Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

ग
ग्रेटगणेश
गुरुवार, 04/30/2015 - 08:44
🗣 240 प्रतिसाद
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ? (सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत. इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते. आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे. इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे. जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे. सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा. भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी. थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी.. आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे. - गणेश साळुंखे ९३२१८ ११०९१

प्रतिक्रिया द्या
66334 वाचन

💬 प्रतिसाद (240)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/30/2015 - 18:57 नवीन
toothpaste???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 04/30/2015 - 20:39 नवीन
हे घे खालील शब्दांसाठी मराठी शब्द ! आमच्या हीने सांगीतलेनं हो खास तुझ्यासाठी ! ब्राऊजर : चाळक गिअर : दातेरी चक्र / चक्री क्लच : दट्या मी तीला अडॅप्टर चा अर्थ विचारणार तोवर ती झोपी गेली. आता उद्या मुड चांगला असेल तर विचारुन सांगतो हो. काय चुकलेमाकले असले तर माफ कर हो तिला. ता.क. : ती तुला काही मराठी शब्दांना विंग्रजीमधे काय म्हणतात ते विचारणार होती. उदा. १. तुंबडी २. तुंबाड ३. लामण लावणे ४. विद्रट ५. म्हातारचळ ६. आमचे हे ७. इकडची स्वारी पण मग स्वतःहूनच नको म्हणाली. कशाला उगाच या वयात माईला विनाकारण त्रास द्यायचा असे काय काय म्हणत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/01/2015 - 05:53 नवीन
धन्यवाद रे धर्मराजा.
मी तीला अडॅप्टर चा अर्थ विचारणार तोवर ती झोपी गेली.
ही अपेक्षा होतीच.(ह. घे.रे). माझा उद्देश मराटीची(वा ईतर भारतीय भाषा) इंग्रजीशी तुलना करणे नाही.मराठी भाषेत असे शेकडो शब्द असतील ज्यांना इंग्रजीत प्रतिशब्द नाही.सगळे शिक्षण मातृभाषेत हवे हा आग्रह तार्किक वाटला तरी तो भारतात टिकणार नाही. हजारो,लाखो वैज्ञानिक संज्ञांना मराठी प्रतिशब्द बळेच शोधायचे व मुलांना ते शिकायला लावायचे?असो. गणेशाच्या ह्या विधानावर माझा अजूनही आ़क्षेप आहे.
मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते
भारतापुरता विचार केलास ते खरे नाही. मोठ्ठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी,सैन्यातील मोठे पदाधिकारी,भारतिय विदेश सेवेतले अधिकारी,मोठे आय.पी.एस.अधिकारी..ह्यांचे शि़क्षण अनेक वेळा इंग्रजीत झालेले दिसून येते.ह्यांची मानसिक वाढ तुलनेत कमी असते असे आहे का? इंग्रजी शाळेत गेलेली काही मंडळी. १)रघुराम राजन(दिल्ली पब्लिक स्कूल) २)आमीर खान,राहूल शर्मा(बॉम्बे स्कॉटिश) ३)दीपक पारेख, ज्युलियो रिबेरो, गौतम राजाध्यक्ष,होमी. सेठना,सोली सोराबजी(सेंट झेवियर). मला खात्री आहे मातृभाषेत शिकलेल्यांची ही अशी यादी तू देशील कदाचित. मातृभाषेत न शिकल्याने मानसिक वाढ कमी होते,विषय नीट समजत नाहीत..असल्या विधानांवर माझा आ़़क्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Fri, 05/01/2015 - 06:58 नवीन
अगदी तुमच्यासारखे विचार करणारे आहेत म्हणून मराठी शाळांना कोणी विचारत नाही आजकाल. यश आणि शिक्षणाचा तसा काहीच संबंध नाही हे अजूनही कुणी लक्षात घेत नाही. ना इंग्रजीतून शिकलेले सगळे रघुराम राजन होत. ना झेडपीतून शिकलेले भटकर होतात. शिक्षण हे नोकरीसाठीच घ्यायचे एवढीच क्षुल्लक आणि क्षुद्र मागणी असेल तर शाळा महाविद्यालयांची गरजच काय? चार महिन्यांच्या क्लासमधे फाडफाड इंग्रजी शिकवतातचकी. इंग्लीश-विंग्लीश चित्रपटात श्रीदेवी शिकते तशी. मुलभूत संकल्पना आपल्या भाषेतून शिकणे आणि परक्या भाषेतून शिकणे यात फरक आहेच. ए फॉर अ‍ॅपल करणे म्हणजे फक्त रट्टा मारणे आहे. त्या मुलाला ए समजत नाही, अ‍ॅपल समजत नाही. फॉर चा अर्थ समजत नाही. ए फॉर अ‍ॅपल हे इंग्रजी मुलांसाठी त्यांची भाषा शिकण्याची पद्दत आहे. जसं आपल्याकडे अननसाचा अ शिकवल्या जातो. तो लिहिण्या-वाचण्यासाठी शिकवला जातो. मराठी समजण्या-बोलता येण्यासाठी नाही. राहीला प्रश्न गीअर, ब्राउजर वैगेरेंचा. इंग्रजीचे पुचाट आणि बालिश समर्थन करणार्‍यांकडे यापेक्षा चांगला युक्तिवाद कधीच नसतो. टेबल, पेन, बॉटल, कम्प्युटर इत्यादी शब्दांचा मराठीत वापर करतांना काही त्रास होतो का? "कम्प्युटर टेबलवरून पेन आणि बॉटल उचलून घे" हे नि:संशय मराठीच आहे. हे वाक्य उच्चारायला इंग्रजी कशासाठी लागते? 'आपल्या भाषेतून शिक्षण' चा इंग्रजी-समर्थक ओढून-ताणून चुकीचे अर्थ लावतात तेव्हा जाम हसायला येतं. मातृभाषेच्या प्रमाण भाषेची अडचण पुढे करतात. इंग्रजी कशी जगन्मान्य आहे याचा ढोल वाजवतात. अरे, फक्त अमेरिकन आणि ब्रिटीश इंग्रजीचे फरक समजून घेता घेता भंबेरी उडते. त्याच प्रत्येकाचे उच्चार, अर्थ, स्पेलींग्ज वेगळे. इंग्रजीत काय प्रमाण आहे सांगेल का कुणी? तिरपागडं, लंगडं इंग्रजी तिच्या अंगभूत अवगुणांमुळे शिकता शिकता देशी पोरांच्या डोक्याची वाट लागते. तुर्तास एवढेच. अजून बरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 05/03/2015 - 04:22 नवीन
मुलभूत संकल्पना आपल्या भाषेतून शिकणे आणि परक्या भाषेतून शिकणे यात फरक आहेच. ए फॉर अ‍ॅपल करणे म्हणजे फक्त रट्टा मारणे आहे. त्या मुलाला ए समजत नाही, अ‍ॅपल समजत नाही. फॉर चा अर्थ समजत नाही
असे असेल तर मातृभाषेत(मराठीत) शिकणार्यांच्या गणित्,विज्ञान.. वगरे विषयातल्या संकल्पना ईतरांपेक्षा अधिक प्रगल्भ हव्यात.पण मला तरी तसे दिसत नाही.स्पर्धा परीक्षा,नोकर्या,संशोधन... कुठेतरी मातृभाषेत शि़क्षण घेणारी मुले मोठ्या प्रमाणावर चमकताना दिसली असती.. निदान एखाद्या क्षेत्रात तसा पॅटर्न तरी दिसायला हवा की नको? तो तसा (भारतापुरता)दिसत नाही म्हणून इंग्रजी शाळेय घातले तर काय फरक पडतो? निदान डिग्री मिळाल्यावर मुलाखतीत स्पष्ट इंग्रजी बोलता तरी येते. घरी मातृभाषा पण बाहेर सर्वत्र इंग्रजी असे असणारी अमेरेकेतली भारतीय वंशाची मुले अनेक स्पर्धा परीक्षात्,संशोधनात चमकताना दिसतात. ती कशी काय असा ह्यांचा सवाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 05/03/2015 - 09:05 नवीन
माईसाहेब, तुमच्या बेसिकमधेच लोचा झाला आहे. अमेरिकेतल्या भारतीय मुलांचं तुम्ही उदाहरण देताय यावरून तुमचं या विषयासंदर्भातलं आकलन कळलं. 'मातृभाषेतून शिक्षण' ही संकल्पना जरा समजून घ्या आधी. नंतर करू चर्चा. काय की तर्क कितीही ताणू शकता पण त्यासाठीच्या अभ्यासाचं काय? डीग्री मिळाल्यावर नोकरीसाठी मुलाखत इंग्रजीतून देता यावी यासाठी मुलाला जर प्ले-स्कूल पासून इंग्रजीत टाकावे लागत असेल तर त्या पालकांचे इंग्रजीबद्दलचे ज्ञानही समजून येते. माझ्या मते इंग्रजी शाळांची गुलामगिरी सहन करण्यामागे हेच दिव्य ज्ञान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सामान्यनागरिक गुरुवार, 06/11/2015 - 09:18 नवीन
आणि हे असले लोकच मराठीचं कसं होणार म्हणून गळे काढतात....आणि येथे मराठीतुन शिकणे कसे दुय्यम याबद्दल वाद घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नगरीनिरंजन Sun, 05/03/2015 - 16:27 नवीन
चमकणे म्हणजे काय हो माई? मराठीत शिकलेले अनेक लोक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदांवर आहेत पण ते चमकत नाहीत. मुळात "प्रस्थापित व्यवस्थेत यश मिळवणे" हे हवंय की वेगळा विचार करण्याची क्षमता हवी असा प्रश्न आहे. आजकाल समाजातल्या विक्षिप्त लोकांची संख्या कमी होत चालली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मनाला येईल ते करण्यासाठी सगळं झुगारुन देणारे बरेच लोक असत. आता तशी परिस्थिती नाहीय. जर इंग्रजी शिक्षणाने लोक जास्त हुशार झाले असते तर भारतात इनोव्हेशनचे प्रमाण तुफान वाढायला हवे होते. त्यापेक्षा चीनमध्ये बघा बर्‍याच लोकांना तिथे अजिबात इंग्रजी येत नाही पण गूगलच्या तोडीस बैडू आणि फेसबुकच्या तोडीस रेनरेन तयार करुन ते वापरतात. इंग्रजी शिकल्यामुळे इनोव्हेशनची गरज संपून निव्वळ एक ग्राहक होतो आपण या वेस्टर्न कंपन्यांचे. चिमूटभर लोकांना नोकर्‍या देतात ते पण मार्केट अब्जावधीचं खातात. त्या चिमटीत बसण्यासाठी सगळी धावपळ. =)) मुळात इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्याल्याशिवाय गत्यंतर नाही हे फ्रेंच,जपानी व चिन्यांनी खोटे ठरवले आहे तरी गुलामी वृत्ती काही जात नाही आपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
H
hitesh Sun, 05/03/2015 - 19:25 नवीन
तो नरुकाका चायनीज अध्यक्षासोबत झोपाळ्यावर जो जो करत होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sun, 05/03/2015 - 19:29 नवीन
चायनीज मालाबद्दल प्रेम नाही. त्यांच्या स्वत्वाबद्दल प्रेम आहे. त्यांनी इंग्लिश स्पीकिंग सर्फ्सची बाजारपेठ जगाला आंदण दिलेली नाही की कोणतेही प्रॉडक्ट्स काहीही बदल न करता आणून विका आमच्याकडे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
विवेकपटाईत Sat, 05/02/2015 - 16:28 नवीन
प्रत्येक भाषा नवीन शब्दांना आत्मसात करते. भाषेच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. त्या मुळे मराठीत ब्राउसर, अडाप्टर हे शब्द वापरल्या जाऊ शकतात. आधी पण आपण रेल्वे, बस, कर, इत्यादी शब्द मराठीत वापरतोच न. शिवाय NGO वर अधिनिक तंत्राची माहिती ही मराठी, हिंदी भाषेत सहजपणे दिली जाते. फक्त मराठीत शिक्षण सुरु झाल्याने जनता आणि आजच्या नव-ब्राह्मण (उच्चभू वर्ग) यातला फरक कमी होईल. सरकारी शाळेत शिकणारे ही मोठ्या पदांवर पोहचणार, डॉक्टर, इंजिनीअर बनतील. हे नव-ब्राह्मणांना कसे चालेल. म्हणून देशात आंग्ल भाषा आहे. हे वेगळे देशातल्या उच्चतम कार्यालयातल्या अधिकाऱ्यांशी आंग्ल भाषा वाचाल तर कळेल इथे सर्व मोरपंख लावलेले कावळेच आहे. (त्यात आपण सर्वच जे आंग्ल भाषेत कार्य करतात अर्थात मोरपंख लावलेले कावळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सामान्यनागरिक गुरुवार, 04/30/2015 - 16:22 नवीन
आपण भालचंद्र् नेमाडेंशी सहमत. विदेशी माध्यमांच्या शाळांवर काही काळ तरी बंदी घातलीच पाहिजे. निदान महाराष्ट्रात तरी!. किंवा खुप मोठ्ठा कर लावा.त्याशिवाय तरणोपाय नाही. नाहीतर काही दिवसांतच आपण सगळे लोक मिंग्राठी भाषा बोलु लागू. आणि एक विनंतीवजा सूचना .. आमच्यासारख्या नवख्या आणि अज्ञ लोकांना हे माई आणि नानासाहेब याबद्दलची जी देवाण घेवाण झाली ती काही कळली तसेच पटली नाही.. जर आपापसातच देवाण घेवाण करायची असेल तर व्यनि मार्फत करावी. .......चूभूदेघे.......
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 05/01/2015 - 13:39 नवीन
जी संस्कृत भाषा व्यवहारात काडीमात्र वापर्ली जात्नाही तिचे इतके कौतुक. अणि इंग्रजीच्या जिवावर पोटपाणी चालुनही ती मात्र 'पर्कीय ' गंमतच .
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 05/01/2015 - 14:17 नवीन
ओ पगारे... नका आपल्या संस्कृती वर येउ. इथे संस्कृत भाषा हा विषयच नाहि आहे.
  • Log in or register to post comments
H
hitesh Sat, 05/02/2015 - 01:47 नवीन
मी मी आहे. मातृभाषाच हवी , हिंदी नको इंग्लिश नको असे कोकलणार्‍याना संस्कृतचा मात्र जबरदस्त पुळका असतो. अबु मराठीत का बोलला नाही म्हणुन त्याला मारले. पण त्याच वेळी कुणीतरी संस्कृतात प्रतिज्ञा घेतली होती. ते मात्र चालले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/02/2015 - 05:15 नवीन
मारणार्या साहेबाची मुले मात्र बॉम्बे स्कॉटिशला शिकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
भ
भक्त प्रल्हाद Sat, 05/02/2015 - 20:59 नवीन
लाखाची गोष्ट! अरे इथे प्रत्यक्ष गांधीबाबाला लोक इंग्रजी शिकल्या शिवाय विचारत नाहीत तिथे सामान्य माणसाची काय कथा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ह
हुप्प्या Sun, 05/03/2015 - 19:17 नवीन
नान्या, संस्कृतचे स्थान हे अन्य भाषांपेक्षा वेगळे आहे. मराठी संस्कृतला आपल्या आईप्रमाणे मानते. बाकी अनेक भारतीय भाषा तसे मानतात. तसे नसते तर अनेक सरकारी संस्था, विभाग ह्यांची बोधवाक्ये संस्कृतमधे का असती? उदा. नौदलः शं नौ वरुणः, वायुदल : नभः स्पृशं दीप्तम, तटरक्षकः जलमेव यस्य बलमेव तस्य. ही बोधवाक्ये काँग्रेस सत्तेवर असताना बनली बरं का गं मायडे. नाहीतर मोदीच्या नावाने बोटे मोडशील. तेव्हा संस्कृतला एक विशेष स्थान आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे मराठी आणि हिंदी प्रतिस्पर्धी आहेत. पण संस्कृत ही कुठल्या राज्याची भाषा नाही आणि वरील उदाहरणांप्रमाणे ती एक विशेष कौतुकाची भाषा आहे त्यामुळे त्या भाषेत घेतलेल्या शपथेकडे त्या दृष्टीने पाहिले जात नाही. ज्याने संस्कृत भाषेत शपथ घेतली तो इतर वेळी उत्तम मराठी बोलतो. त्याला मराठीबाबत आकस नाही. अबु आझमी बद्दल असे म्हणता येईल का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Wed, 05/06/2015 - 03:24 नवीन
हे जो तो ठरवेल. कूणी संस्कृतअचे करेल. कुणी हिंदी उर्दुचे करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Wed, 05/06/2015 - 04:32 नवीन
संस्कृतची मराठीशी स्पर्धा नाही. भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे आणि हिदी भाषिकांचे लोंढे मुंबईत आणि महाराष्ट्रात आल्यामुळे हिंदी ही प्रतिस्पर्थी भाषा आहे. उर्दूबद्दलही तसेच म्हणावे लागेल (मुळात उर्दू आणि हिंदीत फार फरक नाही असे माझे मत). त्यामुळे संस्कृतमधून शपथ आणि हिंदीतून शपथ ह्यात एक मूलभूत फरक आहे आपणास तो मान्य करायचाच नाही असा अट्टाहास करायचा असेल तर आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/07/2015 - 17:57 नवीन
आपलं नावं बदलुन बुराखान किंवा हितेशूद्दोला करा. वरनं काही वैद्यकीय विधी करतात त्यांच्यात ते पण घ्या करुन. म्हणजे आपल्या भाषेवर, धर्मावर आणि संस्कृतीवर असा बुरखा घेउन हल्ला करायची वे़ळ येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ज
जेपी Fri, 05/01/2015 - 15:34 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.ग्रेटगणेश आणी श्री.अजो* यांचा सत्कार एक एक डायरी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते. *अजोनां वाढत्या वयात रिमांयडर साठी
  • Log in or register to post comments
अ
अवतार Fri, 05/01/2015 - 16:20 नवीन
भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली
हा नवीन शोध लावल्याबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 05/01/2015 - 17:08 नवीन
सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.
वरुन हे लोकप्रभाने छापल्यामुळे अधिकृत पण झालंय.. आहांत कुठे ? (एकच डोला मिचकावणारी स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
ह
होबासराव Fri, 05/01/2015 - 16:38 नवीन
अफाट..अचाट.. फार बेक्कार.. खतरनाक..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/02/2015 - 11:23 नवीन
नेमाडे सरांनी ज्ञानपीठ स्वीकारल्यानंतर केलेले भाषण मात्र ईंग्रजी मधे होते. (मी केवळ एक निरिक्षण नोंदवले आहे.) पैजारबुवा
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 05/02/2015 - 16:30 नवीन
नेमाडे साहेब ही आपल्या सारखे मोरपंख लावलेले (आंग्ल भाषेचे गुलाम) कावळे (देशी भाषा बोलणारे) आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 05/03/2015 - 05:26 नवीन
नेमाडे मोठे लेखक आहेत ह्यात वाद नाहीच पण ईतर भाषांचा द्वेष,तिरस्कार करण्यास लोकांना सांगू नये.मग ईतर 'इंग्रजाळलेले' भाषिक अनेक क्षेत्रांत आघाडीवर गेले की मग आपण 'मराठी माणूस मागे पडतो' म्हणत कट्ट्यांवर चर्चा करायची वेळ येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
H
hitesh Sat, 05/02/2015 - 15:06 नवीन
धागा मेला धागा मर गया थ्रेड ईज नो मोअर
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 05/03/2015 - 13:12 नवीन
माझ्या काही मित्रांची मातृभाषा खालीलप्रमाणे आहे: आगरी, अहिराणी, वाडवळ ई. त्यांनी त्यांचे शिक्षण त्या भाषांत घ्यावे हे उत्तमच! पण जे ज्ञान शिक्षणाने प्राप्त करायचे आहे ते ज्ञान आधि त्या भाषेत उपलब्धपसायला नको? त्यामुळे ज्ञान ज्या भाषेत उपलब्ध असेल त्या भाषेत घ्यावे हे उत्तम.
रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे नजरेआड करून चालणार नाही.
ह्यापैकी किती देश शतकानुशतके गुलामगीरीत होते, त्यांच्या जनजीवनावर आणि भाषेवर जेत्यांच्या भाषेचा पगडा होता? त्या-त्या देशांनी त्यांच्या भाषेत ते ज्ञान उपलब्ध होइल ह्याची काळजी घेतली त्यामुळे ते शिक्षण त्यांच्या भाषेत घेऊ शकतात.
मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात.
हे कसे ते सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची? - (ज्ञान मिळवणे महत्वाचे मानणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 05/03/2015 - 15:36 नवीन
योग्य प्रतिसाद रे सोकाजी.गेले २०-२५ वर्षे हा चर्चेचा मुद्दा नव्हता.गेल्या काही वर्षात काही राजकीय पक्षांनी भाषेचे राजकारण चालू केल्याने पुन्हा हा मुद्दा अधून मधून चर्चेला येतो.त्यात भर मोठ्या मराठी लेखकांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
H
hitesh Sun, 05/03/2015 - 19:15 नवीन
मेकॉलेला शिव्या घालायच्या. मग म्हणायचे इंग्रजी माध्यम नको . मराठीच घ्या. नुसते माध्यम बदलल्याने शिक्षणपद्धती बदलते का ? जे धडे मराठीत तेच त्याच यत्तेत इंग्रजीवाल्याना इंग्रजीत असतात ना ? चित्रंही तीच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
नगरीनिरंजन Sun, 05/03/2015 - 19:23 नवीन
शिक्षणपद्धती बदलायला इथे कोणाची हरकत नसावी. बळंच प्रत्येक गोष्टीत पुरोगामीपणा म्हणून लोकप्रिय मताचा अनादर करणे याला अर्थ नाही. आधुनिकता भारतीयांना कळत नाही हेच खरे. एक तर हे टोक नाही तर ते टोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
क
क्लिंटन Mon, 05/04/2015 - 10:43 नवीन
माझ्या काही मित्रांची मातृभाषा खालीलप्रमाणे आहे: आगरी, अहिराणी, वाडवळ ई.
बापरे वाडवळ म्हणून कुठली भाषा असते याचा पत्ताच नव्हता मला :)
त्यांनी त्यांचे शिक्षण त्या भाषांत घ्यावे हे उत्तमच! पण जे ज्ञान शिक्षणाने प्राप्त करायचे आहे ते ज्ञान आधि त्या भाषेत उपलब्धपसायला नको?
छे हो असले प्रश्न विचारायचे नसतात.मराठी बाणा जपता आला पाहिजे काय समजलात?
(ज्ञान मिळवणे महत्वाचे मानणारा) सोकाजी
मी पण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सुनील Mon, 05/04/2015 - 10:53 नवीन
बापरे वाडवळ म्हणून कुठली भाषा असते याचा पत्ताच नव्हता मला :)
वसई भागातील स्थानिकांच्या भाषेला वाडवळ असे नाव आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मदनबाण Sun, 05/03/2015 - 19:18 नवीन
International Mother Language Day UNESCO co-organized conference stresses importance of mother tongue language On Mother Language Day, UN spotlights role of native tongue in education Many children speak a home language that differs from the language of instruction in education programs. Research confirms that children learn best in their mother tongue as a prelude to and complement of bilingual and multilingual education.Whether children successfully retain their mother tongue while acquiring additional languages depends on several interacting factors. Studies show that six to eight years of education in a language are necessary to develop the level of literacy and verbal proficiency required for academic achievement in secondary school. To retain their mother tongue, children whose first language is not the medium of instruction must have: (1) continued interaction with their family and community in their first language on increasingly complex topics that go beyond household matters; (2) ongoing formal instruction in their first language to develop reading and writing skills; and (3) exposure to positive parental attitudes to maintaining the mother tongue, both as a marker of cultural identity and for certain instrumental purposes (e.g., success in the local economy or global trade). In addition, research increasingly shows that children‘s ability to learn a second or additional languages(e.g., a lingua franca and an international language) does not suffer when their mother tongue is the primary language of instruction throughout primary school. Fluency and literacy in the mother tongue lay a cognitive and linguistic foundation for learning additional languages. Fluency and literacy in the mother tongue lay a cognitive and linguistic foundation for learning additional languages. When children receive formal instruction in their first language throughout primary school and then gradually transition to academic learning in the second language, they learn the second language quickly. If they continue to have opportunities to develop their first language skills in secondary school, they emerge as fully bilingual (or multilingual) learners. If, however, children are forced to switch abruptly or transition too soon from learning in their mother tongue to schooling in a second language, their first language acquisition may be attenuated or even lost. Even more importantly, their self-confidence as learners and their interest in what they are learning may decline, leading to lack of motivation, school failure, and early school leaving. इति :- Mother tongue based bilingual or multilingual education in early childhood and early primary school years {पीडीएफ}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 05/03/2015 - 21:18 नवीन
जीवनात मिळणारे यश, पैसा, प्रसिद्धी ही तुम्हाला कोणती भाषा येते यावर अवलंबून आहे अशा खुळचट कल्पना मनी बाळगणारे गुलाम होते, गुलाम आहेत आणि गुलाम राहतील. जगातल्या सर्व यशस्वी लोकांकडे बघितलं तर ते सहज कळून येतं. पण 'आम्ही तुमच्या मुलाला आईन्स्टाईन बनवू' या आणि अशाच निरर्थक जाहिरातींना भुलणारे जेव्हा १५-२० वर्षानी स्वतःच्या मुलांना ना घरके ना घाटके झालेलं बघतील तेव्हा प्रचंड उशीर झालेला असेल. १५-२० वर्षांनी येणारे जग स्वयंउद्योजकांचे असेल. ज्यांना स्वत:चे डोके चालवून उत्पादने, सेवा, इत्यादी क्षेत्रात जम बसवावा लागेल. तुम्हाला इंग्रजी येतं यापेक्षा कैक पटीने तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळं येतं याला प्रचंड महत्त्व असेल. आपली लोकसंख्या हीच आपली भाकरी असेल. इथे तुमची संकल्पना मांडण्याची कल्पकता, आक्रमकता, धाडस यांची गरज असेल. त्यासाठी शिक्षणपद्धती तशी असावी लागेल. इथेच करोडपती, अब्जोपती जन्माला येतील ते इथल्या मातीत व्यवहार करूनच. तेव्हा इथल्या मातीशी नाळ तुटलेले फक्त तृतीय दर्जाची कामे करू शकतील. एका सारखे अनेक झाल्याने सुरक्षीत नोकरी हे मध्यमवर्गीय स्वप्नरंजन गळून पडेल. त्यामुळे इंग्रजीकडे पोटापाण्याची सोय करणारी माय म्हणून पाहणारांनी आधीच सावध व्हावे. येणार्‍या काळात इंग्रजीच काय तर जर्मन, फ्रेंच, जापनीज, चायनीज, अरबी अशासारख्या किमान सहा विदेशी भाषांना पर्याय राहणार नाही. येणार्‍या जगात यशस्वी व्हायचे असेल तर आता ५ वर्षे वय असलेल्या मुलांची तशी तयारी सुरु करायला लागेल. किमान वयाच्या १५ वर्षांपर्यंत मातृभाषेतून शिक्षण व नंतर इतर भाषांचा अस्खलित बोलण्याइतपत अभ्यास लागेल. मराठीला किंवा मातृभाषेला आंधळा विरोध करणार्‍यांनी जरा विचार करावा. कुणाला इंग्रजी येतं म्हणून तो प्रचंड हुशार आहे, बुद्धीमान आहे हा मुर्खचळ सोडायला हवा आता. इंग्रजी येणार्‍या एतद्देशीय लोकांना आपण इतर भारतीयांपेक्षा वेगळे आहोत असा अहंगंड असतो. इंग्रजी येतं म्हणून एखादी जटील वैज्ञानिक संकल्पना त्याला जास्त चांगली समजते असे म्हणणे हा एक विनोदच. सगळं ज्ञान इंग्रजीतच असतं हा दुसरा विनोद. जे इंग्रजीत नाही ते ज्ञान नाही का? आपण इंग्रजी नामक विहीरीत आहोत म्हणून समुद्र नाहीच असे म्हणणे केवळ अहंगंड आहे. विज्ञानाला कुठलीही भाषा नसते, ज्ञानी व्ह्यायची प्रचंड इच्छा असेल तर ज्ञानाला भाषेचे अडसर येत नाहीत. माईंनी मागच्या २०-२५ वर्षांतच मातृभाषेचे उमाळे राजकारण्यांमुळे यायला लागले आहेत असा उल्लेख केला. त्यांना माझे सांगणे असे की जगभरात मागच्या ४० वर्षात बर्‍याच घडामोडी फार वेगाने घडल्या आहेत. भारतात अजूनही शिक्षण कशाशी खातात याची पुरेशी ओळख बहुसंख्य लोकांना नाही. फक्त पोटापाण्यासाठी शिकणारे ओझी वाहणारे हमाल होऊ शकतात. महाशक्ती नाही.
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 05/04/2015 - 06:55 नवीन
आमची मेडिकलची पुस्तकं कुणी मराठीत आणली तर मी ती पुस्तके वाचुन आणखी एकदा डिग्री घ्यायला तयार आहे . इंग्रजांना इंग्रजीचा उमाळा होता ते आपल्या तालावर नाचणारे नोकर हवेत म्हणुन ... आजच्या पुढार्‍याना मराठीचा उमाळा आहे तोही याच कारणाने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
होबासराव गुरुवार, 05/07/2015 - 13:21 नवीन
कसले युनानि दवाइए का, १०/- रु ला मिळतात बस स्टँड वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सोत्रि Mon, 05/04/2015 - 05:41 नवीन
सगळं ज्ञान इंग्रजीतच असतं हा दुसरा विनोद.
बरं.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ (विनोद असल्याने हसलो)
विज्ञानाला कुठलीही भाषा नसते, ज्ञानी व्ह्यायची प्रचंड इच्छा असेल तर ज्ञानाला भाषेचे अडसर येत नाहीत.
बाब्बोय... प्रेमाला भाषा नसते हे माहितसोकाजी, पण आता ज्ञानाला पण भाषेचा अडसर नाही हे 'सत्य उमगल्याने' चक्क बोधी वृक्षाच्या झाडाखाली बसल्यासारखे वाटले. - (ज्ञान प्राप्त झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
H
hitesh Mon, 05/04/2015 - 07:00 नवीन
सर्व सत्य हे संस्कृतातच आहे. रामायण , म्हाभारत , गीता , रामरक्षा , सुभाषिते , मेघदूत , उपनिषद , देवीस्तोत्र , नवग्रह स्तोत्र इ इ इ ..... बाकी भौतिक , रसायन , मेडिकल , इंजिनियरिंग हे सर्व क्षूद्र ज्ञान आहे सोत्री ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 07:41 नवीन
हितेश भाऊ, वडाची साल पिंपळाला लावण्यात तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही. हिंदूधर्म व त्यांच्याशी संबंधीत गोष्टींचा हिणकस उल्लेख कुठल्याही धाग्यावर कुठल्याही संदर्भाशिवाय करण्याची तुमची खोड जुनीच आहे. किमान माझ्या प्रतिसादावर तरी अशा बुद्धीहिन, अक्कलशून्य, निरर्थक प्रतिक्रिया देऊ नये. तुमची हिंदूधर्माशी काही विशेष दुष्मनी असेल तर स्वतंत्र धागे काढा, काय गरळ ओकायची ती तिकडे ओका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 08:44 नवीन
१. भिंगाने सुर्यकिरणांचा वापर करून कागद पेटवता येतो, हे जगातल्या कुठल्याही लहान मुलाला कुठल्याही भाषेशिवाय शिकवता येते. २. दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप बनवता येते हेही कुठल्याही भाषेशिवाय शिकता येते. ३. साखर, मिठ पाण्यात टाकले की विरघळून जाते, पाणी अडवले की जमिनीत मुरते, उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन होते हे ही भाषेशिवाय शिकता येते. ४. वाफेच्या इंजिनाचा शोध कुठल्याही भाषेशिवाय लागलाय. ५. चाकाचाही शोध कुठल्याही भाषेशिवाय लागलाय. ६. जमिनीत बी पेरल्यावर झाड उगवतं, त्याला फळे लागतात हे कळण्यासाठी कुठल्या भाषेची आवश्यकता नाही. अजून बरेच आहेत सोकाजीराव... फक्त हे ज्ञान एकाकडून दुसर्‍याकडे जातांना भाषेची गरज लागते. भाषेची गरज माहितीच्या देवाण-घेवाणीपर्यंत मर्यादीत आहे. ज्ञान-विज्ञान हे भाषेच्या पलिकडे आहे. ते कुण्या विशिष्ट भाषेवर अवलंबून नसतं. इंग्रजांनी आपलेच ज्ञान त्यांच्या भाषेत आपल्यासमोर पेश केले की आपल्याला खात्रीशीर वाटते. सर्व शोध पाश्चात्त्यांनीच लावले असाच भारतीयांचा समज असतो. या जगात चीन, जापान आणि इतर बरेच पौर्वात्य देश, त्यांचे संशोधक यांनीही जगाच्या आधुनिकतेत भर घालणारे मोलाचे संशोधन केले आहे हे आपल्या खिजगणतीतही नसते. किंबहुना पौर्वात्यांना पाश्चात्त्यांपेक्षा कम-अस्सल मानणे हाच भारतीयांचा धर्म. इंग्रजीची गुलामगिरी बाळगणार्‍यांना कितीही घसा फोडून सांगितले तरी डोक्यात शिरणार नाही. ईंग्रजी भारतात येईपर्यंत भारतात काहीच ज्ञान नव्हते, सगळा भारत कंदमुळे खाऊन जगत होता, साहेब आल्यानेच नेटीवांना कसे जगायचे समजायला लागले वैगेरे अशीच धारणा असेल तर धन्य आहे. इंग्रजांची तरी तशीच धारणा होती. ज्ञान, विज्ञान आणि माहिती यात गल्लत करू नका. आधुनिक विज्ञान म्हणजे इंग्रजीत उपलब्ध असलेले ज्ञान असे जर तुम्हाला वाटत असेल तर बोधीवृक्षाखाली बसूनही उपयोग नाही. इंग्रजीनेच भाग्योदय होतो ही तद्दन खुळचट कल्पना आहे. याच कल्पनेमागे लागून भारतीय अजूनही मागे आहेत आणि राहतील. कारण जो दुसर्‍यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला अशी समर्थांची म्हण आहे मराठीत. पण जाऊ दे तुमच्या लेखी ते ज्ञान नाही ना... तशा अर्थाची इंग्रजी म्हण शोधून बघतो कुणा टॉम, डीक, हॅरीची, म्हणजे पटेल. बाकी इंग्रजीत ज्ञान मिळवून विज्ञानक्षेत्रात नेटीवांनी काय दिवे लावले ते कळले तर फार बरं होईल. त्यात त्यांच्या बुद्धीवापराला इंग्रजीमुळेच मोठा हातभार लागला असे काही पुरावे असतील तर तेही द्या. आणि एक, जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ख
खटासि खट Mon, 05/04/2015 - 07:50 नवीन
बरं
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/04/2015 - 08:17 नवीन
मराठीला किंवा मातृभाषेला आंधळा विरोध करणार्‍यांनी जरा विचार करावा.
मुद्दा भरकटवतो आहेस रे संदीप. विरोध मराटी वा मातृभाषेला नाही.इंग्रजीतून शि़क्षण घेणार्यांच्या मूलभूत संकल्पना चांगल्या नसतात ह्या गैरसमजाला आक्षेप. ग्रेटगणेशाच्या खालील विधानांना माझा जोरदार आ़क्षेप आहे. ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं.मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. अशी विधाने लिहायची तर पुरेसा विदा नको का? समाजात चित्र पूर्ण उलटे दिसते.बहुतांशी राजकारण्यांची मुले,सैन्य अधिकारी,त्यांची मुले,मोठे वैज्ञानिक्,त्यांची मुले,मोठे उदोय्गपती,त्यांची मुले.... बहुतांशी इंग्रजी माध्यमात शिकलेली आढळतील.
इथेच करोडपती, अब्जोपती जन्माला येतील ते इथल्या मातीत व्यवहार करूनच
सध्याच्या करोडपती,अब्जाधीशांची यादी पहा. मला खात्री आहे त्यातले बहुतांशी लोक्,त्यांची पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकलेली दिसेल. धिरूभाई इथल्या मातीतलेच. पण मुकेश्,अनिल पेडर रोडच्या इंग्रजी शाळेत शिकले आहेत.व इथल्या मातीतच व्यवहार करत आहेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 09:14 नवीन
सध्याच्या करोडपती,अब्जाधीशांची यादी पहा. मला खात्री आहे त्यातले बहुतांशी लोक्,त्यांची पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकलेली दिसेल. धिरूभाई इथल्या मातीतलेच. पण मुकेश्,अनिल पेडर रोडच्या इंग्रजी शाळेत शिकले आहेत.व इथल्या मातीतच व्यवहार करत आहेत.
खरं तर तुम्हीच त्या अब्जाधिशांची यादी जरा निरखून पाहिली आणि त्यातल्या सगळ्यांच्या शालेय शिक्षणाचा मागोवा काढला तर सत्य कळेल. नुसतंच सांगू नका अब्जाधिशांची यादी बघायला. ते इंग्रजीत शिकले म्हणून ते अब्जाधिश झाले असा तुमचा दावा असेल तर धन्य आहे. माईसाहेब, अब्जाधिशांची मुले ज्या शाळांमधे जातात त्या शाळा भाषेपेक्षा इतर आवश्यक गोष्टींवर जास्त भर देतात. व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. इंग्रजी फाडफाड बोलता येणे हा नाही. ते ज्या वातावरणात, लोकांमधे राहतात, वावरतात, धंदा करतात त्या वातावरणात इंग्रजी संपर्कभाषा आहे. धीरूभाई मातृभाषेत शिकले किंवा त्यांची मुलं इंग्रजी शिकली म्हणून ते अब्जाधीश झाले असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा. माझा मुद्दा फार सरळ आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत आत्मविश्वास वाढवणारे, एक परिपुर्ण व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षण असावे आणि ते मातृभाषेत असावे, जेणेकरून मुलांना कुठलाही न्यूनगंड वाटू नये की इतर देशबांधवांबाबत किळस वाटू नये. आताच्या गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवलेल्या इंग्रजी शाळांत आणि बॉम्बे स्कॉटीश शाळेत काहीच फरक नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा. बॉम्बे स्कॉटीशचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात भारतीयतेशी नाळ तोडणारे इंग्रजी शिक्षण देण्याचा घाट गल्लीबोळातल्या शाळांनी घातला आहे. तो फार घातक आहे एवढेच नमूद करू इच्छितो. माझा मुलगा ज्या (पुर्ण) मराठी शाळेत जातो तिथली आठवी-नववीची मुले स्वतः इंग्रजीमधे नाटक लिहून स्वत: दिग्दर्शन करून सादर करतात. इंग्रजीमधे सादर करण्याचे कारण हेच की त्यांना दाखवून द्यायचे आहे की ते इंग्रजी शाळांच्या मुलांपेक्षा इंग्रजीत कुठेच मागे नाहीत तर काकणभर पुढेच आहेत. पण त्यांच्या इंग्रजीपेक्षा नाटक स्वतः लिहिणे, स्वत: सादर करणे यात दिसत असलेला व्यक्तिमत्व विकास मला अभिप्रेत आहे. मुलं इंग्रजी शाळेत गेली की हुशार झाली असा गोड समज करून पालक फक्त स्वप्नरंजन करत आहेत हे आजुबाजुला इंग्रजी शाळेत जाणार्‍या कित्येक मुलांना पाहून सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
र
राही Mon, 05/04/2015 - 09:52 नवीन
सुबत्तेकडे नेणार्‍या कोणयाही शिडीकडे लोकांचा ओढा असतो. गेली कित्येक वर्षे इंजीनिअरिंगचे शिक्षण हे सुबत्ता देणारे ठरले होते म्हणून लोकांचा ओढा तिकडे होता. सध्या हॉटेल मॅनेजमेंट,कायदा यांमध्ये यशाची आणि आर्थिक सुबत्तेची संधी वाढते आहे. तसेच भाषेचेही आहे.ज्या भाषेमुळे स्वास्थ्य आणि ऐहिक सुखाची शक्यता वाढते,तिकडेच लोक वळतात, वळतील. सामान्य लोकांना ऐहिक सुख आणि फायदा महत्त्वाचा असतो आणि तो त्यांना व्यवस्थित कळतोही. आज मोलकरणींची,झाडूवाल्यांची मुले इंग्रजी माध्यमाकडे वळत असतील तर त्या माध्यमात नक्कीच काहीतरी ईक्वलाय्ज़र आणि अप्लिफ्टिंग असे आहे. मनाची आध्यात्मिक प्रगल्भता वगैरे गेली उडत. उलट त्यांचा आत्मविश्वास इंग्रजी माध्यमामुळे वाढतो. त्यांचे ग्रामीण मराठी बोलून जो सन्मान त्यांना मिळाला नसता, तो त्यांना तोडके मोडके पण फाड फाड(म्हणजे इतर 'आंग्लाळलेल्या' भारतीयांसारखेच)इंग्रजी बोलून मिळतो. शिवाय इंग्रजी माध्यमातून शिकल्याने भारतीय संस्कृतीशी नाळ तुटते, या म्हणण्याशी सहमत होणे कठिण आहे.'रोजमरा की जिंदगीमें'जगण्यासाठी संस्कृतीचे जितके ज्ञान अपेक्षित असते, तितके त्यांच्याजवळ असतेच. किंबहुना ते जी संस्कृती जगत असतात, तीच खरी संस्कृती असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अवतार Mon, 05/04/2015 - 16:34 नवीन
प्रचंड सहमत ! मराठी शाळा अस्तित्वातच नव्हत्या तेव्हापासून मराठी संस्कृती टिकून आहे. मराठी भाषेला अधिकृत लिपी देखील नव्हती तेव्हापासून मराठी संस्कृती टिकून आहे. संस्कृती ही लेखी भाषेवर नव्हे तर बोली भाषेवर अवलंबून असते. मराठीचा उदो उदो करणाऱ्यांनी बोली भाषेतल्या मराठीत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी. मराठी शाळांमध्ये कोणतेही संस्कृत स्तोत्र शिकविले जाऊ नये ह्याची काळजी घ्यावी. इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द शोधतांना संस्कृतचा आधार घेणे बंद करावे. मराठी भाषेचा एवढाच अभिमान असेल तर संस्कृतकडून उधार घेतलेली देवनागरी लिपी बदलून मराठी भाषेसाठी स्वतंत्र लिपी निर्माण करावी. मराठी भाषेवर जर इंग्रजीचे अतिक्रमण सहन होत नसेल तर संस्कृतचेही अतिक्रमण सहन करू नये. हे सर्व करणे शक्य नसेल तर मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे मुद्दे परस्परपूरक आहेत हे मान्य करण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
H
hitesh Mon, 05/04/2015 - 19:23 नवीन
तर मला लोक पाकडा / बाटगा / हिंदुद्व्ष्टा बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
प
प्रमोद देर्देकर Tue, 05/05/2015 - 11:54 नवीन
राही यांना +११११११ अतिशय समतोल, वास्तववादी चांगला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा