काटा वजनाचा -१
डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही.
पण आम्ही काही खातच नाही.
आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही.
वजनाचा काटाच बरोबर नाही
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो
वजनाचा तक्ता चूक आहे किंवा
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो.
आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते.
आता फक्त उपास करणे बाकी आहे.
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?
आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत.
माझे वजन बरोबर आहे फक्त उंचीच थोडी कमी आहे.
बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही.
दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ?
मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं
मेनो पॉज नंतर वजन वाढतंच
पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं
हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात.
यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही.
खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे.
बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन फार जास्त आहे आणी आपण ते कमी करावे असे वाटत नाही. यामुळे जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे. https://en.wikipedia.org/wiki/Denial
वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या
आज जगात ९२ कोटी लोक भुकेलेले आहेत तर १५० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत.
जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात.
लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत.
अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात.
दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत.
वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते.
जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत.
शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे जास्त चांगले परिमाण आहे.
यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी.
यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा
वजनदार माणूस BMI २५ ते ३०
आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त.
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३३.८५ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे.
उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे.
http://halls.md/body-mass-index/av.htm
यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावऋण आपल्याला पाहता येईल
हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine.
तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल).
रच्याकने-- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते
क्रमशः
- काटा वजनाचा -२
- काटा वजनाचा -३
- काटा वजनाचा --४
- काटा वजनाचा --५
- काटा वजनाचा --६
- काटा वजनाचा --७
- वजनाचा काटा -८
- वजनाचा काटा --भाग ९
Book traversal links for काटा वजनाचा -१
💬 प्रतिसाद
(74)
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2016 - 15:45
नवीन
रक्तवाहिन्यांची लवचिकता, चांगल्या कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण राखण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात वंगण असणे आवश्यक असते जे या तुपातून मिळते
याला कोणता शास्त्राधार आहे? आमच्या एका नातेवाईकांना हृदय विकाराचा झटका आल्यावर पुण्यातील एका प्रथितयश वैद्यराजांनी तुमच्या कॉरोनरीमध्ये वंगण कमी झाले आहे रोज एक वाटी तूप प्या असा सल्ला दिला.
परिणाम-- एक वर्षातच त्यांना बायपासची शल्यक्रिया करण्याची पाळी आली.
शुद्ध तूप चवीपुरतेच घ्यावे.औषध म्हणून रोज घेणे हितकारक नाही ते वनस्पती( डालडा) पेक्षा चांगले असले तरी इतर वनस्पती तेलांपेक्षा( शेंगदाणा, तीळ, तांदूळाचे तूस या तेलांपेक्षा) जास्त चांगले नक्कीच नाही. अति सर्वत्र वर्जयेत.
उगाच जुन्या शास्त्रांचा आधार घेऊन आजच्या काळात वागणे महाग पडू शकते. १९७० च्या अगोदर( हरितक्रांती पूर्वी) भारतवर्षाच्या इतिहासात लोकांकडे मुबलक अन्न कधीच नव्हते. दुष्काळ हा भारत वर्षाच्या पाचवीला पुजलेला होता. तेंव्हा माणसे कुपोषणाने मरत. लठ्ठपणाने नव्हे. हि अतिसेवनाची साथ गेल्या ४०-५० वर्षातील आहे.
त्यावेळेसच्या "ऋणे कृत्वा घृतं पिबेत? सारख्या म्हणी त्या काळानुसार होत्या. तेंव्हा तसे वागणे बरोबर होते आता नाही.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 01/01/2016 - 15:53
नवीन
मी योग्य प्रमाणात म्हणतोय - वाटीभर तूप हे अयोग्यच.
तरीही तुमचे म्हणणे जास्त योग्य आहे कारण तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहात.
माझे विधान मी मागे घेतो.
(खजील)रंगा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2016 - 16:03
नवीन
साहेब,
खजील व्हायची गरज नाही. वरण भातावर जरूर तूप घ्या
पण तुपात थबथबलेली घारी,मैसूरपाक, मोहनथाळ, जिलबी, मालपुवा ई. किती खायचं यावर नियंत्रण असावे एवढेच म्हणणे आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2016 - 16:05
नवीन
किंवा पुरणपोळीवर तूप जरूर घ्या.
पण तुपात भिजून तूप ओघळेल एवढे तूप पुरणपोळीवर घेणे कितपत योग्य आहे? आता स्पा किंवा नीलमोहर ती यांनी घेतले तर योग्य आहे.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 01/01/2016 - 16:08
नवीन
खरंय! :)
(पुरणपोळीप्रेमी)रंगा
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 12/31/2015 - 23:36
नवीन
काटा बोले ना काटा चाले ना
आम्ही खंत करू काही केल्या
खाली सरके ना
- Log in or register to post comments
म
मोगा
Fri, 01/01/2016 - 10:30
नवीन
१ वेळ poLeebhàji व एकवेळ्सॅलड खाउन , रोज चार किमी चालुनही ७२ किलोच आहे.
( औरंगजेब ) दद्दूचा फॉर्मुला वापरावा म्हणतोय.
१ वेळ जेवा
३ मैल चाला
५ वेळा अल्ला म्हणा
७ वेळा पाणी प्या
९ ० वर्षे जगा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2016 - 13:40
नवीन
उस्ताद मोगा जी
इथे पण सोयीचा बदल करून घेतला काय? ३ मैल चालणं आणि ७ वेळा पाणी ?
आलमगीराचं नुसतं नाव घ्यायचं?
१ वेळा "च" जेवायचं( दुपारी)
३ वेळा फक्त पाणी प्यायचं ( न्याहारी, दुपारचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणा ऐवजी)
५ वेळा नमाज पढायचा
७ मैल चालायचं
९० वर्षं जगायचं
असं आहे ते खरं
- Log in or register to post comments
म
मोगा
Fri, 01/01/2016 - 13:47
नवीन
मी दद्दूचा इतिहास वाचून सहज फॉर्मुला तयार केला होता...
तुमचा फॉर्मुला जास्ती सायंटिफिक वाटतो.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 01/01/2016 - 13:58
नवीन
मालिकेसाठी धन्यवाद डॉक! गेल्या वर्षी काही मैत्रिणींच्या मदतीने चालणे+एरोबिक्स सुरु केले. खाण्यात श्रीरंगाने सांगितले ते शक्य तेवढे अंमलात आणत आहे. पहिल्या ३ महिन्यात ५ किलो वजन कमी करता आले. आता ते शरीराला अतिरिक्त भार होणार नाही इतक्या लेव्हल ला आणणार आहे. या मालिकेचा त्यासाठी खूप उपयोग होईल.
- Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक
Tue, 01/05/2016 - 08:06
नवीन
पैसाताई, मी सुद्धा 'गिरकी' ने दिलेल्या टिप्स वापरत आहे. रोज चालणेहि सुरु केले आहे. तू इथे उल्लेख केलेले 'खाण्यात श्रीरंगाने सांगितले' हे काय आहे? धागा असेल तर इथे द्यावा.
डॉक्टर साहेब, लेखाची सुरुवात छान झाली आहे. आता प्रत्यक्ष टिप्सच्या प्रतीक्षेत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 01/05/2016 - 22:05
नवीन
कृपया वरचा हा प्रतिसाद वाचावा...
- Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक
Wed, 01/06/2016 - 07:15
नवीन
धन्यवाद श्रीरंग
- Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे
Sat, 01/02/2016 - 12:18
नवीन
डॉक्टर, आहारनियमनाचा सारांश कुठेही इतका सुंदर दिला नसेल. आवडला.
आपली मालिकाही किती मोलाची असणार आहे, हे ह्या नमनाच्या लेखावरूनच स्पष्ट होत आहे.
आपली वर्णशैली नर्म विनोदी, खुसखुशित आणि सर्वत महत्त्वाचे म्हणजे अत्यंत यथातथ्य आहे.
मालिकेतील यापुढील परखड प्रबोधनाच्या प्रतीक्षेत अधीर आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sat, 01/02/2016 - 17:09
नवीन
BMI सोबत बॉडी फॅट इंडेक्सबद्दलही लिहिणार का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 01/03/2016 - 15:38
नवीन
बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body adiposity index) : https://en.wikipedia.org/wiki/Body_adiposity_index
हे सकृतदर्शनी उत्तम असे परिमाण वाटले होते परंतु एक तर तो मोजणे हे फार कटकटी चे आहे आणी BMI इतके सोपे आणी सहज परत परत वापरण्यासारखे नाही.
शिवाय A detailed study published in 2012 concluded that estimates of body fat percentage based on BAI were not more accurate than those based on BMI, waist circumference, or hip circumference.
यास्तव आणखी जास्त गुंतागुंत न करण्यासाठी मी ते यात उधृत करणे टाळले आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Tue, 01/05/2016 - 04:26
नवीन
पण मग अर्नॉल्ड श्वार्झनेगरचीही बीएमआय चुकीची येईल. त्यामुळेच, सोबत फॅट इंडेक्स मोजणे गरजेचे आहे. ही इंडेक्स मोजताना शक्यतो स्किन फोल्ड थिकनेसवरून मोजलेल्या उत्तम. परंतु, मान, पोट, कंबर, नितंब, मांड्या, दंड, व मनगटाचा घेर मोजूनही बॉडी फॅट इंडेक्स वा परसेंटेज सहजपणे काढता येते.
तुम्ही दिलेल्या इंग्रजी वाक्यात फॅट परसेंटेज मोजणे हेच कमी अॅक्युरेट वा चुकीचे आहे, असे म्हटलेले नसून, "अ" प्रकाराने मोजलेली टक्केवारी "ब" प्रकारे मोजलेल्या प्रकारापेक्षा जास्त अॅक्युरेट नाही इतकेच म्हटलेले आहे. तेव्हा त्या इंग्रजी वाक्याचा संदर्भ लक्षात आलेला नाही.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Tue, 01/05/2016 - 04:33
नवीन
उदाहरणादाखल सांगतो,
माझी उंची ५.११ फूट असून वजन ८२ आहे. यानुसार बीएमआय २५.१० म्हणजे ओबेसिटी दाखवणारी येईल.
पण फॅट इंडेक्स १७.०२ आहे. याचा अर्थ असा की मी वेट रिडक्शन करू जाता मसल मास लॉस करावा लागेल. हे करणे योग्य की अयोग्य?
यासाठी आपणास फॅट इंडेक्सबद्दल दोन वाक्ये लिहिण्याची विनंती केलेली होती.
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 01/05/2016 - 08:31
नवीन
BMI/ Fat index या दोन्ही मोजणीत एक गोष्ट समजत नाही ती म्हणजे स्नायू व हाडांच्या वजनाचे प्रमाण. त्याचे योग्य प्रमाण काय असावे?
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Mon, 01/04/2016 - 03:57
नवीन
धन्यवाद . काटा काळजात घुसला .
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Mon, 01/04/2016 - 03:58
नवीन
धन्यवाद उपयुक्त माहितीबद्दल . काटा काळजात घुसला .
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 01/04/2016 - 05:19
नवीन
आज काल बिन काट्याचे काटे असतात वजन मोजायला. डिजिटल.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 01/04/2016 - 11:09
नवीन
उत्तम! पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
आवडीचा विषय. तुमची मांडणी मस्तच आहे..
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 01/05/2016 - 10:56
नवीन
आवडीचा विषय, वजन आटोक्यात आहे तरी पोटावर बिस्कीटं पडावीत अशी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे. ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2