Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: नितीश कुमारांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 09/10/2015 - 19:51
🗣 124 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, कालच बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल आणि मतमोजणी ८ नोव्हेंबरला होईल.नेहमीप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवसभर मिपावर ऑनलाईन असणारच आहे.दरम्यानच्या काळात वेळ मिळेल त्याप्रमाणे बिहार निवडणुकांवर मिपावर लिहिणारच आहे. या निवडणुकांसाठी दोन आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.पहिली आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस पक्ष यांची तर दुसरी आघाडी भाजप, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा भारतीय आवाम पक्ष तर उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष यांची आहे. या पहिल्या लेखामध्ये नितीश कुमार यांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने यांची चर्चा करणार आहे. नितीश कुमार आघाडीची बलस्थाने १. माझ्या मते नितीश कुमारांच्या आघाडीचे सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमारांसारखा चेहरा असणे हेच आहे.नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द नक्कीच चांगली राहिली आहे.विशेषत: लालू-राबडींनी त्यापूर्वी १५ वर्षे जो धुमाकूळ घातला होता त्यापासून नितीश कुमारांच्या राजवटीत बिहारची नक्कीच मुक्तता झाली. आजही नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच लोकप्रिय आहेत. त्यांच्या तोडीचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार भाजप आघाडीकडे नाही. बिहारची २००५ नंतर प्रगती झाली त्याचे श्रेय नितीश कुमार नक्कीच घेऊ शकतात. २. कागदावर नितीश कुमारांची आघाडी ही भाजप आघाडीपेक्षा अधिक शक्तीशाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दल (संयुक्त) + राष्ट्रीय जनता दल + कॉंग्रेस आघाडीला ४५.१% मते तर भाजपप्रणित एन.डी.ए ला ३९.५% मते होती. पण नितीश कुमारांनी काही अत्यंत गंभीर चुका केल्या त्या त्यांना महागात पडतील असे मला वाटते. त्या पुढीलप्रमाणे: १. २०११ च्या सुरवातीपासून युपीए सरकार संकटात सापडल्यावर आणि भाजपकडेही केंद्रीय पातळीवर नेतृत्वासाठी सर्वमान्य चेहरा नव्हता. अशा वेळेस तिसऱ्या आघाडीचे सरकार येऊन कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन १९९६-९८ ची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचे चित्र उभे राहत होते.त्याचवेळी भाजपमध्ये नरेंद्र मोदींच्या नावालाही अंतर्गत विरोध होत होताच.अशा वेळी एन.डी.ए आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करेल अशी कदाचित नितीश कुमारांची अपेक्षा असावी.पण डिसेंबर २०१२ मध्ये गुजरातमध्ये तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींचे नाव अधिक प्रमाणात पुढे येऊ लागल्यानंतर आपले नाव जाहीर होणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले.त्याचवेळी भविष्यात तिसऱ्या आघाडीचे सरकार आल्यास आपला दावा प्रबळ असावा आणि असा दावा ठेवण्यासाठी अर्थातच २०१४ च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या साथीने लढविणे अडचणीचे ठरेल हे लक्षात घेऊन नितीश कुमारांनी जून २०१३ मध्ये भाजपशी १७ वर्षे जुनी युती तोडली. देशात २०१३ च्या उत्तरार्धापासून नरेंद्र मोदींची लाट आलीच होती. नेमक्या त्याचवेळी भाजपशी युती तोडणे ही त्यांची घोडचुक ठरली.बदलती परिस्थिती लक्षात घेऊन रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांनी भाजपशी जमवून घेतले.त्याचा परिणाम म्हणून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल (संयुक्त) चा धुव्वा उडाला. जून २०१३ मध्ये भाजपशी युती तोडणे राज्य विधानसभा निवडणुकांसाठी नितीश कुमारांना कदाचित इतके महागात पडले नसते. कारण यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आपल्या पूर्वेतिहासाच्या जोरावर लोकांकडे मते मागूच शकले असते. पण त्यानंतर त्यांनी जी चूक केली त्यातून त्यांचा पाय आणखीच खोलात गेला. २. लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर पराभवाची ’नैतिक जबाबदारी’ घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जीतनराम मांझींना मुख्यमंत्री बनविले.दरम्यानच्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल आणि त्याचवेळी मांझींसारखा फारशी महत्वाकांक्षा नसलेला मुख्यमंत्री बरा होईल असे गणित होते.असे गणित आखायचे आणि मग ते फसायचा इतिहास बराच जुना आहे. इंदिरा गांधींनाही नंतर कधीही कठपुतलीसारखे फिरवता येईल म्हणून १९६६ मध्ये सिंडिकेटने पंतप्रधान केले. केंद्रात राहून सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याच्या आड महाराष्ट्रावर लक्ष ठेवता येईल म्हणून शरद पवारांनी नाईकांना मुख्यमंत्री केले. पण ही दोन्ही गणिते फसली तसेच नितीश कुमारांचेही मांझींना मुख्यमंत्री करायचे गणित फसले. मांझी हे त्यापूर्वी फारशी महत्वाकांक्षा असलेले नेते नव्हते.पण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी नितीश कुमारांना दाद लागू दिली नाही आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून द्यायला सुरवात केली.त्यातच त्यांची भाजपशी सलगी वाढली आणि केसरीनाथ त्रिपाठींसारखा मुळातला भाजप नेता बिहारच्या राज्यपालपदी होता.या सगळयांनी मिळून नितीश कुमारांना जवळपास महिनाभर टोलवत ठेवले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर परतू दिले नाही. हे थोडेच झाले म्हणून की काय जीतनराम मांझी हे ’मुसहार’ या ’महादलित’ समाजातले. त्यांना अशाप्रकारे मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात मांझी यशस्वीही झाले. हाच महादलित समाज २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला होता.म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी परिस्थिती नितीश कुमारांची यामुळे झाली.पण मांझींना मुख्यमंत्री करून आपल्याच साठी खड्डा त्यांनी खणून ठेवला असे चित्र सध्या तरी नक्कीच आहे. ३. या दोन चुका कमीच झाल्या म्हणून की काय तर नितीश कुमारांनी लालूप्रसाद यादवांशी हातमिळवणी केली. २००५ आणि २०१० मध्ये लालूप्रसादांच्या ’जंगल राज’ च्या विरोधात रान उठवून नितीश कुमारांनी सत्ता हस्तगत केली.आता त्याच लालूप्रसादांबरोबर हातमिळवणी केल्यामुळे नितीश कुमारांसाठी पुढील धोके संबवतात-- अ. एका बाजूने मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि केलेली विकासकामे हे मुद्दे घेऊन लोकांपुढे मते मागायची त्याचवेळी लालूंच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करणे या दोन गोष्टी नक्कीच परस्परविरोधी आहेत.इतकी वर्षे ज्या जंगल राज साठी तुम्ही लालूंना टिकेचे लक्ष्य बनविलेत त्याच लालूंबरोबर परत हातमिळवणी कशी हा अडचणीचा प्रश्न त्यांची पाठ सोडणार नाहीच. यातून नितीश कुमारांना अन्यथा विकासासाठी मते ज्या मतदारांनी दिली असती ती त्यांच्याविरोधात जायची शक्यता नक्कीच आहे. ब. कितीही काहीही म्हटले तरी बिहारमध्ये निवडणुकांसाठी जात हा काही प्रमाणात तरी महत्वाचा मुद्दा असतोच. लालूंच्या राज्यातील ’यादवीचा’ दलित आणि महादलित समाजातील अनेक जातींना त्रास होत होता आणि त्यापासून सुटका मिळावी म्हणून या समाजातील मतदारांनी पूर्वी नितीश कुमारांना मते दिली होती.त्याच लालूंशी हातमिळवणी करून ही सगळी मते आपल्यापासून दूर जातील ही तजवीज नितीश कुमारांनी करून ठेवली आहे असे मला वाटते. क. नितीश आणि लालू १९९४ पासून एकमेकांचे राजकीय वैरी होते.त्यामुळे गाव पातळीवर जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात कितपत समन्वय आहे ही शंकाच आहे. शेवटी निवडणुकांसाठी केवळ उच्च पातळीवर युती होऊन चालत नाही.जर ती युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाली नाही तर ती युती एक लाएबिलीटी होईल असे मला वाटते. ड. त्यातच ’मी हलाहल प्यायला पण तयार होईन’, ’चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी सापातले विष चंदनाच्या झाडात जात नाही’ अशा पध्दतीची वक्तव्ये नेत्यांकडून आली आहेत. यामधून नक्कीच प्रश्न उभा राहू शकतो की ही युती नक्की टिकणाऱ्यातली आहे का? भाजप आघाडीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि इतर त्यामानाने लहान पक्ष आहेत. पण नितीश कुमारांच्या आघाडीत त्यांचा आणि लालूंचा पक्ष दोन्ही बऱ्यापैकी तुल्यबळच आहेत.त्यामुळे कोणालाही माघार घेणे त्यामानाने कठिणच जाईल असे दिसते. इ. २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पक्षाने १४० जागी निवडणुक लढवली होती.तसेच लालूंच्या पक्षाने १७५ जागी निवडणुक लढवली होती. यावेळी त्यांच्या वाट्याला १०० जागाच आल्या आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका संभवतो. नितीश कुमार या चुकांमुळे बॅकफूटवर जातील असे मला वाटते. प्रत्यक्षात काय होईल, भाजप आघाडीमध्ये काय चित्र आहे, प्रत्यक्ष मतदानापर्यंत परिस्थिती कशी बदलते हे बघणे रोचक ठरेल.३० ऑगस्टला पाटण्यातील गांधी मैदानावरील सभेला फारशी गर्दी झाली नव्हती आणि लोकांना आकृष्ट करायला नृत्याचे कार्यक्रम ठेवले होते अशा बातम्या आल्या आहेत.ही या ’महागठबंधन’ साठी फारशी उत्साहवर्धक बातमी नाही.त्या सभेनंतर या ’महागठबंधन’ मधून समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडले.या पक्षांची बिहारमध्ये फार ताकद आहे अशातला भाग नाही.पण हे ’महागठबंधन’ कितपत स्थिर राहणार हा प्रश्न नक्कीच उभा केला जाऊ शकेल अशा या घटना आहेत. हा लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहाविशी वाटते.खरं तर हा मुद्दा मी कमकुवत स्थानांमध्ये पहिल्यांदा ३ (फ) म्हणून लिहिणार होतो.पण हा मुद्दा वेगळा लिहित आहे. गोष्ट आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांनी लिहिलेली. ते १९९० मध्ये लालू पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर बिहारमध्ये गेले होते तेव्हा जातीपातीच्या उतरंडीतील तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये सीटवर बसून प्रवास करायला मिळणे हीच मोठी अप्रूप गोष्ट होती.त्यावेळी लालू म्हणाले होते--"मै आपको स्वर्ग तो नही दे सकता लेकीन स्वर तो जरूर दुंगा". ते त्या काळात चालून गेले. पुढे कुबेर २०१४ मध्ये बिहारला गेले असताना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये मांडीला मांडी लावून बसता येणे ही तर गृहित धरायची गोष्ट झाली होती--त्याचे अप्रूप वाटायचे दिवस बरेच मागे पडले होते.आता लोकांच्या महत्वाकांक्षा होत्या--चांगला नोकरी-व्यवसाय, चांगले शिक्षण, राहायला चांगले घर इत्यादी. तेव्हा या बदललेल्या महत्वाकांक्षेच्या काळात लालूंचे जुनाट मुद्दे लोकांना पूर्वी इतके प्रभावित करू शकतील अशी परिस्थिती राहिली नाही. पूर्वी यादव मतदार एकगठ्ठा लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदान करत असे. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यादव समाजातीलही काही प्रमाणात मते भाजपला विकासाच्या मुद्द्यावरून गेली होती अशा बातम्या आहेत. एकूणच काय की एकदा एखादी गोष्ट मिळाली की त्या गोष्टीचे अप्रूप वाटेनासे होते आणि त्यापेक्षा मोठ्या गोष्टी हव्याशा वाटायला लागतात. त्यामुळे त्या अर्थी ’अच्छे दिन’ आले असे फारच थोडे लोक म्हणू शकतात.बहुतांश लोकांसाठी ’अच्छे दिन’ म्हणजे मृगजळासारखी दूर पळणारी संकल्पना ठरते. मोदी आणि भाजपने २०१९ पर्यंत या महत्वाचा गोष्टीचा विसर पडू न देणे हे श्रेयस्कर. असो. यापुढच्या लेखात भाजप आघाडीविषयी भाष्य करेन.
  • बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
  • बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: मतमोजणीपूर्व धागा
  • बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: नितीश कुमारांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने

  • बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके ›
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
51546 वाचन

💬 प्रतिसाद (124)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/02/2015 - 14:45 नवीन
बिहार पॅकेजचा आकडा १,२५,००० (एक लाख पचविस हजार किंवा सव्वा लाख) कोटी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/02/2015 - 14:48 नवीन
हा आकडा बिहारच्या २०१५ च्या जीएसडीपीच्या ३१% आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
C
chetanlakhs Sat, 10/03/2015 - 03:56 नवीन
काही दिवसांपूर्वी अचानक एका बिहारी मित्राच्या fb वरील पोस्ट्स आणि त्याच्या बिहारी मित्रांची मते वाचनात आली..थोडक्यात सांगायचे तर साधारणतः नितीश-लालू जोडी काही त्याना पटलेली नाही..लालू नसता तर नितीश ला तोड़ न्हवती..लालू मुळे ही पोर मोदींच्या बाजूने सरकली आहेत..
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/03/2015 - 07:07 नवीन
लालूंशी केलेली हातमिळवणी केल्याचा नितीश कुमारांना भविष्यात पश्चात्ताप होवो ही सदिच्छा. कर्नाटकमधील मतदार खूप चोखंदळपणे मते देतात हे यापूर्वी सिध्द झाले आहे. १९९९ मध्ये रामकृष्ण हेगडेंच्या आग्रहाखातर भाजपने जे.एच.पटेल यांच्या जनता दल गटाशी हातमिळवणी करून निवडणुका लढविल्या. १९९४ ते जुलै १९९९ या काळात भाजपने पहिल्यांदा देवेगौडा आणि नंतर जे.एच.पटेल मुख्यमंत्री असताना दोघांनाही कडाडून विरोध केला होता.पण शेवटच्या तीन महिन्यात त्याच जे.एच.पटेलांबरोबर भाजपने हातमिळवणी केलेली मतदारांना आवडली नाही.त्यामुळे जे.एच.पटेलांविरूध्दची अ‍ॅन्टी इन्कबन्सी मते काँग्रेसला जाऊन राज्यात काँग्रेसचा विजय झाला. विजयश्रीच्या जबड्यातून पराभव कसा खेचून आणायचा याचे हे अगदी मूर्तीमंत उदाहरण होते. असाच चोखंदळपणा बिहारमधल्या मतदारांनीही दाखवावा ही अपेक्षा.नितीश कुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले याचे एक महत्वाचे कारण म्हणजे लालूंच्या राज्यात सर्वत्र यादवांची चलती होती आणि नितीश कुमारांच्या कुर्मी समाजाला डावलले जात होते. तेव्हापासून नितीश कुमारांनी लालूंना कायम विरोधच केला होता. २००५ आणि २०१० च्या निवडणुका लालूंच्या जंगलराजच्या विरोधात त्यांनी लढविल्या होत्या.तेव्हा तसाच चोखंदळपणा दाखवायला बिहार-२०१५ ही अगदी फिट केस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chetanlakhs
अ
अनुप ढेरे Sat, 10/03/2015 - 07:35 नवीन
भाजपावर गुंडांना तिकिटं देण्याचे आरोप होत आहेत. भाजपाही जंगलराजच्या वाटेवर आहे असाही ग्रह मतदारांना होउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/03/2015 - 08:39 नवीन
भाजपावर गुंडांना तिकिटं देण्याचे आरोप होत आहेत. भाजपाही जंगलराजच्या वाटेवर आहे असाही ग्रह मतदारांना होउ शकतो.
अर्थातच. बिहारमध्ये एकही पक्ष असा नाही की ज्याने कधीच बाहुबलींना तिकिटे दिलेली नाहीत. नितीश कुमार २००० साली औटघटकेचे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांना अविभाजित बिहार विधानसभेत ३२४ पैकी १२४ सदस्यांचा पाठिंबा होता.विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यापूर्वी आपला पराभव होणार हे लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिला होता.त्या विश्वासदर्शक ठरावावर आपल्या बाजूने मतदान करावे म्हणून तुरूंगातून निवडणुक लढवून जिंकलेल्या एका आमदाराला भेटायला ते तुरूंगात गेले होते असेही वाचल्याचे आठवते. तेव्हा बिहारमध्ये निवडणुक म्हटले की बाहुबली दुर्दैवाने येणारच. फक्त राजद आणि भाजपमध्ये फरक इतका की बिहार भाजपकडे सुशीलकुमार मोदी, अश्वनी चौबे, शाहनवाझ हुसेन ही चांगली मंडळी आहेत. राजदमध्ये त्यातल्या त्यात बरा माणूस म्हणजे रघुवंशप्रसाद सिंग. पण अर्थातच लालूंपुढे त्यांचे फारसे चालत नाही. देवेन्द्रकुमार यादव हा एक दुसरा बरा माणूस होता पण लालूंशी त्यांचे मतभेद झाले आणि आता त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या तिसर्‍या आघाडीबरोबर निवडणुक लढवत आहे.तेव्हा राजदकडे सगळीच वानवा आहे.तेव्हा लोकांनी या गोष्टीचा विचार करावा ही अपेक्षा. अर्थातच लालू १५ वर्षे सत्तेत असताना किती माजले होते आणि सत्तेचा कसा दर्प त्यांच्यात होता आणि बिहारची त्यांनी कशी वाट लावली या सगळ्या गोष्टींकडे सोयीस्करपणे कानाडोळा करून बीजेपीवाले माजलेत म्हणून त्यापेक्षा १०० पटींनी माजलेले लालू निवडून यावे अशी अपेक्षा/इच्छा असलेले लोक अगदी मिपावरही आहेत.तेव्हा बिहारमध्ये तसले लोक असणारच. अशा लोकांनी लालूंना दिलेली मते इतरांनी एन.डी.ए ला दिलेल्या मतांपेक्षा जास्त असतील तर लालू निवडून येतीलही. तसे झाल्यास "तुम्ही आणि तुमचे नशीब. काय हवा तो गोंधळ घाला आणि खड्ड्यात जा" यापेक्षा जास्त बिहारच्या लोकांना काहीच म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sat, 10/03/2015 - 09:14 नवीन
ज्यांना जंगलराजची भीती आहे ते लोक निकु लालूंवर किती अंकुश ठेऊ शकतात याचा नक्कीच विचार करतील. २०१४ मध्ये जसं मोदी हिंदूत्ववादी लोकांच्या कारनाम्यांवर किती कंट्रोल ठेऊ शकतात याचा देखील भाजपाला नव्यानेच मत देणार्‍या लोकांनी विचार केला असेल तसं. मोदींना गुजरातमध्ये वि.हिं.प आणि संघाशी पंगा घेतल्याचा अशा मतदारांना आकार्षित करण्यात फायदा झाला (अशी माझी अटकळ आहे मर्यादित लोकांच्या सँपलवर) तसा निकूंना होइल का नाही हे नाही माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
द
दत्ता जोशी Sat, 10/03/2015 - 09:03 नवीन
"बिहारमध्ये एकही पक्ष असा नाही की ज्याने कधीच बाहुबलींना तिकिटे दिलेली नाहीत." हो त्यामुळेच भाजपा ने गुंडांना तिकिटे देणे समर्थनीयच आहे. अर्थात, हे एक भाजपचे बलस्थानच असू शकेल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/03/2015 - 09:16 नवीन
हो त्यामुळेच भाजपा ने गुंडांना तिकिटे देणे समर्थनीयच आहे.
या गोष्टीला मी समर्थनीय नक्कीच म्हणणार नाही. पण मत देताना सरकार बनल्यास कोणाचा शब्द चालणार---बाहुबलींचा की चांगल्या माणसांचा याचा विचार लोकांनी नक्कीच करावा ही अपेक्षा. भाजपचे सरकार बनल्यास सुशीलकुमार मोदी किंवा चौबे किंवा शाहनवाझ हुसेन-- जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांना या बाहुबलींच्या किती तालावर नाचावे लागेल आणि समजा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर त्यांना किती नाचावे लागेल ही तुलना तरी निदान व्हावी. सगळा राजदच जर बाहुबलींचा पक्ष असेल तर नितीश कुमार स्वतः चांगले असून किती फरक पडेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
ब
बोका-ए-आझम Sat, 10/03/2015 - 20:48 नवीन
मग ते जगातल्या कुठल्याही लोकशाही देशातलं असो, निवडणूक जिंकण्याची क्षमता या गोष्टीला महत्व असतंच. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैराँ यांच्याविरूद्ध जेव्हा काहीजणांनी जवाहरलाल नेहरुंकडे तक्रार केली, तेव्हा नेहरूंनी ' पण ते निवडणूक जिंकतात ' या शब्दांत कैराँ यांचं समर्थन आणि एकप्रकारे त्यांच्यासारख्या लोकांची राजकारणात असलेली अपरिहार्यता आणि सर्व राजकीय पक्षांची हतबलता यावर भाष्य केलं होतं. तो काळ आदर्शवाद जरातरी जिवंत असल्याचा काळ होता. नंतर इंदिरा गांधींच्या काळात त्यांना येनकेनप्रकारेण विरोधकांना - पक्षातल्या आणि बाहेरच्या - निष्प्रभ करायचं होतं. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती राजकारणात शिरली आणि त्यावेळचा सर्वोच्च पदावरचा पक्षच हे उघडपणे करत होता त्यामुळे त्याला राजमान्यताही मिळाली. पुढे मंडल आयोगाच्या राजकारणात काँग्रेसविरोधी पकड उप्र आणि बिहार या राज्यांवरुन निसटली आणि तिथे बाहुबली आणि प्रादेशिक नेत्यांचा उदय झाला. त्यामुळे ही व्यवस्था किडण्याची सुरूवात ही १३० वर्षे जुन्या ( असं ते म्हणतात ) ग्रँड ओल्ड पार्टीने केलेली आहे. बाकीचे निव्वळ अपरिहार्यतेतून त्याला पुढे नेत आहेत. मतदारांनी अशा लोकांना नाकारणे आणि राजकीय पक्षांनी क्षणिक राजकीय फायद्यांकडे (जसं नितीशकुमार यांनी केलं तसं) न बघता विकास या मुद्दयावर लढणे हा एकमेव उपाय आहे. पण ते बिहारसारख्या जात या गोष्टीला सर्वस्व मानणा-या प्रदेशात कधी सुरू होईल ते कुणास ठाऊक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
नांदेडीअन Sat, 10/03/2015 - 13:19 नवीन
पहले स्कूटी अब मुफ़्त पेट्रोल का वादा http://www.bbc.com/hindi/india/2015/10/151003_bjp_promises_free_petrol_dil
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/03/2015 - 16:37 नवीन
फुकट पाणी, फुकट वायफाय, २५ नवीन महाविद्यालये, १५ लाख सीसीटीव्ही, निम्म्या खर्चात वीज, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना १५ लाख रूपयांचे बिनव्याजी कर्ज ... इ. फुकटी आश्वासने देऊन निवडणुक जिंकता येते हे सिद्ध झाल्यामुळे आता भविष्यात अशीच आश्वासने मिळणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
समीर_happy go lucky Sat, 10/03/2015 - 15:15 नवीन
अभ्यासपूर्ण लेख,आवडला
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sat, 10/03/2015 - 16:39 नवीन
मोदी हे २० निवडणूक सभा बिहार मध्ये घेणार असल्याची बातमी आहे. त्यांच्या सभांना खूप गर्दी असते.या सभांचा मतांच्या टक्केवारी वर किती परिणाम होईल याचा अंदाज कोणी करेल का ? आत्ता पर्यंतचे सर्व सर्वे या आधीचे आहेत
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 10/04/2015 - 15:07 नवीन
या लेखात लिहायचा एक राहिलेला मुद्दा आता लिहितो. कॉंग्रेसला २४३ पैकी ४१ जागा मिळाल्या आहेत. इतक्या जागा कॉंग्रेसला मिळणे जरा अतर्क्यच वाटते. कॉंग्रेसचा आलेख बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उतरता राहिला आहे. राष्ट्रीय जनता दलाशी युती करून २००५ मध्ये ५१ जागा लढवून ९ तर २०१० मध्ये सगळ्या २४३ जागा स्वबळावर लढवून अवघ्या ४ जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. अशावेळी ४१ जागा लढवायला मिळणे ही तशी लॉटरीच लागली असे म्हणायला हवे. या ४१ पैकी केवळ १० जागांवरच कॉंग्रेसने २०१० मध्ये २०% पेक्षा जास्त मते मिळवली होती. आणखी १६ जागांवर १० ते २०% मते मिळवली होती तर १५ जागांवर १०% पेक्षा कमी मते मिळवली होती.त्यापैकी २ जागांवर तर २% पेक्षाही कमी मते कॉंग्रेसला मिळाली होती.म्हणजे या ४१ जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत त्या जागांपैकी किती ठिकाणी पक्षाची म्हणावी अशी ताकद आहे? काही जागा कॉंग्रेसला नक्की कोणत्या आधारावर दिल्या गेल्या आहेत हे समजत नाही. उदाहरणार्थ तरारी मतदारसंघात मागच्या वेळी जनता दल (संयुक्त) ला ४८ हजार, राजदला ३४ हजार तर कॉंग्रेसला अवघी १४०० मते होती तरी त्या जागेवर यावेळी उमेदवार आहे कॉंग्रेसचा. या कॉंग्रेसच्या उमेदवारासाठी जनता दल (संयुक्त) आणि राजदचे कार्यकर्ते का काम करतील? लालूंनी नितीश कुमारांना सॅबोटेज करावे म्हणून जागा कॉंग्रेसच्या पदरात घातल्या असे म्हणावे तर काही ठिकाणी (उदाहरणार्थ बांकीपूर) मागच्या वेळी राजदला कॉंग्रेसपेक्षा जवळपास तिप्पट मते असूनही त्या जागेवर यावेळी कॉंग्रेसचा उमेदवार आहे!! अशा काही जागा महागठबंधनने एन.डी.ए साठी बाय म्हणून दिल्या आहेत का?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 10/04/2015 - 15:11 नवीन
हा लेख लिहिल्यापासून गेल्या १५-२० दिवसात काही घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे नितीश कुमार आणखी थोडेसे बॅकफुटवर गेले आहेत असे मला वाटते. सर्वप्रथम नितीश कुमारांच्या आघाडीचा प्रचार हा एकत्र होत आहे असे चित्र नाही. ३० ऑगस्टला लालू-नितीश-सोनिया यांची एकत्र सभा पाटण्यातील गांधी मैदानात झाली.त्यानंतर तीनही पक्षांचे नेते एका व्यासपीठावर अजून तरी आलेले नाहीत. राहुल गांधींची सभा पश्चिम चंपारण जिल्ह्यात झाली.या भागात मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे. असे असताना अगदी सुरवातीला राहुल गांधींची सभा तिथे ठेवायचे प्रयोजन समजले नाही.गांधीजींच्या सत्याग्रहाची भारतात सुरवात तिथून झाली म्हणून सभा तिथे ठेवावी असे म्हणावे तर त्याच सभेत गांधीजी या भागात दोन वर्षे राहिले होते असे १४ महिन्यांनी बिहारमध्ये अवतीर्ण झालेले आणि २३ मिनिटांची सभा संपवून परत गेलेले राहुल गांधी म्हणाले!! या सभेला लालू आले नव्हते की नितीशही नव्हते. प्रचारांमध्ये नितीश मुख्यमंत्रीपदावरून केलेल्या विकासकामांवर भर देत आहेत तर लालू उघडउघड जातीय प्रचार करत आहेत. एकूणच प्रचार एका दिशेने आणि एकत्र होत आहे असे चित्र नाही. असे चित्र उभे राहणे महागठबंधनसाठी नक्कीच चांगले नाही.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 10/04/2015 - 15:22 नवीन
त्यांनी राजद आणि लालू यांच्याविषयी एक चकार शब्दही न काढता नितीश कुमारांना परत मुख्यमंत्री बनवण्याचं आवाहन बिहारच्या मतदारांना केलंय. जर पक्षश्रेष्ठी असं वागत असतील तर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसणं हे अगदी स्वाभाविक म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 10/04/2015 - 17:32 नवीन
गेल्या ३ निवडणुकात (२०१० विधानसभा आणि २००९ व २०१४ लोकसभा) बिहारी जनतेने सातत्याने राजद व कॉंग्रेसला नाकारले आहे. या दोन पक्षांबरोबर जे जे पक्ष होते त्यांनाही जनतेने नाकारले. २००९ मध्ये राजद+लोजप, २०१० मध्ये पुन्हा एकदा राजद+लोजप आणि २०१४ मध्ये राजद+कॉन्ग्रेस अशी समीकरणे जनतेने नाकारली. याउलट या तीनही निवडणुकात भाजप व भाजप बरोबर असलेल्या पक्षांना जनतेने स्वीकारले. २००९ मध्ये भाजप+संजद, २०१० मध्ये पुन्हा एकदा भाजप+संजद आणि २०१४ मध्ये भाजप्+लोजप्+इतर २ पक्ष (नावे विसरलो) यांना जनतेने स्वीकारले. याचा अर्थ उघड आहे. तरीसुद्धा संजदने राजद व काँग्रेसबरोबर युती करून पुन्हा एकदा घोडचूक केली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 10/07/2015 - 11:25 नवीन
Ye dil maange more! Nitish, a prisoner of his developmental initiatives?-http://m.ibnlive.com/news/politics/ye-dil-maange-more-nitish-a-prisoner-of-his-developmental-initiatives-1145621.html
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 10/07/2015 - 13:40 नवीन
खालील वृत्तानुसार --- मतदानपूर्व चाचणीत रालोआची आघाडी ‘लोकनीती’ने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’साठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मतदानपूर्व चाचणी आयोजित केली होती भाजप आघाडीला महाआघाडीपेक्षा चार टक्के मताधिक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असतानाच आणि पहिल्या टप्प्यातील मतदानाला अद्याप एक आठवडा राहिलेला असतानाच करण्यात आलेल्या जनमत चाचणीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपेक्षा झुकते माप देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ‘लोकनीती’ने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’साठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मतदानपूर्व चाचणी आयोजित केली होती त्यानुसार भाजप आघाडीला महाआघाडीपेक्षा चार टक्के मताधिक्य अधिक मिळणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात मतदान घेण्यात आले असते, तर एनडीएला ४२ टक्के तर महाआघाडीला ३८ टक्के मते मिळाली असती, असे आमच्या पाहणीतून सूचित होत असल्याचे लोकनीतीचे म्हणणे आहे. डावे पक्ष आणि बसपा हे त्यापेक्षाही खालच्या स्तरावर असल्याचे म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षही कोणता विशेष प्रभाव पाडू शकणार नसला तरी प्रचारामुळे त्या पक्षाला मुस्लीम मतांची काही प्रमाणात बेगमी करता येईल, असेही लोकनीतीने म्हटले आहे. या निवडणुकीतील दोन महाआघाडय़ांना मिळणारा पाठिंबाही सुस्पष्ट आहे. एनडीएला उच्चवर्णीय, निम्नवर्गीय अन्य मागासवर्गीय आणि दलितांचा मुख्यत्वे पासवान समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर महाआघाडीला यादव, कुर्मी-कोएरिस आणि मुस्लीम यांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. शहरी भागांत एनडीए महाआघाडीपेक्षा अधिक मते मिळविणार असून ग्रामीण भागांत हेच चित्र उलटे असणार आहे. एनडीएने महाआघाडीपेक्षा अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये चांगली म्हणजेच ३२ वरून ५५ टक्के आघाडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर यादव, कुर्मी आणि कोएरिस या वर्गातील प्रत्येक १० मतदारांपैकी दोन मतदार एनडीएचे समर्थक आहेत. त्यामुळे महाआघाडीला स्वमतांपैकी मर्यादित पाठिंबा मिळणार आहे. महाआघाडीला ५२ टक्के मुस्लिमांचा पाठिंबा असल्याचे मतदानपूर्व चाचणीत आढळले आहे आणि ३९ टक्के मुस्लीम या दोन आघाडय़ांपेक्षा वेगळा पर्याय निवडत आहेत. मतदान टप्प्यांमध्ये होणार असल्याने एका ठिकाणी झालेल्या मतदानानंतर दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या मतदानावर त्याचा राजकीय परिणाम होणार आहे. एखाद्या प्रांताने विशिष्ट आघाडीला मतदान केल्याचे आढळल्यास त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. जागांचा अंदाज दिलेला नाही. ____________________________________________________________________________________ http://www.loksatta.com/deshvidesh-news/election-survey-results-not-favor-to-bjp-1147884/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 10/07/2015 - 19:56 नवीन
एबीपी न्यूज - नेल्सन च्या १५ सप्टेंबरच्या मतदानपूर्व चाचणीनुसार खालील अंदाज होता. एनडीए: ११८ जागा (३९% मते) महागटबंधनः १२२ जागा (४३% मते) _________________________________________________________________ आज जाहीर झालेल्या ताज्या मतदानपूर्व चाचणीनुसार खालील परिस्थिती असेल. (http://www.abplive.in/india/2015/10/07/article734139.ece/ABP-News-Nielsen-Final-Opinion-poll-Modis-magic-continues-NDA-likely-to-get-majority-in-Bihar) एनडीए: १२८ जागा महागटबंधनः ११२ जागा विभागवार अंदाज - तिरहूत क्षेत्र एनडीए: ५५ जागा महागटबंधनः १७ जागा मगध क्षेत्र एनडीए: २२ जागा महागटबंधनः ३९ जागा मिथिला क्षेत्र एनडीए: २५ जागा महागटबंधनः १७ जागा पूर्व बिहार एनडीए: १० जागा महागटबंधनः ३१ जागा भोजपूर क्षेत्र एनडीए: १६ जागा महागटबंधनः ८ जागा पूर्व बिहार आणि मगध या दोन विभागात एनडीए बर्‍याच प्रमाणात मागे आहे असं दिसतंय. तिरहूत क्षेत्रात एनडीए खूपच पुढे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/08/2015 - 14:20 नवीन
एन.डी.ए ला महागठबंधनपेक्षा ४% जास्त मते आणि केवळ चारच जास्त जागा हे पटत नाही. बिहारमध्ये निवडणुक दोन मुख्य आघाड्यांमध्ये आहे आणि इतर पक्ष (तिसरी आघाडी आणि ओवेसी वगैरे) यांचा प्रभाव फार नाही. या परिस्थितीत आणि राजस्थानातल्या किंवा हिमाचल प्रदेशातल्या परिस्थितीत बरेच साम्य आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर २००३ मध्ये भाजपला ३९.२% आणि कॉंग्रेसला ३५.६% मते होती (३.६% चा फरक). तर जागा होत्या भाजपला १२० आणि कॉंग्रेसला ५६. तर हिमाचल प्रदेशात २००७ मध्ये भाजपला ४३.८% आणि कॉंग्रेसला ३८.९% (जवळपास ५% चा फरक) मते होती तर जागा होत्या अनुक्रमे ४१ आणि २३ (६८ पैकी). तसेच हिमाचल प्रदेशात २०१२ मध्ये कॉंग्रेसला ४२.८% मते तर भाजपला ३८.५% मते (४.३% चा फरक) तर जागा होत्या अनुक्रमे ३६ आणि २६. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे प्रामुख्याने दुरंगी लढतीत पहिल्या दोन पक्षांमध्ये ४% मतांचा फरक असेल तर आघाडीवरील पक्षाला जवळपास ६०% जागा मिळतात. तेव्हा अशी परिस्थिती बिहारमध्ये आल्यास पुढे असलेल्या आघाडीला (एन.डी.ए किंवा महागठबंधन) १४५ च्या आसपास जागा मिळायला हव्यात (कदाचित जास्तही). तेव्हा एकतर ४% मते जास्त हे चुकीचे वाटते नाहीतर चारच जागा अधिक हे चुकीचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
होबासराव गुरुवार, 10/08/2015 - 14:22 नवीन
चारच जागा अधिक हे चुकीचे वाटते
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/08/2015 - 18:44 नवीन
भाजप व एनडीए साठी आज वाईट बातम्या आहेत. आज संध्याकाळी एकूण ३ नवीन सर्वेक्षणांचे अंदाज जाहीर केले गेले. ते खालीलप्रमाणे आहेत. (१) आयबीएन - ७ संजद+ ४६% मते आणि जागा १३७ (संजद ६९ + राजद ४८ + काँग्रेस २०) भाजप+ ३८% मते आणि जागा ९५ (भाजप ८२ + लोजप २ + मांझीचा पक्ष ७ + चौथा पक्ष ४) (२) इंडिया टुडे - सिसेरो संजद+ १२२ भाजप+ १११ (३) इंडिया टिव्ही - सी व्होटर संजद+ ११६ भाजप+ ११९
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा