Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अल्लाल शेती

द
दादा पेंगट
Sat, 01/24/2015 - 21:38
🗣 114 प्रतिसाद
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही. अधिक, धुर्‍यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते. आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्‍यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्‍याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो. ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो. मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात. १) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? २) वर्‍हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्‍हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का? ३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है? ४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्‍या बाजूचे शेतकर्‍यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो? असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..

प्रतिक्रिया द्या
21994 वाचन

💬 प्रतिसाद (114)
स
संदीप डांगे गुरुवार, 01/29/2015 - 09:18 नवीन
व्यावसायीक वृत्ती आणि कष्ट करण्याची इच्छा
हेच मिसींग आहे हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चेतन Sun, 01/25/2015 - 06:03 नवीन
लेख आवडला. पण अल्लाल शेती पुढिल काहि वर्षात होइल याबद्दल साशंक. नगदी पी़क थोड्या प्रमाणात घेता येत नाही का?
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:14 नवीन
खरे तर थोडे, एखाद्या बांधीत घेता यायला हवे. पण घेत नाहीत. अल्लाल शेती होत राहील. धानाचे अर्थशास्त्र किंवा थोडे वेगळे आहे. मिनिमम सपोर्ट किमत असते. तसेच नवनवे वाण येत असतात आणि शेतकरी ते वापरत असतात. प्रतिहेक्टर उत्पादन हळूहळू का होईना पण वाढत आहे. उदाहरणार्थ आता आमच्या गावी जय श्रीराम हे धानाचे वाण मोठ्या प्रमाणात लावले जाते कारण दर चांगला मिळतो, जरा काटक आहे, उत्पादनही चांगला होते. सुगंधी चिन्नोर वाण एखाद्याने लावलेच तर थोडे पोटापुरतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
व
विशाल कुलकर्णी Sun, 01/25/2015 - 06:06 नवीन
साधी सरळ गोष्ट आहे दादा, आपल्याकडे नैसर्गिक उपलब्धी काय आहे?जमीन कुठल्या उत्पादनाला पोषक आहे? याचा अंदाज घेवून पिके घ्यायला हवीत. उगीच निव्वळ उत्पन्नाच्या मागे लागून नगदी पिके घ्यायची आणि मग शेवटी तेलही गेले .... करत बसायचे याला काहीच अर्थ नाही. सुटसुटीत आणि थेट लेख, आवडलाच.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 01/25/2015 - 06:21 नवीन
ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो.
१. पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ आणि तुमचा आयडी तुमच्या आळशी मनोवृतीचे द्योतक आहे. प्रयोगशील असण्यास तुमची हरकत का आहे? तर आतबट्ट्याचा व्यवहार होण्याची शक्यता असते म्हणून! त्यासाठी कोकणी माणसाला समविचारी बनवून हाताशी धरताय, का? २. उत्पादनक्ष्मता वाढविण्याची कल्पना आहे का? हा प्रश्न कशाच्या आधारावर विचारताय? त्यासाठी लागणारी आर्थिक सुबत्ता यावी म्हणूनच तर नगदी पिकांचां अट्टाहास आहे हो. पण तिथेच बोंब आहे. नगदी पिकांची गरज तर आहे पण त्यासाठी शेतकर्‍याला मदत मात्र कोणी करणार नाही. तुमचा उपाय काय तर हातावर हात धरून पोटापुरते पिकवा. देशाच्या एकंदरीत मागणीचे काय करायचे? आयात ??? ३. मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये हे तुम्ही, अल्लाल शेतकर्‍याने सांगावे हाच मोठा विनोद आहे. ४. शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून ह्याचे उत्तर शोधण्यापेक्षा प्रत्याक्षात काय स्थती आहे त्याबद्दल विचार करायला हवा. शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते असे म्हणताय ना? मग कर अब्जोपती माल्ल्या किंगफिशर वाचणन्यासाठी सरकार कडे हात पसरू शकतो तर शेतकर्‍यानेच काय घोडं मारलं आहे? -('सदा जागरूक') सोकाजी
  • Log in or register to post comments
च
चेतन Sun, 01/25/2015 - 06:42 नवीन
>>पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ आणि तुमचा आयडी तुमच्या आळशी मनोवृतीचे द्योतक आहे. कशावरुन. त्यांनी आधिच सांगितलय शेतीच्या जोडीने इतर व्यवसाय आणी नोकरी करतात म्हणून (उगाच उचलली..) नगदी पीकं उदा. कापुस आणि आयात काय संबध्द? भाव आपोआप मिळेल. मग कर अब्जोपती माल्ल्या किंगफिशर वाचणन्यासाठी सरकार कडे हात पसरू शकतो तर शेतकर्‍यानेच काय घोडं मारलं आहे? दरवर्षी? प्रयोगशील रहावे पण पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Sun, 01/25/2015 - 06:55 नवीन
कशावरुन
त्यांनीच प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर म्हणून उचलली आणि...पण उगाच नव्हे :)
काय संबध्द?
मुद्दा नीट समजून घ्या, नाही समजला तर विचारा की नेमका मुद्दा काय आहे! ठीक ?
दरवर्षी?
हो! कारण तसे करत राहवे लागते ह्याचा अर्थच मागच्या वर्षी काही केले गेले नाही!!
प्रयोगशील रहावे पण पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यावर
लेख असे म्हणत नाही, लेख फक्त पोटापाण्याचे बघा असे म्हणतोय! - (प्रयोगशील) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चेतन Sun, 01/25/2015 - 07:14 नवीन
मग मुद्दा नीट समजउन सांगाचं. कापसाची जर डिमांड असेल तर भाव का मिळत नाही? कारण तसे करत राहवे लागते ह्याचा अर्थच मागच्या वर्षी काही केले गेले नाही!!?? नक्की???? मग दरवर्षीची कर्जमाफी प्रत्यक्शात नसते का? माल्याबद्दल सरकारने काय केले? माल्या टॅक्स भरतो शेतकरी भरतो का? माल्याच्या कंपनीवर बर्‍याच नोकरदारांची घरे अवलंबुन असतात तसे इथे असते का? शेवटच्या मुद्द्याबद्दल किंचीत सहमत. म्हणुन नकदी पीकं थोड्याप्रमाणात घेता येतात का हा प्र॑श्न विचारला. (फुकटचा टॅक्स भरणारा नोकरदार) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
व
विवेकपटाईत Mon, 01/26/2015 - 12:53 नवीन
महानगरात राहणाऱ्या नौकार्दाराला सर्वात जास्त सरकारी अनुदान मिळते (अप्रत्यक्ष रुपात ). मुंबईत आणि दिल्लीत राहणाऱ्या लोकांसाठी पाणी, वाहतूक (मोठे मोठे उड्डाणपूल च्यायला जेवढा पैसा मुंबईच्या लोकांना पाणी पाजण्यात आणि रस्त्यांवर खर्च होतो तेवढा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रावर होत नाही. स्वस्त लोकल, बस, बाबुंसाठी नुकसानात चाललेली AI, नियमित २२ तासांपेक्षा जास्त वीज. सबसिडी वाली गस व गेल्या ५० वर्षांपासून पेट्रोल डीजेल सबसिडी (सध्या नाही आहे, उद्या पुन्हा चालू होई शकते). विचार करा निदान प्रत्येक महानगरीय व्यक्ती वर २० ते २५ हजार रुपयांची दरवर्षी सबसिडी सरकार तर्फे जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
व
वामन देशमुख Mon, 01/26/2015 - 18:09 नवीन
महानगरात राहणाऱ्या नौकार्दाराला सर्वात जास्त सरकारी अनुदान मिळते...
हो, पण शहरात राहणारे नोकरदार आणि त्यांच्या कंपन्याही सरकारला कररूपाने सर्वात जास्त महसूल देतात. आणि अजून एक, शेतीजन्य उत्पन्नावर करच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
मराठी_माणूस Tue, 01/27/2015 - 13:30 नवीन
त्यांच्या कंपन्याही सरकारला कररूपाने सर्वात जास्त महसूल देतात.
ह्या कंपन्यांचे उत्पादन भलत्याच शहरात होत असते. कॉर्पोरेट ऑफिस महनगरात असते आणि वित्तिय कारभार तिथुन होतो म्हणुन तसे भासते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
व
विवेकपटाईत Tue, 01/27/2015 - 15:10 नवीन
चुकता आहात राव, शेतीचे भाव सरकार ठरवते आणि ते कमी कसे ठरवायचे हाच प्रयत्न असतो. पण अप्रत्यक्ष रूपेण कर वसूलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
स
सुबोध खरे Wed, 01/28/2015 - 07:26 नवीन
Mumbai accounts for slightly more than 6.16% of India's economy contributing 10% of factory employment, 30% of income tax collections, 60% of customs duty collections, 20% of central excise tax collections, 40% of foreign trade and rupees 40,000 crore (US $10 billion) in corporate taxes to the Indian economy.[2]source wikipedia साहेब एवढा पैसा मिळवण्यासाठी मुंबईला दिलेल्या सुविधा आणि त्यावरील खर्च नगण्यच आहे. मुंबईतील माणूस जेवढी मेहनत करतो तेवढी महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात होत नाही हि वस्तुस्थिती आहे. मुंबईत विजेची गळती( चोरी) नगण्य आहे. मुंबईत कुणालाही फुकट काहीही मिळत नाही. उगाच गावांचा कळवळा घेणे हि फ्याशन झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
सुबोध खरे Wed, 01/28/2015 - 07:29 नवीन
हे पण पहा http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Role%20of%20Mumbai%20City%20in%20Indian%20Economy.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/28/2015 - 09:24 नवीन
मुंबईतील माणूस जेवढी मेहनत करतो तेवढी महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात होत नाही हि वस्तुस्थिती आहे. हे आमच्या मुटेसाहेबांना सांगा. ते म्हणतात शेतकर्‍यांइतके कष्ट कोणीच करत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/28/2015 - 18:54 नवीन
:) आता या धाग्यालाही शतकाकडे जोरात पळवायचा विचार आहे काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/29/2015 - 07:37 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:35 नवीन
लेख फक्त पोटापाण्याचे बघा असे म्हणतोय! >>> मी असे म्हणत नाही. मी शेती व्यावहारिक होऊन करावी म्हणतोय. ज्याला पोटापुरती करावीशी वाटते त्याने तशी करावी, ज्याला बक्कळ पैसा काढावासा वाटतो त्याने तसे करावे. पण वास्तवाचे भान असू द्यावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:29 नवीन
१. मी कुठे हरकत घेतली आहे? मी माझ्या भागापुरती असलेली एक मानसिकता सांगितली आहे. आणि तशी मानसिकता कोकणात पण आहे का ते विचारले आहे. त्याच्यामागचे कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २. नगदी पिकांची गरज तर आहे पण त्यासाठी शेतकर्‍याला मदत मात्र कोणी करणार नाही. >> मदत करायला ब्यांका आहेत, कृषी विद्यापीठे आहेत, शासनाच्या योजना आहेत. तसेही तुम्ही तुमच्या मनातली वाक्ये माझ्या तोंडी घालण्याचे धंदे करत आहात असे वाटत आहे. मी कुठलाही उपाय सांगितला नाही. माझा तेवढा अभ्यास, कुवत, अधिकार नाही. ३. ऊस जिथे भरपूर पाणी आहे त्यांनी घ्यावे ना. पण पाणीच नसताना ऊस का घ्यावे? इतर नगदी पिके आहेतच. जमिनीतले सगळे पाणी ऊसाच्या घशात घातले तर मग प्यायच्या पाण्यासाठी वणवण करण्यात काय अर्थ आहे. पावसाळा संपला नाही की जिथे टँकर मागवावा लागतो तिथे ऊस का लावावा? ४. सरकारने किंगफ़िशर वाचवण्याची कोशीश केली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ब
बाबा पाटील Sun, 01/25/2015 - 07:10 नवीन
वास्तवाशी कसलाही संबध नसलेला,एसीत बसुन खरडलेला लेख.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 01/25/2015 - 07:16 नवीन
एसीत बसुन खरडलेला लेख.
पूर्ण ताकदीने सहमती! -(एसीत बसूनही वास्तव समजून घेणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 10:05 नवीन
माझ्या घरी एसी नाही. हिवाळा असल्याने पंखाही बंदच अस्तो. त्यामुळे हा लेख एसीत बसून खरडला आहे हा आरोप सरासर झूठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
आ
आदूबाळ Sun, 01/25/2015 - 08:57 नवीन
हायला! का बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
अ
अनुप ढेरे Sun, 01/25/2015 - 10:07 नवीन
हेच विचारतो. लेखाकाने स्वतःची शेती असल्याचा उल्लेख केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 10:16 नवीन
साहेब, तुमचा शेतीशी कितपत संबंध आहे मला माहीत नाही. पण माझा आहे. मी फक्त माझे अनुभवकथन केले आहे. तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. भारताच्या प्रत्येक भागातल्या शेतकर्‍यांचे अनुभव वेगळे असू शकतात. सरसकटीकरण करता येत नाही. म्हणून मी माझ्या भागापुरते बोललो आणि इतर क्षेत्रांविषयीचे जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली. आपण आपले अनुभव लिहावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
सतिश गावडे Sun, 01/25/2015 - 12:32 नवीन
डॉ. साहेब त्यांनी त्यांचा अनुभव लिहिला आहे. केवळ त्यांचा अनुभव तुमच्या अनुभवाशी मिळता जुळता नाही म्हणून लेखकाची आणि लेखाची "फेक" अशी संभावना करुन कशी चालेल? कोकणातील शेती आणि शेतकर्‍यांची मानसिकता या लेखातील वर्णनापेक्षा फार वेगळी नाही. आज जरी मी आयटीत असलो तरी मी वयाची पहिली बावीस वर्ष ते अनुभवलं आहे. आपला देश इतका अवाढव्य आहे, ऋतूमानात इतकी विविधता आहे की एका जागेचे किंवा हवामानाचे ठोकताळे दुसर्‍या ठिकाणी लागू होत नाही. सोत्रींच्या प्रयोगशीलतेच्या मुद्याबद्दल बोलायचे झाले तर वर्षानूवर्षे हात पोळणारी, हताश शेतकर्‍याचा जीव घेणारी प्रयोगशीलता काय कामाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:40 नवीन
तुम्ही माझाच मुद्दा अंडरलाइन केला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 18:14 नवीन
काही लोकांना कोकणात शेतकरी आहेत हे सुद्धा माहीत नाही असे दीसतेय. महाराष्ट्रातील शेती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेती असे एक समीकरण झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस Sun, 01/25/2015 - 07:15 नवीन
सोत्रि आणि चेतन यांच्या प्रश्नांची उत्तरे मीही देऊ शकतो. प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो. आता हे सगळं थोडक्यात पाच दहा ओळीत नाही सांगता येणार. केरळ, कर्नाटकचे अथवा जर्मनी, जपान, इस्राइलचे उदाहरण घेऊन लगेच इकडे तसे केले असं होत नाही याला बरीच कारणे आहेत. काही एकर ते फक्त वीस गुंठे जमीनीचा तुकडा असणाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 01/25/2015 - 07:20 नवीन
प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो
ह्यावर लिहा, प्लीज! मनापासून वाचायला आवडेल. ह्या विषयावर काहीही माहिती नसताना लेखाला 'चान चान' म्हणणार्‍यांनाही खरे काय ते कळावी ही इच्छा आहेच! - (प्रयोगशील) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sun, 01/25/2015 - 16:55 नवीन
प्रगतिशील शेतकऱ्याकडे भांडवल, पाण्याची स्वत:ची व्यवस्था आणि रस्त्याकडे जाण्याचा मार्ग असणे गरजेचे आहे तर तो काही वेगळे पीक घेण्याचा विचार करू शकतो. हे शेतकरी बहुधा बाजारपद्धती चांगली अवगत असणारे असतात. कोणत्या वेळेस कोणत्या बाजारात काय विकायला आणायचे हे अचूकपणे करून भाव मिळवण्यात यशस्वी होतात. उदा लाल गुलाबाची फुले व्हलेंटाइन डेला आणणे. परंपरागत शेतीमध्ये सर्व गाव जे पीक लावेल ते घ्यावे लागते. पाणी पाटाचे अथवा विहिरीचे पाळीने मिळते. पंचक्रोशीतले पीक तयार झाल्यावरच गाडीवाट मिळते. अगदी बांधापर्यंत रान असते. बैलगाडी आतल्या शेतात नेता येत नाही. मिरची, वांगी वगैरे आठवड्याला तोडून बाहेर आणता येत नाही. पिकातलेच काही दाणे ठेवून पुढच्या वर्षीचे बियाणे होते. वेगळे महागडे वांझोटे बियाणे खरेदी करावे लागत नाही. धान्य कडधान्याच्या भावात फार चढ उतार होऊन नुकसान होत नाही. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. शिवाय धान्य उत्पादन टाळून सर्वच फुलशेती करू लागले तर काय होईल ? हे थोडेफार मुद्दे शेतीचे कार्यक्रम घरी कोचावर बसून पाहून लिहिले आहेत त्यामुळे चुका संभवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
म
माहितगार Sun, 01/25/2015 - 07:37 नवीन
'कोडतात केशी' म्हणजे ? लेख आणि प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/25/2015 - 08:44 नवीन
ते "कोर्टात केसेस" असं आहे. आमच्या मराठीत कोर्ट"केस" चं अनेकवचन "केशी" होतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 18:17 नवीन
हे बाकी बेस बोललात ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एक सामान्य मानव Sun, 01/25/2015 - 07:40 नवीन
ह्या विशयावर झी न्यूजवर सगुणा बागच्या मालकान्ची मुलाखत होती परवा. त्यानी भात शेती कमी खर्चात करण्याचे तन्त्र विकसीत केले आहे. तचेच इतर जोडधन्दे करुन उत्पन्न कसे वाढवले तेही चान्गले वाटले. ज्याना रस असेल त्यानी यूनळीवर बघावा.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 01/25/2015 - 07:59 नवीन
शेती चर्चेला अच्छे दिन आले.... ओबामा आणि मोदी यांचे अभिनंदन. धन्यवाद !!! ;-) :D
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 01/25/2015 - 08:47 नवीन
उत्तम लेख ,आवडला .तसेच पैसा ताईंचा प्रतिसादही मस्त !
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sun, 01/25/2015 - 09:59 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 01/25/2015 - 09:50 नवीन
आजवर किती प्रधानमंत्री आपल्या "जंबो डेलीगेशन" मधे शेतकरी प्रतिनिधि घेऊन गेलेत? नाही म्हणजे शेतकरी पोशिंदा वैग्रे वैग्रे सगळे सोडा! आपण असे धरून चालू की शेती हा एक व्यवसायच आहे! (आहेच!) पण मग किती शेतकरी प्रतिनिधि ह्या डेलीगेशन मधे नेले गेले? न नेल्यास का नाही? भारत कृषिप्रधानदेश आहे न ? मग? बरं अगदी व्हाईट हाउस च्या ऑफिसियल डिनर मधे मुंडासे हवे असा अट्टहास नाही पण कमीत कमी , डब्ल्यु टी ओ राउंड्स मधे तरी किती कास्तकार (शेतकरी) नेले जातात? एकंदरीत शेतकरी लोकांस इंटरनेशनल किंमत निर्धारण प्रक्रियेत ? ज्याला धंदा करायचा आहे त्यालाच बारगेनिंग मधे स्थान नाही मग हा व्यवसाय इतर व्यवसाया सोबत लेवल प्लेयिंग ग्राउंड वर आहे अन तमाम शेतकरी हे ऐतखाऊ आळशी असल्याचे बोलणे कितपत संयुक्तिक?? हे पेंगट ब्वा त्यांच्या जिल्ह्यातले सांगत आहेत! तिथल्या भौगोलिक परिस्थिति नुसार तेथील शेतकरी त्याची मानसिकता लाइफस्टाइल बेतलेली आहे ! जनारालायाझेशन न व्हावे ही मनापासून इच्छा!!!
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 10:03 नवीन
आपले मुद्दे रास्तच आहेत. मी फक्त माझ्याच भागातले माझेच अनुभवकथन केले आहे हे स्पष्ट केले आहेच. जनरलायझेशन करण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक भागातला शेतकरी वेगळा असतो. डेलिगेशन, शेतकर्‍यांना प्रतिनिधित्व देण्याचे बोलाल तर मला वाटते की तुमचे पवार साहेब सुद्धा एका अर्थाने शेतकरीच आहेत.तुलनेत थोडे सधन शेतकरी आहेत, पण आहेत तर शेतकरीच. ते कृषिमंत्रीसुद्धा होते. आणि त्यांच्या हाती निर्णय अधिकार होतेच. म्हणजे यशस्वी व्यावसायिकाला प्रतिनिधित्व मिळतेच. शासन जेव्हा उद्योगपतींचे डेलिगेशन नेते तेव्हा कोपर्‍यातल्या पानठेलेवाल्याला किंवा गावातल्या बंदर छाप लाल दंतमंजन बनवणार्‍याला नेत नाही, तर मोठ्या, यशस्वी उद्योगपतींनाच नेते. तसाच प्रकार शेतीतही घडत असेल, काय माहीत? ह्याबद्दल अर्थातच जाणकार लोक जास्त योग्य माहिती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 01/25/2015 - 10:23 नवीन
अर्थातच! मी काही "यष्टी" भरुन शेतकरी न्या म्हणालो नाही!! पण अल्पभुधारक, कोरडवाहू शेती ची जाण , अनुभव अन अर्थकारण ह्याचे ज्ञान असलेला शेतकरी न्यायला काय हरकत आहे! ?? कोरडवाहू शेती चा अनुभव नसणे ह्या पाई पवार "आमचे" नाही!! (अर्थात ते कोणाचेच नाहीत) अन बाय शेतकरी आय मीन "प्रतिनिधी" ! नाहीतर परत म्हणाल गलाटा कायले न्याव!!!, बव्हंशी भारतीय शेती ही कोरडवाहू असल्याने हा प्रतिनिधी त्यांचा असावा! उगा डुबुक शेती करून गब्बर झालेला, पैनल ची कारखान्याची राजकारणे करून शेतकरी लोकांची बाजु घेतल्याचे भासवुन आपलीच पोळी शेकुन घेणारा कुठल्या संघटनेचा "नेता" "राजकारणी" "धरतीपुत्र" इत्यादी नसावेत! शेती वर कर नसल्याचा अति गैरफायदा घेणारे अन तदानुषंघाने बागायतदार ओलित धारी खादी धारी नक्कीच नसावेत!!! (बाणेदार वर्हाडी) बाप्या
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 01/25/2015 - 10:42 नवीन
विदर्भातल्या शेतकर्‍यांची किंबहुना सर्वसाधारण लोकांची मानसिकताच वेगळी आहे असे आम्हां प.महाराष्ट्र आणि मुंबईवाल्यांना जाणवत राहाते. एक तर भाषेवर हिंदीची छाप. मुंबईपेक्षा नागपूरचे आणि त्याहीपेक्षा हैद्राबादचे जास्त आकर्षण. चंद्रपूर-मूळ रोडचा खूपसा ट्रॅफिक हैद्राबादचा असतो. सीपी अँड बेरार म्हटले की मालगुजार आणि सरंजामदार लोकच डोळ्यांपुढे उभे राहातात. सेंट्रल प्रॉविन्शिअल मानसिकता. खंडांतर्गत भाग त्यामुळे वेगळे हवामान. मध्यप्रदेश,छत्तीसगढ, आन्ध्र यांच्याशी सीमा जुळलेल्या. उडीशाही फार दूर नाही.या सर्वांच्या वेगवेगळ्या प्रकृती झाडीपट्टीमध्ये दिसतात.गावांची नावेसुद्धा नागेपळ्ळी, ईटापळ्ळी अशी. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा मूळचा आदिवासी कोअर भाग. आदिवासी हे जंगलाचे राजे. त्यांची मूल्ये, जगण्याचे नियम नागरी संस्कृतीपेक्षा अगदी वेगळे. आजची भूक भागली की झाले. उद्याची भ्रांत नाही आणि उद्यासाठी साठा करून ठेवायचा नाही.एका अर्थी ही आदिम मूल्ये चांगलीच. इथे अधाशीपणा, ग्रीड, हरबक याला स्थान नाही. खरे तर या वृत्ती म्हणजे नागरी संस्कृतीची 'देणगी'. पण काळाच्या ओघात कोणतीही संस्कृती शुद्ध स्वरूपात टिकत नाही. बदल आणि सरमिसळ अटळ असतात. तेच झाडीपट्टीत दिसते.
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 16:48 नवीन
प्रतिसाद आवडला. कारणमीमांस पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मंजूताई Sun, 01/25/2015 - 11:07 नवीन
लेख. पैसा व राहीचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 01/25/2015 - 11:20 नवीन
लेख आणि 'अल्लाल' दृष्टीकोन आवडला. दृष्टीकोन शेतीविषयी नसून जीवनातल्या वास्तवाविषयी आहे असे वाटते. तसेच सोत्री म्हणतात तसे प्रायोगिक किंवा व्यावसायिक शेती करूच नये किंवा वाईट असे काही लेखात लिहिलेले नाही. प्रायोगिक आणि व्यावसायिक शेतीबद्दल स्वानुभवाचे लेखन वाचणे, सोत्रींप्रमाणेच, आवडेल.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 01/25/2015 - 14:48 नवीन
लेख, पैसातै आणि राहितै चे प्रतिसाद आवडले, एकंदर कर्ज काढुन सण करु नये तशीच कर्ज काढुन शेती करण्यापुर्वी हजारदा विचार करावा हे पटलं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 01/25/2015 - 18:35 नवीन
एक नंबर लेख. लय आवडला. तदुपरि मते न जुळल्याने फेकूगिरी आरोपिणारे प्रतिसादही तितकेच रोचक वाटले.
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट Mon, 01/26/2015 - 11:18 नवीन
चालायचंच. सत्याला अनेक कंगोरे असू शकतात ये कई लोग के गले नहीं उतरता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विवेकपटाईत Mon, 01/26/2015 - 12:46 नवीन
लेख आवडला,काही मुद्दे निश्चित विचारणीय आहेत (मीही नौकरीची १५-१६ वर्षे कृषी भवन मध्ये व्यतीत केली आहे), तिथे ही अधिकार्यांना कित्येक गोष्टींची चिंता होती १. जमिनीतून पाणी काढून उस लावणे म्हणजे भविष्यात वाळवंट तैयार करणे. नागपूर जिल्ह्यातील काही भागात पाण्याची पातळी संत्र्याच्या शेतीमुळे १००-१५० पेक्षा ही खाली गेली आहे. भविष्यात पिण्याचे पाणी ही दुर्मिळ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत आहे. आणि कुणाला ही चिंता नाही. २. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेती करणे, काळाची गरज आहे. विदर्भात ही पारंपारिक शेती करणारा शेतकऱ्या वर आत्महत्येची पाळी येत नाही. . गोंदिया, भंडारा, गढचिरोळी या मागासलेल्या जिल्ह्यांत आत्महत्या कमी आहेत. दुसरी कडे अकोला, अमरावती, येवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी जास्त. (BT जास्त जिम्मेदार)].
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 01/26/2015 - 20:54 नवीन
भारतात आय आय टी काढायची कल्पना नेहरूंची , अर्थात त्यावेळच्या शहरी मध्यमवर्ग तेथे शिकणार होता त्याबद्दल त्यांचे कौतुक , अगदी रशिया व अमेरिकेच्या सहाय्याने ह्या आय आय टी भारत भर बनल्या पण त्यावेळी ७० हून कदाचित जास्त भारतीय गावात राहणारे शेतीवर अवलंबून होते , त्यांच्या साठी जागतिक दर्जाचे कृषी महाविद्यालये देशभरात का झाली नाहीत , देशात हरित क्रांती एकाचवेळी का झाली नाही , कम्युनिस्ट लोकांना व समाजवादी लोकांना खाजगी उद्योग धंद्याचे वावडे होते पण शेतीत प्रगत व व्यवसायिक दृष्ट्या ह्या देशात शेतकऱ्यांना कशी करावी हे का त्यांना शिकवता आले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा