Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

क
कोकणप्रेमी
गुरुवार, 12/24/2015 - 09:45
🗣 146 प्रतिसाद
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातुनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मी एक इंग्रजी शिवचरित्र पण लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं लिहुन झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली... मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही मशीद बांधली असं सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की शिवाजी महाराजांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो, ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इना¬म करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी गणपतीवर आरती केली नाही. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चालू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन मशिदींचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी माझ्या इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुस्तकाच्या पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल. एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, त्या पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता..हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगत, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात, ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती, व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी उक्ती सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे.त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महाराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय ते दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर पुण्यात टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे.त्याच्याकडं गावक-यांनी काही कर माफ़ करण्याची विनंतीकेली, ती त्याने मान्य केलीय, ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो ही छापलाय हं! कमल गोखल्यांनी लिहिलेले जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय, तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या त्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं. त्यांचे जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन हे नाव ब-याच जणांनी ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्या हेन्री रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, त्याने महाराजांना ओळखलं होतं. तो त्या वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत! असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाच्या प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो.नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील तर, सुंदर नारायणाचं देऊळ आहे नाशिकमधे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे ही कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे असे वाटेल कोणाला, पण शिवाजीमहाराजांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं होतं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आहे, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाही वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही, ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी. तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो मला म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? तो म्हणे, औरंगाबाद म्हणून एक शहर आहे ना तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला आज लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी त्या शहराचे सरकारी नाव अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. असे जगात कुठे ही नाही. उदाहरण मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावानी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावानेही मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख! असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. १६५८ सालचं अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? १६५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला होता फ़त्तेखान हा सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाही वर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते, १० मार्च १६५७ पर्यंत, त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितली, एवढी ३ आहेत. १६५७ नंतर यांचं नख सुद्धा कुठे दिसत नाही. हे कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं १६५८ साली स्वराज्याला शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. १६५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा, मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळांत जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठली ही जात म्हणायची आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला हिंदू करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला पुन्हा हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल हा हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता शिवाजीमहाराजांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता.दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारत जेंव्हा स्वतंत्र झाला १९४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते. भारतीय नव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळप होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं,मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालानंतर हकीकत लिहिलेली अाहे आणि काय लिहिलय ? की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे. तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते. त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक.. दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते. नव्हतेच... आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरचा काही पगार जात नव्हता. त्यांच्याच पदरचा जाणार होता, तुम्हाला सांगायला माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे, लोकं तुम्हाला खोटं काहीतरी अलिकडं सांगत असतात म्हणून नाईलाजानं मला तुम्हाला हे खरं काय आहे ते सांगायला लागलं.... मला वाटतं गुरुजी थांबू का? (संभाजीराव भिडे गुरुजी) ५ मिनिटं बोलू?...बरं... मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ हटकून परत बांधलं,, हटकून का म्हटलं? हट्टी पणानं का बांधलं? त्यांनी हट्टीपणानं पाडलं म्हणुन यांनी हट्टीपणानं बांधलं तशा आणखी २ गोष्टी त्यांच्या आयुष्यात अहेत. एकतरराजव्यवहारकोष...म्हणजे मराठी भाषेत फ़ारसी शब्द फ़ार आले होते...आणि कशामुळं आले होते?आपणहून देवाण स्वाभाविक देवाण घेवाणीतनं आले नव्हते ...जबरदस्तीनं त्यांचं राज्य असल्यामुळं आले होते. ते काढण्याकरता त्यांनी राजव्यवहारकोष रचून घेतला.. त्यात असं म्हटलंच आहे की यवनांच्या भाषेमुळं मराठी भाषा दुषित झाली आहे, ती शुद्ध करण्याकरिता राजव्यवहारकोष रचलाय... असं त्याच्या प्रस्तावनेत सांगितलंयं...२ गोष्टीतलं साम्य बघा..जबरदस्तीनं देऊळ पाडलं...त्यांनी जबरदस्तीनं देऊनळ बांधलं...जबरदस्तीनं भाषेत शब्द शिरले, त्यांनी जबरदस्तीनं बाहेर काढले आणि अशीच तीसरी गोष्ट आहे नेतोजी पालकर...राहिला असता मुसलमान, काय बिघडत होतं? सगळं धर्म सारखे आहेत ना, लोकं म्हणतात, नाहियेत! पूर्ण वेगवेगळे आहेत! अजिबात सारखे नाहीत... खोटं बोलतात. कुठल्याच धर्माची माहिती नसलेले लोक असं बोलतात. सर्व धर्म पूर्णपणाने वेगवेगळे आहेत. आणि मी जेंव्हा हिंदू म्हणतो, तेंव्हा भराताच्या राज्यघटनेच्या २५ व्या कलमात हिंदु शब्दाची जी व्याख्या आहे, ती काय व्याख्या आहे? त्यात हिंदू आहेत, म्हणजे पारंपारिक हिंदू, ग्यानबा तुकाराम करणारे तुमच्या माझ्यासारखे, शीख आहेत...जैन आहेत...बौद्ध आहेत....हे सर्व लोक हिंदू या शब्दाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घातलेले आहेत. आणि तोच अर्थ मला कायम सुरुवातीपासून आत्ता पर्यंत अभिप्रेत आहे, दुसरा कुठला अर्थ माझ्या मनात नाही. एवढाच अर्थ मला येतो. तेंव्हा तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की राहिला असता नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार! तीन गोष्टी आहेत बघा! तुम्ही भाषा दुषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणुस दुषित केलात , मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दुषित केलंत, मी ते शुद्ध करणार...हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले, आपण सामान्य माणुस.... गुरुजी थांबतो. (समाप्त) श्रीराजाशिवछत्रपति-चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे व्याख्यान स्थळ : श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदीर, पुणे दिनांक: अधिक आषाढ वद्य नवमी शके १९३७, शिवशक ३४२ (१० जुलै २०१५)
वर्गीकरण
इतिहास
चर्चा

प्रतिक्रिया द्या
25342 वाचन

💬 प्रतिसाद (146)
क
कपिलमुनी गुरुवार, 12/24/2015 - 10:21 नवीन
लेख उत्तम आहे ! मिपावर मालोजीरावांसारखे इतिहास प्रेमी आहेत. आणि इतर अभ्यासक आहेत त्यांचे प्रतिसाद यावेत ही अपेक्षा ! चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 10:25 नवीन
मेहेंदळे म्हणजे प्रश्नच नाही. शिवचरित्राचा चालताबोलता एनसायक्लोपिडीया आहेत ते.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 10:31 नवीन
केवळ तीन-चार उदाहरणांवरून शिवाजी कट्टर हिंदूत्ववादी होते(मुस्लिमविरोधी) असे म्हणता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/24/2015 - 11:20 नवीन
मग काय म्हणता येते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
न
नाखु गुरुवार, 12/24/2015 - 12:24 नवीन
सध्या तुष्टीकरणाचे आणि दाढी कुरवाळण्याचे पुरावे नाहीत, तेव्हा (तयार केल्यावर) येतील ते.. बरीच खेडेकरांची पुस्तके+फुत्कारी संदर्भ गोळा करून मगच येणार आहेत. आहेस कुठे ????? प्र.मात्र गपगुमान नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 12:41 नवीन
स्वधर्माविषयी सर्वांनाच अभिमान असतो,तसा त्यांनाही होता. आपले राज्य असावे अशी त्यांची मनापासून इच्छा असायची,शिवाय चारी बाजूंना मुस्लिम शत्रू होते ही त्यावेळची परिस्थिती होती. पण याचा सोयीस्कर अर्थ आपण लावता कामा नये. आदिलशाही जेव्हा खिळखिळी झाली शिवाय तिकडे दुष्काळी परिस्थितीने हाल होत होते,तेव्हा शिवाजी महाराजांनी तिकडे धान्य पाठवले होते.(संदर्भ→ संभाजी-विश्वास पाटील) आणि महाराज-कुतूबशहा भेट ही विसरून चालणार नाही.(यासाठी संदर्भाची गरज नाही,तरीसुद्धा राजा शिवछत्रपती-बा.पुरंदरे) -शिवाय शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले आहे याचा पुरावा सुद्धा→राजा शिवछत्रपती -स्वराज्य कार्यात जे कोणी आडवे आले त्यांचा बिमोड महाराजांनी केला. मग ते चंद्रराव मोरे,खंडोजी खोपडे,बाजी घोरपडे असोत अथवा कृष्णाजी भास्कर असोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 12:45 नवीन
खेडेकरांची पुस्तके+फुत्कारी संदर्भ गोळा करून मगच येणार आहेत.
नेमकं याच्या उलट मी तुमच्याविषयी बोलू शकतो.पण मी तसे करणार नाही कारण मी ब्रिगेडी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/24/2015 - 10:44 नवीन
निव्वळ अप्रतिम !
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 12/24/2015 - 10:53 नवीन
आणि हिंदू म्हणजे फक्त ब्राह्मण किंवा उच्चवर्णीयच असे अभिप्रेत नाहीत हेही सांगीतले ते बरे !! मालोजीरावांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.. (बॅट्या नाही तेव्हा तपशीलवार माहीती साठी फक्त मालोजीरावांकडेच तलवार-ढाल आहे). (बॅट्या बॅन असल्याची खंत अश्या धाग्यांवर जास्त प्रकर्षाने वाटणारा.) प्र.मात्र खंतावलेला नाखु.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 12/24/2015 - 12:20 नवीन
+१ ब्याट्याची उणीव अगदी ठळकपणे जाणवून देणारा धागा आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 12:21 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कपिलमुनी गुरुवार, 12/24/2015 - 12:32 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/24/2015 - 13:05 नवीन
+४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मालोजीराव गुरुवार, 12/24/2015 - 13:08 नवीन
ब्याट्या को वापीस लाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाव आडनाव गुरुवार, 12/24/2015 - 13:21 नवीन
+६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मी-सौरभ गुरुवार, 12/24/2015 - 13:56 नवीन
चर्चा वाचण्यास ऊत्सुक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
अ
अभ्या.. गुरुवार, 12/24/2015 - 15:18 नवीन
+८ ब्याटया यायलाच हवा. अशा चर्चाना त्याच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाशिवाय रंग नाही. तसे व्यासंगी प्रतिसाद दूसरे कोण देऊ शकेल असेही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
क
किसन शिंदे गुरुवार, 12/24/2015 - 17:30 नवीन
+९ बँन उठवायला हवा आता मालकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संदीप डांगे गुरुवार, 12/24/2015 - 18:42 नवीन
+१० He's the hero Gotham deserves, but not the one it needs right now. So we'll hunt him. Because he can take it. Because he's not our hero. He's a silent guardian, a watchful protector. A dark knight.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
स्पा Fri, 12/25/2015 - 03:01 नवीन
+१२२०००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/25/2015 - 03:15 नवीन
+१२२०००००००००००००००००००००
+++++ अजून +१२२००००००००००००००००००००० टू पां डुब्बा! हमारी मांगे पुरी करो,खाटूक म्यान कु वापिस लाओ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मदनबाण Sat, 12/26/2015 - 05:47 नवीन
मालकांना { ज्या काही कारणांनी हे झाले असेल ते सुद्धा लक्षात घेउन } नम्र विनंती ! जे कोणी मिपाकर... उदा. बॅट्या, टक्या, विश्वनाथ मेहेंदळे इं बॅन झाले असतील तर त्यांना पुन्हा एकदा संधी ध्यावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ला.ला.ला... :) :- Poi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मृत्युन्जय Sat, 12/26/2015 - 09:23 नवीन
+१४००००००००००००००००००००००००००००००००००० बॅट्ञाची अनुपस्थिती खुपच जाणवते आहे. झाले गेले त्यावर पडदा टाका आणि त्याला परत आणा. तद्वतच टक्याची अनुपस्थिती देखील जाणवते आहे (या धाग्यावर नाही हा) आणि हो विमे राहिले. त्यांच्या घरवापसीला देखील अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/24/2015 - 21:06 नवीन
बॅट्या बॅन झाला ?? काय झालं काय म्हणायचं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
S
sagarpdy Sun, 12/27/2015 - 10:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मोहन गुरुवार, 12/24/2015 - 11:00 नवीन
धन्यवाद कोंकणप्रेमी. तसदी घेउन इतक्या माहीतीपुर्ण व्याख्यानाचा लाभ आम्हाला दिल्या बद्दल.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 12:57 नवीन
म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा!
समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/24/2015 - 13:07 नवीन
समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतं
काहीही हां प्रदीप ! =)))) महाराजांनी स्वतःच आपला वंश सिसोदिया वंशाशी अर्थात राजपुतांशी जोडलेला आहे हे राज्याभिषेकाच्या वेळेस दाखवुन दिले होते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 13:31 नवीन
ते एक उदाहरण म्हणून दिलं आहे. राजपूत काढून पोर्तुगीज घ्या हवं तर! 'पोर्तुगीजक्षयदीक्षित' . . . आता त्यावेळी पोर्तुगीज कमी प्रमाणात होते असं म्हणू नका.it's only उदाहरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मालोजीराव गुरुवार, 12/24/2015 - 13:00 नवीन
शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य हे हिंदू प्रो राज्य म्हणूनच स्थापित झालं , मेहेंदळे सर बरोबर सांगत आहेत. अनेक मराठे,राजपूत,ठाकूर,जाट मोगलांकडून मराठ्यांशी लढले तसेच अनेक मुस्लिम मराठ्यांकडून मोगलांशी हि लढ्लेत. शिवाजी महाराज सहिष्णू होते याची उदाहरणे सुरतच्या स्वारीत, दक्षिण स्वारीत पाहायला मिळतात. पण जिथे मंदिरांना क्षति पोचवून मशीद,दर्गे निर्माण झाले ते छत्रपतींनी जमीनदोस्त केले. उदाहरण बघायचं तर दक्षिणेतील प्रसिद्ध देवस्थान व्रीद्धाचलम म्हणता येईल. येथे मंदिराच्या आवारातील मशीद आणि दर्गा काढण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ओल्ड गोव्या जवळच्या जुवे बेटावरच महत्वाच धार्मिक ठिकाण असलेलं स्टीफन्स चर्च पेटवून दिलं होतं. इनिक्विसिशन च्या विरोधातली हि प्रतिक्रिया होती. हिंदुत्ववादी,पुरोगामी अश्या गोष्टीत शिवराय बांधण्यापेक्षा मी याला 'जशास तसे ' वर्तन म्हणेन .
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 13:40 नवीन
मराठ्यांच्या सैन्याने चर्च पेटवले हे खरं आहे,कारण गोव्यामध्ये पोर्तुगीज हिंदूचा फार छळ करीत होते. पण संभाजींनी तसा आदेश दिला होता का? विश्वास पाटील नाही असे म्हणतात, . . पण कदाचित आदेश दिला असेल कारण संभाजी महाराज फारच शीघ्रकोपी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव Sat, 12/26/2015 - 06:21 नवीन
पण संभाजींनी तसा आदेश दिला होता का? विश्वास पाटील नाही असे म्हणतात
विश्वास पाटील इतिहासकार आहेत काय ? कादंबरी म्हणून चांगली असली तरी संभाजी पुस्तकात अनेक चुका आहेत.
पण कदाचित आदेश दिला असेल कारण संभाजी महाराज फारच शीघ्रकोपी होते.
काय संबंध, संभाजी राजे उत्तम राजकारणी होते. एखादी मोहीम काढल्यावर युद्धखर्च निघून वर निधी साठत असेल तरच अश्या मोहिमा मराठे काढायचे. त्यामुळे गोव्याची स्वारी पूर्वनियोजित होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 13:12 नवीन
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत
मग ती इनामं बंद सुद्धा पाडता आली असती पण महाराजांनी ती पाडली नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कर्ण-२ गुरुवार, 12/24/2015 - 13:24 नवीन
अशा नकारतमक डोक्यानेच 'research' केलाय का आजोबा …… लेखात फ़्क़्त नाही,नाही अशीच वाक्ये आहेत … तुम्हाला लेख लिहायचा आहे तर तो माहितीप्रधान पाहिजे, 'धर्म'प्रधान नाही बरा आपण जदुनाथ सरकार वाचला आहे का …
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 14:01 नवीन
Is JAdunath sarkar somekind of standard?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्ण-२
क
कर्ण-२ गुरुवार, 12/24/2015 - 14:04 नवीन
वरच्या लेखच्या 'रीसेर्चर' पेक्षा standard तर जास्तच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 16:15 नवीन
Sorry, I cant write in Devnagari from here, Coming to the point, While nobody doubts Jadunath Sarkars contribution, It should also be noted that his work is primarily based on Mogul and British resources. secondly, His work is at least 100 year old, Thirdly Jadunath Sarkars research on Shivaji is a byproduct of his research on Aurangzeb, seen in the same light. Jadunath has no access to primary Maratha documents which is enjoyed by later researchers. Dr Mehandale is a serious researcher and placed atleast 3 generations after Jadunath Sarkar, obviously with more information and exposure. I have no doubt about the authenticity of information and proofs he is sharing. If you have anything contradictory, please share. You may have different opinion but it should be based on proofs and not on feelings.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्ण-२
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 16:22 नवीन
सहमत आहे. ह्याशिवाय जदुनाथ सरकारांना मोडी लिपी येत नव्हती त्यामुळे समकालीन मराठी साधनांतून त्यांना संशोधन करता आले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/24/2015 - 16:48 नवीन
त्यांनी जदुनाथ सरकारांवर टीका केलेली आहे. संगमनेर हे नाव संगंनेर असं लिहिलेलं त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी शहानिशा न करता ते खुशाल राजपुतान्यामधील सांगानेर असं दडपलं असा काहीसा तो संदर्भ आहे. बाकी जदुनाथ सरकारना सर ही पदवी मिळाली यातच सगळं आलं. ब्रिटिशांचे बूट चाटल्याशिवाय त्यांना ती मिळाली असती का? त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास हा कितपत ग्राह्य धरायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 17:01 नवीन
बाकी जदुनाथ सरकारना सर ही पदवी मिळाली यातच सगळं आलं. ब्रिटिशांचे बूट चाटल्याशिवाय त्यांना ती मिळाली असती का? त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास हा कितपत ग्राह्य धरायचा?
ह्याच्याशी मात्र असहमत. तत्कालीन परिस्थितीतल्या उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांनी इतिहास लिहिलाय. हा पूर्णपणे अचूक नाही तरीही जदुनाथ सरकारांचे एक अव्वल दर्जाचा इतिहासकार म्हणून असलेले मोल कमी होत नाही. मोडी लिपी न येणे, मराठा दफ्तर अभ्यासास न मिळणे, महाराष्ट्राचा भूगोल कमी प्रमाणात माहीत असणे, मुख्यत: औरंगजेबाचा इतिहास अभ्यासताना शिवाजी राजेंचा इतिहास एक बाय प्रॉडक्ट म्हणून अभ्यासणे ह्यामुळे त्यांच्या मराठेशाहीच्या इतिहासात काही त्रुटी आहेत. मात्र ह्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. ते निश्चितपणे एक श्रेष्ठ दर्जाचे इतिहासकार आहेत. अगदी आपल्याकडे पाहता रियासतकार सरदेसाई ह्यांनी लिहिलेल्या मराठा रियासतीतही बऱ्याच त्रुटी आहेत. अगदी इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी लिहिलेली काही मतेही एकांगी आहेत मात्र ह्यामुळे त्यांनी केलेले कार्य गौण दर्जाचे ठरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सतिश गावडे गुरुवार, 12/24/2015 - 17:27 नवीन
इतिहास संशोधनाकडे काळ्या आणि पांढऱ्या या दोनच रंगात न पाहता इतिहासकारांच्या मर्यादा लक्षात घेऊन अशी सामंजस्याची भुमिका खचितच कुणी घेऊ शकेल. मानलं तुम्हाला आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 17:37 नवीन
हा आपला मोठेपणा आहे गावडे सर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
किसन शिंदे गुरुवार, 12/24/2015 - 19:16 नवीन
गावडे सर, या एकाच गोष्टीसाठी तर फॅन आहोत आम्ही प्रचेतस (श्यॅ, काय नावे) सरांचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/24/2015 - 19:57 नवीन
या एकाच गोष्टीसाठी तर फॅन आहोत आम्ही प्रचेतस (श्यॅ, काय नावे) सरांचे. ;)
एकाच ह्या शब्दावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत आहे :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/25/2015 - 03:19 नवीन
किसनराव जी शिंदे पाटलांशी कचकून सहमत.. =)) पण आंम्ही वि डमबक आगोबाचेही फ्याण आहोत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
न
नाखु Sat, 12/26/2015 - 04:21 नवीन
प्रस्ताव कर्ता आणि सहमती वाले दोघांचेही पंखे आहोत. प्र.मात्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/25/2015 - 15:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/24/2015 - 18:37 नवीन
पण सर ही पदवी निव्वळ त्यांच्या इतिहाससंशोधनामुळे त्यांना मिळाली असेल असं वाटत नाही. राजवाडे आणि शेजवलकर हे कमी दर्जाचे इतिहासकार नक्कीच नव्हते पण त्यांना सरकारी मानमरातब न मिळणं आणि जदुनाथ सरकारना मिळणं यामागे निःपक्षपाती दृष्टीकोन दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
राही Fri, 12/25/2015 - 13:43 नवीन
प्रतिसाद फारच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/24/2015 - 17:22 नवीन
You may have different opinion but it should be based on proofs and not on feelings. यासाठी २००% सहमती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा