Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

व
विटेकर
Tue, 07/19/2016 - 14:21
🗣 173 प्रतिसाद
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते. २०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात. २०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती. सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती ) या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ ! त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही ! दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते ! त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही ) ५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१ डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती. मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे ! मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत ! जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे ! पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे ! अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !
वर्गीकरण
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
128355 वाचन

💬 प्रतिसाद (173)
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/21/2016 - 17:31 नवीन
बघा बरं.. फक्त खडुसपणा न करता परखडपणे सांगितलत तरी समजतंच आम्हाला.. ;) सुंदरच समजावुन सांगितलं आहे. ह्या धाग्यातुन पुष्कळ चांगली माहिती मिळाली. फक्त ते दही, ताक, पनीर आणि लोणी सुद्धा चालणार नाही ह्याबद्दल कुणी डॉक्टर टिपण्णी करेल काय? शिवाय हे खायचं नाही, धान्य कमी खायची तर बाकी घटक कमी होणार नाहीत का शरीरात? शाकाहारी लोकांचे फारच वांदे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
ब़जरबट्टू Mon, 08/08/2016 - 12:01 नवीन
फक्त शाकाहारीचा नाही, मांसाहारींचे पण वांधे आहेत. या उपचारपदध्तीमध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करायचा असतो.. त्यामुळे मलापण प्रोटीन बद्दल शंका आहे. पण डॉक्टर म्हणतात, एक महिना स्वतःचे डोके वापरू नका.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चौकटराजा Wed, 07/20/2016 - 17:33 नवीन
आज येथील एक अट पुरी करता येते का ते प्रयोग करून पाहिले,.वीस मिनिटाच्या काळात 24 मजले 2 हप् त्यात चढून गेलो पहिल्या 12 मजल्या ना 4 मिनिटे 1 से व आणखी 12 मजल्या ना 4 मि व 15 से लागले दोन्ही इमारतीत 4 मजल्या नंतर 20 से आराम केला 12 व्या मजल्यावर नाडी 138 होती .सदर प्रयोग जेवल्यावर 2 तासाने केला . काहीही दमणूक झाली नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/20/2016 - 18:59 नवीन
चौराजी आप तो नवजवान हो । अभिनंदन ! थम्ज अप !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:51 नवीन
गोळी घेत असाल आणि जिन्यांचा व्यायाम सुरु केला असेल तर हायपो होण्याची शक्यता आहे , ग्लुकोमीटर वर चेक करत रहा. १५ मिनिटांच्या पायर्‍यांच्या व्यायामाने ३०-४० युनिट साखर कमी होते असा माझा अनुभव आहे ! सदाशिव पेठेत ग्लुकोमीटरच्या १०० स्ट्रीप ११०० रुपायला मिळतात. नेहमीचा दुकानदार लै कापतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पैसा Wed, 07/20/2016 - 18:55 नवीन
या धाग्यावरचे सर्व डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद खूप माहिती देणारे आहेत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 07/20/2016 - 22:08 नवीन
डॉक्टर आनंदी गोपाळ, तुमचे ह्या लेखातले प्रतिसाद खूप माहितीकारक होते. मे गेले 5 महिने कोणतेही कारण नसताना बंद केलेला माझा व्यायाम उद्यापासून परत चालू करत आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 07/21/2016 - 02:55 नवीन
आपले कौतुक याबद्द्ल. खरे तर असा व्यायाम व्हॅल्यू अ‍ॅडेड असावयास हवा. महिला पेशंट (अनाहिता मंडळ माफी असावी) तो करत नाहीत. उगीच दोन चार फेर्या मारतात. मला संगीताची आवड आहे. निरनिराळ्या संगीतकारांच्या प्लेलिस्ट करून त्या ऐकत चालतो. मस्त वाटते. यात शक्यतो मध्य द्रूत लयातील गाणी घेतलेली आहेत. सबब पायाना अपोआपच लयीची प्राप्ती होते. पाउण तास कसा गेला हे कळत नाही. मधुमेहात साखरेची पातळी १४० चे खाली सतत असणे कठीण असते. काही लबाडी करून चाचणीचे वेळी तसे करून स्वतः ची फसवणूक करून घेता येते. सबब 'एच बी ए वन सी' ची टेस्ट ही आवश्यक करण औषधाचा डोस त्यामुळे अधिक अचूक ठरवता येतो. साखरेची पातळी १८० चे खाली सतत ठेवणे हे किमान ध्येय असावे. बाकी मधुमेह किडनी डोळा पाय, मेंदू ,हृदय यात नक्की कोणाला नुकसान पोहोचवतो हे नशीबच ठरवते. मधुमेह हा एन्डोक्राईन ओरिएन्टेड व व्हस्कुलर टारजेटिंग आजार आहे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
स्पा गुरुवार, 07/21/2016 - 06:16 नवीन
ले चाैकट फुल्ल फाॅर्म मध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 04:34 नवीन
मधुमेह आटोक्यात राहातो असं म्हणायचं असेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 04:37 नवीन
गाला यांचे मधुमेहावरचे पुस्तकही फार उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 07/21/2016 - 05:24 नवीन
हेच म्हणतो.मधुमेही माणसाला त्यात फार उपयुक्त मार्गदर्शन आहे. डॉ जावडेकर यानी लिहिलेले प्रश्नोत्तर वजा पुस्तक ही उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 07:53 नवीन
डॉक्टर लोक्स, नमस्कार, तुम्ही फार आपुलकीने लिहित आहात म्हणुन थोडे आगंतुक पणे विचारतो, क्षमा असावी, मी GTT केली तेव्हा एकूण 21 जण होते, पैकी 7 जण पुर्व मधुमेही मुक्त झाले, त्यांचे PP दोन तासांनी 140 च्या खाली होते, ते आतामधुमेही नाहीत असे म्हणायचे का? बाकी पुष्कळ प्रश्न आहेत, वेळ मिळाला की विचारतो,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/21/2016 - 08:10 नवीन
त्यांचा मधुमेह "आता" नियंत्रणात आहे असा अर्थ आहे. पथ्य पाणी सोडलं आणि वजन वाढलं कि परत साखरेचे प्रमाण वर जाईल. मधुमेह हा "उच्च रक्तदाबा"सारखा आपला मित्र असतो आणि आपली मृत्यूपर्यंत साथ देतो. तेंव्हा आहारविहार पथ्यपाणी करून तो नियंत्रणाबाहेर जाणार नाही ही काळजी घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
वामन देशमुख गुरुवार, 07/21/2016 - 13:41 नवीन
डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ आणि इतर डॉक्टर्स, उच्च / निम्न रक्तदाबावर परिपूर्ण माहिती (कारणे, लक्षणे, प्रतिबंधक उपाय, इलाज इ.) देणारा एक लेख लिहावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/21/2016 - 08:02 नवीन
हे विधान
पैकी 7 जण पुर्व मधुमेही मुक्त झाले
आणि
सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही.
थोडा गोंधळ होत आहे. म्हणजे मधुमेहा पासुन कधीच सुटका होउ शकत नाही का होउ शकते ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/21/2016 - 08:12 नवीन
विटूकाका आनि विटूकाकी दोघांचे अभिनंदन. सातीअक्का आणि गोपाळरावांना धन्यवाद. . आम्ही बी अनुवांशिक मधुमेहप्रेमीच. सध्या वायाम चालुय, खाणेपिणे जरा मापात ठेवाया पायजे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/21/2016 - 08:13 नवीन
समस्त डॉक्टरलोक, तुम्हाला एक प्रश्न आहे. मला सकाळी झोपेतून उठल्यावर साखर खावीशी वाटते. साधारणत: चमचा दोन चमचा फ्रूट जाम खाऊन बरं वाटतं. रोज अतिरिक्त साखर फक्त चहाकॉफीत असते. दिवसभरात सहा चमचे (टीस्पून) किंवा कमी. इथली इंग्लंडमधली साखर गोडीला बरीच कमी आहे. मधुमेह अजिबात नाही. थोडंफार गोड खाल्लं जातं कधीमधी, पण मनापासून आवडंत नाही. व्यायाम रोजच्या रोज नसला तरी नियमित आहे. तर प्रश्न असा आहे की साखर खाल्ल्यानंतर तरतरी येणे हे कुठल्याश्या विकाराचे लक्षण आहे का? सकाळी साखर खाल्ल्यावर बरे वाटणे हे व्यसन आहे का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/21/2016 - 08:15 नवीन
शुगर इज इंजुरिअस टु हेल्थ असे वाण्याच्या दुकानात बोर्डावर लिहिणे मँडेटरी करावे काय ?
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:54 नवीन
साखर धोकादायक नाही , साखर उलट आवश्यक आहे , धोकादायक आहे दूध ! त्यावर कायद्याने बंदी आणावी. मनुष्य सोडलयास अन्य कोणताही प्राणी वाढ पूर्ण झाल्यावर दूध सहसा पीत नाही ( अपवाद असतील ) आणि त्यापेक्षा धोकादायक आहे अविवेकाने खाणे ! ती पाटी प्रत्येक ठीकाणी लावावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/21/2016 - 08:59 नवीन
डॉ खरे व आनंदी गोपाळ यांना प्रश्न.. विटेकर यांनी बी१२, डी जीवनसत्व चाचणी केल्याच म्हटलय. याचा मधुमेहाशी कसा संबंध आहे?? कारण माझ्या या चाचण्या ( खांद्याच्या दुखापतीसंदर्भात) झाल्या असून ब१२ व ड३ कमी आढळले आहेत. homocysteine ची पातळी २२ होती..
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 11:08 नवीन
थोडक्यात मधुमेह १)रोग असा नाही पण त्रास भयंकर २)रक्तातील अन्नाची झालेली साखर इतर अवयवापाशी पोहोचते पण ती त्यांना घेता येत नाही अथवा फार थोडीच घेता येते ही क्रिया बिघडणे म्हणजेच मधुमेह. ३)ही न घेतलेली साखर मुत्रावाटे बाहेर पडते अथवा पडतच नाही हा एक त्रास वाढतो. ४) या क्रिया का बंद पडतात याचा शोध लागलेला नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/21/2016 - 11:24 नवीन
विटेकर, सर्वात प्रथम तुम्ही प्रयत्नपूर्वक मधुमेहापासून मुक्ती मिळविलीत या बद्दल अभिनंदन! माझे काही विचार मांडतो. १) तुम्हाला २००६ पासून मधुमेह होता (म्हणजे २००६ मध्ये मधुमेह आहे हे तपासणीत दिसले. कदाचित त्याआधीपासूनही असेल.). २०१४-१५ पर्यंत तुम्ही फक्त ग्लुकोरिल च्या रोज २ च गोळ्या घेत होता व इतक्या कमी औषधावर तुमची साखर पूर्ण नसली तरी बर्‍यापैकी नियंत्रणात होती. म्हणजे बहुतेक तुमचा टाईप-२ चा मधुमेह तितक्या तीव्र स्वरूपात नसावा. साधारणपणे टाईप-२ चा मधुमेह असलेल्यांना यापेक्षा जास्त प्रमाणात औषधे घ्यावी लागतात. बर्‍याच जणांना गोळ्या व / किंवा थोडे इन्सुलिन असे दोन्ही घ्यावे लागते. परंतु तुमचे फक्त दोन गोळ्यांवर भागत होते. याच कारणामुळे डॉ. त्रिपाठींची उपाययोजना तुम्हाला लागू पडली असावी. ज्यांना जास्त प्रमाणात औषधे घ्यावी लागतात किंवा जे रोज किमान २०-२५ युनिट्स इन्सुलिन घेतात, त्यांना या उपचार पद्धतीने मधुमेहापासून मुक्ती मिळणे शक्य होईल असे वाटत नाही. २) आता तुम्हाला मधुमेहापासून मुक्ती मिळाली आहे. परंतु यापूर्वी मधुमेह होऊन गेल्याने भविष्यात पुन्हा तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. यासाठी आमरस किंवा तत्सम गोड पदार्थ थोड्या प्रमाणातच खाणे आवश्यक आहे. ३) मधुमेह मुक्तीसाठी डॉ. त्रिपाठींनी सुचविलेले डाएट तितकेसे परीपूर्ण नाही असे मला वाटते. तुमच्या सध्याच्या वयात शरीरात कॅल्शिअम व ड जीवनसत्व पुरेसे नसण्याची शक्यता असते. दूध व दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद केले तर शरीराला आवश्यक असलेले कॅल्शिअम, ड जीवनसत्व व अ जीवनसत्व पुरेसे मिळू शकणार नाही. विशेषतः ड जीवनसत्वासाठी गायीचे दूध वगळता फारसे शाकाहारी पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे मधुमेहावर मुक्ती मिळविताना हाडे व स्नायू दुर्बल होण्याची शक्यता वाटते. ४) ज्यांचा मधुमेह बॉर्डरवर आहे त्यांनाच तो फक्त व्यायाम व आहाराने नियंत्रणात ठेवता येतो. इतरांना व्यायाम व आहाराच्या बरोबरीने योग्य ती औषधे घ्यावी लागतात. ५) रोज सकाळी कडधान्याची न्याहारी प्रथिने व तंतुमय पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने चांगली असली तरी कडधान्ये पचायला काहीशी जड असल्याने ज्यांना आतड्याचे विकार आहेत त्यांना ही रोजची न्याहारी जरा त्रासदायकच होईल. ६) मधुमेह सुरवातीला एकटा आला तरी नंतर त्याच्यापाठोपाठ रक्तदाब, हृदयविकार, काचबिंदूसारखे डोळ्यांचे आजार इ. कालांतराने येण्याची शक्यता असते. अशा रूग्णांना फारच संतुलित आहार सांभाळावा लागतो. डॉक्टर त्रिपाठींची उपाययोजना ज्यांना फक्त मधुमेह आहे व इतर विकार नाहीत आणि ज्यांचा मधुमेह तितकासा तीव्र नाही अशांनाच लागू पडेल असे वाटते. ७) एकदा झाल्यानंतर मधुमेह कधीही बरा होत नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो असे सर्व डॉक्टर सांगतात. त्यामुळे एखाद्याचा मधुमेह पूर्ण बरा झाला असे वाचून थोडासा संभ्रम निर्माण होतो. अर्थात तुमचा मधुमेह पूर्ण बरा झाला आहे हे चाचण्या करून सिद्ध झाले आहे. चिकाटीने उपचारपद्धती समजून घेऊन मधुमेह पूर्ण बरा केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 13:48 नवीन
१. पूर्ण शाकाहारी आणि काहीसा व्यायाम यामुळे माझे दोन गोळ्यांवर चालून गेले हे खरेच पण माझ्याबरोबर अनेकांचे इन्शुलीन पण सुटले, माझ्याबरोबर जी टी टी केली आणि पास झाली अश्या एक प्राध्यापिका २५ वर्षांपासून मधुमेही होत्या आणि त्यपैकी १० वर्षे इनशुलीन घेत होत्या. पूर्ण मुक्त झाल्या ! २. होय , पुन्हा साखर वाढू शकते याची मला जाणीव आहे ! धन्यवाद. आणि म्हणूनच मी जी टी टी पास न झाल्याचा मला सूक्ष्म आनंदच झाला ! नाहीतरी मी पुन्हा सैराट झालो असतो ! ३. बी १२ आणि डी ही शाकाहारी लोकांची नेहमीची समस्या आहे ! त्यासाठी सप्लीमेंट घेत राहणे हाच उपाय आहे. अर्थात काही मिश्रहारी लोकांनाही ही समस्या आहेच,त्याचा मधुमेहाशी संबंध आहे ही आणि नाही ही! डाळींमधून पुरेशी प्रथिने मिळतातच आणि माझ्या मार्च मधील चाचण्यांमध्ये दोन्ही ही नोर्मल आले आहे ! ४. नाही , इन्शुलिन घेणारेही मुक्त झाले आहेत हे वरती सांगितले आहेच ! ५.सुरुवातीला त्रास झाला पण स्मूदिमुळे पित्ताचा / पोटाचा अजिबात त्रास होत नाही. आणि बहुतेक गुजराती लोक डाळींची न्याहरी करतात ! असा आहार मी गेली ११ महिने करतो आहे. ६. डॉ. त्रिपाठींच्या म्हणण्यानुसार मधुमेह बरा होतो. जी टी टी पास असेल तर द्ब्ल्यु एच ओ देखील मधुमेह नाही असे मान्य करते. त्यांनी एच बी वन सुद्धा चालते. पण मिपाच काय इतरत्र ही दॉक्टर लोक हे मान्य करत नाहीत ६.मधुमेह च नव्हे तर अन्य आजार देखील या आहाराने आटोक्यात येतात असा अनुभव आहे, आणि आजाराप्रमाणे थोडे फार आहारात बदल करता येतात.
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 07/21/2016 - 14:50 नवीन
त्रिपाठींकडे जाउन, जबरदस्त नियंत्रण प्राप्त केलेली दोन लोकं मला ठाउक आहेत. त्यातले एक ज्येष्ठ माजी मिपासदस्य आहेत. ते मागील दहा वर्षे इन्शुलिन घेत होते. डायबेटिस त्यांना त्याही पूर्वीपासून होता. त्यांनी दिनचर्या बदलल्यवर दोनेक महिन्यांतच इन्शुलिन घेणे पूर्णतः बंद करणे शक्य झाले! दहा वर्शापासून सुरु असलेले . गोळ्यांचीही गरज पडलेली नाही . मागील किमान दीडेक वर्षं पूर्णतः इन्शुलिन - गोळ्या बगोळ्यात. त्यांची एच बी ए वन सी सुद्धा ६.० पेक्षा कमीच असावी. . . त्यांच्याच रेफरन्सने आमच्याकडच्या पेशण्टला घेउन गेलो. (सुरुवातीस्स हा डॉ त्रिपाठी गोलमाल असण्याची शक्यता वाटली. म्हणून रेफरन्स तपासून घेतला.) माझ्या जावळच्या व्यक्तीच्या गोळ्या पूर्णतः बंद झालयत . एच बी ए वन सी ६.० पेक्षा कमी आलेली आहे. फास्टिंग व पोस्ट मील दोन्ही आकडे शंभरच्या आसपास असतात. जी टी टी लवकरच केली जाणार आहे. . . इथल्या डॉ लोकांच्या प्रतिसादांवरुन व माझ्या खास जवळचय डॉक्टर मित्रांशी बोललल्यावर जाणवलेली बाब म्हणजे "फ्रीडम फ्रॉम डायबेटिस " हे मिसनॉमर, किंचित चुकीचं नाव असू शकतं. "फ्रीडम फ्रॉम मेडिसिन्स्/इन्शुलिन/ मेडिकल ट्रीटमेण्ट" हे नाव कदाचित त्यातल्या त्यात जवळ जातं. आणि त्याबद्दल दुमत नसावं. आणि डायबेटिस पासून मुक्ती मिळत नसेल तरी औषधांपासून मुक्ती मिळणेही हीसुद्धा फार मोठी गोष्ट आहे ना ?. . . आता प्रश्न राहिला की "असं किती दिवस चालाय्चं" तर उत्तर हेच की जितके दिवस चाल्वता येइल तितपत. समजा तुम्ही अजून काही दशके अशी घालवू शकलात )आणि प्रारब्ध असल्याप्रमाणे नंतर डायबेटिस उपटलाच) तरी आयुष्यातली महत्वाची वर्षं तुम्ही आरोग्यदायी, विना औषध घालवलेली असतात. ही सुद्धा म्हत्वाची गोष्ट वाटते. . . त्रिपाठी सांगतात त्यातल्या कित्येक गोष्टी डॉक्टर मंडाळींना कॉमन सेन्सवाल्या वाटतत; हे खरय. माझ्या डॉक्टार मित्रांना त्या तशाच वाटल्या. पण दुर्दैवाने आमचा पेशण्ट जेव्हा डॉक्टार लोकांना दाकह्वायला गेला तेव्हा त्यांनी हे ऑप्शन दिलं नव्हतं की "तुम्ही अमुक लाइफ स्टाइल बदल केलात तर औषध पूर्ण बंद करता येइल. आणि आहे तसच रहायचं असेल तर औषध घ्यावं लागेल." त्यांनी थेट औषधं सुरु करण्याचा सल्ला दिला. अर्थात ह्याबद्दल काडीचीही तक्रार नाही. कदाचित आम्हीच आमच्याबाजूने तसं विचारणयत कमी पडलो असू. किंवा त्या वेळी डॉक्टरना काही इतर कामं/ वर्कलोड असू शकत होता. आमच्या बाजूने काही चूक आसेल हे मान्य आहे. पण त्रिपाठींकडे गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा हाच ऑप्शन दिला की पुरेशी पथ्य पाळून औषधं बंद करता येत असतील तर करणा र का ? . . क्रमशः
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 07/21/2016 - 17:10 नवीन
वरती नीट घटनाक्रम लिहायचा राहिला. तो लिहितो. १. काही वर्षापूर्वी पेशण्टला शुगर डिटेक्ट झाली. २. डायबेटिसमधल्या तज्ञ, अनुभवी , जाणत्या मुळे नावाच्या डॉक्टरांकडे गेलो. (अर्थातच मॉडर्न मेडिसिनवाले डॉ आहेत ते ) ह्यांचे नाव आहे बरेच. हसतमुख, सज्जन व्यक्तिमत्व. आणि तसाच अनुभवही आला. ह्यांच्याकडे नियमित जाउन शुगर नियंत्रणात रहात होती. साधारण १६० च्या घरात असे. पण नियमित गोळ्या घ्याव्या लागत. (त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आकडा बराच मोठा होता.) ३. कुठूनतरी त्रिपाठींबद्दल ऐकले. (मिपावर एक सिनिअर,पूर्वी बरेच सक्रिय असणारे, अभ्यस्त, कलंदर सदस्य व माजी संपादक ह्यांनीही दहा वर्षाची इन्शुलिन बंद करुन दाखवल्याचे कन्फर्म केले. ) मग "प्रोग्राम जाउन बघायला हरकत काय आहे " असा विचार करुन आम्चा पेशण्ट त्रिपाठींचा प्रोग्राम ( हा धागा ज्याबद्दल आहे तो प्रोग्राम) अटेण्ड करुन आला. ४. डॉक्टर मुळे ह्यांना विचारले की अमुक एक प्रयोग करुन पाहणार आहे आहार- विहार नियंत्रण, व्यायाम वगैरे बद्दल ; चालेल का ? त्यांनी होकार दिला. व नियमित तपासणी करत राहण्यास सांगितले. ५. तपासण्या केल्या गेल्या. व नियमित मुळेंकडे चेक अपला जात होतो. त्यांनीच काही महिन्यांनी सांगितले की आता गोळ्या थांबवल्या तरी चालतील. (पण तपासणी नियमित करत राहणे पिरियॉडिकली, हे मात्र गरजेचे. ) पेशण्टने गोळ्या पूर्णत: बंद केल्या . ह्या धाग्यात वरती डॉक्टर लोकांनी जी माहिती दिली ऑल्मोस्ट तीच माहिती त्यांनीही दिली. त्यांचे म्हण्णे आहे की "तुम्ही कंट्रोल करत आहात ते चांगलेच आहे. जितके दिवस कराल तितके चांगलेच." आता हे किती दिवस करता येइल , कल्पना नाही. किमान काही दशके तरी कंट्रोल करता यावे अशी इच्छा /उद्दीष्ट आहे. जमल्यास उत्तमच. अर्थात अजूनही महिन्याभरातून एकदा किंवा सुचवले/ साम्गितले जाइल तसे डॉक्टर मुळेंकडे जाणे होतेच. ते सांगतील ते श्रद्धेने ऐकण्याकडे कल आहे. त्यांनी "तुम्ही कंट्रोल करत आहात ते चांगलेच आहे. जितके दिवस कराल तितके चांगलेच." हे म्हणताना काही तपशील अतिसंक्षिप्त रुपात सांगितले होते. त्यातले काही समजले, लक्षात राहिले. काही विसरले गेले. वरचे प्रतिसाद बघून डॉक्टर मुळे काय म्हणाले होते, ते अधिक नेमक्याने उलगडले. त्यामुळे ह्या धाग्यातल्या प्रतिसादांबद्दल डॉ लोकांचे आभार. . . गोळ्या - औषधं काही वाईट आहेत ; भयंकर आहेत असं म्हण्णं अर्थातच नाही . त्या संदर्भात काहीही म्हण्ण्याइत्का अभ्यास / पात्रता माझी नाही. गोळ्या- औषधांना " आहार - विहार -जीवनशैली नियंत्रण " हा एक पर्याय ( निदान काही काळापुरता) असणं शक्य आहे (निदान काही केसेस मध्ये) इतकच साम्गायचं आहे (ज्यांना माहित नसेल त्यांना .... म्हंजे आम आदमीला, आम पेशण्टला सांगायचं आहे. वैद्यकिय क्षेत्रातल्या लोकांसाठी हे सामान्य ज्ञान असेल , त्यांना ह्यात विशेष काही नवीन नसेल ह्याची आयडिया आहे. ) शिवाय स्थल-काल-परिस्थिती-ऐपत लक्षात घेता काही केसेसमध्ये औषधोपचार (गोळ्या , इन्शुलिन ) हे अपरिहार्य/व्यवहार्य आहेत ह्याचीही कल्पना आहे. पण निदान काही लोकं तरी त्यापासून दूर राहू शकतात, ह्यची त्या लोकांना जाणीव व्हावी, इतकीच इच्छा. माझ्या डोळ्यासमोर दोन उदाहरणं आहेत, म्हणून सांगतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
च
चौकटराजा गुरुवार, 07/21/2016 - 15:01 नवीन
एकदा म्हणता WHO म्हणते जी टी टी पास झालेला माणू स मुक्त झाला दुसऱ्या जागी म्हणता पून्हा साखर वाढेल याची जाणीव आहे यात तुमचा पुरता गोंधळ झालेला दिसून येतोय . एक घोडा बोलो नाहीतर.......चतुर बोलो. आहार नियंत्रणाने मूळ बीटा सेल सर्वच्या सर्व काम करायला लागतील ? मला शंका आहे बुवा ! व गोळ्यांचे काही भयानक परिणाम मला तरी 12 वर्षात जाणवलेले नाहीत दरम्यान आजही मी 9 मिनिटात 24 मजले चढून गेलो.जे पटले तेव्हडे लगेच चालू केले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई गुरुवार, 07/21/2016 - 19:41 नवीन
आज जी टी टी नॉर्मल आहे. याचा अर्थ इन्शुलिन डिमांड व सप्लायठीकठीक आहे. पण उद्या अचानक मेडिकल सर्जिकल प्रॉब्लेम. स्ट्रेस वगैरे झाल्यासपुन्हा शुगर वाढू शकते. गटार तुंबली होती... ७० % साफ केली. आता पाणी तुंबत नाही... पण अचानक पाउस जोराचा झाला किंवा काही कारणाने पुन्हा घाण अडकली व ३० चे ब्लॉकेज पुन्हा ५० ला आले तर पुन्हा पाणी तुंबेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
आ
आजानुकर्ण गुरुवार, 07/21/2016 - 17:55 नवीन
उत्तम चर्चा. सर्व डॉ. मंडळींना मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 07/21/2016 - 19:34 नवीन
खूप माहितीपूर्ण लेख.धन्यवाद. प्रतिसाद ही आवडले. तुम्ही सांगितलेलं diet मधुमेहासाठी तर आहेच. पण असेच diet निरोगी वेट लॉस साठी सुद्धा उपयुक्त आहे. अगदी महिनाभर जरी केलं तरी उत्तम परिणाम दिसतात. कडधान्ये आहारात समाविष्ट असल्यामुळे मसल मास अजिबात कमी न होता वजन कमी होते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/22/2016 - 01:05 नवीन
धन्यवाद! प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/21/2016 - 20:13 नवीन
लेख व प्रतिसाद माहितीपूर्ण. स्वाती
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 07/22/2016 - 02:38 नवीन
लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. शिवाय, चिकाटीसाठी तुमचे आणि तुमच्या पत्नीचेही कौतुक! नाहीतर बर्‍याचदा कुठलीही गोष्ट करण्यामध्ये कंटाळाच आड येतो.
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Fri, 07/22/2016 - 07:05 नवीन
तुमचं तर कौतुक आहेच, त्याहूनही जास्त तुमच्या सौभाग्यवतींचं. डॉक्टरमिपाकरांकडून अतिशय सोप्या भाषेत उत्तम माहिती आम्हाला मिळाली तुमच्यामुळे. सगळ्यांना धन्यवाद! अवांतर - मी कुठेतरी वाचलं आणि पटलं. पूर्ण उंचीचा आरसा घरी ड्रेसिंग टेबलला नसेल तरी हरकत नाही. न्हाणीघरात मात्र असायलाच हवा. आपण खरेखुरे कसे आहोत ते स्वतःला रोज दिसायला हवं.
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Fri, 07/22/2016 - 08:48 नवीन
डायबेटीसमधे, एकतर किल्ल्या कमी बनतात. किंवा कुलुपे खराब होतात. अर्थात, इन्शुलिन नॉर्मल प्रमाणात येऊनही पेशींत ग्लुकोज शिरणे दुरापस्त होते.
डॉक्टर खरे आणि डॉक्टर आगो, ह्या कुलुप खराब होण्याबद्दल पण सांगा प्लीज. अजुन एक प्रश्न. माझ्या वडीलांना डायबेटीस होता आणि पुढे इन्सुलिन पण घ्यावे लागत होते. तेंव्हा डॉक्टरांची एक कॉमेंट होती ती अशी की "मधुमेही माणसाची सुगर कंट्रोल मधे आहे म्हणजे सर्व ऑलवेल आहे असे समजू नये. इन्सुलिन ची कमतरता बॅकग्राउंड ला नुकसान करतच असते" हे बरोबर आहे का? असले तर काय करावे?
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 07/22/2016 - 17:25 नवीन
डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ, डॉ. साती, डॉ. म्हात्रे आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सध्याच्या लाइफ स्टाईल मुळे असेल पण बहुतेक कुठलेहि डॉक्टर इतके सर्व समजावून सांगण्याइतका वेळ देवू शकत नाहीत. तुम्ही सर्वांनी स्वतःहून इतक्या सोप्या सरळ भाषेत कळकळीनी लिहिलं आहे कि तुम्ही मिपा परिवाराचे खरे फॅमिली डॉक्टर शोभता.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 07/22/2016 - 18:10 नवीन
+१००...अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
र
रुस्तम Sat, 07/23/2016 - 07:51 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 17:04 नवीन
फारच उपयुक्त आणि मौलिक धागा. _________________________________ साती, नानबा, जामोप्या रामराम :) (माझे तिकडचे मित्र इकडेही आहेत हे आजच कळले म्हणून :)
  • Log in or register to post comments
N
nanaba Sun, 07/24/2016 - 07:44 नवीन
नमस्कार! मी इथे नव्याने यायला लागलिये.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 17:48 नवीन
२००७ पूर्वी वेगवेगळ्या कारणाने मधुमेहाच्या चाचण्या घेतल्यातरी मधुमेह नाही असे डॉक्टर सांगत होते. मला मधुमेह हे १२-०१-२०१२ ला कळले. तेव्हा जेवनानंतर २ तासाने २५२ होती. नंतर प्राणायाम, थोडा व्यायाम व साखर पूर्णपणे केल्यानंतर सहा महिन्यात नॉर्मल पातळीवर आला. १२-०१-२०१२ पासून आजतागायत Glyomet 500 SR २ वेळा सुरू आहे. मात्र एक वर्षापासून प्राणायाम, व्यायाम बंद आहेत. गेल्या सहामहिन्यात फ़ास्ट १२० ते १३० आणि जेवनानंतर १७० ते २२० असं चाललंय. दोन महिन्यापासून चेक केलेली नाही. उद्या सकाळी चेक करून सांगतो. नियमित होणारे त्रास : तासाभराच्या अंतराने तरी पाणी प्यावेच लागते. पातळी वाढल्यानंतर होणारे स्पेशल त्रास : अंगदुखणे. सांधे दुखने. कधी अंगाला खाज सुटणे. (Cetrazine घेतली की १५ मिनिटात थांबते), कधीकधी रात्रभर व दिवसभर झोपच न येणे. याव्यतिरिक्त वेगळे काही त्रास जाणवले नाही. माझ्या मर्यादा : नियमितपणे समान दिनचर्या ठेवणे अशक्य आहे. सदासर्वदा पुरेशी झोप घेणे शक्य नाही. सदासर्वदा सकाळी झोपून उठणे शक्य नसल्याने प्राणायाम, व्यायाम करणे शक्य होत नाही. सायंकाळी अर्धा तास चालायचे असा विचार सध्या करतो आहे.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 07/23/2016 - 20:49 नवीन
या विषयावरचा भाग २ लवकरच लिहिण्याची इच्छा आहे! :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 07/24/2016 - 12:10 नवीन
सर्वच डॉक्टर लोकांनी अत्यंत स्पष्ट आणि समजायला सोप्या शब्दांत मुद्दे मांडून स्पष्ट चित्र मांडल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. विशेषतः आनंदी गोपाळ यांनी कारखाना, कुलपं, चाव्या यासारख्या उपमा वापरल्याने कुठचा डायेबिटिस गोळ्यांशिवाय ताब्यात राहू शकतो, कधी गोळ्या घेणं अनिवार्य होतं याबद्दल छान विवेचन केलेलं आहे. सगळ्यांचेच आभार. मला आता दुसऱ्या बाजूने प्रश्न विचारावासा वाटतो. इन्शुलिन घेण्यात नक्की काय त्रास आहे? इन्शुलिन टाळण्यासाठी जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागतो. - साखर खायची नाही. यामुळे आपण जीवनातल्या एका प्रचंड आनंदाला मुकतो. - अतिरेकी व्यायाम करायचा. सगळ्यांना यासाठी दररोज पंचेचाळीस मिनिटं मिळू शकतीलच असं नाही. - दूग्धजन्य पदार्थ सोडायचे. (याने किती फायदा होतो हे विवाद्य आहे पण लेखात उल्लेख आलेला आहे) किती चवदार पदार्थांना आपण यामुळे मुकतो याची कल्पनाही करता येत नाही. जीवनपद्धतीत डायबेटिसच्या निमित्ताने काही मर्यादित बदल करावे हे ठीकच आहे. म्हणजे व्यायाम वाढवावा, साखर थोडी कमी खावी, दारू कमी प्यावी वगैरे वगैरे सर्वसाधारणच चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक गोष्टी आहेत. पण याचा अतिरेक करून आपण नक्की काय साधतो? तर दिवसातून दोनचार वेळा इन्शुलिन टोचून घ्यावं लागत नाही. यातून 'आपण काहीतरी विजय मिळवला' या भावनेपलिकडे नक्की काय मिळतं? म्हणजे १. वर दिलेली अतिरेकी पथ्यं + शून्य बाह्य इन्शुलिन = साखरेची पातळी मर्यादेत २. किंचित जीवनपद्धतीत बदल + काही बाह्य इन्शुलिन = साखरेची पातळी मर्यादेत या दोन पर्यायांमध्ये पहिला चांगला, आणि दुसरा वाईट असं का? माझ्या डोळ्याला जर काही मर्यादा असतील तर मी मुकाट्याने चष्मा लावतो. तशाच इन्शुलिनच्या मर्यादा मान्य का करू नये? गोळ्यांशिवायच किंवा इन्शुलिनशिवायच हे सगळं साधण्यासाठी इतका जिवाचा आटापिटा का करावा?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/24/2016 - 17:03 नवीन
मलाही काहीसे असेच वाटले होते. पण नेमक्या शब्दात मांडणे जमत नव्हते. १. गोळ्या कायम राहिल्याने नेमकं काय होतं? २. इन्सुलिन तयार होणे बंद झालेलेच असतांना बाहेरुन इन्सुलिन घेण्यात अडचण काय आहे? ३. जर मधुमेह कधीच बरा होणार नसेल, तर वर उल्लेखित अतिरेकी जीवनपद्धती कायमस्वरुपी कशी काय अवलंबता येईल? ४. हे एका अर्थाने तुरुंगासम जीवन नव्हे काय? राजेशजींनी मांडलेला मुद्दा व त्याबद्दलचे विचार यावर डॉक्टरांकडून मंथन अपेक्षित आहेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
सामान्य वाचक Sun, 07/24/2016 - 17:27 नवीन
म्हणून माझे निरीक्षण असे, 1 काही गोळ्यांनी वजन वाढते , हळू हळू गोळी ची मात्र वाढवत न्यावी लागते डॉ नि सांगितलेले साईड इफेक्ट्स किडनी, लिवर वर परिणाम होते, स्किन allergy इ इ 2 इन्सुलिन ची मात्रा वाढवत न्यावी लागते 3 हि खरे तर अतिरेकी जीवन पद्धती नाही। एकदा शुगर कंट्रोल मध्ये आली कि deviation म्हणजे चैन करता येते 4 नाही हो। आपले आजी आजोबा हेच खात मजेत जगले माझ्या एका मामाला डायबेटिस ने झिझवले हे मी पहिले आहे 35 वर्षे गोळ्या हळू हळू वाढत आणि नंतर इन्सुलिन वाढत गेले डोळे आणि मज्जा संस्था यावर खूप परिणाम झाला हे सगळे औषधे घेऊन आणि पथ्य पाळून, याउलट दुसऱ्या नातेवाईक ना त्रिपाठी डायट ने डायबेटिस मुक्त झालेले पाहिले आहे आता कमी प्रमाणात हॉटेलिंग, चहा, मिठाया इ सगळे सुरु करून हि शुगर कंट्रोल मध्ये आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 07/24/2016 - 18:25 नवीन
Ok. Fine. Thanks for the answer. Did not know that medication keeps on increasing
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सुबोध खरे Sun, 07/24/2016 - 19:43 नवीन
घासुगुरुजीआपल्याला पडणारा प्रश्न हा जवळजवळ १०० % मधुमेहाच्या रुग्णांना पडतो मधुमेह हा जितका चांगला नियंत्रणात असेल तितक्या त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती कमी होतात याचा अर्थ असा नाही की आपण "जगणे" सोडून द्यावे गुलाबजाम एक घासात खाण्या ऐवजी चार लहान लहान घास घेतले आणि नीट चावून खाल्ला तर तुम्हाला चार गुलाबजाम इतकाच स्वाद अनुभवता येतो. जास्त खाणाऱ्याला खवय्या म्हटले तर जास्त गणरायाला गवय्या म्हणायला पाहिजे हे पु लं म्हणून गेले आहेत याचा हाच अर्थ आहे. जर तुम्हाला थोडी औषधे आणि प्रमाणात गोड खाऊन तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवता आला तर "उपाशी" औषधावाचून राहण्यापेक्षा हे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी जीवन हे जगण्यासारखेच असावे हे माझे मत आहे. माझ्या आईला मधुमेह वयाच्या ६२-६३ ला प्रथम दृष्टीस पडला. यानंतर तिचे पथ्य आणि गोळ्या घेऊन साखर १००-१२० आणि १६०-१८० (जेवण अगोदर आणि नंतर) या टप्प्यात ठेवण्याचं प्रयत्न करतो. कारण अतिपथ्य करायला सांगितले तर आमची आई ते करणार नाही आणि तिचे असे मत आहे की उपाशी मारण्याच्या पेक्षा मी खाऊन मरेन. मी तिला भीती घालत असतो की एकदाच फगेलीस तर ठीक आहे पण हृदयविकार किंवा पक्षाघात होऊन अंथरुणावर पडलीस तर तुला आणि वडिलांना जास्त त्रास होईल. तिचे सध्या वय ७५ आहे आणि रक्तातील साखर गणपती उत्सव आणि दिवाळी च्या नंतर २०० च्या वर जाते आणि Hb a १ C हे सात च्या आसपास असते. त्यानंतर परत ते ६ ते ६. ५ पर्यंत येते. सुग्रास अन्न हा एक आयुष्यातील अतीव आनंदाचा भाग आहे म्हणूनच आपण बरीच वेळेस कोणताही सण समारंभ साजरा करतो त्यात सुग्रास अन्न हा एक महत्त्वाचं भाग आहे. ज्याला पटेल आणि रुचेल त्याने कडक पथ्य करावे आणि औषधे गोळ्या न घेताही आनंदात राहावे. ज्याला ते झेपणार नाही त्याने मात्र प्रमाणात खाणेव्यायाम, गोळ्या आणि गरज असल्यास इन्स्युलिन घेऊन आपला मधुमेह नियंत्रणात ठेवावा. काही होत नाही म्हणून हलगर्जी पण फार महागात पडू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 07/25/2016 - 01:03 नवीन
जर तुम्हाला थोडी औषधे आणि प्रमाणात गोड खाऊन तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवता आला तर "उपाशी" औषधावाचून राहण्यापेक्षा हे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद. आत्तापर्यंत ज्या ज्या डॉक्टरांशी बोललेलो आहे त्यांचा असाच दृष्टिकोन दिसलेला आहे. मात्र डायाबेटिसच नाही, तर एकंदरीत 'हेल्थ-सेल्फ-हेल्प' इंडस्ट्रीचे प्रवक्ते हे अशा मध्यममार्गांऐवजी हे खाऊच नका, इतकाच व्यायाम करा वगैरे काहीसा हट्टी आग्रह धरताना दिसतात. वजन कमी करण्यासाठीची जी काही डायेटं येतात त्यात असे अनेक टोकांचे सल्ले दिसतात. वर दिलेल्या रजिममध्येही असाच एक टोकेरीपणा मला जाणवला. मला स्वतःला अशा सल्ल्यांमध्ये माणसाच्या आनंदाची जी कॉस्ट असते ती खर्चाच्या कॉलममध्ये मांडलेली कधीच दिसत नाही. काही लोक खरोखर असे असतात की त्यांच्यासाठी या विजयाच्या आनंदाच्या मानाने दूध-साखर-पाव न खाण्याचं दुःख नगण्य असतं. ते त्यांना लखलाभ. पण सामान्य माणसांसाठी हे आनंद महत्त्वाचे असतात. आनंद कितीही कमी झाला तरी चालेल पण आयुर्मान वाढलंच पाहिजे हा अट्टाहास कधीकधी अशा सल्ल्यांतून दिसतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/25/2016 - 06:31 नवीन
बहुसंख्य डॉक्टर हे रोज पाहत असतात की अतिकडक पथ्य असेल तर माणसे त्यातून पळवाट काढतात किंवा त्यांना ते शक्य नसते. शिवाय डॉक्टर रोज अकाली मृत्यू पाहत असतात त्यामुळे "आज" आयुष्य आनंदात जगायला पाहिजे या गोष्टीची त्यांना सतत जाणीव असते. बरेचसे असे वजन कमी करणे किंवा मधुमेहावर खात्रीशीर इलाज सारखे कार्यक्रम असतात ते १-३ -६ महिने इतकाच कालावधी साठी असतात आणि याचे प्रवर्तक तुमची तेवढ्याच काळाची "खात्री" देतात. तुमचा फॅमिली डॉक्टर मात्र तुमचा दूरवरचा आणि तुमच्या मानसिक स्थितीचा विचार करून औषध देत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच आकड्यात ( रुपये ६०,०००/- आणि अधिक) पैसे दिल्यावर एक नैतिक जबादारी येते आणि शिवाय कुटुंबाचे सदस्य एवढे पैसे दिले आहेत तर पथ्य व्यवस्थित पाळायला पाहिजे हा सल्ला/"भाषण" देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. जिम मध्ये सुद्धा केवळ दाबून पैसे भरले आहेत म्हणून जाणारी पानसे कमी नाहीत. या उलट आपले फॅमिली डॉक्टर १००-२०० रुपयात बराच मोलाचा सल्ला देत असतात. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला मी तुम्हाला ३०,०००/- रुपये(अर्धेच पैसे) देतो एक वर्षभर(दुप्पट काळ) माझ्या संपूर्ण आहार, पथ्य आणि व्यायामाची काळजी तुम्ही घ्यायची हे म्हणून पहा ते आनंदाने तसे करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चतुरंग Sun, 07/24/2016 - 18:50 नवीन
प्रतिसाद. विटूकाका आणि काकू यांचे अभिनंदन! तुमचा मनोनिग्रह आणि सातत्याचे कौतुक वाटते. तुमचे आरोग्यपूर्ण आयुष्य असेच सुरु राहो. माझ्या मावशीच्या यजमानांना डायबेटीस होता. त्यांचं पथ्य सांभाळून नियमित व्यायाम, संतुलित आणि योग्य आहार, विश्रांती इत्यादींच्या सहाय्याने तिने त्यांना इंसुलीनपासून लांब ठेवले. ते ऐंशीव्या वर्षापर्यंत अतिशय अ‍ॅक्टिव आयुष्य जगले. डॉ. खरे, डॉ. आनंदी गोपाळ, डॉ. साती या सर्वांचे मनापासून आभार. नात्यात अनेक डायबिटीसधारी असल्याने बर्‍याच गोष्टी कानावर पडलेल्या होत्या परंतु त्यामागील नेमका कार्ककारण भाव कोणता. डायबेटिस मधे नेमकं शरीरात काय होतं यावर नक्कीच जास्त उजेड पडला. माझ्या वडिलांच्या आईला आणि आईच्या वडिलांना डायबेटीस होता आणि अतिशय तीव्र होता. त्यामुळे मी नियमित वार्षिक तपासणीत सगळ्या गोष्टी तपासून घेतो. सुदैवाने व्यायाम आवडतो त्यामुळे चालणे, पळणे, सायकलिंग यातले काहीना काही सुरु असतेच. ते तसंच सुरु ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे माझ्यासाठी अधोरेखित झालं! धन्यवाद!! मुळात डायबेटीस हा "बरा" झाला तरी एखादी "जखम बरी होणं" असा बरा होत नसून तो फक्त नियंत्रणात असतो, दबून असतो. व्यायाम बंद करुन, खाण्यावरचे नियंत्रण सोडून तुम्ही त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स निर्माण केल्यात की तो मजेने पुन्हा एकदा तुमच्याशी सलगी सुरु करतो हे समजले! :) नुसते इंन्सुलीन वाढवून साखर नियंत्रणात राहू शकली तरी त्याचे मज्जासंस्था, किडनीज, हाडे, हृदय इत्यादींवरती हळूहळू होणारे दुष्परिणाम हे केवळ आणि केवळ योग्य जीवनशैलीनेच आटोक्यात राहू शकतात हे महत्त्वाचे समजले. त्यामुळे शरीराचा कारखाना सगळ्या किल्ल्या आणि कुलुपांसहित व्यवस्थित चालायला हवा असला तर व्यायाम आणि योग्य खाण्याला पर्याय नाही! :) (सध्यातरीकिल्ल्याकुलुपेव्यवस्थितअसलेला)रंगा किल्लेदार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा