Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अल्लाल शेती

द
दादा पेंगट
Sat, 01/24/2015 - 21:38
🗣 114 प्रतिसाद
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही. अधिक, धुर्‍यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते. आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्‍यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्‍याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो. ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो. मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात. १) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? २) वर्‍हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्‍हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का? ३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है? ४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्‍या बाजूचे शेतकर्‍यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो? असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..

प्रतिक्रिया द्या
21994 वाचन

💬 प्रतिसाद (114)
न
नाखु Tue, 01/27/2015 - 08:25 नवीन
  • मी शेतकरी नाही.
  • मी शेतकरी नाही आणि शेतीही कसत्/करीत नाही
  • मी शहरातील नोकरदार असल्याने मी नक्की शेतकर्यांचा शोषणंकर्ता का पोषणकर्ता हेच अजून सिद्ध झाले नाही/सिद्ध केलेले नाही *SCRATCH*
  • शेतकर्यांनी स्वतःवर "प्रयोग्/अधांनुकरण" आणि पर्यायाने समाजावर "परंपरवादी अनुकरण" करावे का नाही हे समजण्याची "समज" मला आहे का नाही हेच मला समजले नाही. *UNKNOWN* :HZ: :hz:
  • सबब या सर्व परिस्थीतीत "निवांत बोलू (आयुष्यावर) नंतर काही " हेच फक्त अनुभवत आहे. *YES*
सातवी "फ" जीवन शिक्षण मंदीर ता:पारनेर जि.अहमदनगर
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Wed, 01/28/2015 - 05:30 नवीन
गडे हो, पत्याची बात बोललात. प्रश्न पुसलेत. १. शेती का करायची? तर थोड्या वेळात उपजीविका साधून उरलेला वेळ काव्य-शास्त्र-विनोदात घालवून आनंदाने जीवन जगता यावे म्हणून. झाडीपट्टीत हे सहजच साधले जाते आहे. म्हणूनच तुम्ही 'ठेविले अनंते तसेच' म्हणजे आनंदात राहत आहात. कव्वालीचे मुकाबले करत आहात, हाडपाक्यात नाचत आहात, मारबती काढत आहात, रामलीला भरवत आहात. काय कमी आहे हो. सुख आहे. २. नगदी पिके कार्यक्षमतेने उत्पादित व्हावीत ह्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? खरे तर नाही! ३. मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. >>> सत्यवचन! इतरही भागांत गरज नसता साखरपेरणी हवीच कशाला. ज्याची गरज आहे तेच पेरावे. ४. दादा, व्यवसायम करायला हवा आहे. बरे झाले तुम्हीच कान टोचलेत. मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र तुम्ही म्हणता इथे अल्लाल शेती करतात. प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात. ह्यातले काय काय चांगले म्हणायचे हो? आत्महत्या करणारे आपले प्रश्न आपण सोडवोत. मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 08:39 नवीन
प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात.
बरोबर आहे साहेब. मी बी ह्याचे समर्थन नाही करत. मोहाची दारू पेवाच्या बदली मोहाची राब खा, मोहाच्या फुलाची भाजी खा..
मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!
विकासाबद्दल माहेवाले मत जरा अलग आहे. विकासाच्या मांगे लंगलंग फिरुन जर का रात्रिचि झोप उळत असल, शुद्ध हवा नाकात जात नसल तं का फायदा? माले वाट्टे का आपल्या गरजा पुर्‍या होत असतील, सुखशांतींनं राहानं जमतं असनं तं तेवळाच विकास पाहिजे. झाडिपट्टीचा थोडा विकास जरूरी आहे, पर झाडीपट्टी झाडीपट्टीच राह्यली पाह्यजे. तिचा पुणेमुंबई झाल्या नाही पाह्यजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
प
प्रसन्न केसकर Wed, 01/28/2015 - 05:51 नवीन
ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे? कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर? आलशिपना हा गुण की दुर्गुण?
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 08:42 नवीन
ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे?
तो इस में बुरा क्या है?
कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर?
धान जास्त झाला तरी आम्ही ढोलीत जमा करून ठेवतो. पुढच्या वर्षी कामात येते. बाजारात नाही आणत त्या वर्षी.
आलशिपना हा गुण की दुर्गुण?
कधी गुण कधी दुर्गुण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
न
नक्शत्त्रा Wed, 01/28/2015 - 09:46 नवीन
वाचत आहे । लेख आणि लेखावारचे प्रतिसाद पण चांगले आणि विचार करायला लावणारे आहेत पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून ती सर्व शेतकर्यान पर्यंत पोहचली तर काह्रेच खूप कुटुंबांची वाताहत थांबेल
  • Log in or register to post comments
व
विलासराव Wed, 01/28/2015 - 15:22 नवीन
https://collaboration.maharashtra.gov.in/mr जमल्यास उपाय ईथेही लिहा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/28/2015 - 15:24 नवीन
लिंकसाठी धन्यवाद! पण तिथे लिहिलेले खरेच कोणी वाचतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Wed, 01/28/2015 - 15:42 नवीन
माहीत नाही. नवीनच लाँच केलीय फडणवीस सरकारने. मंत्रालयातील काही तक्रारीही करु शकता. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला तरी वाटते काही उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 08:43 नवीन
धन्यवाद. जाऊ पाहतो लिंक वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विटेकर गुरुवार, 01/29/2015 - 08:31 नवीन
लेख आवड्ला पण त्याही पेक्षा त्यामागची भूमिका आवडली. वरती कुणीतरी म्ह्टळे आहे की हे सारे खरे तर फक्त शेतीलाच नव्हे तर संपूर्ण जगण्याला लागू होते. मुटेंच्या धग्यावर प्रतिक्रिया देताना मीलिहले होते की , आत्माह्त्या का होतात त्याच्या पाठी मागची मान्सिकता ध्यानी घ्यायला हवी. ती परिस्थिती सापेक्श नसते, पूर्वी शेतीत नुकसान होत नव्हते का ? दुष्काळ / अतिवृष्टी नव्हती का ?लोक आत्महत्या का करत नव्हते ?? त्याचे उत्तर मनोवृत्तीत आहे. अधिकाधिक मिळवण्याची हाव हे त्या पाठीमागचे कारण आहे. अधिक परतावा मिळावा म्ह्नून अधिक धोका पत्करणे आणि धोका झाल्यावर सरकारच्या नावाने खडे फोडणे / आत्महत्या झाल्यावर त्याचेही भांड्वल करणे ही ती वृत्ती आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 01/29/2015 - 08:43 नवीन
माझ्या मते हे पेंगट ब्वा, सरकार ने ह्यावर केलेला "शेतकरी बन्धुंसाठी आर्ट ऑफ़ लिविंग कोर्स" ह्या अस्सल इलाजाच्या समर्थानात असावेत!!!
  • Log in or register to post comments
द
दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 08:47 नवीन
मला ह्या 'आर्त ऑफ लिविंग' बद्दल काही माहीत नाही बापु. पण जर का ह्याच्याने शेतकरी आत्महत्या करणार नसेल आणि व्यवस्थित शेती करू शकत असेल तर माझे समर्थन असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पुष्करिणी Sun, 02/01/2015 - 18:55 नवीन
कोर्सेरा वर एक नविन कोर्स सुरू होतोय - https://www.coursera.org/course/postharvestloss जे शेती करतात किंवा ज्यांना शेती या विषयात रस आहे त्यांनी जरून 'Global Postharvest Loss Prevention: Fundamentals, Technologies, and Actors' या कोर्सला एन्रोल करा, कोर्स फ्री आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा