Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

युती संपली, पुढे काय?

श
श्रीगुरुजी
Sat, 01/28/2017 - 10:57
🗣 226 प्रतिसाद
जे होणे अटळ होते, जे व्हायलाच हवे होते, जे होणार हे नक्की होते परंतु कधी होणार हा फक्त काही काळाचाच प्रश्न होता, जे व्हावे अशी अनेकांची मनापासून इच्छा होती . . . ते अखेर घडून आलेले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मागील २७-२८ वर्षांपासून असलेली महाराष्ट्रातील युती अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. २६ जानेवारीला उद्धव ठाकरेंनी युती संपल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करतानाच आम्ही आता एकटे लढून महाराष्ट्रावर स्वतःच्या जीवावर भगवा फडकावणार, युतीत आम्ही २५ वर्षे सडलो, आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही, तुमची वज्रमूठ मिळाली तर समोरच्याचे दात पाडून टाकू, मुंबईत ११४ जागा मागून आमचा अपमान केला . . . अशी नेहमीचीच फुशारक्या मारणारी विनोदी वाक्ये होतीच. तशी यांची युती विधानसभा पातळीला २०१४ मध्येच संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात भाजपचा जनाधार पक्षाच्या स्थापनेपासूनच, म्हणजे १९८० पासून, शिवसेनेच्या तुलनेत जास्त असताना व तो एखाद्या विशिष्ट भागात साचलेला नसून महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्वात असताना, १९८४ च्या लोकसभेत फक्त २ जागा मिळविलेल्या भाजपने, पक्षविस्तार करण्यासाठी पडती भूमिका घेऊन १९८९ मध्ये शिवसेनेशी युती केली. वास्तविक पाहता ही युती म्हणजे स्कूटरला पुढचे चाक स्कूटीच्या चाकाच्या आकाराचे व मागचे चाक मोटरसायकलच्या चाकाच्या आकाराचे अशी विपरीत जोड होती. शिवसेचेची १९६६ मध्ये स्थापना झाल्यावर १९८५ पर्यंत महाराष्ट्रात ५ वेळा विधानसभा निवडणुक झाली. यापैकी १९६८, १९७३, १९७८ व १९८० च्या निवडणुकीत शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता, तर १९८५ मध्ये फक्त १ आमदार निवडून आला होता. नाही म्हणायला १९६८ मध्ये मुंबईत कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांचा खून झाल्यावर (ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या समजली जाते व यात हत्येचा आरोप शिवसेनेवर होता) झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले होते. म्हणजे ५ विधानसभा निवडणुकीत फक्त २ आमदार ही शिवसेनेची कामगिरी. याउअट भाजपने आपल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या अवतारात १९७७ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत थोडेसे आमदार निवडून आणले होते. अगदी थोडे आमदार निवडून आणले असले तरी पक्षाचे अस्तित्व त्यातून दिसत होते. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसची मोठी लाट असतानासुद्धा भाजपने महाराष्ट्राने प. महाराष्ट्र वगळता इतर सर्व भागातून आपले एकूण १२ आमदार निवडून आणले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेला आधीच्या सर्व निवडणुकांप्रमाणे भोपळा मिळाला होता. मुंबई व ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे या भ्रमात अगदी सुरवातीपासून सेना होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे २ तुकडे झालेले होते. इंदिरा काँग्रेस व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटिल, यशवंतराव मोहिते इ. चा समावेश असलेल्या काँग्रेस नेत्यांची रेड्डी काँग्रेस असे दोन्ही तुकडे एकमेकांविरूद्ध लढले. केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेला जनता पक्ष हा तिसरा पक्ष निवडणुकीत होता. बहुसंख्य मते या ३ पक्षातच विभागली जाणार हे उघड होते. अशा परिस्थितीत आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या निदान मुंबई-ठाण्यात तरी सेनेला किमान १०-१२ ठिकाणी विजय मिळायला हवा होता. सेनेने एकूण ३५ उमेदवार उभे करून एकही आमदार निवडून आला नाही. सेनेला मुंबई-ठाण्यातील काही ठराविक वॉर्डांपलिकडे स्थान नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. परंतु ही वस्तुस्थिती सेनेने किंवा सेनेबद्दल सुरवातीपासूनच सॉफ्ट कॉर्नर असलेल्या मराठी माध्यमांनी कधीच उघडपणे मान्य केली नाही. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत देशभर इंदिरा गांधींची प्रचंड लाट होती. भारतातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल ३५५ मतदारसंघात इंदिरा काँग्रेसने विजय मिळविला होता. महाराष्ट्रात सुद्धा इंदिरा काँग्रेसला ४८ पैकी ३९ जागी विजय मिळाला होता. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून शिवसेनेला मुंबईतील २ जागा सोडल्या होत्या. महाराष्ट्रात व देशात इंदिरा गांधींची प्रचंड लाट असताना व याच पक्षाबरोबर युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुक लढविणार्‍या सेनेने मुंबईतील दोन्ही जागा खरं तर मोठ्या मताधिक्याने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही जागांवर सेनेचा पराभव झाला. मुंबईत फक्त आपलाच आवाज चालतो व मुंबई हा आमचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा भ्रम पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. शिवसेनेने १९७३ मध्ये ठाणे महापालिकेत सत्ता मिळविली होती व नंतर १९७४ मध्ये मुंबईत सत्ता मिळविली होती. ती सत्ता अर्थातच सेनेने पुढील निवडणुकीत गमावली. मुंबई-ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे हा भ्रम तेव्हापासूनच उराशी बाळगलेला आहे. मुंबई-ठाण्याच्या बाहेर तर सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. १९८५ मध्ये सुद्धा सेनेने स्वबळावर विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. परंतु माझगाव मधून निवडून आलेल्या छगन भुजबळांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर सेनेचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने जनता पक्ष, पवारांची समाजवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युतीत निवडणुक लढवून १६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला जरी युतीचा फायदा मिळाला होता तरी १९८० मध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावर इंदिरा काँग्रेसच्या लाटेत १२ आमदार निवडून आणले होते हे विसरता येणार नाही. एकंदरीत १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी आधीच्या निवडणुकीवरून जे चित्र दिसत होते ते असे होते की शिवसेनेला मुंबईत थोडेसे स्थान आहे तर भाजपला सेनेच्या तुलनेत मुंबईसकट इतर सर्व भागात जास्त जनाधार आहे. त्यामुळे युती होताना भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत हवा होता. परंतु १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या अनुभवावरून, प्रसंगी पडती भूमिका घेऊन, स्थानिक पक्षांशी युती करून आपला पक्षविस्तार करायचा असे पक्षाध्यक्ष अडवाणींनी ठरविले होते. त्या धोरणानुसार तामिळनाडूच्या धर्तीवर शिवसेनेशी युती करण्याचे ठरविले गेले. लोकसभेत भाजप ३२ व सेना १६ व विधानसभेत याच्या बरोबर उलटे जागावाटप असे ठरविले गेले. या युतीचे प्रमुख शिल्पकार होते बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन. विधानसभेसाठी भाजप १०५ व सेना १८३ असे विषम जागावाटप भाजपने का मान्य केले हे अनाकलनीय आहे. युतीत पहिल्यापासूनच शिवसेना दादागिरीच्या भूमिकेत होती. आपल्यापेक्षा सेनेचा जनाधार कमी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा भाजपने दुय्यम भूमिका का स्वीकारली हे एक गूढच आहे. सेनेने फारशी शक्ती नसूनसुद्धा २८८ जागांमधील मोठा वाटा मिळविला व त्याचबरोबरीने भाजपने जोपासलेले व बांधलेले काही मतदारसंघ घशात घातले. १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला. सेनेने जसा शिवाजीनगर ढापला तसाच ठाणे व कल्याणही ढापला. शिवसेनेची ही ढापाढापी २००९ पर्यंत सुरु होती. २००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्‍या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला. भाजप नेते, आधी महाजन, नंतर मुंडे व गडकरी असहायपणे सेनेसमोर मान तुकवित होते. यात बदल झाला तो एकदम २०१४ मध्ये. २०१३ मध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यावर त्यांनी सेनेची दादागिरी मोडून काढण्याचे ठरविले. समान जागावाटप होत असेल तरच युती नाहीतर स्वबळावर लढण्याची ताठर भूमिका घेऊन सेनेसमोर नमते घेण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात आपणच भारी हा भ्रम तोपर्यंत सेनेच्या मनात ठाम रूजला होता. त्यामुळे सेनेनेही नमते घेण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणुक लढविली. शेवटी भाजपने १२२ जागा जिंकताना सेनेला फक्त ६३ जागाच जिंकता आल्या व महाराष्ट्रात कोण भारी यावर शिक्कामोर्तब झाले. तसेही यापूर्वीच्या सर्व निवडणुकात भाजपचा स्ट्राईक रेट हा कायमच सेनेपेक्षा जास्त होता. १९९० मध्ये भाजप १०५ पैकी ४२ तर सेना १८३ पैकी ५२, १९९५ मध्ये भाजप ६५ तर सेना ७३, १९९९ मध्ये भाजप ५६ सेना ६९, २००४ मध्ये भाजप ५४ सेना ६२ अशी परिस्थिती होती. भाजपपेक्षा किमान ५० जागा जास्त लढवूनसुद्धा सेनेला भाजपपेक्षा जेमतेम ८-१० जास्त मिळायच्या. २००९ मध्ये तर भाजपने ११९ जागा लढवून ४६ जागा जिंकल्या तर सेनेने तब्बल १६९ जागा लढवून फक्त ४४ जागाच जिंकल्या. चित्र अगदी स्पष्ट होते. परंतु स्वत:च्या ताकदीच्या भ्रमात गर्क असणार्‍या सेनेची वस्तुस्थिती मान्य करण्याची तयारी नव्हती. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी ६ जागा मनसेने, ५ सेनेने व ४ भाजपने जिंकल्या होत्या (भाजपने अर्थातच सेनेपेक्षा खूप कमी जागा लढविल्या होत्या). सेनेचे मुख्यालय 'मातोश्री' ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात सुद्धा सेनेचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजप व सेना या दोघांनीही स्वतंत्र लढून अनुक्रमे १५ व १४ जागा जिंकल्या. भाजप सेनेपेक्षा मुंबईत सुद्धा जास्त ताकदवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशा परिस्थितीत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत युती करायची असेल तर आम्ही ११४ जागा व सेना ११३ जागा ही भाजपची मागणी योग्यच होती. परंतु याहीवेळी सेनेने अहंकार व वस्तुस्थिती मान्य न करण्याचा हेकेखोरपणा यामुळे हे वाटप मान्य केले नाही आणि आता शौर्याचा आव आणून युती स्वतःहून तोडण्याची घोषणा केली आहे. भाजपने सेनेबरोबर युती अजिबात करू नये किंवा केल्यास स्वतःच्या अटींवर करावी असे माझे पूर्वीपासूनच मत होते. त्यामुळे सेनेने स्वतःहून युती तोडल्यामुळे मला आनंद झाला आहे. माझ्या मते फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार्‍या ११ महापालिकांच्या निवडणुकीत खालील चित्र असेल. १) मुंबई: भाजप ८०-९०, शिवसेना ४०-५०, काँग्रेस ५०-६० २) ठाणे: मला ठाण्यातील फारशी माहिती नाही. परंतु इथे राष्ट्रवादीसुद्धा प्रबळ आहे. माझ्या मते ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. भाजप व सेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणे अवघड आहे. ३) पुणे: भाजप ६०-७० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. ४) नाशिकः भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना द्वितीय क्रमांकावर असेल. ५) पिंपरी-चिंचवडः राष्ट्रवादी काँगेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. ६) नागपूरः भाजपला बहुमत मिळेल. ७) अकोला: बहुजन महासंघ, काँग्रेस व भाजप या तीन पक्षात जोरदार चुरस असेल. ८) अमरावती: अमरावतीबद्दल फारशी माहिती नाही. ९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल. १०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल. ११) भिवंडी: फारशी माहिती नाही. भाजप महापालिका पातळीवर अजूनपर्यंत तरी कच्चा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील २१-२२ महापालिकांपैकी फक्त नागपूरमध्ये भाजप सत्तेवर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस प्रत्येकी ४-५ महापालिकेत सत्तेवर आहेत. नाशिकमध्ये मनसे, वसई-पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी, अकोल्यात बहुजन महासंघ, कोल्हापूरमध्ये स्थानिक आघाडी सत्तेवर आहेत. २०१७ मध्ये भाजप नागपूरव्यतिरिक्त पुणे, मुंबई व नाशिकमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकात सत्ता गमवावी लागेल. या दोन्ही महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू आहे व प्राणवायूचा पुरवठा बंद झाला की मृत्यु अटळ असतो. शेकाप, मनसे, मगोप अशा स्थानिक पक्षांप्रमाणेच शिवसेना देखील पूर्णपणे irrelevant होणार आहे. त्याची सुरूवात २०१४ मध्ये झाली, २०१७ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल व २०१९ मध्ये शिवसेना पूर्णपणे अस्तित्वहीन झालेली असेल. निदान २०१७ च्या निकालानंतर तरी शिवसेनेच्या फुशारक्या व बढाया थांबाव्यात अशी अपेक्षा आहे. शिवसेना लगेचच फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेईल असे वाटत नाही. परंतु तशी चूक केल्यास चांगले काम करणारे सरकार अस्थिर केल्याचा व मध्यावधी निवडणुकीचा दोष शिवसेनेच्या माथ्यावर येऊन त्यांना किंमत द्यावी लागेल.
वर्गीकरण
राजकारण महाराष्ट्र भाजप शिवसेना युती

प्रतिक्रिया द्या
39210 वाचन

💬 प्रतिसाद (226)
श
श्रीगुरुजी Sun, 01/29/2017 - 16:22 नवीन
अमित शहा किंवा मोदी यांच्यावर शिवसेनेने केलेली टीका झोंबली वगैरे असे काहीही नाही. शिवसेना आपल्याविरूद्ध असलेल्या प्रत्येकावरच अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करते. यापूर्वी भुजबळ आणि राणे यांच्यावरही बाळासाहेबांनी अत्यंत अर्वाच्य शब्दात टीका केली होती. मोदींनाही यापूर्वी आदिलशहा, अफझलखान इ. विशेषणे लावली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ज
जानु Sun, 01/29/2017 - 14:54 नवीन
बाळा नांदगावकर मातोश्रीवर दाखल झालेत. सेना मनसे एकत्र येण्याची हवासुध्दा भाजपासाठी धोक्याची घंटा ठरेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 01/29/2017 - 15:02 नवीन
कोणीही एकत्र येवो, वा दूर राहो, अंतिमतः भरडला जाणार तो सामान्य नागरिकांच्या समस्यांचा प्रश्नच. आता सगळे एकमेकांवर चिखलफेक करत प्रचार गाजवणार, खरे प्रश्न बाजूला राहणार. मुंबईत कोण जिंकणार ते माहित नाही पण हरणार ते मतदार. कारण बहुमत कोणालाच मिळणार नाही आणि ज्यांना आजवर शिव्या दिल्या त्यांनाच मिठ्या मारत लोकशाहीच्या नावाचा जागर करत सत्तास्थापना होणार. मुंबईकरांचे हाल मागच्या पानावरुन पुढे चालू राहणार. केंद्रात, राज्यात आणि अगदी मुंबैतही सत्ता असून भाजपने मुंबैसाठी नक्की काय केलंय हा प्रश्न विचारला जावा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
श
श्रीगुरुजी Sun, 01/29/2017 - 16:16 नवीन
सेना मनसे एकत्र येणे ही भाजपसाठी नसून सेनेसाठी धोक्याची घंटा ठरेल. मनसे हा शेवटची घरघर लागलेला पक्ष आहे. एका वृत्तानुसार मनसेने स्वतः ५० व सेना १७७ असे सूत्र दिले आहे. सेनेबरोबर येण्याने मनसेला धुगधुगी मिळून मनसेचे मरण पुढे ढकलले जाईल व सेनेविरूद्ध मराठी मतांमध्ये एक वाटेकरी उभा राहील. राज ठाकरे अत्यंत अविश्वासार्ह आहेत. स्थापना झाल्यावर सुरवातीला ते काँग्रेसला मदत करीत होते. २००९ मध्ये सेना-भाजप युतीचे अनेक उमेदवार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे महत्कार्य त्यांनी पार पाडल्यावर काँग्रेसला असलेली त्यांची गरज संपली. त्यांनी नंतर ठाणे व कल्याण डोंबिवलीमध्ये सेनेला साथ दिली. नंतर नाशिकमध्ये सुरवातीला भाजपचा पाठिंबा घेतला व नंतर राष्ट्रवादीचा घेतला. नंतर त्यांनी नगर व पुण्यात राष्ट्रवादीला साथ दिली. म्हणजे सर्व चार प्रमुख पक्षांबरोबर त्यांची चुंबाचुंबी होऊन गेली आहे. त्यांच्या या धरसोड भूमिकेमुळे मतदारांनी त्यांच्या पक्षाला कचरापेटीत फेकून दिले. नुकत्याच झालेला नगरपरीषद निवडणुकीत अंदाजे ४७०० नगरसेवकांपैकी मनसेला ४७ पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आपल्याला आता महाराष्ट्रात स्थान राहिलेले नाही हे ओळखून ते आता स्वत:हून सेनेकडे जायचा प्रयत्न करीत आहेत. सेनेबरोबर महापालिकेसाठी युती केली तरी मनसे भविष्यात सेनेच्याच बरोबर राहील असे नाही. मनसे पुन्हा उभारी धरणे सेनेसाठी तोट्याचे ठरेल. त्यामुळे विधानसभा व आता महापालिका निवडणुक एकट्याने लढविणे या दोन घोडचुका सेनेने केल्यानंतर मनसेशी हातमिळवणी करून मरणोसंपन्न मनसेला प्राणवायू पुरविणे ही सेनेची तिसरी घोडचूक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/29/2017 - 15:18 नवीन
महापालिका निवडणुकांमध्ये निकाल नेहमी स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर अवलंबून असतात. माझा स्वतःचा या निवडणुकांमधला इंटरेस्ट इतकाच की शिवसेना हरली पाहिजे. इतर कोणीही आले तरी घंटा काही फरक पडणार नसला (रस्त्यावरचे खड्डे तसेच राहिले, मुंबई दरवर्षी पावसात बंद पडली, नगरसेवकांच्या कृपेने अनधिकृत बांधकामे उभी राहिली, कंत्राटदारांना कंत्राटे मिळवायला टक्केवारी द्यावी लागली अशा बातम्या कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत) तरी इंटरेस्ट फक्त शिवसेना हरण्यामध्ये. उधोजीरावांच्या फुशारकीचा स्त्रोत बंद व्हायला हवा. तशाही महापालिका निवडणुका या विधानसभा किंवा लोकसभा या माझ्या इंटरेस्टच्या दोन्ही निवडणुकांमधील कल अजिबात दाखवत नाहीत. डिसेंबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी हत्येनंतर आलेल्या सहानुभूती लाटेत इतर सगळे पक्ष वाहून गेले. काँग्रेसने मुंबईतील लोकसभेच्या ६ पैकी ५ जागा जिंकल्या आणि १ जागा दत्ता सामंतांनी जिंकली. त्यानंतरच दोन-अडीच महिन्यात झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील ३४ पैकी २७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले, २ ठिकाणी भाजप, १ ठिकाणी शिवसेना आणि उरलेल्या ३ ठिकाणी (गिरणगावातील परळ, शिवडी आणि वरळी) दत्ता सामंतांचे सहकारी जिंकले. पण त्यानंतर दोनेक महिन्यात झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेने जवळपास बहुमत मिळवले. १९८६ मध्ये ठाण्यातूनही शिवसेनेलाच जवळपास बहुमत मिळाले होते. १९८५ मध्ये ठाणे आणि बेलापूर या विधानसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. १९९२ मध्ये मुंबईत शिवसेना भाजप युती नव्हती. त्यामुळे काँग्रेस रिपब्लिकन आघाडीला यश मिळवायला त्रास झाला नाही.पण त्याचवेळी ठाण्यात शिवसेना भाजप युती होती. १९९० मध्ये शिवसेनेने ठाणे आणि बेलापूर या दोन्ही विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता तरीही युती आणि काँग्रेस या दोघांनाही समसमान म्हणजे ३५ जागा मिळाल्या होत्या. युतीला बहुमत मिळविण्यात अपयश आले होते. १९९७ मध्ये मुंबईतील महापालिका निकाल १९९५ च्या विधानसभा आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे लागले पण वर्षभरातच १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला लोकसभेच्या ६ पैकी तीनच जागा जिंकता आल्या. त्यापैकी एक जागा होती मोहन रावलेंची दक्षिण मध्य मुंबई-- १५३ मतांनी जिंकलेली. आणि ती पण जनता दलाच्या शरद रावांनी ४० हजार मते घेतली म्हणून!! २००२ मध्ये परत शिवसेना भाजप युतीला यश मिळाले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसने मुंबईतील ६ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. राम नाईक, मनोहर जोशी या दिग्गजांचा मुंबईत पराभव झाला होता आणि गोविंदासारखाही लोकसभेवर निवडून गेला. २००७ आणि २००९ मध्येही महापालिका आणि लोकसभा-विधानसभा निकालांमध्ये कोरिलेशन नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/29/2017 - 15:42 नवीन
शिवसेना हरावी असे मनोमन वाटत असले तरी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला 'राईट ऑफ' करता येणार नाही. शेवटी महापालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकांबरोबर कनेक्ट महत्वाचा असतो. या दोन गोष्टींमध्ये शिवसेनेला मुंबईत इतर कोणताच पक्ष पुरा पडू शकणार नाही. अर्थातच शिवसेनेला स्वबळावर बहुमत वगैरे मिळणे फारच कठिण आहे.पण सर्वात मोठा पक्ष शिवसेना बनू शकेल आणि तसे झाल्यास उध्दव ठाकरेंची झाकली मूठच राहिल. वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे महापालिका निवडणुका आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकांच्या निकालात कोरिलेशन नसते. त्यामुळे महापालिकेत काय झाले त्यावरून २०१९ मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काय होईल याविषयी काहीही सांगता येत नसले तरी उध्दव ठाकरे मात्र सर्वात मोठा पक्ष झाल्यास 'जितं मया' असा दावा करतीलच. या निवडणुकांमध्ये काहीही झाले (अगदी शिवसेना दुसर्‍या नंबरला जरी गेली) तरी शिवसेनेला राज्य पातळीवरही 'राईट ऑफ' करता येणार नाही. म.गो.पक्ष कोसळला कारण त्यांचे आमदार काँग्रेसवासी व्हायला लागले. त्यामुळे लोकांपुढे चित्र उभे राहिले की म.गो.पक्षाला मत देणे म्हणजे मागच्या दाराने काँग्रेसलाच मत देणे. म्हणून काँग्रेसविरोधी मतदार भाजपकडे वळले आणि म.गो.पक्षाची जागा भाजपने व्यापली. तसे शिवसेनेत होत नाही तोपर्यंत अगदी कितीही irrelevant झाली तरी शिवसेना किमान २५-३० जागा तरी विधानसभेत जिंकतच राहिल. दुसरे म्हणजे सुरवातीला सगळे हेच म्हणत होते की शिवसेनेत नेते बाळासाहेबांविषयीच्या कृतज्ञतेमुळे राहतील पण बाळासाहेबांपश्चात उध्दव ठाकरेंना सगळा डोलारा टिकविणे कठिण जाईल आणि मनसेमध्ये जायला रिघ लागेल. तसे काही झाले नाही आणि राज जास्त आक्रमक वाटत असले आणि शिवसेनेची जागा मनसे व्यापेल असे कितीही बोलले जात असले तरी उध्दव ठाकरेंनी हा डोलारा व्यवस्थित सांभाळला आहे आणि उलट मनसेलाच हद्दपार व्हायची वेळ आली आहे हे श्रेय उध्दव ठाकरेंना द्यायलाच हवे.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Sun, 01/29/2017 - 15:46 नवीन
ट्रुमन आकड्याखाली स्वतःचा बायस लपवू नका. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 01/29/2017 - 16:16 नवीन
मला मुंबईत शिवसेना जिंकावी असे वाटत असले तरी त्यांना बहुमत मिळू नये असे मनोमन वाटते. जसे राज्यात भाजपवर चेक म्हणून मुंबईत शिवसेना असावी वाटते तसेच मुंबईत शिवसेनेच्या सत्तेवर कोणाचातरी चेक असावा. हा चेक मनसेचा ठरला तर खूपच उत्तम!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/29/2017 - 16:22 नवीन
अजून एक भाकित करतो. हे भाकित राजकारण्यांशी संबंधित नाही तर फेसबुक आणि इतर ठिकाणच्या बुबुडाविपुमाधविंविषयीचे आहे. २०१९ मध्ये शिवसेना भाजप--पक्षी मोदींविरूध्द निवडणुक लढविणार असल्यामुळे सगळे बुबुडाविपुमाधवि शिवसेना किती चांगली याचा घोषा लावतील (जसा घोषा त्यांनी २०१५ मध्ये लालू किती चांगला असा लावला होता) आणि irony शंभर मरणे मरेल :)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/29/2017 - 16:24 नवीन
गॅरी ट्रुमन,
अर्थातच शिवसेनेला स्वबळावर बहुमत वगैरे मिळणे फारच कठिण आहे.पण सर्वात मोठा पक्ष शिवसेना बनू शकेल आणि तसे झाल्यास उध्दव ठाकरेंची झाकली मूठच राहिल.
अगदी अचूक निदान. नेमकं हेच धोरण उद्धव ठाकरे पुढे रेटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सरकार चालवंत नसतात. म्हणूनंच या निवडणुकीत बहुमताची गरज नसते. सर्वात मोठा पक्ष महापौर/नगराध्यक्ष वगैरे निवडतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Sun, 01/29/2017 - 22:37 नवीन
१९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.
तुम्हाला कोथरूड मतदारसंघ म्हणायचे आहे का? मेधा कुलकर्णी कोथरूड मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी सेनेच्या मोकाटेंचा पराभव केला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 04:01 नवीन
बरोबर. २००९ पासून त्या मतदारसंघाचे नाव कोथरूड झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला
अ
अनुप ढेरे Mon, 01/30/2017 - 05:58 नवीन
शिवाजीनगरमध्ये विजय काळे आमदार आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 06:08 नवीन
अरे काय हे! जिथे राहतात खुद्द तिथलीही नीट माहिती नाही की काय अभ्यासू गुरुजींना? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 14:23 नवीन
शिवाजीनगरचे नाव कोथरूड झाले आहे व पाषाण, बाणेर इ. भाग असलेल्या मतदारसंघाचे नाव शिवाजीनगर केले आहे हे मला पूर्वीपासूनच माहिती आहे. हा बदल २००९ मध्ये झाला. वरील प्रतिसादात १९७७ पासूनचे संदर्भ असल्याने मी मुद्दामच कोथरूड नाव न घेता शिवाजीनगर नाव लिहिले होते. आणि अभ्यासाचंच म्हणाल तर २० लाख रूपये रोख घेऊन हिंडणार्‍या ट्रकचालकांच्या कहाण्या लिहिणार्‍या अभ्यासू व व्यासंगी सदस्यांपुढे आमचा अभ्यास म्हणजे किस झाड की पत्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साहेब.. Tue, 01/31/2017 - 05:27 नवीन
आणि अभ्यासाचंच म्हणाल तर २० लाख रूपये रोख घेऊन हिंडणार्‍या ट्रकचालकांच्या कहाण्या लिहिणार्‍या अभ्यासू व व्यासंगी सदस्यांपुढे आमचा अभ्यास म्हणजे किस झाड की पत्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/30/2017 - 06:14 नवीन
शिवाजीनगरमध्ये विजय काळे आमदार आहेत ना?
हो शिवाजीनगरमध्ये भाजपचे विजय काळे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विनायक निम्हण यांचा पराभव केला. हे विनायक निम्हण नारायण राणेंच्या निकटवर्तीयांपैकी होते. २००५ मध्ये राणे शिवसेनेबाहेर पडल्यानंतरही निम्हण शिवसेनेतच होते. पण २००९ मध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. या मतदारसंघात १९८० आणि १९८५ मध्ये भाजपचे अण्णा जोशी तर १९९० आणि १९९५ मध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार तसेच १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक निम्हण विजयी झाले होते. २०१४ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता आणि त्या उमेदवाराने आपले डिपॉझिटही गमावले होते. वास्तविकपणे युती करताना कोणताही पक्ष आपण मागच्या वेळेस जिंकलेली जागा सोडत नसतो. पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाच माहित असलेल्या कारणामुळे भाजपने हा मतदारसंघ १९९० मध्ये शिवसेनेसाठी सोडला आणि अण्णा जोशींना शिवाजीनगरहून कसबा पेठमधून उमेदवारी दिली गेली. ते १९९०-९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते.तर १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बबन ताम्बे Mon, 01/30/2017 - 13:55 नवीन
१९९१ मध्ये माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यात पवारसाहेबांनी संभाजीराव काकडेंना उभे केले, आणि कोंग्रेसची मते फोडली, ज्यामुळे विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव झाला आणि अण्णा जोशी विजयी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 14:09 नवीन
बरोबर. विठ्ठलराव गाडगीळ पवारविरोधी गटातले होते. त्यांना पाडण्यासाठी पवारांनी संभाजी काकडेंना जनता दलाच्या तिकिटावर उभे केले होते. १९८९ च्या निवडणुकीत अण्णा जोशींचा गाडगीळांविरूद्ध जेमतेम ८ हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. त्या लढतील तिसरा उमेदवार जनता दलाचे अतुर संगतानी यांना ५७ हजार मते मिळाली होती. त्यापूर्वी १९८४ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या मोहन धारियांना ५३ हजार मते मिळाली होती. म्हणजे जनता पक्ष/जनता दल यांची एकूण मते ६०००० च्या आतच होती. परंतु १९८९ नंतर लगेचच दीड वर्षात झालेल्या निवडणुकीत काकड्यांनी ८०००० मते घेतली. ही वरची २०-२२ हजार मते पवारांनी फिरविली होती. त्यामुळे गाडगीळ १६ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. अर्थात ते त्यापूर्वी लागोपाठ ३ वेळा निवडून आले होते. परंतु या पराभवानंतर काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व लयाला गेले. नंतर मे १९९३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव अनंत गाडगीळ पुण्यात आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रत्येक वेळी जोरदार प्रयत्न करतात. परंतु त्यांना पुण्यात हिंग लावून कोणी विचारत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/31/2017 - 12:16 नवीन
ण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाच माहित असलेल्या कारणामुळे भाजपने हा मतदारसंघ १९९० मध्ये शिवसेनेसाठी सोडला आणि अण्णा जोशींना शिवाजीनगरहून कसबा पेठमधून उमेदवारी दिली गेली. याचे कारण युती मजबूत करणे हे होते. आण्णा जोशी खासदारकी ला उभे राहील्यावर शशिकांत सुतारांनी त्यांची (शिवसेनेची, कारण शशिकांत सुतार हे पुण्यात शिवसेना स्थापनेपासून कार्यरत असलेले व प्रभावशाली व्यक्तिमत्व होते) संपूर्ण ताकद आण्णांच्या पाठीशी उभी केली. त्या बदलात आण्णांच्या आग्रहामुळे हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. सुतार इथूनच निवडून जाऊन पुण्याचे पालकमंत्री व कृषि राज्यमंत्री झाले होते. नंतर शिवसेनेतल्या अंतर्गत कलहातून आण्णा हजारे प्रकरण उद्भवले व सुतार सक्रीय राजकारणातून बाहेर पडले. त्यानंतर ते कधीच कुठल्याही निवडणूकीत उभे राहीले नाहीत. परंतु शिवसेनेने मात्र हा मतदार संघ आपला असल्याच्या मिजाशीत आपल्याकडे ठेवला व हिंदुत्ववादी असलेलि कोथरूडकर जनता युतीमुळे मोकाटेंना मत देत राहीली. जेव्हा २०१५ ला संधी मिळाली तेह्वा सर्वांनी भाजपाला मत देऊन हा मतदारसंघ भाजपाचाच आहे हे सिद्ध केले. शशिकांत सुतारांचे काम आणि जनसंपर्क दांडगा असला तरी जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा देखील सुतारांची पत्नी सौ. रसिका सुतार ह्या महानगरपालीका निवडणूकीत कोथरूड डेपो मतदार संघातून सुबराव कदम (काँग्रेस) यांविरुद्ध पडल्या होत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/31/2017 - 12:21 नवीन
आण्णा जोशींचे दुर्दैव म्हणजे एकेकाळी पुण्यातल्या भाजपाचे चेहरा असलेले आण्णा जोशी २००९ च्या निवडणूकीत कोथरुड मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढून दणदणीत पडले. युतीमुळे मोकटे निवडून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/30/2017 - 05:27 नवीन
आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही,
असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/30/2017 - 08:37 नवीन
गॅरी ट्रुमन, अहो असं कसं म्हणता तुम्ही! आत्तापर्यंत भाजपवाले भिकेचे कटोरे घेऊन शिवसेनेच्या दारात उभे होते. तसलं काही शिवसेना करणार नाही, इतकाच उद्धवोक्तीचा आशय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 14:14 नवीन
असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?
"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले. फडणविसांनी अर्थातच ही "विनंती" धुडकावून लावली. हे खरे असेल तर हा भिकेचा कटोराच म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 14:20 नवीन
"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले.
हे कुठे वाचले ह्याचा संदर्भ व ते खरे असल्याचा पुरावा द्याल काय.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Mon, 01/30/2017 - 14:47 नवीन
मुंबईतही तुम्हाला जागा वाढवून पाहिजेत त्यातही तडजोड नको चर्चेची भूमिका नको पारदर्शकता वर असून बसलात ज्या सत्तेत आपण होतात तिथेच चिखलफेक केलीत वाजपेयींच्या काळात आम्ही सरकार चालावा म्हणून तडजोड केली होती जयललिता आणि ममता बॅनर्जींमुळे . कारण त्यावेळी युतीत असलेले उत्तम संबंध आणि नेते . असा एकंदरीत पूर्ण आशय होता त्या वाक्याचा . पण सोयीस्कर वाक्य तोडलं आणि लिहिलं. अजूनपर्यंत भाजपचा भ्रष्टाचार किंवा नोटबंदी किंवा पालिकेत का राहिलात ,३ वर्ष गृहमंत्री पद आहे तरी का बघत बसलात , खडसेंच्या राजीनामा का घ्यावा लागला अश्या अनेक प्रश्नाचा उत्तर भाजपसमर्थकांकडे नाही . मुंबईत शिवसेना हरावी आणि उद्धव ठाकरे कसे चुकले यासाठी फक्त इच्छुक आहेत भाजपसमर्थक .वर कारभार बदलणार नाहीये पण सांगत आहेत . .तर्कसंगती छान आहे . भाजपच्या प्रभावाचा पण तसेच . जाऊदे भाजप चे पूर्वीचे नेते चुकीचे होते त्यांनीच ठरवलंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 15:57 नवीन
He leader said while Sena made the announcement that it was calling off talks for a BMC poll alliance on January 26, none other than Uddhav Thackeray had given indications to the CM on the possibility of such an outcome when he spoke to him a fortnight ago. "Uddhav made it clear to the CM, he said let BJP rule India and Maharashtra, but leave Mumbai for Shiv Sena. We were not surprised by the decision,'' he said. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bmc-polls-2017-uddhav-thackeray-seeks-to-boost-own-image-in-shiv-sena-by-going-alone/articleshow/56826116.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वरुण मोहिते Mon, 01/30/2017 - 16:25 नवीन
मी बाकीची पार्श्वभूमी सांगितली त्या वाक्याची . दोन्हीकडे शिवसेना पण सत्तेत आहे जितका त्यांना वाटा मिळायला हवा तितका मिळाला आहे . त्यामुळे मुंबई सोडा म्हणून कुठला दुसरा पक्ष ऐकेल का आणि कोणी असे सांगेल का सेनेलाही माहित आहे कदाचित भाजपाची गरज लागेल आणि भाजप लाही . प्रश्न केव्हा उद्भवला जेव्हा सत्तेत असून माफियाराज वैग्रे बाता चालू झाल्या . कारण सरळ आहे पैसा. शेलार आणि सोमैय्या काय आहेत सगळ्यांना माहित आहे . सोमैय्यांना तर आमच्या इथे कोण विचारातही नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माझीही शॅम्पेन Mon, 01/30/2017 - 08:41 नवीन
बाकीच्याच काय व्हायच ते होवो , पण ही निवडणूक ही सेने साठी धोक्याची घंटा आहे हे नक्की , कारण 1) इतके वर्ष सतत निवडून देऊन ही ठाणे आणि मुंबई ह्यांची खस्ता हालात , आता वेगळे लढल्याने सहज सेनेवर त्याच खापर फुट्नार 2) सेनेला जर का ह्या वेळेस भाजपा वेगळी लढली तर अमराठी मत जी खूप प्रमाणात आहेत मुंबई मध्ये ती मिळन दुरपस्त आहे 3) मोदी ह्यांचा करिश्मा आज ही कायम आहे , भाजपा जर सेनेला समर्थ पर्याय म्हणून उभा राहिला तर सेनेची पंचायत होऊ शकते 4) फडणविस हे मुख्यमंत्री म्हणून जर ठाणे / मुंबई कारांसाठी ठोस आश्वासन देऊ शकले (जस की टोल बंद / कमी करू वैगरे) तर शेवटच्या क्षणी मतांचा स्विंग भाजपा कडे झुकु शकतो 5) अनेक धर सोड धोरणांमुळे उध्धव ठाकरे ह्यांच नेतृत्व फडणविस ह्यांच्या पेक्षा थोडस कमी अपीलिंग आहे माझ्या मते मुंबईत भाजप प्रथम असेल आणि ठाण्यात निसटत्या फरकाने सेना पुढे असेल , जे काही होईल त्याचे परिणाम राज्याच्या राज करणावर दूरगामी असतील , जर सेनेच पानिपत झाल तर मात्र सेना पक्ष फुटू पण शकेल (शक्यता फार कमी आहे)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/30/2017 - 11:05 नवीन
बाकीच्याच काय व्हायच ते होवो , पण ही निवडणूक ही सेने साठी धोक्याची घंटा आहे हे नक्की
असे व्हावे हे फार फार वाटते. पण ते होईलच याची खात्री मात्र वाटत नाही. निवडणुका आल्यावर मराठीचे पंचवार्षिक उमाळे आणि इतर वेळी कमालीची अकार्यक्षमता, एकीकडे बोलताना समाजकारणाचा जप करायचा पण दुसरीकडे गुंडगिरी करायची असल्या सेनेचा पराभव व्हावा असे फार वाटत असले तरी तो होईल का याविषयी मात्र साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
क
कपिलमुनी Mon, 01/30/2017 - 10:51 नवीन
मुख्यमंत्रीच राष्ट्रवादीमधे ?? Image removed. पिंचिमधे ज्या प्रकारे सगळ्या भ्रष्ट लोकांना पावन करुन भाजपामधे घेणे चालले आहे ते बघता भाजपाला कोणतेही नितीचे सोयरसुतक नाही. विलास लांडे वगळता सर्व राष्ट्रवादीचे नेते भाजपमधे आले आहेत. ईतक्या मोठ्या प्रमाणात आयात करून भाजप निवडनूक जिंकेल पण निवडून भ्रष्टवादीच येतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 11:15 नवीन
=)) =)) महिन्याभरापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी आणी पवारांविरुद्ध चालणारी इथली मुलूखमैदान तोफ गळून पडल्यासारखी शांत बसली आहे आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 01/30/2017 - 11:40 नवीन
काँग्रेस राष्ट्रवादी वाईट आहेतच पण सेना भाजपा त्याच वाटेवर आहेत. सेनेला खंडणीखोर म्हणणारे भाजपाचाच मुख्यमंत्री \ गृहमंत्री आहे ना ? मग टाका ना जेलमधे ! 25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान होता पण सत्तेमधे वाटेकरी होताच ना ? मुंबईचा नुकसान होताना विरोध का केला नाहीत ? निवडणूकीच्या तोंडावर एकमेकांवर आरोप करून सेना - भाजपा स्वतःची सामान्य मतदारांमधील विश्वासार्हता घालवत आहेत.आज सेना जात्यात असेल तर भाजपा सुपात आहे. आयारामांनी निवडणूका जिंकल्या तरी कार्यकर्ता / पारंपारीक मतदार दुरावतोच . भाजपा मुंबईमधे आला तर फार बदल घडणार नाही हे कडोंमपा च्या बातमीवरून लक्षात येत आहेच
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 11:57 नवीन
ते ६५०० कोटी मामाच्या घरुन येणार नाहीत हे आता कळले असावे... =)) कदाचित. संदर्भः https://sabrangindia.in/article/lucknow-rally-pointed-the-finger-at-pm-modi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/31/2017 - 12:40 नवीन
सबरंग इंडीया म्हणजे बूच बसलेल्या सेटलवाड बाईंचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अनुप ढेरे Tue, 01/31/2017 - 12:48 नवीन
बरोब्बर! ती लिंक पांचजन्य/ सामनाइतकी विश्वासार्ह मानावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ग
गामा पैलवान Wed, 02/01/2017 - 08:25 नवीन
हाहाहा! सामना वा पांचजन्यला आजून तरी बुच बसलेली नाहीये. वक्रोक्ती आवडली! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
संदीप डांगे Wed, 02/01/2017 - 08:39 नवीन
पेशवे, अनुप, लिन्क कोणाची आहे हे बघायचे की मोदी साहेब स्वतः काय म्हणाले ते बघायचं...? खाली विडियो बघून घ्यावा... माननीय मोदींजीच स्वमुखातून बोलले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Wed, 02/01/2017 - 10:35 नवीन
इथे नक्की इश्यू काय आहे? नक्की कोणत्या गोष्टीला विरोध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/01/2017 - 10:59 नवीन
ते मोदींना विचारा, तेच विरोध करत आहेत बॉ.... आता मोदींचे हिंदीही तुम्हाला समजत नसेल तर चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/02/2017 - 09:53 नवीन
मग करू देत ना विरोध. विरोध केला असला तरी नक्की इश्यू काय आह?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उपेक्षित Mon, 01/30/2017 - 11:55 नवीन
सर्वप्रथम लेख बराच एकांगी तसेच प्रचारकी झाला आहे हे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. आता गोची अशी आहे कि मी भाजपेयी होतो (२००५ पर्यंत तरी निदान) पण माझे आवडते वाजपेयी जस-जसे सक्रीय राजकारणातून कमी होत गेले तसे मी शिवसेनेला मत द्यायला सुरवात केली. मोदी कितीही चांगले काम करूदेत पण त्यांच्याबद्दल मनात १ अनामिक भीती सतत राहते कि हा माणूस संधी मिळाली तर नक्कीच हुकुमशहा होऊ शकतो. अमित शहा बद्दल न बोललेलेच बरे कारण एक मोदी समर्थक सोडले तर या माणसाचे काहीही योगदान नाही. राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा तर विधानसभेला मोदी लाट जिवंत असून देखील शिवसेनेने ६३ जागा जिंकून दाखवल्या हे सुद्धा काही कमी नाही, वरती गॅरी ट्रुमन व गुरुजी सतत बोलून दाखवत आहेत कि उद्धव फुशारक्या मारत आहेत फुशारक्या मारत आहेत मग मी त्यांना प्रश्न न कि भाजप चे नेते काय करत आहेत ? ते आशिष शेलार / किरीट सोमय्या ई. प्रभूती सतत शिवसेनेच्या खोड्या काढत आहेत. अगदी विधानसभेच्या निकालादिवशीपासून भाजपवाले राष्ट्रवादीच्या पाठींब्या बाबत स्पष्टपणे काही बोलत नाहीये असे का ? ज्या पवारांना भ्रष्ट, भ्रष्ट करत भाजप सत्तेपर्यंत पोहोचली आहे तिचाच पाठींबा आता भाजप ला आता चालणार आहे ? त्याच पवारांना आता हे पद्मविभूषण देत आहेत ? मग आमच्या सारख्या सामान्य लोकांनी काय समजावे ? साला मग ते उद्धव परवडले कि हो मला मान्य आहे कि मुंबई ची दुरवस्था व्हायला शिवसेना जबाबदार असेल पण मग या पापात भाजप देखील तितकाच वाटेकरी आहे असे नाही वाटत तुम्हाला? मनसे ला तर मी कधीच गृहीत धरले नव्हते कारण राज ठाकरे नामक स्वमग्न माणूस स्वतः सोबत आपल्या सहकार्यांचे देखील वाटोळे करत आहे. सध्या इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 12:01 नवीन
सहमत... लेखाचा उद्देश भाजपचा प्रचार करणे इतकाच आहे. संपादक असले धडधडीत प्रचारकी लेख मिसळपाववर राहू देतात याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 16:03 नवीन
२० लाख रूपये रोख घेऊन फिरणार्‍या ट्रकचालकांच्या सुरस कहाण्या असणारे लेख इथे प्रदर्शित होतात, आपण शय्यागृहात आनंदवृद्धीसाठी कोणती अतिरिक्त साधने वापरतो हे सांगणारे लेख प्रदर्शित होतात, मग याचे लेखाने काय घोडं मारलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 01/30/2017 - 16:26 नवीन
चला म्हणजे एका अर्थी तुम्ही मान्य करताय तर हा लेख भाजपच्या प्रचारासाठी लिहिलाय... हे ही नसे थोडके. माननीय संपादक-मालक, श्रीगुरुजी स्वतः कबूल करत आहेत की ते इथे भाजपचा प्रचार करायला लिहितात. बघा बुवा.... बाकी, ना माझा २० लाखाचे ट्रक घेऊन फिरायचा धंदा आहे ना संक्षींचा रिंगा विकायचा धंदा आहे... तसेच आम्ही दोघे वीस लाख घेऊन फिरणार्‍या ट्रकांची किंवा रिगांची भलामण करायला सतत धागेही काढत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/30/2017 - 16:42 नवीन
नेहमीप्रमाणेच स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे. माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा. तुम्हाला जो धागा प्रचारकी वाटतो तो संपादक का चालून देतात असा तुमचा आक्षेप आहे. तुम्हाला मी वर उल्लेखलेले इतर धागे चालतात तर या धाग्यावर आक्षेप का असे मी विचारले आहे. माझ्या या प्रतिसादावर लगेच स्वत:ला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे. तुमचा किंवा त्यांचा कसला धंदा आहे त्याच्याशी मला अजिबात घेणंदेणं नाही. तुमचे धंदे तुम्हालाच लखलाभ. तुम्ही ते फालतू धागे काढले ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/30/2017 - 12:01 नवीन
मी गेल्या काही दिवसात लिहिलेले महापालिका निवडणुकांविषयीच्या सर्व चर्चांमधले प्रतिसाद वाचून मगच असे काही लिहा असे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Mon, 01/30/2017 - 12:36 नवीन
गॅरीभाऊ आपला अभ्यासूपणाचा आणि आपल्या राजकीय लेखांचा इथे असलेल्यांपैकी मी एक चाहता आहे आणि आपल्याबद्दल आदरअसून देखील वरील प्रतिसाद मी लिहिला आहे. वरती मी काही मुद्दे मांडायचा प्रयत्न केला पण तुमच्याकडून १हि मुद्द्याचे उत्तर आलेले नाहीये (गुरुजींकडून तशीही अपेक्षा नाहीये मला हे स्पष्ट करतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/30/2017 - 12:42 नवीन
एकाही मुद्द्याचे उत्तर आलेले नाही याचे कारण या मुद्द्यांविषयी मी आधीच लिहिलेले आहे. शिवसेना जावी. सत्ता गेली तरी चालेल पण तिथे राष्ट्रवादी नको आणि तसे झाल्यास विधानसभा निवडणुकांमध्ये माझे मत भाजपला नसेल हे गेल्या दोन-तीन दिवसात कुठल्यातरी चर्चेत स्पष्टपणे लिहिलेले आहे. दुसरे म्हणजे महापालिका पातळीवर कोण सत्तेत येतो त्यामुळे खरोखरच काहीही फरक पडत नाही. रस्त्यावरचे खड्डे, अनधिकृत बांधकामे वगैरे गोष्टी कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत त्यामुळे माझा या निवडणुकांमधला इंटरेस्ट फक्त शिवसेना पराभूत व्हावी इतकाच हे पण लिहिलेले आहे. त्यामुळे तुमच्या मुद्यांविषयी नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Mon, 01/30/2017 - 13:06 नवीन
तुम्ही या मुद्द्यावर आधी काय लिहिले आहे आणि कोणत्या संदर्भाला धरून लिहिले आहे ते मी वाचलेले नाहीये सो मला ते माहित नाहीये आणि नवीन धाग्यावर चर्चा नव्याने चालू झालेली आहे तुम्ही प्रतिसाद देत आहात तर हे म्हणणे सयुक्तिक नाहीये कि मी आधी दुसरीकडे यावर चर्चा केली आहे तर आता नाही करणार. हे बरोबर नव्ह देवा.... हि सरळसरळ पळवाट झाली... बाकी तुम्हाला शिवसेना हरलेली बघायची आहे हे समजले आहे पण ते का याचे नित उत्तर अजून आलेले नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा