छगन भुजबळांच्या निमित्ताने...
छगन भुजबळांच्या मागचा एसीबी सामेमीरा हटायचे काहि लक्षण दिसत नाहि. त्यांना आता कोर्टाने समन्स बजावला म्हणतात.
यामागे काय राजकारण असायचं ते असु दे. राज्यसरकार, बारामतीकर, भाजपा-काँग्रेसचे स्टेकहोल्डर्सचा या प्रकरणातला सहभाग पण वेगळा विषय आहे. मला प्रश्न पडलाय हे असे घोटाळे (झाले असतीलच तर) होतात तरी कसे.
सरकरी कंत्राटं मिळवायचे, त्यांचा निधी बनावट कंपन्यांकडे वळवायचा, तो परत लेजीटीमेट कंपन्यांना ट्रान्स्फर करायचा. या सगळ्या प्रकरणात नेमका पैसा कसा आणि कुठे मुरतो ? बनावट कंपन्या म्हणजे नेमकं काय तयार करतात हे लोकं ? कुठेतरी त्याचं रजीस्ट्रेशन होतच असणार ना ? लाचलुचपत शोधायला काय टेक्नीक वापरतात? साधं हौसींग लोन घेतो म्हटलं तर एल.आय.सी, एस.बी.आय हज्जारदा कागदपत्रं चेक करतात आपले. मग इतक्या मोठाल्या रकमांचे ट्रान्स्फर्स कुठेही ट्रेस न ठेवता, कुठेही तपासल्या न जाता होतातच कसे? नेमके काय लूपहोल्स असतात सिस्टीममधे जे या प्रकरणात प्रथमदर्शनी एक्स्प्लॉइट केल्या गेले ? आणि मुख्य म्हणजे, गोष्टी या थराला जात पर्यंत उजेडात येत कशा नाहित? आणि बरच काहि...
पळवाटा आधीच इमॅजीन करुन नियम तयार होत नसतात."उत्तम नीति, नियम आणि त्यांच्या अंमलबजावणीची अधिकृत कृती (Policy; Rules & Regulations; and Procedures)" बनवताना नेहमीच, त्या कायद्याच्या प्रत्येक कलमाचे (पळवाटा शोधून) उलंघन होईलच; ते कसे केले जाईल; व ते उलंघन कसे टाळावे; या सगळ्याचा सखोल विचार करूनच (फुलप्रूफ) बनवले जातात. या प्रक्रियेला "फेल्युअर मोड अँड इफेक्ट्स अॅनॅलिसिस (FMEA)" असे म्हणतात. इतरही अनेक पर्याय कायद्यातल्या तृटी टाळण्यासाठी वापरल्या जातात. इतके सर्व करूनही एखादी तृटी राहू शकते (इथे मुद्दामहून ठेवली जावू शकते / जाते असा अर्थ दूरान्वयानेही नाही), याला "अज्ञात अज्ञात प्रकारचा धोका (Unknown Unknown Type of Risk)" असे म्हणतात. वापर करताना कायद्यातली एखादी तृटी ध्यानात आल्यावर तिचे सद्यस्थितीत त्वरीत निवारण करण्यासाठी व ती तृटी कायमची काढून टाकण्यासाठीही उपाययोजना (Corrective Measures and Corrections) करणे चांगल्या प्रशासन व्यवस्थेत अनिवार्य असते व तसे करणे हा "अंमलबजावणीच्या अधिकृत कृती (Procedures)"चा एक हिस्सा असतो. प्रत्यक्ष व्यवहारात, जगभर, हितसंबंधी लोक कायदे आपल्याला हवे तसे वाकविता येतील असेच असावेत यासाठी प्रयत्न जरूर करतात... त्यांच्या हातकंड्यांत सामील होऊन कायदा कमकुवत करणार्या शासनव्यवस्थेला "भ्रष्ट" म्हणतात आणि त्यांचे हातकंडे ध्यानात येण्याएवढे हुशार नसल्याने कमकुवत कायदे बनवणार्या शासनव्यवस्थेला "मूर्ख / बुद्दू" म्हणतात !नियम केल्यावर त्यातल्या पॉसिबल पळवाटा शोधणे हे नियम बनवण्यातले अंतर्भूत कर्म आहे.चांगल्या प्रशासनात, सत्यपरिस्थिती याविरुद्ध असते, नियम बनवण्यापूर्वी आपले ज्ञान, अनुभव आणि विचारशक्ती वापरून शक्य तेवढा फूलप्रूफ कायदा बनवणे हाच प्रशासनाचा उद्देश असतो, असावा. म्हणुनच लूपहोल्स नसलेला सबळ कायदा बनवणे येरागबाळ्याचे नाही, तर तज्ञांचे काम असते. अर्थात कोणताही नियम सार्वकालीक अभेद्य असू शकत नाही. नियम आणि त्यांचा भंग हा चोर पोलिसांचा खेळ असतो... त्यात कधी चोर वरचढ ठरतो. पण त्याच अर्थ असा नाहि की, पहिला कायदा बनवा आणि मग चोर त्यात कोणत्या पळवाता काढतात यावरून आपन शिकून तो बदलत रहा ! ज्या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे असे आपण म्हणतो तेथे "कायदा बनवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे" "कायद्याचा गैरफायदा घेऊ पहाणार्यांच्या दोन पावले पुढे राहण्याचा सतत यशस्वी प्रयत्न करत असतात, म्हणूनच ते शक्य असते. आपल्या भोवती "चांगला कायदा बनवणे" यापेक्षा "आपल्या हितसंबंधांसाठी कायदा बनवणे व नंतर येणार्या दबावाखाली त्यात फरक करत राहणे" हे जास्त प्रमाणात दिसत असले तरी ते कायदा बनवण्यामागचे मूळ तत्व नाही... तो त्या प्रक्रियेतला रोग आहे !नियम केल्यावर त्यातल्या पॉसिबल पळवाटा शोधणे हे नियम बनवण्यातले अंतर्भूत कर्म आहे...याचा अर्थ कायदा बनवण्यार्याची बौद्धीक पात्रता कायद्यातल्या पळवाटा शोधणार्यापेक्षा कमी असते/असावी, व त्याला प्रतिबंधक उपायांची माहिती नाही, असा होतो. अश्या माणसाची कायदा बनवण्यासाठी निवड करणे म्हणजे आपत्तीला (disaster) आमंत्रण देणे होय ! म्हणूनच, वर म्हटल्याप्रमाणेच, कायदा बनवणे (विषेशतः त्याची कलमे लिहिणे) येरा गबाळ्याचे काम नाही... तेथे पाहिजे जातीचे (तज्ञ) !