Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोलेस्ट्रेरॉल

स
सर्वसाक्षी
Wed, 12/02/2015 - 09:19
🗣 116 प्रतिसाद
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो. काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्‍या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच. अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही. आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही? असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्‍या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते. यात तथ्य किती?
वर्गीकरण
वैद्यकशास्त्र

प्रतिक्रिया द्या
23984 वाचन

💬 प्रतिसाद (116)
व
वेल्लाभट गुरुवार, 12/03/2015 - 14:00 नवीन
आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे मोटरमन आणि कॅब ड्रायव्हरवर विश्वास ठेवतोच ना? तसेच एक डॉक्टर निवडायचा आणि विश्वास ठेवायचा.
अरे ए :ड :ड :ड काहीप्पण???? निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणा.पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे. ते किती महत्वाचे होते हे सगळेच जण मानतील. त्यामुळे निवडायचा प्रश्न नसायचा. आता आज या मॉल मधे उद्या त्या... या रेट ने लोकं या वेळी अमक्याचं औषध घेऊ, या वेळी तमक्याकडे जाऊ असं करतात. इट्स राँग. जीपी, तुमचे फॅमिली डॉक्टर यांना तुमची सगळी माहिती असायची. त्यामुळे ते वेगळं असायचं प्रकरण. आता म्हणजे तसं काहीच नातं नसतं. वेळ आलीच स्पेशालिस्ट कडे पाठवायची तर फॅडॉ सांगतील त्याकडे जायचं... असो. पण तुम्ही जोकच केलात राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/03/2015 - 14:10 नवीन
निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणा अहो.. ती तर बेसीक गोष्ट झाली. समजा आपण रस्त्यावर चाललो आहे आणि चपलेचा अंगठा तुटला म्हणून चांभार शोधता शोधता "अर्रे?? या बोळात पण दवाखाना आहे.. आता पुढच्या आजाराला याच्याकडे येवूया." असे आपण कधी ठरवतो का? उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना ज्या बेसीक गोष्टी आपण चेक करतो त्यासुद्धा विषद करणे अपेक्षित होते का? सगळेच स्पष्ट लिहायचे म्हणजे मिसळीच्या तर्रीमध्ये लिंबू पिळण्या ऐवजी लिंबू सरबत घातल्यासारखे मिळमिळीत होणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 12/03/2015 - 14:25 नवीन
हाह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 15:17 नवीन
उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना ज्या बेसीक गोष्टी आपण चेक करतो त्यासुद्धा विषद करणे अपेक्षित होते का?
मुळात अशा 'बेसिक गोष्टी सामान्यांना चेक करण्याची वेळच येऊ नये' हा माझा मुद्दा आहे जो मी नेहमी मांडत आलोय. बेसिक गोष्टी म्हणजे तरी काय? कुणी गरोदर महिलेला हार्ट स्पेशालिस्टकडे तर घेऊन जाणार नाही. पण हार्टस्पेशालिस्टचीच गरज असेल तर ह्या शहरात उपलब्ध असलेल्या १० पैकी कोण विश्वासार्ह असा प्रश्न विचारून निर्णय घ्यायला जर आपण सुचवत असाल तर ह्या दहा पैकी 'कोणीतरी विश्वासार्ह नाही' हे सत्यच कबूल करतोय, असे आहे की नाही? माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत. त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे. तुम्ही वर जे वैमानिक, कॅब ड्रायवर, इत्यादी उदाहरणे दिली ती या बाबतीत आपल्याला मुद्दा व त्याचे गांभिर्य समजले नाही याची निदर्शक आहेत. हा मुद्दा कुणाच्या स्किललेवल बद्दल नसून इंटेन्शन्स बद्दल आहे. कुणाची इंटेन्शन्स कशी मोजली जातात? रादर, वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का? दहा-बारा वर्षांआधी मेट्रोसिटीतल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलचा लेख वाचला होता. त्यात 'पब्लिक ट्रांस्पोर्ट' स्त्रियांसाठी भारतातून सगळ्यात जास्त सुरक्षित हा मुंबैत आहे असे लिहिलेले होते. या शहरात रात्री कितीही वाजता एखादी स्त्री एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी बिनघोर जाऊ शकते, टॅक्सी-ट्रेन-बस काहीही वापरून. रिक्षात बसतांना तीच्या मनात रिक्षावाल्याबद्दल कुठलाच किंतु-परंतु येत नाही. हे वातावरण २००० साली मुंबईत होते. त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली. नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्‍या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही? जर प्रत्येक डॉक्टर विश्वासू आणि चांगलाच असेल तर मला ओढून ताणून, उसनं अवसान आणुन त्याच्यावर विश्वास 'ठेवण्याची' गरजच नाही. तो आपोआप इन-बिल्ट असेल. तुम्ही माझा याविषयावरचा लेख वाचलेला आहे. त्यातले सगळे डॉक्टर हे पुर्ण चौकशी करून निवडलेले होते. तरीही फसवणूक झालीच तेव्हा काही प्रतिक्रियांचा सूर असा होता की तुम्हीच मूर्ख असाल. असो. त्या धाग्याची चर्चा त्या धाग्यावर. पण मुद्दा आणि प्रश्न अजूनही तोच आहे. मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/03/2015 - 15:40 नवीन
माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत. हे मत आजच्या युगात फारच भाबडे आहे असे माझे मत आहे. त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे. सहमत. पण हा सल्ला "नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय आहे" हेही तुमच्या लक्षात आले असेलच! वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का? गरज आहे कारण दुसर्‍या कुणाच्या तरी चुकीच्या इंटेंशनमुळे (जे पॅसेंजरच्या नियंत्रणाखाली नाहीये) तो पॅसेंजर स्वतः अपघातग्रस्त होणार आहे. त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली २००० सालापर्यंत रिक्शावाल्यांनी गुन्हे केलेच नाहीत का? एकही अपघात झाला नाहीच का? किंवा १००% रिक्शावाले "उत्तम आणि विश्वासार्ह" होतेच का? नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्‍या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही? चुकत नाहीये असे मी म्हणतच नाहीये. फक्त मी माझ्यापुरता आजच्या काळाला अनुसरून काढलेला निष्कर्ष येथे लिहिला. मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो? प्रॅक्टीकली विचार केलात तर तुम्ही शहाणे असाल तरीही आजच्या युगात फसवले जाताच (याचा रोख डॉक्टरांकडे नाहीये तर तुमच्या कामवालीपासून कंपनीपर्यंत सगळीकडे आहे!) मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात? असो, या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली आहे. तुमच्या अपेक्षा आजच्या काळाला अनुसरून नाहीयेत हे माझे मत; आणि सर्वच डॉक्टरांनी सज्जन असावे हे तुमचे मत, दोन्ही मते आहे तेथेच आहेत. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 16:23 नवीन
मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात? आपल्या सर्व चर्चेचा सारांश हाच प्रश्न आहे. हाच प्रश्न जेव्हा रुग्ण डॉक्टरांना विचारतात तेव्हा समस्या निर्माण होते. जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही. प्रत्यक्षात झाले काय, तर 'रुग्णांचीच कशी चूक होते' हे नेहमी डॉक्टरांकडून मांडल्या गेले आहे. त्यांच्यावर येणार्‍या रोखाला सामोरे न जाता भलतीकडेच वळवण्याचे राजकारण खेळणे व्यवसायाच्या दॄष्टीने आवश्यक असेल पण बकरे की मां कबतक खैर मनायेगी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/03/2015 - 16:32 नवीन
जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही. मी डॉक्टर नाही. परंतु एका डॉक्टरने किंवा डॉक्टर समुहाने कोणत्या अधिकारावर पुढे यावे आणि उपाय करावेत? या समस्यांसाठी सरकारी नियंत्रणेखाली न्यायव्यवस्था आहे, डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारीही संस्था आहे. सर्व समस्यांवरील उपाय सर्वस्वी त्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित असणारे कामाची अपेक्षा आपण आपल्या गल्लीतल्या डॉक्टरकडून करू शकत नाही. (मला सारखे सारखे देजावू फिलींग येत आहे - बहुदा आपल्यात हे सगळे बोलून झाले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 17:05 नवीन
हो हे सगळे बोलुन झाले आहे. म्हणून खाली नवा प्रस्ताव मांडत आहे. मला निष्फळ तू-तू-मैं-मैं चर्चेत खरंच रस नाही. निदान ह्या बाबतीत तरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे गुरुवार, 12/03/2015 - 15:43 नवीन
मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो? डांगे साहेब, आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का? आपल्याला आला तो अनुभव वाईटच आहे.त्याबद्दल आम्ही फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो. पण दुनिया हि अशीच आहे? कुणाला "अधिकार आहे कि नाही" ती वेगळी गोष्ट आहे. सगळीच माणसे प्रामाणिक आणी विश्वासार्ह असावीत हे स्वप्नरंजन आहे. आयुष्यात तुम्हाला तुमच्या "मित्रा"पैकी कुणीच कधीच फसवले नसेल तर तुम्ही फारच नशीबवान असाल. गेला बाजार ऑरीफ्लेम किंवा टप्परवेअर किंवा एमवे वाला तुमचा एकही मित्र( सौंची मैत्रीण) नसेल तर आपल्याला साष्टांग नमस्कारच करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 16:04 नवीन
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही. तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का? मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही. आपल्याला आला तो अनुभव वाईटच आहे.त्याबद्दल आम्ही फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो. मनापासून धन्यवाद! पण दुनिया हि अशीच आहे? कुणाला "अधिकार आहे कि नाही" ती वेगळी गोष्ट आहे. सगळीच माणसे प्रामाणिक आणी विश्वासार्ह असावीत हे स्वप्नरंजन आहे. हो हे मान्य आहेच. पण रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते. रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते. आयुष्यात तुम्हाला तुमच्या "मित्रा"पैकी कुणीच कधीच फसवले नसेल तर तुम्ही फारच नशीबवान असाल. गेला बाजार ऑरीफ्लेम किंवा टप्परवेअर किंवा एमवे वाला तुमचा एकही मित्र( सौंची मैत्रीण) नसेल तर आपल्याला साष्टांग नमस्कारच करेन. नशिबाने त्याबाबतीत मी नशिबवान आहे. हे तिन्ही व्यवसाय असणारे मित्रमैत्रिणी आहेत. पण ऑरिफ्लेम, टपरवेअर, अ‍ॅमवे शी आपण डॉक्टरच्या प्रोफेशनची तुलना करत आहात, ते वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक गुरुवार, 12/03/2015 - 16:14 नवीन
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही. तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का? तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का? मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही. सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का? रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते. आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल. रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते. नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 17:03 नवीन
तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का? नाही. घोळ नाही. ते स्त्रियांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल मुंबईत असलेल्या वातावरणाबद्दल आहे. आणि हे साधारणपणे सर्वच रिक्षेने जाणार्‍यांना भोगाव्या लागणार्‍या रिक्षेवाल्यांच्या मुजोरी, चोरी, मस्तवालपणाबद्दल आहे. दोन गोष्टींची गल्लत करू नये. सार्वजनिक रिक्षाचे काही कायदे-नियम आहेत. ते बहुसंख्य रिक्षावाले पाळत नाहीत हा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. त्यावरून जनता त्यांना चोर, बदमाश, हरामखोर म्हणते. हे सरसकटीकरण आहे. आता तुम्ही मला विदा-सर्वेक्षण वैगेरे मागणार नाही अशी अपेक्षा करतो. मुंबैत वा कुठेही आपण कुठल्याही रिक्षास्टँडवर प्रत्यक्ष जनतेकडून ही मते जाणून घेऊ शकता. सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का? प्रश्न सरसकट असण्याचा नसून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या भावनेचा आहे. ती भावना निर्माण का झाली त्याची कारणे आपणास शहरात फिरलात की लक्षात येतात. आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल. आपण मोबदला देतोय तेव्हा डॉक्टरने योग्य ती सेवा देणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे ही अपेक्षा जर स्वप्नरंजन असेल तर रुग्ण दगावल्यावर तोडफोड होऊ नये ही अपेक्षाही स्वप्नरंजनच आहे. डॉक्टर खरेंनी म्हटल्याप्रमाणे जर जसा समाज तसा डॉक्टर असेल तर डॉक्टरलाही तो समाज कसा आहे हे समजून घ्यावे लागेल. त्याबद्दल तक्रार करून चालणार नाही. नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का? नाही. त्याबद्दल नाही. आता खालीच डॉक्टरसाहेबांनी एक प्रतिसाद दिला ज्यामधे त्यांनी समाज त्यांना कसा वागवतो ह्याबद्दल लिहिले. ते हे अनुभव नेहमीच लिहतात. कारण जेव्हा डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्यावर बोलले जाते तेव्हा ते हे अनुभव लिहतात म्हणजे "तुम्ही आम्हाला काय बोलता, तुम्हीच बघा कसे आहात आधी?" असा अ‍ॅप्रोच एकंदर दिसतो. हे ते वातावरण. हे समस्येला भटकवण्याचे प्रयत्न आहेत. ब्लेम-गेम आहे. डॉक्टरांबद्दल एकेकाळी देव अशी प्रतिमा होती, ती राक्षस अशी होत जात आहे यात डॉक्टरांचा काहीच दोष नसून समाजाचाच आहे असे ठरवण्याचे जेव्हा प्रयत्न होतात तेव्हा वातावरण कलुषित होते. मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय? हे असेच असणार आहे म्हणून सोडून द्यायचे काय? मागे बॅटमॅनने तशी संकल्पना मांडली होती की जशी हॉटेल्ससाठी झोमॅटो वेब्साईट आहे तशी हॉस्पीटल्स डॉक्टरसाठी करता येईल काय. मी स्वतः, ह्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करायला तयार आहे. ह्यात मला डॉक्टरलोकांची मदत लागेल. ह्यासाठी ते समोर येतील काय हाच प्रश्न आता उरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/03/2015 - 17:09 नवीन
मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय? ठीक आहे. माझ्याकडून काही मदत लागली तर जरूर सांगा. ..आणि यासर्व प्रतिसादांमध्ये तू-तू-मी-मी चा टोन तुमच्याकडून आढळला नाही म्हणून इतका प्रतिसादप्रपंच केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/04/2015 - 07:53 नवीन
जशी हॉटेल्ससाठी झोमॅटो वेब्साईट आहे तशी हॉस्पीटल्स डॉक्टरसाठी करता येईल काय. मी स्वतः, ह्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करायला तयार आहे.
त्यासाठी शुभेच्छा. त्यापूर्वी माझ्या ह्या लेखावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रीया वाचा.
या निमित्ताने काही प्रश्न... संदीप डांगे - Wed, 01/04/2015 - 20:23 १. बर्‍याच खटपटी-लटपटी करून कायदेशीरपणे पण अनैतिकतेने कर वाचवणारे हे भ्रष्टाचारी असतात की नसतात.? २. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असतांना खाजगी वाहनाचा वापर करणे सुविधाजनक आहे की पेट्रोलची उधळपट्टी? ३. बायकोच्या नावावर घर घेऊन कसला तरी आर्थिक फायदा होतो म्हणतात. त्याचं काय? ४. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी की गरीब? ५. पावतीशिवाय वस्तू घेऊन पैसे वाचवणे कायदेशीर गुन्हा आहे की बचतीची वृत्ती? ६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी? ८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी? ९. नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठे मिळेल? १०. "अमुक असून त्याने 'असे' वागावे म्हणजे काय?" या वाक्यामागे असा अर्थ आहे का की अमुक नसणारांना कसेही वागण्याची मुभा किंवा सवलत आहे?
स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत संदीप डांगे - Wed, 08/04/2015 - 00:14 स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही. >> हाच तर मुद्दा आहे राव सगळ्या प्रश्नांचा. स्वार्थ आणि प्रामाणिकपणा सोयीनुसार वापरल्या जातो 'खर्‍या जगात'. कुणी अप्रामाणिक वागू नये म्हणून नोकरीवर घ्यायच्या आधीच नोकरांशी हजार अटी असलेले करार केले जातात. ह्याचे कारण हेच आहे. त्यामुळे तुमची जी मुदलात गल्लत झाली आहे त्याकडे जरा विश्लेषण करून पहा.
ज्यांच्याकडे पाहून आपण नैतिकेचे धडे घेतो तेच असे अनैतिक वागले तर काय? असा तुमचा मूळ प्रश्न आहे. यात तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. आपण कधीही धडे घेत नाही तर ते आपल्याला देण्याचे प्रयत्न केले जातात.
आपण जे खरे धडे घेतो ते प्रत्यक्ष जगतांना. माझा स्वार्थ कुठे पुर्ण होतो हाच कळीचा मुद्दा असतो प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आदर्शाची वाट उपयोगाची नाही हेही अनुभवानी लक्षात येते. प्रत्यक्ष आयुष्यातले अनुभव व्यक्तिमत्व घडवतात. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे आणि लोकलाज झुगारून द्यायच्या क्षमतेप्रमाणे लोक खरे-खोटे काम करत पुढे जात असतात. यात कुणीच अपवाद नाही. शिक्षकही नाही, डॉक्टरही नाही. या सगळ्या आपल्या लहानपणीच्या कवीकल्पना आहेत. जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात.
आज शिक्षकांना प्रवेश मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी दणदणीत डोनेशन द्यावे लागतं. विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्‍या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. एवढी पात्रता असतांना असा धडा मिळत असेल तर कोण कशाला प्रामाणिकतेचे-आदर्शाचे वृथा सोंग करत फिरेल? तत्वज्ञान आणि आदर्शवाद म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं ठाम मत होत जातं. आता त्या निवृत्त मुख्याध्यापकाचंच घ्या. बढती व्हावी, वेतनवाढ व्हावी, भत्ते मिळावे म्हणून त्यांच्याच विद्यार्थ्यांसारख्या सरकारी बाबूंनी त्याच्याकडून पैसे उकळले असणार. त्या बाबूंचे शिक्षक आदर्श नव्हते का? जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का?
कारण भ्रष्टाचाराशी अजिबात संबंध आलेला नसेल तर ती व्यक्ती या ग्रहावरची तरी नाही किंवा चार भिंतीबाहेर पडून कधी व्यवहार करायची गरज पडणार नाही इतकी संरक्षित असेल.
पण अभ्यास, चिंतन वाढवा. ग्रॅजुएट होईपर्यंतच काय कित्येकांना रिटायर होईपर्यंत चपला शिवणार्‍या पोराइतकं व्यवहार-चातुर्य येत नाही असं निरिक्षण आहे. मानवी व्यवहारांचं जग अगम्य आहे. त्याला आदर्शाच्या कॅलिडोस्कोपमधून पाहण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. भ्रमनिरासच होईल.
पुन्हा शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 08:10 नवीन
तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने तुम्हालाच शुभेच्छा द्याव्यात असे म्हणतो. आपला धागा हा पैशाच्या भ्रष्टाचारावर होता. आणि हा धागा नागरिकांचे आरोग्य स्वतःच्या स्वार्थासाठी धोक्यात घालून पैसे उकळण्याबद्दल आहे. हे कदाचित आपल्या लक्षात आले नसेल. एखादा डॉक्टर एखाद्या शस्त्रक्रियेसाठी दोन लाखाच्या ठिकाणी चार लाख घेत असेल तर आपली काय ना नाही. पण दोन लाख मिळतील म्हणून गरज नसतांना कुणाची शस्त्रक्रिया करून त्याच्यामागे आयुष्याभराचे दुखणे लावत असेल तर ते कसे पटेल? तुमच्या संकल्पनेतला गोंधळ आधी समजून घ्या. अन्यथा मी चोरा-दरोडेखोरांचे समर्थन करत आहे असे आपल्याला वाटेल. कॉपी-पेस्टींगच्या झालेल्या अनावश्यक श्रमाबद्दल श्रमपरिहार म्हणून एक गाणं ऐका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Fri, 12/04/2015 - 08:21 नवीन
हा धागा पण कोलेस्टीरॉलवर आहे असे वाटते. वैद्यकीय गैरप्रकारांवर नसावा. ओढून ताणून ते कोणत्याही धाग्यावर आणण्याचे काय प्रयोजन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 08:37 नवीन
डॉक्टरसाहेब, धाग्याचा विषय: कोलेस्टरॉलच्या नावाखाली होणार्‍या हृदयरोगाशी संबंधीत अनावश्यक शस्त्रक्रिया. हा वैद्यकिय गैरप्रकाराचाच भाग आहे असे वाटते. तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/04/2015 - 09:57 नवीन
तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने तुम्हालाच शुभेच्छा द्याव्यात असे म्हणतो.
तुमच्यामध्ये झालेल्या मतपरिवर्तनाला आणी तुम्ही करत असलेल्या प्रामाणीक प्रयत्नांना मी शुभेच्छा दिल्या होत्या.
आपला धागा हा पैशाच्या भ्रष्टाचारावर होता. आणि हा धागा नागरिकांचे आरोग्य स्वतःच्या स्वार्थासाठी धोक्यात घालून पैसे उकळण्याबद्दल आहे. हे कदाचित आपल्या लक्षात आले नसेल.
लक्षात आले होते. स्वार्थ हा मुद्दा दोन्हीकडेही समान आहे. भ्रष्ट आचार भले तो आर्थीक असो वा शारिरीक असो मी त्यात भेदभाव करत नाही. आर्थीक भ्रष्टाचारामुळेही एखाद्याचा जीव जावू शकतो. ठाण्यात एका बांधकाम व्यवसायीकाने ह्या कारणाने आत्महत्या केली होती. उदाहरणे बरीच देता येतील. त्यामुळे तुमचा युक्तीवाद चुकीचा वाटतो.
पण दोन लाख मिळतील म्हणून गरज नसतांना कुणाची शस्त्रक्रिया करून त्याच्यामागे आयुष्याभराचे दुखणे लावत असेल तर ते कसे पटेल?
हे तो का करतो? त्या डॉ.च्या बाबतीत अशी घटना घडली असेल व तो त्याचा सूड आपल्यावर काढत असेल असेही असू शकेल. बिनडोक तर्क वाटतो ना?
तुमच्या संकल्पनेतला गोंधळ आधी समजून घ्या. अन्यथा मी चोरा-दरोडेखोरांचे समर्थन करत आहे असे आपल्याला वाटेल.
गोंधळ तुमचा होतोय माझा अजीबात नाही..माझा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोधच आहे व माझ्या पातळीवर मी त्याला नेहमीच विरोध करतो.
कॉपी-पेस्टींगच्या झालेल्या अनावश्यक श्रमाबद्दल श्रमपरिहार म्हणून एक गाणं ऐका.
कॉपी-पेस्टींगला मला कोणतेही श्रम पडत नाही. कृपया माझ्या ज्ञानात भर पडेल अशा विडीओ देत जा. अशा फालतू विडीओमध्ये मला रस नाही. तुमच्यासारख्याकडून अशा विडीओची अजीबात अपेक्षा नव्हती. जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का? ह्यात तुम्ही डॉक्टर पेशालाही पकडले होते. आज अचानक युटर्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 10:35 नवीन
जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का? ह्यात तुम्ही डॉक्टर पेशालाही पकडले होते. आज अचानक युटर्न.
तुम्हाला मला शब्दात पकडण्याचा आनंद मिळवायचा आहे यात जास्त रस दिसतोय. ठिक आहे. भ्रष्ट आचार भले तो आर्थीक असो वा शारिरीक असो मी त्यात भेदभाव करत नाही. आर्थीक भ्रष्टाचारामुळेही एखाद्याचा जीव जावू शकतो. ठाण्यात एका बांधकाम व्यवसायीकाने ह्या कारणाने आत्महत्या केली होती. माझा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोधच आहे व माझ्या पातळीवर मी त्याला नेहमीच विरोध करतो. अनैतिकता आणि अप्रामाणिकपणा याबद्दलची तुमची मोजपट्टी माझ्या हातात का सोपवताय? आर्थिक भ्रष्टाचाराने कंटाळून त्या बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली असे तुम्हाला कसे वाटले? उदाहरण देतांना जरा माहितीही काढली अस्ती तर. जेव्हा तो ह्या व्यवसायात आहे तेव्हा त्याला ह्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्याने वेळोवेळी संबंधितांना योग्य ते पैसे चारले आहेत. तरीही ते त्याची अडवणूक करत होते. जे त्याला सहन न होऊन त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या आत्यंतिक मानसिक दबावातून झाली आहे. आत्महत्या करण्याचा निर्णय हा त्याचा स्वतःचा होता. ह्यात त्याची परिस्थिती कारणीभूत असली तरी जीवंत राहण्याचा त्याच्याकडे पर्याय होताच. तो त्याने स्वतः नाकारला. ह्या प्रकरणाचा रुग्णाला अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया करायला लावून आयुष्याचे दुखणे देणार्‍या, त्याची जबाबदारी टाळणार्‍या डॉक्टरशी आपण कसा संबंध जोडू शकता? या प्रश्नांची उत्तरे द्या, मग पुढे काय ते सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/04/2015 - 11:16 नवीन
तुम्हाला मला शब्दात पकडण्याचा आनंद मिळवायचा आहे यात जास्त रस दिसतोय.
अहो तुम्ही तुमच्या सोयीनुसार भूमिका बदलता हेच मला तुम्हाला सांगायचे होते. मला त्यात आनंद होत नाही उलट वाईटच वाटते. माझा कुठल्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोध आहे. तुमचा आहे का?
त्याने वेळोवेळी संबंधितांना योग्य ते पैसे चारले आहेत. तरीही ते त्याची अडवणूक करत होते. जे त्याला सहन न होऊन त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या आत्यंतिक मानसिक दबावातून झाली आहे
शेवटी हा कडेलोट कशामूळे झाला. जीव गेलाच ना? हे उदाहरण मी आर्थीक भ्रष्टाचारही एखाद्याचा जीव घेऊ शकतो हे सांगण्याकरता दिले होते. त्यामुळे मी डॉक्टरांच्या अयोग्य प्रॅक्टीसचे समर्थन करतो असा अर्थ काढू नका.
अनैतिकता आणि अप्रामाणिकपणा याबद्दलची तुमची मोजपट्टी माझ्या हातात का सोपवताय?
ती सवय तुम्हाला आहे. तुम्ही तुमची मोजपट्टी वापरायाला मो़कळे आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/03/2015 - 16:20 नवीन
डांगे साहेब आपण आजही डॉक्टर हा नोबल प्रोफेशन मानता. तो जमाना गेला कारण आता रुग्णही तसेच झाले आहेत. डॉ. श्रीखंडे सारख्या ऋषी तुल्य व्यक्तिमत्वाने डॉक्टरांच्या त्यागाची समाजाला किंमत नाही असे उद्गार काढले आहेत. डॉ रवी बापट यांनी हि अशीच खंत व्यक्त केली आहे. ज्या समाजातून डॉक्टर निर्माण होतात तोच किडलेला आहे. जर बीज किडके असेल तर वृक्ष किडकाच निघणार. हि वस्तुस्थिती मान्य करा. मी लष्करातून निवृत्त झालो तेंव्हा ज्या सोसायटीत मी लहानाचा मोठा झालो त्यांनी माझ्याकडे दवाखाना घेण्यासाठी काही रक्कम "रोख" मागितली. म्हणजे माझे पांढरे पैसे काळे करून द्यावे लागले. त्याच दवाखान्यासाठी मी ४० महिन्यांचा पूर्ण पगार( GROSS) किंवा ६० महिन्यांचा घरात येणारा पगार( नेट) एवढे पैसे भरले तेंव्हा सोसायटीने मला एक छदाम सवलत दिली नाही परंतु दवाखाना सुरु झाल्यावर मात्र ९० % लोकांनी सोसायटीतील लोकांना सवलत किती हे विचारले? २०१२ साली १०० रुपये उद्या देतो २०० रुपये आणून देतो म्हणून विश्वास ठेवला तर दोन फुलस्केप पाने भरतील एवढया रुग्णांनी पैसे बुडवले (जर कधी माझ्या दवाखान्यात आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल) आणी ती रक्कम थोडी थोडकी नव्हे तर २०,०००/- च्या वर जाते. आज कोणी मला सांगितले कि पैसे उद्या आणून देतो तर मी स्पष्ट नाही म्हणतो. यावर आमच्यावर विश्वास नाही का? पासून माणुसकी नाही हे ऐकावे लागते. आई ची बिले बायकोच्या आणी बापाची बिले स्वतःच्या नावावर मागणारे महाभाग शेकड्यांनी आहेत. बिले वाढवून मागणारे सुद्धा. या समाजातूनच डॉक्टर आले आणी येणार मग समाजाने स्वतःच आत्म परीक्षण करायला नको का? डॉक्टर हा आपलाच घटक आहे तो आपण जितके चांगले तितकेच डॉक्टर चांगले असतील. डॉक्टरनेच त्याग केला पाहिजे, डॉक्टरनेच ग्रामीण सेवा केली पाहिजे,डॉक्टरनेच देश सोडून जायचे नाही. बाकी समाजाने शेण खाल्ले तरी चालेल. PEOPLE GET THE DOCTORS THEY DESERVE.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 17:02 नवीन
आपण मांडलेले अनुभव शंभर टक्के मान्य आहेत. पण आपल्याला असे वाईट अनुभव आले म्हणून आपण चुकीच्या मार्गाने गेलेला पैसा कमवायचा प्रयत्न कराल काय? मी सदसदविवेकबुद्धी, प्रामाणिकता याबद्दल बोलत नाही. तुमचे गेलेले पैसे काढायला किंवा अतिरिक्त कमवायला काहीतरी (कुणाला आरोग्याच्या दॄष्टीने त्रासदायक वा कशीही नसलेली) क्लृप्ती लढवालच. पण माझे एवढे लाख गेले तर आता कुणा डॉक्टरशी संगनमत करून येणार्‍या रुग्णांना गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करायला लावून, आपल्या अंगावर येणार नाही अशी काळजी घेऊन गल्ला भराल काय? किंवा कुणीही असे करणे योग्य असेल काय? डॉक्टरकी हा एक व्यवसाय आहे, त्यांना त्यांचे उचित मानधन, सोयीसुविधा, हक्क अधिकार मिळालेच पाहिजेत हे मी आधीही एका धाग्यावर कळकळीने मांडले होते. पण समाज त्यांना फसवतो म्हणून त्यांनी समाजाला अशा पद्धतीने फसवणे पटत नाही. तुम्ही एक प्रकारे डॉक्टरांच्या त्या सर्व कृत्यांचे समर्थन करत आहात असे वाटते. वैद्यकिय व्यवसायाच्या बाबतीत 'टीट फॉर टॅट' विचारपद्धती चूकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Mon, 12/07/2015 - 13:02 नवीन
व्यवसायाशी संबंधित नाहीच आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही प्रत्येक व्यवसायात असते. मी पत्रकारितेत असताना एक प्रसंग घडला होता. माझ्या एका वरिष्ठ सहका-याने एक प्रकरण शोधून काढलं होतं आणि त्यात दोन पोलिस अधिकारी involved होते. त्याला फोन आला होता की तुम्ही पोलिसांविरूद्ध का स्टोरी करताय? त्यावर त्याचं उत्तर हे होतं की मी गुन्हेगारांविरुद्ध स्टोरी करतोय आणि त्यातले काही जण पोलिस आहेत. मला वाटतं या सगळ्या वादविवादात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 09:17 नवीन
समजा जर कोलेस्टेरॉल आणि ह्रूदयविकार यांचा संबंध नसेल तर ते कमी करायचे उपचार का घ्यावे? जर मधुमेहाचे प्रमाण १४० असेल तर ११० च्या व्यक्तिने उपचार का घ्यावेत?
अत्यंत बरोबर. फक्त इतकंच म्हणणं आहे की खात्री करुन घेण्यासाठीसुद्धा मुळात नवा दावा करणारा सोर्स कोणता आहे हे पाहूनही किमान क्रेडिबिलिटी ओळखता येऊ शकते. उदा. मॉडर्न मेडिसिनच्या काही स्टँडर्ड जर्नल्समधे किंवा अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या पाठिंब्याने कुठे अभ्यासनिबंध प्रसिद्ध झाला असेल तर शहानिशा करुन घेण्याइतपत योग्यता समजली जाईल. कुठल्यातरी आठवडी पुरवणीत चूर्णबीर्ण किंवा रक्तशुद्धीवाली सिरप्स बनवणार्‍या कंपनीने "स्पॉन्सर" केलेल्या चौकटीत अशी टेक्सासछाप संशोधनं उल्लेखिलेली असतील तर त्यांचा विचारही न करणं उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/04/2015 - 01:53 नवीन
बाकी चर्चा वाचत आहे. पण टेक्सासच्या अस्मितेला आव्हान देण्याबद्दल गविंचा निषेध. -- टेक्साससुंदरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Fri, 12/04/2015 - 02:33 नवीन
असंच काही नाही. तुम्ही सांगलीतली वर्ल्डफेमस टेक्सास ओली भेळ खाल्ली आहेत का? चांगली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुबोध खरे गुरुवार, 12/03/2015 - 08:14 नवीन
स्वस्तातील औषध लवकर परिणामकारक ठरत नाही म्हणतात असेच काही नाही. एकच औषध वेगवेगळ्या कंपन्यांचे यात खूप तफावत असू शकते दर्जा एकच असूनही. उदा. FDC (ELEKTRAL वाले) यांचे एटोर्व्हास्टाटीन ZIVAST २५ रुपयाला १० गोळ्या मिळतात तेच RANBAXY चे स्टोअर व्हास १८० रुपयाला १० गोळ्या मिळतात. राहिली गोष्ट नकली गोळ्यांची -- सर्वच नकली गोळ्यात औषध नसतेच असे नाही. उदा. टिनीडाझोल हे औषध पोटातील आम्लामुळे विघटन पावते त्यामुळे ते इंटेरीक कोटेड म्हणजे आम्लात न विरघळणाऱ्या आवरणाच्या गोळीतून देणे आवश्यक आहे. यासाठी ५०० मिली ग्राम गोळी प्रथम तयार करावी लागते आणी त्या प्रत्येक गोळीवर हे इंटेरीक कोटेडचे आवरण चढवावे लागते. या उत्पादन पद्धती साठी बराच खर्च येतो तेंव्हा नुसता रंग चढवून दिली तर तुम्हाला काय कळेल. तिच्यातील टिनीडाझोल मोजले तर ५०० मिग्राम आढळेल पण गोळी घेतली तर नुसती जळजळ होईल आणी हगवण मात्र थांम्ब्णार नाही. मग आपले विद्वान शेजारी असतातच सांगायला, "आधुनिक औषधांचे साईड इफेक्टच फार असतात." आम्ही सुरुवातीला होल सेलर कडून जेनेरीक औषधे घेतली तेंव्हा मी त्याला हि शंका विचारली कि तू हि औषधे मला विकतो आहेस ती नकली नाहीत ना ? त्यावर तो म्हणाला साहेब मी तुम्हाला फार तर एकदा फसवू शकेन पण मला धंदा करायचा आहे. एकदा फसव्ल्यावर तुम्ही माझ्याकडून माल परत घ्याल का? त्यामुळे डॉक्टर स्वतः खात्रीशीर माणसाकडूनच औषधे विकत घेतात. पण ती औषधे लोक विकत करीत नाहीत असा आमचा अनुभव आहे . लोकांचा केमिस्ट वर जास्त विश्वास आहे त्याला कोण काय करणार?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 12/03/2015 - 09:10 नवीन
सुबोध खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट ! धन्यवाद डॉक्टरसाहेब !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 10:53 नवीन
डॉक्टर खर्‍यांचे प्रतिसाद खूप आवडले.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 12/03/2015 - 13:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाप्पू गुरुवार, 12/03/2015 - 12:18 नवीन
चांगला धागा. खरे सरांचे प्रतिसाद देखील छान आयुर्हीत यांचा उल्लेख आल्यामुळे एक गोष्ट आठवली. आयुर्हीत मोड ऑन अबक बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला व्यनि करा . आयुर्हीत मोड ऑफ =) =)
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/03/2015 - 12:54 नवीन
डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे उदात्त विचाराच्या डाॅक्टरांची संख्या खूप कमी आहे. डाॅक्टरच्या बेजबाबदार व बेपर्वाहीची एक घटना. आमच्या एका नातेवाईकाला डोळ्यासाठी स्टेम सेल थेरेपी करण्यासाठी कारने मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये त्याला बघून तारीख घेण्यासाठी नेले. सर्व पेशंट मुख्य डाॅक्टरची (या डाॅक्टरचे मुंबईत स्वत:चे स्टेम सेल हाॅस्पिटल आहे) सकाळी 10 पासून वाट पहात होते, डाॅक्टर संध्याकाळी 5 वाजता आले. पेशंटचे रिपोर्टस तपासताना मुख्य डाॅक्टरांचे काजू, फुटाणे, शेंगदाणे खाणे चालू होते. आमच्या नातेवाईकाला पुढील महिन्याची तारीख दिली. त्याप्रमाणे सर्व तयारी करून नातेवाईक सायनला गेले. तेथे गेल्यावर डाॅक्टर गावाला गेलेत पुढच्या महिन्यात या असे सांगितले. 5-10 हजार रूपये वाया गेले. पुढच्या महिन्यात नातेवाईकाला सायन मध्ये अॅडमिट केले. दोन दिवस आैषध व तिसर्या दिवशी बोन मॅरोमधून स्टेम सेल घेणे चालू झाले. प्रोसिजर चालू असताना जेन्टस डाॅक्टर व वार्डबाॅचे लेडी डाॅक्टरसमोर फालतू जोक चालू होते. पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया दिल्यामुळे सगळे कळत होते. त्यानंतर बोन मॅरो मधून काढलेल्या स्टेम सेलवर प्रक्रिया करून ते परत शरीरात टाकण्यासाठी 4 तास लागले. यावरून पेशंटने सरकारी दवाखान्यात न येता खाजगी दवाखान्यात जावे अशी डाॅक्टरची इच्छाआहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 12/03/2015 - 13:00 नवीन
पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया दिल्यामुळे सगळे कळत होते.
तुम्हाला लोकल म्हणायचं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 12/03/2015 - 18:00 नवीन
धन्यवाद डॉक्टर. तुमचे म्हणणे पटले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/03/2015 - 18:00 नवीन
संदिप डांगे तुम्ही शाळेत व काॅलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत बरीच पारितोषके मिळविली असतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/03/2015 - 18:18 नवीन
कोलेस्टेरॉल एक उपयुक्त धातू आहे का?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 07:22 नवीन
लघु घनता कोलेस्टेरॉल आणि हृदरोग यांच्यामधील सरळ गुणोत्तर आता प्रस्थापित झालं आहे*. लघु घनता कोलेस्टेरोल कमी (~३०% कमी) करण्यासाठी स्टॅटिन वर्गातली औषधे उपलब्ध आहेत. त्यात फायझरचे अटोर्व्हास्टॅटिन (ब्रान्ड नेम लिपिटॉर) नुकतेच पेटंट पिरियड संपवून जेनेरिक झालेले आहे. त्याहीपुढे जाऊन जर लघु घनता कोलेस्टेरॉल अजून कमी (~५०-६०% कमी) करायचं असेल तर त्यावर इव्होल्युक्युमॅब नांवाचे नवीन इंजेक्टेबल ड्रग बाजारात आले आहे.* गरजूंनी इंटरनेटवर अजून माहिती काढावी. *पिवळा डांबिस ह्या भुताने झपाटलेल्या झाडाचा ह्या संशोधनात्मक अभ्यासात प्रत्यक्ष सहभाग आहे. अजून जास्त काही लिहिणे अप्रस्तुत होईल.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sun, 12/06/2015 - 08:11 नवीन
डॉक्टर्सची तुलना बेइमान रीक्शावाले, मॅकॅनिकस, विमा एजंट यांच्याबरोबर करतात ते काही पटले नाही. (काही जण तर चक्क पेशंटला लुबाडण्याच्या वृत्तीचे समर्थनही करताना दीसतात.) जशी आपण कोर्टातील न्यायाधीश, पोलीस, लष्कर, रीझर्व बँकेतील उच्चाधीकारी, IAS ऑफीसर्स, सचीव यांच्याकडुन उच्च नैतीकतेची अपेक्षा ठेवतो, तीच अपेक्षा समाज डॉक्टर्स कडुनही ठेवतो. खुप साधी गोष्ट आहे. ज्याच्याकडे आपण स्वतःला विश्वासाने सोपवतो त्याच्याकडुन होणारी फसवणुक ही साधी लबाडी कींवा बेईमानी नसुन विश्वासघात असतो, तोही थोड्याफार पैशांसाठी केलेला. काही डॉक्टर्सच्या रुग्णांच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील विश्वास कमी होणे ही फार सिरीयस गोष्ट आहे, जीचा संपुर्ण समाजावर खुप दुरगामी परीणाम होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 12/07/2015 - 07:00 नवीन
लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील विश्वास कमी होणे ही फार सिरीयस गोष्ट आहे,
उगाचच भयंकरीकरण करू नका. माझा डॉक्टरांवरील विश्वास अजिबात कमी झाला नाहीये. आणि माझ्या माहितीतल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा सुद्धा. क्वचित एखाद्या डॉक्टरचे वागणे/ बोलणे पटत नाही ( जनरली उद्धटपणा आणि वेळ कमी देणे आणि वेळ न पाळणे ). पण त्यांच्या बद्दल विश्वास कमी झाला नाही. रुग्णानी पण काळजी घ्यावी ती मी घेतो. उगाच रस्त्यावर पाटी दिसली म्हणुन दिसेल त्या डॉक्टर कडे जात पण नाही. कोणाच्या तरी अनुभवावरुन च कोणत्या डॉक्टर कडे जायचे ते ठरवतो. जमले तर डॉक्टर कुठल्या विद्यापिठातुन पास झाला आहे हे शोधतो आणि कॉलेज चे नाव कळले तर बेस्टच. तरुण डॉक्टरांना टाळतो. ४५-५० वयाच्या पुढचा असेल तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 07:41 नवीन
उगाच रस्त्यावर पाटी दिसली म्हणुन दिसेल त्या डॉक्टर कडे जात पण नाही. कोणाच्या तरी अनुभवावरुन च कोणत्या डॉक्टर कडे जायचे ते ठरवतो. जमले तर डॉक्टर कुठल्या विद्यापिठातुन पास झाला आहे हे शोधतो आणि कॉलेज चे नाव कळले तर बेस्टच. तरुण डॉक्टरांना टाळतो. ४५-५० वयाच्या पुढचा असेल तर उत्तमच.
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले तर काय म्हणाल..? डॉक्टरांच्या व्यवसायातल्या गैरप्रकारांचे खापर सातत्याने रुग्णांवरच फोडणे हेही जास्त सिरियस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/07/2015 - 08:49 नवीन
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले तर काय म्हणाल..?
आपले दुर्दैव!!! सर्व गोष्टी आपण कंट्रोल करु शकतो असे वाटु देऊ नये. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी असतात ज्याचा कार्यकारण भाव समजत नाही. बर्‍याच वेळेस आपला काही दोष पण नसतो ( असे आपल्याला वाटते ). ह्या सर्वावर "स्वीकार" हे एकच उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गवि Mon, 12/07/2015 - 08:41 नवीन
मला तर उलट तरुण डॉक्टर्स लेटेस्ट वैद्यकीय ज्ञानाशी जास्त परिचित / संपर्कात असलेले, जास्त शक्यतांचा विचार करणारे, उत्साही, (कदाचित क्लायंटेल एस्टॅब्लिश करायच्या ध्येयाने) जास्त सखोल लक्ष देणारे वाटतात. तुलनेत वयस्कर डॉक्टर जुन्या विचारांचे, शिष्ट - तर्हेवाईक असणं म्हणजेच प्रसिद्ध असणं अशा गटातले, पेशंटला जराशीही वैद्यकीय ज्ञानाची माहिती न देणारे, रुढीप्रिय असतात. सरसकटीकरण नव्हे पण खरंच अनेक जुने डॉक्टर नॉलेज अपडेटच्या बाबतीत जरा साचलेपण आलेले असतात असे अनुभव आले आहेत. पुन्हा एकदा.. हे सर्वांबाबत खरं नसेलही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 12/07/2015 - 08:59 नवीन
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च समजले जातात हो. त्यातल्या त्यात डॉक्टर लोक तर जास्त च तरुण रहातात. :-) पायलट ला नाही का काही हजार तासाचे उडणे गरजेचे असते. तसे डॉक्टर नी काही हजार पेशंट बघितलेले असतील तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 12/07/2015 - 09:38 नवीन
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च समजले जातात हो.
तेही खरंच. शिकून सेटल होईस्तो डोईवर केसांची एलओसी बरीच उत्तरेकडे सरकलेली दिसते अनेकांची. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मार्मिक गोडसे Mon, 12/07/2015 - 10:05 नवीन
स्वार्थ हा असा एकमेव दुर्गुण आहे जो आपल्याला दुसर्‍याकडे असलेला चालत नाही. नैतिकतेच्या गप्पा मारनारे इतर नोकरी, व्यवसायातील अनैतिकता खपवून घेतात. फक्त वैद्यकीय पेशाकडूनच नैतिकतेच्या अपेक्षा ठेवतात. आर्थिक कारणांमुळे सरकारी नोकर्,लोकप्रतिनीधी व इतर व्यावसायीकांमध्ये अनैतिकता वाढली. ह्याला समाजाने विरोध न केल्याने ही आर्थिक अनैतिकता वैद्यकीय पेशातही आली. त्यामुळे फक्त वैद्यकीय पेशालातील अनैतिकतेला टार्गेट करण्याऐवजी सिस्टीममधील इतर अनैतीक कृत्य करनार्‍यांनाही विरोध करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 10:25 नवीन
फक्त वैद्यकीय पेशालातील अनैतिकतेला टार्गेट करण्याऐवजी सिस्टीममधील इतर अनैतीक कृत्य करनार्‍यांनाही विरोध करायला हवा.
तुम्ही किती विरोध करता हो वैद्यकिय अनैतिकतेला? तुम्ही तर इथे मान्यही करायला तयार नाही की अनैतिकता आहे. विरोध तर दूरच राहिला. आणि हो, तुमच्या प्रतिसादावर उत्तर देतो, जरा थांबा. अर्ध लिहिलंय अर्ध बाकी आहे. सवड मिळाली की टाकतो. डोण्ट वरी. कीप बॅकिंग डॉक्टर्स हु डिसॅबल्ड पेशंट्स बट फ्युमिंग ऑन टीचर्स फॉर फ्यु रुपीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 12/07/2015 - 10:57 नवीन
ह्याला समाजाने विरोध न केल्याने ही आर्थिक अनैतिकता वैद्यकीय पेशातही आली.
हे वाचले नाही का तुम्ही? फ्यु रुपीजचा प्रश्न नाही नैतिकतेचा आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 11:08 नवीन
प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून व्यावसायिक अनैतिकतेचा आहे याकडे आपले बहुधा लक्षच नाही. डॉक्टरांना पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी पेशंटचे जीव धोक्यात घालणे किंवा नको त्या शस्त्रक्रिया, महागड्या टेस्टस सांगणे गरजेचे आहे काय? पैसाच कमवायची हौस असेल तर इतर अनेक व्यवसाय आहेत, डॉक्टरांना दैवयोगे बुद्धीमत्ताही चांगली मिळालेली असते. तुम्ही सुरवातीपासून दोन वेगळ्या मुद्द्यांमधे तुलना करुन घोळ घालताय. आर्थिक अनैतिकता आणि व्यावसायिक अनैतिकता ह्यात फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
भ
भंकस बाबा Mon, 12/07/2015 - 12:22 नवीन
मी मालाडला राहतो. माझ्या आसपास बरेचशे डॉक्टर आहेत. त्यात एक नावाजलेले बालरोगतज्ञ आहेत. सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे गर्दी असते. तिथुनच जवळ दूसरे बालरोगतज्ञ आहेत. त्यांच्याकडे मात्र मोजकेच रुग्ण असतात. मला गर्दीचा तिटकारा आहे त्यामुळे मी माझ्या मुलाला कमी गर्दी असलेल्या ठिकाणी घेऊन जातो. एकदा ते डॉक्टर नसल्यामुळे गर्दीवाल्या डॉक्टरकडे जाण्याचा योग आला. आजार होता साधी सर्दी व् वायरल ताप. डॉक्टरांनी सरळ एंटीबायोटिक्स लिहून दिली. माझे पहिले डॉक्टर मात्र साधी ओषधे लिहून देत. मी नंतर माझ्या पहिल्या डॉक्टरांना यासम्बंधि विचारले. त्यांनी सांगितले की आजकाल सर्वाना इंस्टेंट पाहिजे असते . वायरल ताप असेल तर कड़क पथ्य व् साधी ओषधे घेऊन तीन चार दिवसात आराम मिळतो. पण कोणाची तितके थाम्बायची तयारी नसते. बाय द वे तुमचे अनुभव वाचले. पण मला आलेले अनुभव चांगले आहेत. आणि हो जर मला जास्त पैसे देऊन चांगली सेवा मिळत असेल तर मला ते फसवल्यासारखे वाटत नाही. आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भरमसाठ टेस्ट ते करायला लावतात. उत्तम उपाय म्हणजे अशे डॉक्टर टाळणे. पण नंतर गुण नाही आला की तुम्ही बोम्बलणार. डोक्याला मार लागला की सीटी स्कैन करने आजकाल सर्रास् झाले आहे. माझ्या व् तुमच्या लहानपनि अशी स्थिति नव्हती. अहो ऐडमिट पण करत न्हवते. माझे विचाराल तर आता मी नक्कीच सीटी करून घेइन व् नॉर्मल असेल तर घरी येऊन बिनधास्त झोपेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद१९७१ Mon, 12/07/2015 - 12:30 नवीन
आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भरमसाठ टेस्ट ते करायला लावतात.
रिस्क डॉक्टर पेक्षा रुग्णाला असते. त्यामुळे टेस्ट करायची की नाही ते रुग्णानी ठरवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा