Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कलेवराचा उत्सव?

व
वेल्लाभट
Tue, 10/06/2015 - 07:26
🗣 175 प्रतिसाद
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही. सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला. त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा. 'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो. उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे. सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही. संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही. आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो. ब्लॉग दुवा हा
वर्गीकरण
बातम्या
परंपरा
विचार

प्रतिक्रिया द्या
54330 वाचन

💬 प्रतिसाद (175)
अ
अन्या दातार Tue, 10/06/2015 - 15:18 नवीन
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही? वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 10/13/2015 - 15:53 नवीन
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
म
मांत्रिक Tue, 10/13/2015 - 15:55 नवीन
पब वगैरेविषयी टिपणी नाही. कारण ती मला आवडणारी गोष्ट नाही. साहजिकच त्याबाबत मौनच पाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
अ
अभ्या.. Tue, 10/06/2015 - 15:32 नवीन
आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही. . कसे ते आत्ता लिहू शकत नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 07:38 नवीन
हरकत नाही :) जमेल तेंव्हा लिही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तर्राट जोकर Tue, 10/06/2015 - 15:41 नवीन
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार. लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.
  • Log in or register to post comments
द
दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 15:44 नवीन
"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे." +१००० अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
द
दत्ता जोशी Tue, 10/06/2015 - 15:51 नवीन
अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 10/06/2015 - 15:52 नवीन
छान, संयमित उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 10/06/2015 - 15:57 नवीन
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत १. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे. २. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे. ३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत. ४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 07:40 नवीन
एक्झॅक्टली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बोका-ए-आझम Tue, 10/06/2015 - 21:55 नवीन
यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाकरी Tue, 10/06/2015 - 23:22 नवीन
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत? ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 08:02 नवीन
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे. बरं... आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे. आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते. आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी
भ
भाकरी Wed, 10/07/2015 - 13:32 नवीन
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे. ----------------------------------------------
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.
हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे! आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.
जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.
ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.
खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का? एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 13:47 नवीन
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" काहीही हं भाकरी म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही. आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय? मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा. एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!! अगेन, व्हेरी फनी. प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी
भ
भाकरी Wed, 10/07/2015 - 15:09 नवीन
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो
....... काय बोलणार यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 08:03 नवीन
आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
तुम्हीच म्हणालात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी
म
मदनबाण Tue, 10/06/2015 - 23:56 नवीन
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 06:18 नवीन
मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे. स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे. स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं. आता मूळ लेखावर... छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं ’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".
त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.
कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.
निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.
हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 08:15 नवीन
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.
वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.
मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.
शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये
मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं. असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
म
माझीही शॅम्पेन Wed, 10/07/2015 - 13:17 नवीन
+१०००० संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 06:31 नवीन
भाकरी यांचा ता.क. आवडला. (इथे प्रतिसाद संपादनाची सुविधा नाही का? म्हणजे हे वाक्य माझ्या मूळ प्रतिसादात टाकता आलं असतं.)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 07:20 नवीन
पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.
यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 08:18 नवीन
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 08:49 नवीन
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 08:58 नवीन
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का? चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:05 नवीन
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?
टोकाचा निष्कर्ष. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
टवाळ कार्टा Wed, 10/07/2015 - 11:10 नवीन
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 07:40 नवीन
तर्राट जोकर, दत्ता जोशी, स्वॅप्स, मदनबाण, बोका तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सॅपचा अंगठा !
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Wed, 10/07/2015 - 08:35 नवीन
लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार? दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा. यावर लेखकाने मत मान्डावे... (अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..) आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा एक सामान्य मानव... (अक्षराला हसू नये)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:06 नवीन
भाकरी यांना दिलेला प्रतिसाद बघावा त्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
म
मराठी_माणूस Wed, 10/07/2015 - 08:52 नवीन
मोठ मोठे आवाज ऐकण्याची सक्ती करणे हे अमानवीय आणि क्रुर आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 09:12 नवीन
माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 10/07/2015 - 09:24 नवीन
---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ---- साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.
  • Log in or register to post comments
द
दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 09:58 नवीन
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य. बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.) अंतरा ताई, बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार अरे बापरे ! ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते. समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 10:09 नवीन
अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे. सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.
अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
अ
अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 11:08 नवीन
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.
पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.
नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:09 नवीन
अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच
तो उन्माद नसतो हो.... उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:11 नवीन
यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Wed, 10/07/2015 - 10:01 नवीन
उत्सव साजरे करणाऱ्या तरुणाईला " कलेवराचा" उत्सव म्हणणे हा कोणता जिवंत पण आहे हे कळले नाही.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 10/07/2015 - 10:16 नवीन
मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो. कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले. अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का? बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच. जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Wed, 10/07/2015 - 11:09 नवीन
जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
प
प्यारे१ Wed, 10/07/2015 - 10:30 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/sandip/articleshow/49249967.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/07/2015 - 10:32 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/crime/articleshow/49220648.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ध
धोणी Wed, 10/07/2015 - 10:58 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या Wed, 10/07/2015 - 11:44 नवीन
हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोणी
व
वेल्लाभट Wed, 10/07/2015 - 11:58 नवीन
प्रतिसादाशी सुरुवातीच्या ५ वाक्यांपुरता सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
अ
अनुप ढेरे Wed, 10/07/2015 - 11:00 नवीन
ढोल ताशे आता दहिहंडी, नवरात्र, शिवजयंती यांच्यातपण असतात. (पुण्यात दिसतात) फक्त गणेशोत्सवामध्ये वाजवतात हे म्हणणं चूक आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 10/07/2015 - 11:35 नवीन
शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत. शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा