फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.
१. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा.
२. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या.
३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा.
४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.
५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं.
६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात.
७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला.
८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी.
१०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं.
११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला.
१२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती.
१३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली.
१४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले.
या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतंमुळात जर तरच्या गोष्टी कशासाठी करायच्या? आणि फॅसीझम, लोकशाही, साम्यवादासंदर्भात लेखन करायचे असेल तर थोडे तरी विश्वासू संदर्भ असावेत. येथे लेख लिहिला आहे, आवेशपूर्ण प्रतिसाद दिला आहे आणि मतप्रदर्शन केले आहे. मग जर तर असे कशला? आहे ते आहे.असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन.हेही मान्य. दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey..सहमत.म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.सहमत. मात्र हा सर्व प्रकार करताना निदान स्वत:शी आणि स्वत:च्या उद्देशाशी प्रामाणिक असणे आणि निघालेले निष्कर्ष मान्य करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.टीका पॉझीटिव्हली घेण्याबाबत कसे असते.. हिंदू धर्म, भारत देश यांच्यावर टिका करण्यासाठी फारशी पात्रता लागत नाही आणि तसेही हिंदू लोक्स संघटित उपद्रवमूल्य बाळगून नाहीत. त्यामुळे इतके दिवस "मी म्हणते तोच मौत का सौदागर" आणि "मी म्हणतो तोच हिंदू कम्युनल" अशी परिस्थिती होती. आता अशा अन्याय्यपणे होणार्या टिकेला थोडेफार प्रत्युत्तर* मिळाले की असहिष्णुता, विचारांची गळचेपी, हुकुमशाही वगैरे कोल्हेकुई सुरू होते. ..आणि उदो उदोचा प्रश्न सगळीकडेच अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे त्यामध्ये काहीही नवीन नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की.. ऐतवडे बुद्रुकमध्ये एखादा माजी उपसरपंच काही बोलला की ते विधान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून आल्यासारखे न्यूज चॅनल दिवसरात्र दाखवत बसतात आणि त्यावर विश्वास ठेवून तथाकथीत विद्वान विचारवंत संस्थळांवरती मतप्रदर्शन करतात. *प्रत्युत्तर न्याय्य आहे की नाही ते त्या त्या घटनेवर अवलंबून आहे. "मोदींवर टीका करणार्यांनी पाकिस्तानात जावा", "राम मानत नाही म्हणजे हराम" हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच.