आंबा-काजूची बागायती होऊ शकते पण त्याला राखणदारी लागते,ती मजुरी परवडत नाही. दक्षिण कोंकणात रानटी हत्तींचे आक्रमण होऊ लागले आहे. पण यावर एक नामी उपाय कोंकणाला ब्रिटिशांच्या कृपेने लाभला, तो म्हणजे मुंबई. गेल्या दीड शतकापासून कोंकणातून मुंबईत चाकरमान्यांचे स्थलांतर सुरू आहे. मुंबईवर गडद कोंकणी छाप इतके दिवस होती ती यामुळेच आणि पश्चिम महाराष्ट्राला मुंबई सांस्कृतिक दृष्ट्या आपलीशी वाटत नाही तीही यामुळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/25/2015 - 10:26 नवीन
खालाटपट्टीत, म्हणजे समुद्रकिनार्‍यापासून साधारण १५/२० किमि अंतरापर्यंत विहिरींना कायम पाणी असते. पण जरा उंचावर गेले की उन्हाळ्यात पाणी आटून जाते. जिथे अजून जंगलतोड झाली नाही तिथे हा प्रश्न एवढा भेडसावणारा नाही. पण चिपळूण, लांजा अशा ठिकाणी झाडी तुटली त्या त्या भागात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. दक्षिण कोकणात रानटी हत्ती येत आहेत तेही गोवा कर्नाटक बॉर्डरवर खाणींमुळे जंगलतोड झाल्यामुळे. आता खाणी परत सुरू होणार असे सध्या वाचत आहे. प्रत्येकाला आपापल्या खाजगी फायद्याची काळजी आहे. पर्यावरण आणि जंगलांचे कोणाला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
आ
आदूबाळ Sun, 01/25/2015 - 10:37 नवीन
कोंकणात पाणी भरपूर आहे ही समजूत सध्या तित्कीशी खरी राहिलेली नाही.तीव्र उताराच्या जमिनींमुळे आकाशातून जितके पाणी पडते तितके भर्रकन वाहून जाते.उन्हाळ्यात विहिरी आटतात. नद्यांमधून गोड्या पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे नदीमुखे खूप आतपर्यंत खारी होतात.विकासाच्या कामांमुळे डोंगर ढासळत चालले आहेत आणि ही धुपणारी माती नद्यानाल्यांत जाऊन खाड्या ओहोरताहेत. समतल जमिनीची वानवा असल्यामुळे शेततळी वगैरे संकल्पना बाद आहेत. हिरवा चारा फक्त काही महिनेच मिळू शकतो. त्यामुळे गुरेपालन बाद. आंबा-काजूची बागायती होऊ शकते पण त्याला राखणदारी लागते,ती मजुरी परवडत नाही. दक्षिण कोंकणात रानटी हत्तींचे आक्रमण होऊ लागले आहे.
प्रवीण दशरथ बांदेकर यांची "चाळेगत" ही कादंबरी याविषयावर आहे. (कादंबरी फसली आहे हे माझं वैयक्तिक मत, पण) कोकणातल्या वास्तवाचं वर्णन भयावह आहे.
गेल्या दीड शतकापासून कोंकणातून मुंबईत चाकरमान्यांचे स्थलांतर सुरू आहे. मुंबईवर गडद कोंकणी छाप इतके दिवस होती ती यामुळेच
अगदी अगदी. मुंबईला जिथे नोकरीला होतो तिथे सगळे सावंत, सामंत, महाडिक, राणे, देसाय, पाडेकर, म्हात्रे असेच होते. एकमेकांत अगदी स्वच्छ कोकणी / मालवणी बोलत. फार गोड भाषा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सतिश गावडे Sun, 01/25/2015 - 12:19 नवीन
म्हात्रे आगरी. कोकणी नव्हे. आगरी लोक पेण, पनवेल, उरण आणि ठाण्याचा काही भाग या पट्टयात राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Sun, 01/25/2015 - 18:20 नवीन
हे म्हात्रेशेट बहुतेक भंडारी होते. त्या जातीतही म्हात्रे आडनाव असतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 19:00 नवीन
हो बरोबर, काही पाचकळशी लोक सुध्दा म्हात्रे आडनावाचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सोत्रि Mon, 01/26/2015 - 02:39 नवीन
अजुनही आडनावावरून जात शोधण्याचा समाजाचा सोस काही जात नाही आणि जात काही जात नाही हेच खरं! - (आडनाव न लावावे का हा विचार करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सतिश गावडे Mon, 01/26/2015 - 07:53 नवीन
"आगरी" म्हणून काही जात आहे की नाही हे मला माहिती नाही. कदाचित असेलही. मात्र उत्तर रायगड मधील पेण, पनवेल, उरण आणि अलिबाग हे चार तालुके आणि ठाणे व नवी मुंबई शहरांच्या बहुतांशी भागात "आगरी" भाषा बोलणारे लोक राहतात. हे लोक "आगरी" म्हणुणच ओळखले जातात. या समाजाची वस्ती समुद्रकिनार्यावरील व खाडीच्या शेजारील गावांमध्ये असते. या लोकांचा मिठागरे हा एक व्यवसाय असून "आगरी" हा शब्द मिठागर शब्दातील आगर शब्दावरून आला आहे. आगरी ही मराठीची एक बोलीभाषा आहे. आंतरजालावर "आगरी रामायण" असा शोध घेतल्यास मिमिक्री आर्टिस्ट जॉनी रावत यांची आगरी भाषेतील ध्वनिफीत सापडते. ती ऐकल्यास आगरी भाषेची कल्पना येते. टाईमपास चित्रपटातील "दादूस" म्हणणार्या पात्राची भाषा आगरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ख
खटपट्या Mon, 01/26/2015 - 08:08 नवीन
मुळात आडनावे ही जातीवरुन पडली. यात जात शोधण्याचा वगैरे काही प्रयत्न केला नाहीये. जे माहीत होते ते सांगीतले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
प
पिंगू Tue, 01/27/2015 - 22:10 नवीन
मुळात आगरी म्हणजे मिठाच्या आगरांची मालक असलेले आणि तिथे काम करणारे. भातशेती आणि मिठागरे हा आगरीसमाजाचा पारंपारिक व्यवसाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
निनाद मुक्काम … Tue, 01/27/2015 - 22:34 नवीन
आणि ह्या जमिनी विकून त्याच्या इमारती बांधून बक्कल पैसा हाती घ्यायचा. पायातील चपलेसह पांढरा पोशाख गळ्यात सोन्याच्या चेन अश्या अवतारात गावभर भटकंती करतांना ह्या समाजाला डोंबिवलीत लहानपणापासून पहिले आहे. आगरी मुलांशी मैत्री नाही ना असे अनेकदा घरी विचारले जायचे. डोंबिवलीत आगरी लोकांना ब्रिटीश म्हटले जाते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Wed, 01/28/2015 - 00:02 नवीन
मी पण आगरीच. पण मला कधीच असले शौक जडले नाहीत. आता तर जमिनी विकून भिकेला लागलेल्या कितीतरी जणांना बघितले आहे. काहीच कारण नसताना उगाच मिरवामिरवी करायची, हा इथला चुकीचा पांयडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/28/2015 - 05:44 नवीन
माझे खुप मित्र आहेत आगरी समाजात. एकदा मैत्री केली की जिवाला जिव देणारी माणसं. वेळ पडल्यास तुमच्यासाठी जीवही देतील आणि वेळ पडल्यास घ्यायलाही तयार होतील. लहानपणी कळव्यात राहत असताना एक आगरी आज्जी फार जवळची होती आम्हाला. तीचे नाव शेवटपर्यंत काही कळाले नाही, रादर आम्ही तसा प्रयत्नच केला नाही. कारण तिचा आवाज एखाद्या आगबोटीच्या भोंग्यासारखा खणखणीत होता. माझे मामा म्हणायचे 'कसला ढणढण आवाज करतेस गं मावशे?' त्यावरून आम्ही तीचं नावच पाडलं होतं "ढणढणआज्जी " ;) नन्तर मोठे झाल्यावर कळले तीने तिच्या तरुणपणी एक खुन केला होता. भर बाजारात एका मासे खरेदी करायला आलेल्या माणसाने काहीतरी भांडणावरून तिच्या नवर्‍याच्या अंगावर हात उचलला. या बाईने तिथेच मासे कापायच्या सुरीने त्याच्या कोथळाच काढला. गंमत म्हणजे या गुन्ह्याच्या आरोपाखाली तिचा नवरा शिक्षा भोगून आला. ढणढण आज्जी आता नाहीये पण कळव्यात गेलो की तिच्या घरी नेहमी जातो आम्ही अगदी हक्काच्या आजोळी जावे तसे. या आज्जीच्या कळव्यात तीन चाळी आहेत चार मजली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
न
निनाद मुक्काम … Wed, 01/28/2015 - 22:39 नवीन
डोंबिवलीत बालपण गेले तेथे ह्या समाजाची जी प्रतिमा आहे ती येथे लिहिली,पण चेंबूर ला घाटाला विलेज , छोटा राजांचा बालेकिल्ला किंवा जुहु कोळीवाडा येथील अनेक आगरी माझ्या पुढे ओळखीचे झाले , अनेक जण उच्च शिक्षित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
ब
बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 10:55 नवीन
यात इतके वाईट काय आहे हेच मला समजत नाही. कुठल्याही जातीबद्दल अनुद्गार निघत नसतील तर काय त्रास काय आहे नेमका? उलट 'आमच्यात असं व तुमच्यात तसं' छाप न्यूट्रल चर्चेतून जितकी माहिती मिळते त्याने आपले अनुभवविश्व समृद्ध होतेच. जातपात व तज्जन्य वाईट प्रकार नको असतील तर हा विषय असा कुष्ठरोग्यागत बाहेर ठेवून दुर्लक्षिण्याजोगा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:08 नवीन
+११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
दादा पेंगट Mon, 01/26/2015 - 17:03 नवीन
आपल्याकडे कित्येक रीतीभाती ह्या एकेका जातीपुरत्याच आहेत, शतकानुशतके रोटीबेटी व्यवहार जातिपुरता मर्यादित राहिल्याने. जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी कोणी चालीरीती, खाद्यसंस्कृती वगैरे बद्दल बोलत असेल तर जातीचा उल्लेख आवश्यक ठरतो. आमच्या जातीत अमुक असते, तमुक सणाला अमुक बनते वगैरे सांगितले आणि त्याच्यावर जातीयतेचा आरोप केला तर आपण आपल्या ज्ञान मिळवण्यावरच मर्यादा आणत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/27/2015 - 06:48 नवीन
जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी कोणी चालीरीती, खाद्यसंस्कृती वगैरे बद्दल बोलत असेल तर जातीचा उल्लेख आवश्यक ठरतो सहमत आहे. वर बॅटमन यांनी म्हटल्याप्रमाणे जर अवमान, अवहेलना होत नसेल तर जातीच्या उल्लेखाने फारसा फरक पडत नाही. आणि भारतासारख्या देशात जिथे अठरापगड जातींचे वर्चस्व आहे तिथे तर या गोष्टी अपरिहार्यपणे संवादात येतच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट
न
नाखु Wed, 01/28/2015 - 07:07 नवीन
जावू द्या मिपा "आसबें" च लेखन प्रताप पाहून ही तुम्हाला अशे प्रश्न पडावेत?? जात आहेच ती सांगीतली किंवा नाही सांगीतली तरी राहणारच (आपल्या कुणाची इच्छा असो नसो तरी) पण जातीभेद्/जातीद्वेष कसोशीने टाळणे/निपटणे हातात आहे हे सत्य स्वीकारणारा गावकुसाबाहेरचा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
सस्नेह Sun, 01/25/2015 - 11:04 नवीन
'कोडतातल्या केशी' बद्दल प्रचंड सहमत ! कोकणात पोष्टिंग झालेल्या आमच्या काही घाटी 'खाते'-बंधूंना या केशींनी दे माय धरणी ठाय करून सोडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:46 नवीन
थोडक्या महाराष्ट्राच्या पूर्व टोकात आणि पश्चिम टोकात बरेच साम्य आहे.बीच में ही थोडी गडबड है. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गवि Tue, 01/27/2015 - 07:23 नवीन
एक मात्र आहे, कोकणी माणूस हा तसा ऋण काढून सण करणारा नव्हे. शिक्षणाचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे खाजगी सावकाराच्या विळख्यात कोणी शेतकरी अडकत नाही.
चपखल. आता कोंकण बदललं असं ऐकू येतं. पण वीसेक वर्षापूर्वी मी जी पंधराएक वर्षं कोंकणात होतो तेव्हा भिकारी जवळजवळ अजिबातच बघितला नाही. एकच म्हातारा होता तो आठवड्या पंधरा दिवसांनी कधीतरी घरी येऊन अन्न मागून न्यायचा, पण तोही भिकारी नव्हता. शौचालये आणि रस्ते यांची साफसफाई करणारा पण वयाने फार काम झेपत नसलेला कामगार होता. रस्त्यात शी करायला पोरांना बसवणे हा प्रकार पूर्ण शहरात वर्ज्य होता. मोठ्यांनी तसे करण्याची बात दूरच राहिली. एका नव्याने शहरात आलेल्या कुटुंबाने पोरांना बाहेर शी ला बसवलं तेव्हा सगळी आळी त्यांच्या विरोधात गेली आणि ते बंद करवलं. स्वच्छतेचा सेन्स कोंकणातल्यासारखा घाटावर नाही दिसला. कोल्हापूर्-सांगली-सातारा भागात खूप वर्षं राहणं झालं, तिथे रस्ते हे कडेला संडासला बसण्यासाठीच असतात आणि कोणतीही रिकामी जागा हा संडास, मुतारी कम उकिरडाच असतो अशी समजूत व्यापक दिसली. रत्नागिरीत पावसाचं पाणी फार साठून रहायचं नाही, पण जे काही साठायचं त्यात पाय बुडवून खेळतानाही स्वच्छ वाटायचं. देशावर आल्यानंतर कोणतंही पाण्याचं डबकं म्हणजे गटार ऊर्फ टाळण्याची गोष्ट असंच वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Tue, 01/27/2015 - 07:35 नवीन
सहमत !! बर्‍याच वेळेला रानातल्या झर्‍याचं पाणी पीण्याईतके शुद्ध असायचं. अजुन असतं. कोल्हापूर सातारा सांगली वाल्यांच्या भावना दुखावल्या नाही म्हणजे झालं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बॅटमॅन Tue, 01/27/2015 - 08:15 नवीन
अहो सत्य आहे ते सत्यच आहे. भावना दुखवून घेऊन सांगता कुणाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 01/27/2015 - 08:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अर्धवटराव Tue, 01/27/2015 - 20:48 नवीन
मी कोकणी नाहि. पण हा गुण माझ्यातही अगदी पुरेपूर उतरला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सौन्दर्य Sun, 01/25/2015 - 04:37 नवीन
लेख फार छान आणि संतुलित आहे. तुमचे विचार आवडले आणि पटले देखील. एक नवीनच दृष्टीकोन वाचायला मिळाला. अजून लिहित रहा आम्हाला वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 01/25/2015 - 05:17 नवीन
छान लेख,,. आवडला.
  • Log in or register to post comments
क
किशोर७० Sun, 01/25/2015 - 06:03 नवीन
लेख आवडला. एक शंका आहे- तुम्ही म्हणता तसे विदर्भातल्या कोरडवाहू शेतकऱ्याने अन्नधान्याच्या उत्पादनाकडे वळायचे तर तो कोणती पिके घेऊ शकतो? भात आणि गहू घेणे शक्य नाही. मग उरतात ज्वारी आणि बाजरी ही दोनच पिके. त्यावर त्याने जगावे का? दुसरं, तुमच्याकडे आणि कोकणात नोकरी करून शेती करतात किंवा शेती करून नोकरी करतात... तसं विदर्भात होत नाही, याची कारणं तिथल्या विकासाशी जुळलेली असावीत. झाडीपट्टीतली आणि कोकणातली लोकसंख्या, खाणउद्योगात किंवा औद्योगिक क्षेत्रात नोकरी साठी होणारे स्थलांतर हे लक्षात घ्यायला हवे.
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 10:10 नवीन
मला वाटते गहू शक्य असावे. पण कपाशीपूर्वी ज्वारीच प्रमुख पीक होते. ते स्थानिक वातावरणात चांगले उत्पन्न देईल असे वाटते. अर्थात मीदेखील वर्‍हाडात शेतकर्‍यांनी पारंपारिक पीकेच घ्यावी असे म्हणत नाही आहे तर पारंपारिक पीके का घेत नाहीत हा प्रश्न केलाय. मला उत्तर माहीत नाही. 'नगदी पीकेच घेऊ, सातत्याने कर्जबाजारी झालो तरी चालेल' ह्यामागची भूमिका, मानसिकता जाणून घ्यायची आहे, कारण आमच्या भागात वेगळी मानसिकता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किशोर७०
अ
अर्धवटराव Tue, 01/27/2015 - 21:00 नवीन
'नगदी पीकेच घेऊ, सातत्याने कर्जबाजारी झालो तरी चालेल' ह्यामागची भूमिका, मानसिकता जाणून घ्यायची आहे
स्थानीक पंजाबी, मारवाडी, सिंधी लोकांसारखं गबर व्हायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्राने नगदी पिकातुन कमवला तसा बक्कळ पैसा कमवायचा अशी काहिशी अतरंगी आयडीया आहे वर्‍हाड-विदर्भात. पण मुळात त्यासाठी अत्यावष्यक अशी व्यावसायीक वृत्ती आणि कष्ट करण्याची इच्छा नसल्यामुळे वाघाचं कातडं पांघरुन शेर बनायला निघालेल्या गाढवासारखी अवस्था झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा