Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुलेट ट्रेन ( भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण

A
Anand More
Sun, 09/24/2017 - 16:38
💬 78 प्रतिसाद
अकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले. २०,००० लोकांनी २२ वर्षे काम करून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य यमुनेच्या तीरावर वसवले.
Courtesy  : Internet
१७२३ ला अॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्ववेत्त्याचा जन्म झाला. ऑक्सफोर्डमध्ये त्याच्या विचारांची गळचेपी होत होती म्हणून तो ग्लासगो विद्यापीठात शिक्षण पूर्ण करायला गेला. तिथेच तो प्राध्यापकही झाला. १७५९ मध्ये त्याने लिहिलेलं 'द थिअरी ऑफ मॉरल सेंटीमेंट्स (The Theory of Moral Sentiments)' नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यामुळे तो युरोपमध्ये प्रसिद्ध झाला. १७७६ मध्ये ज्यामुळे त्याला 'आधुनिक अर्थशास्त्राचा जनक' मानले जाऊ लागलं ते दुसरं पुस्तक प्रसिद्ध झालं.. त्या पुस्तकाचं नाव होतं, 'अँन एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स (An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations)'. हे पुस्तक त्याच्या 'वेल्थ ऑफ नेशन्स' या छोट्या नावाने जगप्रसिद्ध आहे.
Courtesy : Internet
अॅडम स्मिथच्या आधी युरोपमध्ये देखील शहाजहान सारख्या राजांची चलती होती. संपत्ती म्हणजे सोने, नाणे हाच विचार युरोपमध्ये फोफावला होता. खोलवर रुजला होता. पण अॅडम स्मिथने या सगळ्याला धक्का दिला आणि ठामपणे सांगितले की देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या त्या वस्तू आणि सेवा ज्यांची संपूर्ण जगात मागणी आहे. त्याच्या दृष्टीने जग म्हणजे एक बाजारपेठ होती. ज्यात वेगवेगळे समूह आपापली उत्पादने विक्रीस घेऊन येत होते. या खरेदी विक्रीस राजे राजवाड्यांचा, 'संपत्ती म्हणजे सोने नाणे' हा विचार आडवा येत होता. कारण आयात केली की सोने नाणे द्यावे लागते म्हणजे राष्ट्राची संपत्ती कमी होते, या विचाराने सर्व देश आयाती विरुद्ध निर्बंध घालून होते. आणि अॅडम स्मिथचे विचार तर अनिर्बंध बाजाराची मागणी करत होते. तो अनिर्बंध व्यापाराचा, मुक्त अर्थव्यवस्थेचा आणि 'लेझे फेअर' सरकारचा इतका कट्टर समर्थक होता की त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीला कडवा विरोध केला आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अमेरिकन वसाहती बरोबर असून इंग्लड सरकारचे चुकते आहे असे मत त्याने मांडले.
Courtesy : Internet
(लेझे फेअर सरकार म्हणजे अर्थव्यवस्थेत ढवळाढवळ न करणारे सरकार. अॅडम स्मिथच्या मते सरकारचे काम केवळ कायदे करणे आणि त्याची अमबजावणी करणे इतकेच असावे. स्वतः बाजारात उतरणे, किंवा कुणाला मक्तेदारी अथवा विशेषाधिकार देऊन अर्थव्यवस्थेला एका दिशेला झुकवणे हे सरकारचे काम नाही) त्याच इंग्लंडमध्ये १८८३ ला अजून एका अर्थतज्ञाचा जन्म झाला. पहिल्या महायुद्धानंतर पराभूत जर्मनीवर लादलेल्या अटी जाचक आहेत आणि यात पुढील काळासाठी अशांतीची बीजे रोवलेली आहेत असे ठामपणाने सांगणारा आणि १९२९च्या आर्थिक मंदीतून जगाला बाहेर पडण्याचा एक रस्ता दाखवणारा हा ब्रिटिश अर्थतज्ञ म्हणजे 'जॉन मेनार्ड केन्स'. जेव्हा लोकांची खर्च करण्याची इच्छा कमी होते आणि पैसा साठवण्याकडे कल वाढतो तेव्हा खाजगी व्यवसायांना घरघर लागते. अश्यावेळी सरकारने बाजारात उतरावे आणि स्वतः गुंतवणूक करावी असा सल्ला त्याने दिला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचं म्हणजे, 'सरकारने छापील चलन बाटल्यांमध्ये भरावं, निरुपयोगी ठरलेल्या कोळशाच्या खाणीत त्या बाटल्या पुराव्यात, त्यावर शहरभरचा कचरा टाकून त्या बुजवाव्यात आणि मग लेझे फेअर तत्वाचा वापर करत बाजूला होऊन, त्या बाटल्या वर काढण्याचं काम खाजगी उद्योगांना द्यावं, म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल'.
Courtesy : Internet
यातला ब्रिटिश विनोद सोडला तर या उपायामागील महत्वाचे तत्व होते, अॅडम स्मिथने सांगितलेला लेझे फेअरचा मार्ग काही विशिष्ट परिस्थितीत योग्य आहे. सरकारने कायमस्वरूपी लेझे फेअर रहाणे अर्थव्यवस्थेसाठी हितावह नाही. जेव्हा समाजाचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उठतो तेव्हा तो परत आणण्यासाठी सरकारला बाजारात उतरणे क्रमप्राप्त असते. सरकारने असा रोजगार द्यावा की ज्यामुळे बाजारात नव्या वस्तू येणार नाहीत पण लोकांच्या हातात पैसा खेळता राहील. यातून बाजारात आधीपासून असलेल्या वस्तूंची मागणी वाढेल आणि खाजगी क्षेत्राला पुन्हा चालना मिळेल. सन १९०० पासून अमेरिकन सरकारने नेवाडाच्या वाळवंटात कोलोरॅडो नदीवर मोठा धरण प्रकल्प बांधण्याची योजना आखलेली होती. पण प्रकल्प रेंगाळत होता. १९२९ची आर्थिक मंदी आली. केन्सने 'पैसे बाटलीत घालून कोळशाच्या खाणीत पुरा आणि ते बाहेर काढणाऱ्या लोकांना तोच पगार द्या' चा उपाय सुचवला. आणि धरण बांधायला जणू तात्विक पाया मिळाला. १९३१ मध्ये कोलोरॅडो नदीवर जगप्रसिद्ध हूवर धरण बांधायला सुरवात झाली. २१,००० लोकांनी ७ वर्षे काम करून धरण बांधलं. हूवर धरण बांधायला अमेरिकन सरकारला कुणाकडूनही कर्ज मिळणार नव्हतं. आणि बहुतेक सरकारकडे शहाजहानइतका पैसाही नव्हता. म्हणून सरकारने स्वतःच हूवर धरण प्रकल्पाला कर्ज दिलं. १४० मिलियन डॉलर्सचं कर्ज. हूवर धरण प्रकल्पाने हे कर्ज ५० वर्षात फेडावं अशी अपेक्षा होती.
Courtesy : Internet
कर्ज फेडणार कसं? धरणाला उत्पन्न कुठलं? तर त्यावर एक जलविद्युत प्रकल्प उभारून तीन राज्यांना त्या विजेचा पुरवठा होणार होता. ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि नेवाडा.
Courtesy : Internet
कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूड बहरू लागलं. १९५५ मध्ये तिथे जगातील पहिलं डिस्नेलँड थीम पार्क बनलं आणि आता तर तिथे सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत.
Courtesy : Internet
नेवाडा म्हणजे वाळवंट. १९३१मध्ये अतिशय विरळ लोकसंख्या असलेलं राज्य. इथे वीज घेणार कोण? मग १९३१ला नेवाडामध्ये जुगार कायदेशीर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे संपूर्ण अमेरिकेत नेवाडा सोडून इतर राज्यांत जुगारप्रतिबंधक कायद्यांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे नेवाडातील लास वेगास ही अमेरिकेतल्या आणि जगातल्या जुगाऱ्यांची पंढरी बनली. वेश्याव्यसाय कायदेशीर असणारं नेवाडा हे अमेरिकेतील एकमेव राज्य आहे. लास वेगासमधले गर्दीने भरून वाहणारे कॅसिनो आणि तिथलं जगप्रसिद्ध नाईट लाईफ, काही अपवाद सोडल्यास रात्रभर हूवर धरणाच्या वीजप्रवाहावर लखलखत असतं. जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत परकीयांच्या पैशाची भर घालतं. त्याशिवाय नेवाडामध्ये वैयक्तिक उत्पन्नावर कर नाही आणि अप्रत्यक्ष कर अतिशय कमी आहेत. त्यामुळे सुरवातीला जरी बग्सी सीगल सारख्या कुख्यात गुंडांनी लास वेगासमध्ये गुंतवणूक केली असली तरी नंतर हॉवर्ड हयुजेससारख्या प्रतिष्ठित धनाढ्य लोकांनी लास वेगासमध्ये गुंतवणूक करून नेवाडाच्या अर्थव्यवस्थेत भर घातली. १९८७ मध्ये सरकारने दिलेलं कर्ज हूवर धरणाने फेडलं. तोपर्यंत तीन राज्यातील विजेचे ग्राहक आपापल्या वीजबिलातून दरवर्षी ३% दराने, ५.४० मिलियन डॉलर्स व्याज म्हणून भरत होते. कुणी म्हणेल अमेरिकन सरकारने हवेतून कर्ज निर्माण केलं. मी म्हणतो अमेरिकन सरकारने पुढील पिढ्यांकडून वस्तू आणि सेवा उत्पादन करून घेऊ अशी स्वतःच स्वतःला ग्वाही दिली आणि त्या भविष्यकालीन उत्पादनाच्या हमीवर धरणाला कर्ज दिलं. मग लोकांनी काम करावं, त्यांच्याकडील वस्तू आणि सेवा फक्त अमेरिकनांनीच नव्हे तर जगभरातील लोकांनी विकत घ्याव्यात म्हणून तसे नवे कायदे बनवले. तशी व्यवस्था बनवली. २०,००० लोकांनी २२ वर्ष खपून ताजमहाल बनवला. आपल्या सल्तनतीचा साठवलेला खजिना ज्यावर उधळला, तिकीट काढून त्याला बघायला पर्यटक येण्यासाठी जवळपास ३०० वर्षे जावी लागली. मुघलांचा खजिना ज्यामुळे रिकामा झाला त्या ताजमहालामुळे शहाजहानचे नाव इतिहासात अजरामर झाले पण त्याला किंवा त्याच्या वारसदारांना या तिकिटातून काहीही मिळणे अशक्य आहे. आग्र्याची अर्थव्यवस्था अजूनही जगात कुणाच्याही खिजगणतीत नाही. २१,००० लोकांनी ७ वर्ष खपून हूवर धरण बांधले. देशाने धरणाला दिलेल्या कर्जातून. देशाच्या जनतेकडून वसूल केलेल्या करातून नाही. व्याजासहित कर्ज तीन राज्यांकडून वसूल केलं. धरणाचे तंत्रज्ञान स्वतः तयार केले. त्याच्या विजेने हजारो घरे आणि कारखाने उजळले. चित्रपट बनले. नायक नायिकाच काय पण चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेकांची घरे वसली. डिस्नेलँड, आयटी कंपन्या यांनी जगभर करोडो रोजगार निर्माण केले आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला जगाच्या पुढे नेले. हॉटेल्स आणि टुरिझम विकसित करून नेवाडाच्या वाळवंटात ओऍसिस फुलवलं. वर उल्लेख केलेल्या दोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सारखी असली तरी प्रकल्पांची फलिते वेगवेगळी कशी काय झाली? कारण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा प्रकल्पामुळे नंतर कुठल्या वस्तू आणि सेवा तयार करण्यात येतील याबाबत अमेरिकन विचार स्पष्ट होते.
Courtesy : Internet
बुलेट ट्रेन प्रकल्पात देखील १६,००० ते २०,००० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. पण त्यामुळे वाढलेल्या वेगाने किती जणांचा काय फायदा होणार आहे त्याबाबत सरकारी पातळीवर कुठल्याही योजना मला दिसत नाही. मुंबई अहमदाबाद हा प्रभाग करमुक्त होणार आहे काय? बुलेट ट्रेनचा खर्च केवळ येथील लाभार्थी उचलणार आहेत काय? बुलेट ट्रेनमुळे इथे कुठले नवीन उद्योग उभे राहणार आहेत? त्यांना सरकार काय प्रोत्साहन देणार आहे? त्यामुळे जगभरातून या प्रदेशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांची मागणी कशी वाढणार आहे? त्यामुळे आपण परकीय चलन कसे कमावणार आहोत? याबाबत काही स्पष्ट योजना दिसत नसल्याने मला बुलेट ट्रेनचे स्वागत करताना छातीत थोडे धडधडते. मी बुलेट ट्रेनचे स्वागत करतो. खुल्या मनाने करतो. पण ते करत असताना भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकणार्‍या अनेक शक्यतांपैकी एक काळजी करण्याजोगी शक्यता मला दिसते. इथे कर्ज परदेशातून आहे. तंत्रज्ञान इतरांचे आहे. कर्ज परतफेड संपूर्ण देशाकडून जमा केलेल्या करातून होणार असे आता तरी वाटते आहे. प्रवासाच्या वाढलेल्या वेगामुळे ज्यांना प्रत्यक्ष लाभ होईल त्या लाभार्थींची संख्या सध्या तरी नजरेसमोर येत नाही. म्हणून केवळ बुलेट ट्रेनचे अवाजवी स्वागत करण्यापेक्षा, समाजमाध्यमांवर मित्रमंडळींशी लाथाळ्या खेळून, 'बाजारात तुरी' ही म्हण खरी करण्यापेक्षा, भविष्यातील अप्रिय शक्यता प्रत्यक्षात येऊ नये म्हणून मित्रांना तरी माझे मत विस्ताराने सांगावे असे मला वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच.
  • बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी
  • बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज
  • बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका
  • बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक
  • बुलेट ट्रेन (भाग ६)

Book traversal links for बुलेट ट्रेन ( भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण

  • बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी ›

प्रतिक्रिया द्या
61926 वाचन

💬 प्रतिसाद (78)
स
संग्राम Sun, 09/24/2017 - 17:55 नवीन
बुलेट ट्रेन गरजेची आहे आज ना उद्या पण मार्ग कदाचित दुसरा असू शकला असता
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 09/24/2017 - 17:59 नवीन
वा वा, छान लेख सर ! तुमचा लेख पाहून आनंद झाला.. . छान लिहिता. लिहिते जाहले मोरे, बहरले मिपाचे खोरे ।।
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 09/24/2017 - 18:04 नवीन
लेखमाला वाचून झाली आहेच. पण तुम्ही मिपावर लेख टाकलेत ह्याचा विशेष आनंद झाला. आता इथे उत्तम चर्चा वाचायला मिळेल.
  • Log in or register to post comments
A
Anand More Sun, 09/24/2017 - 18:20 नवीन
लिहिताना मिपाची आठवण येत होती पण वेळ कमी पडत असल्याने इथे टाकणे राहून जात होते. मिपावरची मंडळी अभ्यासू आहेत. त्यांची मतं वाचून माझ्या आकलनातही भर पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभिजीत अवलिया Sun, 09/24/2017 - 18:28 नवीन
लेख आवडला. बुलेट ट्रेन बद्दल तुम्हाला ज्या शंका आहेत त्याच मला देखील. मुंबई अहमदाबाद हा अंदाजे ५२५ किमीचा प्रवास सध्या देखील रेल्वेने ६ तासात पूर्ण होतो. तर खाजगी कार वा बसने देखील थोडाफार तितकाच वेळ लागतो. मुंबई ते अहमदाबाद विमानसेवा देखील उत्तम आहे. मग १लाख १० हजार कोटी रुपये खर्चाची बुलेट ट्रेन करून प्रवासाचे २ तास वाचवून नक्की काय मिळणार आहे? त्यापेक्षा हे पैसे वापरून देशातील सध्या अस्तित्वात असलेले नेटवर्क सक्षम आणि वेगवान केले असते तर जास्त फायदा झाला नसता का?
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील Mon, 09/25/2017 - 09:31 नवीन
खरंच या प्रकारच्या लेखामुळेच मिपा वाचनीय असतो, बरेसचे मुद्दे पटले. उदाहरण देऊन मुद्दा सांगायचा हे एकदम आवडेश
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/25/2017 - 14:51 नवीन
अभिजित अवलिया,
१लाख १० हजार कोटी रुपये खर्चाची बुलेट ट्रेन करून प्रवासाचे २ तास वाचवून नक्की काय मिळणार आहे?
माझ्याही मनात हाच प्रश्न आहे. माझ्या अंदाजानुसार हा केवळ पथदर्शी प्रकल्प आहे. एक प्रयोग म्हणून करून बघायला हरकत नाही. मुंबईत ५० उड्डाणपूल बांधायचा निर्णय घेतला होता तेव्हाही विरोध झाला होता. प्रत्यक्ष कामं सुरू झाल्यावर लोकांचे हाल आजूनंच वाढले. पण नंतर बरीच सोय झाली. बुट्रेचंही असंच होऊ शकतं. म्हणून थोड्या प्रमाणावर धोका पत्करायला हरकत नाही. पहिला धोका म्हणजे गाडी थेट बुडीतखाती जाण्याचा. जर मुंबई दिल्ली सेवा बघितली तर विमानप्रवास स्वस्त आणि अल्पकालीन पडतो. त्यामुळे बुट्रे सुरू करायची झाली तर ५०० किमीपेक्षा जास्त अंतराची सुरू करू नये. युरोपातदेखील अधिक लांबीचे मार्ग नाहीत. मात्र चीनमध्ये आहेत. तिथली गणितं वेगळी आहेत. चिन्यांनी बुट्रे लोहमार्ग बांधण्यात प्रावीण्य मिळवल्याचा दावा असून ते आपली बांधणीसेवा निर्यात करतात. भारतालाही करता येईल. दुसरी जोखीम आर्थिक आहे. अर्थात ती पत्करायची झाला तर तो जनतेच्या दृष्टीने कमीत कमी असावी. म्हणून या प्रकल्पात शासकीय गुंतवणूक किमान हवी असा माझा आग्रह आहे. खाजगी क्षेत्रास उतरायचं असेल तर खुशाल उतरू द्यावं. माझ्या माहितीनुसार गाडीसेवा सुरू झाल्यावर शासन केवळ पहिले पाच वर्षे वित्तपुरवठा करणार आहे. नंतर बहुतेक अंबाणी / अदानी विकंत घेतील. एक प्रयोग म्हणून मला मुंबई-कर्णावती अतिजलद गाडीसेवा मला मान्य आहे. जर विकली गेली तर पुढे दिल्लीपर्यंत वाढवता येईल. या विस्तारित सेवेस जरी विमानप्रवासापेक्षा जास्त वेळ लागला तरी रातराणी सेवा म्हणून विकली जाऊ शकते. अर्थात हा भविष्यकालीन विमर्श आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 09/26/2017 - 08:56 नवीन
लेखातील सार नुसार, कामाची गरज दोन्ही देशाला आहे (जपान आणि भारत) जपान कडे पेसा आहे तंत्रज्ञान आहे भारता कडे मजुर आहेत आता दोघांना काम हवे असेल तर दोघांची निकड भागायला हवी. जुन्या तंत्रज्ञानात जपान गुंतवनुक करणार नाही आणि आपल्याला बुलेट ट्रेन ची खुप आवश्यकता नाही पण गुंतवणुक आणि काम हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मराठी कथालेखक Mon, 09/25/2017 - 16:00 नवीन
बुलेट ट्रेन मधून फक्त प्रवासी वाहतूक होणार आहे की एक-दोन डबे सामान / टपाल यांसाठी पण असणार आहेत ? मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याकरिता सुरक्षित व्यवस्था या ट्रेनमध्ये पुरवली जावू शकेल काय ? यावरुनच प्रश्न पडला की सध्या मौल्यवान वस्तूंची वाहतूक (खासगी तसेच सरकारी मालकीच्या) कशी होते [ जसे सोने , हिरे ई.] ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/25/2017 - 20:58 नवीन
म.क., अतिमौल्यवान वस्तू (रत्ने, कागदपत्र, इ.) वाहून नेण्याची सेवा अंगडिया नामक गुजराती व्यापारी पुरवतात. अतिशय विश्वासू माणसं आहेत. प्राण जाय पर वस्तू ना जाय अशी वृत्ती असते. माझ्या मते बुट्रेत बरेचसे तेच लोकं असतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 09/26/2017 - 11:18 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नमकिन Sun, 10/22/2017 - 16:52 नवीन
ATM मध्ये पैसे भरणारे कंपनीवाले याप्रकारची संरक्षित वाहतूक सेवा पुरवतात. मोठा धंदा आहे तो. सेना व पोलिस सेवानिव्रुत्त लोक नेमतात हे कंपनीवाले. मौल्यवान वस्तू वाहतूक देश परदेशात केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
श
श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 19:19 नवीन
माहितीपूर्ण लेख!
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Tue, 09/26/2017 - 05:07 नवीन
*१लाख १० हजार कोटी रुपये खर्चाची बुलेट ट्रेन करून प्रवासाचे २ तास वाचवून नक्की काय मिळणार आहे?* .. मला देखील हा प्रश्न पडला आहे. ●●बु.ट्रे. ची जाहिरात करताना असा म्हणलंय की आपल्याला चकटफू मिळालंय तर काय वाईट आहे ? पण एक सांगू का,जगात कुठली गोष्ट फुकट मिळत नाही. ●●आत्ता पैसे भरायचेच नाहीयेत ,15 वर्षांनी बघू. पण त्या वेळेला रुपयाची किंमत किती झाली असेल, जपानी चलनाची किंमत किती असेल, आणि त्या वरचे व्याज मिळून किती रक्कम होणार , हे सरकार स्पष्ट करत नाहीए. ●●माल वाहतुकी साठी सुद्धा बु.ट्रे.चा उपयोग आहे का हे स्पष्ट होत नाही. कारण ज्यांना अह.ला जायचंय ते विमानांनी जाऊ शकतातच. माल वाहतूक केली तर बराच फरक पडेल असं वाटतंय. ●●बु.ट्रे. मध्ये खर्च होणार पैसा बाकीच्या developements साठी वापरला तर ???
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 07:17 नवीन
बापाचे पैसे आणि आईचे प्रेम सोडले तर जगातील कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. जपान तुम्हाला बुलेट ट्रेन बरोबर त्याचे "तंत्रज्ञान" देत आहे. आपल्या रेल्वेची स्थिती हि सांडपाण्याच्या डबक्यासारखी झालेली आहे. तिचे तंत्रज्ञान हे फार जुने झालेले असून त्यात आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्यातून २००३ ते २०१३ या दहा वर्षात रेल्वेत भाडे वाढ झालेली नाही. लालू प्रसादानी तर रेल्वेचा भंगार विकून तिकीटाची किंमत कमी करण्याची किमया करून दाखवली. या आणि अशा गोष्टींचे फलित एवढेच आहे कि कोणतीही गोष्ट स्वस्त किंवा फुकट मिळणे हा आमचा हक्क आहे हे जनतेच्या मनात प्रस्थापित झाले. आणि ते बदलणे हि राजकीय हाराकिरी ठरते आहे. मग ते फुकट वीज असो कि पाणी असो किंवा कर्ज माफी असो. १ जून १९३० साली चालू झालेली आपली डेक्कन क्वीन मुंबईहून पुण्याला जायला ३ तास १० मिनिटे घेत असे. ८७ वर्षांनंतर आज त्या गाडीला ३ तास वीस मिनिटेच लागतात. क्रांतिकारी बदल घडवणारे तंत्रज्ञान आणले तरच रेल्वेचा कारभार सुधारणे शक्य आहे हि वस्तुस्थिती आहे. एक उदाहरण म्हणून देत आहे. १९८८ साली आपण चक्र १ हि अणुपाणबुडी रशिया कडून भाड्याने घेतली.यानंतर परत २०११ साली चक्र २ हि अणुपाणबुडी १० वर्षे भाड्याने घेतली आहे. त्यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आत्मसात करून आपण स्वदेशी अशा दोन अणू पाणबुड्या बनवल्या "अरिहंत" हि नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून अरिदमन हि त्या मार्गावर आहे. अणुक्षेपणास्त्रे असलेल्या या स्वदेशी बनावटीच्या अणुपाणबुड्या हे या तंत्रज्ञान विकासाचे फलित आहे.फक्त फरक एवढाच आहे कि संरक्षणावरच्या खर्चाचा हिशेब कोणी मागत नाही. सुरुवातीचा खर्च झाल्यावर आज स्थिती अशीआहे कि एका अणुपाणबुडीला खर्च प्रत्येकी ६ हजार कोटी येणार आहे आणि फ्रान्स कडून घेत असलेल्या स्कॉर्पियन डिझेल पाणबुड्यांची किंमत आजमितीला १० हजार कोटी प्रत्येकी. तंत्रज्ञान आत्मसात करणे का आवश्यक आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. असे तंत्रज्ञान वापरून भारतात दळण वळणात आमूलाग्र क्रांती करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचा सोनेरी चतुष्कोण(golden quadrilateral), मुंबईतील उड्डाणपूल किंवा दिल्ल्लीतील मेट्रो बद्दलहि असाच आरडा ओरडा मी ऐकला वाचला होता. त्याचे फलित काय झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आहेच. खाजगीकरणातून बुलेट ट्रेन आणा म्हणून बोलणारे लोकच मुंबई मेट्रोमध्ये अंबानी नफेखोरी करत आहेत म्हणून ठणाणा करताना आढळतात. एक तर खाजगी कंपन्यांना परवानगी द्या किंवा सरकारनेच प्रकल्प राबवा. मी पैसे खर्च करणार नाही आणि तुम्हीही नफा कमवायचा नाही या कम्युनिस्ट वृत्तीने जगाचे भरपूर नुकसान झालेले आपण काही दशके पाहतो आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 07:20 नवीन
"According to our calculations, if we are to build six attack submarines based on the existing design of the Arihant, the cost would not exceed Rs 35,000 crore," a source involved in the process told ET. Contrast this to an upcoming tender the Navy will float for six more conventional submarines which is expected to cost over Rs 60,000 crore, called Project 75 I. Read more at: http://economictimes.indiatimes.com/news/defence/home-made-submarines-cheaper-than-those-built-with-foreign-technology/articleshow/53919022.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गंम्बा Tue, 09/26/2017 - 07:37 नवीन
बापाचे पैसे आणि आईचे प्रेम सोडले तर जगातील कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही.
डॉक्टरसाहेब, अवांतर होतय पण हे एकदम सेक्सिस्ट विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 07:43 नवीन
यात सेक्सिस्ट काय आहे उलगडून सांगाल का? --/\-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
ग
गंम्बा Tue, 09/26/2017 - 08:24 नवीन
" पुरुष ( फक्त ) पैसे मिळवणार, स्त्री ( फक्त ) प्रेम/सांभाळ करणार . स्त्री, पुरुषांचे रोल आहेत हे ठरलेले आहेत " हे गृहितक त्यात दिसतय म्हणुन "सेक्सिस्ट" म्हणले. आईबापाचा पैसा आणि प्रेम सोडुन दुसरे काही फुकट मिळत नाही असे वाक्य असते तर सेक्सिस्ट वाटले नसते. --------- तुम्ही सेक्सिस्ट नाहित ह्याची पूर्ण खात्री आहे. पण बोलण्यातल्या सवयी जात नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 11:14 नवीन
आपला मुद्दा मान्य आहे पण जे दिसते त्यावर वाक्प्रचार असतो. बापाचे प्रेम आणि आईचा पैसे दिसत नाही. मी केवळ वाक्प्रचार लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
उ
उपेक्षित Tue, 09/26/2017 - 09:33 नवीन
उत्तम प्रतिसाद डॉक... पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राही Tue, 09/26/2017 - 10:10 नवीन
कोंकण रेल वे ला अगदी मिनिस्क्यूल प्रमाणात विरोध झाला तोही गोव्यातल्या इवल्याश्या टापूत. खाजण जमिनी बुजतील म्हणून आणि ( आता नक्की आठवत नाही; पण ) एका पुरातन चर्चला पुढेमागे नुकसान पोचेल म्हणून बाकी मंगळुरुपर्यंतच्या संपूर्ण कोंकणपट्टीत कोंकण रेल वे व्हावी म्हणून मागण्या केल्या गेल्या. १९४० सालापासून कोंकण रेल वेची मागणी वेगवेगळ्या लोकव्यासपीठांवरून मांडली जात होती. मधु दंडवते यांच्या निवडणूक प्रचारात कोंकण रेल वे बांधण्याचे प्रमुख आश्वासन असे. दिवा- दासगाव- रोहा हे टप्पे गाठल्यावर प्रत्येक ठिकाणी लोकांनी जल्लोश केला होता. घाटकोपर- वेसावे मेट्रोतली अंबानींची नफेखोरी हा वेगळा विषय आहे. याही मेट्रोच्या अस्तित्वाला विरोध नव्हता. उलट कलकत्त्यात दिल्लीत आली आणि मुंबईत अजून नाही हे वैषम्य लोकांना खुपत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजीत अवलिया Tue, 09/26/2017 - 10:17 नवीन
सहमत आहे राही. कोकण रेल्वेचे काम चालू असताना लोक प्रचंंड उत्साही होते. त्यावेळी जमेल त्या रविवारी काम चालू असलेल्या ठिकाणी आम्ही मित्र जायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 11:10 नवीन
कोकण रेल्वेला कोकणी लोकांचा विरोध नव्हता तर शहरात राहणाऱ्या आरामखुर्चीतील विचारवंतांचा होता. एवढे अजस्त्र बोगदे आणि पूल बांधून काय फायदा? ना शेतमालाची वाहतूक ना उद्योगधंदे आहेत कोकणात आणि कर्नाटकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ग
गामा पैलवान Tue, 09/26/2017 - 14:38 नवीन
अवांतर : खरे डॉक्टर, नेमक्या या परोपजीवी विचारजंतांमुळे कोकण रेल्वे एकमार्गी झाली. त्याच वेळेस दोन मार्ग तक्ता आले असते. निदान रुंद बोगदे तरी खणता आले असते. जे आता करायचं आहे तर वेळखाऊ काम आहे. कारण की दुहेरी मार्गासाठी स्वतंत्र बोगदा खणावा लागेल. चालू बोगदा विस्तारता येणार नाही. कोकण रेल्वे बांधण्याच्या वेळेस हे सगळे आक्षेप नोंदवले होते. पण लक्षात कोण घेतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राही गुरुवार, 09/28/2017 - 10:48 नवीन
कोंकण रेल्वेची मागणी लावून धरण्यात मुख्यत: समाजवादी पक्ष आघाडीवर होता. हे मुद्दाम अशासाठी सांगायचे तर आजकाल या लोकांना बुबुडा, पुरोगामी ही विशेषणे छद्मीपणाने लावली जातात. नाथ पै रत्नागिरी मतदारसंघ जिंकत आले ते जसे त्यांच्या कामामुळे तसेच कोंकण रेल्वेचा पाठपुरावा केल्यामुळे. त्या काळच्या मानाने खर्च अवाढव्य होता आणि बजेटमध्ये पूर्ण तरतूद होऊ शकत नव्हती. शिवाय कोंकणची lobby सुद्धा नव्हती. पंधरावीस कोटी रुपये मंजूर होत त्यात आज दिवा मग दासगाव मग रोहा असे चालले होते. जनता राजवटीत दंडवते- फर्नॅंडिस या जोडगोळीने नेटाने कोंकण रेल corporation स्थापन करून भांडवलउभारणी केली. आणि कोंकणरेल्वे खऱ्या अर्थाने मार्गी लागली. तरीसुद्धा भांडवलाचा प्रश्न पूर्णपणे सुटला नाहीच. मग तडजोड म्हणून एकेरी मार्ग टाकण्यात आला. आणि दोन्ही टोकांकडून बांधकाम सुरू करून मंगळुरु - उडिपी वगैरे टप्पे जसजसे बांधून होतील तसतसे वाहतुकीस खुले करून थोड्याफार ताबडतोबीच्या उत्पन्नाची सोय केली गेली. असो. सत्य हेच की कोंकण रेल्वेला फारसा विरोध खुर्चीधारी शहरी विचारवंत अथवा सामान्य जनता यांच्याकडून झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 11:40 नवीन
नाथ पै जॉर्ज फर्नांडिस मधू दंडवते वसंत बापट मृणाल गोरे हे तत्वनिष्ठ समाजवादी होते आता राहिले आहेत ते तर त्यांच्या सावलीत बसण्याचीही लायकी नसलेले आहेत. लालू प्रसाद मुलायम सिंह मायावती शरद यादव ( अपवाद नितीश कुमार सोडले तर) नावं घेतली तरी बद्धकोष्ठ उपटेल असे आहेत एकाचढ एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Tue, 09/26/2017 - 11:12 नवीन
मुंबई मेट्रो खाजगी कंपनीने बांधली आहे मेट्रोला विरोध नव्हे तर त्यांच्या नफा कमावण्यावरून वादंग झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सिंथेटिक जिनियस Tue, 09/26/2017 - 16:01 नवीन
मोदींच्या निर्णयावर शंका घेतलीच कशी? काँग्रेसने सेतू समुद्रम बांधायचा निर्णय घेतला तेव्हा त्याला विरोध करणारे भाजपचेच लोक होते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 09/26/2017 - 20:09 नवीन
लोक हा स्टॅन्डअलोन प्रकल्प म्हणून का बघतात? जसं काही हा फक्त एकच मार्ग होणार आहे. अगदी आयआयएम मधल्या हुशार लोकांनी पण गणित मांडून दाखवलं की रु. १५०० तिकीट ठेवून रोज १ लाख लोकांनी तिकीट काढून प्रवास केला तर हे कर्ज आपण फेडू शकू. यात ते सोयीस्करपणे हे विसरले की सर्व उत्पादन आणि मांडणी/ जोडणी भारतातच होत असल्याने रोजगार मिळतील. एकदा ट्रेन सुरु झाल्यावर फक्त तिकिटाने पैसे मिळवण्यापेक्षा इतरही मार्गांनी पैसे मिळवता येतात उदा. जाहिराती, विविध कंत्राटे देणे ई. तसेच अप्रत्यक्ष फायदे पण बघितले पाहिजेत. पेट्रोल/ डिझेलची बचत होईल त्यामुळे जी परकीय गंगाजळी वाचेल ती पण विचारात घ्यायला हवी. नोकऱ्या आणि बिझनेस वाढल्यामुळे तेवढ्या लोकांना रोजगार मिळेल. तसेच तंत्रज्ञान पण मिळणार असल्याने ते आत्मसात करून आपल्याला त्याचे एक स्वतंत्र मार्केट तयार करता येईल. अगदी जगात ग्राहक नाही मिळाले तरी देशांतर्गत असे मार्ग करायला आपण स्वयंपूर्ण होऊ शकू. आर्थिक बाब महत्वाची असली तरी माझ्यामते याला बरेच अँगल असावेत. राजकीय दृष्ट्या विचार केला तर चीनला शह देण्यासाठी आशियातल्या भारत आणि जपान या दोन देशांना एकत्र आहोत हे दाखवणे गरजेचे आहे. फ्रांस किंवा चीनचे बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारी असले तरी जपानला राजकीय आणि सामरिक दृष्ट्या जवळ ठेवणे महत्वाचे आहे. जशी ही आपली गरज आहे तशी जपानलाही ती गरज आहेच. दुसऱ्या बाजूने त्यांच्या बुलेट ट्रेनला ग्राहक मिळवणे ही त्यांना गरजेचे असावे. उगाच कोणी ०.१% व्याजाने एवढे पैसे देणार नाही. जपान बुलेट ट्रेन साठी कर्ज देणार आहे त्यामुळे आपल्या सध्याच्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी हे पैसे वापरता येणार नाहीत. त्यामुळे सध्याच्या मार्गांची क्षमता वाढवणे आणि बुलेट ट्रेन उभारणे हे दोन वेगवेगळे प्रकल्प आहेत. आत्ताचे मार्ग आधी सुधारा या न्यायाने मुंबई पुणे जुना महामार्ग असताना वेगळा एक्सप्रेस वे बांधायची काय गरज होती? जुन्याच मार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा करता आल्या असत्या ना? असे समजू की फक्त आताचे मार्ग सुधारायचे असं ठरवलं तर ते करण्यासाठी जो काही वेळ लागेल तेवढा वेळ मुंबई - अहमदाबाद रेल्वे मार्ग बंद ठेवला किंवा अंशतः चालू ठेवला तर काय हाल होतील? वाहतूक पूर्णपणे चालू ठेऊन असा कायापालट कसा करायचा? तिकिटाचे म्हणाल तर सीझनमध्ये तथाकथीत "स्लीपर कोच" बससाठी १०००-१५०० भाडं द्यायला लागतं आणि प्रवासाचा वेळ ८-१० तास. मी बरेच वेळा मुंबई - बडोदा प्रवास केला आहे आणि ट्रेनमध्ये कमी गर्दी आहे असं कधीच झालं नाही. एक दिवसाचं काम असेल तर अपरात्री न निघता योग्य वेळेत पोचवेल अश्या गाड्या जवळजवळ नाहीतच, एखादी असलीच तर ती दुथडी भरून वहात असते. विमान प्रवासाचा संपूर्ण वेळ बघितला तर तो ३ तासांपेक्षा बराच जास्त आहे. बुलेट ट्रेनमुळे लोकांच्या पोटात दुखायची प्रत्येकाची आपापली कारणे आहेत. एक तर बराचसा मार्ग गुजराथमध्ये आहे, त्यामुळे गुजराथला आणि पर्यायाने मोदींना फायदा होईल असं वाटतंय. जरी काँग्रेसने हा प्रस्ताव आणला होता तरी आता मोदींनी हा प्रकल्प तडीस नेला तर क्रेडिट मोदींना मिळेल. काही लोक अमेरिकेत अजून बुलेट ट्रेन नाही तर भारतात कशाला हवी म्हणतात. अमेरिकेत काही मोठी शहरं सोडली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाहीये. कुठलीही ट्रेन किंवा बस नाही, स्वतःची कार वापरा किंवा टॅक्सी करा. जे अश्या ठिकाणी राहतात त्यांना विचारा ते किती महागात जातं आणि कार नसेल तर कसे हाल होतात. न्यू जर्सी, न्यू यॉर्क सारख्या ठिकाणी ज्या लोकल ट्रेन आहेत त्याचे वन वे तिकीट किती आहे बघा. न्यू जर्सीमधून न्यू यॉर्कला येण्यासाठी (अंतर अंदाजे ३५-५० मैल) वन वे तिकीट $१८+$१.७५ आहे, तर महिन्याचा पास $३५०+$७५ फक्त आणि लागणारा वेळ फक्त १.३० तास (वन वे). आणि हो, त्या ट्रेन मधेही तुडुंब गर्दी असते. एवढे पैसे देऊन मस्त निवांत बसून जाता येत नाही तर सगळं प्रवास दाटीवाटीने उभं राहून (दुसऱ्याला धक्का न लावता आणि दुसऱ्याच्या मोबाईल किंवा पुस्तक/पेपर मध्ये डोकं न घालता) करायला लागतो. अरे आणि घर ते स्टेशन स्वतःच्या कारने यायला लागत असल्याने स्टेशनवर पार्किंगचे प्रतिदिन $१० राहिलेच. एवढे पैसे असूनही प्रिन्सटन जंक्शन सारख्या स्टेशनच्या पार्किंगला २ वर्षांचे वेटिंग असते. त्यामुळे मग प्रायव्हेट पार्किंग मध्ये मागतील तेवढे ($१०++) पैसे द्यावे लागतात. काहींचं म्हणणं आहे की जपानच का, चीन किंवा फ्रांस का नाही? काहींना वाटतंय की आपण कर देतो त्यातून हे पैसे फेडले जाणार. जसे काही बुलेट ट्रेन फक्त बांधणार आणि शोभेची वस्तू म्हणून ठेऊन देणार. काही तर अगदी रुपयाची किंमत बदलते किंवा फॉरेक्स रेट बदलतो म्हणून चिंतीत आहेत. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे पण फुकट पाहिजे किंवा स्वतःला कुठलीही तोशिष लागायला नको. नोकरी धंदा पाहिजे पण ठराविकच काम पाहिजे किंवा फार काम नको. स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायचं नाही. आहे त्याच मार्गाच्या आसपास तसाच दुसरा रेल्वे मार्ग तयार करायचा खर्च कोणाला माहित आहे का? थोडक्यात आहे तो मार्ग सुधारणे किंवा तसाच नवीन मार्ग बांधणे हे पर्याय सगळ्यांना मान्य असावेत. मग खरं तर अश्या मार्गाचा खर्च आणि बुलेट ट्रेनचा खर्च यातील तफावत हा खरा बुलेट ट्रेनचा खर्च का पकडू नये? मग तेवढा खर्च करावा का नाही त्यावर वाद घालता येईल ना?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/26/2017 - 23:28 नवीन
ट्रेड मार्क, आपण निपोनच्या (=जपानच्या) जवळ आहोत हे वेगळ्या प्रकारेही दाखवता येऊ शकतं. त्यासाठी बुट्रे खरेदी करायची गरज नाही. उद्या समजा भारताचे बुट्रे मार्ग परदेशात न्यायचे झाले तर रुंद चौडे असलेले बरे. मानक चौडे असतील तर अडचण होईल. बाकी सर्व कथनाशी सहमत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ज
जयंत कुलकर्णी Wed, 09/27/2017 - 13:19 नवीन
मुख्य प्रश्न आहे की हा प्रकल्प स्वतःचे कर्ज स्वतः फेडणार आहे का ? बाकी काही चर्चा करण्यात तसा अर्थ नाही. जर तसे नसेल तर मग आपल्याला त्यात पैसे घालावे लागतील का ? आपल्याला म्हणजे तुम्हाला आम्हाला... सध्या या असल्या गाड्यांची तिकीटे ही जवळ जवळ विमानांच्या भाड्याएवढी होत चालली आहेत मग ही गाडी सुरू करण्यात काय शहाणपणा ? जर ते कर्ज ती कंपनी फेडणार असेल तरीही चर्चेला अर्थ उरत नाही. मग त्यांना काय करायचे ते करू देत. सरकारने आर्थिक मदत सोडून बाकी सगळी मदत करावी... अर्थात हे माझे मत आहे... चूक असण्याचीच शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
पिलीयन रायडर Wed, 09/27/2017 - 15:06 नवीन
माझाही हाच प्रश्न आहे. जितके कर्ज उचलत आहोत ते फेडले जाईल इतका पैसा हा प्रकल्प निर्माण करणार आहे का? सध्याचे दुरान्तोचे तिकिट, विमानाचे तिकिट आणि बुलेट ट्रेनचे संभाव्य तिकिट ह्यांची तुलना ह्या प्रवासांच्या वेळेसोबत केली असता बुलेट ट्रेन खरंच आवश्यक होती का असा प्रश्न मलाही पडलाय. तंत्रज्ञान जपान आपल्याला वापरु देणार आहे का? मला त्याबाबत निश्चित काही माहिती मिळाली नाही. (किंवा वाचली असेल तर आत्ता आठवत नाही.) त्या ०.१% बद्दल पुढच्या भागात लेखक लिहीतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पैसा Wed, 09/27/2017 - 14:09 नवीन
सगळे प्रतिसाद व प्रकल्पाची माहिती वाचली नाहीये. या ट्रेनला dedicated रेल्वे लाईन टाकणार आहेत का? कोंकण रेल्वेच्या सिंगल ट्रॅक मुळे कागदोपत्री सुपरफास्ट वगैरे असलेल्या आणि रत्नागिरी ते मडगाव नॉन स्टॉप असणाऱ्या गाड्या मडूरे वगैरे चिंधी स्टेशनांवर अर्धा एक तास सुद्धा थांबतात आणि तीन तासाचा प्रवास 6 तासांपर्यंत लांबतो हा अनुभव आहे. रुळावरून चालणारे लोक, गुरे हा अजून एक अडथळा. हे सगळे कसे टळणार आहेत? आपले लोक पण भारी आहेत. तेजस एक्सप्रेसमधले हेडफोन्स आणि एलईडी उचकटून काढण्यापर्यंत मजल गेली होती. असल्या सुविधा वापरण्याएवढे आपण mature आहोत का?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 14:17 नवीन
या ट्रेनला dedicated रेल्वे लाईन टाकणार आहेत का?
होय, याची वेगळी रुंदी असते ... दुसऱ्या ट्रॅकवर या गाड्या, व दुसऱ्या गाड्या याच्या ट्रॅकवर चालू शकत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/27/2017 - 14:23 नवीन
म्हणून एवढा मोठा भांडवली खर्च आहे. निव्वळ ट्रेनची किंमत असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 14:49 नवीन
मोठा भांडवली खर्च असू देत .... पण तो वसूल कसा होणार / केला जाणार ? का शेवटी तोट्यात गेल्यावर, जनतेचा काररूपी पैश्याद्वारे बेल आउट पॅकेज देणार का ? असे प्रश्न आहे .... जसे ताजमहाल बांधणारा गेला बांधून, पुढच्या सत्ताधार्याला जाचक कर लावून जनतेची पिळवणूक करण्याची संधी .... (ताज महाल शेवटी तत्कालीन शेतकरी कामकरी व्यापारी यांच्या कररूपातून वसूल केला गेला ... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/27/2017 - 15:22 नवीन
आदर्श परिस्थितीत भांडवली खर्चातून दीर्घ मुदतीच्या assets तयार होतात, तशा त्या होणार आहेत. तुमचा मुद्दा हा की ही रक्कम कर्जद्वारे उभी केली आहे तर कर्जफेड कोण कशी करणार आहे. सरकार जनतेचे प्रतिनिधी आहे म्हणजे जनताच अंतिमतः कर्जफेड करणार आहे. याला खूप दीर्घ मुदत असल्याने अनेक सरकारांना कर्जफेडीसाठी पैसे उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यात सर्व पक्षांची सरकारे कधी न कधी असतील. नुसते पैसे छापून तर कर्जफेड करता येणार नाही. प्रकल्प कधी ब्रेक इव्हन करेल किंवा सरकार कर्जफेड कशी करेल याबाबत अभ्यास केल्याशिवाय कर्ज घेतले असेल असे वाटत नाही. साधी बँकांनी दिलेली कर्जे कधी कधी गोलमाल करून दिली तरी कागदोपत्री proposal apparently flawless असावे लागते. तसे ते इथेही असणार आहे. प्रश्न त्याच्या प्रत्यक्षातल्या अंमलबजावणीचा आहे. त्याचे उत्तर काळच देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
ट्रेड मार्क Wed, 09/27/2017 - 15:56 नवीन
आपल्याकडे मल्ल्या सारखे या विषयातले दिग्गज आहेत की, त्यालाच सल्लागार नेमू... कृहघ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 09/27/2017 - 16:29 नवीन
झालं मग ! बाजार उठला ... फ्लाय विथ किंगफिशर बुलेटट्रेन बियर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
र
राही गुरुवार, 09/28/2017 - 11:06 नवीन
हा corridor डेडिकेटेड तर असणारच आहे शिवाय उन्नतही आहे. एकूण ५०८किमी पैकी ४७१ किमी मार्ग हा १८ मीटर इतक्या उंचीवरून जाणार आहे. बीकेसी ते ठाणे या अंतरापैकी १५ किमी भूमिगत असणार आहेत. ठाणे ते वसई तालुका यातले सात किलोमीटर्स पाण्याखालून (नेटवर undersea असा शब्द आहे.)आहेत. वसई किंवा वसई रोड इथे स्टेशन नाहीं. महाराष्ट्रात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोयसर ही स्टेशने आहेत. बोयसरपुढे वापी हे स्टेशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चिगो गुरुवार, 09/28/2017 - 14:25 नवीन
मला हा प्रत्येक गोष्टीसाठी 'उन्नत मार्ग' / इल्हेवेटेड पाथचं भारतीय फॅसिनेशन कळत नाही.. बुलेट ट्रेन साठी संपुर्णतः उन्नत मार्ग खरंच योग्य किंवा गरजेचा आहे का? इटलीतील फ्लोरेन्स ते मिलान मार्गावरील अतिजलदगती (माझ्या आठवणीत ३०० किमी/तास) ट्रेनमध्ये प्रवास केला, तेव्हा उन्नत मार्ग फार कमी लागल्याचे आठवते.. हां, तो मार्ग संपुर्णतः कुंपणबद्ध (बॅरीकेटेड) होता हे नक्की.. माझ्यामते भुकंप, वादळ इ. नैसर्गिक आपत्तींना लक्षात घेता, संपुर्ण उन्नत मार्ग फारसा योग्य नाही.. उन्नत मार्ग करण्यापेक्षा फक्त बॅरीकेटेड पाथ करुन (जिथे रस्ते आणि रेल्वे क्रॉस होतात, तिथे योग्य पुल हवेत) खर्च कमी होणार नाही का? केवळ भव्यदिव्य करण्याचा अट्टाहासापाई पांढरा हत्ती (किंवा मायावतींचे हत्ती म्हणा) पोसण्यात काय हशील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
थ
थॉर माणूस Mon, 10/02/2017 - 19:17 नवीन
बरोबर हाय स्पीड रेल्वेसाठी बॅरीकेड्स अनिवार्य आहेत उन्नतमार्ग फारसे गरजेचे नाहीत. उन्नतमार्ग बहुतेक भारतीयांसाठीच निवडले जात असावेत. कारण तुम्ही बॅरीकेड म्हणून अक्षरशः भींत जरी बांधलीत तरी त्यावरून उड्या टाकून ट्रॅक पार करणारे महाभाग शेकड्याने असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्रसाद_१९८२ Tue, 10/03/2017 - 09:00 नवीन
मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला लावले तारांचे कुंपण (बॅरीकेड्स) लोकांनी काढून भंगारवाल्याला विकून टाकले. तेंव्हा भारतात फक्त बॅरीकेड्स लावून हायस्पीड रेल्वेट्रॅक सुरक्षीत करणे फारच कठीण काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
व
विशुमित Tue, 10/03/2017 - 11:32 नवीन
<<<तेंव्हा भारतात फक्त बॅरीकेड्स लावून हायस्पीड रेल्वेट्रॅक सुरक्षीत करणे फारच कठीण काम आहे.>>> ==>> आमच्या इकडे रेल्वेचं कोणतेच भंगार भंगारवाला घेत नाही. प्रचंड घाबरतात रेल्वेच्या कारवाईला. तुमच्या साईडला काय परिस्थिती आहे? सहसा ही रिस्क कोणताच भंगारवाला घेत नाही, असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
म
मार्मिक गोडसे Tue, 10/03/2017 - 11:49 नवीन
योग्य निरीक्षण. खरं आहे , रेल्वेचे भंगार व गटारीची झाकणं कुठलाही भंगारवाला घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Sat, 10/07/2017 - 14:52 नवीन
काय म्हणताय? तेजस एक्स्प्रेस महामाना एक्सप्रेस मधल्या टॅबलेट पासून नळापर्यंत सर्व गोष्टी पहिल्या दिवशीच चोरी झाल्या आणि तुम्ही म्हणताय भंगारवाला विकत घेत नाही. काहीही हा मार्मिक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 10/07/2017 - 15:54 नवीन
तुम्ही इतक्या छातीठोकपणे सांगत आहात म्हणजे भंगारवाले घेतही असतील टॅबलेट. २०१४ नंतर भंगारवाल्यांचा कॉन्फिडन्स बराच वाढलेला दिसतोय. चांगलंय ,कोणाला तरी अच्छे दिन आलेत म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 10/07/2017 - 16:30 नवीन
मग हे चोरीला गेलेले नळ आणि टॅबलेट काय चोर घरी वापरतात का? http://www.ecoti.in/VYrXAZ53 हे ही वाचून घ्या. आपला मुद्दाच खरा हा आग्रह कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 10/07/2017 - 17:23 नवीन
मान्य केलंय की मी. चोर स्मार्ट झालेत ..... २०१४ नंतर तर conviction rate झपकन खाली आला असंही त्या बातमीत म्हटले आहे. कॉन्फिडन्स वाढल्याचे लक्षण आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा