Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हात झाले काळे!

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/12/2015 - 08:41
🗣 127 प्रतिसाद
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले. मनमोहन यांच्याव्यतिरिक्त उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, िहदाल्कोचे दोन अधिकारी यांनाही गुन्हेगारी कट, फसवणूक या आरोपाखाली समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना अशा प्रकारचे समन्स धाडण्यात आले होते. त्यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये जिंकलेली निवडणुक निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायलयाने रद्द करून त्यांना ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली होती. न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही. विशेष न्यायालयाचे म्हणण्यानुसार कोळसा खाणवाटपात सकृतदर्शनी गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाल्याचे निदर्शनास येते. यात शुभेंदु अमिताभ, डी. भट्टाचार्य व कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. हिंदाल्कोला खाणवाटप करताना झुकते माप देण्यात आले. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. परख व कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांच्या अप्रत्यक्ष प्रयत्नातून हिंदाल्कोला खाणवाटप झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे न्यायाधीश भरत पराशर यांनी नमूद केले आहे. बिर्ला समुहातील हिंदाल्को कंपनीला ओरिसातील खाणवाटप करताना, कोळसामंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाने प्रचलित सरकारी नियमांचा भंग झाल्याचा ठपका विशेष सीबीआय कोर्टाने ठेवला. सिंग यांच्या मान्यतेमुळेच हिंदाल्को कंपनीला अचानक प्रचंड नफा झाला आणि सरकारी कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले, असा ठपकाही कोर्टाने ठेवल्याने मनमोहन यांच्या स्वच्छ कारकिर्दीवर तुर्तास तरी लाभाचा डाग लागला. खुद्द सिंग, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्कोचे दोन अधिकारी यांना आरोपी म्हणून ८ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले.विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती भरत पराशर यांच्या निर्देशावरून डॉ. सिंग व अन्य पाच आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे (कलम १२० ब), गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (कलम ४०९) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले आहेत. मनमोहन सिंग आणि पारख निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालविण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. नोकरशाही तसेच राजकीय माध्यमातून हिंदाल्कोला कोळसा खाणी मिळाव्या म्हणून कंपनीच्या शुभेंदू अमिताभ आणि भट्टाचार्य यांनी षडयंत्र रचले. कुमारमंगलम बिर्ला यांनी ते पुढे रेटले आणि कोळसा सचिव पी. सी. पारख व मनमोहन सिंग यांच्या माध्यमाने या षडयंत्राला अंतिम स्वरूप मिळाले, असा निष्कर्ष न्या. पराशर यांनी काढला. या प्रकरणात दोषी ठरल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दिवंगत नर​सिंह राव यांच्यानंतर प्रथमच फौजदारी खटल्याला सामोरे जाण्याची वेळ माजी पंतप्रधानांवर आली आहे. मात्र तरीही केवळ काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षच नव्हे, तर विरोधकांनीही याबाबत वैयक्तिकरित्या मनमोहन यांच्यावर मात्र कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. मनमोहन सिंगांना या प्रकरणातून काही वैयक्तिक लाभ झाला का हे महत्त्वाचे नसून या घोटाळ्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे हेच जास्त महत्त्वाचे आहे. २-जी तरंगलहरींचे आपल्या हितसंबंधियांना खिरापतीसारखे वाटप करताना सरकारचे रू. १,७६,००० कोटी इतके नुकसान झाले असा अहवाल महालेखापालांनी यापूर्वीच दिला होता. लिलाव न करता आपल्या हितसंबंधियांना कोळसा खाणी दिल्यामुळे सुद्धा सरकारचे रू. १,८६,००० कोटी इतके प्रचंड नुकसान झाले हाही अहवाल महालेखापालांचाच. काँग्रेसने सुरवातीला या दोन्ही अहवालांची खिल्ली उडविली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कसलेले वकील कपिल सिब्बल यांनी तर तरंगलहरी वाटपात "झिरो लॉस" झाला, उलट त्यात फायदाच झाला अशी मखलाशी केली. तर दुसरे नामवंत वकील व केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पुढची पायरी गाठताना असे विधान केले की, "ज्या खाणवाटपामध्ये सरकारला नुकसान झाल्याचा आरोप होत आहे, त्या खाणीतला कोळसा अजून बाहेर काढलेलाच नाही. मग कोठे आहे तोटा?". अशी मखलाशी करून आपण स्वतःला व सरकारला हास्यास्पद बनवितो आहे हे या चाणाक्ष वकीलांच्या डोक्यातच आले नाही. २-जी तरंगलहरींचे वाटप व कोळसा खाणींचे वाटप हे लिलाव पद्धतीने झाले असते तर सरकारला कित्येक लाख कोटी रूपयांचा महसूल मिळाला असता. लिलाव न करता मनमानी पद्धतीने उद्योगपतींना व हितसंबंधियांना वाटप केल्याने हे पैसे सरकारच्या तिजोरीत न येता उद्योजकांच्याच खिशात गेले व देशाला प्रचंड तोटा झाला. सुदैवाने न्यायालयाने तरंगलहरी व खाणवाटपाचे परवाने रद्द करून त्यांचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात २-जी तरंगलहरी व परवाने रद्द केलेल्या २१८ खाणींपैकी फक्त थोड्या खाणींचे वाटप लिलाव पद्धतीने केल्यावर तब्बल २ लाख कोटी रूपयाहून अधिक रकमेची बोली लागलेली. जेव्हा सर्व २१८ खाणी लिलाव पद्धतीने विकल्या जातील तेव्हा सरकारच्या तिजोरीत तब्बल १५ लाख कोटी रूपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग सरकारने देशाचे नुकसान केले यात शंकाच नाही. ते स्वतः स्वच्छ असतील, परंतु त्यांच्याच अधिकाराने व त्यांच्यात अखत्यारीत देशाचे नुकसान झाले व ते शांतपणे नुकसान बघत राहिले असे दिसत आहे. देशाचे नुकसान थांबविण्याचे संपूर्ण आणि सर्वोच्च अधिकार हातात असताना गप्प बसून राहणे हा सुद्धा गुन्हाच आहे. स्वच्छ, अपघाताने राजकारणात आलेले, हाडाने राजकारणी नसलेले, सुसंस्कृत, मितभाषी, अर्थतज्ज्ञ इ. विशेषणांनी नटलेले मनमोहन सिंग न्यायालयासमोर आता स्वतःचा बचाव कसा करणार ते पहायचं. पूर्वी एका लेखात मनमोहन सिंगांबद्दल एक यथार्थ वाक्य आले होते.
Manmohan Singh has been overestimated as an economist and, at the same time, he has been underestimated as a politician.
प्रचंड घोटाळे उघडकीस येऊनसुद्धा ज्या तर्‍हेने मनमोहन सिंगांनी आपली खुर्ची १० वर्षे वाचविली त्यावरून वरील वाक्य सिद्ध होते. त्यांचे राजकीय गुरू नरसिंहराव यांनी याच तर्‍हेने आपली खुर्ची वाचविली होती. अत्यंत उपद्रवी व बेभरवशाचे असलेले सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा करून २-जी तरंगलहरी वाटपातील घोटाळा शोधून काढला. त्याचप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील खासदार हंसराज अहीर यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा करून कोळसा खाणवाटप घोटाळा शोधून काढला. याबद्दल हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. "मी निश्चितच दुःखी आहे. पण हा जीवनाचाच एक भाग आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवरून ते निश्चितच न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. परंतु या खटल्यात काँग्रेसच्या इतर अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात "आपल्या अहवालात ठपका ठेवलेल्या युपीए सरकारमधील काही जणांची नावे वगळावीत" असा आपल्यावर दबाव येत होता असे स्पष्ट लिहिले आहे. मनमोहन सिंगांचे पूर्वीचे प्रसिद्धी प्रमुख संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात "तरंगलहरी व कोळसा खाण वाटपासाठी" पंतप्रधान कार्यालयावर कसा बाहेरुन दबाव येत होता याचीही सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे हा खटला सुरू होउ नये व मनमोहन सिंगांना न्यायालयात जावे लागू नये यासाठी काँग्रेस जीवापाड प्रयत्न करेल. काँग्रेसकडे चिदंबरम्, सिब्बल, खुर्शिद असे कसलेले वकील आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपपत्रातील नाव वगळावे यासाठी सुरवातीला केंद्रीय गुप्तचर खात्याच्या विशेष न्यायालयाला विनंती करण्यात येईल. ती विनंती न्यायालयाने फेटाळली तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. तिथेही विनंती मान्य नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. असे एकापाठोपाठ एक अर्ज करून काँग्रेस या खटल्याचा प्रारंभ जास्तीतजास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील. शेवटी काय होईल ते बघायचं. मात्र या निमित्ताने काँग्रेसचे भ्रष्टाचाराने काळेकुट्ट झालेले हात परत जनतेसमोर येत आहेत हेच महत्त्वाचं.

प्रतिक्रिया द्या
29158 वाचन

💬 प्रतिसाद (127)
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/12/2015 - 09:36 नवीन
काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची वेळ आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहिच नाही. ते ६० पेक्षा जस्त वर्षे सत्तेवर आहेत. त्यामानाने ३ पंतप्रधान म्हणजे फारच कमी झाले. बाकीच्या लोकांना सत्ताच नाही मिळाली कधी तर त्यांचे हात काळे झाले नाहित म्हणण्यात कसले आले आहे कौतुक. सत्तेत असताना भाजपा प्रमुख बंगारु लक्ष्मण देखील पकडले गेलेच की. एका ५ वर्षाच्या काळातच त्यांनी हा पराक्रम केला. यात भाजपाचे पंतप्रधान अडकले नाहित यात काय गौरवास्पद? अध्यक्ष तर अडकलेच ना? असो. येताजाता उगाच इतरांवर आरोप करण्यापेक्षा, त्यांची खिल्ली उडवण्यापेक्षा आणि स्वतःचा भपका करण्यापेक्षा भाजप सरकारने शांतीत क्रांती केली तर बरे होइल. बाकीच्या त्यांच्या मौतीने मरतीलच.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 03/14/2015 - 11:21 नवीन
+१००००००० अगदी असेच म्हणायचे होते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/14/2015 - 13:29 नवीन
३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची वेळ आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहिच नाही. ते ६० पेक्षा जस्त वर्षे सत्तेवर आहेत. त्यामानाने ३ पंतप्रधान म्हणजे फारच कमी झाले. या प्रतिसादातल्या अतीअजब तर्कामध्ये भारत ६५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विकसनशिल (म्हणजे साध्या मराठीत गरीब आणि स्पष्ट मराठीत अजून काही, पण असो) देश का राहिला आहे याचे गमक आहे. लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते या प्रवादाचे उत्तम उदाहरण !!! पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्य कार्यकरी पदावरच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा ठेवणार्‍या नागरिकांना अजून किती चांगले सरकार मिळू शकेल ???!!! कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्‍यावर कोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास त्या अधिकार्‍याला अथवा त्याच्या पक्षाला मते देणार्‍या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते. हम्म !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 03/16/2015 - 08:10 नवीन
या प्रतिसादातल्या अतीअजब तर्कामध्ये भारत ६५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विकसनशिल (म्हणजे साध्या मराठीत गरीब आणि स्पष्ट मराठीत अजून काही, पण असो) देश का राहिला आहे याचे गमक आहे. हा प्रतिसादातला तर्क नाही आहे तर तिरकसपणा आहे. सभ्यतेचे आणि स्वच्छ चारित्र्याचे बुरखे पांघरण्यारांनी किमान इतके तरी बघावे की सत्तेत असताना त्यांचाच पक्षाध्यक्ष लाच घेताना पकडला गेला होता. पुर्ण कार्यकाळ पुर्ण केलेली सरकारे या देशात २ च एक काँग्रेसचे ज्यांनी साधारण ६० वर्षे गाडे हाकले. उरले भाजपा ज्यांनी ५ वर्षे. या दोन्ही पक्षांच्या सरकारांचे मुल्यांकन केवळ पंतप्रधान / प्रमुख स्थानी असणार्‍या नेत्यांचा भ्रष्टाचारातील हात या एकाच मुद्द्यावर करायचे झाल्यास हात काळे दोघांचेही झालेतच की. कॉंग्रेसवर आरोप झाले आणि यांचा तर पक्षाध्यक्षच पकडला गेला. दुसरा तिरकस मुद्दा तुम्हाला दिसला नाही हे आश्चर्यच "६० पेक्षा जस्त वर्षे सत्तेवर आहेत. त्यामानाने ३ पंतप्रधान म्हणजे फारच कमी झाले." या वाक्याचे बरेच अर्थ निघतात. जरा विचार करा. शिवाय वरील वाक्ये काँग्रेसचे समर्थन करणारी नसून, इतरांचे हातही काळे आहेत हे दाखवण्यासाठी होती. पंतप्रधानांवर कॉर्टात जायची वेळ आली हे खरेच. त्याचे समर्थन नाही. पण आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे पहायचे वाकुन या वृत्तीचा राग होता हा. पंतप्रधानांना कॉर्टाने समन्स दिले तेव्हा आरोप त्या व्यक्तीवर झाला तर समजण्यासारखे होते, कार्यकाळावर झाले तरी समजण्यासारखे होते. उठसूट कॉग्रेस कसे वाईट हे दाखवताना ५ वर्षातच भाजपाने काय रंग दाखवले ते बघणेही महत्वाचे. नाहितर केवळ काँग्रेसवर टीका करुन देशाची गरीब कमी नक्की नाही होणार. लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते या प्रवादाचे उत्तम उदाहरण !!! पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्य कार्यकरी पदावरच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा ठेवणार्‍या नागरिकांना अजून किती चांगले सरकार मिळू शकेल ???!!! हा प्रतिसाद खुप वैयक्तिक होता हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. खासकरुन प्रतिसादाचा खुपच चुकीचा अर्थ लावुन प्रतिवाद केला आहे म्हणुन तर नक्कीच. त्या प्रतिसादाचा (त्या वाक्यांचा) भावार्थ इतकाच होता की सांख्यिकीच्या कसोटीवर भाजपाच्या प्रामाणिकपणाचे वाभाडे जास्त काढता येतील. त्यात कुठल्याही पतप्रधानाने येउन भ्र्ष्टाचार करुन जावा असे चुकुनही म्हटलेले नाही. बाकी सर्वोच्च कार्यकारी पदावरच्या लोकांकडुन काय अपेक्षा कराव्यात हेच जिथे या देशातल्या लोकांना कळालेले नाही तिथे केवळ या मुद्द्यावर काय विवाद करणार? केवळ कुठल्या घोटाळ्यात समन्स बजावले म्हणुन मी मनमोहन सिंगांवर टीका नाही करु शकत. मला ते आवडत नाहित कारण जे काही ऐकले / वाचले आहे त्यावरुन त्यांनी पंतप्रधान या पदाची अवहेलना केली आहे असे माझे मत झाले आहे म्हणुन मला ते एक पंतप्रधान म्हणुन आवडत नाहित. कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत
केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्‍यावर
कोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास
त्या अधिकार्‍याला अथवा त्याच्या पक्षाला
मते देणार्‍या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते.
आपण भाजपाला मत दिले असल्यास बंगारु लक्ष्मणच्या पार्श्वभूमीवर त्यांना कसे मत दिले हे समजून घ्यायला मला आवडेल. तुम्हाला त्यांना मत दिल्यावर लाजिरवाणे आणी अपमानास्पद वाटते काय? अवांतरः गेल्या १५+ वर्षातील नगरसेवक पदाचा एक सन्माननीय अपवाद वगळता मी कधीही भाजपा (अथवा भाजपापुरस्कृत) उमेदवार वगळता इतर कुणालाही मत दिलेले नाही (आणी मी जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत मतदान केलेले आहे). पण माझी कारणे वेगळी आहेत. (हिंदुत्व हा मुद्दा नाहिच) आणी मला त्यांना मत दिल्याबद्दल अजिबात लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटत नाही. या लेखात आणि तुमच्या प्रतिसादात मुद्दे आणी मांडणीच चुकीची आहे असे ठाम मत झाल्याने हा दीर्घे प्रतिसादप्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 21:04 नवीन
मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी ती दोषीच असते. माझे मत मी दर निवडणूकीच्या वेळेस माझ्या समजूतीने देशाला जास्तीत जास्त चांगला ठरू शकेल अश्या उमेदवाराला आणि पक्षाला देतो... आणि असे असले तरी मी मत दिलेल्या व्यक्तीने/पक्षाने चूक केली तर तिला चूक म्हणणेच योग्य आहे असे मला वाटते. मला वाटते ही विधाने तुमच्या प्रतिसादातल्या प्रश्नांत घ्वनित होणारे तुमचे गैरसमज दूर करायला पुरेशी ठरावित. एकाच्या भ्रष्टाचाराचे कारण देऊन दुसर्‍याच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याइतका मोठा भ्रष्टाचार नाही असे माझे म्हणणे आहे. प्रत्येक भ्रष्टाचार्‍याला केवळ त्याच्या वैयक्तीक भ्रष्टाचाराच्या आधारावर शिक्षा झाली पाहिजे. पिरियड. या पार्श्वभूमीवर माझा प्रतिसाद परत वाचल्यास माझे म्हणणे तुम्हाला पटेल असे वाटते. *** तुमच्या मूळ प्रतिसादात तुम्ही केलेले "सत्तेवरचा कार्यकाळ व खटल्यांना सामोरे जाणारे पंतप्रधान" यांच्या गुणोत्तराबद्दलचे विधान तिरकस (उपरोधिक) होते असे तुम्ही वरच्या प्रतिसादात म्हटले आहे. मात्र तो तिरकसपणा पुरेसा स्पष्ट नव्हता हे नक्की... आणि अतीमहत्वाच्या मुद्द्याच्या बाबतीत अगदी विनोदाकरिताही ठेवलेला इतका अस्पष्टपणा धोक्याचा असतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुधीर गुरुवार, 03/19/2015 - 04:55 नवीन
मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे मझ्या बुद्धीला पटत नाही. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या गुरुवार, 03/19/2015 - 11:41 नवीन
आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही.
सहमत.. पण याही पुढे जाऊन म्हणेन की आंधळेपणाने असो अथवा डोळसपणाने, कशाही तर्‍हेने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे हे तुम्ही त्या नेत्या/पक्षाबरोबर काम करत नसाल तर अयोग्यच. सामान्य जनतेने आपल्या देशाशी बांधिलकी मानावी, त्याचे कोणी नुकसान करु नये आणि त्याच्यासाठी योग्य दिशेने कार्य व्हावे हाच हेतू असावा, नेते/पक्ष/संघटना/स्वयंसेवी संस्था ही सर्व फक्त साधने आहेत यासाठी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/19/2015 - 11:56 नवीन
कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्‍यावर कोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास त्या अधिकार्‍याला अथवा त्याच्या पक्षाला मते देणार्‍या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते. मी आपले वरील विधान परत उद्ध्रुत करतो. बंगारु लक्ष्मण च्या पार्श्वभूमीवर भाजपाला मत देणार्‍या प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाला लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटले पाहिजे. म्हणुन मी स्पष्ट प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपला मत दिल्याबद्दल अपमानास्पद आणी लाजिरवाणे वाटते काय? माझ्या मते आपले वरील विधान चुकीचे आहे. आज एकही पक्ष स्वच्छ नाही. सगळ्यांचे हात काळे आहेत. आणि मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा त्यांचे हात तसे काळे असावेत अशी माझी अजिबात आशा, मागणी, इच्छा, सुप्त अपेक्षा वगैरे नाही. आणि एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तीला मत देताना कुठल्याही एका घटनेचा आयसोलेशन मध्ये विचार करुन चालत नाही तर व्यापक मुद्दे विचारात घ्यावे लागतातच. त्यामुळे टीका अथवा निंदा करतानाही ती व्यापक मुद्यांवर करावी असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/19/2015 - 14:22 नवीन
बापरे, अजून इस्काटून सांगायला लागेल असे वाटले नव्हते ! अजून एक शेवटचा प्रयत्न... केवळ बंगारू लक्ष्मणच काय (अ) कोणत्याही भारतीय पक्षाच्या मोठ्या नेत्याने... मग तो मी मत दिलेल्या पक्षाचा असो अथवा नसो... आणि (आ) कोणत्याही मोठ्या भारतीय सनदी अधिकार्‍यांने; भ्रष्टाचार केला तर एक अभिमानी भारतीय म्हणून मला शरम वाटतेच वाटते. एक भारतिय नागरीक म्ह्णून त्याचा विरोध आणि निषेध करण्याचा माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच. याचे साधी पण महत्वाची कारणे अशी आहेत... १. या बाबतीत "मी कोणाला मत दिले ?" या प्रश्नाचा संबंध गौण आहे हे म्हणण्याइतपतही येत नाही. उलट मी जर त्या माणसाला मत दिले असेल तर मला माझ्या चुकीच्या निर्णयाबद्दल जरा जास्तच शरम वाटेल. २. महत्वाचे भारतीय नेते आणि अधिकारी भारताचे प्रतिनिधित्व करत असतात. म्हणजे एकदा निवडून आले अथवा नेमणूक झाली की ते सर्व भारताचे प्रतिनिधी असतात; त्यांच्या व्यक्तीगत पक्षाचे नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून भारताची (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व भारतियांची) प्रतिमा ठरत असते आणि भारताचे भवितव्यसुद्धा ठरत असते. त्यांच्या भ्रष्टाचारी अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या अयोग्य वागण्या-बोलण्याने भारताचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व भारतियांचे) अर्थ, समाज, जागतिक प्रतिमा, इ अनेक प्रकारे अक्षम्य नुकसान होते. स्पष्ट शब्दात सांगायचे तर अशी गैरव्यवहार करणारी व्यक्ती अस्तनितला निखारा असते आणि मोठेपणाच्या बुरख्याखाली देशघातक काम करत असते. *** आता तुमच्या ध्यानात आले असावे की तुमचा, म्हणुन मी स्पष्ट प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपला मत दिल्याबद्दल अपमानास्पद आणी लाजिरवाणे वाटते काय? हा प्रश्न गैरलागू आहे. तो तसा असण्याची अजून काही स्पष्ट कारणे आहेत, ते अशी... १. मी भाजपला मत दिले हा शोध तुम्हाला कुठून लागला ? भारतिय लोकशाहीत गुप्त मतदान पद्धत आस्तित्वात आहे. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे सांगण्याचा आग्रह करणे अवैध आहे. तशातही कोणी तसा आग्रह केलाच तर त्याचे उत्तर न देण्याचा हक्क मी नेहमीच राखून ठेवतो. त्यामुळे तुमच्या या दाव्याचे :) आले. असो. २. मुख्य म्हणजे मी माझे मत कोणाल दिले ते जाहीर केले नाही, तर माझ्यावर रागवेल अथवा ज्याची मला भिती वाटेल अशी कोणतीही व्यक्ती आस्तित्वात नाही. याचे कारण मी अगोदरच स्पष्टपणे लिहीले आहे... मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी ती दोषीच असते. माझे मत मी दर निवडणूकीच्या वेळेस माझ्या समजूतीने देशाला जास्तीत जास्त चांगला ठरू शकेल अश्या उमेदवाराला आणि पक्षाला देतो. ३. पक्ष येतील, पक्ष जातील. नेते येतील, नेते जातील. भारत देश ताठ मानेने पुढे जात राहणे हे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे. हे मात्र माझे स्पष्ट आणि व्यक्त मत आहे. ====== असो. यापलिकडे जास्त वाद केल्यास तो वितंडवादाकडे झुकेल आणि "फायदा-व्यय गुणोत्तर" खूपच प्रतिकूल होईल. तेव्हा या विषयावरचा संवाद इथेच थांबवूया. तुम्हाला तुमची मते बनवण्याचा आणि मांडण्याचा अधिकार आहे याचे मला भान आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विकास गुरुवार, 03/19/2015 - 14:24 नवीन
सर्वप्रथम परत तुमचाच डिसक्लेमर लक्षात ठेवून अथवा थोडक्यात भाजपाची तरफदारी अथवा काँग्रेसची नाचक्की असा पक्षिय उद्देश डोक्यात नाही (कारण मी कुठल्याच पक्षाशी संलग्न नाही!). मी आपले वरील विधान परत उद्ध्रुत करतो. बंगारु लक्ष्मण च्या पार्श्वभूमीवर भाजपाला मत देणार्‍या प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाला लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटले पाहिजे. एक नासका आंबा आहे हे सिद्ध झाले म्हणून संपूर्ण पेटीच कचर्‍यात टाकायची का? का तो नासका आंबा काढून टाकायचा? बंगारू लक्ष्मण यांच्या बाबतीत त्यांनी पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना तात्काळ काढून टाकण्यात आले. तत्कालीन सरसंघचालकांनी (बंगारू मुळचे संघ स्वयंसेवक होते म्हणून) त्यांच्यावर जाहीर टिका देखील करायला मागे-पुढे पाहीले नाही.... आता कॉंग्रेसचे बघूयात - आदर्श मधे अडकलेल्यांना काय केले जात आहे? एखाद्या मंत्र्याने चूक केली तर शिक्षा म्हणून राज्यपाल करणे पण कमी वाटलेले नाही... असे अनेक सांगता येईल. इतकेच कशाला ज्या व्यक्तीने स्वतंत्र भारतात परत हुकूमशाही आणली त्या व्यक्तीचेच गोडवे गाणे देखील कमी झाले नाही. याचा अर्थ भाजपा (अथवा कुठलाच राजकीय पक्ष) हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असेल असे मला म्हणायचे नाही. कदाचीत या अर्थाने, भाजपाला, अजूनही "दिल्ली बहौत दूर है" असेच सांगावे लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/19/2015 - 16:22 नवीन
>>> मी आपले वरील विधान परत उद्ध्रुत करतो. बंगारु लक्ष्मण च्या पार्श्वभूमीवर भाजपाला मत देणार्‍या प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाला लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटले पाहिजे. का? >>> म्हणुन मी स्पष्ट प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपला मत दिल्याबद्दल अपमानास्पद आणी लाजिरवाणे वाटते काय? नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ख
खंडेराव गुरुवार, 03/12/2015 - 09:46 नवीन
+१००० बाकी, येडियुरप्पा भाजपाचेच होते ना. ज्या राज्यात सरकारे होती/ आहेत ती काही फार स्वच्छ नाहीत. प्रश्न संधिचाच आहे. कॉन्ग्रेस आणि भाजपा यांत भ्रष्टाचार हा डिफ्फरनशियेटर नसावा
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 03/12/2015 - 11:43 नवीन
या लेखास अनुशंगून मला काही प्रश्न पडले आहेत, काही सदस्यांसाठी, काही संमंसाठी.. (या लेखातल्या मुद्द्यांच्या सत्यासत्यतेबाबत ही प्रतिक्रिया नसून सदैव एकाच एका दृष्टीकोनाच्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समोर आलेल्या तथ्यांच्या विशिष्ठ मांडणीबाबत आहे. मी सामान्य मतदार असून कोणत्याही विचारसरणी, पक्ष, नेता यांच्याशी बांधिलकी मानत नाही. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चूकला चूक आणि बरोबरला म्हणावे असे माझे मत आहे. ) प्रथमतः या व्यासपीठावर तटस्थतेचा दावा करून कोणी प्रचारकी लेखन करत असेल तर कितपत योग्य ? म्हणजे असे की गुर्जींंची भाजपनिष्ठता लपून राहिलेली नाही (गुर्जी लिहितातही चांगले मुद्देसूद पण तरीही). परंतु "सुहास" या आयडीप्रमाणे ते काही अधिकृत भाजपचे कोणी आहेत असे आजवर तरी त्यांनी सांगितलेले नाही. या स्थितीमध्ये आडून आडून प्रत्येक लेखनात एकाच पक्षाचा छुपा प्रचार ही भुमिका किती योग्य? सगळेच काही तथ्ये तपासायला जात नाहीत (आणि लिहिणारा जर किमान भाजपचा कोणी म्हणून लिहित नसल्याचा दावा करत असल्यास) तेव्हा बर्‍याचदा हा छुपा प्रचाराचा मुद्दा लक्षातदेखील न येता समोरच्यांच्या गळी उतरवला जातो. ही एकप्रकारची जाहिरातीची पध्दतच नव्हे काय ? आता श्रीगुरुजींबद्दल, गुरुजी चांगले लिहितात, मुद्देसूद लिहितात पण जो पक्षीय अभिनिवेश सदैव डोकावत राहतो तो त्यांचे लिखाण संशयास्पद करतो. तो थोडासा बाजूला ठेवला, किमान जेव्हा भाजपबद्दल बाजू मांडत नसतील तेव्हा, तर लेखन अजून छान होईल असे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/12/2015 - 12:59 नवीन
तुमचा गैरसमज झालेला असावा. मी खरंच भाजपचा किंवा कोणत्याच पक्षाचा किंवा संघटनेचा सदस्य नाही आणि नव्हतो. मी निवडणुकीत भाजपलाच मत देतो असेही नाही. आधी उमेदवार आणि नंतर पक्ष असे बघून मी मत देतो. भूतकाळात मी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मते दिली आहेत. माझा वरील धागा मनमोहन सिंगांना न्यायालयाने पाठविलेल्या समन्सबद्दल होता. त्यात कोणत्या वाक्यात भाजपचा प्रचार केल्यासारखा वाटतो? संपूर्ण धाग्यात भाजपचा उल्लेख एकाच वाक्यात आहे (हंसराज अहीर यांचा उल्लेख असलेल्या वाक्यात). इतरत्र कोठेही उल्लेख नाही. धाग्यात जे लिहिले आहे ती वस्तुस्थिती आहे. तरंगलहरी वाटप आणि कोळसा खाण वाटप यात मोठा घोटाळा झाला व त्यात देशाचे प्रचंड नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे. याच काळात मनमोहन सिंग पंतप्रधान होते ही देखील वस्तुस्थिती आहे व घोटाळा होउ न देण्याचे सर्वोच्च अधिकार त्यांच्याकडे असूनसुद्धा त्यांनी तो होऊन दिला ही देखील वस्तुस्थिती आहे. हेच सर्व लिहिले आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या गुरुवार, 03/12/2015 - 15:04 नवीन
मी आधीच स्पष्ट केले आहे की,
सदैव एकाच एका दृष्टीकोनाच्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समोर आलेल्या तथ्यांच्या विशिष्ठ मांडणीबाबत आहे.
मग गैरसमज कशा अर्थाने म्हणावा. म्हणजे तुम्ही तटस्थ लिहिता तरीही मी असा समज करुन घेतला आहे असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ?
धाग्यात जे लिहिले आहे ती वस्तुस्थिती आहे.
हा परिच्छेद अवांतर आहे कारण मी कुठेही असे म्हणालो नाही की तुम्ही वस्तुस्थिती मांडली नाहीत. माझा प्रतिसाद लक्षात घ्यावा, श्रीगुरुजी. असो, जर तुम्हाला तटस्थतेचा दावा करायचा असेल तर भुसंपादन विधेयक अथवा सद्य सरकारची कोळश्याची लिलाव पद्धत यावर (फक्त) टिकात्मक असा विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल. [ अवांतर : खाली कोणीतरी तुम्ही पैसे घेवून लिहित असल्याचा दावा केला आहे, त्याच्याशी तीव्र असहमत. आणि चुकून जरी ते खरे असेल तर आमच्यासारख्यांना जास्त दु:ख होईल हे खरं. कारण आम्ही तुमचे टिकाकार जरी असलो तरी तुम्ही तुमच्या मतांशी, मुद्द्यांशी प्रामाणिक असता आणि आहात याबद्दल (आत्तातरी) विश्वास आहे. ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 15:27 नवीन
यावर ते गुर्जी अवाक्षरदेखील काढ णार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/12/2015 - 18:13 नवीन
भूसंपादन विधेयक किंवा शेती याबद्दल मला कमी माहिती आहे. त्यामुळे या विषयांवर मी प्रतिसाद दिलेला नाही. मिपावरील इतर अनेक शेतीविषयक धाग्यांवरही मी मूक वाचक असतो. जेव्हा या विषयांबद्दल माझ्याजवळ पुरेशी माहिती जमा होईल तेव्हा मी प्रतिसाद देईन. तोपर्यंत फक्त वाचत राहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/12/2015 - 18:22 नवीन
>>> मग गैरसमज कशा अर्थाने म्हणावा. म्हणजे तुम्ही तटस्थ लिहिता तरीही मी असा समज करुन घेतला आहे असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ? तुम्ही मूळ प्रतिसादात "प्रचारकी थाटाचे लिखाण" असा उल्लेख केलात. तो मला खटकला. सध्या कोठेही नवीन निवडणुक नाही त्यामुळे प्रचारकी लिखाण करण्याची गरजच नाही. आणि दुसरं म्हणजे वरील लेखात प्रचारकी म्हणता येईल असे एकही वाक्य नसावे. असल्यास दाखवून द्यावे. >>> असो, जर तुम्हाला तटस्थतेचा दावा करायचा असेल तर भुसंपादन विधेयक अथवा सद्य सरकारची कोळश्याची लिलाव पद्धत यावर (फक्त) टिकात्मक असा विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल. भूसंपादन विधेयकाबद्दल खाली उत्तर दिले आहे. ते परत लिहायला नको. सद्य सरकारची कोळश्याची लिलावाची पद्धत याविषयी अजून फारसे वाचायला मिळालेले नाही. लिलावात मिळणारे पैसे यावरच बातम्या केंद्रीत आहेत. लिलाव पद्धतीत काही त्रुटी आहेत असे काही ठिकाणी वाचले. त्यावर जरा सविस्तर वाचावयास हवे. नंतर मत मांडता येईल. >>> अवांतर : खाली कोणीतरी तुम्ही पैसे घेवून लिहित असल्याचा दावा केला आहे, त्याच्याशी तीव्र असहमत. आणि चुकून जरी ते खरे असेल तर आमच्यासारख्यांना जास्त दु:ख होईल हे खरं. कारण आम्ही तुमचे टिकाकार जरी असलो तरी तुम्ही तुमच्या मतांशी, मुद्द्यांशी प्रामाणिक असता आणि आहात याबद्दल (आत्तातरी) विश्वास आहे. जे असे लिहितात त्यांच्या कल्पनेच्या भरार्‍या किती उंच जातात याची तुम्हास कल्पना असेलच. पैसे घेऊन लिहिणे हे माझ्या बाबतीत कधीच खरे नव्हते, खरे नाही आणि भविष्यातही खरे नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/12/2015 - 18:24 नवीन
वरील प्रतिसादातील "सध्या कोठेही नवीन निवडणुक नाही त्यामुळे प्रचारकी लिखाण करण्याची गरजच नाही." या वाक्यातून लगेच कोणीतरी असा अर्थ काढू शकेल की मी निवडणुकीच्या काळात प्रचारकी लेखन करतो. अर्थातच ते खरे नाही असा लगेचच खुलासा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हाडक्या Fri, 03/13/2015 - 02:01 नवीन
गुरुजी मी निरिक्षणातून दिसून आलेला मुद्दा तुम्हाला एक सल्ला म्हणून मांडला तर तुम्ही वकिली बाण्याने "दाखवून द्या" वगैरे म्हणू लागला आहात. तर त्याबद्दल जमेल तेवढा प्रतिसाद देतो पटला तर घ्या अन्यथा इथेच सोडून दिलात तरीही हरकत नाही. त्याआधी तुम्ही "तुम्ही तटस्थ लिहिता की नाही" याचे तुम्ही उत्तर दिलेले नसेल तरीही "हो" असे मानून चालू.
दुसरं म्हणजे वरील लेखात प्रचारकी म्हणता येईल असे एकही वाक्य नसावे. असल्यास दाखवून द्यावे.
प्रचारासाठी निवडणुकाच लागतात असे कोणी सांगितलेय हो (तसाही तुम्ही खुलासा केला आहे तेव्हा हे बाजूस ठेवू.). तसेही प्रचारकी म्हणता येईल असे एकही वाक्य न लिहिता ही प्रचारकीय लेखन करता येते हे मी तुम्हाला सांगायला हवे का गुरुजी? नाव न घेता बरेच काही करता येते. प्रशंसा करताना टिका "बिटविन द लाईन" पेरता येते, हे मी सांगावे म्हणजे लहान तोंडी मोठा घास व्हायचा हो. पण वरुन "असल्यास दाखवून द्यावे" हे थोडे शहाजोगपणाचे नाही का वाटत? खालील एक्का यांचा हा प्रतिसाद पहावा तरीही काय म्हणायचेय ते न कळाल्यास अधिक काय बोलावे.
तुम्ही मूळ प्रतिसादात "प्रचारकी थाटाचे लिखाण" असा उल्लेख केलात. तो मला खटकला.
तो तुमच्या तटस्थतेच्या दाव्याच्या अनुशंगाने होता. तुम्ही तटस्थ आहात असे म्हणाल तर "प्रचारकी लेखन" नाही असा त्या वाक्याचा अर्थ होता (किंवा व्यत्यास) आणि त्यानुसार पुढे बोलता आले असते (म्हणूनच "प्रथमतः या व्यासपीठावर तटस्थतेचा दावा करून कोणी प्रचारकी लेखन करत असेल तर कितपत योग्य?" हा प्रश्न होता). तुमच्या ते लक्षात आले नसेल तर अस्पष्टतेबद्दल माझी वाक्यरचनाच दोषी असावी. तसेच,
असो, जर तुम्हाला तटस्थतेचा दावा करायचा असेल तर भुसंपादन विधेयक अथवा सद्य सरकारची कोळश्याची लिलाव पद्धत यावर (फक्त) टिकात्मक असा विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल.
मी उदा. म्हणून भूसंपादन अथवा कोळसा लिलाव म्हणालो, मुख्य मुद्दा हा तुमच्याकडून सद्य सरकारच्या एखाद्या तरी धोरण/कायदा/मुद्दा यासंदर्भात "विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल" असा होता आणि तोदेखील तुमच्या तटस्थतेच्या अनुशंगानेच होता. तुमच्या तेही लक्षात आले नसेल तर इथेही अस्पष्टतेबद्दल माझी वाक्यरचनाच दोषी असावी. ते समजून घ्यावे आणि शक्य तेव्हा त्याही भुमिकेतून लिहावे एवढेच म्हणायचे होते. असो.. बर्‍याचदा इतर अर्थानर्थात मूळ गाभा बाजूस राहतो आणि अर्थ स्पष्ट होण्याऐवजी इतरच चर्चा होते, मला तुम्हाला जे काही सांगायचे होते ते पहिल्या प्रतिसादातच सांगून झाले आहे आणि हे दोन प्रतिसाद ते स्पष्ट करण्यात आणि वाक्यार्थांचे विवेचन करण्यातच कारणी लागले आहेत. तेव्हा गाभा समजून घ्यावा. समजला तर ठीक नाही तरी ठीकच. :) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास गुरुवार, 03/12/2015 - 15:12 नवीन
त्यात कोणत्या वाक्यात भाजपचा प्रचार केल्यासारखा वाटतो? संपूर्ण धाग्यात भाजपचा उल्लेख एकाच वाक्यात आहे (हंसराज अहीर यांचा उल्लेख असलेल्या वाक्यात). इतरत्र कोठेही उल्लेख नाही. जे केवळ भाजप विरुद्ध इतर या चष्म्यातून बघतात त्यांच्या या वैचारीक मर्यादा आहेत. तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हाडक्या गुरुवार, 03/12/2015 - 15:53 नवीन
वैचारीक मर्यादा
?? हा वाक्प्रचार खटकला. इतरांच्या वैचारीक मर्यादा तुमच्या कशा लक्षात येतात हो लगेच? तुमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नसताना इतरांच्या वैचारीक मर्यादा तुम्हाला कळू लागल्या म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुकच करायला हवे नाही का ?
भाजप विरुद्ध इतर या चष्म्यातून बघतात
हे इथे कोठून आले ? तुमच्याच डोक्यातून ? थोडी तुमची "भाजप विरुद्ध इतर " ही भुमिका सोडून पूर्ण प्रतिसाद वाचलात तर मुद्दा कमीत कमी विचारात तरी घ्यायचा विचार कराल (जो पहिल्या प्रथम तुम्हाला उद्देशूनदेखील नव्हता, तरीही तुम्हाला आमची वैचारिक मर्यादा काढाविशी वाटली, याचा काय अर्थ घ्यायचा ? तुमचीच अघोषित भाजप वि. इतर अशी कंपुबाजी ? म्हणजे आम्हा सामान्य लोकांना स्थानच नाही म्हणायचे! की मत प्रदर्शनदेखील नाही करायचे ? की भाजपबद्दल बोलायला पण आम्ही भाजप, काँग्रेस, आप, शिवसेना असे कोणीतरी असलेच पाहिजे काय ? नै तसा वटहुकून तरी नै दिसला अजून म्हणून विचारतोय.) आणि दुर्लक्ष करा सांगताय म्हणजे काय हो ? नीट विचारलेल्या प्रश्नालापण तुम्ही तुमच्याच चष्म्यातून पाहताय आणि तिसर्‍याच आयडीला ( श्रीगुरुजींना) दुर्लक्ष करायला सांगताय, याचा काय अर्थ घ्यायचा ?? या लेखातल्या मुद्द्यांच्या सत्यासत्यतेबाबत ही प्रतिक्रिया नसून सदैव एकाच एका दृष्टीकोनाच्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समोर आलेल्या तथ्यांच्या विशिष्ठ मांडणीबाबत आहे. मी सामान्य मतदार असून कोणत्याही विचारसरणी, पक्ष, नेता यांच्याशी बांधिलकी मानत नाही. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चूकला चूक आणि बरोबरला म्हणावे असे माझे मत आहे. हे एवढे ढळढळीतपणे लिहून पण तुम्हाला असे वाटावे याला काय म्हणावे ? तुम्ही तुमच्याच चष्म्यातून पाहणे कमी करा राव आणि जरा "भाजप आणि इतर" असल्या मांडणीपेक्षा वेगळा विचार असू शकतो हे तुमच्या वैचारीक मर्यादांच्या कक्षेत बसत असेल तर बसवून घ्या. [विकास या आयडीबद्दल जो आदर होता त्यामुळेतर वरचा प्रतिसाद जास्त दु:खदायी होता भाऊ. पण असो. अपेक्षाभंगांची आता कदाचित तयारी आधीच करुन ठेवायला हवी.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/12/2015 - 16:42 नवीन
इतरांच्या वैचारीक मर्यादा तुमच्या कशा लक्षात येतात हो लगेच? तुमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नसताना इतरांच्या वैचारीक मर्यादा तुम्हाला कळू लागल्या म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुकच करायला हवे नाही का ? पहीली गोष्ट म्हणजे मी हे तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, जरी तो तुमच्या प्रतिसादाला आलेला उप-उप प्रतिसाद ठरू शकत असला तरी. दुसरे म्हणजे मी "वैचारीक" म्हणले, "बौध्दीक" नाही कारण तो माझा झोपेत देखील उद्देश नव्हता/नाही. मी केवळ गुरूजींच्या एका मुद्याबद्दल बोलत होतो जो इतरत्रही दिसतो. इथे देखील खालील काही प्रतिसाद पाहीले तर ते लक्षात येईल. ते सगळे मी आधी वाचले असल्याने त्या वाक्याला आणि इतर प्रतिसादाला अनुषंगून प्रतिक्रीया दिली. >>> या लेखातल्या मुद्द्यांच्या सत्यासत्यतेबाबत ही प्रतिक्रिया नसून ... कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चूकला चूक आणि बरोबरला म्हणावे असे माझे मत आहे. <<< हे जे तुमचे मत आहे. त्याच्याशी मी बर्‍याच अंशी सहमत आहे. पण तरी देखील त्यावर माझे उत्तर वेगळे आहे. परत परत एखादा विषय येऊ लागला अथवा एखाद्या आयडीकडून तोच तोच विषय येऊ लागता तर त्या कडे दुर्लक्ष करणे आपण (तुम्ही-मी सर्वच) सहज करू शकतो. त्याच बरोबर एखादा विषय कधी निघाला आहे यावरून त्या लेखनकर्त्याच्या लिहीण्यामागच्या उद्देशाबद्दल देखील आपण समजून घेऊ शकतो. मनमोहन सिंगांवर अशी वेळ येणे हे मला खरेच दुर्दैवी वाटले आणि वाईट वाटले. "असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ" ह्या म्हणीचा अर्थ कुठेतरी समजला... अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. पण ही बातमी मोठी असल्याने त्यावर आत्ता कोणीतरी लेख टाकणारच होते, तसे झाले असे मला वाटते. विकास या आयडीबद्दल जो आदर होता त्यामुळेतर वरचा प्रतिसाद जास्त दु:खदायी होता भाऊ. पण असो. अपेक्षाभंगांची आता कदाचित तयारी आधीच करुन ठेवायला हवी. ओ भौ! मी सामान्य माणूस आहे, आम आदमी नाही. उगाच आदर ठेवून नंतर दु:खदायी अपेक्षाभंग करून घेण्याची अपेक्षा माझ्याकडून करून घेऊ नका! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 03/13/2015 - 01:17 नवीन
पहीली गोष्ट म्हणजे मी हे तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, जरी तो तुमच्या प्रतिसादाला आलेला उप-उप प्रतिसाद ठरू शकत असला तरी
ओह. थोडा गैरसमज झाला असं वाटतंय. पण आता बर्‍यापैकी लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचंय ते.
परत परत एखादा विषय येऊ लागला अथवा एखाद्या आयडीकडून तोच तोच विषय येऊ लागता तर त्या कडे दुर्लक्ष करणे आपण (तुम्ही-मी सर्वच) सहज करू शकतो.
बर्‍याचदा दुर्लक्ष करतोच हो तरीपण शक्य असेल तिथे प्रयत्न करून पाहतो, अपेक्षित परिणाम थोडा जरी आला तरी ठीकच.
ओ भौ! मी सामान्य माणूस आहे, आम आदमी नाही.
हा हा हा.. सगळेच अपेक्षाभंग करणार नाहीत अशी आशा. :) .. सामान्यतः तुमचे लेखन संतुलित असतेय हो म्हणून उद्वेगमिश्रित आश्चर्य वाटले होते इतकेच. तशी मिपावर कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाहीच हो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मोदक Fri, 03/13/2015 - 03:57 नवीन
योग्य मुद्दा. >>>>>तरी त्या स्थितीमध्ये आडून आडून प्रत्येक लेखनात एकाच पक्षाचा छुपा प्रचार ही भुमिका किती योग्य? सगळेच काही तथ्ये तपासायला जात नाहीत (आणि लिहिणारा जर किमान भाजपचा कोणी म्हणून लिहित नसल्याचा दावा करत असल्यास) तेव्हा बर्‍याचदा हा छुपा प्रचाराचा मुद्दा लक्षातदेखील न येता समोरच्यांच्या गळी उतरवला जातो. ही एकप्रकारची जाहिरातीची पध्दतच नव्हे काय? आणि समजा एखादा सदस्य "उघडपणे" मी XXX समर्थक आहे असे म्हणत असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
संपत Fri, 03/13/2015 - 17:46 नवीन
एखादा कुठल्या तरी पक्षाचा, भाषेचा, जातीचा, विचारसरणीचा समर्थक / प्रचारक आहे कि नाही ह्याचा disclaimer करण्याची गरज निदान मला तरी वाटत नाही.. (आणि हो मी भाजपचा किंवा श्रीगुरुजींचा समर्थक / प्रचारक नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
म
मृत्युन्जय Fri, 03/13/2015 - 09:23 नवीन
अमोल इथे इतके आयडी मोदी म्हटल्यावर थयथयाट करायला लागतात की उद्या ते रुसी मोदी हे नाव निघाले तरी तौबा तौबा करतील. त्यातले बहुतांश पेड आर्मीचे मेबर्स आहेत हे कोणीही डोळे झाकुन सांगु शकेल. गुर्जींबद्दल बोलायचे झाल्यास ते पेड आर्मीचे मेंबर असतीलच तर किमान भल्या माणसासाठी काम करताहेत. देशबुडव्यांपेक्षा मोदींची भलामण केलेली कधीही चांगली. अर्थात मी कोणाचाही उगा डांगोरा पिटण्याच्या विरोधात असल्याने मला ही जाहिरातबाजी मुळातच आवडत नाही ही गोष्ट वेगळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
क
कपिलमुनी Fri, 03/13/2015 - 09:33 नवीन
चांगल्याला चांगले म्हणावे . वाईटाला वाईट ! आंधळी भक्ती आणि आंधळा विरोध दोन्ही प्रकार चूकच ! मोदींनी चांगले काम केले तर चांगले म्हणावे पण जोथे चुकतात तिथे चुकतात म्हणवे , त्याने पाप लागत नाही. बाकी काँग्रेसच्या पापाचे माप मतदारांनी त्यांच्या पदरात घातलेच आहे ( तरीपण अजून सुधारले नाहीत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिंपातला उंदीर Fri, 03/13/2015 - 10:30 नवीन
मोदी किंवा भाजप विरुध्द मी नाही . मी पक्षापेक्षा नेत्यांना मानतो . मी काल उघडलेला धागा जर तुम्ही बघितलात तर मी त्यात देवेंद्र फडवणीस याचं कौतुक केल आहे . बाकी काश्मीर निवडणुकी मधल्या धाग्यावर गुर्जीनी खूप वैयक्तिक शेरेबाजी केली म्हणून त्यांच्याबद्दल जाणवणार माझ निरीक्षण मी मांडलं . ते प्रत्येकाला मान्य असेलच असे नाही . मी माझ्या प्रतिसादात पण असे म्हंटले आहे की पेड मेंबर हे सगळ्याच पक्षांचे आहेत . पण भाजप चा जोर जास्त आहे . पेड मेंबर हे आता एक राजकीय वास्तव आहे . बाकी गुर्जी वैयक्तिक शेरेबाजी करणार नसतील तर त्यांच्यासोबत इतर धाग्यांवर पण चर्चा करेल . बाकी आता काम आहे . मी एका पेपर साठी चित्रपट परीक्षण लिहितो . त्यामुळे आजच दिवस चित्रपट बघण्याचा . उद्या परीक्षण लिहिण्याचा आणि रविवार चा दिवस बायकोचा . आता भेट थेट सोमवारी . शुभ विकांत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी Fri, 03/13/2015 - 10:46 नवीन
पिंपातला उंदीर, वैयक्तिक शेरेबाजी तुम्हीच सुरू केली होती. सर्वच धाग्यावर अनेकांच्या बाबतीत तुमची वैयक्तिक शेरेबाजी सुरूच असते. तुमची कोणतीही चुकीची गोष्ट पुराव्यानिशी खोडून काढली की लगेच समोरच्याचा तुम्ही "लाज कशी वाटत नाही", "निर्लज्जपणे समर्थन सुरूच आहे" असा उद्धार करत असता. आपण प्रतिसाद दिलेले कोणतेही धागे उघडून पहा आणि दुसर्‍याने प्रतिवाद केल्यावर आपण काय शब्दात त्या व्यक्तीचा उद्धार करता ते पहा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
व
विजुभाऊ गुरुवार, 03/12/2015 - 14:40 नवीन
२जी स्पेक्ट्रम ची सुरुवात भाजपच्याच एका दिवंगत नेत्यामुळे झालेली होती. त्याने सध्या मोदींच्या पाठीशी असणार्‍या उद्योगपतीच्याच हिताचे अनेक निर्णय घेवून अप्रत्यक्ष मदत केली होती.]भाजपने मोठ्या शिताफीने त्या दिवंगत नेत्याचे नाव वाचवले आहे.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/12/2015 - 15:00 नवीन
या नेत्याच्या मुलाच्या अय्याशीचे किस्से तेव्हा चर्चेत होते. फार मोठे डिल होते म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगुरुजी Fri, 03/13/2015 - 10:49 नवीन
२-जी तरंगलहरींचे वाटप नक्की कधी सुरू झाले? माझ्या आठवणीप्रमाणे २००७ मध्ये हे वाटप झाले होते. २००४ किंवा २००६ पूर्वी हे वाटप झाले नसावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ख
खंडेराव Fri, 03/13/2015 - 11:07 नवीन
याचे आश्चर्य. असो. http://articles.economictimes.indiatimes.com/2011-06-09/news/29638490_1_ashish-deora-three-companies-reliance-infocomm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/13/2015 - 11:12 नवीन
लिंक वाचली. हे प्रकरण आणि २००७ मधील विविध कंपन्यांना केलेले २-जी तरंगलहरींचे वाटप यात थेट संबंध दिसत नाही. १९९९-२००३ या काळात घडलेले हे प्रकरण एकदम वेगळेच दिसते. या प्रकरणाचा पुढे काय निकाल लागला? का अजून पेंडींग आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Fri, 03/13/2015 - 11:24 नवीन
नाही अजुन, पण प्रकरण तगडे होते. याचा २ग शी संदर्भ असा की, इथुन तरंगलहरी या मलिदा देतात हे राजकारण्यांच्या लक्शात आले. वायरलेस इन लो़कल लूप ला फुल्ल मोबिलिटी देण्याचा हा किस्सा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हुप्प्या गुरुवार, 03/12/2015 - 15:03 नवीन
http://misalpav.com/node/22527
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/12/2015 - 15:24 नवीन
या लेखातल्या प्रकरणाची गरमागरम चर्चा सर्व माध्यमांत होणे अपेक्षितच आहे. पण... न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही. हा शेरा आणि इतर छुपे हल्ले करण्याचा मोह टाळला असता तर ह्या लेखाची उंची वेगळी असती आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे लेखातल्या मुख्य मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळाला असता ! असे अवांतराला स्वतःच आमंत्रण देण्याची परिणती स्वतःच स्वतःच्या मुद्द्यांची किंमत कमी करण्यात होते ! बाकी या प्रकरणामध्ये भारतीय राजकारणावर दूरगामी प्रभाव पाडण्याची ताकद असल्याने, त्याच्याकडे बारकाईने लक्ष जाणारच. दोन्ही बाजूंच्या पाठीराख्यांच्या आणि/किंवा निष्पक्ष जाणकारांच्या "मुद्देसूद व वैध भाषेतल्या" प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 03/12/2015 - 15:58 नवीन
अगदी सहमत .. हाच मुद्दा वरती या प्रतिसादात मांडला असता, "भाजप विरुद्ध इतर या चष्म्यातून बघतात त्यांच्या या वैचारीक मर्यादा आहेत. तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल." असे इतर विचारवंतांचे मत वाचणे तर अतिशय उद्वेगजनक आहे. :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 03/12/2015 - 16:11 नवीन
शेवटी काय होईल ते बघायचं. मात्र या निमित्ताने काँग्रेसचे भ्रष्टाचाराने काळेकुट्ट झालेले हात परत जनतेसमोर येत आहेत हेच महत्त्वाच<<<<<< जययेडूरप्पा जय बंगारू
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 03/12/2015 - 19:51 नवीन
अतिरेक्याला सोडणे , चुनावी जुमला , भूसंपादन , काळा पैसा वापसी यावर एका अक्षरानेही धागा निघाला नाही. काँग्रेसच्या पंप्र ला अजुन समन निघाले तर जणु काही व्हर्डिक्ट पास झालेच अशा थाटात लिहिले आहे. हेच / असेच भाजपाबाबत होऊन कुणी धागा काढला असता तर अजुन केस कोर्टात आहे , निकाल लागलेला नाही , मग भाज्पा गुन्हेगार कशी असा घोळवलकaर गुर्जी आक्रोश करायला हेच श्रीगुर्जी अवतरले असते हे नक्की. सध्या निवडणुक नाही. पण मोदी सर्कारचा एक वर्षातला प्रवास पहाता पुढची सत्ता मिळेल का याची आता मोदीभक्ताना शाश्वती राहिली नाही... म्हणुन हा लेख म्हणजे पुन्हा नेटाने प्रचारमोहीम सुरु झाल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/12/2015 - 20:57 नवीन
...जणु काही व्हर्डिक्ट पास झालेच अशा थाटात लिहिले आहे.... हेच / असेच भाजपाबाबत होऊन कुणी धागा काढला असता तर २००२ ते २०१२, सैतान पण चळाचळा कापेल, हिटलर जणू काही शांतीदूत वाटावा अशी मोदींची प्रतिमा केली होती. जाता येता त्यावेळेस गरळ दिसायची. गंमत म्हणजे समन्स दूर राहूंदेत, त्यांच्यावर तर आरोपपत्र पण नव्हते तरी देखील झाले होते. पण मोदी सर्कारचा एक वर्षातला प्रवास पहाता पुढची सत्ता मिळेल का याची आता मोदीभक्ताना शाश्वती राहिली नाही... म्हणुन हा लेख म्हणजे पुन्हा नेटाने प्रचारमोहीम सुरु झाल्याचे लक्षण आहे. जालावर जरा पाहीले तर लक्षात येईल की ज्यांना मोदीभक्त म्हणून हिणावले गेले होते ते आज जे पटत नाही त्याबद्दल स्पष्टपणे बोलत/लिहीत आहेत. पण त्याउलट केजरीवालांचे अंधसमर्थक बघा - आळीमिळी गुपचिळी झाली आहे. त्यावरून डोळस समर्थक कोण (आणि कशाचे) ते तसेच अंधसमर्थक अथवा भक्त कोण (आणि कोणाचे) ते सहज समजू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/12/2015 - 21:41 नवीन
ह्यांना काळा पैश्याची वापसी लगेच पाहीजे आहे मग ६५ वर्ष ईतका काळा पैसा बाहेर जात असताना मुग गिळुन गप्प का होते ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/12/2015 - 21:45 नवीन
काँग्रेसला इतका काळा पैसा बाहेर का गेला अस विचारल्याच आठवत का कोणाला ? आज मनमोहन सींगना कोर्टाच समन्स आल्यावर लगेच काँग्रेसवाले पद यात्रा करायला हजर झाले. ईतके दिवस कोळश्याचा काळा बाजार झालाच नाही अश्या थाटात वावरणारे लोक आता जमिनीवर पडलेत !!
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 03/12/2015 - 23:10 नवीन
सत्ताधिकार्‍याना जाब विचारणे हे विरोधी पक्षाचे काम असते... काँग्रेस काळा पैसा नेत असताना विरोधात बसलेली कमळाबाई तोंडावर पदर घेऊन झोपली होती ! कोळसा घोटाळा , स्पेक्ट्रम घोटाळा हे जरी घोटाळे असले तरी त्यातुन जनतेचं थोडं तरी भलं होत होतं का हेही बघायला हवे. देशाला महसूल कमी मिळाला तरी कंपन्याना ते रिसोर्सेस स्वस्त मिळाल्याने ते जनतेला सेवाही कमी दरात देतील ना? स्पेक्ट्रम स्वस्तात वाटले तेंव्हा त्याचा मोबदला म्हणुन जनतेला कॉल रेटही कमी होते ना ? आणि पारदर्शितेच्या नावाने आता मोबैल कंपन्यांकडुन महसुल जास्त मिळतोय पण मोबाइल सेवाही महाग झाली ! आता या कोळशाचं हे कमळवाले काय करतात बघुया ... कायदे कडक केल्याचे भासवुन महसुल जास्त गोळा होईलही. पण त्यामुळे लोकाना मिळणारी सेबाही महाग झाली की मग देशभक्तीचे डोस पाजणारे मोदीभक्त तोंड काळे करतीलच नै का ? त्यापेक्षा काळ्या हाताची काँग्रेस परवडली ! ( वि सू : हे करचुकवेगिरीचे समर्थन नाही. वाद त्या दिशेने वाढवु नये. ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विकास गुरुवार, 03/12/2015 - 23:57 नवीन
हे करचुकवेगिरीचे समर्थन नाही. वाद त्या दिशेने वाढवु नये. मी जे काही वाचले आहे त्यानुसार कोलगेटचा संबंध कंत्राट संदर्भातील कायदे मोडण्याशी आहे. कंत्राट देण्याचे काही नियम असतात. त्यातील एक असा आहे की निविदा मागवून त्यातून जास्तित जास्त पैशाला नैसर्गिक साधनसंपत्ती विकणे गरजेचे असते. नेमके तसे कोलगेट प्रकरणात झाले नाही. तेथे स्वतःच्या जवळ असलेल्या मोठ्या कंपन्यांना साठे देण्यात आले. तसेच काही कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या कंपन्या काढून स्वस्तात खाणी देऊ केल्या. नंतर या असल्या कंपन्यांनी त्यांना मिळालेल्या मालकीच्या खाणी या मोठ्या माशांना चढ्या भावात विकून स्वत:चे आणि (कदाचीत संबंधीत अधिकार्‍यांचे/मंत्र्यांचे/पक्षाचे) पोट भरले. त्यात जो काही तोटा झाला तो १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा होता. त्याची काँग्रेसजनांनी थट्टा करून पाहीली. पण पहील्याच राउंड मधे आत्ता जे काही सरकारला कंत्राट मिळालीत ती २ लाख कोटींची आहेत. अर्थात हे खाणकाम पुढे ३० वर्षांसाठीचे असल्याने ते पुढची ३० वर्षे मिळणार आहेत. त्याथी या सरकारने यातील बहुतांश त्या त्या राज्यांना दिला आहे. परीणामी महाराष्ट्राला पण फायदा होणार आहे. आणि तो फायदा जनतेसाठी अर्थातच होऊ शकणार आहे. हा प्रश्न केवळ पारदर्शकतेचा नसून बेकायदेशीर मनमानी करून कुणालाही कंत्राट देण्याचा आहे. जर भाजपा सरकारने तसे केले तर ते देखील चुकीचेच असेल आणि त्यांना पण कोर्टात खेचावेच लागेल. तरी तुर्तास यात "जर - तर" आहे. काँग्रेसच्या बाबतीत "जर-तर" नसून, ऑलरेडी झालेले असल्याने, "म्हणून" असे म्हणावे लागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
विटेकर Fri, 03/13/2015 - 06:35 नवीन
स्पेक्ट्रम स्वस्तात वाटले तेंव्हा त्याचा मोबदला म्हणुन जनतेला कॉल रेटही कमी होते ना ? खरे आहे हो तुमचे ! एखादा चोर एखाद्या संपन्न घरात चोरी करतो तेव्हा समाजातील दरिद्री घरांची संख्या एकने कमी होत असते ! पोलिस उगाचच त्याच्या मागे लागतात वास्तविक अर्थिक विषमता कमी करण्यास हातभार लावला म्हणून आपण त्यांचा सत्कारच करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Fri, 03/13/2015 - 08:01 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/13/2015 - 07:06 नवीन
कधी कधी काही लोक वाद करताना स्वतःच्या हुशारीच्या कल्पनेच्या ओघात इतके वाहत जातात की "आपण मांडलेल्या मुद्द्यांमध्ये चलाख प्रतिवाद होत नसून स्वतःचेच हसे होत आहे" हे त्यांच्या लक्षात येत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
विनोद१८ Fri, 03/13/2015 - 15:41 नवीन
...palthya ghadavarche paani aahe te.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा