Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्यू यॉर्क : ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/24/2016 - 18:28
💬 101
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...               ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...               १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...               १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...               १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...               १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...               २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...               २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...               २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...               २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...               ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...               ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस... =============================================================================== न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरचे एक शहर. जगप्रसिद्ध शहरांच्या यादीत नाव असलेल्या या शहराच्या नावाभोवती एक वेगळेच वलय आहे, हे नि:संशय. त्याला विविध कारणे आहेत आणि त्यातल्या एक किंवा अनेक कारणांनी हे शहर पर्यटकांच्या यादीत बर्‍याच वर, किंबहुना पहिल्या स्थानावर असते. अश्या शहराची काहीशी दीर्घ भेट आटपून नुकताच परतलो आहे. अर्थातच त्या भेटीत न्यू यॉर्कमध्ये बरीच भटकंती झाली, त्या शहराचा भरपूर आनंद उपभोगला, थोडक्यात "जीवाचे न्यू यॉर्क केले !" तो अनुभव वाचकांबरोबर वाटून त्या आठवणींचा आनंद परत अनुभवण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय ? असो. अमेरिकेला जायचे नक्की झाले आणि अर्थातच इतर तयारीबरोबर काय काय पहायचे याचा विचार सुरू होणे अपरिहार्य होता. पूर्वी एकदा अमेरिकासफर झाली होती. तेव्हा पूर्व किनारा ते पश्चिम किनारा चवीने बघून झाले होते. शिवाय या सफरीचा मुख्य हेतू आमच्या युवराजांना भेटणे आणि त्यांच्या सोबत काळ व्यतीत करणे हाच होता. त्यामुळे, भेट देण्याच्या जागांची फार मोठी यादी नव्हती. अमरिकेच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची १५ दिवसांची एक सहल करण्याची माझी इच्छा होती. पण ते नक्की करेपर्यंत त्या सहलींतल्या ऑक्टोबरपर्यंतच्या जागा संपून गेल्या. उगाच हट्टाने फिरायला जायचेच म्हणून कोठेतरी भटकंती करण्यात माझा रस नव्हता. त्यामुळे, "न्यू यॉर्क न्यू यॉर्क म्हणजे आहे तरी काय, हे संपूर्ण शहर पिंजून काढून पाहूया." असा विचार पक्का झाला. अर्थात असे केल्याने भेटीचा सर्व वेळ मुलाबरोबर राहता येईल हा गुप्त स्वार्थ होताच ! अमेरिकेला जायचे तर व्हिसा काढणे आलेच. या बाबतीत साधारणपणे जरा धडकी भरेल अश्या कहाण्या सांगितल्या जातात. मात्र या प्रकरणाची जनमानसात जी हवा आहे त्यापेक्षा ते खूपच सरळ आणि सोपे असल्याचा अनुभव आला. अमेरिकन दूतावासाच्या संस्थळावरील अर्ज भरा, संस्थळावरच किंवा त्यांनी दिलेल्या यादीतील एका बँकेत व्हिसा प्रोसेसिंग फी भरा आणि संस्थळावरून अनुमती आली की आपल्याला सोयीच्या जागेवरील काउंसलेटमध्ये मुलाखतीची वेळ घ्या, बस्स. मुंबईमधल्या काउंसलेटमध्ये १५ दिवसांच्या आतली मुलाखतीची वेळ मिळाली. मुलाखतीच्या दिवसाच्या कमीत कमी एक दिवस अगोदरची वेळ घेऊन VFS या वकिलातीच्या मान्यताप्राप्त एजंट कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात बोटांचे ठसे देणे व फोटो काढून घेणे करावे लागते, तेही सोपस्कार पूर्ण केले. दुसर्‍या दिवशी, मुलाखतीला आलेल्या लोकांची काऊंसलेटबाहेरची मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब रांग पाहून "आता दिवसभर इथेच जाईल" असे वाटले. मध्ये मध्ये थांबत थांबत, पण तरीही फार मोठे थांबे न घेता न घेता रांग पुढे पुढे जात राहिली आणि थोड्याच वेळात काऊंसलेटच्या अंतर्भागात पोहोचलो. तेथे रांग थांबली असताना बसायची व्यवस्थाही होती, हे पाहून बरे वाटले. फार खोळंबा न होता एकून अर्ध्या-पाऊण तासातच मुलाखतीच्या दालनात पोहोचलो. तेथे रांगेत उभे असताना आमच्या पुढे असलेल्या तरुणीच्या चाललेल्या मुलाखतीतील संभाषण ऐकू येत होते. अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाशी तिचे दोन-तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती मोठ्या कळकळीने सगळी माहिती अधिकार्‍याला सांगत होती. पण, "शिकत असलेला तिचा नवरा त्या दोघांचा आर्थिक भार कसा उचलेल ?" याबाबत अधिकार्‍याची समजूत पटवून देण्यात ती अयशस्वी ठरली. अधिकार्‍याने "सॉरी मॅडम, मी तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही" असे म्हणत पासपोर्ट परत करून तिची बोळवण केली. हे सगळे कान देऊन ऐकत असलेल्या आमच्या गृहमंत्र्यांवर त्याचा प्रभाव पडलाच ! "आता असं झालं तर काय?" अश्या प्रश्नाला "तिची आणि आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा उगाच काळजी करू नको" असे म्हणत आम्ही मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍यासमोर गेलो. "(अ) आपल्या देशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा (आ) आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा (इ) आपल्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" ही काळजी घेणे हे वकिलातीतील व्हिसा अधिकार्‍यांचे मुख्य काम असते, हे माहीत होते. शिवाय, अगोदरच्या अमेरिका भेटीच्या वेळच्या मुलाखतीचा आणि त्या वेळेस मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍याशी झालेल्या किंचित बाचाबाचीचा अनुभव होता. ;) त्यामुळे मी बर्‍यापैकी निर्धास्त होतो. मात्र, त्याच बरोबर, तो अनुभव वेगळ्या देशातील वकिलातीतील होता आणि "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे सुद्धा पुरेपूर माहीत होते. त्यामुळे, अनावश्यक अतीआत्मविश्वासही नव्हता. वकिलातीचे सर्व अमेरिकन अधिकारी खूपच विनयशीलपणे वागताना दिसले. स्मितहास्यपूर्वक 'गुड मॉर्निंग' ने स्वागत झाले. मुलाखतीचे सोपस्कार आटपताना एखादा टोकदार प्रश्नही सौम्य शब्दांत आणि 'सर' वगैरे संबोधने सढळपणे वापरून केला गेला. एकंदरीत वरिष्ठतेचा किंवा तुच्छतेचा आविर्भाव चुकूनही दिसला नाही. याविरुद्ध, काऊंसलेटमधल्या भारतीय सुरक्षाकर्मचार्‍यांची वागणूक बर्‍यापैकी उद्धट आणि काही वेळेस चीड आणणारी होती. अमेरिकन काऊंसलेटमध्ये आपण व्हिसा घ्यायला आलो आहोत या कारणाने लोक त्यांची वागणूक नाईलाजाने शांतपणे सहन करत होते. पाचेक मिनिटांची मुलाखत संपल्यावर "तुम्हाला व्हिसा दिला आहे, पाच दिवसांत पासपोर्ट ताब्यात मिळेल" हे आश्वासन मिळाले. काम संपवून "अरे वा ! हे प्रकरण तर खूपच सोपे आहे" असा विचार करत इमारतींबाहेर पडलो. त्याच वेळेस अजून एक गोष्ट ध्यानात आली की, "अरेच्च्या, मुलाखतीत भरभक्कम पुरावे असावे म्हणून आणलेली बर्‍यापैकी जाड फाइल तर सर्व वेळ बॅगेतच होती." आठवडाभर परिश्रमाने तयार केलेल्या कागदपत्रांना पाहणे तर दूरच, पण मुलाखतीत त्याबद्दल काही प्रश्न किंवा त्यांचा साधा उल्लेखही होऊ नये ?! काय हे !! ;) पण, व्हिसा मिळाल्याच्या आनंदात ही गोष्ट विसरायला फार वेळ लागला नाही. व्हिसाचा अर्ज करताना संस्थळावर असलेल्या यादीतील आपल्याला सोयीच्या ठिकाणाची "पासपोर्ट परत ताब्यात घेण्याचे ठिकाण (पासपोर्ट कलेक्शन सेंटर)" अशी निवड आपण करू शकतो. पुण्यातल्या सोहराब हॉल (पुणे स्टेशन) येथील VFS चे कार्यालय असे एक कलेक्शन सेंटर आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील लोकांची एक मुंबई फेरी वाचते. व्हिसासह पासपोर्ट तेथे पोहोचला की नाही हे आपल्याला वकिलातीच्या संस्थळावर पाहता येते. मुलाखत शुक्रवारी असल्याचा फायदा घेत शनिवार-रविवार ठाण्यातील नातेवाइकांचा पाहुणचार घेऊन सोमवारी दुपारी पुण्यात घरी पोचलो. सोमवार म्हणजे मुलाखतीनंतरचा कामाचा पहिलाच दिवस होता. तरी साधारणपणे दुपारी दोन वाजता घरी पोहोचल्यावर वकिलातीच्या संस्थळावर डोकावण्याचा मोह झालाच ! अहो आश्चर्यम्, तेथे "पासपोर्ट पुण्याला पोहोचला आहे आणि तो घेऊन जाऊ शकता" अशी सूचना होती ! पासपोर्ट हातात आल्यावर पाहिले तर व्हिसावरची तारीख मुलाखतीच्या दिवसाचीच होती. थोडक्यात, लोकहो, "परदेशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा त्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा त्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" हे तुमच्या बाबतीत खरे असले आणि मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍याला ते आपल्या बोलण्याने व कागदपत्रांनी पटवू शकलात तर अमेरिकनच काय पण कुठल्याच देशाच्या व्हिसाचा फार धसका घेण्याची गरज नाही. मात्र, "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे तत्त्व लक्षात ठेवून अनावश्यक अतीआत्मविश्वासही टाळणे जरूर आहे. असो. व्हिसा हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यावर तुलनेने सहजपणे होणार्‍या इतर गोष्टी पुर्‍या करणे आले. त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे... १. विमानाचे रिटर्न तिकीट : हे हल्ली घरबसल्या आंतरजालावरूनही मिळते. दोनतीन महिने अगोदर जालावर थोडे संशोधन केले तर आपल्या आवडीची विमान कंपनी व सोयीचा प्रवासाचा दिवस आणि तिकिटाची किंमत यांचे चांगले नियोजन करता येते. माझ्यासारखा सतत विमानाच्या खिडकीबाहेर डोकावयाचा नाद असला तर मोक्याची खिडकीजवळची जागाही पटकावता येते ! २. पर्यटन वैद्यकीय विमा : हा प्रत्येक परदेशी सहलीचा महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत व्हिसासाठी अर्ज करताना पर्यटन वैद्यकीय विम्याची पॉलिसी जोडणे आवश्यक असते. अमेरिकन व्हिसासाठी असे करावे लागले नाही. तरीही, अमेरिकेतल्या वैद्यकीय सेवांचे गगनाला भिडणारे दर पाहिले तर अमेरिकेत वैद्यकीय विम्याविना जाणे हा वेडेपणा समजायला हरकत नाही. ३. परकीय चलन : आजकाल ही फार मोठी समस्या राहिलेली नाही. अनेक बँकांमध्ये आणि नॉन-बँकिंग संस्थांमध्ये परकीय चलन मिळू शकते. यासाठी "ट्रॅव्हल कार्ड" ची सोयही आहे. पाच-दहा डॉलर्सचाही व्यवहार कार्डाने होणार्‍या अमेरिकेसारख्या देशामध्ये असे कार्ड फार सोयीचे व सुरक्षिततेचे आहे. परदेशात फिरताना जालावर (ऑनलाईन) स्थानिक सहल, शोचे तिकिट, इ खरेदी करायची असेल तर मात्र असे कार्ड नीट चौकशी करून घ्यावे. सर्व कार्डे प्रत्यक्ष खरेदीच्या जागी (पॉइंट ऑफ सेल) स्वाईप करता येतात. परंतू, काही कार्डांची ऑनलाईन खरेदी करू शकू अश्या संस्थळांची यादी बरीच मर्यादित असते. सर्वसाधारणपणे व्हिसा मिळाला की त्या देशातला प्रवेश गृहित धरायला हरकत नसते. मात्र पासपोर्टवरचा अमेरिकन व्हिसा ही केवळ "अमेरिकेच्या दिशेने प्रवास करण्याची परवानगी" असते. अमेरिकेच्या प्रवेशव्दारावर असलेल्या आगमन-निर्गमन अधिकार्‍याला (एंट्री पॉइंट इमिग्रेशन ऑफिसरला) प्रवाश्याची फेरतपासणी करून अमेरिकेत प्रवेश नाकारता येतो. या संदर्भात वरच्या तीन गोष्टी आपल्या बाजूने भरभक्कम असणे फायद्याचे ठरते. सर्व तयारी झाली. या फेरीत, नेहमीच्या भटकंतीप्रमाणे सतत फिरत न राहता, फक्त न्यू यॉर्कमध्येच ठिय्या मारून राहायचे असल्याने इतर बर्‍याच गोष्टींचे महत्त्व तुलनेने कमी होते. आम्ही येतोय म्हणून लेकाने मॅनहॅटनमध्येच एक फ्लॅट भाड्याने घेतला अशी खबर दिली आणि सगळे टिक् मार्क्स पुरे झाले. आता निघण्याच्या दिवसाची वाट पाहणे सुरू झाले. ****** आला एकदाचा प्रवासाचा दिवस आणि आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या स्थानकाककडे (टर्मिनल २) निघालो. मुंबईतील गर्दीचा सामना करत करत स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर येताच हे स्थानक खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे याची चुणूक दिसायला सुरुवात झाली...

जसजसे पुढे गेलो तसतसे ती समजूत पक्की होत गेली...



या स्थानकाची माध्यमांत जी तारीफ केली गेली ती खरी असल्याचे दिसून आले आणि उड्डाण करण्याअगोदरच भारताच्या भूमीवरच विकसित देशातल्या व्यवस्थेचा अनुभव आल्याने उर अभिमानाने भरून आला...









विमानतळावरची व्यवस्था गेल्या चारपाच वर्षांत बरीच सुधारलयाचा अनुभव होताच. पण या नवीन स्थानकावरची व्यवस्था अजून चांगल्या प्रतीची असल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळे सोपस्कार संपवून शिवाय आरामात कॉफीपानाचा आनंद घेऊन बरोबर वेळेवर निर्गमनद्वाराजवळ पोहोचलो आणि काही वेळातच विमानात स्थानापन्न झालो. यावेळीही नेहमीप्रमाणेच खिडकीजवळची जागा राखून ठेवली होती हे सांगायला नकोच !...

खिडकीतून थोडेसे आजूबाजूचे निरीक्षण होते न होते तोच विमानाने बरोबर ठरलेल्या वेळी आकाशात झेप घेतली आणि आम्ही न्यू यॉर्कच्या दिशेने मार्गस्थ झालो. विमानाचा नकाश्यावरील मार्ग भारतातील महाराष्ट्र व गुजरातवरून उड्डाणाची सुरुवात करत नंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान-तुर्कमेनिस्तान-रशिया-स्वीडन-नॉर्वे असा उत्तरपश्चिमेकडे जात जात नॉर्वेजियन समुद्रावर पोहोचल्यावर दिशा बदलून बदलून दक्षिणपश्चिमेला वळून कॅनडा व नंतर अमेरिका असा होता...

रात्री ११:२० ला प्रवास सुरू होऊन दुसर्‍या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या जवळ जवळ १६ तासांत विमान सूर्याच्या पुढे पुढे पळत राहिल्याने सतत अंधारातच प्रवास झाला. स्वीडनवरून उडताना मागच्या बाजूने थोडेसे झुंजूमुंजू झालेले दिसले...

पण जमिनीवरचे स्वच्छ दिसेल इतका उजेड नव्हता. त्यामुळे खिडकीजवळ बसूनही रशिया आणि स्कॅडेनेव्हिया यांच्या भूभागांचे हवाई सर्वेक्षण करण्याचा मनसुबा धुळीला मिळाला. शिवाय तेथे ढगांचे इतके दाट आवरण होते की बाल्टीक समुद्रातली काही अस्पष्ट बेटे...

आणि एका ठिकाणी नॉर्वेचा बर्फाळ भूभाग इतकेच काय ते दिसले...

कॅनडाचा सर्व भूभाग ढगांची जाड गोधडी पांघरून गाढ झोपी गेला होता. त्यामुळे त्याचेही दर्शन झाले नाही. बरेच दक्षिणेकडे येऊन विमान अमेरिकेवरून उडू लागले तेव्हा कोठे जमिनीवरचे लुकलुकते दिवे दिसू लागले...

न्यू यॉर्क जवळ आले, विमानाने उंची कमी केली आणि पहाटेच्या अंधुक उजेडात खालच्या शहरातल्या दिव्यांची रोषणाई पाहत असताना न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केव्हा उतरलो ते घ्यानातच आले नाही. हा विमानतळ न्यू यॉर्क राज्याला लागून असलेल्या न्यू जर्सी या राज्यात आहे. परंतु तो न्यू यॉर्क शहराच्या इतका जवळ आहे की न्यू यॉर्क शहरातले दोन (जे एफ के आणि ला ग्वार्दिया) व हा एक असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ दळणवळणाच्या दृष्टीने न्यू यॉर्कचेच विमानतळ गणले जातात ! या विमानतळाचे व्यवस्थापनही Port Authority of New York and New Jersey ही संस्था पाहते. आगमनाचे सर्व सोपस्कार आटपून बाहेर पडेपर्यंत तासभर लागला. मुलगा विमानतळाबाहेर वाट पाहत असल्याचा फोन आला होताच. त्यामुळे बाहेर पडताच रुंद गुळगुळीत रस्त्यांवरून हिरवाईने भरलेल्या न्यू जर्सीतून प्रवास सुरू झाला...

मधूनच एखादी वस्ती लागत होती...

अर्ध्या एक तासात जॉर्ज वॉशिग्टन पूल ओलांडून आम्ही न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावर पोहोचलो...

थोड्याच वेळात ब्रॉडवेवर आलो...

...आणि दहा एक मिनिटांत बेनेट अव्हेन्युवरच्या घरी पोहोचलो. पुढच्या तीन महिन्यांत न्यू यॉर्क शहर व परिसरांवर करायच्या चढायांसाठीची ही आमची मुख्य छावणी होती. (क्रमश :) =============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...               ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...               १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...               १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...               १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...               १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...               २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...               २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...               २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...               २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...               ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...               ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस... ===============================================================================
  • न्यू यॉर्क : ०२ : शहराची तोंडओळख
  • न्यू यॉर्क : ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका
  • न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर
  • न्यू यॉर्क : ०५ : टाईम्स स्क्वेअर
  • न्यू यॉर्क : ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधिल पदविदान समारंभ
  • न्यू यॉर्क : ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१
  • न्यू यॉर्क : ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१
  • न्यू यॉर्क : १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क
  • न्यू यॉर्क : १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय
  • न्यू यॉर्क : १५ : हेदर गार्डन
  • न्यू यॉर्क : १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'
  • न्यू यॉर्क : २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास
  • न्यू यॉर्क : २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन
  • न्यू यॉर्क : २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१
  • न्यू यॉर्क : २७ : रॉकंफेलर सेंटर
  • न्यू यॉर्क : २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर
  • न्यू यॉर्क : २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१
  • न्यू यॉर्क : ३१ : सेंट बार्टचे चर्च
  • न्यू यॉर्क : ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम
  • न्यू यॉर्क : ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल

Book traversal links for न्यू यॉर्क : ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान

  • न्यू यॉर्क : ०२ : शहराची तोंडओळख ›

प्रतिक्रिया द्या
51931 वाचन

💬 प्रतिसाद (101)
अ
अजया गुरुवार, 08/25/2016 - 05:38 नवीन
तुमची आणि मधुराची मालिका वाचून नुकतंच आॅस्ट्रिया स्विस झालंय .तर आता तुम्ही अमेरिका काढली! तुमच्यामुळे किती खर्च होतो!! आता करुन द्या अमेरिकेचा व्हिसा आणि काढून द्या तिकिट;) पु भा च्या अत्यंत प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/25/2016 - 17:30 नवीन
धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
श
शान्तिप्रिय गुरुवार, 08/25/2016 - 11:34 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 08/25/2016 - 11:47 नवीन
भारी लिखाण.. नेहमीप्रमाणेच. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/25/2016 - 12:14 नवीन
भटकंती अनेक जण करतात. माझे तर काही नातेवाईक या परिसरात रहातातही पण आमच्या उत्सुकतेला ते प्रतिसाद देत नाहीत कारण त्यांच्या उद्देश डॉलर मधे मिळणारा पगार हाच असतो.हिमालयाकडे पाहून यात किती किती आईसक्रीम पॉटस भरून जातील असा विचार करणारेही काही असतात. आपण मात्र बुद्धीबरोबरच संवेदनाक्षमतेची, रसिकतेची जोड घेउन भटकंती करत असल्याने प्रवासाचा अगदी सर्वतोपरी आनंद घेत असता व तितक्याच तत्परतेने टंकाळा न करता देत ही असता. आपले हे असे बॉल बाय बॉल वर्णन येत रहावे. यात विजा वा विसा याचा जो अनुभव आपल्याला आला आहे त्यातील तीन तत्वे सर्वाना कळली तर धीर येण्यास हरकत नसावी. अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज या कादंबरीच्या नायकाची फिलिअस फॉग ची आठवण झाली. त्यात त्याचा एक दिवसाच्या हिशेबाचा घोळ झालेला दाखविला आहे. मी तर आता सरसावून या मालिकेची वाट पहात आहे कारण कोण लिहित आहे हे ही फार महत्वाचे. बाकी १९७० पासून आजपावेतो हे शहर अनेक अंगाने चित्रपटात दिसले आहे. पण आपला माणूस पाहून कथन करतो त्याची लज्जत वेगळीच.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/25/2016 - 13:05 नवीन
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/25/2016 - 17:59 नवीन
धन्यवाद ! आपल्यासारख्या मिपाकरांमुळेच लिहिण्यासाठी धीर आणि मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ल
लोनली प्लॅनेट गुरुवार, 08/25/2016 - 12:32 नवीन
तुमचे सगळेच लेख आवडतात भटकंती तर फारच पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर गुरुवार, 08/25/2016 - 12:52 नवीन
सुरुवात छान झाली, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/25/2016 - 13:32 नवीन
डॉक्टर साहेब, लेखन शैली नेहमीच आवडते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 08/25/2016 - 13:56 नवीन
वा मस्तच!तुमचे भटकंती लेख नेहमीच आवडतात. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 08/25/2016 - 13:56 नवीन
वा मस्तच!तुमचे भटकंती लेख नेहमीच आवडतात. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
J
Jack_Bauer गुरुवार, 08/25/2016 - 14:38 नवीन
तुमचे UA49 हे विमान होते का ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/25/2016 - 18:00 नवीन
धन्यवाद ! हो जाताना UA49 आणि येताना UA48.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer
भ
भाते गुरुवार, 08/25/2016 - 16:51 नवीन
तुमची आणखी एक भटकंती म्हणजे आमच्यासाठी सहलचं! हा आणि यापुढचे सगळे धागे मी, अर्थातच वाचेन. पण कदाचित प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद द्यायला जमणार नाही. तुमच्या या धाग्यावर बरेचसे रोमातले मिपाकर दिसले. यातल्या बऱ्याचश्या मिपाकरांना व्यनि करून 'कृपया आणखी लिखाण करा' अशी विनंती करायची वेळ आली आहे. संमं, जरा जागे करा त्यांना! पिराताई, तुमच्या सविस्तर धाग्याची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/25/2016 - 18:10 नवीन
धन्यवाद ! "रोमातल्या मिपाकरांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा" याच्याशी तीव्र सहमती... +१००० !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
स
सही रे सई गुरुवार, 08/25/2016 - 22:23 नवीन
हे रोमातले मिपाकर म्हणजे कोण?अडाण्याला शहाण करून सोडाव म्हणते मी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे गुरुवार, 08/25/2016 - 22:27 नवीन
Read only mode
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
सही रे सई Fri, 08/26/2016 - 19:19 नवीन
धन्यवाद संदिपजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जव्हेरगंज गुरुवार, 08/25/2016 - 17:37 नवीन
व्वा! भारी आहे हे!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/25/2016 - 18:11 नवीन
सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! सहलीत आपली सोबत अशीच चालू ठेवा.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/25/2016 - 19:07 नवीन
युनायटेड U49/48 म्हणजे अत्यंत घाणेरडे जेवण आणि (त्या जेवणावर उपाय म्हणून घरुन डबे आणणारे) ठेपलाछाप गुजराती न्यूजर्सीकर सहप्रवासी. मात्र फ्लाईटच्या वेळा सोयीस्कर असल्याने ह्या गैरसोयी सहन करता येतात. प्रवासवर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/25/2016 - 21:03 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. इस्ट ऑर वेस्ट, एमिरेट्स इज द बेस्ट.
  • Log in or register to post comments
न
निशाचर गुरुवार, 08/25/2016 - 23:26 नवीन
न्यूयॉर्कमध्ये तीन महिने भटकायची संधी म्हण्जे भारीच! युएस आणि युके विसाच्या सुरस कहाण्या ऐकल्या आहेत. चांगला अनुभवही येऊ शकतो, हे तुमच्यामुळे कळलं. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/26/2016 - 07:27 नवीन
धन्यवाद ! व्हिसाच्या सुरस कहाण्या नेहमीच सांगितल्या ऐकल्या जातात. माझ्या मते त्या तुलनेने फार कमी असतात, एका नाकारलेल्या व्हिसाच्या बरोबर हजारोंनी मिळालेले व्हिसा असतात. पण, सुखद घटनांपेक्षा धक्कदायक व दु:खद घटनांना जास्त प्रसिद्धीमुल्य असते म्हणून त्या सतत प्रचारात राहतात. माझे पहिले अमेरिकन आणि युके व्हिसाज् किंचीत बाचाबाची होऊन अनुक्रमे ४५ मिनिटे आणि एक दिवसात ताब्यात मिळाले होते. त्याबाबत कधितरी लिहिले जाईलच :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशाचर
न
निशाचर Fri, 08/26/2016 - 15:14 नवीन
अर्थात बॅड न्यूज सेल्स! युएस आणि युकेचा अजून अनुभव नाही, पण ऑस्ट्रेलियाने तीन महिने लावले होते. (तेही दहाबारा वर्षांपूर्वी. सध्याची स्थिती माहित नाहि.) पण ते गोर्‍यांनाही तसंच वागवतात, त्याबाबतीत भेदभाव करत नाहीत हे कळल्यावर दु:ख कमी झालं होतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/26/2016 - 16:53 नवीन
मलाही ऑस्ट्रेलियन एंबॅसीने सहा आठवडे लागतील असे सांगितले होते. पण, जरासा फॉलोअप व कागदपत्रे इमेल केल्यावर व्हिसा मिळाल्याचे पत्र दोन आठवड्यांत आणि ते ही शुक्रवारी (गल्फमधला आठवडी सुटीचा दिवस) पाठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशाचर
न
निशाचर Fri, 08/26/2016 - 19:02 नवीन
माझी विसाची कॅटेगरी थोडी विचित्र होती. त्यामुळे दर आठदहा दिवसांनी नवनवीन कागदपत्रे आणि पुराव्यांची मागणी अशी मजामजा होती. शेवटी विसा मिळाला तेव्हा ती एक्साइट्मेंट आणि चॅलेंजेस हिरावून घेतली, असं वाटलं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सामान्य वाचक Fri, 08/26/2016 - 05:12 नवीन
वाखु साठवत आहे
  • Log in or register to post comments
द
दिपस्वराज Fri, 08/26/2016 - 05:58 नवीन
वाह!! निव्वळ वाह!! म्हात्रे काका लेखन शिस्त शिकावी तर तुमच्याकडून, मुद्देसूद तरीही अतिशय जास्त पकड घेणारे, मी तुमच्यासोबत अन काकूंसोबत व्हीसाच्या लाईन मध्ये सुद्धा उभा होतो असे बरेच लोक म्हणतील पण तुमच्या अगोदर व्हिसा नामंजूर झालेल्या मुलीचा संवादही डोळ्यापुढे उभा राहिला एकदम.
+११११
म्हात्रे काका, खूप छान लिहिताय. तुमची प्रवास वर्णनं नेहमीच आवडतात.
+१ तुमची आणखी एक भटकंती म्हणजे आमच्यासाठी सहलचं!पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/26/2016 - 06:05 नवीन
म्हात्रे साहेबांच्या अभ्यासू नजरेतून न्यूयॉर्कची सफर म्हणजे पर्वणीच असणार. अतिशय सुसंगत, नेटकं, माहितीपूर्ण आणि तरीही रंजक लेखन कसं असावं याचा वस्तुपाठ असतो डॉक्टरसाहेबांचे लेखन म्हणजे! पुढील भागांची वाट बघतोय! (तुमचा वीजाचा अनुभव वाचून चेन्नई, मुंबई आणि दिल्ली कौंसलावासला दिलेल्या भेटी आठवल्या!) -रंगा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/26/2016 - 06:30 नवीन
लेखन शिस्त शिकावी तर तुमच्याकडून, मुद्देसूद तरीही अतिशय जास्त पकड घेणारे एकहि शब्द अनावश्य्क नसलेला लेख सुरेख
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 08/26/2016 - 06:47 नवीन
प्रवासारंभ वर्णन एक नंबर. अगदी स्टेप बाय स्टेप. तरीही रंजक. न्यु यॉर्क म्हटले की मला मुंबईसारखेच वाटते. बेशिस्त, गोंधळ, आवाज आणि फेरीवाले सोडून. वॉल स्ट्रीटची मौनातली धावपळ, मुकाट बसलेला तो प्रसिद्ध पण प्रत्यक्ष पाहिल्यावर छोटासा वाटणारा 'बुल', चाय्नीज मार्केट, सगळं आपलं वाटतं. पण सगळ्यात लक्ष्यात राहिला आहे तो बॅटरी पार्क येथे पायांखाली दणाणणारा अ‍ॅटलांटिक. न्यू पोर्ट येथे एक्स्चेंज प्लेसलाही असा स्टील फ्रेमवर समुद्राच्या (हड्सन नदीच्या) किंचित आत किनार्‍यावर बांधलेला लाकडी पॅटिओ आहे. जगात आणखी अनेक ठिकाणी कदाचित असतीलही. आपण त्या मजबूत लाकडी माळ्यावर असतो आणि खाली समुद्र घोंगावत, रोरावत, गाजत असतो. पायांनाही ती स्पंदने जाणवतात. शिवाय पोकळीमुळे आवाज वर्धित होतो. तो थरार वेगळाच. आणि आत कुठे तरी जाणवत राहातं की ह्याचंच एक टोक, आत्याच्या चुलत नणंदेचा मावसदीर इतक्या दूरच्या नात्याने अरबी समुद्राच्या रूपाने आपल्या उत्तर पश्चिम किनार्‍याशी जोडलेलं आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Fri, 08/26/2016 - 07:39 नवीन
सुंदर लेख! आणि फोटोजदेखील! न्यू यॉर्क मी एकदा पाहिलेले आहे. मला जबरदस्त आवडले. एकदा तिथे काम करण्याची, राहण्याची इच्छा आहे. कुणाला काही संधी माहीत असल्यास कृपया सांगावी. :-)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 08/26/2016 - 09:16 नवीन
सुंदर लेख आणि फोटो
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 08/26/2016 - 10:57 नवीन
काका नेहमी प्रमाणे सुंदर लेख आणि फोटो. एक आहे तुमच्या लेखा मुळे सगळे अनिवासी लिहते झाले आणि आम्हाला माहित झाले..
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Fri, 08/26/2016 - 11:15 नवीन
शिस्तबध्द वर्णन आवडलं तसेच अत्यंत उपयुक्त! जुलैत प्रथम वारी करायचा मानस आहे ... मानस कारण व्हिसा ! पण त्याची धास्ती वाटण्याचे काही कारण नाही हे कळले. वाखु साठवली. चित्रगुप्तजी तुमचेही वर्णन येऊ देत कारण लेकीकडे वॉडीसीला मुक्काम असणारे....
  • Log in or register to post comments
म
मानस् Fri, 08/26/2016 - 12:00 नवीन
व्वा! मस्त लेखन..अगदी तुमच्यासोबत न्यूयॉर्क सफारीला निघाल्यासारखे वाटत् आहे..पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Fri, 08/26/2016 - 13:23 नवीन
मस्त वर्णन. सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 08/26/2016 - 13:44 नवीन
लेख आणि फोटोज
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 08/26/2016 - 17:06 नवीन
क्या बात क्या बात !! तुमच्या भटकंती सीरिज वाचणं हा एक अनुभव असतो .. न्यु यॉर्क ला जाऊन आले आहे पण तुमच्या नजरेतुन वाचायला उत्सुक आहे. पुढच्या ट्रिप मध्ये एखादा तरी तुमच्या लेखातला स्पॉट नव्याने बघेन :)
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 08/26/2016 - 20:27 नवीन
न्यूयॉर्क मध्ये ३ वर्ष काम केलं आहे त्यामुळे बऱ्याच जागा माहिती आहेत. पण तुमच्या नजरेतून परत एकदा बघायला मिळेल ही पर्वणीच आहे. जमल्यास कधीतरी माझे अनुभव लिहिण्याचा विचार आहे. प्रचंड विविधता आणि तेवढेच विविध अनुभव देणारं महानगर आहे ते. वेगवेगळे ऋतू - स्प्रिंग, फॉल, स्नोफॉल आणि त्यात येणारी स्टॉर्म व टोर्नेडो व त्यात स्थानिक लोक आणि सरकार कसं म्यानेज करतात हे पण अनुभवण्यासारखं असतं.
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 04:10 नवीन
एयर इंडिया ची फ्लाइट पोचली पण.... काका येऊ द्या लौकर लौकर. (लोकांनादेखील धान्दरट पणा, गोंधळ, गॉसिप, दुसऱ्याला श्या देणं आवडतं तर एकंदर ;), हलकं घ्या नका घेऊ कसंही)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/27/2016 - 08:43 नवीन
धन्यवाद ! दुसरा भाग लिहायला सुरुवात केली आहे. टाकतो लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
स
सिरुसेरि Sat, 08/27/2016 - 07:31 नवीन
छान प्रवास माहिती . "कोलंबस कोलंबस छुट्टी है आयी ..आओ कोई नया मुल्क धुंडे चलके भाई" असे गाणे आठवले .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 08:16 नवीन
भारीच की एक्काकाका, ह्या फोटोतले निम्मे तर स्वतः पाह्यलेले आहेत. ;) उरलेल्या निम्म्यासाठि थोडे वाट पाहणे आले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 08/27/2016 - 13:41 नवीन
सुरूवात छानच! वाचते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sat, 08/27/2016 - 14:13 नवीन
तुमच्या नजरेतून नायगाराचे वर्णन येऊ द्या. मला न्यूयॉर्क फारसे आवडले नाही परंतु नायगाराचे विशाल रूप बघून आपल्या थिटेपणाची जाणीव होते. cave of the winds अजिबात चुकवू नका. त्या विशाल धबधब्याचे पाणी अंगावर घेणे हा एक सुखद अनुभव आहे. अक्षरशः धप्प धप्प करत ते पाणी आपल्या अंगावर पडते. नक्की लिहा. अजून एक, जर शक्य असेल तर रात्री साडेनऊ/ दहा नंतर परत एकदा पार्क मध्ये जा. अमेरिका आणि कॅनडा दोन्ही बाजूनी विविधरंगी प्रकाशझोत सोडलेले असतात. अतिशय छान दिसते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/27/2016 - 17:44 नवीन
धन्यवाद ! नायागारा रात्रीच्या रोषणाईसह मागच्या फेरीत पाहिला होता. त्यामुळे यावेळेस तिथे गेलो नाही. किंबहुना लेखात लिहिल्याप्रमाणे या वेळेस न्यू यॉर्क शहर सोडून आजूबाजूच्या फक्त दोन तीन ठिकाणांनाच भेट दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 17:45 नवीन
100!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा