Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

व
विटेकर
Tue, 07/19/2016 - 14:21
🗣 173 प्रतिसाद
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते. २०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात. २०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती. सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती ) या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ ! त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही ! दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते ! त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही ) ५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१ डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती. मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे ! मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत ! जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे ! पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे ! अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !
वर्गीकरण
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
128355 वाचन

💬 प्रतिसाद (173)
N
nanaba Wed, 07/20/2016 - 06:41 नवीन
A2 milk chalel ka?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 10:13 नवीन
कोणतेच दूध आणि दूग्धजन्य पदार्थ चालणार नाहीत. फक्त नारळाचे दूध , सोयाबीनचे दूध, बदामाचे दूध चालेल. ( याचे मला आश्चर्य वाटते पण मी नियम पाळतो ) दूध नाही म्हणजे ताक - दही , तूप, लोणी, पनीर , कढी, खरवस काहीही नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:22 नवीन
खरेच डॉक्टर , तिच्याशिवाय हे काही शक्य नव्हते ! ती माझ्यासाठी सावित्रीच आहे ! या प्रोग्रम साठी दोघांनी भाग घेणे जरुरी असते, नवरा रुग्ण असेल तर बायकोने आणि बायको रुग्ण असेल तर नवर्याने पण प्रोग्राम साठे प्रवेश घेणे जवळ जवळ अनिवार्य आहे ! समूह शिक्षणावर त्यांचा भर आहे , प्रत्येक रुग्णासाठी एक डॉक्टर आणि एक मेण्टर निर्धरित केलेला आसतो , त्यांच्या सतत संपर्कांमुळे आणि प्रोत्साहानामुळे मनोधैर्य टिकते आणि वाढते ! त्याशिवाय कायप्पा समूहावर खूप शेयरिन्ग होते , त्यामुळेही खूप उत्साह वाढतो. मी पण आता मेण्टर आहे ४ जणांचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्य वाचक Tue, 07/19/2016 - 16:34 नवीन
डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा आमच्या घरात पण फायदा झाला मधुमेह 10 वर्षे गोळ्या घेतल्यावर, आता बरा झाला हापूसची गोष्ट तुमच्यासारखीच 10 वर्षांनी भरपेट आंबे खाता आले त्यांनी सांगितलेली मुख्य सूत्रे मगणजे दुग्धजन्य पदार्थ, pricessed food पूर्ण बंद गहू खाल्ले तर खपली गहू। सिंहोर लोकवन इ पंजाबी वाण नाही ज्वारी ची भाकरी च खाणे उत्तम सकाळी हिरव्या पालेभाज्या ,सफरचंद, दुधी इ इ ची ग्रीन स्मूदी पिणे जेवल्यावर 1,5 तासाने जिने चढण्याचा व्यायाम करावा
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 07/19/2016 - 18:04 नवीन
सर्वप्रथम कडक जीवनशैली अवलंबून औषधे न वापरता डायबेटिस कंट्रोल मिळविल्याबद्दल अभिनंदन. * आता खरे साहेब व साती अक्कांच्या प्रतिसादानंतर माझा नेहेमीचा खडूस, व प्रदीर्घ प्रतिसाद. या प्रतिसादाचे कारण म्हणजे, "डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा फायदा.. " हे वाक्य ३-४ प्रतिसादांत दिसले. आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो, की अमुक एका यशस्वी डॉ.चे औषध मी सुरू केले, की आपोआप बरा होणार. इथे मुळात त्यांचा सल्ला घेतला हे महत्वाचे नसून तो संपूर्णपणे आचरणात आणला हे जास्त महत्वाचे आहे, हे सर्व डायबेटिक रुग्णांनी लक्षात घेतले पाहिजे. (डिस्क्लेमर क्र. १. : मी डायबेटॉलॉजिस्ट नाही. सातीअक्का डायबेटीसच्या स्पेशलिस्ट आहेत.) (डिस्क्लेमर क्र २. : मी फक्त कडू सत्ये नोंदविणार आहे.) (डिस्क्लेमर क्र ३. : हा/ असा प्रतिसाद पूर्वी कुठेतरी दिला असावासा देजावू येतो आहे) डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे. सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही. जेवणात नक्की कोणते घटक किती प्रमाणात घ्यायचे, ते नीट समजून घेतले तर डायबेटीसवाल्याला अमुक वस्तू कधीच खाता येणार नाही असे होत नाही. म्हणजे २ चमचे आमरस खाल्ला, तर जेवणातून १ पोळी कट करता यायला हवी. किती कार्बोहायड्रेट खायचे ते मोजणे गरजेचे. ते कोणत्या प्रकारे खाल्लेत हे जरा कमी महत्वाचे. शेवटी, डायबेटीस 'कागदावर दिसतो' तोपर्यंतच त्याची ट्रीटमेंट करण्यात मजा आहे. आपल्याला डायबेटीस झाला, की सुरुवातीला आपण घाबरतो. जोरात पथ्य पाणी, वॉक इ. सुरू होते. २-३ वर्षांत, हळूहळू डायबेटीस 'मित्र' बनतो. अर्थात, आपल्या लक्षात येते, की व्यायाम ८-१५ दिवस 'चुकला' किंवा भरपूर कुपथ्य झालं. (काय करणार चुलत भाच्याचं लग्न होतं..) तरी आपल्याला 'त्रास' होत नाही. एकतर आधीच स्वतःला टोचून रक्तातली साखर तपासून घ्यायची जिवावर येते. वरतून लॅब टेस्ट करून घेणे हा डॉक्टरी भ्रष्टाचार, असे डोक्यात भिनलेले असते. तेव्हा, 'मला त्रास होत नाही' हा डायबेटीस "बरा" असण्याचा क्रायटेरिया तयार होतो. शुगर मॉनिटर होतच नाही. शिवाय तोपर्यंत अमुक एक 'योगासन' केल्याने, किंवा 'कारल्याचा/आणि कसला रस पिण्याने' किंवा अमुक पुड्या खाल्ल्याने वगैरे डायबेटीस बरा झाल्याच्या कथा ऐकिवा असतात, व कमी कष्टात डायबेटीस बरा करण्यासाठी त्या बिनकष्टाच्या उपायांचा वापर सुरू होतो. मित्रहो, डायबेटीस कागदावर दिसतो, (अर्थात लॅब रिपोर्टात दिसतो, तुम्हाला 'त्रास होत नाही') तोपर्यंतच त्याला आटोक्यात ठेवा. कारण, सातीअक्कांचे, डॉ. त्रिपाठींचे, नीट न ऐकता, डायबेटीस कंट्रोल हुकतो, तेव्हा मेडिकल ट्रीटमेंट संपून पेशंट आमच्यासारख्या सर्जनकडे पाठवावा लागतो. मग पायाच्या बोटाच्या जखमेसाठी एकतर पेशंट वर्षानुवर्षे न भरणार्‍या जखमा घेऊन फिरतो. आम्ही बोट, किंवा पाय कापायला सांगतो. किडन्या फेल होतात, आम्ही डायलिसिस्/किडनी ट्रान्स्प्लाण्ट सांगतो. डोळ्याचे पडदे जातात, आम्ही लेझरने रेटिना जाळून टाकतो.. डायबेटीसने गुण दाखवले की नो पॉझिटिव्ह ट्रीटमेंट. तेव्हा, लोकहो, विटेकर साहेबांच्या सखोल अभ्यास, अत्यंत रिव्होलुशनरी लाईफस्टाईल चेंज व चिकाटीवरून धडा घ्या, अन "पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की मला आनंद होतो" या डॉ. साती यांच्या वाक्याचा अर्थ समजवून घ्या, [*ओएचे=ओरल हायपोग्लायसेमिक एजंट=डायबेटीसचं औषध ;) ] डायबेटीस-मुक्त रहा, याच सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 07/19/2016 - 20:09 नवीन
+१०००००. This is the Best comment here!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
श
शलभ Tue, 07/19/2016 - 20:41 नवीन
मस्त प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
र
रुस्तम Wed, 07/20/2016 - 07:10 नवीन
या वेळेस प्रतिसाद अजिबात खडूस वाटला नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सही रे सई Fri, 07/22/2016 - 17:43 नवीन
आपला प्रतिसाद काहीवेळी मनाला बोचणारा असतो, पण हा प्रतिसाद खरोखरीच बरच मार्गदर्शन करणारा आहे. डोळे उघडले. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नेहमी असेच नेटक्या शब्दात मार्गदर्शन करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
झ
झेन Tue, 07/19/2016 - 18:20 नवीन
विटेकर काका मन:पूर्वक अभिनंदन. आपला अनुभव आणि इथल्या डॉक्टरांचं अनुमोदन यामुळे मधुमेहाकडे सकारत्मकपणे बघू शकतो हे प्रथमच जाणवले. माहितीतल्या ज्यांना कुणाला मधुमेहाचा त्रास/इतिहास आहे त्याना तुमचा अनुभव कळकळीने सांगेन. अनुभव शेअर करण्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Tue, 07/19/2016 - 20:17 नवीन
पायर्‍या चढणे उतरणे व चालणे हे उत्तम वायाम आहेत. लिफ्टचा वापर कमी करावा. रिक्षा टाळावी
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/20/2016 - 02:04 नवीन
विटूकाका व विटूकाकूंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/20/2016 - 03:13 नवीन
१. सर्वप्रथम श्री व सौ विटेकर यांचे हार्दीक अभिनंदन आणि दोघांनाही उत्तम व दीर्घ आयुरोग्यासाठी शुभेच्छा ! त्यांच्याइतका अभ्यास, चिकाटी आणि मेहनत घेणे सर्वसामान्यपणे दिसत नाही. २. त्याचबरोबर वर तीन डॉक्टरांनी दिलेले सल्ले व अनुभवही तितकेच महत्वाचे आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 07/20/2016 - 05:03 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वतः धागाकर्त्याचा फर्स्टहॅन्ड अनुभव अधिक मिपावरील सर्वच ज्ञात डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद, यामुळे सदर धागा वाखु म्हणून साठवण्यायोग्य झाला आहे. काही शंका - १) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय? लोणी-तूप समजण्यासारखे आहे परंतु दही-ताक का व्यर्ज? शिवाय यामुळे कॅल्शियमची जी कमतरता भासेल ती कशी पूर्ण करता येईल? २) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही. समजा दोन पोळ्या आणि एक मूद भात असे घेतल्याने नक्की काय फरक पडू शकेल? ३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय? ४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय? ५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 07/20/2016 - 06:26 नवीन
नक्की कारण माहिती नाही पण ते डागदर त्रिपाठी व्हिगन आहाराचा प्रचार करतात बहुदा. व्हिगन नाव न घेता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:29 नवीन
१) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय? याचे मुख्य कारण म्हणजे फ्याट वाढू नये ! डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पेशी ईन्शुलीन ला आत घेत नाहीत ! तसेच आपल्याला मिळणारे दूध अत्यन्तिक भेसळ्युक्त असते ! पण तरिही देशी गाईचे , घरीच काढलेले दूध ही वर्ज्य आहे. ( हे मला फारसे पटत नाही , आई खास देशी गाईचे तूप मला पाठवते , ते ही मला वर्ज्य आहे , कारण समजले नाही ) २) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही. अगदी सोप्पे ! साखर वढू नये म्हणून ! साखरेचा ईन्टेक कमी करायचा. धान्याचा जी आय सगळ्यात जास्त म्हणून कमीत कमी धान्य घ्यायचे ! ३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय? रिवरसल होइइपर्यन्त मांसाहार नाही, नंतर ही मर्यादा आहेच ! ४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय? आपल्या आवडीचा, पण घाम येणे अपेक्षित आहे , ठोके जलद व्हावेत ! ५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय? होय पूर्ण वर्ज्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
कंजूस Wed, 07/20/2016 - 05:05 नवीन
असे अनुभव लिहिण्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.आनंदी गोपाळ यांनी बरोबर लिहिले आहे. या रुग्णांना काही खाल्ले तरी पोट भरल्याची भावना होतच नाही.त्यासाठी असे अन्नपदार्थ शोधावे लागतात जे पोट भरवतील पण साखर वाढवणार नाहीत. - पाव भाजी खा. पण यातली भाजी ही नेहमीची पावभाजी नसून दुधी,टिंडा,काकडी, कच्ची पपइची वापरायची.म्हणजे बटाट्याची काचय्रा भाजी करतो तशी या भाजांच्या काचय्रा करायच्या.पावात भाजी भरून खायची.करून पाहा. इतर लोकांनी ( रोगी नसलेल्यांनी ) चमचमीत आहार ाला एक दिवस सुट्टी देऊन मद्राशी भाज्या खाव्यात.कदान्न खावे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 07/20/2016 - 05:11 नवीन
माझ्या अंदाजाने माझ्या शरीरात डायबेटिक ट्रीगर होऊन आता चौदा वर्षे झाली. त्यात गेली १२ वर्षे मी गोळया घेत आहे. पण गोळ्या बंद कशासाठी करायच्या ते मला काही उमगलेले नाही.माझे वय आता ६३ आहे. जर माझा मधुमेह २८ व्या वर्षी चालू झाला असता तर गोळ्या बंद करण्याचे स्वपन मी पाहिले असते. विटेकर यानी दिलेल्या माहितीत बेकरी फूड न खाण्याचा सल्ला दिला आहे. तो माहित होण्यासाठी त्रिपाठीच का ? हे सारे माहिती जालावरही आहे. मैद्याचा ग्ल्यसेमिक इंडेक्स अति आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत माझे ग्लूकोसायलेटेड हिमोग्लोबिन ६.७ आहे. चौदा वर्षाच्या मधुमेहाच्या सहवासाच्या मानाचे ६.७ हा उत्तम कंट्रोल आहे असे डॉक्टरांचे मत आहे. वे त्याचे श्रेय कालच त्यानी मलाच दिले. ते म्हणाले तुमच्या या प्रवासात औषध हा एक लहानसा उपाय आहे. खरे व्यवस्थापन तुम्ही केले तरच. प्रतिसादात आगो यानी एक सूचक वाक्य टाकले आहे. डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे. यातच खरी बात आहे. चालायचे नाही, पालेभाज्या कोशिंबीरी आवडत नाहीत, केळी आंबे , सिताफळे चिकू मजबूत खायचे, फक्त फलभाज्या हव्यात उसळी नकोत, सारखे सारखे बाहेर जाउन पावभाजी खायची व मुख्यतः कार्ली जांभूळ रस अलोव्हेरा मेथी यांचे प्रयोग करीत रहायचे यापासून मी लांब राहिलो आहे. सतत शरीर हालते ठेवून वा थोडे थोडे खाऊन स्वादुपिंडावरील भार कमी ठेवणे हा यातील खरा फंडा आहे. पण हा फंडा नोकरी करणार्‍या॑ माणसाला अंमलात आणणे कठीण आहे. साखर जास्त प्रमाणात रक्तात येणे याचा ताणाशी जवळचा संबंध आहे सबब नात्यात व ध्येयातही फार गुंतून रहाण्याचे टाळावे. ते मी करतो. संगीत, विनोद,गप्पा, निसर्गाची आवड याने ताण कमी होतो असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:38 नवीन
चौरा सर, ६३ म्हणजे फार वय नव्हे ! अगदी यौ-वनात नसले तरीही वनात जावे असेही नाही ! आणि हल्ली आरोग्य सुविधामुळे आयुर्मान वाढले आहे ! ६.७ हा उत्तम कंट्रोल आहे , पण हा गोळ्या घेऊन आहे ! डायबेटीस च्या गोळ्यांचे साईड इफेक्टस आहेत म्हणून गोळ्या नकोत ! ( गोळ्यांपेक्षा इन्शुलीन बरे अशी माझी धारणा आहे , त्याचे दुष्परिणाम नाहीत ) एकदा त्यातील गंमत समजली की नोकरी करणार्‍या माणसालाही काही कठीण नाही ! उलट माझ्या रजा कमी झाल्या आहेत. ताणाचा मुद्दा अगदी बरोबर आहे , पण त्याचा नोकरीशी संबंध नाही ! ताण असतो तो आत , बाह्य परिस्थितीवर नाही असे मला वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
अ
अर्धवटराव Wed, 07/20/2016 - 05:46 नवीन
डिसिप्लिईन नीट पाळता आली तर आश्चर्यकारक परिणाम दिसतात हे खरं आहे. अवांतरः सुरुवातीला/अधुन मधुन मनोनिग्रह कमि पडतो तेंव्हा जिभेचे चोचले पुरवत पथ्य पाळण्याचे हमखास टेक्नीक म्हणजे "जिभेला द्या, पोटाला देऊ नका". गुलाबजाम खावासा वाटतोय? रस पिळुन टाका आणि गुलाबजाम तोंडात टाका. डोळे मिटुन जिभेवर चव रुळु द्या. ५ मिनिटाने मन भरेल. देन स्पिट इट औट. (हा अन्नाचा अपमान आहे हे मान्य. पण पोटात जास्तिच्या कॅलरी ढकलुन त्या व्यायमाने कमि करणे म्हणजे देखील त्या कॅलरीज थुंकणे होय. अ‍ॅज गुड अ‍ॅज स्पिटींग)
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:39 नवीन
डोळे मिटुन जिभेवर चव रुळु द्या. ५ मिनिटाने मन भरेल.
हा उपाय एस- व्यासा वाले सुचवितात , अर्थात प्रत्यक्ष खाणे नव्हे तर फक्त कल्पना करायला सांगतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
कंजूस Wed, 07/20/2016 - 05:52 नवीन
गोडगोड सल्ले सतत मिळाल्यानेही रोगी कंटाळत असतील.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Wed, 07/20/2016 - 06:30 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! मागच्या वर्षीच डायबेटीस आहे हे समजले. अजून तरी धावणे, जिम सोडून वेगळे काही केले नाहीये. आता रजिस्ट्रेशन करतो पाहिले बेसिक कोर्स साठी. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:40 नवीन
धावणे, जिम सोडून
जिन्यावर पायर्‍या चढण्याचा व्यायाम करावा असे सुचवेन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
ब
ब़जरबट्टू Mon, 08/08/2016 - 12:53 नवीन
मनापासून धन्यवाद काका., तुमच्या या धाग्यामुळे फार फायदा झाला.. सध्या तरी पूर्व-मधुमेही आहे. त्यामुळे आतापासून काळजी घेतोय. दूध व तत्सम पदार्थ बंद करून 2 आठवडे झालेत, व पृथ्वीवरचे 3 किलोग्रॅम वजन कमी झालेय. त्यामुळे उत्साह आहे. मागच्या आठवड्यातच बेसिक प्रोग्रामला हजेरी लावली, व आता स्मूदी सुरु करतोय. आता मांसाहार व तीर्थ बंद करणे म्हणजे जिकरीचे काम आहे, पण अनायसे श्रावण आलाय मदतीला, तर थोडे पुण्य पण कमावून घेतो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
श
शिद Wed, 07/20/2016 - 11:53 नवीन
खरंच विटेकर काका...मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! व हा लेख लिहील्याबद्दल धन्यवाद. वाचनखूण तर साठवली आहेच पण लेखाची लिंक आमच्या पिताश्रींना देखील पाठवली आहे. ह्यानिमित्तानं मिपावरील सन्माननिय डॉक्टर्सना काही प्रश्नः १. माझं संपूर्ण घराणं डायबेटीक आहे. माझ्या माहितीतल्या बराचश्या जवळच्या व लांबच्या आजोबांना व काकांना डायबेटीस होता/आहे. माझ्या वडीलांना सुद्धा आहे. पण घरातील मुलींना म्हणजे आत्या व बहीणींना डायबेटीस झाला आहे असं कधी कानावर आलं नाही, असं का? २. माझे वडील ज्वारी-बाजरी-नाचणी-मेथी (मुठभर) असं मिक्स पिठाच्या भाकर्‍या खातात व कधीकधी चपाती. पण लहानपणाच्या सवयीमूळे त्यांना जेवणात मच्छी (ओली/सुक्की) लागते; रोज नाही पण आठवड्यातून ३-४ दिवस. तर कुठली मच्छी त्यांच्या डायबेटीसच्या आजारात खालेली चालेल? ३. आत्ता त्यांच वय ६३ आहे व २ महीन्याने वैगरे एखाद पेग स्कॉच घेतात. तसंपण ते कधीच हेवी ड्रींकर नव्हते. तर असा एखादा पेग चालेल का की दारू पुर्ण वर्ज्य करावी? आगाऊ धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/20/2016 - 16:39 नवीन
मधुमेह अनुवांशिक असला तरी पुढच्या पिढीतील सर्वानाच होतो असे नाही. शिवाय बऱ्याच वेळेस नीट तपासणी केलेलेही नसते त्यामुळे एखादी जखम बरी होत नसेल तेंव्हा तपासणी केली तर एकदम भरपूर साखर( मधुमेह) आहे असे कळून येते. वजन आटोक्यात राहील अशा तर्हेने राहिले तर कोणतेही "मासे" खाल्ले तर चालतात. त्यामानाने शिंपले खेकडे इ कठीण कवचाचे प्राणी कमी खावेत. दोन महिन्यात एखादा ( किंवा दोन पेग) घेण्याने काहीही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Wed, 07/20/2016 - 22:22 नवीन
खुप आभार ही माहीती दिल्याबद्दल...धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेदांत Wed, 07/20/2016 - 12:09 नवीन
अभिनन्दन
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/20/2016 - 12:29 नवीन
विटूकाकांचे कचकावुन अभिनंदन. परत एकदा सकाळी उठुन व्यायाम सुरु केला पाहिजे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 07/20/2016 - 12:50 नवीन
अभिनंदन! असेच मधुमेह मुक्त रहा!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Wed, 07/20/2016 - 13:23 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 07/20/2016 - 14:55 नवीन
सर्वांचे मन:पूर्वक आभार, बाकी निवांत सविस्तर लिहितो. सध्या हापिसच्या गडबडीत आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/20/2016 - 15:24 नवीन
सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही. गोपाळरावांच्या या वाक्याचे मी फक्त विश्लेषण देत आहे. डायबेटीस का होतो-- आपल्या रक्तातील साखर सरक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीत शिरण्यासाठी आणि तिचा तेथे वापर होण्यासाठी स्वादुपिंडातून(PANCREAS) इन्स्युलिन हे द्रव्य शरीरात उतरत असते. जितकी साखर जास्त खाल तितके इन्स्युलिन जास्त लागते. अनुभवांशिकता किंवा इतर कारणांमुळे जेंव्हा इन्स्युलिन स्रवण्याची ही प्रक्रिया कमी होते तेंव्हा सुरुवातीला उपाशीपोटी रक्तात साखर व्यवस्थित असते पण जेंव्हा तुम्ही जेवता तेंव्हा अतिरिक्त साखर वापरण्यासाठी लागणारे इन्स्युलिन तुमचे शरीर तयार करू शकत नाही यामुळे खाल्ल्यानंतरची रक्तातील साखर ही जास्त दाखवली जाते. याला इम्पेयर्ड ग्लुकोज टॉलरन्स( IGT) म्हणतात म्हणजे आपले शरीर अतिरिक्त ग्लुकोजला सहन करू शकत नाही. हा आजार अजून वाढला तर आपल्या रक्तातील इन्स्युलिनची पातळी इतकी खाली येते की उपाशीपोटी सुद्धा आपल्या रक्तातील साखर वाढलेली असते. दुर्दैवाने रक्तात भरपूर साखर असूनही शरीराच्या पेशींना साखर मिळत नाही. यामुळे आपल्याला भूक आणि तहान जास्त लागणे आणि हीच साखर मूत्रातून टाकून दिल्याने लघवीला वारंवार होणे अशी लक्षणे दिसतात. मुळात तुमच्या शरीरात इन्स्युलिन स्रवण्याचे प्रमाण कमी झाल्याने जी औषधे दिली जातात(OHA) ती स्वादुपिंडाला चालना देऊन अधिक इन्स्युलिन तयार करायला भाग पडतात. आपले वजन जितके जास्त तितकी आपल्याला इन्स्युलिनची गरज जास्त. एक विशिष्ट पातळी नंतर आपले स्वादुपिंड अधिक इन्स्युलिन तयार करू शकत नाही मग आपल्याला इन्स्युलिनची इंजेक्शने घ्यावी लागतात. स्वादुपिंदात पेशी हळूहळू मृत्यू पावल्यामुळे कमी होत जातात यामुळे उरलेल्या पेशींवर ताण येतो. मूळ आपले स्वादुपिंड नीट काम करत नसेल तर ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी (मृत पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासाठी) कोणतेही औषध आजतरी उपलब्ध नाही. यासाठी ज्यांच्या कुटुंबात हा रोग आनुवंशिकतेने आला/ येणार असेल त्यांनी वयाच्या "२५" पासूनच आपली दिनचर्या जास्त आरोग्यपूर्ण करावी. (२५ वयाला विमा काढला तर तो स्वस्त पडतो). जितक्या उशिरा हे काम कराल तितक्या जास्त स्वादुपिंडातील पेशींचा नाश झालेला असेल. एवढ्या उहापोहानंतर आपल्याला हे लक्षात आले असेल की अजून तरी मधुमेह "कायमचा बरा" होणे शक्य नाही. तो केवळ नियंत्रणात राहू शकतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 16:51 नवीन
ह्या माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनंदी गोपाळ Wed, 07/20/2016 - 18:20 नवीन
आपण म्हणताहात ते बरोबरच आहे.
आपल्या रक्तातील साखर सरक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीत शिरण्यासाठी आणि तिचा तेथे वापर होण्यासाठी स्वादुपिंडातून(PANCREAS) इन्स्युलिन हे द्रव्य शरीरात उतरत असते. जितकी साखर जास्त खाल तितके इन्स्युलिन जास्त लागते.
वर डॉक्टरसाहेबांनी इन्शुलिन नक्की काय करते याबद्दल ही माहिती दिलेली आहेच. पण डायबेटीस सी.एम.ई. (कंटीन्यूड मेडीकल इडुकेशन उर्फ परिसंवाद) सुरूच आहे, तर वर हायलाईट केलंय त्याबद्दल थोडं डिटेल बोलून घेतो. चूकभूल द्यावी घ्यावी. आपल्या पेशी एकाद्या कारखान्यासारख्या असतात. अन तो कारखाना चालण्यासाठी लागणारे इंधन = ग्लूकोज. हे ग्लुकोज लिटरली 'जाळून' (ऑक्सिडेशन) उर्जा बनवली जाते. तर, हे इंधन आपण जेवणातून पोटात घेतो. पचनातून काँप्लेक्स शुगर्सचे ब्रेकडाऊन करून ग्लुकोज बनते, ते पोटातून रक्तात येते. (जेवणातून मिळाले नाही तर शरीरातले राखीव फॅट, वा प्रसंगी स्नायूही मोडून ऊर्जानिर्मिती केली जाते, पण तो वेगळा विषय.) हे रक्तातून वाहून आणलेले ग्लूकोज पेशीच्या दारी आले, की फॅक्ट्रीचे दरवाजे उघडण्याचा जो गेटपास, किंवा किल्ली असतो, तो म्हणजे इन्शुलिन. ही इन्शुलिनची किल्ली पेशीभित्तीच्या कुलुपात लागली, की सेल मेंब्रेन ग्लूकोजसाठी 'पर्मिएबल' होते, अर्थात दराजा उघडतो, होते, व ग्लुकोज आत प्रवेश करते. डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.. किल्ल्या कमी बनण्यात काहींदा किल्ल्या बनवणारे कारागीर (आयलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स) आळशी होतात, त्यावेळी (पॅन्क्रिआ ग्रंथीतील या पेशींना उत्तेजित करणारी औषधे देवून) किल्ली, अर्थात, इन्शुलिन प्रॉडक्शन वाढवता येते. काहींदा कारागीरच नष्ट झालेले असतात तेव्हा बाहेरून किल्ल्या (इन्शुलिन इंजेक्शने) आणून द्याव्या लागतात. इ. अर्थातच यावरून डायबेटीसचे प्रकार असतात, अन त्यानुसार उपचारही बदलतात. * इन्सुलिन हे प्रोटीन असल्याने गोळीसारखे तोंडाने खाल्ले तर नॉर्मल अंडी खाल्ल्यावर प्रोटीन पचते, तसे पचून जाते व रक्तात शिरेपर्यंत त्याचा औषधी इफेक्ट गायब होतो. तस्मात आजतरी इंजेक्शनेच घ्यावी लागतात. * डायबेटीसमधे रक्तातील साखर वाढते, हे केवळ लक्षण आहे, जसे मलेरियात 'थंडी वाजून ताप येतो'. मलेरियातले खरे नुकसान वेगळे असते. लाल रक्तपेशींत मलेरियाच्या जंतूची वाढ होऊन त्या फुटतात, ही ती 'अंडरलाईंग पॅथॉलॉजी' अर्थात होणारे खरे नुकसान. मलेरियाचे जंतू शरीरात शिरणे हे कारण आहे. रक्तपेशी फुटतात तेव्हा थंडीवाजून ताप येणे हे लक्षण आहे. लिव्हर व रक्तपेशींना होणारे नुकसान आहे. डायबेटीसमधे नुसती साखर वापरता येत नाही, हे कारण आहे, रक्त, लघवीतली वाढलेली साखर हे लक्षण आहे, व मायक्रोव्हॅस्कुलर अँजिओपथी हे नुकसान आहे. (आणखीही काही आहे, पण सध्या हा मुख्य मुद्दा) तर, शरीरातल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या बंद पडणे हा खरा डायबेटीसचा आजार आहे. यामुळे मज्जतंतूंना पुरवठा करणार्‍याच छोट्या रक्तवाहिन्या बंद पडतात, ज्यामुळे संवेदना खुंटतात. पायाला ठेच लागलेली समजत नाही. तिथे अल्सर्स, जखमा तयार होतात. या जखमा भरण्यासाठी लागणारा रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या पुनः बंद असतात, हवी ती प्रतिकारशक्ती तिथे पोहोचत नाही. रक्तातली अतिरिक्त साखर जंतूंना खाद्य देण्याचे काम करते, इन्फेक्शन्स होत राहतात. वेदनाच समजत नाहीत. डायबेटिक पेशंटचे हार्ट अ‍ॅटॅकही सायलेंट असतात. दुखतच नाहीत! रक्तवाहिन्या बंद पडल्याने गल्लीतला पाणीपुरवठा कमी झाल्यासारखी परिस्थिती येते. मग तिथे 'निओव्हॅस्कुलरायझेशन' होते. अर्थात लोक इल्लीगल कनेक्शन्स घेऊ लागतात. नव्या रक्तवाहिन्या फुटतात. या गळक्या असतात. नको तिथे रक्तस्त्राव होतात. उदा. रेटिना. किडनीज.. मल्टी सिस्टीम फेल्युअर, मल्टिसिस्टीम डिसीज. हे सगळे डायबेटिसच्या अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसमधे होते, जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे पेशंट फिजिशियनकडून सर्जनकडे पोहोचतो/ पोहोचवावा लागतो. व हे होण्याचे मूळ कारण बहुतेकदा, पुअर डायबेटीस कंट्रोल इतकेच असते. उत्तम डायबेटीस कंट्रोल ठेवल्यास सहसा, या स्टेजेस कमी वयात येत नाहीत. वय झाल्यावर... असो. येतानाच रिटर्न तिकिट आणलंय ना आपण? ;) तर, डायबेटीस अर्थात रक्तशर्करेवर ताबा ठेवला तर या सगळ्या गोष्टी होण्याचे प्रमाण खूपच कमी असते, व म्हणून आम्ही डॉक्टर लोक साखर ठिकाणावर ठेवा, हा सल्ला सांगत राहतो. अर्थात, त्यासाठी व्यायाम, पथ्य, औषध, ही त्रिसूत्री आवश्यक आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कॅन गिव्ह मिरॅकल्स. पाच पन्नास हजाराची गाडी आपण काळजीपूर्वक वापरतो. लाख मोलाचे शरीर समजून उमजून वापरणे = लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. इतके हे सगळे सोपे आहे.. त्याला औषधांची जोड आहेच. औषधे, सुर्‍या कात्र्या शक्य तितक्या कमी वापरणे हाच प्रयत्न आम्हा डॉक्टरांचा असतो, तो सफल होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची जोड अत्यावश्यक असते. औषध घ्यायला लाजू नये, व विनाकारण, विना एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस ते घेऊही नये. * डिस्क्लेमर्सः १. वरील प्रतिसादात अनेक मेडिकल कन्सेप्ट्स/संज्ञांचे जनसामान्यासाठी अतिसुलभीकरण (putting in layman's terms) केलेले आहे. डायबेटीस हा हत्तीसारखा आहे. आम्ही आंधळे आमच्या वैयक्तीक व्ह्यूपॉईंटातून समजवून सांगायचा प्रयत्न करीत असतो, ;) पण तो मुळात हत्ती आहे, यावर आमचे सर्व डॉक्टरांचे एकमत आहे. तसेच लेमॅन टर्म्स कोणत्या याबद्दल युनिफॉर्म गाईड नाही, म्हणून काही लोक शेपूट, काही टेल, काही पूँछ म्हणतात, अर्थ तोच असतो. २. "सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही." अर्थात, काही प्रकारचे डायबेटीस, काही काळाकरता विना औषध (ओएचए) आटोक्यात राहतात, हे मला म्हणायचे आहे. सर्व नाहीत, सर्वकाळ नाहीत. 'बरे' नाहीत, आटोक्यात. येनकेनप्रकारेण, शुगरकंट्रोलम् पुरुषो प्राप्येत ;) आयुर्वेदातही मधुमेह 'असाध्य'च वर्णिलेला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनंदी गोपाळ Wed, 07/20/2016 - 18:21 नवीन
अती लांबट प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:43 नवीन
डॉ. त्रिपाठीनी हेच समाजावून सांगितले आहे ! फारच छान सांगितलेत ! दुर्दैवाने डॉक्टर लोक इतके समजाऊन साण्गत नाहीत , डोस वाढवत राहतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
च
चौकटराजा Fri, 07/22/2016 - 05:40 नवीन
मी असे वाचले आहे की चल व्यायाम करताना ( गप्पा मारीत मित्रानी सकाळी फिरायला जाणे नव्हे.) करताना " गेट पास" शिवाय मेम्ब्रेन ची दारे उघडतात. त्यामुळे चालायची संवय असलेल्या मधुमेही माणसाला दमायच्या ऐवजी साखरेला पेशीत प्रवेश मिळून उलटे उत्साही वाटते. मला याचा अनुभव आहे. पण याचा अर्थाअर्थी संबंध मी उल्लेखिलेल्या कार्यकारण भावाशी आहे का हो मला कोडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सामान्य वाचक Wed, 07/20/2016 - 18:46 नवीन
अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले एकंदरीत lifestyle कायमस्वरूपी बदलणे हा उपाय आहे 10 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स केला आणि दुखणे गायब असे नाही या सगळ्या गोष्टी आयुष्य भर पाळल्या पाहिजेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 07/21/2016 - 06:59 नवीन
डॉक्टर आनंदी गोपाळ, छान समजावून सांगितले.
डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.
कुलुपे खराब झाली तर त्यावर कसा इलाज केला जातो? आणि कुलुपे खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:45 नवीन
कुलुपे खराब
माझ्या माहितीप्रमाणे त्यावर फ्याट जमा होते म्हणून कुलपे खराब होतात, बाकी डो़क्टर समजाऊन सांगतीलच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/21/2016 - 07:47 नवीन
डॉ खरे यांच्या व तुमच्या या प्रतिसादामुळे मधुमेहाची बर्‍यापैकी कल्पना आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/21/2016 - 08:12 नवीन
थँक्स अ लॉट सर. या प्रतिसादाबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 08:24 नवीन
खुप छान माहीती दिलीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
साती गुरुवार, 07/21/2016 - 08:41 नवीन
आनंदी गोपाळ, एकदम सुंदर शब्दांत समजावलंत मधुमेहाविषयी. धन्यवाद! यात अजून एक म्हणजे इन्स्युलीन काही फक्त साखरेच्या चयाप हयातच महत्त्वाचा रोल बजावते असे नाही चयापचयाच्या इतर अनेक अभिक्रीयांत शरीराला इन्स्युलीनची गरज असते. त्यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी आहे म्हणजे मधुमेहाच्या दृष्टीने सगळे आलबेल आहे असे अजिबात नाही हे ही महत्त्वाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
साती गुरुवार, 07/21/2016 - 08:41 नवीन
आनंदी गोपाळ, एकदम सुंदर शब्दांत समजावलंत मधुमेहाविषयी. धन्यवाद! यात अजून एक म्हणजे इन्स्युलीन काही फक्त साखरेच्या चयापचयातच महत्त्वाचा रोल बजावते असे नाही चयापचयाच्या इतर अनेक अभिक्रीयांत शरीराला इन्स्युलीनची गरज असते. त्यामुळे आपल्या रक्तातील साखर कमी आहे म्हणजे मधुमेहाच्या दृष्टीने सगळे आलबेल आहे असे अजिबात नाही हे ही महत्त्वाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
N
nanaba गुरुवार, 07/21/2016 - 12:28 नवीन
Hi, I have HBA1C 6.1, 6.2 from last 2 years or so (post partum, it went up to 6.7, then with diet change alone, it came down to 6.1 and is in that range most of the times). lately, fasting sugar was bit higher - 108 or so. I am not on any medication. How much damage is already done? Now, if this changes with lifestyle changes, can we call it "managed" or "cured"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
N
nanaba गुरुवार, 07/21/2016 - 19:05 नवीन
हा प्रश्न कुतुहल म्हणून विचरतेयं माहिती साठीं . मेडिकल उपचारांसाठी पर्याय म्हणून नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
N
nanaba गुरुवार, 07/21/2016 - 19:06 नवीन
हा प्रश्न माहितीसाठी विचारला आहे _ उपचारांसाठी पर्याय म्हणून नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा