Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक आत्ताच का केला गेला ?

ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/07/2016 - 21:55
🗣 150 प्रतिसाद
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत. याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत. जनक्षोभ : लोकशाहीत कोणत्याही लोकाभिमुख नेत्याला "जनतेची तगमग" दुर्लक्षून जमत नाही. त्याला राजकारणात शिल्लक राहण्यासाठी लोकमताची कदर करावीच लागते. परंतू, अंतिमतः त्याबाबत काय कारवाई केली जाईल व ती कोणत्या स्वरूपात केली जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते. राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक : सर्जिकल स्ट्राईक सारखी (ज्याचा परिणाम (इस्कॅलेशन) सर्वंकष युद्धामध्ये होऊ शकतो) कोणतीही आक्रमक कृती डोके गरम करून किंवा केवळ स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी केल्यास बाजू आपल्यावर उलटून देशाचे, आपल्या पक्षाचे आणि नेत्याच्या स्वतःच्या राजकिय जीवनाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.यासाठी "राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक" असावी लागते. जी भारतातर्फे आजपर्यंत १९६५, १९७१, कारगिल ही युद्धे आणि आताचा सर्जिकल स्ट्राईकचा अपवाद सोडता दिसलेली नाही. आंतरराष्टिय संघर्ष आणि मित्रराष्ट्रे : जागतिक स्तरावर राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक असणे इतकेच पुरेसे नसते. कारण, कोणत्याही मोठे युद्धाचे स्वरूप केवळ दोन देशांतले युद्ध असे राहत नाही तर ते दोन विचारसरणींमधे विभागलेल्या देशांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असलेले युद्ध असे बनते. म्हणजे ज्या देशाच्या गटाचे वजन जास्त तो अंतिमतः जिंकतो. उदा. भारत-पाक युद्धात पाकच्या पारड्यात चीनचे वजन (पक्षी : राजकिय-सामरिक पाठींबा) धरावेच लागेल आणि त्याला तोलून शिवाय जास्त होईल अश्या एक किंवा अनेक देशांचे वजन आपल्या पारड्यात असणे जरूर असते. त्यामुळे, परदेशाबरोबरच्या आक्रमक कृतीअगोदर जागतिक स्तरावर आपले सबळ पाठीराखे मित्र देश (आक्रमक कृती केल्यावरही आपल्या मागे उभे राहणारे) असणे जरूर असते. हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही दर युद्धाअगोदर हे करावेच लागते. हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते. जगातली पत आणि ती वापरण्याची धमक : यासाठी, किमान "आमच्या बाजूला असा किंवा असून नका, तुमची मर्जी. आम्ही आमच्या हितसंबंधांसाठी जरूर ती कृती करणारच. पण आमची न्याय्य बाजू न घेतल्यास, जगाच्या पुढे अंतिमतः तुमचेच नैतिक नुकसान आहे." इतके तरी पटवून देण्याची गरज असते. हे यशस्वीपणे करायला आपल्याकडे एक चांगली नीति असणे आणि तिच्यावर आपला ठाम विश्वास असण्याची गरज असते. असे १९७१ च्या युद्धात केले गेले होते. सद्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर, भारताच्या बाजूने अनेक मित्रराष्ट्रे असल्याने आणि पाकिस्तान जागतिक स्तरावर एकटा पडून त्याने "स्ट्राईक्स झालेच नाहीत" असा कातडीबचाऊ पवित्रा घेतल्याने भारताला इतक्या पुढच्या पायरीवर जाणे जरूर पडलेले नाही. जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे : मोदींनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानसोबत मित्रत्वाचे संबंध स्थापन करण्यास अगदी टोकाचे प्रयत्न केले आहेत हे जगाला दिसले आहे. हे त्यांच्या मूळच्या आक्रमक प्रतिमेला छेद देणारे असल्याने त्यांचे पाठीराखे व विरोधक यांना बरेच गोंधळाचे व आश्चर्यकारक वाटले. किंबहुना त्यासाठी त्याना देशांतर्गत टीकेचे व चेष्टेचे धनी व्हावे लागले आहे. मात्र, देशांतर्गत आणि जागतिक वारे पाहिले असता, जर सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पाकिस्तानबरोबर कडक वागणे सुरू केले असते तर जागतिक स्तरावर त्यांची आतताई नेता अशी छबी निर्माण झाली असती. शिवाय, त्यांना अगदी हिटलरपर्यंत नावे ठेवणार्‍या देशांतर्गत विरोधकांच्या हाती कोलीत दिल्यासारखे झाले असते. मग तर त्यांच्या कोणत्याही आक्रमक कृतीला देशाबाहेरून व देशातून मोठा विरोध होऊन ते एकटे पडले असते. सॉफ्ट पॉवर : (अ) जागतिक स्तरावरची मैत्री मुख्य दोन प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरांवर अवलंबून असते : १. या देशाशी मैत्री केल्याने माझ्या देशाचा फायदा होईल का ? २. या देशाशी मैत्री न केल्याने माझ्या देशाचा तोटा होईल का ? (आ) आर्थिक हितसंबंध : पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी जगातील इतर महत्वाच्या राष्ट्रांबरोबर मैत्रीपूर्ण व आर्थिक संबंध प्रस्थापित करून आपण व आपला देश युद्धखोर नाही, तर आपला मुख्य उद्येश देशाचा आणि एकंदरीत सर्व जगाचा विकास करणे हाच आहे हे सिद्ध केले. त्या प्रयत्नांच्या परिणामाने अनेक महत्वाच्या देशांबरोबर भारताचे दीर्घकालीन सहकार्याचे व्यापारी, राजकिय, सामरिक आणि पर्यावरणसंबंधी करार झाले आहेत. असे समान हितसंबधावर आधारलेले करार दोन देशांना दीर्घकालासाठी घट्टपणे बांधायला मदत करतात. या बाबतीत बहुतेक सर्व विकसित देश पूर्वीपेक्षा भारताच्या जास्त जवळ आहेत यात संशय नाही. (इ) परदेशांतले भारतिय वंशाचे लोक (इंडियन डायास्पोरा) : अनेक विकसित देशांत लक्षणीय प्रमाणांत भारतिय वंशांचे लोक आहेत. पूर्वी त्यांच्याकडे परकिय चलनाचा स्त्रोत असलेले NRI किंवा PIO यापलिकडे पाहिले गेले नाही. जागतिक राजकारणाचा हा एक महत्वाचा दबावगट मोदींनी हेरला आणि आपल्या प्रत्येक परदेश भेटीत त्याला संबोधित करून आपलेसे केले. या गटाला आपली अगोदर माहित नसलेली ताकद उमगली आहे. हे अमेरिका आणि ब्रिटन मधल्या राजकारणी वार्‍यांत स्पष्ट दिसते आहे. आज आणि पूर्वी संख्येने तेवढेच असलेल्या पण पूर्वी स्थानिक राजकारनात फारसे न दिसणारा हा गट आता दृष्य स्वरूपात आला आहे. या गटाच्या धृवीकरणाने त्यांचे स्थानिक राजकारणातले महत्व वाढले आहे. अर्थातच, त्यांना महत्व देतांना त्यांच्या मूळ देशाकडे दुर्लक्ष करणे स्थानिक राजकारण्यांना शक्य नाही. अमेरिका आणि ब्रिटनमधल्या निवडणूकांकडे वरवर लक्ष असलेल्यांनाही मला काय म्हणायचे आहे ते कलले असेलच. अश्या भारताच्या बाजूने बनलेल्या दबावाचा परिणाम त्या देशाचे भारताशी असलेले द्विपक्षिय संबंध अधिक घट्ट होण्यात होतोच, पण आंतरराष्ट्रिय स्तरावर असे दोन देश एकाच गटात येण्याची शक्यता अजून वाढते. (ई) इतर मित्र देश : अनेक छोट्या देशांबरोबरही करार करून भारताने त्यांना मदत केली यावर अनेकदा टीका केली जाते. उदा : माक्रोनेशियातले नकाशातल्या केवळ ठिपक्यासारखे असलेले देश, दक्षिण आशियातले देश, इत्यादी. याचे खूप फायदे असतात. याचे फायदे पाहण्यासाथी दोन मुद्दे पुरेसे आहेत : (१) संयुक्त राष्ट्रांच्या मतदानात भारताला, अमेरिकेला आणि नकाशावरच्या ठिपक्याच्या आकाराच्या देशाला, दोघानांही प्रत्येकी एकच मत असते. (२) नुकताच भारताने पाकिस्तानातील सार्कच्या सभेवर टाकलेल्या बहिष्काराच्या नंतर एक एक करत पाकिस्तान सोडून इतर सर्व देशांनी बहिष्कार टाकला. या घटनेचे परिणाम दक्षिण आशियापुरते सीमीत राहिलेले नाही, त्याची नोंद आपल्या परिसराच्या बाहेर असलेल्या जगातील सर्व देशांनी घेतली असणारच आणि तिचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या आजच्या व उद्याच्या कृतींवर पडणार आहे. पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक चुका : हे सर्व चालू असतानाच, पाकिस्तानाने त्याच्या मूळ स्वभावाला अनुसरून आपल्या अतिरेकी कारवाया चालूच ठेवल्या. सुरुवातीच्या दिवसांत, मोदी चिडून काही आक्रमक करतील आणि त्यांना जागतिक स्तरावर अलग पाडून आपल्याला वरचढ होता येईल असे पाकिस्तानला वाटले. मात्र या खेळीला न बधता, त्यांच्या मोदींनी पाकिस्तानच्या दिशेने केवळ शांतीपूर्णच नाही तर "शरीफना वाढदिवसाची भेट" या सारख्या "ऑउट ऑफ द वे" कृती चालू ठेवल्या. यामुळे, पाकिस्तानने मोदी 'केवळ मोठ्या घोषणा देणारा पण पूर्वीच्या नेत्यांसारखा कोणतीही आक्रमक कारवाई करण्याला घाबरणारा नेता आहे' असा स्वतःचा गैरसमज करून घेतला व आपल्या अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या. याचा परिणाम पाकिस्तान नकळत जगाच्या मनातून उतरत जाण्यात झाला. भारताच्याबद्दलच्या या (गैर)समजामुळे पाकिस्तान इतका गाफिल होता की पूर्वानुभावरून भारतातर्फे काही कारवाई होणार नाही याची त्याची खात्री झाली होती. त्यामुळे, उरी हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करण्यासाठी त्याने लाईन ऑफ कंट्रोल्जवळच्या अनेक लाँचपॅड्सवर मोठ्या प्रमाणात अतिरेकी जमा केले होते. सर्जिकल स्ट्राईकच्या योग्य संधिची वाट पाहणार्‍या भारतिय सैन्याच्या हे पथ्यावरच पडले. जागतिक स्तरावरचा पाठींबा : पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया जगाला अगोदर माहित नव्हत्या इतके पाश्चिमात्य देश अज्ञानी आहेत असे अजिबात नाही. पण जो देश स्वतःसाठी काहीच करायची हिंमत दाखवत नाही त्याची बाजू घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे इतके सर्वसामान्य माणूसही जाणतो, तर हुशार राजकारणी कसे जाणणार नाहीत. समजा, तुमचा एक शेजारी दुसर्‍याला नेहमी मार देत आहे आणि तरीही दुसरा नेहमी शांततेची माळ ओढत मार खाणे पसंत करत आहे व वर त्याचे नीतिमत्तेच्या नावाखाली समर्थन करत आहे. अश्या भित्र्या व भित्रेपणाचे गोडवे गाणार्‍या माणसाची बाजू घेतल्यास, तो केव्हा कच खाऊन त्याला मदत करणार्‍याची अवस्था कठीण करेल याचा नेम नसतो. अर्थात, अश्या माणसाची बाजू सत्याची असली तरी त्याला पाठींबा देणे मूर्खपणाचे ठरते. जागतिक राजकारणातही हेच मूलभूत सत्य कोणी कोणाची बाजू घ्यावी याकरिता वापरले जाते. सामरिक ताकद आणि तिचा वापर : सामरिक साधनसंपत्तीच्या अनेक कमींशी सामना देत असले भारतिय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक आहे. त्यातही भारतिय कमांडोच्या पात्रतेबद्दल कोणालाही संशय नसावा. कमी होती त्यांना आदेश मिळण्याची. भारतात लोकशाही आहे आणि खर्‍या लोकशाहीत सैन्य मुलकी सरकारच्या अधिकारामध्ये असते. त्यामुळे सरकार कणखर नसले व आदेश द्यायला कचरणारे असले तर उत्तमातले उत्तम सैन्यही हात बांधलेल्या अवस्थेत राहते. यावेळेस भारतिय सैन्याला "योग्य वाटेल त्या वेळेस, योग्य वाटेल त्या प्रकारे" हल्ला करण्याचा आदेश मिळाला आणि अश्या आदेशाची वाट पहात असलेल्या सैन्याने त्या संधीचे सोने केले. हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी : हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील... १. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्‍या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली. २. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला ! ३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्‍या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्‍या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्‍याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही. ४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्‍या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही. यापेक्षा जास्त मुद्दे सांगता येतील. पण, खालील साधार निष्कर्ष काढण्यासाठी सद्या इतके पुरे व्हावेत. शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. त्यांनी भारताच्या जागतिक व स्थानिक स्तरावरच्या आर्थिक-राजकिय सबलीकरणासाठी जाणिवपूर्वक एक स्ट्रॅटेजी ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. वास्तवात असे मार्ग फार थोड्या कालात फळे देत नाहीत. देशाच्या सामर्थ्याची वाढ करणे ही लांबवरची कृती आहे. मात्र, वाढत असलेल्या जागतिक शक्तीचा उपयोग अचानक आलेल्या संधीचा उपयोग करून तरीही "नि-जर्क पद्धतीने" नव्हे तर "योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, हवा तो परिणाम साधणारा हल्ला करण्याचे" स्वातंत्र्य देणारे आदेश सैन्याला दिले गेले आणि अर्थातच, आपल्या सैन्याने त्या संधिचे सोने करून इतिहास घडवला आहे. कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. एक देशप्रेमी नागरिक म्हणून मला वरच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या सर्व घटनाक्रमांचा साधार अभिमान आणि आनंद आहे. किंबहुना, हा घटनाक्रम तसाच पुढे चालू रहावा आणि भारताचे पाऊल सतत पुढे पडत रहावे हीच माझी इच्छा आहे. ********************************************************** हा विषय खूप मोठा आहे आणि या एका लेखात पूर्णपणे मांडणे शक्य नाही. पण सहज सुचले ते लिहिले आहे. **********************************************************
वर्गीकरण
राजकिय व सामरिक स्ट्रॅटेजी
जागतिक राजकारण आणि राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक

प्रतिक्रिया द्या
31319 वाचन

💬 प्रतिसाद (150)
प
पैसा Sat, 10/08/2016 - 08:46 नवीन
उत्तम विश्लेषण. नेमके युनोच्या अधिवेशनाच्या जरा आधी उरी तळावर असला भीषण हल्ला करायची अतिरेक्यांना बुद्धी झाली. आणि भारताच्या सैन्यासंबंधित थिंक टँकने यानंतर आततायी काही न करता यूनोच्या अधिवेशनाचाही आपल्याला अनुकूल होईल असा पुरेपूर उपयोग करून घेतला. पुढचा सर्जिकल स्ट्राईक हा मास्टरस्ट्रोक होता. यानंतर पाकिस्तानची अवस्था "सहन होत नाही आणि सांगता येत नाही" अशी झाली. या हल्ल्याचे पुरावे मागणार्‍यांच्या मागे काही पाकिस्तानी लागेबांधे आहेत का याचा नक्कीच शोध घेतला जावा. कारण अशा हल्ल्यांची प्रक्रिया शत्रूला दाखवू नये हे आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळते तर या अतिशहाण्या धूर्त राजकारण्याना कळत नसेल अशी शक्यताच नाही. ताज हॉटेलच्या हल्ल्यात कमांडो कारवाईचे प्रक्षेपण करून अतिरेक्याना मदत केली गेली तसे पुन्हा कधीही काही घडू नये. उलट हेलिकॉप्टर्स गेली की पॅराट्रुपर्स चालत गेले याबद्दल पाकड्यांचा गोंधळ उडवून दिला गेला पाहिजे. पाकिस्तानसारख्या हरामखोर शत्रूला नामोहरम करायला गनिमी काव्याला पर्याय नाही. .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 10/08/2016 - 08:59 नवीन
या हल्ल्याचे पुरावे मागणार्‍यांच्या मागे काही पाकिस्तानी लागेबांधे आहेत का याचा नक्कीच शोध घेतला जावा. सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
समी Sat, 10/08/2016 - 09:07 नवीन
१०१% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 09:54 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 09:55 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/08/2016 - 21:32 नवीन
नेमके युनोच्या अधिवेशनाच्या जरा आधी उरी तळावर असला भीषण हल्ला करायची अतिरेक्यांना बुद्धी झाली. भारत-पाकिस्तानमधली प्रत्येक महत्वाची द्विपक्षिय सभा/भेट आणि जागतिक स्तरावरचा मोठा समारंभ यांच्या वेळेस अथवा आजूबाजूला भारतातले अतिरेक्यांचे हल्ले होणे ही नवीन गोष्ट नाही. पाकिस्तानामधील भारत-पाक सभांत भारतिय ध्वज उलटा लावला जाण्याचे प्रसंग विरळ नव्हते. त्यावर भारत नेहमीच "होते अशी चूक कधी कधी" असे म्हणत सभा सुरु करत असे. अश्या घटनांत आपण दुखावलेला किंवा चिंताग्रस्त (नर्व्हस) केलेला देश "कडक कारवाई करतो" की "आपल्याकडून समारंभाला गालबोट लावले जाईल या भीतीने आपला मान बाजूला ठेऊन पडते घोरण घेतो" हे पाहून त्या देशाचे "पाणी जोखले जाते"... आणि भूतकालात "भारत पडते घेतो" हीच नेहमीची गोष्ट होती. या वेळेस पाकिस्तानला (व जगाला) अनपेक्षित असलेल्या दोन गोष्टी घडल्या आहेत... सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तानी सैन्याला जितकी अनपेक्षित व नामुष्कीची गोष्ट होती, तितकीच सार्क सभेचा बोजवारा ही पाकिस्तानी सरकारला अनपेक्षित व नामुष्कीची गोष्ट होती ! :) चीनचा चेअरमन आणि पंतप्रधान भारतात आले होते त्या वेळेसही चीनच्या सैन्याने भारतीय सीमेचे उल्लांघन करून आपल्या हद्दीत फेर्‍या (इन्कर्शन्स) मारल्या होत्या, हे आठवत असेल. सर्वोच्च महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळी अश्या कुरापती चुकीने नाही तर सकारण होतात. ते चीनने "भारताचे पाणी जोखणेच" असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मार्मिक गोडसे Sat, 10/08/2016 - 08:53 नवीन
१९७१ मध्ये सोव्हिएत रशिया याचा अर्थ निव्वळ रशिया नव्हे तर संपूर्ण कम्युनिस्ट जग असा होता. हे सर्वच देश - पूर्व जर्मनी,पोलंड, झेकोस्लोव्हाकिया,बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया - रशियाबरोबर भारताच्या बाजूने उभे होते. हे देश महासत्ता नसतील, पण अण्वस्त्रधारी देश होते.
परंतू बलाढ्य अमेरिका व धोकादायक शेजारील देश चीनही भारताच्या विरुद्ध होते हे विसरून कसे चालेल.
आपल्या बाजूने जनमत होतं, पण ' बिच्चारा देश ' असं होतं.
१९७१ चे युद्ध, दोन अणुचाचण्या, जागतिक निर्बंध लादले असतानाही केलेली प्रगती ,तरी भारत 'बिच्चारा' म्हणनार्‍यांची कीव येते.
आता तुम्हाला जे अपेक्षित आहे ते उत्तर देतो
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज का वाटली? शिक्के मारण्याचेही काम करता का?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 09:36 नवीन
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज का वाटली? शिक्के मारण्याचेही काम करता का?
त्याला pre-emptive strike असं म्हणतात. तुम्ही वैयक्तिक मुद्द्यांवर आल्यामुळे तो वर्मी बसला आहे हे समजलंच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 10/08/2016 - 11:42 नवीन
त्याला pre-emptive strike असं म्हणतात.
मराठीत 'खाजवून खरुज काढणे' असे म्हणतात. स्वतःच चर्चेचा रोख बदलायचा व नंतर समोरच्यावर विषयांतर केल्याचा आरोपही करायचा. असते एखाद्याला वाईट खोड. तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 11:51 नवीन
तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते. जियो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित Sat, 10/08/2016 - 11:56 नवीन
++111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/28/2016 - 08:21 नवीन
हे तिरंग्याबरोबरचे झेंडे आमचे मानबिंदू आहेत. कारण वी डोण्ट हेट इन प्लुरल. :) उदा १. Image removed. उदा २. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/08/2016 - 16:54 नवीन
तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते. +१,००,००० तिरंगा हा केवळ झेंडा नाही तर मानबिंदू आहे आणि तो सतत आमच्या हृदयात वास करत असल्याने त्याला वेगळे सांगण्याची गरज वाटली नाही ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 17:25 नवीन
वाह!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Sun, 10/09/2016 - 08:35 नवीन
तिरंगा हा केवळ झेंडा नाही तर मानबिंदू आहे आणि तो सतत आमच्या हृदयात वास करत असल्याने त्याला वेगळे सांगण्याची गरज वाटली नाही ! :)
प्रश्नच नाही, परंतू माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता, तर तो बळजबरीने दुसरेच झेंडे माझ्या हातात देणार्‍याला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 12:28 नवीन
तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते.
काय सांगता? खरं वाटेल एखाद्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सचु कुळकर्णी Sat, 10/08/2016 - 08:54 नवीन
या हल्ल्याचे पुरावे मागणार्‍यांच्या मागे काही पाकिस्तानी लागेबांधे आहेत का याचा नक्कीच शोध घेतला जावा. बाडीस
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Sat, 10/08/2016 - 09:22 नवीन
कारण ते सरळ सरळ सैन्यावर संशय व्यक्त करतायत एक ३ *** रँक DGMO ने स्ट्राईक केल्याच जाहिर केल होत. ह्याच DGMO ने काहि दिवसांपूर्वी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटल होत की "कारवाई जरुर होईल पण वेळ आणि जागा आमच्या चॉईस ची असेल " सगळयाच पार्टी चे जे थोर विचारवंत US PRESIDENTIAL DEBATE समजून जो काय धिंगाणा चँनेल्स वर घालत असतात तो तर शिसारी आणणारा असतो, त्याच चर्चेत उपस्थित असलेले रि. जनरल्स, ब्रिगेडीअर ह्यांच्या चेहर्यावरील भाव पाहिले तर लक्षात येत कि त्याना तिथे आल्याचा कीति मनस्ताप होतोय. छ्य जानी हम तुम्हे मारेंगे जरुर मारेंगे लेकीन वक्त भी हमारा होगा, बंदुक भी हमारी होगी और गोली भी.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/08/2016 - 09:45 नवीन
आता तुम्ही मधे बोलू नका ...तुम्ही बोलत असताना मी मधे बोललो का ....? हे वाक्य तर भाजपा व कॉंग्रेस यांचे प्रवक्ते अगदी पटकथेत लिहिल्याप्रमाणे बोलत असतात. माझ्या मते ही चर्चा वगैरे सब बकवास आहे तो एक करमणुकीचा खेळ म्हणून या सर्वानी स्वीकरलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
अ
अनुप ढेरे Sat, 10/08/2016 - 10:11 नवीन
जाहीर हल्ला करण्याची दोन मुख्य उद्दीष्ट असावीत असा कयास आहे. १. डिटरंटः पुन्हा असे हल्ले होऊ नयेत म्हणून एवढा मोठा हल्ला पब्लिकली केला. डिटरंट म्हणून उपयोगी कितपत ठरलं हे पुढचा हल्ला होई पर्यंत सांगता नाही होणार. अशा स्ट्राईकने जरब बसेल का अतिरेक्यांवर/पाकिस्तान सैन्यावर हे आत्ताच सांगता येणार नाही. २, भारतीय नागरिकांना संदेश देणं की आम्ही नुसते बसलेलो नाही.जशास तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो. हा मुद्दा तुम्ही लिहिलेला आहेच. पण या हल्ल्याचा एक परिणाम असा की पुन्हा उरी सारखं झालंच काही तर लोक पुन्हा अशाच रिटालिएशनची अपेक्षा ठेवणार. ती अपेक्षा पूर्ण करणं शक्य असेलच दर वेळेला हे नक्की नाही.
जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे :
याच्याशी पूर्ण सहमत. भारताने शांततेचे सर्व प्रयत्न थकल्यावर हे केलं आहे हे स्पष्ट दिसत आहे. पठाणकोटमध्ये पाकिस्तानची टीम बोलावणं, शरीफ-मोदी यांच्या भेटी, nsa स्तरावरच्या भेटी हे सर्व उपाय अगदी दृष्य होते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/08/2016 - 10:13 नवीन
विश्लेषण आवडले.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/08/2016 - 12:18 नवीन
डॉ सुहास म्हात्रे , सुरेख विवेचन <<<< कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. >>>> ह्याला सलाम पाकिस्तान न्युज टीव्ही वर मिळालेल्या माहीती नुसार. पाकिस्तानी ईंटीलिजंसला गाफिल ठेवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकस केलेल्या जागा सोडुन ईतर भारत पाक बॉर्डरवर स्ट्राईकसच्या पुर्वी काही दिवस, भारतीय सैन्य, बिएसएफ, चॉपर व ईतर वेहीकल मुव्हमेंट करत होते . त्या शिवाय जागतीक पातळीवर पाकिस्तानला एकट पाडु, ईंडस नदीच पाणी बंद करु वैगेरे पण सुरु होत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/08/2016 - 21:41 नवीन
सहमत. बर्‍याचदा, युद्ध जेवढे शस्त्रांनी जिंकले जाते तेवढेच किंवा किंचीत जास्तच मुत्सद्देगिरी व व्यूहरचनेने जिंकले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/08/2016 - 12:42 नवीन
या लेखाच्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यातले सर्व मुद्दे इथे लिहिणे विस्तारभयास्तव शक्य नाही. परंतु तरीही, मध्यरात्री लेख लिहिताना एक फार महत्वाचा मुद्दा राहून गेला. तो इथे मांडणे आवश्यक आहे. हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी : हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील... १. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्‍या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली. २. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला ! ३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्‍या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्‍या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्‍याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही. ४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्‍या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही. अजून बारीक सारीक बरेच आहे. पण हा मुद्दा मांडायला इतके पुरेसे आहे. तेव्हा, विस्तारभयास्तव, लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/08/2016 - 14:07 नवीन
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक तर एक भारी मूव्ह होतीच, पण तुम्ही उलगडून लिहिलेय पण झक्कास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 18:32 नवीन
सर्जिकल स्ट्राईक च्या सगळ्या घटनाक्रमाची हि प्रेस काँफेरेन्स चेरी ऑन टॉप होती! 'भाई, हम तो अब ऐसेही मारेंगे, जो उखाडना है उखाड लो!' सविस्तर आणि अचूक विश्लेषण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
याॅर्कर Sat, 10/08/2016 - 15:15 नवीन
छान विश्लेषण!! पण याविषयीच्या व्हाटसअप फेसबुकी फाॅरवाॅर्ड्सनी वैताग आणलाय. (LOC च्या पलिकडचा भाग आपण आपल्या देशाच्या नकाशातच दाखवतो म्हणजे तो आपला भाग आहे असं, मग ते "पाकिस्तान मे घुस के मारा" हे मिडियावाल्यांचे वाक्य गैरलागु आहे.) जय हिंद!!!
  • Log in or register to post comments
म
मोहन Sat, 10/08/2016 - 15:59 नवीन
अत्यंत संयत व माहितीपूर्ण विवेचना बद्दल डॉ. म्हात्रे यांचे आभार आणि अभीनंदन. अशा लेखांमुळे मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. बाकी गदरोळ पाहिला की "कालचा गोंधळ बरा होता " म्हणायची वेळ येते. आणि हो .... डिसक्लेमर १ नं. आहे ... प्रत्येकाने वापरावे असे.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Sat, 10/08/2016 - 21:05 नवीन
चर्चेतील काहि मुद्दे १ कारगिल
तुम्ही कारगिलच्या युध्दात राजकिय इच्छाशक्ती दिसली असं जे म्हणालात त्याबद्दल माझे मत वेगळे आहे. मुळात त्या वेळी पाकिस्तानने घुसखोरी करून आपला भूभाग बळकावला होता. त्यामुळे सरकारकडे कोणताही अन्य मार्ग न्हवता. कोणीही सत्तेत असते तरी त्याला लष्करी कारवाई करावीच लागली असती. जर भारताने कारवाई करून भूभाग पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला नसता तर भाजपाला लोकांनी शिल्लक ठेवले नसते. कारगिल नंतर काही दिवसात झालेल्या काठमांडू दिल्ली विमान अपहरणाच्या वेळी देखील तेच सरकार सत्तेत होते आणी त्या वेळी त्यांनी घातलेला गोंधळ सगळ्यांनी बघितला होता.
पुर्ण सहमत. कारगिल युध्दात तत्कालिन लष्कर प्रमुख / हवाईदल प्रमुख यांनी घोषित केले होते कि L O C भारतातर्फे ओलांडलि जाणार नाही. लष्कर प्रमुख / हवाईदल प्रमुख स्वतःच्या मनाने ही घोषणा केली हे म्हणने फार हास्यास्पद ठरेल. ज्या मुशर्रफने कारगिल केले, त्या मुशर्रफला तत्कालिन पंतप्रधानांनी आग्र्याला वाटाघाटीसाठी बोलवले त्या मुशर्रफला एक तुच्छ शेकहॅन्ड देवुन तत्कालिन हवाईदल प्रमुख टिपणीस यांनी "पाकिस्तानी प्रमुखाला" त्याची लायकी दाखवली. हे धमक दाखवण्याचे एक उत्तम उदाहरण आहे असे माझे मत.
२ राजकीय मजबूरी
मिपावर तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांची संयुक्त सरकार असल्यामुळे राजकीय मजबूरी होती असा उल्लेख वाचला. संयुक्त सरकार चालवणार्या ममोने कशी जोखिम घेवुन ( भ्रष्टाचार करुन ) अमेरिके बरोबर अणुकरार केला, ज्याची फळे कोण चाखत आहे यावरपण चर्चा घडावी. CURRENT AFFAIRE १ फ्रान्स बरोबरच्या पाणबुडि प्रकल्पातील माहिती लिक झाली मोघम विधान करुन सरकारने विषय थांबवला फ्रान्स बरोबर रफाल करार केला २ अमेरीकेबरोबर एकमेकांच्या लष्करी तळांच्या वापराबद्द्ल करार झाला. ( शंकास्पद ) या CURRENT AFFAIRE व सर्जिकल स्ट्राईक नंतर अमेरिका / फ्रान्स फार शांत आहे हा योगायोग नाही यावर पण चर्चा घडावी
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 10:43 नवीन
२०११ मध्येही भारताने केले होते सर्जिकल स्ट्राईक, ३ पाक जवानांचे शिर आणले होते भारतात लष्कराचे निवृत्त मेजर जनरल ए के चक्रवर्ती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्थात भारतीय लष्कर आणि सरकार हे अधिकृतरीत्या मान्य करणार नाहीत त्यामुळे याची विश्वाससर्हता संशनीय राहील. आता हे जर खरे असेल तर ह्याला सर्जिकल strike म्हणावे का हे हा वादाचा मुद्दा असू शकतो. ह्या क्षेत्रातील जाणकारांना reading between the line समजेल.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 11:50 नवीन
अर्थात भारतीय लष्कर आणि सरकार हे अधिकृतरीत्या मान्य करणार नाहीत त्यामुळे याची विश्वाससर्हता संशनीय राहील. आता हे जर खरे असेल तर ह्याला सर्जिकल strike म्हणावे का हे हा वादाचा मुद्दा असू शकतो.
हे वाक्य मी The Hindu ची बातमी न वाचता लिहिलेलं. आता मी म्हणेन हो हे surgical strike होत आणि हे विश्वसनीय आहे. मी ह्या पध्दतीचा प्रतिसाद ह्या आदि हि दिला होता http://www.misalpav.com/comment/883422#comment-883422 http://www.misalpav.com/comment/883441#comment-883441 पण आता बातमी मधील पुरावे आणखी सबळ आणि विश्वसनीय आहेत. जरी हे पुरावे नसते तरी मी म्हंटले असते कि भारतीय आर्मी नेहमी revenge घेते कोणालाही माफ करत नाही मग ती बातमी public domain मध्ये येवो अथवा secret राहो. तसेच भारतीय लष्कर आणि मोदी सरकार बद्दल ह्या कारवाई बद्दल अभिमान च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ब
बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 12:24 नवीन
Here's the real reason behind Congress' silence on pre-2014 cross-border raids http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-the-real-reason-behind-congress-silence-on-pre-2014-cross-border-raids/articleshow/54778781.cms via The Economic Times App(Download Now): http://ecoti.in/etapps
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 11:31 नवीन
हि बातमी सर्वांनी वाचावी हि विनंती. The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged. http://www.thehindu.com/news/national/operation-ginger-titfortat-across-the-line-of-control/article9202758.ece Major General (retired) S.K. Chakravorty, who planned and executed the operation as the chief of Kupwara-based 28 Division, confirmed the raid to The Hindu. For the strike, about 25 soldiers, mainly Para Commandos, reached their launch-pad at 3 a.m. on August 29 and hid there until 10 p.m. They then crossed over the Line of Control to reach close to Police Chowki. By 4 a.m. on August 30, the planned day of the attack, the ambush team was deep within the enemy territory waiting to strike.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/09/2016 - 11:36 नवीन
हिंदू ने ही बातमी कशी आणि का प्रकाशित केली आहे? अगदी कागदोपत्रांचा पुरावा देऊन? त्याने काही नुकसान तर नाही ना होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 12:25 नवीन
मला नाही वाटत नुकसान होईल. पाकिस्तान ला हल्ला झाल्यानंतर कळल असणारच, तसेच tit for tat हल्ले LOC वर नवीन नाहीयेत. बाकी ईतर लोकांची मते वेगळी असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 11:41 नवीन
The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged.
एका गुप्त लष्करी कारवाईची गुप्त कागदपत्रे 'हिंदू' दैनिकाला कशी मिळाली असावीत याचे खूपच कुतुहल वाटत आहे. ही कागदपत्रे खरी असतील तर लष्कराची कागदपत्रे जपण्याची व्यवस्था अत्यंत ढिसाळ आहे असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 12:28 नवीन
भारत सरकार किंवा आर्मी हे पुरावे मान्य करणार नाही (हे साहजिकच आहे), परतू the hindu ची विश्वास सर्हता उच्च दर्जाची आहे. मात्र लष्कराची कागदपत्रे उघड होणे नक्कीच चिंताजनक आहे. मात्र हे लक्ष्यात ह्या the hindu ने हि बातमी २०११ सुद्धा दिली होती मात्र त्यावेळी पुरावे नवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 16:30 नवीन
मात्र हे लक्ष्यात ह्या the hindu ने हि बातमी २०११ सुद्धा दिली होती मात्र त्यावेळी पुरावे नवते.
या बातमीची लिंक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 10/09/2016 - 16:46 नवीन
आहे हि पहा. बातमी ह्या बातमी मधील काही line Finally, on August 30, 2011, Pakistan complained that three soldiers, including a JCO, were beheaded in an Indian raid on a post in the Sharda sector, across the Neelam river valley in Kel. The Hindu had first reported the incident based on testimony from Indian military sources,, who said two Pakistani soldiers had been beheaded following the decapitation of two Indian soldiers near Karnah.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 16:55 नवीन
ओह! बघूया पुढील काही दिवसात याबद्दल अजून माहिती बाहेर येतीय का. लष्कराकडूनही खुलासा यायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 16:42 नवीन
The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged.
'हिंदू'कडे या गुप्त कारवाईची सर्व अधिकृत कागदपत्रे, चित्रफिती, प्रकाशचित्रे आहेत हे धक्कादायक आहे. 'हिंदू'तील बातमीत खालील वाक्ये आहेत. A few days after the beheading, Indian Army discovered a video clip from a Pakistani militant who was killed in an encounter while crossing into Kashmir, showing Pakistanis standing around the severed heads of Adhikari and Singh displayed on raised platform. The Hindu has a copy of the video. मारल्या गेलेल्या दोन भारतीय सैनिकाच्या मुंडक्याशेजारी पाकिस्तानी सैनिक उभे आहेत अशी एक चित्रफीत भारतीय लष्कराने मारलेल्या पाकिस्तानी सैनिकाकडे सापडली होती व ती पाकिस्तानी चित्रफीत सुद्धा 'हिंदू'कडे आहे असे या परिच्छेदात लिहिले आहे. लष्कराची इतकी गुप्त कागदपत्रे, चित्रफिती, प्रकाशचित्रे, जप्त केलेली पाकिस्तानी चित्रफीत 'हिंदू'कडे आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 11:43 नवीन
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत. याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत.
अत्यंत उत्कृष्ट लेख! संपूर्ण लेखाशी सहमत. डॉ. म्हात्रे यांनी हा लेख कोणत्यातरी मराठी दैनिकाकडे पाठवावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मोहन Sun, 10/09/2016 - 13:41 नवीन
+ १ अगदी मनातले बोललात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/09/2016 - 16:31 नवीन
म्हात्रे काकांनी ऑलरेडी ताजमहाल बांधलाय, त्याला आमची एक वीट, हा व्हिडीओ पाहुन एक मिपाकर्/त्याचा नातलग्/संतती कोणीतरी जरी भरती झाले तरी आमचे उद्देश्य सफल होइल तर, आज पेशे खिदमत आहे, माझी अत्याधिक प्यारी मराठा लाइट इन्फंट्री. खालील व्हिडीओ हा मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर, बेळगाव ह्यांनी खुद्द बनवलेला आहे "युवक से योद्धा : मराठा सिपाही" असे नाव असलेली ही चित्रफित तब्बल ४७ मिनिटे लांब असुन ती पुर्ण पहावीत अशी सगळ्यांना विनंती. मराठा लाईट फक्त भारतीय भुदलातलीच नाही तर विश्वस्तरावर एक प्रचंड मोठे नाव असलेली रेजिमेंट आहे, हिची स्थापनाच १७५७ म्हणजेच अमेरिकन स्वातंत्र्य प्राप्त होऊन अमेरिकन राष्ट्र बनायच्याही आधीची आहे. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा युद्धघोष असलेली अन "सिंहगड" मार्चिंग साँग असलेली, आमच्या भोळ्या गणपत्सची टोळी, आमचीच मराठा लाईट इन्फंट्री.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 10/10/2016 - 15:34 नवीन
एक्काकाका, धागा आवडला. प्रचंड माहीतीपूर्ण लिहिलय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/10/2016 - 17:08 नवीन
याच विषयाशी संबंधित चिन्मय घारेखान यांचा हा एक लेख - http://indianexpress.com/article/opinion/columns/surgical-strikes-india-pakistan-un-security-council-uri-attack-3074227/
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 10/10/2016 - 17:56 नवीन
एक्का काकांना एक कडक सॅल्यूट. Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Tue, 10/11/2016 - 03:18 नवीन
धन्यवाद एक्काकाका .... उलगडून दाखवलेत ते चांगले झाले. आजच्या घडीला राजकीय इच्छाशक्ती दाखवली आहे हे एक चांगले चिन्ह आहे. Scroll.In Article या लिंकवरती प्लॅन कसा झाला यावर अजून थोडी माहिती सापडली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 10/11/2016 - 03:45 नवीन
उत्कृष्ट आणि विस्तृत लेख साठी अभिनंदन. बाकी मी स्वत: सुरक्षा संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या सोबत कार्य केले असल्यामुळे अधिक काही लिहिणार नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/11/2016 - 09:24 नवीन
धन्यवाद व सहमत विवेकपटाईत साहेब. अश्या लेखात "काय लिहावे हे नक्कीच महत्वाचे, पण त्यापेक्षा 'काय लिहू नये याचे भान ठेवणे' जास्त महत्वाचे असते", हे नि:संशय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा