Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६

ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/24/2016 - 13:13
🗣 163 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकांचे पडघम वाजू लागलेच आहेत.त्यासंदर्भातील घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे. या निमित्ताने मला जेवढी अध्यक्षीय निवडणुकांविषयीची माहिती आहे ती सर्वप्रथम लिहितोच.त्यातील चुका/त्रुटी दाखविणे, नवीन माहितीची भर टाकणे इत्यादी गोष्टी मिपाच्या परंपरेप्रमाणे होतीलच.मराठी आंतरजालावर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांसाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल असे स्वरूप या धाग्याला द्यायचा उद्देश आहे.तो उद्देश कितपत साध्य होतो हे बघू. भारतात कुठल्याही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडणे ही प्रक्रिया बरीचशी अपारदर्शक असते.म्हणजे वेगवेगळे पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर करतात पण नक्की कोणत्या आधारावर हे उमेदवार निवडले या प्रश्नाचे नक्की उत्तर नसते. अमेरिकेत मात्र अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार निवडण्यासाठीची प्रक्रिया ठरलेली आहे. अमेरिकेतील दोन महत्वाचे पक्ष--डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन आपले अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्‍या पक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनात निवडतात.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ रोजी ओहायो राज्यात क्लिव्हलँड येथे तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ रोजी पेन्सिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया या ऐतिहासिक शहरात होणार आहे.या अधिवेशनांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ प्रतिनिधी तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे एकूण ४७६४ प्रतिनिधी त्यांच्या पक्षांचे उमेदवार निवडणार आहेत.निवडणुकांसाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी या प्रतिनिधींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे अनुकूल मत मिळणे गरजेचे आहे. म्हणजेच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी १२३७ तर डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी २३८३ मते मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून नक्की कोण सहभागी होणार याची निवड विविध राज्यांमधील प्रायमरी आणि कॉकस यातून होते.काही राज्यांमध्ये प्रायमरी होतात तर काही राज्यांमध्ये कॉकस होतात.प्रायमरी आणि कॉकस यांच्यातील फरक म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रायमरी म्हणजे त्या त्या राज्यातील राज्य सरकारने घेतलेल्या सरकारी खर्चाने घेतलेल्या निवडणुका असतात तर कॉकस म्हणजे विविध ठिकाणी पक्षाने स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे असतात. प्रायमरी या निवडणुका म्हणजे नोव्हेंबर मध्ये होणार्‍या निवडणुकीसारखी छोटेखानी निवडणुकच असते.प्रायमरी मध्ये कोण मतदान करू शकतो? तर हे नियम राज्यांप्रमाणे बदलतात.ओपन प्रायमरीमध्ये त्या राज्याच्या मतदारयादीत नाव असलेला कोणीही मतदार आपले मत देऊ शकतो तर क्लोज्ड प्रायमरीमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात.त्याचप्रमाणे ओपन कॉकसमध्ये त्या राज्यातील कोणीही आणि क्लोज्ड कॉकसमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात. प्रायमरीमधील मतदान प्रत्यक्ष निवडणुकांमधील मतदानाप्रमाणेच (मतपत्रिका/मशीनद्वारे) तर कॉकसमधील मतदान खुल्या पध्दतीने--एक तर हात वर करून किंवा संबंधित उमेदवाराच्या समर्थकांना गटांमध्ये एकत्र करून होते. अमेरिकेतील राज्यांपैकी केवळ अलास्का, कोलोरॅडो, हवाई, कॅन्सस, मेन, मिन्नेसोटा, नेवाडा, नॉर्थ डॅकोटा, वायोमिंग आणि आयोवा या राज्यांमध्ये कॉकस तर इतर सर्व राज्यांमध्ये प्रायमरी होतात. दोन्ही पक्ष विविध राज्यांमधून राष्ट्रीय अधिवेशनासाठी नक्की किती प्रतिनिधी जाणार याचे आकडे ठरवितात. उदाहरणार्थ डेमॉक्रॅटिक पक्षाचे कॅलिफॉर्नियामधून ५४६ तर व्हर्जिनियामधून १०९ प्रतिनिधी आहेत तर रिपब्लिकन पक्षाचे या दोन राज्यांमधून अनुक्रमे १७२ आणि ४९ प्रतिनिधी आहेत.या प्रतिनिधींमध्ये दोन प्रकारच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. पहिला प्रकार असतो तो म्हणजे प्रायमरी-कॉकसमधून निवडलेले प्रतिनिधी आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे इतर प्रतिनिधी. डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते (माजी अध्यक्ष, आजीमाजी सिनेटर वगैरे) यांना सुपरडेलिगेट असेही म्हणतात.डेमॉक्रॅटिक पक्षासाठी वर दिलेल्या आकड्यांमध्ये सुपरडेलिगेटचाही समावेश आहे.रिपब्लिकन पक्षात असाच काहीसा 'अनबाऊंड डेलिगेट' हा प्रकार असतो. राज्यांमधून हे प्रतिनिधी (डेलिगेट) कसे निवडले जातात हे बघणे पण रोचक आहे.डेमॉक्रॅटिक पक्षांच्या उमेदवारांना विविध राज्यांमध्ये त्या राज्यात मिळालेल्या मतांच्या (प्रायमरी किंवा कॉकसमधून) प्रमाणात असतात.तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना बहुतांश राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल' म्हणजे एखाद्या राज्यातून सर्वाधिक मते मिळविलेल्या उमेदवाराला त्या राज्यातून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी मिळतात. टेक्साससारख्या काही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनाही मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळतात.तर न्यू हॅम्पशायर सारख्या राज्यांमध्ये राज्याच्या कायद्याप्रमाणे उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी द्यावे लागतात. थोडक्यात हे सगळे नियम राज्यांप्रमाणे आणि पक्षाप्रमाणे बदलतात.समजा एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यातून २० प्रतिनिधी मिळणार असतील तर ते २० प्रतिनिधी नक्की कोण असावेत हे संबंधित उमेदवार ठरवितो/ते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आयोवा आणि न्यू हॅम्पशायरपासून प्रायमरी आणि कॉकसना सुरवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या प्रायमरी आणि कॉकसमधील निकाल बघण्यापूर्वी दोन्ही पक्षांचे महत्वाचे उमेदवार कोण हे बघू. मूळ लेखात सर्व उमेदवारांची विविध प्रश्नांवरील मते वगैरे विस्तारभयास्तव लिहित नाही. ते नंतर कधीतरी प्रतिसादांमधून लिहेन किंवा ही माहिती अन्य कोणी मिपाकराने लिहिली तर उत्तमच. डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार १. माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन २. व्हरमाँट राज्याचे सिनेटर बर्नी सँडर्स रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार १. उद्योगपती डॉनल्ड ट्रम्प २. टेक्सास राज्याचे सिनेटर टेड क्रुझ ३. फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर मार्को रुबिओ ४. ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसिच ५. बाल्टीमोरमधील जॉन हाफकिन्स मेडिकल सेंटरमधील माजी डॉक्टर बेन कार्सन आता बघू आतापर्यंत झालेल्या कॉकस आणि प्रायमरीमध्ये लागलेले निकाल--- १. आयोवा कॉकस (१ फेब्रुवारी २०१६) डेमॉक्रॅटिक पक्ष
  
 आयोवा कॉकस१ फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
हिलरी क्लिंटन49.9%23
बर्नी सँडर्स49.6%21
मार्टिन ओ'मॅली0.6%0
मार्टिन ओ'मॅली यांना आयोवा कॉकसमध्ये फार प्रभाव दाखवता आला नाही.त्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. रिपब्लिकन पक्ष
आयोवा कॉकस१ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
टेड क्रुझ27.6%8
डॉनल्ड ट्रम्प24.3%7
मार्को रुबिओ23.1%7
बेन कार्सन9.3%3
रॅन्ड पॉल4.5%1
जेब बुश2.8%1
२. न्यू हॅम्पशायर प्रायमरी (९ फेब्रुवारी २०१६) डेमॉक्रॅटिक पक्ष
  
 न्यू हॅम्पशायर प्रायमरी९ फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
बर्नी सँडर्स60.4%15
हिलरी क्लिंटन38.0%9
रिपब्लिकन पक्ष
न्यू हॅम्पशायर प्रायमरी९ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प35.3%11
जॉन कॅसिच15.8%4
टेड क्रुझ11.7%3
जेब बुश11.0%3
मार्को रुबिओ10.6%2
३. नेवाडा कॉकस डेमॉक्रॅटिक पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)
  
 नेवाडा कॉकस२० फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
हिलरी क्लिंटन52.6%19
बर्नी सँडर्स47.3%15
रिपब्लिकन पक्ष (२३ फेब्रुवारी २०१६)
  
 नेवाडा कॉकस२३ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प45.9%12
मार्को रुबिओ23.9%5
टेड क्रुझ21.4%5
बेन कार्सन4.8%0
जॉन कॅसिच3.6%0
४. साऊथ कॅरोलायना प्रायमरी रिपब्लिकन पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)
  
 साऊथ कॅरोलायना प्रायमरी२० फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प32.5%50
मार्को रुबिओ22.5%0
टेड क्रुझ22.3%0
जेब बुश7.8%0
जॉन कॅसिच7.6%0
बेन कार्सन7.2%0
डेमॉक्रॅटिक पक्षाची साऊथ कॅरोलायना प्रायमरी २७ फेब्रुवारी रोजी आहे. आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात (सुपरडेलिगेट मिळून) हिलरी क्लिंटन ५०३ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर बर्नी सॅन्डर्स ७० प्रतिनिधींसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प ६८ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर टेड क्रुझ ११ प्रतिनिधींसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत.मार्को रुबिओ,जॉन कॅसिच आणि बेन कार्सन यांना अनुक्रमे ९, ५ आणि ३ प्रतिनिधी मिळाले आहेत. यानंतर १ मार्चला अलाबामा, अलास्का, अरकॉन्सॉ,कोलोरॅडो,जॉर्जिया,मॅसॅच्युसेट्स,मिन्नेसोटा,ओक्लाहोमा,टेन्नीसी, टेक्सास, व्हरमॉन्ट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये प्रायमरी किंवा कॉकस असतील. या मंगळवारला सुपर ट्युजडे म्हणतात.जशी या प्रायमरी-कॉकसचे निकाल येतील तसे ते इथे लिहिणारच आहे. या विषयात रस असलेल्या सर्व मिपाकरांना विनंती आहे की तुम्हीही या लेखात जेव्हा जमेल तेव्हा आणि तशी भर टाका. मला एकेकाळी अमेरिकेच्या राजकारणात भारताच्या राजकारणाइतकाच रस होता.पण आता तो खूप कमी झाला आहे.त्यामुळे माझ्या माहितीत काही चुका/त्रुटी असतीलच.त्या पण कोणी दूर केल्या तर फारच उत्तम.मी पण वेळ मिळेल त्याप्रमाणे प्रतिसादांद्वारे नवी माहिती लिहिणारच आहे.
  • अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
  • अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग ३)
  • अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल

Book traversal links for अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६

  • अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २) ›
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
86846 वाचन

💬 प्रतिसाद (163)
ग
गॅरी ट्रुमन Wed, 02/24/2016 - 13:16 नवीन
या निमित्ताने माझ्या २००९ मध्ये लिहिलेल्या अमेरिकेतील राज्यपध्दती या धाग्याची जाहिरात करत आहे.त्या धाग्यातून आणि चर्चेतून काही माहिती मिळेल या अपेक्षेने माझ्याच धाग्याची जाहिरात करत आहे :)
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Wed, 02/24/2016 - 13:31 नवीन
डोनाॅल्ड ट्रंम्प आलेच पाहिजेत, हाण कि नाग्या,वढ कि वढ
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/24/2016 - 20:15 नवीन
डोनाॅल्ड ट्रंम्प आलेच पाहिजेत,

Reasons to vote Trump

A handy list of all the reasons to vote Trump. Show America who to vote for!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
अ
अजया Wed, 02/24/2016 - 13:43 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Wed, 02/24/2016 - 13:48 नवीन
मस्त लेख. या प्रकारा बद्दल उच्छुकता होती व मागे जाला वाचायचा प्रयत्न पण केला होता पण पुर्ण समजले नव्हते. आता या लेखातुन चांगली कल्पना आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 02/24/2016 - 14:37 नवीन
अमेरीकेचे नागरीक शास्त्राचे पुस्तक वाचल्यासारखं वाटतंय ! ;-)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 14:49 नवीन
हिलरी क्लिंटन मोदींना व्हिसा न देण्याच्या निर्णयासाठी आग्रही होत्या असं ऐकलेलं आहे. त्यामुळे त्या जर अध्यक्ष झाल्या तर अमेरिकेचं धोरण बदलेल, निदान त्या राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत तरी ते बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांच्यासारखं नसेल. एक थंडपणा असेल (distant chill). रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष आला तर ही कदाचित पहिली वेळ असेल जेव्हा भारत, ब्रिटन, अमेरिका आणि जपान या सगळ्या देशांत उजव्या विचारांचे पक्ष सत्तेवर असतील. त्यामुळे आपल्या देशात डावी फालतूगिरी, जी आत्ता सुरु आहे, ती अजून तीव्र होऊ शकते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 08:06 नवीन
हो वरकरणी हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी येणे हे भारताच्या दृष्टीने तितकेसे चांगले नसेल असे वाटते.त्यामुळे माझा हिलरी क्लिंटनना सध्या तरी विरोध आहे (त्या विरोधामुळे व्हाईट हाऊसमधील झाडाचे पान जरी पडत नसले तरी).किंबहुना त्याच कारणामुळे मी माझे मिपावरील नाव बदलून हे नाव धारण केले आहे. (क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा वगैरे मुद्दे चर्चेत येऊ नयेत म्हणून :) ) तरीही हिलरी अध्यक्षपदावर आल्या तर प्रत्यक्षात तसे होईलच असे १००% खात्रीने सांगता येणार नाही.रिचर्ड निक्सन पूर्वी चीनविरोधी समजले जात होते पण चीनबरोबर संबंध प्रस्थापित केले ते रिचर्ड निक्सननेच. असे महत्वाचे निर्णय देशाचे हितसंबंध लक्षात घेऊन घेतले जातात.त्यामुळे हिलरी अध्यक्षपदी आल्यास भारतासाठी ते चांगले नसेल हे वरकरणी वाटत असले तरी भविष्यात तसे काही होणार नाही अशी अपेक्षा मात्र आपण करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नया है वह Wed, 02/24/2016 - 14:54 नवीन
वाचत राहणार...
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 02/24/2016 - 15:01 नवीन
हिलरी क्लिंटन मोदींना व्हिसा न देण्याच्या निर्णयासाठी आग्रही होत्या असं ऐकलेलं आहे. बोका भौ मला तरि असे वाटत नाहि ! कारण अमेरिकेचे परराष्ट्रिय धोरण अत्यंत स्वार्थि ** आणि प्राथमिकता अमेरिकेच्या सुरक्षाविषयक धोरणांना असते. त्यामुळे भारतासारख्या इतक्या मोठ्या मार्केट ला नाराज करुन त्यांना चालणार नाहित. आठवा जनमत चाचण्यांचे निकाल (आणि बहुधा सि.आय.ए. चे सुद्धा) बघुन अमेरिकेनेच पहिला राजदुत मोदिंच्या भेटिला पाठवला होता. स्वार्थि **:- दुसरा शब्द सुचवा प्लिज
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 02/27/2016 - 18:00 नवीन
स्वार्थी : संधीसाधू अप्पलपोटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Wed, 02/24/2016 - 15:02 नवीन
त्यामुळे आपल्या देशात डावी फालतूगिरी, जी आत्ता सुरु आहे, ती अजून तीव्र होऊ शकते. कदाचित दिवा विझण्यापुर्वि फडफडतो तसे असावे नव्हे तसेच व्हावे.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 08:27 नवीन
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का? असल्यास इतक्या तीव्र अन टोकदार भावना असल्याचे कारण काय असेल?? लोकशाहीवर्धक चेक्स एंड बॅलन्ससच्या प्रक्रियेत तो आवाज अव्यवहार्य आहे असे आपणा उभयतांस वाटते काय? स्थापनेनंतर काही वर्षातच कुप्रसिद्ध "कम्युनिस्ट समरसॉल्ट" मारणारी ही मंडळी बेभरवश्याची आहेच वरील प्रश्नांवर आपले मत जाणून घ्यायला आवडेल, बाकी आम्ही मिपावर वाचनमात्र होतो तेव्हा एकेजागी "कम्युनिस्ट डोक्यात जातात" वगैरे विधान वाचले होते गैरी भाऊ ह्यांचे असे अंधुक आठवते म्हणून त्यांना विचारत नाहीये कारण बहुदा ह्या मुद्द्यावर त्यांची मते ठाम असावी असे भासते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 10:28 नवीन
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का? होय असल्यास इतक्या तीव्र अन टोकदार भावना असल्याचे कारण काय असेल?? पुर्ण आयडियोलॉजिच कालबाह्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 10:39 नवीन
भावना अन त्याची तीव्रता दोन्ही नीट पोचल्या. मुद्द्यावर बोलून फायदा होईल असे वाटत नाही (एकाच पुर्ण आइडियोलॉजीची वासलात लावायच्या तुमच्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक वाटतं) असो. तुम्हाला कायम शुभेच्छा ____/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 10:59 नवीन
(एकाच पुर्ण आइडियोलॉजीची वासलात लावायच्या तुमच्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक वाटतं) आइडियोलॉजीची वासलात लावायचि मला गरजच नाहि ति ऑलरेडी त्या पार्टि ने केलय, राहिला प्रश्न मला ति आइडियोलॉजी पटण्याचा तर मि माझ्यापुरत क्लिअर केलय कि ति कंप्लिटलि कालबाह्य आहे, तुम्हाला त्या आइडियोलॉजी त काहि दम वाटतो तुम्हि फॉलो करा. राहिला प्रश्न शुभेच्छांचा तर तुम्हाला सुध्दा आहेतच माझ्यातर्फे नेहमिकरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 02/26/2016 - 09:36 नवीन
तुम्हाला त्या आइडियोलॉजी त काहि दम वाटतो तुम्हि फॉलो करा. फॉलो करू शकेन??? मागे मी एका जागी बोललो ही होतो, आजकाल ते स्वातंत्र्य भारतात नाही जे आहे त्याची वाट तथाकथित कम्युनिस्ट लोकांनी अगोदरच लावली आहे अश्यात जर विवेक शाबूत ठेवत कम्युनिज्म चा अभ्यास किंवा त्यातल्या उदात्त तत्वांचा प्रचार करायचे म्हणले तर मलाच लोकं "तुझा बाप रशियन का चीनी" हे विचारायचा चान्स जास्त दिसतो, पार पब्लिक फोरम्स (जालीय) ते पब्लिक फ़ोरम्स (वास्तविक जीवनातले) सगळीकडे! तस्मात् नको उजवे ही नको अन डावे ही नको अन मतदान ही नको दिवसभर पत्रे dispatch करून झाली की फ़क्त संध्याकाळी स्कॉच मिळाल्यास हवी (ती ही आम्हाला परवडत नाहीच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 22:20 नवीन
ह्या विचारसरणी खुद्द त्यांच्याच देशात मृतवत झाल्या आहेत पूर्व युरोपातील देश जे नव्याने इयु मध्ये आले त्यांच्याशी संवाद साधला असता पोकळ बडबड पोटात आग ह्यामुळे रशिया तुटल्यावर त्यांच्या मुली दुबईच्या बाजारात आल्या सध्या त्या भारतात येत आहेत. दोन वेळच्या अन्नाची सोय झाली प्रतिष्ठेची झूल अंगावर चढवून काही लोक साम्यवादी विचारांचा प्रचार करतात ,गोडवे गातात. आणि कनैह्या सारखे विद्यापीठातून ६० पासून चालत आलेले साम्यवादी गाणी त्यांचे अन्थेम गातात ह्या पासून आझादी हवी त्यापासून आझादी जगाला ह्यांच्यापासून आझादी मिळाली १९८९ ते साल भारताच्या दृष्टीने लाखमोलाचे ठरले. भारतातील ह्यांची पिलावळ संपायलाच हवी भारत हे विद्येचे मंदीर आहे असे सूत्र निवेदकाने म्हटल्यावर ह्याने मंदीर म्हणू नका नुसते संस्था म्हणा असे सांगितले कनैह्या ला भाजपचे संजीब पात्रा म्हणाले अरे बाबा तुला मंदिर ह्या शब्दांचा एवढा तिटकारा असेल तर स्वताचे नाव बदलून घे आणि ठेव आफिज , ट्रम आलाच पाहिजे. डेविड केमेरोन ने आधीच्या दशकात झालेल्या सर्व चुका टाळून इंग्लिश राष्ट्रवाद इंग्लिश स्वाभिमान जनतेत निर्माण केला. तसा ट्रम ने करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 16:23 नवीन
ट्रम आलाच पाहिजे.
नाना तुम्ही जर्मन नागरिक दिसताय! हे असले काहीतरी बोलताय ते विचार करून का आपले उगाच ? हा बघा "ट्रम" काय म्हणतो तुमचा ते हे जमंना की हो दादा! नोकऱ्या नेल्या काढून म्हणजे? तुम्हाला त्रास नसेल पण आम्ही काय करावे? पोराबाळांची माती होईल आमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Fri, 03/04/2016 - 23:23 नवीन
भारतीयांना अमेरिकन सरकार कडून नोकर्या प्रत्यक्ष अमेरिकेत किंवा भारतात अमेरिकन बाजरपेठेकडून मिळतात ते काही खैरात ,दानधर्म किंवा भारत जगला तर आशिया मध्ये अमेरिका जगेल अश्या भ्रामक समजुती नाही तर भांडवलशाही चे नियम ,तर्कानुसार भारतीय लोकांच्या कर्तुत्वावर मिळतात. तेव्हा निवडणुकीमध्ये बोलणे व प्रत्यक्ष करणे फरक आहे से नो तो बेंगळूरू असा नारा सुद्धा काही वर्षापूर्वी ऐकला होता आणि टेन्शन नही लेने का खुद ट्रम साहेब मुंबईत लोढा ग्रुप सोबत भागीदार आहेत ते अध्यक्ष झाले तर मलबार हिल चे लोढा अमेरिकेत आणि जगभारत पसरतील काळजी नसावी. भारतात त्यांची गुंतवणूक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
व
विकास Fri, 03/04/2016 - 23:47 नवीन
तेव्हा निवडणुकीमध्ये बोलणे व प्रत्यक्ष करणे फरक आहे ट्रम्प यांनी कालच्याच डिबेटमधे H1-B व्हिसा संदर्भातली भुमिका बदलली. अर्थात केवळ या मुद्द्याशीच सहमत आहे. बाकी ट्रंप राष्ट्राध्यक्ष होणे म्हणजे disaster ठरेल. तो एक फ्रॉड आहे असेच वाटते. चकाकणारे सारेच सोने नसते आणि सतत बकबक करणारे खरेच कोणी ग्रेट असतात असे नाही. आपल्याला या संदर्भात भारतात एक केजरीवाल म्हणून सभ्य दिसणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास करून घ्यावी, म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते समजेल. Image removed. हा माणूस नुसते बोलून फसवतो आहे. याच्या बुडीत खात्याची यादी टाईम मॅगझिन मधे बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नाना स्कॉच Sat, 03/05/2016 - 16:36 नवीन
चकाकणारे सारेच सोने नसते आणि सतत बकबक करणारे खरेच कोणी ग्रेट असतात असे नाही.
हे वाक्य यूनिवर्सल का? नाही एकाची बकबक दुसऱ्यासाठी "बौद्धिक" "विद्वत्ताप्रचुर" "मन की बात" वगैरे पण असू शकते न? (माझ्यासाठी आहे असा निष्कर्ष काढू नये, विधान फ़क्त "सापेक्षता" दाखवायला केले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/07/2016 - 06:32 नवीन
याच्या बुडीत खात्याची यादी टाईम मॅगझिन मधे बघता येईल.
यालाच अमेरिकन वे ऑफ लाईफ म्हणता येईल का? अमेरिकेत स्वतः दिवाळे जाहीर करून नंतर यश मिळवलेले कित्येक लोक आहेत.आणि अशा मंडळींमध्ये माजी अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन आणि विलिअम मॅकिन्ली, डॉनल्ड डक आणि मिकी माऊसला लोकप्रिय बनवलेले वॉल्ट डिस्ने, हर्शीज चॉकलेटचे मिल्टन हर्शी, हाईन्झ केचप बनविणार्‍या कंपनीचे संस्थापक एच.जे.हाईन्झ अशा दिग्गजांचा समावेश होतो. तेव्हा स्वतः दिवाळे जाहीर करून इतरांची देणी बुडविणे हा प्रकार भारतात जितका वाईट समजला जातो तितका वाईट अमेरिकेत समजला जात नसावा. अर्थातच एनरॉनमध्ये झाले त्याप्रमाणे फ्रॉड झाला असेल तर तो अर्थातच गुन्हा आहे.पण कोणतेही वाईट उद्देश न ठेवता जर बिझनेसमध्ये झालेल्या चढउतारांमुळे कोणी दिवाळे जाहीर केले तर ते अमेरिकेत तरी तितकेसे वाईट समजले जात नसावे. ट्रम्प यांचा प्रकार नक्की कोणत्या प्रकारात मोडतो हे बघायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 11:00 नवीन
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का?
का, कारण तो मुळ मानवी स्वभावाच्या पूर्ण पणे विरुद्ध आहे. तो पुस्तका मध्ये जरी छान छान वाटत असला तरी प्रत्येक्षात खरा उतरत नाही ह्याचे कारण तेच आहे. मानवाला मुळातच स्वार्थ साधायला, संग्रह करायला, मालकी हक्क असणे हवे असते. कोणताही विचार जर त्याच्या विरुद्ध वागा असे सांगत असला तर तो नक्की फसणार. "डीझाइंड टू फेल" असे काहीतरी म्हणता येइल. त्यापेक्षा उजवा विचार त्याच मानवी स्वभावाला वापरतो, त्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत नाह सहकाराचा विचार पण असाच चुकीचा आहे. लाखो लोकांचा पैसा एका माणसाच्या हातात आल्यावर त्यात गैर प्रकार होणारच. कुठलीही व्यवस्था माणुस सज्जन आहे असे धरुन डीझाइन करता येत नाही. कारण अश्या व्यवस्थेचा ताबा दुर्जन घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 11:40 नवीन
उजवा विचार मानवी स्वभावाला कसा धरून चालतो? मानवी स्वभावाला धरून म्हणजे *षड्रिपुंचे अस्तित्व मान्य करून का त्यांचे उदात्तीकरण करून? डावा विचार हा मानवी स्वभावाला धरुन नाही तर मानवी मुळ स्वभावच्या दमनावर आधारित असतो हे मान्य करायला नक्कीच वाव आहे, पण तसे पाहता कुठला पॉलिटिकल इझम मानवी स्वभाव अगदी स्थितप्रज्ञपणे वापरतो? जर आपल्याला उजवा विचार उत्तम वाटत असल्यास तो का हे तुम्ही समजवु शकता काय?? *मला इथे विठा व्हायचे नाहीये बरंका :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 12:08 नवीन
मानवी स्वभावाला धरुन म्हणजे मी वर लिहीले होते तसे मालकी हक्क असणे, स्वताचा स्वार्थ साधणे, आपली मालमत्ता मुलांकडे पास करणे किंवा वाटेल तशी विल्हेवाट लावणे. माझी काहीच मालमत्त नसणारे, मी कीतीकी जास्त किंवा चांगले काम केले तरी त्याचा फायदा विभागुन जाणार आहे हे माहीती असताना कोण काम करेल? चीन मधे सुद्धा सामुदायीक शेती वरुन शेतकरी स्वताहुन खाजगी शेतीकडे गेले ( अगदी माओ जीवंत असतानाच १९७४ सालापासुन ) होते कसे, की सर्व पुस्तकात चांगले दिसते. पण त्या सिस्टीम चा फायदा स्वार्थी लोकच घेतात. आणि हे जगभर उदाहरणातुन सिद्ध झाले आहे. गुणवत्तेची / कष्ताची किंमत केली जात नाही.
उजवा विचार उत्तम वाटत असल्यास तो का हे तुम्ही समजवु शकता काय??
उजवा विचार उत्तम नसेल पण त्याच्या पेक्षा चांगला विचार आत्ता तरी दिसत नाही. असला तर तो नक्कीच स्वीकारु ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 12:12 नवीन
हां!! हे पटण्यासारखे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 12:57 नवीन
कारण तो मुळ मानवी स्वभावाच्या पूर्ण पणे विरुद्ध आहे
सहमत आहे. याविषयी मिपावर मागे हा प्रतिसाद दिला होता.विषयांतर नको म्हणून प्रतिसादाचा दुवाच देत आहे आणि प्रतिसाद इथे पेस्ट करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 20:14 नवीन
डावा विचार हा पूर्णपणे टाकाऊ आहे असे आपले मत आहे का?
नाही. स्त्रीपुरुष समता, जातीयवादाला विरोध असे काही मुद्दे डाव्या विचारांच्या विचारवंतांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत. आणि भारतासारख्या देशात आत्यंतिक गरिबी जोवर आहे तोपर्यंत डावा विचार पूर्णपणे कालबाह्य होणारही नाही. पण डाव्या फालतूगिरीला विरोध आहे. आणि उजव्याही. उदाहरणार्थ शिवसेनेच्या. २००९ च्या निवडणुकीत मी काँग्रेसला मत दिलं होतं कारण डाव्यांनी आणि भाजपनी एकत्र येऊन अमेरिकेबरोबरच्या अणुकरारासंदर्भात मनमोहन सिंग यांचं सरकार पाडण्याचा जो घाट घातला होता तो माझ्या डोक्यात गेला होता. ही डावी आणि उजवी फालतूगिरी. डाव्या आर्थिक विचारात बाजारपेठ आणि मुक्त अर्थव्यवस्थेला कधीकधी विरोधासाठी विरोध असतो. तुम्ही जर Economic and Political Weekly वाचलंत तर तुम्हाला कळेल की डाव्या आर्थिक विचाराचं equality obsession हे किती आहे आणि त्यापायी आपल्या देशाचं किती नुकसान झालं (उदाहरणार्थ MRTP सारख्या कायद्यांमुळे बेकारी वाढणं).शिवाय डाव्या विचारात नफा हा वाईट किंवा किमान problematic मानला जातो. पण कंपन्या नफा न कमावता कामगारांना दरवर्षी पगारवाढ कशी देणार या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणीही डावा देत नाही. राजकीय दृष्ट्या आपल्या देशातले डावे हे बहुतांशी कामगार चळवळीतून आलेले आहेत आणि त्यातली दंडेलशाही आणि arm twisting त्यांच्यात पुरेपूर भिनलेलं आहे. मला स्वतःला महाविद्यालयीन शिक्षकांच्या युनियनचा अत्यंत वाईट अनुभव असल्यामुळे मी ट्रेड युनियन या गोष्टीच्या पूर्ण विरोधात आहे. आपल्या देशात आयटी क्षेत्रात काही चांगलं होण्याचं एक कारण तिथे युनियनला थारा नसणं हे आहे असं माझं मत आहे. कुटुंबातील काहींची १९८२ च्या मिल संपानंतर झालेली वाताहत पाहिलेली आहे. त्यामुळे ट्रेड युनियन या प्रमुख डाव्या संघटनेबद्दल माझ्या मनात फक्त तिटकारा आहे. So, मी डावा विचार टाकाऊ मानतो का? नाही. उजव्यांच्या लाथा खाण्यासाठी तरी किमान डावे असायलाच हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 02/26/2016 - 09:29 नवीन
नेहमी प्रमाणे समतोल अन नकारण्याचा प्रश्नच नाही असे विवेचन आहे हे :) फ़क्त शेवटचे वाक्य खटकले, डाव्यांचे अस्तित्व हे उजव्यांच्या लाथा खायला असणे गरजेचे आहे ह्यात उगीच वर्चस्ववादी भूमिका वाटली (माझा गैरसमज असावा) मला असे वाटते की चेक्स एंड बॅलन्स बद्दल विचार करता प्रसंगानुरूप दोघेही एकमेकांच्या लाथा खायला अस्तित्वात असावेत कारण डाव्यांचे अस्तित्व सुद्धा गरजेचे आहे हे आपण प्रमाणिक मुद्दे अन त्या अस्तित्वाची गरज असणाऱ्या प्रॉब्लमची मोजदाद करवुन सांगितलेच आहेत, काय म्हणता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 03:59 नवीन
भूमिकेसाठी एक चपखल शब्द आहे - स्वमतांधदांभिकता. डाव्यांच्या लाथा खाण्यासाठी उजवे पाहिजेत असं मला न वाटण्याचं एक कारण म्हणजे डाव्या विचारांमधला फोलपणा हा खुद्द डाव्यांनाही समजलेला असतो, पण ते मान्य करणं त्यांच्यासाठी अशक्य असतं. ज्या कामगार-कष्टक-यांच्या हितसंबंधांसाठी डावे तथाकथित लढा उभारतात, त्यांच्यावर जास्तीतजास्त अत्याचार डाव्या आणि अतिडाव्या राजवटींतच झालेले आहेत. शिवाय डाव्यांना गरिबीचा प्रचंड पुळका असतो (गरिबीचा, गरिबांचा नव्हे) कारण तेच त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहेत. जर गरिबी दूर झाली तर डाव्यांना कोणीही विचारणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
व
विकास Sat, 02/27/2016 - 05:58 नवीन
अमेरीकेतले डावे भारतातल्या डाव्यांप्रमाणे कम्युनिस्ट पण नसतात आणि देशाच्या सीमा मान्य करणारे असतात. ते समाजवादाच्या जवळ असतात, साम्यवादाच्या जवळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सतिश गावडे Sat, 02/27/2016 - 11:37 नवीन
मला नेहमी पडणारा प्रश्न या निमित्ताने विचारून घेतो. समाजवाद आणि साम्यवाद यातील फरक काय? अजून एकः समाजवाद = कम्युनिझम? साम्यवाद = मार्क्ससिझम? अजून एक: मिपावरील चर्चा वाचून "उजवे" कोण हे आता नेमके कळले आहे. "डावे" कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 02/27/2016 - 14:10 नवीन
समाजवाद = सोशॅलिझम साम्यवाद = मार्क्ससिझम = कम्युनिझम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 17:40 नवीन
कम्युनिझमला मार्क्सने जे शास्त्रीय आणि योजनाबद्ध रुप देण्याचा प्रयत्न केला (मार्क्स आणि एंगेल्स यांनी त्याला शास्त्रीय समाजवाद किंवा Scientific Socialism असा शब्द वापरला) त्याला आज मार्क्सवाद म्हटलं जातं. कम्युनिझमचा मूळ अर्थ हा सर्व उत्पादनांच्या साधनांची सामायिक मालकी असा आहे. मार्क्सच्या मते माणूस सुरूवातीला जेव्हा जंगली अवस्थेत होता आणि शिकारीसाठी सगळीकडे भटकत होता ती अवस्था मूलभूत स्वरूपाचा कम्युनिझमच होती. तो त्याला Primitive Communism हे नाव देतो. सर थाॅमस मोअर यांच्या Utopia या पुस्तकातही अशा समाजाचा उल्लेख आहे. अशक्य स्वप्नांसाठी वापरला जाणारा Utopian हा शब्द त्यावरूनच आलेला आहे. सेंट सायमन, फ्यूरिए, राॅबर्ट ओवेन उयांनी अशा प्रकारचे समाज स्थापन करण्याचे प्रयत्न केले. या सगळ्यांना मार्क्स स्वप्नाळू समाजवादी म्हणतो. त्याचा आणि एंगेल्सचा समाजवाद हा शास्त्रीय समाजवाद आहे, ज्यानुसार वर्गलढा किंवा वर्गकलह हा भांडवलशाही समाजात अपरिहार्य आहे आणि भांडवलशाही स्वतःमधल्या अंतर्विरोधातून नष्ट होऊन कम्युनिस्ट समाज निर्माण होईल, ज्यात कामगार किंवा proletariat हे संपत्तीचा साठा करणाऱ्या प्रतिगामी भांडवलदारांविरुद्ध उठाव करुन कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित करतील. हा मार्क्सवाद. पण चीनमध्ये माओने शेतकऱ्यांना जागृत करुन मार्क्सवादाला छेद दिला. मार्क्सनुसार शेतकरी हा धान्य पिकवणारा जरी असला तरी तो ते साठवून विकतो म्हणजे त्याचं संपत्तीत रूपांतर करतो म्हणून तो प्रतिगामी आहे. माओने त्यांनाच जागृत धरून कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली, कामगारांना नव्हे. त्यामुळे माओवादी कम्युनिस्टांना अस्सल मार्क्सवादी कम्युनिस्ट्स revisionists असंही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नाना स्कॉच Sat, 03/05/2016 - 17:17 नवीन
1. जग मिपापेक्षा मोठे आहे! (हे मी तुम्हाला सांगणे म्हणजे काजव्याने सुर्याला वगैरे वगैरे वगैरे) 2. स्वमतांधदांभिकता ही पक्षातीत आहे असे वाटते, *सुरुवातीला कट्टर प्रागतिक असलेले नेते नंतर पुराणमतवादी होतात कारण काळ त्यांच्या हातातून निसटलेला असतो. 3. फ़क्त डावे स्वमतांध असतात का? तर माझ्या मतानुसार बरेचसे असतात पण उजवे नसतात का? तर नाही , ते डाव्यांच्या बरोबरीने स्वमतांध असतात, डाव्यांतली असंख्य उदाहरणे सापड़तील/तात तशीच उदाहरणे उजवी सुद्धा आहे अ. मुद्दा कम्युनिस्ट विचारधारेचा सुरु आहे तर पहिले उदाहरण झार चेच घेतले तर? कामाचे तास कमी करा अन मायबाप सरकार भाकरीची सोय करा म्हणून "ईश्वरी अवतार आमचा राजा" असली प्लेकार्ड घेऊन अन त्याच्या द्वारपालांस " "आमच्या" राजाला भेटु न देणारे तुम्ही कोण?" विचारणाऱ्या अन विरोधात सुद्धा निष्ठां ठेवणाऱ्या जनतेवर घोडेस्वार घालुन कवट्या पिचवणारा किंवा स्वतःच्या राज्यभिषेकाच्या जत्रेला पाहण्यासाठी आलेली जनता चेंगराचेंगरी मधे मेल्यावर सुद्धा आपला राज्याभिषेक किमान पोस्टपोन सुद्धा न करणारा झार अन झारीना स्वमतांध नव्हते का?? ब. अडॉल्फ हिटलर ने तर त्या स्वमतांधतेच्या झीट आलेल्या अवस्थेत न्यूरेंबर्ग खटल्या सारख्या जेत्यांच्या सभेत आपल्याला जीव द्यायची शपथ घेतलेल्या तिसऱ्या राइख् च्या आपल्या साथीनां वाऱ्यावर सोडुन भेकड़पणे एक बाई एक कुत्रं सोबत घेऊन आत्महत्या केली , ती स्वमतांधतेची परमाधवी नव्हती काय?? क. युद्धाच्या काळी डोक्यावर घेऊन जेव्हा त्याच व्यवहारी ब्रिटिश जनतेने सत्तेतून खाली खेचले त्या युद्धोत्तर काळात चर्चिल ह्यांनी तरी ही स्वमतांध दांभिकता सोडुन आत्मपरीक्षण केले होते का?? ड. इराक मधे डब्ल्यू एम डी नाही ते तठस्थ निरीक्षकांनी सांगितल्यावर सुद्धा इराक वर अग्निसिंचन करणारे धाकटे बुश हे स्वमतांध नव्हते? त्यांनी ते कबुल केले आहे का कधी?? *वाक्य विश्वास पाटील ह्यांच्या महानायक मधुन साभार उदाहरणे, मुद्दाम उजव्यांची घेतोय, एक बॅलनसिंग एक्ट म्हणून, मुळ मुद्दा "स्वमतांधता डाव्याइतकीच उजव्यांत असते" इतकाच सिद्ध करणेचा हेतु आहे -नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अर्धवटराव Fri, 02/26/2016 - 00:06 नवीन
तरीपण टांग मारतोच :) डाव्या फिलॉसॉफीचा मला जाणावणारा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्याकडे प्रश्नाचं 'उत्तर' असतं 'समाधान' नाहि. त्यामुळे त्यांचं अस्तित्वच मुळी प्रश्न निर्माण करणं व चिघळु देण्यावर अवलंबुन असतं. दुसरं म्हणजे त्यांची वन वे फिलॉसॉफी. सगळ्यांना समान पातळीवर आणायचं हे फार उच्चकोटीचं उद्दीष्ट आहे. पण समानतेची व्याख्या मात्र ते ठरवणार. त्यामुळे असमान वृद्धीला एव्हरेजऔट करण्याच्या नादात उंची कमी करायची अवदसा त्यांना आठवते. 'अ', 'ब', 'क' ला समान करायचं म्हणजे ज्याची उंची कमि आहे त्याला वाढवायचं नाहि, तर जो उंच अहे त्याचे पाय कापायचे. मग तो इतरापेंक्षा खुजा होतो. आता या खुज्याला स्टॅण्डर्ड मानुन इतरांची उंची कमी करायची. हे असं उफराटं काम करत सर्वांना कायमचं पंगु करायचं यांचं तत्वज्ञान. ( डाव्या विचारसरणीबद्दल हे माझं सध्याचं आकलन आहे. प्रत्यक्षात ते तसं नसावं असं मनापासुन वाटतं. कुणी व्यवस्थीत मांडणी केली असल्यास वाचायला/ऐकायला उत्सुक आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 17:53 नवीन
मी त्यालाच Equality Obsession हा शब्द वापरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
निशदे Sat, 02/27/2016 - 17:54 नवीन
ही चर्चा मस्त चालू आहे बरं का!!! बरेच छान मुद्दे वाचायला मिळत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 18:04 नवीन
माझे एक निरीक्षण आहे. साम्यवाद्यांना "अराजक" म्हणजे Anarchy हा शब्द वापरायला फार आवडतो. देशात सर्वत्र अराजकता माजलेली आहे किंवा अमुकतमुक मुळे सर्वत्र अराजकता माजणार आहे आणि साम्यवादीच या अराजकतेवर मात करू शकतात अशी त्यांची एक आवडती थिअरी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
निशदे Wed, 02/24/2016 - 20:07 नवीन
उत्तम introductory लेख. वाचतो आहे. सध्याच्या रिपब्लिकन उमेदवारांमध्ये डोनाल्ड ट्रंप नॉमिनेशन जिंकण्याची जास्त शक्यता आहे. रिपब्लिकन मतदारांच्या पारंपारिक राजकारण्यांच्या विरोधात असलेल्या लाटेमुळे ट्रंप आघाडीवर आहे. अर्थात, ट्रंपला खाली कसे खेचायचे याचे उत्तर कोणाकडेही नाही. डेमोक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्सने काहीतरी जादूई खेळी केल्याशिवाय त्याचा विजय अवघड आहे. तरुणांकडून जबरदस्त पाठिंबा मिळवणारा हा नेता पारंपारिक मतदार, स्त्रिया आणि minority voters(मराठी प्रतिशब्द?) यांच्यामध्ये अजून तितकासा प्रभाव पाडू शकला नाही.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 02/24/2016 - 23:12 नवीन
minority voters(मराठी प्रतिशब्द?)
अल्पसंख्यांक मतदार ? आमच्याकडे लै फेमस आहे हा शब्द ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे
न
निशदे गुरुवार, 02/25/2016 - 18:09 नवीन
बरोब्बर...... जिथे जिथे राजकारण आहे तिथे तिथे हा शब्द फेमसच असतो..... भारत असो वा अमेरिका!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 04:55 नवीन
आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात (सुपरडेलिगेट मिळून) हिलरी क्लिंटन ५०३ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर बर्नी सॅन्डर्स ७०
इथे ५०३ च्या ऐवजी १०३ पाहिजे का? एकुणात खूप माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/25/2016 - 05:07 नवीन
हे लिहीत असताना ५०५ दिसले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 05:30 नवीन
त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा वाटाच ४००+ असावा. हे सुपरडेलिगेट कोणाच्या बाजुनी आहेत हे आधीच ठरले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 07:32 नवीन
त्या ५०५ मधे सुपर डेलिगेट चा वाटाच ४००+ असावा.
हो.आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरी/कॉकस झाले आहेत त्या राज्यांमधून १०२ प्रतिनिधीच निवडले गेले आहेत (आयोवामधून ४४, न्यू हॅम्पशायमधून २४ आणि नेवाडामधून ३४). तेव्हा हिलरींना सध्या ५०५ प्रतिनिधींचे समर्थन आहे याचाच अर्थ त्यात सुपरडेलीगेटचाही समावेश असणार.
हे सुपरडेलिगेट कोणाच्या बाजुनी आहेत हे आधीच ठरले आहे का?
हे सुपरडेलीगेट नक्की कोणाला समर्थन देणार हे आधीच ठरलेले आहे की त्या सुपरडेलीगेटने जाहीर वक्तव्ये केली असतील त्याप्रमाणे त्यांचे समर्थन नक्की कोणाला आहे याचे आडाखे बांधून प्रसारमाध्यमांनी ५०५ हा आकडा जाहीर केला आहे हे तपासून बघायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
न
निशदे गुरुवार, 02/25/2016 - 18:18 नवीन
थोडक्यात माहिती..... superdelegates म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व निवडून आलेले congressman/senators. यांच्यात व conventional delegates मध्ये फरक हा की superdelegates डेमोक्रॅटिक नॉमिनेशनसाठी लढत असलेल्या कोणालाही सपोर्ट करू शकतात; त्यासाठी उमेदवारांनी प्रायमरी/कॉकस जिंकण्याची गरज नाही. याउलट, conventional delegatesना जो लढत जिंकेल त्यालाच(राज्यानुसार) पाठिंबा द्यावा लागतो. आता हिलरीला आत्ताच ५००+ मिळण्याचे कारण संपूर्ण डेमोक्रॅटिक पक्षनेते तिच्या पाठिशी आहेत. सँडर्स आजपर्यंत (अधिकृतरीत्या) डेमोक्रॅट नव्हता. त्याने प्रत्येक निवडणूक independent म्हणून लढवली आहे. त्यामुळे हिलरीचा आकडा एकदम वरती गेला असेल. त.टी. ही माझी माहिती आहे. यात अजून जाणकारांनी भर घालावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 07:26 नवीन
मी यासाठी फॉक्स न्यूजच्या या पानावर लक्ष ठेऊन आहे. तिथे कालच्या पेक्षा आजचे आकडे वेगळे दिसत आहेत.काल तिथे हिलरी क्लिंटनच्या बाजूने ५०३ प्रतिनिधी असे दिले होते.आज तोच आकडा ५०५ असा दिसत आहे.रिपब्लिकन पक्षातलेही आकडे वेगळे दिसत आहेत.बहुदा सुपरडेलीगेट/अनबाऊंड डेलीगेट मध्ये काही बदल झाले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 08:17 नवीन
फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर मार्को रुबिओ
मार्को रुबिओ हे नावाने हिस्पानिक वाटत आहेत! आश्चर्य वाटले जरासे (अर्थात आमच्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर बेतलेले आश्चर्य) रिपब्लिकन लोक हिस्पैनिक लोकांना जवळ करतात? बाकी भारतीय मार्केटला नाराज करुन भागणार नाही हे मान्य तरीच ट्रम्प ह्यांनी सुद्धा भारताला दहशतवादाचा प्रचंड त्रास असल्याचे नमूद अन कबुल केले होते बहुदा (बाकी हे बोलतील लाख तरी पाकड्यालोकांना मदत अव्याहत ठेवतील असे वाटते दुर्दैवाने) रिपब्लिकन पक्ष जास्त पाकिस्तानधर्जिणा आहे असे ही ऐकले होते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा