Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/01/2017 - 07:04
🗣 310 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
83433 वाचन

💬 प्रतिसाद (310)
ग
गॅरी ट्रुमन Wed, 12/06/2017 - 05:42 नवीन
भाजपा ६० वरून डायरेक ४९-५०वर येईल असं वाटत नाही.
गुजरातमध्ये कोणत्याही पक्षाला ६०% मते मिळाली तर तो पक्ष १८२ पैकी १६५-१७० जागा सहज जिंकेल. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला १८२ पैकी १६५ मतदारसंघांमध्ये आघाडी होती. २०१४ मध्ये निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये दिल्लीमध्ये भाजपने सुमारे १२% मते गमावली होती. भाजपला लोकसभेत ४६% तर विधानसभेत ३४% मते होती. राष्ट्रीय पक्षांना लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये कमी मते मिळतात हा नेहमीचा अनुभव आहे. या न्यायाने भाजपने इतर राज्यांमध्ये विधानसभेत काही प्रमाणात मते जरूर गमावली होती पण दिल्लीमध्ये गमावली तितक्या प्रमाणावर नाही. उत्तर प्रदेशात मात्र भाजपने आपली मतांची टक्केवारी जवळपास सारखी ठेवली होती. दिल्लीमध्ये भाजपने इतकी मते गमावली याचे कारण (मला वाटते) दिल्ली भाजप हे गेल्या कित्येक वर्षांपासून दुभंगलेले घर होते. लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली शहरात भाजप अशा स्थितीत असतानाही मोदींच्या नावावर लोकांनी मते दिली पण विधानसभेत मात्र हा विकनेस झाकता आला नाही. त्यातच केजरीवाल हा लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रतिस्पर्ध्याकडून होता. गुजरातमध्ये हे दोन्ही घटक महत्वाचे नाहीत. तरीही २०१४ मध्ये मुळात ६०% मते हा आकडाच खूप मोठा होता आणि मोदीलाटेत भाजपने अभूतपूर्व इतकी मते घेतली होती. तितकी मते ही भाजपची 'नॅचरल स्टेट' आहेत असे याक्षणी तरी वाटत नाही. त्यामुळे त्यात घट होईल असे वाटते आणि मुळातला ६०% हा बेस मोठा असल्यामुळे त्यात १०% घट होऊ शकेल असे गृहित धरून मी आकडेमोड केली आहे. खरोखर काय होते ते १८ डिसेंबरला कळेलच. पण भाजपने १०% नाही तर ५% च मते गमावली तर १५०-१५५ आणि १५% मते गमावली तर ९५-१०० च्या आसपास जागा मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Wed, 12/06/2017 - 06:30 नवीन
येस येस, दिल्ली २०१५ मध्ये भाजपाने दिल्ली २०१३चा व्होटशेअर २०१५ मध्ये राखला होता. २०१४चा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
रामदास२९ Wed, 12/06/2017 - 08:17 नवीन
पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपची मते ३% नी कशी वाढली
बरोबर.. मला वाटत नाही.. हार्दिक पटेल चा एव्हढा प्रभाव पडेल.. कारण त्यामध्ये पण दोन गट आहेत.. त्यातले लेउवा पटेल हार्दिक बरोबर जायला तयार नाहीत तर कडवा काहीप्रमाणात त्याच्याबरोबर जातील .. कोन्ग्रेस कडे भा.ज.पा विषयीच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सन्घटना उरलेली नाही म्हणून तर हार्दिक,अल्पेश आणि जिग्नेश यान्च्यावर अवलम्बून राहावे लागत आहे..त्यात हे तिघे त्यान्च्या जातीचे नेते आहेत, पूर्ण राज्याचे आणि सर्वसमावेशक नाहीत. अल्पेश आणि जिग्नेश त्यान्च्या मतदारसन्घात अडकून बसले आहेत. CD प्रकरणामुळे आणि कोन्ग्रेसशी युती मुळे PAAS आणि त्याच्या समाजातील लोक नाराज आहेत, अल्पेशनी स्वस्तात(फक्त स्वतःचा फायदा बघून) कोन्ग्रेसशी युती केल्यामुळे आणि जिग्नेश ला निवडणूकीला अरुन्धती रोय अशा देशद्रोही ब्रिगेडने मदत केल्याने सर्वसामान्य लोका नाराज आहेत. राहूल यान्ची घोडदौड सोमनाथ, शहजाद यासारख्या सेल्फ गोल मुळे मन्दावली आहे. त्यातच मोदी आणि शहा उशिरा पण बरोबर आगेकुच करत आहेत.. कोन्ग्रेस चा सोफ्ट हिन्दुत्व, महन्त 'कपिल'नाथ वक्फ बोर्डाचे वकिलपत्र घेऊन मातीत मिळवत आहेत .. म्हणजे एकिकडे मन्दिरात जायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या मन्दिराला खोडा घालायचा.. वाह रे भय्या तेरी चाल .. जनता करेगी बुरा हाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
B
babu b Wed, 12/06/2017 - 10:12 नवीन
एकिकडे मन्दिरात जायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या मन्दिराला खोडा म्हणजे एकीकडे आम जनतेला टॅक्सच्या कायद्याची भीती दाखवायची अन व्होडाफोणची वकिली करुन त्यांची व्याजे माफ करायची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
र
राघव Wed, 12/06/2017 - 12:12 नवीन
मला एकदम कोणतातरी हिंदी न्यूज चॅनल लावल्यासारखं वाटलं..!! ;-) पण विरोधी मतांची विभागणी होऊ नये यासाठी केलेली ही [बळजबरीची] युती किती टिकेल याबद्दल आत्ताच शंका वाटते आहे. आता बिहार मधे जेव्हा नितिश + लालू + काँग्रेस झाले तेव्हा सुद्धा असेच वाटले होते.. मला एक समजत नाही.. अशा कोलांटउड्या मारतांना या पक्षांचे कार्यकर्ते कसे काय त्यांच्या लोकांना पटवून देत असतील? म्हणजे कालपर्यंत ज्यांना बेंबीच्या देठापासून बोंबलून शिव्या घातल्या त्यांचीच गळाभेट घ्यायची, तेही स्वतःचे पाठिराखे हातचे न जाऊ देता, तेही निवडणुकीच्या ऐन तोंडावर.. काय चेष्टा आहे? याला खरंच हिंमत लागते राव.. आपण तर कोपरापासून दंडवत घालतो अशांना..! [पाताळयंत्री]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
प
पुंबा Tue, 12/19/2017 - 15:05 नवीन
आयला! एबीपीचे अंदाज बर्‍यापैकी क्लोज आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
B
babu b Mon, 12/04/2017 - 21:22 नवीन
विविध वेबसाइट्स , फेबु, व्हाट्सपवर गंमत सुरु आहे. सुरुवातीच्या सर्वेचे आकडे दाखवून भाजपा येणार म्हणून सांगणारे लोक , आता नवीन आकडे बघितल्यावर , ' ह्या ! ह्ये सर्वे म्हणजे थोतांड असतात , ह्यांचे काही खरे नसते , ' असे सांगू लागले आहेत !
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 12/05/2017 - 07:18 नवीन
... तुमचा हा आयडी तुम्ही किती दिवसात घालवाल यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Tue, 12/05/2017 - 10:03 नवीन
डु आयडी - सत्य की थोतांड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
स
सुबोध खरे Tue, 12/05/2017 - 16:13 नवीन
तुम्ही कधी आणि कुठल्याही संस्थळावर ओरिजिनल आय डी घेतलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/05/2017 - 16:40 नवीन
त्यांचं नाव सगळ्यांना माहीत आहे.ते प्रसिद्ध "जामोप्या" आहेत.खरे नाव गजानन कागलकर आहे.त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला उत्तर नसले की मग हे असले डु आयडी वगैरे फाटे फोडायचं चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 12/06/2017 - 04:12 नवीन
त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला उत्तर नसले की मग हे असले डु आयडी वगैरे फाटे फोडायचं चालू आहे. उष्ट्रानाम् लग्नवेलायाम् गर्दभा: मंत्रपाठका: परस्परम् प्रशंसन्ते 'अहो रूपम् अहो ध्वनीम्'|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
M
mayu4u Wed, 12/06/2017 - 06:38 नवीन
गाढव आणि उंटाचा अपमान केल्याबद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 05:51 नवीन
हा हा हा हा हा पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
र
रमेश आठवले Fri, 12/08/2017 - 06:58 नवीन
माझ्या समरणात असलेला पाठभेद असा आहे. उष्ट्रांनां विवाहेषु गीतं गायन्ती गर्दभ:। परस्परं प्रशनसन्ति अहो रुपम अहो ध्वनिम ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 12/05/2017 - 17:32 नवीन
एक्झिट पोल निकाल दाखवायला बन्दी आहे ना? मग कसं काय दाखवतात.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 12/05/2017 - 19:00 नवीन
ओ काका, ओपिनियन पोल, बद्दल बोलत आहेत लोकं इथं.... उंनिस बिस सोडून द्यायचं असतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ज
जानु Tue, 12/05/2017 - 18:36 नवीन
तस राहुल बाबाने सुरुवात चांगली केली होती, लोक ते काय म्हणतात याकडे लक्ष ठेवायला लागले होते, पण सोमनाथ आणि राम मंदीर सुनावणीत सिब्बल यांची मागणी यामुळे सगळे मुसळ केरात जाईल, मुख्य्हतः हे दोन्ही सेल्फ गोल होते. त्यात भाजपाचा काहीच हात नव्हता.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 12/06/2017 - 01:50 नवीन
राहुलने काल 'आम्ही आलो तर कर्जमाफी देऊ' हे आता दुष्टचक्र वाढत गेले तर सरकारने शेतकय्रांना फुकट पोसायचं आणि जनतेने भाजी धान्य विकत घ्यायचं असं होईल.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/06/2017 - 04:34 नवीन
योगी अन फडणविसानीही तेच केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
M
mayu4u Fri, 12/08/2017 - 06:55 नवीन
फडणवीसांनी 'आम्ही आलो तर कर्जमाफी देऊ' असं आश्वासन दिलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 07:31 नवीन
आपल्याकडे "बारा" गावच्या साहेबानी नाही का मराठा आरक्षणाचे गाजर दाखवलं होतं. कर्ज माफी निदान देता तरी येईल. ते राज्य सरकारच्या हातात तरी असतं. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाला "वळसा" घालून कसे देणार होते? पाटीदारांना काँग्रेस आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे ते पोकळ आहे हे पाटीदार लोकांच्या सहा संघटनांनी पूर्व महाधिवक्ता श्री हरीश साळवे यांचे कायदेशीर मत मागवले असता स्पष्ट झाले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/congresss-quota-promise-not-feasible-say-six-patidar-outfits/articleshow/61939775.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
र
रामदास२९ Fri, 12/08/2017 - 07:37 नवीन
आरक्षणाचा गाजर दाखविणा सोपा आहे पण वास्तवात देणे फार अवघड आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रमेश आठवले Wed, 12/06/2017 - 03:49 नवीन
काँग्रेस राहुल गांधी यांचा पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक तारीख ११ डिसेम्बरलाच उरकून घेत आहेत. १८ डिसेंबर च्या हिमाचल आणि गुजरात यांच्या निकालाच्या आधी असे करण्याचे कारण, हार झाल्या नन्तर राहुलची बढती अप्रशस्त भासेल असे सोनियाजी आणि इतर पक्ष नेत्यांना वाटत असावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 12/06/2017 - 08:54 नवीन
रमेश आठवले, मला वाटतं की दोन्ही विधानसभांत काँग्रेस आधीपेक्षा चांगली कामगिरी करेल असा अंदाज नेतृत्वाला आला आहे. पप्पूच्या बढतीमुले नवचैतन्य वगैरे मथळे गाजवायला वाट मोकळी करायचा हेतू दिसतो आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
आ
आनन्दा Wed, 12/06/2017 - 11:02 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/07/2017 - 09:59 नवीन
एबीपी च्या ४ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणानंतर काल टाइम्स नाऊ आणि इंडिया टीव्ही या दोन वाहिन्यांनी आपल्या सर्वेक्षणाचे आकडे प्रसिद्ध केले. या तीनही सर्वेक्षणांचे एकत्रित अंदाज - Image removed.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 12/07/2017 - 17:19 नवीन
काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय राहुल गांधींना एकट्याला मिळु नये, म्हणुन त्यांचे ईतर नेते जबरदस्त मोर्चे बांधणी करत आहेत. जसे की कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 05:59 नवीन
काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय राहुल गांधींना एकट्याला मिळु नये, म्हणुन त्यांचे ईतर नेते जबरदस्त मोर्चे बांधणी करत आहेत. जसे की कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर. +१०० सेल्फ गोल करण्याची तर काँग्रेस मध्ये स्पर्धा लागली आहे. कालच श्री मणिशंकर अय्यर यांनी श्री मोदींना "नीच" म्हणून घेतले. त्यामुळे श्री मोदींच्या "जातीवर" (इतर मागासवर्ग) टीका केल्यामुळे काँग्रेसची गोची झाली आहे. (आज जरी त्यांना काँग्रेस मधून निलंबित केले तरी) त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी "आपलेच" नाक कापून काँग्रेसला जो अपशकुन केला आहे त्याची तोड नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 06:34 नवीन
मोदींना नीच म्हणणार्‍याला पक्षातून निलंबित केले. पण मौत का सौदागर म्हणणार्‍यांना मात्र पक्षाध्यक्षपद दिले. अर्जुन मोढवाडीयांनी मोदींना माकड, पिसाळलेला कुत्रा चावलेला इत्यादी म्हटले तरी त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. दिग्गिराजांनी म्हटले: मोदींचे यश म्हणजे चु** भक्त बनविले आणि भक्तांना चु** बनविले. तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. बी.के.हरीप्रसाद यांनी मोदींना 'गंदी नालीका किडा' म्हटले. तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. काँग्रेस नेते रिझवान उस्मानींनी मोदींचा बाप कोण असा प्रश्न विचारला तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. सलमान खुर्शीद यांनी मोदींना माकड आणि बेडूक म्हटले तरी त्यांना तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळातील टॉप चार पैकी एक पद दिले गेले. गुलाम नबी आझाद यांनी मोदींना गंगू तेली म्हटले तर बेनीप्रसाद वर्मांनी मोदींना नरभक्षक म्हटले. अर्जुन मोढवाडीयांनी मोदींना मंदबुध्दी असेही म्हटले होते. (या परीच्छेदातील वक्तव्यांचा संदर्भः http://deshgujarat.com/2013/04/06/a-list-of-how-congress-leaders-define-narendra-modi/). या सगळ्यांवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. पण मणीशंकर अय्यरने मोदींना 'नीच' म्हणजे त्यामानाने बर्‍याच सुसंस्कृत शब्दात शिव्या घातल्या तरी त्यांच्यावर कारवाई. बहोत ही नाइन्साफी है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
समाधान राऊत Fri, 12/08/2017 - 22:05 नवीन
नेमक्या हव्या असलेल्या प्रचाराच्या वेळी दिगीभावने माती खाल्ली आहे आणि याच संधीचा फायदा घेत त्यांच्यासोबत कांग्रेसच्या धा पाच जागांना धुळ चारली आहे(असे माझे मत). एरवी गरळ ओकणार्याची आज ना उद्या सुद्धा नंबर लागतील, जसा दिगीभावचा पाकदौरा हिशोबात लावला तसा, पण असाच कावळा बनवुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 06:46 नवीन
या निमित्ताने केजरीवाल साहेबानी श्री मोदींना भ्याड आणि मनोरूग्ण( coward and psychopath) म्हटल्याचे आठवते. आजकाल दिल्लीच्या प्रदूषणामुळे त्यांचा आवाज बसला आहे असे आपटार्ड कडून ऐकले.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/08/2017 - 08:46 नवीन
गुजरातमधील ४७ मतदारसंघांत मुंबईकर शिवसैनिकांचा तळ !! गुजरात मध्ये कित्येक शतक रहाणार्या मराठी भाषिक नागरीकावर भरोसा ठेवुन भाजपाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना आपले उमेदवार रिगणात उतरवणार आहे ! स्वतच नाक कापुन दुसर्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की तोडावर पडणार !
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 08:58 नवीन
स्वतच नाक कापुन दुसर्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की तोडावर पडणार !
हे गुजरातमध्ये जाऊन नक्की काय प्रचार करणार? हा की मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत? हा की मोदी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये हलवत आहेत? हा की मोदी नेहमी गुजरातला झुकते माप देतात? यांना महाराष्ट्रातही कधी २२-२३% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. गुजरातमध्ये यांची संघटना अस्तित्वात नाही. आणि निघालेत मराठी मराठी करत मते मागायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 09:33 नवीन
घराणेशाही वर घरचा आहेर . रोचक आहे ही बातमी: पार्टी विद डिफरेन्स .... https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-gujarat-minister-rapped-the-bjp-for-rahul-gandhis-side-1597790/
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 12/08/2017 - 09:48 नवीन
शिवसेनेच्या कुठल्या मराठ्यांनी तोडफोड करून तुम्हा बिग्रेडींना प्रत्युत्तर दिले.. त्याचा संदर्भ सापडला का..? का तुम्ही नेहमीप्रमाणे आधी टेपा लावून नंतर शेपूट घातली..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Fri, 12/08/2017 - 10:32 नवीन
समर्थ रामदास यांच्या हेरगिरीचे पुरावे येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Fri, 12/08/2017 - 13:20 नवीन
मोदक राव जरा अदबीने घ्या. ज्या त्या धाग्यावर जाऊन त्या खाली प्रतिसाद द्या. माझी काही तक्रार नाही. ... शेपूट बिपुट घालणे असली भाषा वापरणे सोडा एवढे सुचवू इच्छितो. मी काही तुमचा बांध रेटलेला नाही. मागे तुम्हाला व्यक्तिगत निरोप देऊन सांगितले सुद्धा आहे. तुम्हाला माझ्याशी काही दुश्मनी वगैरे आहे का? जिथे तिथे जाऊन तुम्ही आणि मयूर माझ्या प्रतिसादाखाली कब्बडीत करतात तशी साखळी करून इतर धाग्यांचे प्रश्न विचारात राहत आहात. एवढे वयक्तिक होण्याचे काही कारण समजले नाही. सायकलचा संदर्भ मी कुठे वापरला असेल तर ते फक्त रूपक होते जे तुम्ही इतरांना ट्रक घेऊन फिरता असे विचारत असता म्हणून. त्या बद्दल तुम्हाला आक्षेप असेल तर मी सायकल स्टॅन्ड वर लावून कुलूप लावून ठेवतो. .... आता राहिला प्रश्न कोणते मराठे ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी भिडले त्याचे उत्तर माझ्या कडे आहे फक्त तुम्हाला ते सप्रमाण पाहिजे असणार म्हणून प्रयत्न चालू आहेत. आता माझा सगळा काम धंदा सोडून तुमच्या "काळू बाळू"ची उत्तरे शोधत बसायचे म्हंटल्यावर मग काय बोलायलाच नकोच. तूर्तास तुम्हीच बरोबर हा ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे. --- @संपादक मंडळाने यांना मिपाच्या मार्गदर्शक तत्व नुसार समज द्यावी. माझे काय चुकत असेल तर मला पण त्या संबंधात माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/08/2017 - 18:18 नवीन
आदब...? तुमच्यासोबत..?? आपण आदबीने वागतो असलो तर समोरच्याकडून अपेक्षा करावी साहेब. तुम्ही घाणेरड्या भाषेत मनाला येईल ते खोटेनाटे प्रछन्न आरोप करणार आणि समोरच्याने फक्त ऐकून घ्यावे किंवा आदबीने प्रतिवाद करावा ही भाबडी अपेक्षा सोडा. विनाकारण सायकलचा संदर्भ आणून खोड्या काढायला तुम्ही सुरूवात केली आणि आता झेपत नाही म्हणून सज्जनपणाचा आव आणून कुलूप बिलूप भाषा बोलत आहात. ट्रकचे संदर्भ मी माझ्या जबाबदारीवर वापरले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर द्यायला मी समर्थ आहे. तुम्हाला झेपणार असेल तर अजूनही सायकलचे संदर्भ वापरा मात्र प्रत्युत्तर मिळेलच याची खात्री बाळगा. बाकी माझीही तुमच्याशी दुश्मनी नाही. विनाकारण वाद उत्पन्न करणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान असणार्‍या महापुरूषांबद्दल गलिच्छ आणि एकेरी भाषा वापरणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा अकारण सायकल वगैरे संदर्भ आणून शिरसंधान करणे - तुम्ही मान्य केले आहेच. खोटे बोलणे - संदर्भ - शिवसेनेच्या मराठ्यांनी बिग्रेडी मराठ्यांना प्रत्युत्तर दिले दडपशाहीची भाषा वापरणे - तुम्ही श्रीगुरूजींना दिलेल्या धमक्या असे प्रकार तुम्ही टाळलेत तर तुम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाचीच वागणूक मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 12/09/2017 - 08:08 नवीन
<<<<तुम्ही घाणेरड्या भाषेत मनाला येईल ते खोटेनाटे प्रछन्न आरोप करणार आणि समोरच्याने फक्त ऐकून घ्यावे किंवा आदबीने प्रतिवाद करावा ही भाबडी अपेक्षा सोडा.>>> ==>> धरण, धोतर, पिलावळ, शेपूट , बूड हे तुमच्या लेखी सुसंस्कृत शब्द? तशी तुमच्या कडून अपेक्षा ठेवून उपयोगाचे नाही. मुद्दा खोदून काढायचा असेल तर फक्त अदबीने वयक्तिक हल्ले करा. खरे -कि खोटे ठरवणारे तुम्ही काय मिपाचे न्यायधीश नाही आहात. <<< तुम्हाला झेपणार असेल तर अजूनही सायकलचे संदर्भ वापरा मात्र प्रत्युत्तर मिळेलच याची खात्री बाळगा.>>> ==>> धरण सारखे कुठून येत आहे. धोतराचा बराच वेळा खुलासा करून देखील कशाला वापरत होतात? <<< विनाकारण वाद उत्पन्न करणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा>>> ==>> कोपर्डी निकालाच्या वेळेस तुमचा तटस्थ पण कुठे गेला होता, ज्या वेळेस मराठा आणि दलित यांच्यात वाद निर्माण केला जात होता. <<< अकारण सायकल वगैरे संदर्भ आणून शिरसंधान करणे - तुम्ही मान्य केले आहेच.>>> ==>> अकारण धरण, शेतकरी कर्जमाफी, डांगे बरोबरची कंपूबाजी हे कुठून उपजत होते? <<<खोटे बोलणे - संदर्भ - शिवसेनेच्या मराठ्यांनी बिग्रेडी मराठ्यांना प्रत्युत्तर दिले>> ==>> हे खरे कि खोटे याचा निवडा करणारे तुम्ही कोण? मुद्दा खोडून दाखवा शिवेसेनेतले मराठे नव्हते ब्रिगेडला विरोध करायला. <<< दडपशाहीची भाषा वापरणे - तुम्ही श्रीगुरूजींना दिलेल्या धमक्या>>> ==>> तुम्ही काय चौकीदार आहात मिपाचे? गुरुजी आणि मी बघून घेईन. एक शरद पवार आणि ब्राह्मण्यवाद हा विषय सोडला तर माझे त्यांच्या बरोबर सलोख्याचे संबंध आहेत. ते सुद्धा हे मान्य करतील. ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा असला तरी श्री गुरुजी, नाखु जी, पैसे ताई, डांगे अण्णा, अजो, अत्रे, पीर ताई, सुबोध जी असे अजून असंख्य लोक आहेत जे माझ्या माहिती प्रमाणे ब्राह्मण आहेत ज्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जातीच्या चौकटी मिपावर आल्यावर कधीच सोडून दिल्या आहेत. <<< असे प्रकार तुम्ही टाळलेत तर तुम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाचीच वागणूक मिळेल.>>> ==>> मिपावर आवार्ड वाटपाचे काम मालकांनी तुम्हाला दिले कि काय ?? तुमच्या कडून मिळणार असेल घायचा आधीच आवार्ड वापसी करतो मी. (एवढे तुम्हाला स्पष्टीकरण देऊन मिपावरचे तुमचे महत्व मला खरे वाढवायचे नव्हते, पण नाईलाज झाला) असो पुढील वाटचाली करता शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Sat, 12/09/2017 - 08:21 नवीन
गा पै पण एडवा... माझे फेव्हरेट आहेत ते आणि मी त्यांचा जबरा फॅन आहे (गा पै कृपया हा. घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Sat, 12/09/2017 - 17:06 नवीन
बाकीचे मुद्दे चर्चा करूच. तोपर्यंत हे मुद्दे सांगा. >>> मुद्दा खोदून काढायचा असेल तर फक्त अदबीने वयक्तिक हल्ले करा. कसे असते विशुमीत, इथे आपण चार नवीन गोष्टी वाचायला, नवीन माणसे जोडायला येतो. आपले मतभेद असतानाही तुमच्या शेतीच्या ज्ञानाबद्दल मी स्वत: कौतुक केले आहे आणि तुम्हीही माझ्या शंकाना उत्तरे दिली आहेत. या संवादात मी किंवा तुम्ही लै काही ग्रेट काम केले नसले तरी "योग्य विषया संबंधीत संवाद अशक्य नाही" इतकेच. चुकते कुठे.. तर वैयक्तीत हल्ल्यांना सुरूवात तुम्ही केलीत. ट्रकच्या आणि सायकलच्या रेफरन्सने प्रतिसाद दिले. खोटेपणा आणि बिग्रेडी अजेंडा रेटायला सुरूवात केली. तुम्हाला असले घाणेरडे लिखाण करताना आदब, संकेत वगैरे गोष्टी आठवल्या होत्या का..? नाही. या गोष्टी तुमच्यावर उलटल्यावर हे सगळे आठवत आहे. तुम्ही खोटेपणाची सुरूवात केली नसती तर तुमच्याकडे संदर्भ मागितले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. इथे लिहा की तुम्ही खोटेपणा केला आणि समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी केलेली विधाने बिनशर्त मागे घेत आहे. मी ही विषय संपवेन. >>> तुम्ही काय चौकीदार आहात मिपाचे? गुरुजी आणि मी बघून घेईन मग याच न्यायाने ट्रक आणि डांगेंसोबत काय बोलायचे ते मी बघून घेतो की, तुम्हाला डांगेंनी वकीलपत्र दिले आहे का..? >>> मुद्दा खोडून दाखवा शिवेसेनेतले मराठे नव्हते ब्रिगेडला विरोध करायला. भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले. हे तुमचेच वाक्य आहे. वरच्या दोन वाक्यात विसंगती वगैरे आहे याची जाणीव होते आहे का..? तसेच जातीच्या चौकटी सोडल्या होत्या ना..? मग शिवसेनेत आणि भाजपमध्ये किती कोण मराठे होते ते तुम्हाला कुठून कळाले..? >>> जातीच्या चौकटी मिपावर आल्यावर कधीच सोडून दिल्या आहेत मग माझ्यावर व्यनीतून जातीवाचक आरोप करणे, कोणते मिपाकर ब्राह्मण आहेत आणि कोणते नाही याचेही रेकॉर्ड ठेवणे. हे काय आहे..? नक्की काय ते एक ठरवा की. शेतकरी कर्जमाफीबद्दल मी कुणाला उद्देशून काय बोललो आहे त्याचा संदर्भ द्या. हवेत आरोप करून सहानुभूती गोळा करू नका. मलाही तुमच्याकडे उत्तर मागण्याचे काहीच कारण नाही. ..पण किमान जे लिहित आहात त्याला संदर्भ बाळगा इतकेच. संदर्भ नसतील तर विधाने मागे घेणे सोपे आहे. मी चुकून असे कधी केले तर मला विधान मागे घ्यायला कधीही कमीपणा वाटणार नाही. माझ्याकडून पूर्णविराम - तुम्हाला तुमची विधाने मागे घेऊन व सामाजिक संकेत पाळून चर्चा करावयाची असल्यास तुमचे केंव्हाही स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 12/09/2017 - 20:20 नवीन
माझी कोणतीच विधाने मी मागे घेणार नाही. अन मला तुमच्याशी कोणतीच चर्चा करायची ही नाही आहे. भविष्यात कधी तूम्हाला माझ्या प्रतिसादला वैयक्तिक प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरा अदबीने. खुळचटपणा खपवून घेणार नाही. सामाजिक संकेत कसे पाळतात याची मला चांगली जाण आहे. तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. आता अवांतर बंद करा आणि चांगल्या धाग्याला वाट मोकळी करा. !!राम राम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 12/09/2017 - 21:35 नवीन
तुमच्यासारख्या फालतू बिग्रेडी लोकांशी सरळ संवाद शक्य नाही हा अंदाज खरा ठरला. राजकारण्यांच्या कच्छपी लागून इतिहासाचे विकृतीकरण आणि महापुरूषांवर बिनबुडाचे आरोप करून तुम्हाला नक्की काय काय मिळते ते तुम्हालाच माहिती, तुमची जी कांही गरज / मजबुरी असेल ती असेल.. मात्र असल्या हीन मनोवृत्तीचा इथे विरोधच होईल याची खात्री बाळगा. तुमच्या बोलवित्या धन्याच्या पिंका झेलून ते सगळे इथे ओतण्यापेक्षा संदर्भासह लिहिणे सोपे आहे, मात्र ते सोयीचे नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे रेटणे सुरू आहे हे उघड आहे. तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा. शक्य झाल्यास मोठे व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 12/10/2017 - 06:51 नवीन
उगी उगी रडू नका... सर्टिफिकेट्स वाटण्याखेरीज काहीच काम उरलेले दिसत नाही. ... तेवढे फक्त ब्रिगेडी, फालतू, पिंका झेलणे हे शब्द टाळा. तुमच्या सारख्या २ दमडीच्या माणसाचे असले शब्द ऐकून घायला तुम्ही काय माझे कोणी लागत नाही आहात. बाकी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा फक्त ते संबंधित धाग्याच्या संबंधित प्रतिसादावर जाऊन विचारा? कोणाला उत्तरे द्याची आणि कोणाला नाही ते मी ठरवीन. आणि हो संवाद साधण्यासाठी सामाजिक संकेत कसे पाळले जातात याचा जवळ पास कुठे क्लास आहे का ते शोधा. उपयोगी पडेल. .... ( रात्रभर झोपले होते कि नाही ? मी रात्री पाणसिंग तोमर बघून झाल्यावर पण तुम्ही जागेच. शक्य असल्यास एक काम करा मस्त झोप काढा दुपारी ३ वाजे पर्यंत. झोप उडून देऊ नका आरोग्याची काळजी घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 12/10/2017 - 10:08 नवीन
मिरच्या झोंबल्या का? असो, इलाज करून घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 12/10/2017 - 10:27 नवीन
तुम्ही एक झोप काढा, फ्रेश वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 11:46 नवीन
ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा असला तरी श्री गुरुजी, नाखु जी, पैसे ताई, डांगे अण्णा, अजो, अत्रे, पीर ताई, सुबोध जी असे अजून असंख्य लोक आहेत जे माझ्या माहिती प्रमाणे ब्राह्मण आहेत ज्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
अहो, संबंध चांगले असण्याचा आणि कोण कोण्या जातीचा असण्याचा संबंध काय? तुमचे ब्राह्मणांशी संबंध चांगले नसले तरी माझे तुमच्याशी चांगलेच संबंध असतील. चांगले संबंध हे व्यक्तिगत असतात. कोणत्या का निमित्ताने असेना, आपण माझ्याशी संबंध चांगले आहेत असे म्हणाला आहात त्याबद्दल आनंद आहे. ============================= तुम्ही रामदासांना स्वराज्याच्या शत्रूचे हेर म्हटले तरी, आणि माझे त्यांच्याबद्दल आदराचे मत असले तरी, आपले व्यक्तिगत संबंध चांगले असू शकतात. प्रत्येकाचं तसं नसतं. म्हणून तुम्ही मोदक यांना पुरावा आहे कि नाही हे सांगा. ============================== भांडारकर केसमधे मी संभाजी ब्रिगेडला पाठींबा दिला (मंजे मी एक छोटाच माणूस आहे, पण मी फक्त ब्रिगेडचा राग समर्थनीय आहे असं म्हणालो कोणत्यातरी धाग्यावर.) तेव्हा माझे काही मित्र नाराज झाले. पण बिनबुडाच्या गोष्टींमधून भारताच्या महान राष्ट्रपुरुषाचा बाप काढणे हि डोके फिरवणारीच गोष्ट आहे. लोकशाहीमधे हिंसेचे समर्थन करता येत नाही, करयचेही नाही, तो भाग वेगळा. पण तो राग, विरोध किमान मलातरी नैसर्गिक / समजण्यासारखा आहे. तो राग फक्त ब्रिगेडलाच यावा हे अजूनच दुर्दैवी वाटले. ============================================ रामदास हेर होते हे तुम्हाला १००% वाटते कि काही तुमच्या नावडत्या वा भांडारकरी वृत्तीच्या म्हणू ब्राह्मणांना असे म्हटल्याने दु:ख होते म्हणून बोल्लून टाकायचा आनंद घ्यायचा? नै मन्जे तुमची बॉलिंग दुसरीकडे असली तर आम्ही का विकेट पाडून घ्यायची? ===================== मी देखील अनेक राष्ट्रपुरुषांचे दुर्गूण पाहतो, त्यातली त्यात नेहरू गांधी मला कमी आवडतात, रादर नकोसे वाटतात, पण हे सगळं त्यांच्या अधिकृत भूमिकेवर आधारित आहे. गॉसिपवर नाही. मला एक ब्राह्मण म्हणून जगाकडे पहायचं नाही (सवय पण कमी आहे.) प्पण जंड्रली थोर पुरुषांबद्दल जेव्हा असं काही लिहिलं बोललं जातं तेव्हा ते सत्य मानायचं आहे का, असत्य मानायचं आहे का, का ही ब्रिगेड वि. भांडारकर मॅच आपल्यासाठी नाही म्हणून सर्वांना महान मानत वा विसरत पुढे जायचं हे कळण्यासाठी तुमची मदत हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 12/11/2017 - 12:39 नवीन
कृपया या धाग्यावर मला हि चर्चा नको आहे. संध्याकाळी व्य नि करू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 12:50 नवीन
चालेल. पण चर्चा व्यनित नसलेली बरी. कारण व्यक्तिशः मला या कोणत्याच विषयात रस नाही. नाही मंजे इतका नाही कि वैचारिक मतभेदांची पार्श्वभूमी मला एकट्यालाच माहित असावी. बाकी थोडा थोडा इंटरेस्ट असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा