पाककृती

बाप्पाचा नैवेद्यः ऐरोळ्या

Primary tabs

ऐरोळ्या:

साहित्यः

बेसन एक वाटी
कणीक अर्धी वाटी
तांदूळ अर्धी वाटी
अर्ध्या नारळाचं दूध
साखर एक वाटी
साजूक तूप मोहन आणि तळणीसाठी
वेलदोडे पूड
सजावटीला बदाम पिस्त्याचे काप
चिमूटभर मीठ (ऐच्छिक)
.
1
.
.

कृती:

बेसन, कणीक, तांदूळ पिठी चाळून एकत्र मिसळावी.
त्यात १ टेबलस्पून तूप तापवून मोहन घालावं. मोहन मिश्रणाला सगळीकडे एकसारखं लागलं की त्यात आधी नारळाचं घट्ट दूध मिसळावं, आणि नंतर मग पातळ दूध मिसळून भज्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट भिजवावं.
नंतर कढईत तूप तापत ठेवून चमच्याने हे मिश्ररण सोडून ऐरोळ्या मंद आचेवर खरपूस तळाव्यात.
साखरेचा गुलाबजामच्या पाकापेक्षा जरा घट्ट पाक करुन ठेवावा त्यात वेलदोडे पूड घालावी आणि खायला द्यायच्या पंधरा मिनिटं आधी ऐरोळ्या पाकात घालाव्यात. खायला देताना बदाम पिस्त्याचे काप पेरावेत.

.
1
.

(*मी वाचलेल्या पारंपारिक पद्धतीत तयार सरसरीत पीठातच सुका मेवा आणि पीठीसाखर घालून मग ते तळतात. मी हा थोडा बदल केला आहे.)

पद्मावति

आहा!! सुपर्ब दिसताहेत. अगदी अनोखी पाकक्रुती.

पुंबा

कातील दिसताहेत ऐरोळ्या..
पटकन उचलून तोंडात टाकाव्याशा वाटताहेत..

पैसा

_/\_ शि.सा.न. तुला. सगळ्या बायकांना तू स्वयंपाकाच्या बाबत कॉम्प्लेक्स देऊ शकतोस. ही पारंपरिक मस्त पाकृ आहे. आणि करून बघावी असे वाटायला लागले आहे.

सस्नेह

भारीच की !
ते तेवढं चमच्यानं तेलात सोडतानाचा फोटो बरीक टाकला असतास तर पिठाचं टेकस्चर आणि हा शेप कसा आला ते नीट समजलं असतं :)

रेवती

भारी पाकृ. याबद्दल आधी फक्त ऐकले होते. आता पहायला मिळाले. फोटू गोड आलेत.

पिंगू

ऐरोळी ही पाककृती खूप जुनी पाककृती आहे, हे ऐकून होतो. आज बघितली..

सूड पाय कुठे आहेत रे तुझे...

सविता००१

किती सुरेख. आता नक्की करुन पाहीन.
पीठ तुपात सोडताना चमचा उभा धरला होतास का रे? मस्त एकावर एक लेअर आलेत. अगदी सावकाश सोड्लं आहेस वाटतं पीठ

सूड

पीठाची सलग तार येईल ईतपतच पातळ करायचं, अगदी डोशाच्या पीठाइतकं पातळ करायचं नाही. आच मंद असल्याने तूप तापलेलं असलं तरी अगदी खदखदत नसतं. त्यामुळे चमच्याने अलगद सोडायला सुरुवात करायची आणि चमच्यातलं पीठ संपेस्तवर तिथल्या तिथेच किंचित गोलाकार फिरवल्यासारखं करत राहायचं मग असे वेटोळे येतात. नंतर पुन्हा कधी केल्या तर करतानाचे पण एकदोन फोटो टाकेन.

ते करच. कारण मला नीटसं कळालेलं नाहीये की कसं केलं. फार पेशन्सचं काम दिसतंय!

मस्तच दिसत आहेत.
ह्या वर्षी पारंपरिक, अनवट प्रसाद येत आहेत बाप्पा करता हे बघून छान वाटते आहे.
स्वाती

स्रुजा

सुंदर दिसतायेत . फोटो बघुन आधी पाकातले चिरोटे वाटले. करुन बघेन नक्की.

अनन्न्या

फार निगुतीने केलेला पदार्थ आहे, करून पहावा असा! अप्रतिम!

केडी

छान आणि वेगळा प्रकार, मी स्वतः गोड खात नाही, पण मुलांसाठी म्हणून करेन एकदा..

ऐरोळ्या खूपचं सुरेख दिसत आहेत.
गुलाबासारखा आकार आला आहे ++११
सूडची पाकृ म्हणजे प्रश्नचं नाही देखणी असणारच :)

स्पा

कातिल दिसतेय,गुरुदेव आम्हाला बी शिकवा की.

गम्मत-जम्मत

इतका गोंडस, नाजूक दिसणारा पदार्थ मोडून खायचा कसा!! अर्थात मी केला तर इतका सुबक न झाल्याने असा प्रश्न नाही पडणार म्हणा.. :D

निशाचर

सुरुवातीचं साहित्य वाचून वाटलं निनावं आहे कि काय.

सूड

निनावं नुसत्या डाळीच्या पीठाचं करतात ना?

निशाचर

डाळीचं पीठ जास्त असतं. पण गव्हाचं आणि तांदळाचं पीठही थोडंथोडं घेतात.

जुइ

अगदी नाविन्यपूर्ण पाकृ!! आवडली.