संतापजनक अनुभव
संतापजनक अनुभव
मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की.
तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले.
चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते.
माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.
माकडांचा खेळ लावलाय का इथे ?..म्हणून युती सरकार नंतर निवडून आले नाही...!!! =))कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु