बच्चन दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती (उत्तरार्ध)
Primary tabs
आंतरजालावर लिहिताना लिहिताना खूप मोठा लेख लिहू नये असा अलिखित नियम आहे. एक मोठा लेख लिहिण्यापेक्षा २-३ छोटे लेख लिहावे. तो मोह मलाही झाला होता पण वाचनातली सलगता तुटू नये म्हणून लेख एकसंध ठेवला आहे. अरे हो आणि ह्या लेखाचा पूर्वार्ध वाचलायत ना?
-------------------------------------------------------------------------
१५ ऑगस्ट २००८ -- स्वातंत्र्य दिन दुहेरी आनंद घेऊन आला. आज ‘बच्चन दर्शन’ घडणार होतं.
‘शेवंतीचं बन’ ह्या निवडक लोकसंगीताच्या संचातली भन्नाट गाणी ऐकत संध्याकाळी निघालो. धो धो कोसळत्या पावसात जवळपास अडीच तास ड्राइव्ह करून नासाऊ कोलिजियमजवळ पोचलो ! अर्रर्र… पण काहीतरी गोंधळ झाला आणि रस्ता चुकलोय असं वाटायला लागलं ! त्यातच ‘किमान ६०% मानवी शरीर हे पाण्याने भरलेले असते’ ह्याचा प्रत्यय यायला लागला होता !! कुठेतरी थांबणं फार म्हणजे फारच आवश्यक होतं ! एवढ्यात एक मॅरियट हॉटेल दिसलं. (चला हे काम बेष्ट झालं!!)
डोकं परत काम करायला लागल्यावर जाणवलं हॉटेलमधे एक से एक श्रीमंत स्त्रिया आणि पुरूष ! बायकांचे कपडे तर सिनेमातनं उचलून आणल्यासारखे ! म्हटलं एखाद्या अमीर घरातल्या लग्नाची पार्टी वगैरे दिसतेय; आपण आपला पत्ता शोधावा ! हॉटेल स्टाफपैकी एकाला विचारलं तो म्हणाला हे काय नासाऊ कोलिजियम बाजूलाच तर आहे !! , लढ बाप्पू….मटकाच की एकदम !! आम्ही समजत होतो रस्ता चुकलोय आणि चुकून बरोबर जागी आलो होतो चक्क !! तेव्हाच मग साक्षात्कार झाला की हॉटेलमधे पार्टी बिर्टी नव्हती ! त्या ललना बच्चनचा कार्यक्रम पहायला नटूनसजून आल्या होत्या ! घाईघाईत गाडी नासाऊ कोलिजियमच्या ‘कार’स्थानात पार्क केली ! भर पावसात पळत पळत गेलो आणि मुख्य दरवाजातून आत शिरलो. पुणे / मुंबईला थिएटरात (मल्टिप्लेक्समधे नाही!) असते तशा गर्दीत घुसून निखिल समोसे घेऊन आला ! भेळ आणि मसाला चहाचा विचार एकंदर गर्दी पाहून झटकला ! त्या सगळ्या सीनमधे फक्त अजून एक आवाज हवा होता यार ! तो आवाज म्हणजे, “पाँच का दस, पाँच का दस”, “पंधरा का बीस, पंधरा का बीस” म्हणणाऱ्या ब्लॅकवाल्यांचा !
एकदाचे आमच्या सीटवर जाऊन बसलो. आरं बाबौ…नासाऊ कोलिजियम आतून एव्हढं मोठं आहे ? आपण फारच अंडर एस्टिमेट केलं होतं !! दहा-बारा हजार माणसं तर आरामात बसू शकतील. शिवाय बसायला आरामशीर खुर्च्या आणि ढकलाढकली वगैरे काही नाही ! य्ये हुई ना बात !!
सुरूवातीला एका लहान मुलांच्या ग्रुपचा डान्स झाला. पोरं जीव तोडून नाचली. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगबद्दल एक व्हिडीयो क्लिप सुरू झाली. या भयानक समस्येबद्दल काही ओळी तर डोक्यात ठाम बसल्या आहेत.. “If not now - When? If not here - Where? If not you - Who ?”
त्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. बाकी सगळ्या कार्यक्रमापेक्षा मला आणि निखिलला वेध लागले होते – अमिताभ कधी येतोय ह्याचे ! नाचगाणी चालू असताना प्रत्येक मोठ्या कलाकाराबरोबर स्टेजवर शामक दावरच्या ग्रुपचे डान्सर्स होते. शामक दावरने हिंदी सिनेमात एक चांगली गोष्ट करून ठेवलीय ती म्हणजे आपल्याला ’प्रमाणबद्ध’ डान्सर्स पहायची सवय लावलीय. खरंय ना ?
रितेश देशमुखने कार्यक्रमाला सुरूवात केली. त्याचं ’ए छोरी ! जरा नच के दिखा… जरा ठुमका लगा’ आणि ’कॅश’ चित्रपटाचं टायटल साँग मस्त होतं. रितेशच्यानंतर ’प्रिटी वूमन’ गाण्यावर पावलं थिरकली आणि दिमाखात प्रीटी झिंटा आली ! प्रिटी खरंच नावाप्रमाणे ’प्रिटी’ आहे, नाजूक आहे !
आता स्टेजवर अभिषेक बच्चन येईल म्हणून वाट बघत होतो आणि प्रेक्षकांत एकदम पाठीमागे गडबड उडली. स्पॉटलाईटच्या प्रकाशात, प्रेक्षकांच्यामधे, चक्क अभिषेक बच्चन उभा ! शप्पथ सांगतो…. तरूण पोरी आनंदाने इतक्या जोssरात किंचाळू शकतात हे माहितीच नव्हतं !! चार सुरक्षारक्षकांच्या कड्यात तो स्टेजवर आला आणि दिलखुलास नाचला. प्रेक्षागृहातले मंद दिवे पुन्हा सुरू झाले. अभिषेकने अचानक तिसऱ्या / चौथ्या रांगेत बसलेल्या एका तरूणीला उठायला सांगितलं. तिला म्हणाला, “Hey you! Beautiful lady in yellow… stand up!” हो-नाही करत ती लाजाळू मुलगी उभी राहिली आणि अभिषेकनं जाहीर केलं.. ती तरूणी म्हणजे ’श्वेतदी’! त्याची मोठी बहीण श्वेता!! दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असल्याने खास तेवढ्यासाठी भारतातून आली होती!!!
त्यानंतर स्टेजवर आली ‘Most beautiful lady on the Earth’ हे बिरूद मिरवणारी ऐश्वर्या !! ’क्रेझी किया रे’ गाण्यावर नाचत ऐश्वर्याने ऑडियन्सला क्रेझी करून टाकलं पार ! (त्यांची पूर्वजन्मीची काय पुण्यं असतील म्हणून मूर्तिमंत सौंदर्य घडवल्यावर देवाने त्यांना मधुबाला, माधुरी, ऐश्वर्या अशी नावं दिली?) सुप्त असूयेची नोंद करू शकणारं एखादं ’जेलसी मीटर’ असतं तर अभिषेक बच्चनबद्दल खूप नोंदी त्या मीटरने नोंदवल्या असत्या. आता साक्षात ऐश्वर्या बायको म्हटल्यावर दुसरं काय होणार?
नऊ वाजता सुरू झालेला कार्यक्रम साडेदहाच्या सुमाराच चांगलाच रंगला होता. ’निसर्गाच्या हाकेला ओ देणं’ पुन्हा एकदा आवश्यक होतं पण अमिताभची एंट्री तर चुकवायची नव्हती ! पण असं म्हणतात ‘जो भूक देतो तोच दाणाही देतो !’ आता बच्चन येईल असं वाटत होतं आणि स्टेजवर आले विशाल – शेखर हे म्युझिक डायरेक्टर्स ! त्यांची नाच-गाणी चालू असताना ‘हेल्थ ब्रेक’ (खास अमेरिकन शब्द !) घेऊन परत आलो तेव्हा विशाल – शेखरचा टाईम स्लॉट संपतच आला होता !!
खट खट खट …खट खट ॥खट खट खट खट !
ह्या आवाजाबरोबर तीन मोठ्या स्क्रीन्सवर अक्षरं उमटली – The Legend !
’अविस्मरणीय’ असा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला ! स्टेजवर कोण येणार आहे ते वेगळं सांगायची गरज नव्हतीच ! स्टेजवर येणं तर सोडाच पण अजून त्याचं पडद्यावरही दर्शन झालं नव्हतं आणि तरी टाळ्या – शिट्यांचा आवाज छप्पर फाडतो की काय असं वाटायला लागलं ! शिवाय टाळ्या वाजवणारे हात टीन एजर्सपासून ते वृद्धांपर्यंतचे ! अमिताभच्या लोकप्रियतेबद्दल फक्त ऐकलं होतं पण भारतापासून हजारो मैल दूर अमेरिकेत ते प्रत्यक्ष अनुभवलं !
’जहाँ तेरी ये नजर, मेरी जाँ मुझे खबर है !’ स्टेजवर नाचणारी प्रजा आपोआप बाजूला सरकली आणि ’तो’ आला ! टाळ्या-शिट्यांचा आवाज आता कानाचे पडदे फाडू पाहत होता. एखाद्या अदृश्य शक्तीने भारावल्यासारखे दहा-बारा हजार लोक एकाच वेळी उठून उभे राहिले ! Standing Ovation !!
’मैं हूँ डॉन…’, ’देखा ना हाय रे सोचा ना…’, ’रंग बरसे..’, ’शावा शावा’! सो कॉल्ड ’वय झालेला’ बच्चन एक से एक नमुने काढत होता आणि पब्लिक वेडं होत होतं ! Standing Ovation दिल्यावर बरेच लोक खाली बसले पण आमच्यासारखे काही वेडे पीर उभेच होते. आमच्या भागात तर मी आणि निखिल दोघंच उभे होतो, नाचत होतो !
’देखा ना हाय रे सोचा ना..’ चालू होतं तेव्हा ध्यानीमनी नसताना अचानक ’मोमेंट ऑफ दि लाईफ टाईम’ आला ! अमिताभने आमच्याकडे पाहिलं …त्यानं कमरेत हलकंसं वाकून आम्हाला अभिवादन केलं… आम्ही पाsssर गुडघ्यापर्यंत झुकलो आणि मग उभं राहिल्यावर त्याच्याकडे पाहून जोरजोरात हात हलवले… त्यानं आम्हाला ’हाय’ केल्यासारखे हात हलवले आणि परत परफॉरमन्समधे मश्गुल झाला ! आम्ही डायरेक्ट हवेतच तरंगायला लागलो !
थोड्यावेळाने मग बच्चन सगळ्यांशी बोलायला लागला. आत्तापर्यंत जो आवाज केवळ सिनेमा – टीव्हीवरून ऐकला होता तो धीरगंभीर आवाज पहिल्यांदा प्रत्यक्ष ऐकत होतो. कान तृप्त झाले बॉस्स… कान तृप्त झाले. तेव्हा काय माहिती होतं की अजून थोड्यावेळाने कान अजून जास्त तृप्त होणार आहेत. अमिताभ स्टेजवरून परत जाताना पुन्हा एकदा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करत सगळे लोक उभे राहिले. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमिताभ स्टेजवर आला किंवा स्टेजवरून गेला तेव्हा प्रत्येक वेळी standing ovation!
त्यानंतर कानावर शब्द आला ‘नमश्काsssर’ ! पुन्हा एकदा टाळ्या – शिट्या सुरू !! ‘मोहिनी … मोहिनी’ अशा कोरसच्या साथीने स्टेजवर जणू मोहिनीअस्त्र अवतरलं ! ‘तेजाब’मधल्या ‘एक-दो-तीन’ गाण्यातली तिची फेमस स्टेप केली आणि आख्खा हॉल मधुरीवर फिदा झाला ! त्यापाठोपाठ तिने ‘के सरा सरा’ , ‘धक धक..’ आणि ‘आजा नच ले…’ ह्या गाण्यांवर अस्सला पर्फेक्ट डान्स केला की मनात म्हटलं उगीच नाही म्हणत, “एक सिर्फ माधुरी, बाकी सब अधुरी !’ माधुरीची गाणी झाल्यावर प्रेक्षकांशी हितगुज करताना ‘दीदी तेरा देवर दीवाना..’ आणि ‘माईने माई..’ ह्या गाण्यांच्या दोन-दोन ती ओळी गायली. माधुरीच ती … Beauty with Brains! ‘माईने माई’ गाण्यातल्या ओळी थोड्या बदलून ‘जोगन हो गई तेरी दुलारी… मन न्यू यॉर्कसंग लागा’ अशा गाण्याची चतुराई दाखवून तिनं भरपूर टाळ्या मिळवल्या !
त्या संपूर्ण कार्यक्रमाचे चार-पाच हायपॉईंटस होते. पहिला म्हणजे अभिषेकची एन्ट्री. पोरींचं ते खच्चून किंचाळणं कधीच विसरू शकणार नाही. दुसरा हायपॉइंट म्हणजे ‘तेरी बिंदिया रे..’ हे ‘अभिमान’मधलं गाणं ! स्टेजच्या एका बाजूकडून अमिताभ आणि ऐश्वर्या आले तर दुसऱ्या बाजूकडून अभिषेक आणि जया बच्चन ! अमिताभ आणि जया एकमेकांजवळ आले आणि तेवढ्यात अभिषेक एक छोटं स्टूल घेऊन आला. जया त्यावर उभी राहिली आणि मग तिने इतकं लाजून अमिताभला मिठी दिली की क्या कहने !
अजून दोन हायपॉइंट्स म्हणजे ‘कजरा रे..’ आणि ‘डोला रे डोला..’ गाणी ! ‘कजरा रे …’ तर महितीच होतं की सॉलीड हिट असेल. ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ प्रत्यक्ष आपल्यासमोर पाहून कोण जागेवर नुसता बसू शकेल ? ‘डोला रे डोला’ गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्याला एकत्र स्क्रीनवर पाहणंही निखळ आनंद होता मग प्रत्यक्षातली बात काय सांगू? लाल रंगाच्या काठाची, पांढरी धवल साडी नेसलेली माधुरी आणि लालचुटूक रंगाच्या साडीला फिक्कट हिरव्या रंगाचा काठ अशा वस्त्रांत ऐश्वर्या ! नुसत्या उभ्या राहिल्या तरी नजर खिळूवन ठेवतील अशा त्या दोन सौंदर्यवती ! इथे तर स्टेजवर गुलाल उधळीत बहारदार नृत्य करत होत्या !!
ते पाहून डोळे तृप्त झाले आणि कान तृप्त केले ते पाचव्या हायपॉइंटने… बच्चनच्या डायलॉग्जनी ! त्या तीन पडद्यांवर अक्षरं उमटली – ‘The Voice!’ बच्चनच्या आवाजामुळे अजरामर झालेल्या डायलॉग्जमधली निवडक वाक्यं, अंधारातून वेगवेगळ्या दिशांनी, एकामागोमाग एक अशी बंदुकीतून गोळ्या सुटल्यासारखी सटासट कानांवर यायला लागली…….
“हम जहाँ खडे रहते हैं लाईन वहींसे शुरू होती है !”
“डॉन का इन्तजार तो ग्यारा मुल्कोंकी पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है !”
“सरजमीन-ऐ-हिन्दोस्ताँ …!”
“हाँ… मैं उसी अभागन शांती का बेटा हूँ !”
“आय कॅन टाक इंग्लिश, आय कॅन वाक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज ए फन्नी लँग्वेज…”
“रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है…शहेनशाह।”
“इतना पैसा में घर नहीं चलता॥साला ईमान कैसे चलेगा॥ हाँय ? ”
“पीटर… तुम लोग मुझे ढूँढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इन्तजार कर रहा हूँ !”
हात दुखत होते पण टाळ्या थांबत नव्हत्या! स्टेजवरच्या अमिताभकडे पाहत, आता डोळे आणि कानांना काय मेजवानी मिळणार, ह्या उत्सुकतेने सगळे लोक मिळेल त्या जागी बसले !(हाच तो आवाज जो जगभरातले बच्चनवेडे कानात प्राण आणून ऐकतात ! आज विश्वास ठेवणं अवघड जातंय..एके काळी अमिताभला ऑल इंडिया रेडियोच्या अधिकाऱ्यांनी ‘निवेदक’ म्हणून नाकारलं होतं – माईक टेस्ट फेल म्हणून ! सत्य हे कल्पनेपेक्षा अदभुत असतं हेच खरं !!)
सुरूवातच झाली ‘कभी कभी’ ह्या कवितेने ! त्याचा बुलंद आवाज आणि दहा-बारा हजार लोकांची भारावल्यासारखी शांतता ! ‘कभी कभी’ नंतर ‘अग्निपथ’ ही स्व. हरिवंशराय बच्चनांची कविता. एकोणिसशे चाळीस साली स्वातंत्र्य सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठीची कविता – ‘अग्निपथ’ !
ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है
अश्रू, स्वेद, रक्त से, लथपथ लथपथ
अग्निपथ…अग्निपथ…अग्निपथ !
अमिताभच्या आवाजात ही कविता प्रत्यक्ष ऐकताना काय वाटलं ते सांगताच येत नाही.त्यानंतर सुरू झाला ‘अग्निपथ’मधलाच सुप्रसिध्द डायलॉग “विजय दीनानाथ चौहान ! बाप का नाम दीनानाथ चौहान । माँ का नाम सुहासनी चौहान । गाँव माँडवा ….!” ‘अग्निपथ’ सिनेमा पहिल्यांदा बघताना ह्या सीनला थिएटरमधेही खुर्चीच्या काठावर बसलो होतो… इथे तर काय काय ऐकू असं झालं होतं !
‘अनफर्गेटेबल’ कार्यक्रम अत्युच्च स्थानी पोचला ‘दीवार’च्या डायलॉगने -- “आज…. खूष तो बहोत होंगे तुम..!” नास्तिक विजय फक्त आईचे प्राण वाचावेत म्हणून शंकराच्या देवळाची पायरी चढतो तो सीन ! पिन ड्रॉप सायलेन्समधे फक्त बच्चनचा आवाज थरथरत होता. डायलॉगचा शेवट आला… “मेरी माँ मुझे दे दो भगवान…मेरी माँ मुझे दे दो !” बघता बघता अमिताभच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले… ना कुठलं ग्लिसरीन, ना कुठलीही ट्रिक ! काही कळायच्या आधीच नकळत माझेही डोळे पाणावले ! सर्वोत्कृष्ट प्रसंगाला दाद द्यायला टाळ्या कमी पडतात !!!
मग अमिताभने सांगितली एक आठवण – ‘दीवार’च्या ह्या प्रसंगाचे शूटिंग करतानाची. सकाळी नऊ वाजता तो स्टुडियोत पोहचला. (By the way, तुम्हाला माहितीय? नूतन ही एक अभिनेत्री सोडल्यास इतर कोणीही अभिनेता / अभिनेत्री, वक्तशीरपणाबाबत, अमिताभचा हात धरू शकायचं नाही.) अमिताभ सांगत होता, “It was a normal shift ! मी दिग्दर्शक यश चोप्रांना विनंती केली -- हा सीन करायला माझी अजून मानसिक तयारी नाही, आपण थोड्यावेळाने सीन करू. यश चोप्रा म्हणाले काळजी करू नकोस; तुला पाहिजे तितका वेळ घे तोपर्यंत मी इतर काही सीन घेतो. मी माझ्या मेक अप रूममधे बसून होतो … मनाची तयारी करत. शेवटी एकदाचा बाहेर आलो. यश चोप्रांना म्हणालो चला शूटिंग करूया…. मी तयार आहे. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते !” ‘संयम’ हा जर दागिना असेल तर अमिताभ आणि यश चोप्रांनी त्या दागिन्याचा मुगुट करून घातला होता !!
आता अमिताभ खूपच हळवा झाला होता. त्याने त्याच्या आईची जयंती दोनच दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले. तो म्हणाला असंख्य वेळा पडद्यावरच्या माझ्या आईचा मृत्यू झाला पण ती आई पडद्याबाहेर जिवंत असायची, मला भेटायची. आता माझी खरी आई मात्र मला भेटायला आता कधीच येऊ शकणार नाही ! त्याने उजव्या हाताच्या अंगठ्याने गालावर ओघळलेले अश्रू चटकन दूर केले.
अमिताभ बोलायचा थांबला आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्यांची फुलं उधळत standing ovation दिलं ! अमिताभने तीन वेळा कमरेत लवून अभिवादन केलं, टाळ्यांचा स्वीकार केला पण टाळ्यांचा आवाज वाढतच होता…कितीतरी वेळ !
आता कार्यक्रम ह्यापेक्षा जास्त रंगणं शक्यच नव्हतं. थोड्यावेळातच शेवटचं गाणं सुरू झालं – ‘झूम बराबर झूम’ सिनेमातलं गाणं -- ‘झूssम बराबर झूssम बराबर झूssssम !’ ह्या गाण्याला रितेश देशमुखपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळे स्टेजवर नाचत होते. आम्हीही सगळे बेभान नाचत होतो. आमचे डोळे मात्र फक्त बच्चनवर खिळले होते. फार पूर्वी जीतेंद्र हा नट म्हणाला होता की अमिताभचा सिनेमा पहायला येणारा प्रेक्षक रूपयाचे सोळा आणे अमिताभलाच बघायला खर्च करतो.
शेवटी सगळे कलाकार स्टेजवर एकत्र उभे होते। मधोमध उभ्या अमिताभकडे जया बच्चन एका व्यक्तीला घेऊन गेली। अमिताभच्या शेजारी थोडा संकोचून तो माणूस उभा राहिला. बच्चनने त्या माणसाच्या खांद्याभोवती हात टाकून दोस्ती खात्यात ओळख करून दिली, “He is Dr. Nene !” च्यायल्लाssss माधुरीचा नवरा ! (आपली पूर्बजन्मीची पुण्याई कमी पडली बहुतेक !) जेलसी मीटरने पुन्हा एकदा खूप नोंदी केल्या असत्या !
‘अनफर्गेटेबल’ शो म्हणता म्हणता कार्यक्रम संपलाही. बाहेर आलो तर अवाढव्य ‘कार’स्थानात गाडीच सापडेना. मगाशी गडबडीत रांगेचा क्रमांक नीट पाहून ठेवायचं राहूनच गेलं होतं ! मी आणि निखिल दोन दिशांना फिरतोय आपले. मग जाणवलं की आपण आमच्यासारखे इतरही नमुने होते. जवळपास पूर्ण पार्किंग लॉट रिकामा झाल्यावर शेवटी गाडी मिळाली ! आम्ही शरीराने गाडीतून आणि मनाने हवेत तरंगत पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी पोहचलो! आता कधीही आठवणींच्या ’अनफर्गेटेबल’ कप्यात डोकवायचं आणि म्हणायचं, “आज…खूष तो बहोत हैं हम !”
----------------------------------------
पूर्वप्रसिद्धी -- www.atakmatak.blogspot.com
फारच सुंदर झाला आहे. वर्णन एकदम खास. सगळं डोळ्यापुढे घडतं आहे असंच वाटत होतं..
अभिनंदन!! लेखासाठीही आणि तो कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवल्यासाठीही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दोन्ही भाग वाचले आणि आवडले.
अमिताभचे आजकालचे कारनामे सोडता (राग येतोय पण) त्यानं ज्याप्रकारे आपल्याला वेड लावलयं त्याचं वर्णन बरोबर शब्दात केलेत.
मी ऐकलं होतं आतापर्यंत कि अश्या कार्यक्रमांना खूप गर्दी असते पण ती किती असते ते समजले.
रेवती
दोन ठिकाणी लेख वाचल्याबद्दल धन्स प्राजु :)
------
रेवती -- तू म्हणतेस तसं मीही फक्त ऐकलं होतं किती गर्दी असते ते; ह्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले :)
हा लेख मला फार आवडला होता आणि नव्हता पण.. :)
कारण या लेखाने तू माझा अमिताभला बघायचा चान्स गेल्याची आठवण करून देतोस! :)
असो..
तू मस्तच लिहीतोस हे.वे.सां.ग. आहे? उगाच नाही बक्षिस मिळालं! :)
’मैं हूँ डॉन…’, ’देखा ना हाय रे सोचा ना…’, ’रंग बरसे..’, ’शावा शावा’! सो कॉल्ड ’वय झालेला’ बच्चन एक से एक नमुने काढत होता आणि पब्लिक वेडं होत होतं ! Standing Ovation दिल्यावर बरेच लोक खाली बसले पण आमच्यासारखे काही वेडे पीर उभेच होते. आमच्या भागात तर मी आणि निखिल दोघंच उभे होतो, नाचत होतो !
वा! संदिपशेठ, सुंदर लिहिलं आहेस.. :)
आम्हीही जुन्या अमिताभचे पंखे आहोत... :)
डॉन, कालिउआ, शोले, दिवार, आणि अनेक....!
आपला,
(दिवारप्रेमी) तात्या.
आणि छान लिहिलेत.
खुप सुंदर लिहिल आहेस.
अस वाटल खरच डोळ्यासमोर घडतय :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
पण मध्यंतरी स्वत:च्या महाराष्ट्रद्वेष्ट्या बायकोमुळे त्याला लोकान्ची क्षमा मागायला लागली होती.
आणि स्वत: अमिताभही तसा कृतघ्नच आहे! ज्या महाराष्ट्राने त्याला मोठा केला त्या महाराष्ट्राबद्दल त्याला जराही प्रेम, आपुलकी वगैरे नाही. जे काही प्रेम आहे ते फक्त यूपीबद्दलच आहे!
पण अलिकडे मनसेवाल्यांनी चांगला इंगा दाखवल्यामुळे अमिताभ आताशा मराठी आणि महाराष्ट्र प्रेमाची भाषा झक मारत का होईना, परंतु करू लागला आहे! :)
आपला,
(अमिताभचा डोळस चाहता!) तात्या.
दोघेही बच्चन पतीपत्नी एक नंबरचे महाराष्ट्राद्वेष्टे आहेत..!
तात्या.
लेख खूप छान लिहिला आहे. मीही कलाकार अमिताभचा फॅन आहेच पण त्यातल्या भैय्याचा नाही असा लोच्या आहे. शोले- दीवार काय ज॑जीर काय वा त्रिशूल काय, सलीम-जावेदचे अ॑गावर काटा आणणारे स॑वाद व ते पडद्यावर साकारणारा हा महान अभिनेता! एबीसीएलच्या प्रच॑ड पराभवान॑तर कौन बनेगा करोडपतीच्या रूपात जणू काही राखेतून भरारी घेणार्या फिनीक्स पक्षासारखा अमिताभ! हे सगळे पिक्चर्स अस॑ख्य वेळा पाहूनसुद्धा समाधान होत नाही. स॑दीपशेठची अवस्था एक अमिताभ फॅनच समजू शकतो.
पण आमच्या अमिताभप्रेमाला त्याच्या मूर्ख बायकोमुळे उगाचच गालबोट लागल्यासारखे झाले आहे त्याला काय करावे?
दोन्ही भाग वाचले आणि आवडले.
अमिताभचे आजकालचे कारनामे सोडता (राग येतोय पण) त्यानं ज्याप्रकारे आपल्याला वेड लावलयं त्याचं वर्णन बरोबर शब्दात केलेत.
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
कार्यक्रमाच्या हायलाईट बघत होतो असे वाटले. असा प्रोग्रॅम फुकट पहायचा म्हणजे कित्येक जाहीराती झेलाव्या लागतात पण तो त्रास तु वाचवलास संदीप. :-) एकदम मजा केली हे कळतेय.
याची देही याची डोळा पहिल्यांदा अमिताभला प्रत्यक्ष बघायचा आनंद घेतला तो प्रसंग आठवला.
अवांतर - लहानवयात अमिताभच्या अभिनयाची जादू आणी क्रिकेटचे वेड हे कधी भिनले कळलेच नाही. आजच्या मुलात अमिताभच्या ऐवजी ऋतिक, शाहरुक असतील पण बहुदा क्रिकेट असेलच :-)
संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
संदीप भौ, तुम्ही जर यु. एस. मधे असाल तर Bon Jovi, U2, Cold Play यांचे रॉक शो पाहुन काही तरी लिहा ना! आमच्या नशीबात नाही हो हे शो पाहायचे! अमिताभ आणी माधुरी बद्दल काय लिहताय? त्याना पाहुन आणी एकुन डोळे आणी कान विटले. अमिताभ तर काय कायम कळकट चेहर्याने जाहीरातिचा रतीब घालत असतो. त्याचं काय राव एवढं कौतुक कराताय? ( त्याच्या जुन्या चित्रपटांचा मी पण फॅन आहे, पण आता बास म्हणायची वेळ आली आहे)
संदीप, जबरीच मजा केली आहे तुम्ही. जेलसी मीटर खूप जास्त रिडींग दखवतं आहे आत्ता.... :)
बाकी माझ्या पुरतं बोलायचं तर एवढ्या पैश्यात मला फक्त अमिताभ आणि माधुरी दिसले असते पूर्णवेळ तरी चाललं असतं.... ;)
बिपिन कार्यकर्ते
अतिशय सुंदर शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'कलाकार' अमिताभला पर्याय नाही. त्या 'कलाकारा'ला शंभर प्रणाम.
लातूर भूकंपाच्या वेळी त्याने एक गाव दत्तक घेतलं होतं. निदान तसं पेपरात छापून तरी आलं होतं. पण ते दत्तकत्व पुढे निभावलं की नाही, कोण जाणे.
त्याला यूपी बद्दल प्रेम असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण तसेच राजलाही महाराष्ट्राबद्दल प्रेम बाळगण्याचा अधिकार आहे.
जया बच्चनला मराठी भाषा येत असूनही (असे अमिताभच म्हणाला होता) 'हम यूपी वाले है| हम हिन्दीमेंही बात करेंगे| हे वाक्य तिने ज्या खिजवण्याच्या अभिनयात म्हंटले त्याला 'पायताण काढून हाणणे' ही एकच शिक्षा योग्य होईल.
मराठी माणसांनी परप्रांतियांशी स्पर्धा करून सर्व क्षेत्रात हिरीरीने आपली मोहोर उमटवावी.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
फारच छान लिहिले आहेस :)
महाराष्ट्रीय अस्मितेपेक्षा अमिताभ मोठा नाही...!
तात्या.