पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक आत्ताच का केला गेला ?
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत.
याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत.
जनक्षोभ :
लोकशाहीत कोणत्याही लोकाभिमुख नेत्याला "जनतेची तगमग" दुर्लक्षून जमत नाही. त्याला राजकारणात शिल्लक राहण्यासाठी लोकमताची कदर करावीच लागते. परंतू, अंतिमतः त्याबाबत काय कारवाई केली जाईल व ती कोणत्या स्वरूपात केली जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते.
राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक :
सर्जिकल स्ट्राईक सारखी (ज्याचा परिणाम (इस्कॅलेशन) सर्वंकष युद्धामध्ये होऊ शकतो) कोणतीही आक्रमक कृती डोके गरम करून किंवा केवळ स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी केल्यास बाजू आपल्यावर उलटून देशाचे, आपल्या पक्षाचे आणि नेत्याच्या स्वतःच्या राजकिय जीवनाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.यासाठी "राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक" असावी लागते. जी भारतातर्फे आजपर्यंत १९६५, १९७१, कारगिल ही युद्धे आणि आताचा सर्जिकल स्ट्राईकचा अपवाद सोडता दिसलेली नाही.
आंतरराष्टिय संघर्ष आणि मित्रराष्ट्रे :
जागतिक स्तरावर राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक असणे इतकेच पुरेसे नसते. कारण, कोणत्याही मोठे युद्धाचे स्वरूप केवळ दोन देशांतले युद्ध असे राहत नाही तर ते दोन विचारसरणींमधे विभागलेल्या देशांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असलेले युद्ध असे बनते. म्हणजे ज्या देशाच्या गटाचे वजन जास्त तो अंतिमतः जिंकतो. उदा. भारत-पाक युद्धात पाकच्या पारड्यात चीनचे वजन (पक्षी : राजकिय-सामरिक पाठींबा) धरावेच लागेल आणि त्याला तोलून शिवाय जास्त होईल अश्या एक किंवा अनेक देशांचे वजन आपल्या पारड्यात असणे जरूर असते.
त्यामुळे, परदेशाबरोबरच्या आक्रमक कृतीअगोदर जागतिक स्तरावर आपले सबळ पाठीराखे मित्र देश (आक्रमक कृती केल्यावरही आपल्या मागे उभे राहणारे) असणे जरूर असते. हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही दर युद्धाअगोदर हे करावेच लागते. हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते.
जगातली पत आणि ती वापरण्याची धमक :
यासाठी, किमान "आमच्या बाजूला असा किंवा असून नका, तुमची मर्जी. आम्ही आमच्या हितसंबंधांसाठी जरूर ती कृती करणारच. पण आमची न्याय्य बाजू न घेतल्यास, जगाच्या पुढे अंतिमतः तुमचेच नैतिक नुकसान आहे." इतके तरी पटवून देण्याची गरज असते. हे यशस्वीपणे करायला आपल्याकडे एक चांगली नीति असणे आणि तिच्यावर आपला ठाम विश्वास असण्याची गरज असते. असे १९७१ च्या युद्धात केले गेले होते. सद्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर, भारताच्या बाजूने अनेक मित्रराष्ट्रे असल्याने आणि पाकिस्तान जागतिक स्तरावर एकटा पडून त्याने "स्ट्राईक्स झालेच नाहीत" असा कातडीबचाऊ पवित्रा घेतल्याने भारताला इतक्या पुढच्या पायरीवर जाणे जरूर पडलेले नाही.
जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे :
मोदींनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानसोबत मित्रत्वाचे संबंध स्थापन करण्यास अगदी टोकाचे प्रयत्न केले आहेत हे जगाला दिसले आहे. हे त्यांच्या मूळच्या आक्रमक प्रतिमेला छेद देणारे असल्याने त्यांचे पाठीराखे व विरोधक यांना बरेच गोंधळाचे व आश्चर्यकारक वाटले. किंबहुना त्यासाठी त्याना देशांतर्गत टीकेचे व चेष्टेचे धनी व्हावे लागले आहे. मात्र, देशांतर्गत आणि जागतिक वारे पाहिले असता, जर सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पाकिस्तानबरोबर कडक वागणे सुरू केले असते तर जागतिक स्तरावर त्यांची आतताई नेता अशी छबी निर्माण झाली असती. शिवाय, त्यांना अगदी हिटलरपर्यंत नावे ठेवणार्या देशांतर्गत विरोधकांच्या हाती कोलीत दिल्यासारखे झाले असते. मग तर त्यांच्या कोणत्याही आक्रमक कृतीला देशाबाहेरून व देशातून मोठा विरोध होऊन ते एकटे पडले असते.
सॉफ्ट पॉवर :
(अ) जागतिक स्तरावरची मैत्री मुख्य दोन प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरांवर अवलंबून असते :
१. या देशाशी मैत्री केल्याने माझ्या देशाचा फायदा होईल का ?
२. या देशाशी मैत्री न केल्याने माझ्या देशाचा तोटा होईल का ?
(आ) आर्थिक हितसंबंध : पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी जगातील इतर महत्वाच्या राष्ट्रांबरोबर मैत्रीपूर्ण व आर्थिक संबंध प्रस्थापित करून आपण व आपला देश युद्धखोर नाही, तर आपला मुख्य उद्येश देशाचा आणि एकंदरीत सर्व जगाचा विकास करणे हाच आहे हे सिद्ध केले. त्या प्रयत्नांच्या परिणामाने अनेक महत्वाच्या देशांबरोबर भारताचे दीर्घकालीन सहकार्याचे व्यापारी, राजकिय, सामरिक आणि पर्यावरणसंबंधी करार झाले आहेत. असे समान हितसंबधावर आधारलेले करार दोन देशांना दीर्घकालासाठी घट्टपणे बांधायला मदत करतात. या बाबतीत बहुतेक सर्व विकसित देश पूर्वीपेक्षा भारताच्या जास्त जवळ आहेत यात संशय नाही.
(इ) परदेशांतले भारतिय वंशाचे लोक (इंडियन डायास्पोरा) : अनेक विकसित देशांत लक्षणीय प्रमाणांत भारतिय वंशांचे लोक आहेत. पूर्वी त्यांच्याकडे परकिय चलनाचा स्त्रोत असलेले NRI किंवा PIO यापलिकडे पाहिले गेले नाही. जागतिक राजकारणाचा हा एक महत्वाचा दबावगट मोदींनी हेरला आणि आपल्या प्रत्येक परदेश भेटीत त्याला संबोधित करून आपलेसे केले. या गटाला आपली अगोदर माहित नसलेली ताकद उमगली आहे. हे अमेरिका आणि ब्रिटन मधल्या राजकारणी वार्यांत स्पष्ट दिसते आहे. आज आणि पूर्वी संख्येने तेवढेच असलेल्या पण पूर्वी स्थानिक राजकारनात फारसे न दिसणारा हा गट आता दृष्य स्वरूपात आला आहे. या गटाच्या धृवीकरणाने त्यांचे स्थानिक राजकारणातले महत्व वाढले आहे. अर्थातच, त्यांना महत्व देतांना त्यांच्या मूळ देशाकडे दुर्लक्ष करणे स्थानिक राजकारण्यांना शक्य नाही. अमेरिका आणि ब्रिटनमधल्या निवडणूकांकडे वरवर लक्ष असलेल्यांनाही मला काय म्हणायचे आहे ते कलले असेलच. अश्या भारताच्या बाजूने बनलेल्या दबावाचा परिणाम त्या देशाचे भारताशी असलेले द्विपक्षिय संबंध अधिक घट्ट होण्यात होतोच, पण आंतरराष्ट्रिय स्तरावर असे दोन देश एकाच गटात येण्याची शक्यता अजून वाढते.
(ई) इतर मित्र देश : अनेक छोट्या देशांबरोबरही करार करून भारताने त्यांना मदत केली यावर अनेकदा टीका केली जाते. उदा : माक्रोनेशियातले नकाशातल्या केवळ ठिपक्यासारखे असलेले देश, दक्षिण आशियातले देश, इत्यादी. याचे खूप फायदे असतात. याचे फायदे पाहण्यासाथी दोन मुद्दे पुरेसे आहेत :
(१) संयुक्त राष्ट्रांच्या मतदानात भारताला, अमेरिकेला आणि नकाशावरच्या ठिपक्याच्या आकाराच्या देशाला, दोघानांही प्रत्येकी एकच मत असते.
(२) नुकताच भारताने पाकिस्तानातील सार्कच्या सभेवर टाकलेल्या बहिष्काराच्या नंतर एक एक करत पाकिस्तान सोडून इतर सर्व देशांनी बहिष्कार टाकला. या घटनेचे परिणाम दक्षिण आशियापुरते सीमीत राहिलेले नाही, त्याची नोंद आपल्या परिसराच्या बाहेर असलेल्या जगातील सर्व देशांनी घेतली असणारच आणि तिचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या आजच्या व उद्याच्या कृतींवर पडणार आहे.
पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक चुका :
हे सर्व चालू असतानाच, पाकिस्तानाने त्याच्या मूळ स्वभावाला अनुसरून आपल्या अतिरेकी कारवाया चालूच ठेवल्या. सुरुवातीच्या दिवसांत, मोदी चिडून काही आक्रमक करतील आणि त्यांना जागतिक स्तरावर अलग पाडून आपल्याला वरचढ होता येईल असे पाकिस्तानला वाटले. मात्र या खेळीला न बधता, त्यांच्या मोदींनी पाकिस्तानच्या दिशेने केवळ शांतीपूर्णच नाही तर "शरीफना वाढदिवसाची भेट" या सारख्या "ऑउट ऑफ द वे" कृती चालू ठेवल्या. यामुळे, पाकिस्तानने मोदी 'केवळ मोठ्या घोषणा देणारा पण पूर्वीच्या नेत्यांसारखा कोणतीही आक्रमक कारवाई करण्याला घाबरणारा नेता आहे' असा स्वतःचा गैरसमज करून घेतला व आपल्या अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या. याचा परिणाम पाकिस्तान नकळत जगाच्या मनातून उतरत जाण्यात झाला.
भारताच्याबद्दलच्या या (गैर)समजामुळे पाकिस्तान इतका गाफिल होता की पूर्वानुभावरून भारतातर्फे काही कारवाई होणार नाही याची त्याची खात्री झाली होती. त्यामुळे, उरी हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करण्यासाठी त्याने लाईन ऑफ कंट्रोल्जवळच्या अनेक लाँचपॅड्सवर मोठ्या प्रमाणात अतिरेकी जमा केले होते. सर्जिकल स्ट्राईकच्या योग्य संधिची वाट पाहणार्या भारतिय सैन्याच्या हे पथ्यावरच पडले.
जागतिक स्तरावरचा पाठींबा :
पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया जगाला अगोदर माहित नव्हत्या इतके पाश्चिमात्य देश अज्ञानी आहेत असे अजिबात नाही. पण जो देश स्वतःसाठी काहीच करायची हिंमत दाखवत नाही त्याची बाजू घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे इतके सर्वसामान्य माणूसही जाणतो, तर हुशार राजकारणी कसे जाणणार नाहीत. समजा, तुमचा एक शेजारी दुसर्याला नेहमी मार देत आहे आणि तरीही दुसरा नेहमी शांततेची माळ ओढत मार खाणे पसंत करत आहे व वर त्याचे नीतिमत्तेच्या नावाखाली समर्थन करत आहे. अश्या भित्र्या व भित्रेपणाचे गोडवे गाणार्या माणसाची बाजू घेतल्यास, तो केव्हा कच खाऊन त्याला मदत करणार्याची अवस्था कठीण करेल याचा नेम नसतो. अर्थात, अश्या माणसाची बाजू सत्याची असली तरी त्याला पाठींबा देणे मूर्खपणाचे ठरते. जागतिक राजकारणातही हेच मूलभूत सत्य कोणी कोणाची बाजू घ्यावी याकरिता वापरले जाते.
सामरिक ताकद आणि तिचा वापर :
सामरिक साधनसंपत्तीच्या अनेक कमींशी सामना देत असले भारतिय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक आहे. त्यातही भारतिय कमांडोच्या पात्रतेबद्दल कोणालाही संशय नसावा. कमी होती त्यांना आदेश मिळण्याची. भारतात लोकशाही आहे आणि खर्या लोकशाहीत सैन्य मुलकी सरकारच्या अधिकारामध्ये असते. त्यामुळे सरकार कणखर नसले व आदेश द्यायला कचरणारे असले तर उत्तमातले उत्तम सैन्यही हात बांधलेल्या अवस्थेत राहते. यावेळेस भारतिय सैन्याला "योग्य वाटेल त्या वेळेस, योग्य वाटेल त्या प्रकारे" हल्ला करण्याचा आदेश मिळाला आणि अश्या आदेशाची वाट पहात असलेल्या सैन्याने त्या संधीचे सोने केले.
हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी :
हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील...
१. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली.
२. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला !
३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही.
४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही.
यापेक्षा जास्त मुद्दे सांगता येतील. पण, खालील साधार निष्कर्ष काढण्यासाठी सद्या इतके पुरे व्हावेत.
शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. त्यांनी भारताच्या जागतिक व स्थानिक स्तरावरच्या आर्थिक-राजकिय सबलीकरणासाठी जाणिवपूर्वक एक स्ट्रॅटेजी ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. वास्तवात असे मार्ग फार थोड्या कालात फळे देत नाहीत. देशाच्या सामर्थ्याची वाढ करणे ही लांबवरची कृती आहे. मात्र, वाढत असलेल्या जागतिक शक्तीचा उपयोग अचानक आलेल्या संधीचा उपयोग करून तरीही "नि-जर्क पद्धतीने" नव्हे तर "योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, हवा तो परिणाम साधणारा हल्ला करण्याचे" स्वातंत्र्य देणारे आदेश सैन्याला दिले गेले आणि अर्थातच, आपल्या सैन्याने त्या संधिचे सोने करून इतिहास घडवला आहे.
कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
एक देशप्रेमी नागरिक म्हणून मला वरच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या सर्व घटनाक्रमांचा साधार अभिमान आणि आनंद आहे. किंबहुना, हा घटनाक्रम तसाच पुढे चालू रहावा आणि भारताचे पाऊल सतत पुढे पडत रहावे हीच माझी इच्छा आहे.
**********************************************************
हा विषय खूप मोठा आहे आणि या एका लेखात पूर्णपणे मांडणे शक्य नाही. पण सहज सुचले ते लिहिले आहे.
**********************************************************
डिजिएमो चे पत्रकार परिषदेतले सादरीकरणही क्लास होते, शब्द आणि शब्द नीट जपून व अर्थगर्भ वापरलेला!+१०० परत क्लिप पाहिलीत तर त्यावेळचे त्यांचे डोळे पहा.ईए काका म्यानमार मध्ये पण सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्याचा उल्लेख राहिलाय ???राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक या शीर्षकाखाली म्यानमारमधल्या हल्ल्याचा उल्लेख विसरल्यामुळे नाही तर जाणीवपूर्वक केलेला नाही. कारण, म्यानमारमधला व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधला, या दोन सर्जिकल स्ट्राईक्सच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. १. म्यानमारमधला हल्ला त्या देशाच्या सहमतीने व समन्वयाने केलेला हल्ला होता. अर्थातच, तेथे आंतरराष्ट्रिय संघर्षाचा प्रश्नच नव्हता. सर्जिकल स्ट्राईक असला तरी ते मुख्यतः एक सैनिकी ऑपरेशन होते, त्याला राजकिय संघर्षाची किनार नव्हती. थोडक्यात, त्या हल्ल्यामुळे म्यानमार युद्ध तर नाहीच पण इतर काही विरोधी कारवाई/तक्रार करण्याचीही शक्यता नव्हती. राजकिय दृष्टीने पाहिले तर, या ऑपरेशनच्या मागे, "राजकिय इच्छाशक्ती वापरण्याच्या धमक" नव्हे तर "आपल्या सरकारची परिसरातल्या देशांना, आपल्या सैन्याने त्यांच्या प्रदेशात जाऊन (बूट्स ऑन द ग्राऊंड) अतिरेक्यांना मारण्यासाठी परवानगी मिळविण्याइतपत मित्रदेश बनवण्याची आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या मुत्सद्देगिरीतिल (डिप्लोमॅटिक) प्रगल्भता" होती. २. त्याविरुद्ध, दुसर्या हल्ल्यात शत्रूराष्ट्राच्या ताब्यातल्या प्रदेशात त्याच्या नकळत शिरून अतिरेकी आणि त्यांना संरक्षण देणारे सैनिक मारले गेले. अश्या वेळी, शत्रूराष्ट्र आपल्यावर हल्ला केल्याचा आणि अघोषित युद्ध छेडल्याचा (जो जागतिक स्तरावरचा गुन्हा आहे), आरोप करून आपल्याला जागतिक स्तरावर अडचणीत आणू शकतो. अजून महत्वाचे म्हणजे असा हल्ला अयशस्वी झाला किंवा त्यात आपलेच जबर नुकसान झाले तर प्रचंड आंतरराष्ट्रिय राजकिय दबाव निर्माण होतोच मानहानी होतेच, पण त्याचबरोबर देशांतर्गतही मोठा दबाव निर्माण होऊन खुर्ची सोडण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे या सर्जिकल स्ट्राईकसाठी, राजकिय नेतृत्वामध्ये अत्युच्च्य दर्जाची राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक आवश्यक होती, आणि ती दाखवली गेली. ==================================मला नाही वाटत कोणतेही सैन्य अशी योग्य संधीची वाट पाहत असेल कारण, अतिरेकी विशिष्ट ठिकाणी आहेत असं नेमकं कसं सांगता येईल आणि एकाच गुंतून राहणं सुद्धा धोक्याचं आहे. माझ्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जीकल स्ट्राईक हा इंटेलिजन्स ने दिलेल्या माहितीनुसार झाला होता.सद्य परिस्थितीचा विचारात घेऊन योग्य विचाराने, योजनाबद्ध पद्धतीने, योग्य संधी शोधून कारवाई करणेच यशाचे मुख्य गमक असते. कोणी कितीही बलवान असले तरी माथेफिरूपणे केलेली आतताई कृती बहुतेक गोत्यातच आणते. हे मूलतत्व युद्धातच नाही तर जीवनात सगळीकडेच लागू पडते. "मला नाही वाटत कोणतेही सैन्य अशी योग्य संधीची वाट पाहत असेल" असे म्हणता म्हणता तुमच्या शेवटच्या वाक्यात "माझ्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जी स्ट्राईक हा इंटेलिजन्स ने दिलेल्या माहितीनुसार झाला होता." हा, ती संधी कशी शोधतात, याचा एक मार्ग तुम्हीच लिहिला आहे ! याशिवाय, "आपल्या उपग्रहांच्या मदतीने गोळा केलेला जम्मू-काश्मीर विभागांतला डेटा सैन्याला पुरवला होता" हे इस्रोने माध्यमांत सांगितल्याचे वाचले/पाहिले असेलच. हा झाला दुसरा संधी शोधण्याचा मार्ग. इतरही अनेक मार्ग असतात पण त्यांची फार उघड चर्चा न करणेच बरे. आता प्रश्न आहे संधीची वाट का पाहिली / पहायची असते... १. सर्जीकल स्ट्राईक हे सर्वंकष युद्ध नसते, एकांडा हल्ला असतो. तो केल्यावर, शत्रू सजग होतो व जागतिक राजकारणातले प्लेअर्सही कार्यरत होतात. अर्थात, राजकिय दबाव वाढून तसा हल्ला परत करण्याच्या संधी नगण्य होऊ शकतात. म्हणजे, जे काय साध्य करायचे आहे ते सर्व एकुलत्या एका हल्ल्यात साध्य करायचे असते. तसे न झाल्यास किंवा हल्ला अयशस्वी झाल्यास नामुष्की पत्करावी लागते. २. उरी हल्ल्यानंतर जेव्हा भारत-पाक वातावरण उच्च तापमानाला होते, तेव्हा "भारताच्या प्रतिक्षिप्त क्रियेच्या भितीने सर्व अतिरेकी लाँचपॅड्स / तळ रिकामे करून अतिरेक्यांना सुरक्षित जागी हलवणे" ही पाकिस्तानकडून सहाजिकपणे होणारी कृती होती. अश्या रिकाम्या तळांवर हल्ला करून सैन्याने आणि एकंदर भारताने पूर्ण धोका पत्करूनही जगभर हसे करून घेतले असते. ३. हल्ल्यांच्या जवळपास युएनची सभा होती. सहाजिकपणे, त्या काळात भारत काही कारवाई करणे टाळेल व नेहमीप्रमाणेच आठवड्याभरात "थंड" होईल. नंतर युएनची सभा संपल्यावर आपल्याला अजून हल्ले करायला मोकळे रान मिळेल; अशी अटकळ पाकिस्तान पूर्वानुभवावरून करेल, असा अंदाज आपण बांधणे कठीण नव्हते. पाकिस्तान अगदी तसाच वागला आणि युएनच्या सभेचे सूप वाजण्याच्या सुमारास पाच एक दिवसांत त्याने लाँचपॅड्सवर अतिरेकी जमा करायला सुरुवात केली. या कृतीची माहिती वर सांगितलेल्या आणि इतर मार्गांनी सैन्य जमवत असणारच (संघर्ष असो की नसो, हे त्यांचे नेहमीचेच काम आहे). कारवाईसाठी सैन्य पूर्वीपासून तयार असणारच, सैन्याने २४X७ तयार असावे अशीच अपेक्षा असते. जेव्हा अतिरेकी बर्याच संख्येने, कोणत्या वेळी, कोणकोणत्या जागी आहेत याची खात्री झाली, तेव्हाच ती संधी साधून त्या जागांवर हल्ला केल्यामुळेच कमीत कमी वेळेत, कमीत कमी श्रमांत आणि कमीत कमी धोका पत्करून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करता आले. या सगळ्यालाच दुसर्या शब्दांत "संधीची वाट पाहून (संधी साधून) घाव घालणे" म्हणतात. सरकार आणि सैन्य जेव्हा "आम्ही ठरवलेल्या वेळेला, आम्ही ठरवलेल्या जागी आणि आम्ही ठरवलेल्या प्रकारे उत्तर देऊ; असे म्हणत होते त्याचाही "संधी साधून बदला घेऊ" हाच अर्थ होता.रशिया सोडल्यास कुठले बलाढ्य देश भारताच्या मागे खंबीरपणे उभे होते?कोणत्याही युद्धात आपल्या बाजूने सक्रियपणे कोण उभे राहील हे जेवढे महत्वाचे असते तेवढेच शत्रूच्या बाजूने कोणाला उभे राहण्यापासून दूर ठेवता येईल हे महत्वाचे असते. दुसर्या शब्दांत आपले पारडे जड करणे जेवढे महत्वाचे तेवढेच विरुद्ध पारड्याचे वजन वाढू नये हे पाहणे महत्वाचे असते... दोन्ही कृतींनी अपलेच पारडे तुलनेने जास्त जड होते :) त्यावेळेस, इंदिरा गांधींनी रशियाला "तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय; पण कारवाई करणारच. मात्र, आमच्या बरोबर असल्याने तुमचाही फायदाच होईल." असा अल्टीमेटम दिला होता, असे म्हणतात.उरीचा हल्ला झाला नसता तर 'सर्जिकल स्ट्राईक' केले असते का? पठानकोटच्या हल्ल्यानंतर का नाही 'सर्जिकल स्ट्राईक' केले? २ वर्षे जगभर दौरे करुनही आत्मविश्वास नव्हता का?यावेळेस, १८ सैनिकांचे दुख्खद निधन, आणि तेही पठाणकोट हल्ल्यानंतर थोड्याच वेळात, हे महत्वाचे कारण होते. जनतेचा जेवढा क्षोभ होता तेवढाच मानहानी झालेल्या सैन्याचाही आग्रह असला तर आश्चर्य नव्हते. शिवाय, दोन जवळपासच्या अतिरेकी घटनाक्रमामुळे, अगोदरच भारताबद्दल अनुकुल होत असणार्या जागतिक मताचे अधिक धृवीकरण झाले होते. त्यामूळे अश्या हल्ल्यासाठी जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत जनमानसाची पार्श्वभूमी तयार झाली होती. एखादी कृती नक्की कोणत्या वेळी केली तर त्यापासून योग्य परिणाम साधता येईल, हे प्रत्येक घटनेच्या वेळच्या वास्तवावरून ठरवायचे असते. अनेक तज्ञांची मदत असली तरीही, हा एक प्रकारे निर्णय घेणार्या अधिकार्याचा (भारतात, पंतप्रधानांचा) सबजेक्टीव्ह निर्णय असतो. तेव्हा अश्या परिस्थितीत, "आत्ताच का ?", "पूर्वी का नाही ?" किंवा "नंतर का नाही ?"; अश्या शंकेखोरपणाला पटेल असे उत्तर देणे कोणालाच शक्य नसते आणि कारण दिले तरी विचारणार्याला ते पटण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते... रामराज्यातही खुद्द श्रीरामाला शंकेखोर जनतेचे समाधान करणारी उत्तरे देणे शक्य झाले नव्हते; आपण तर सामान्य माणसे आहोत ! :) ;)असे १-२ वर्षात जागतीक मत आपल्या बाजुने वळवणे इतके सोपे असते का?मी गेली अनेक दशके आंतरराष्ट्रिय राजकारणाचे प्रचंड कुतुहल असलेला विद्यार्थी आहे. डोळे उघडून, कोणत्याही रंगाचा चष्मा न लावता आणि बुद्धी समतोल ठेऊन गेल्या दोन-अडीच वर्षांकडे मी बघतो, तेव्हा ते तसे झाले आहे असे मला दिसते. तसे मला का दिसते याचे विवेचनही मी लेखात केले आहेच. माझे म्हणणे सर्वांनाच पटेल / पचेल / सोईचे असेल असे माझे अजिबात म्हणणे नाही :)'पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला' ह्या धाग्यावर एका प्रतिसादात तुम्ही असे म्हटले होते-भारतिय राजकारणाप्रमाणेच मिपावरही अनेक "हुशार" वाद-प्रतिवाद होत असतातच व असा एखादा प्रतिसाद येणार हे गृहित धरलेच होते. त्यामुळे, केवळ "त्याला इतका उशीर का झाला?" याचेच आश्चर्य वाटले आहे. :) ;) पण तरीही एक शेवटचा प्रयत्न करून पाहतो... १. "वास्तव जीवनासंबंधी सर्वसामान्य तत्वे सांगितली जातात आणि त्यांना अपवाद असतात" हे तुम्हाला मी सांगायची गरज आहेच असे नाही. २. त्यामुळे, जीवनात बर्याचदा असे दिसते की... एखादी व्यक्ती/व्यक्तीसमुह/संघटना अनेक वर्षे प्रयत्न करून अयशस्वी राहते, तर अपवादात्मक का होईना पण एखादी एखादी व्यक्ती/व्यक्तीसमुह/संघटना फार कमी वेळात उत्तम यश मिळवते. असे होण्यामागे त्या दोघांमधील हुशारी, विषयावरची पकड, हुशारी वापरण्याची दिशा/नियत ठीकठाक असणे, अपवादात्मक श्रम घेण्याची तयारी असणे, इत्यादी अनेक गोष्टींतील फरकाचा प्रभाव असतो. ३. प्रतिकूल परिस्थितीपासून सुरुवात करूनदेखील जर थोड्या वेळात अपवादात्मक यश मिळविले जात असेल तर ते अधिकच उज्वल समजले जाते. ४. "हजार किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलाने होते." पहिली काही पावले जर दमदार दिसत आहेत आणि त्या अनुभवावरून पुढचा प्रवास वेगवान होऊन भारताची जोमदार प्रगती होईल असा आशेचा किरण दिसत असला, तर एक भारतीय म्हणून मला ती आनंदाची घटना वाटते. "भारताबद्दल" ममत्व असलेल्या इतरांनाही तसेच वाटेल असा माझा अंदाज आहे. आत्ताच्या या उत्तराबद्दलही वरचेच एक वाक्य परत सांगू इच्छितो...जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात.ह्याचा अर्थ मागील सरकारने गेल्या २५-३० वर्षे ज्या खेळ्या खेळल्या त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षात या सरकारला निर्णय घेणे सोपे गेले असाही होतो.माझे म्हणणे सर्वांनाच पटेल / पचेल / सोईचे असेल असे माझे अजिबात म्हणणे नाही. :)