Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/01/2017 - 07:04
🗣 310 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
83433 वाचन

💬 प्रतिसाद (310)
र
रामदास२९ Mon, 12/11/2017 - 16:24 नवीन
तेव्हा काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे. त्याला हे नेहमीचे मापदंड लावता येणार नाहीत.
१००% सहमत .. सरकारला फक्त आपला विचार करून चालत नाही , सर्वान्गीण विचार करावा लागतो. काश्मिर मधे पी.डी.पी शी युती ही माझ्या मते आम्ही शान्तता प्रस्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत हे जगाला दाखविण्याचा भारत सरकार( भा.ज.पा किन्वा कोन्ग्रेस) ची योजना आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिर मधे लोकशाही कशी नाही आणि आम्ही कसा प्रामाणिक प्रयत्न करतो हे भारत दाखवतो. त्यामुळे बाकी देश पाकिस्तानवर दबाव टाकतात आणि त्यान्च्या सार्वमताच्या प्रस्तावाला विरोध करतात. नावापुरता नागरी सरकार आणि आतून लष्कर नियन्त्रीत कारभार अशी आत्ताची परिस्थिती आहे.त्यामुळेच काश्मिर मधील अतिरेकी मारले तरी जातात किन्वा शरण येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 13:38 नवीन
आपल्या लिंकेतून...
In fact, Chief Minister Mehbooba Mufti is widely reg­arded as a pioneer in this. When she was an Opp­osition leader, she would visit the houses of militants who were killed and mourned their deaths. In 2002, when her party, the Peoples Democratic Party (PDP), won 16 of the 87 seats in the J&K assembly, it asked the militants to give up the gun as they now had “16 representatives in the assembly to plead their case”.
तेव्हा बाई नुकत्याच काँग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या. अ‍ॅनी वे, भाजपने एका शांतीवादी पक्षाला राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे. मंजे आता त्या अशा भेटी देत नाहीत. http://www.thecitizen.in/index.php/en/NewsDetail/index/3/10112/Mehbooba-Mufti-Happy-12-Youths-Left-Militancy-And-Surrendered आता त्या म्हणतात - “It gives me immense happiness to see that 12 youth, who had joined militants in the last year, have returned to their homes. Our government will see to it that more youths who have deviated from the path are returned to their families safely," Mufti said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 13:08 नवीन
मोदी ज्या पद्धतीने पाकिस्तान चा प्रचारामध्ये उपयोग करून घेत आहेत किंवा ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते एका पंतप्रधानाला न शोभणारे आहेत, पंतप्रधान पदाची किमंत उतवणारे आहेत.
असेच वर्तन पुरोगामी क्लिंटनताई आणि ओबामाभाऊ करतात तेव्हा मात्र ते अत्यंत सुशोभनीय असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 13:13 नवीन
आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.
मग इ व्ही एम हॅक केलंय असं काँग्रेस १५ दा म्हणाली तेव्हा निवडणूकीची विश्वासहर्ता वाढवायची होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 13:16 नवीन
कारण हा राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.
समजा मोदी खोटं बोलले असले तरी त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षा कशी बाधित होईल याचा मेकॅनिझम कळेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 13:24 नवीन
राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान चा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित म्हणून समजू शकतो पण गुजरात च्या निवडणुकीत काही वेळा त्याचा वापर समजू शकतो परंतु सगळी भाषणे पाकिस्तान भोवती फिरवणे, तेही कॉंग्रेस जिंकण्याची श्यक्यता कमी असताना , हे वैफल्याच लक्षण आहे. गुजरात च्या निवडणुकीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बंगालदेश यावर नको तर लोकल मुद्द्यवर बोला. किती रोजगार निर्मिती केली, गरिबी किती दूर झाली, किती विकास झाला, पायाभूत सुविधा किती उभारल्या, नोटाबंधी आणि gst कसे चांगले हे सांगा.
खरंय म्हणा तुमचं, पण गुजराती लोकांना देशाची काळजी पडलेली असते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 12/11/2017 - 14:44 नवीन
@अजो साहेब तुमच्या अनेक प्रतिसादानं आणि प्रश्नांना एकत्रित प्रतिसाद देतो १. ओबामा आणि हिलरी याविषयी मी कोणतही मत प्रदर्शित केल नवते त्यामुळे मी त्याला उत्तर देवू शकत नाही २. EVM च्या बाबत विरोधी नेत्यांच्या भूमिकीशी मी सहमत नाही, निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वासआहे. EVM छेडछेडीच्या काही घटना मध्ये संशय असेल हि परंतु पूर्ण निवडणूक फिरवणे अश्यक्य आहे. EVM मुळे कॉंग्रेस पंजाब मध्ये जिंकली हे विसरता कामा नये. ३. पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही. तुम्ही एक ओळीचे प्रश्न विचारण्यापेक्षा तुमचे मत लिहित चला, मुद्देसुद्ध प्रतिसाद लिहून माझे मुद्दे खोडत चला हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/11/2017 - 17:52 नवीन
पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही.
या पद्धतीने आपल्या मूळ भूमिका सोडून चार पक्ष/लोक एकत्र येऊन जातीपातीच्या राजकारणाने निवडणुका जिंकायचा प्रयत्न करत असतील तर भाजपने काय वाट्टेल ते करावे आणि ते हाणून पाडावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बिहार मध्ये झाले ते पुन्हा होऊ देऊ नये. काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
प
पगला गजोधर Mon, 12/11/2017 - 18:54 नवीन
काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!
होय बरोब्बर आहे तुमचं, त्याऐवजी धर्मा धर्मांमधे पोलरायझेशन करून नाझी टाईप पोग्राम... असा नवा पायंडा पडायला हवा, असंच म्हणायचंय तुम्हाला सर....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/11/2017 - 19:38 नवीन
परत नीट वाचा! धर्मधर्माचं कौतुक हा देश 70 वर्षांपेक्षा जास्त काळ पाहत आहे त्यामुळे त्याचं एक राहुद्याच! बाकी धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 12/12/2017 - 03:03 नवीन
धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!
दोन्हीही ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/12/2017 - 03:49 नवीन
असहमत! जातींमध्ये फूट पडणे अत्यंत धोकादायक आहे आणि ते अगदी उघडपणे करणारे पक्ष दुसऱ्या पक्षांना हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात हेच मुळी हास्यास्पद आहे. भाजपने अगदी जशास तसे "राजकारण" करावे आणि निवडणुका जिंकाव्यात. उगाच पार्टी विथ डिफ्फरन्स वगैरे च्या भानगडीत समोरच्याच्या गलिच्छ राजकारणाला विजयी होऊ देऊ नये. हा मार्ग चालत नाही कळल्यावर तरी मार्ग बदलतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
च
चष्मेबद्दूर Mon, 12/11/2017 - 13:51 नवीन
आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. व्यक्तिशः मला देखील मोदींचं या भाषणात केलेलं वक्तव्य अजिबात आवडलेलं नाही. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरळ सरळ पाकिस्तानचा हस्तक्षेप आहे या निवडणुकीत आणि मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या स्नेह भोजनात मनमोहन सिंग, पूर्व मिलिटरी चीफ, आणि काही ब्युरो क्रॅट्स यांचा काही पाकिस्तानी ऑफिसिअल्स शी गुजरात निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाल्या असा आरोप आहे.( अहमद पटेलनी मु.मं.व्हावं असं म्हणे पाकिस्तानला वाटतं.) आणि बराच काही म्हणालेत नमो. या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात.. प्र.पदाला शोभेल असं थोड तरी वागायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/11/2017 - 14:06 नवीन
दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात..
एक गोष्ट सांगा. समजा खरोखरच मोदींनी यांना तुरूंगात टाकले तर तुम्ही त्याचे समर्थन करणार आहात का? जर उत्तर नाही असे असेल तर असल्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. भारताच्या राजधानीत भारतीय संसदेवर हल्ला करायच्या भयंकर प्रकारातल्या दहशतवाद्याची 'पुण्यतिथी' साजरी होते, घराघरातून अफजल निघतील अशा घोषणा होतात, भारत देशाचे तुकडेतुकडे होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे जाहिरपणे म्हटले जाते आणि अशांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात टाकले तरी लोक त्याविरूध्द बोलणारे पण असतात. तेव्हा मणीशंकर अय्यर आणि मनमोहनना तुरूंगात टाकले तर सर्व पुरोगामी किती हलकल्लोळ करतील याची कल्पनाच केलेली बरी. एकूणच या देशात या पुरोगामी आणि ढोंगी सेक्युलर लोकांची विषवल्ली फारच फोफावलेली आहे. तिची पाळेमुळे उध्वस्त व्हायला हवीत आणि अजूनही मोदी ते करण्याच्या स्थितीत नाहीत. मिडियामध्ये, विद्यापीठांमध्ये पुरोगाम्यांचे मोठे वर्चस्व आहे. ते पूर्ण उध्वस्त करायची ताकद मोदींमध्ये यावी म्हणूनच मोदींना माझ्यासारखे लोक पाठिंबा देतात. जर का या हलकटातल्या हलकट डाव्या पुरोगाम्यांना कोणी देशोधडीला लावू शकेल तर तो नेता म्हणजे मोदीच आहे. सध्या तरी दुसरा नेता दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
च
चष्मेबद्दूर Mon, 12/11/2017 - 17:48 नवीन
भाजपा वाल्यांची स्वतः सोडून बाकीचे सर्व देशद्रोही किंवा negative विचारांचेच आहेत अशी मनस्थिती झालीये हे परत स्पष्ट होतंय तुमच्या प्रतिसाद वरून. असो, कुठल्याही देशभक्ताला वाईट गोष्टी करणारे तुरुंगात जावे असंच वाटत असतं. आणि देशद्रोह्यांना त्यांचा गुन्हा सिद्ध करून शिक्षा द्यावी अशीच त्यांची इच्छा असते. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा फडकवणे आणि सिनेमाच्या आधी राषट्रगीताला उभे राहणे नाही, हे समजून घ्यावं. राहवलं नाही म्हणून प्रतिसाद लिहिला. ______________===_______===___________ जल्पकांच्या या जगी जाहले कठीण हे जगणे, भाळी बसती कित्येकांच्या नकोसे शिक्के.. च.ब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/11/2017 - 17:57 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
A
arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 14:07 नवीन
या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?
पाकिस्तानला बिजेपी आणी कॉग्रेस एकच वाटत नाही, त्यांना काँग्रेस जास्त पसंद आहे, त्यातली त्यात काँग्रेसमधले मुस्लिम नेते अजून जास्त पसंद आहेत आणि पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे हे काही गुजराथी लोकांना माहित नसेल म्हणून केला असेल शंख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
श
श्रीगुरुजी Tue, 12/12/2017 - 07:02 नवीन
आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. ते पत्र वाचून हसू आलं आणि चीडही आली. म्हणे मोदींनी घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. म्हणे गुजरातमध्ये पराभवाच्या भीतिमुळे मोदींनी अपशब्द वापरणे सुरू केले आहे. म्हणे मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले. म्हणे मोदींनी देशाची माफी मागावी. आपल्या १० वर्षाच्या कारकीर्दीत हे भारतातील सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर असूनसुद्धा एका कठपुतळीसारखे वावरल्यामुळे घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? आसाममध्ये कधीही वास्तव्य केले नसताना खोट्या भाडेपावत्या सादर करून तिथून राज्यसभेची निवडणुक लढताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? देशातील साधनसंपत्तीवर सर्वात पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे असे सर्वोच्च पदावरून भेदभाव करणारे वक्तव्य करताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? हे क्वचितच पत्रकारांना सामोरे जायचे. परंत जानेवारी २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होणे हे देशासाठी अत्यंत घातक ठरेल हे अपशब्द वापरताना त्यामागे लोकसभा निवडणुक पराभव होईल अशी भीति नव्हती का? सोनिया गांधी, राहुल, दिग्विजय, इम्रान मसूद, मण्या अय्यर, गुरूदास कामत अशा असंख्य कॉग्रेसजनांनी यांच्याच कारकीर्दीत मोदींविषयी वारेमाप अपशब्द वापरले, तेव्हा आपल्या सहकार्‍यांना यांनी का माफी मागण्यास सांगितले नव्हते? यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराने कळ्स गाठला होता. त्याबद्दल यांनी आपल्या तोंडातून आजवर अवाक्षर तरी काढले का? देशाचे प्रचंड नुकसान यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत झाले. यांच्या नाकाखाली लूटमार सुरू असताना हे होयबासारखे तोंडात मिठाची गुळणी घेऊन डोळे मिटून स्वस्थ बसून होते. त्याबद्दल हे कधी माफी मागणार? मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले असे तब्बल १० वर्षे पंतप्रधान पदावर बसविलेल्या व्यक्तीने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. अधिकृत पदांवर असलेल्या देशांमधील नेत्यांमध्ये अशा आकस्मिक भेटी होत असतातच. अशा भेटी कधी पूर्वनियोजित असतात आणि तर कधी अचानकही ठरतात. २००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती. त्यांच्या या भेटीबाबतही असेच म्हणावे लागेल का? पूर्वी रशियाचे पंतप्रधान (नाव विसरलो) दुसर्‍या देशाला भेट देऊन रशियाला परत जाताना अचानक भारतात येऊन तत्कालीन पंतप्रधानांना भेटून गेले होते. त्यामुळे मोदी पूर्वनियोजित भेट नसताना अचानक पाकिस्तानला २-३ तासांची भेट देऊन आले यावर निदान पंतप्रधानपदावर बसून गेलेल्या व्यक्तीने तरी शंका व्यक्त करायला नको होती. दुसरं म्हणजे मोदी पाकिस्तानला गेले ते कॅमेर्‍यांच्या गराड्यात. त्यांच्या भेटीचा प्रत्येक क्षण नागरिकांना दिसत होता. त्या भेटीसंबंधात काहीही लपवाछपवी केलेली नव्हती. याउलट हे मात्र पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्याला गुपचूप भेटले व भेट गुप्त ठेवायचा प्रयत्न केला. जुलै २०१७ मध्ये डोकलामध्ये भारत व चीनचे सैन्य हातात शस्त्रे घेऊन समोरासमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे होते. कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल इतके वातावरण तापलेले होते. अशा प्रसंगी पप्पू माजी संरक्षण सचिव शिवशंकर मेनन यांच्या बरोबर गुपचूप चिनी राजदूताला भेटला व जेव्हा भेटीची बातमी फुटली तेव्हा काँग्रेसचा सुरजेवालाने पत्रकार परीषद घेऊन अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे छातीठोकपणे सांगितले. परंतु चिनी दूतावासाने भेटीची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून भेट झाल्याचे मान्य केल्यानंतर खांग्रेसी तोंडावर पडले होते. संरक्षण सचिव असल्याने शिवशंकर मेनन यांना अनेक लष्करी गुपिते माहिती असणार. अशी व्यक्ती युद्धाच्या वातावरणात शत्रू देशाच्या राजदूताला गुपचूप भेटते हे अत्यंत संशयास्पद आहे. खांग्रेसवाले गुपचूप पाकिस्तानी व चिनी अधिकार्‍यांना का भेटत आहेत याचा खुलासा विचारणे म्हणजे घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली असे होते का? खांग्रेस, पाकिस्तान व चीन यांच्यात नक्कीच काहीतरी संशयास्पद सुरू आहे आणि हे ढुढ्ढाचार्य मौनीबाबा सुद्धा त्यात आता सामील झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/12/2017 - 07:27 नवीन
सहमत. या प्रकारामुळे मनमोहनसिंगांविषयी जो काही थोडाथोडका आदर शिल्लक राहिला होता तो पण आता धुळीला मिळाला आहे. प्रतिसादात थोडी सुधारणा सुचवतो.
२००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती.
नाही बिल क्लिंटन यांची पाकिस्तान भेट होणार हे आधीच ठरले होते. पाकिस्तानात मुशर्रफने बंड करून लष्करी राजवट आणल्यामुळे बिल क्लिंटन पाकिस्तानला गेले ती 'स्टेट व्हिजिट' नव्हती तर त्याला भारतातून परत जात असताना 'स्टॉप-ओव्हर' असे म्हटले गेले होते. बिल क्लिंटन त्याच भेटीत वॉशिंग्टनला परतण्यापूर्वी मस्कत आणि जीनीव्हाला पण गेले होते. त्या भेटी आधीच ठरल्या होत्या की ते अचानक तिथे गेले होते हे माहित नाही. जॉर्ज डब्ल्यू बुश २००६ मध्ये भारतात आले तेव्हा येताना काबूलला त्यांनी अशी अचानक भेट दिली होती. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या भेटीची माहिती आधी जाहिर करण्यात आली नव्हती असे सांगण्यात आले होते. बहुदा बराक ओबामाही २०१० मध्ये येताना (किंवा जाताना) काबूलला गेले होते असे वाटते. तपासून बघायला हवे. राजीव गांधींनी १९८५ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची रॉनाल्ड रेगन यांच्याशी चांगली चर्चा होऊन दोन देशांमधील संबंध चांगले होतील अशी शक्यता निर्माण होते आहे असे वाटत असतानाच राजीव गांधी परतताना मॉस्कोला असेच अचानक थांबले होते. याविषयी अधिक http://indiatoday.intoday.in/story/mikhail-gorbachev-gave-rajiv-gandhi-the-status-of-a-world-leader/1/349217.html इथे. रेगन उघडपणे सोव्हिएट रशियाला 'इव्हिल इम्पायर' आणि कम्युनिझमला मानवतेला लागलेला कलंक असे म्हणत असत. अशावेळी भारतासारख्या देशाचा नेता अमेरिकेतून परत जाताना मॉस्कोमध्ये थांबला हे रेगन प्रशासनाला फार आवडलेले नव्हते. मोदींच्या डिसेंबर २०१५ मधील लाहोर भेटीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यार्‍या काँग्रेसला राजीव गांधींच्या १९८५ मधील मॉस्को भेटीचा विसर पडला होता असे http://www.asianage.com/india/congress-targets-pm-forgets-rajiv-gandhi-s-1985-moscow-trip-153 इथे पण म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चष्मेबद्दूर Tue, 12/12/2017 - 09:43 नवीन
पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ? एक गोष्ट नक्की आहे कि, मोदी विरोध म्हणजे देशद्रोह नाही आणि मोदी म्हणजेच भाजपा नाही. मी भाजप ला फक्त डेव्हलपमेंट च्या मुद्द्यावर मत दिलं होतं. पण आता अशी खात्री वाटत आहे कि सत्ता मिळाल्यावर सगळे सारखेच. शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी, गोरक्षकानी केलेल्या हत्या आणि आता गोमांसावरची उठवलेली बंदी...या सगळ्या उलट सुलट घटना काय दाखवतात? माझ्या देशात हे सगळं व्हावं याच फार वाईट वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Tue, 12/12/2017 - 09:57 नवीन
<<<शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या>>> ==>> शाह पुत्राच्या उड्या माहित होत्या, पण त्या प्रकरणात एवढा दम नव्हता. पण डोवाल पुत्राने काय केले ? वाचले नाही कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
अ
अनुप ढेरे Tue, 12/12/2017 - 10:25 नवीन
डोव्हल पुत्राची गोष्ट शाहपुत्राहून फुस्की आहे. पण त्या आर्टिकल्सनी त्यांचं काम बजावलं आहे. त्या आर्टिकल्सचं काम मोदी विरोधकांना वॉटाबाऊटरीसाठी खाद्य पुरवणे एवढच होतं. भ्रश्टाचाराविरोधी काही नाही. शाहपुत्राचा लेखात भ्रष्टाचाराचा आरोप देखील नाही. आर्टिकल लिहिलंच अशा प्रकारे होतं की वाचक आपोआप भ्रष्टाचार आहे असं मत बनवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 12/12/2017 - 10:40 नवीन
पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ? त्यांच्यासारखे कधी वागले? मोदींची पाक भेट पूर्वनियोजित नसली तरी त्यात लपवाछपवी नव्हती. शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी, लोयांचा ३ वर्षांपूर्वी झालेला नैसर्गिक मृत्यू म्हणजे हत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/11/2017 - 17:56 नवीन
मोदींनी काहीही केले तरी ते पंतप्रधानपदाची शान कशी कमी करत आहेत वगैरे गोष्टी मोदीविरोधक बोलत आहेतच. पण मोदी कोणतीही महत्वाची गोष्ट अशी 'लूज एन्डेड' ठेवतील हे शक्यच नाही. पाकिस्तानी लष्कराच्या अर्शद रफिकने गुजरातमध्ये अहमद पटेल मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटले. ती बातमी पुढीलप्रमाणे: असे झाल्यानंतर पाकिस्तानला गुजरात निवडणुकांमध्ये आणि त्यातही काँग्रेसच्या यशात का इंटरेस्ट आहे हा प्रश्न उभा का राहू नये? बरं तो लष्करी अधिकारी त्याचे तो काहीतरी बरळला आहे आमचा त्याचा काही संबंध नाही असे काँग्रेसकडून म्हटले गेले आहे का? तसे कोणतेही स्पष्टीकरण काँग्रेसकडून आले नाही तर संशय नक्कीच वाढेल. आता राहिला प्रश्न मनमोहनसिंगांनी पाकिस्तानी हायकमिशनरला गुप्तपणे भेटण्याचा. मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान असल्यामुळे त्यांना अनेक गोपनीय गोष्टी माहित आहेत हे नक्कीच. अशी गोपनीय माहिती असलेल्या कोणीही पाकिस्तानसारख्या देशाच्या हायकमिशनरला गुप्तपणे भेटणे कितपत योग्य आहे? मनमोहनसिंग जर खरोखरच निस्पृह वगैरे असतील तर आपण असे पाकिस्तानी हायकमिशनरला भेटणार आहोत आणि अमुक तमुक गोष्टींवर चर्चा करणार आहोत एवढे जरी त्यांनी आधीच म्हटले असते तर संशयाला काहीच जागा राहिली नसती. आजी/माजी पंतप्रधानांना खाजगी आयुष्य नसते आणि त्यांचे आयुष्य हीच एक 'खुली किताब' बनते. त्यामुळे पाकिस्तानी हायकमिशनरला आपण भेटणार आहोत एवढे तरी त्यांनी आधी जाहिर नक्कीच करायला हवे होते. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या कोणालाही मनमोहनसिंगांनी भेटणे आणि ती माहिती जगजाहिर न करणे आणि पाकिस्तानी सरकारच्या प्रतिनिधीला भेटणे यात नक्कीच फरक आहे हे नक्कीच. इतकेच नव्हे तर ही बातमी मिडियामध्ये आल्यानंतर सुरवातीला काँग्रेसने तर अशी कोणतीही भेट झालीच नव्हती असेही म्हटले. ते का? जर तुमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर ही बातमी आल्यानंतर सुरवातीला खंडन का केले? काही महिन्यांपूर्वी डोकलाम प्रकरण चालू असताना राहुल गांधी चीनी राजदूताला भेटले होते. त्यावेळीही नेमका हाच प्रकार काँग्रेसने केला होता. त्याचीच पुनरावृत्ती परत झाली. या सगळ्या गोष्टी संशयास्पद न वाटता नेहमीप्रमाणे मोदींना दोष देणे याला कमालीचा पूर्वग्रह सोडून दुसरे काय म्हणता येईल? नशीबाने बहुसंख्य भारतीय जनता सुशिक्षित नाही त्यामुळे या गोष्टी त्यांना तरी नक्कीच संशयास्पद वाटतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 12/11/2017 - 19:10 नवीन
आता ते चमच्यावर गेले. सोन्याचा ( सोनियाचा ) चमचा घेउन जन्मलेल्या राहूलना गरिबी काय ठावूक ? मी उन्हाळ्यात गरिब मुलांची काळजी करतो , अंबानीच्या मुलांची नव्हे !
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 12/12/2017 - 03:08 नवीन
गरीब राहिले तरच गरिबांबद्दल कळवळा रहातो ! मग गरीबी असणं चांगलं की नसणं , हे नवीन कन्फ्युजन आता निर्माण झाले आहे .. पिढ्यानपिढ्या कष्ट केल्यावर कोणती तरी पिढी सोन्याचा चमचा घेउन येणारच की ! की पुढच्या पिढीला गरिबांचा कळवळा रहावा म्हणून मागच्या पिढीने सगळे चमचेच टाकून द्यायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/12/2017 - 03:52 नवीन
होका, मग हे लॉजिक चायवाला म्हणून हिणवताना कुठे गेले होते म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Tue, 12/12/2017 - 04:34 नवीन
मोदी चहा विकत होते , हे त्यानी आणि भाजपानेच जाहीर केले ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 06:39 नवीन
बाबूजी, स्पष्टीकरण द्यावं लागावं इतकं माणसाचं ज्ञान गरीब नसावं. किंवा तसं सोंग करू नये. ---------------------- मोदिंची सद्य लायकी "फक्त" काँग्रेसवाल्यांच्या ऑफिसात चहा विकायची आहे असं काँग्रेस म्हणाली. भाजप प्राचीन काळी ते चहा विकत असे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Tue, 12/12/2017 - 07:10 नवीन
मोदी चहा विकायचे हे त्यानी बायोडेटात नव्हते लिहिले .. तसे काही एक्पिरिअन्स सर्टिफिकेटही नव्हते .. निवडणुकीच्या जाहिराती सुरु झाल्यावर हेच बोलू लागले , मी चहा विकायचो म्हणून. आरटीआयखाली रेल्वेत माहिती मागितली तर त्यानाही माहीत naahee की ते कुठे अन कधी चहा विकायचे ... मग इतराना कसे ठावूक असणार ते चहा विकायचे म्हणून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 08:27 नवीन
नेहरू लफडी करायचे असं त्यांच्या बायोडाटात नव्हतं लिहिलं. त्या बायकांनी त्यांना तसं अनुभव प्रमाणपत्र दिलं नव्हतं. मग त्यांचेच सहकारी लिहू लागले. आरटीआय मधे हॉटेलांत किंवा दिल्लीच्या वा लंडनच्या भवनांत माहीती मागीतली तरी मिळणार नाही. ============================= तरी भाजपने त्यांना किंवा त्यांचा वारसा सांगणार्‍या राहुलला भाजप भवनाबाहेर लफडी करायला (आणि राजकारण सोडायला) बोलावले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गब्रिएल Tue, 12/12/2017 - 09:07 नवीन
न्हेरू-गांधी परिवार आनि "पिढ्यानपिढ्या कष्ट"... हहपुवा... पिढ्यानपिढ्यांचे बलिदान काय कमी पल्डं म्हनून आत्ता हे कायबाय नवं की काय ?! झ्येंडा मिर्वताना सुदीक यवडं भान ईस्रून कसं चालंल बाबूजी ?! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Tue, 12/12/2017 - 09:41 नवीन
मी इन् जनरल बोललो. सोन्याचा चमचा तोंडात घेउन आलेल्याना गरिबी कशी समजणार ? संदर्भ जरी राहूल गांधींचा असला तरी ते इन् जनरल कुणालाही ॲप्लिकेबल आहे. म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:45 नवीन
म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?
तसं नाय हो. पण काँग्रेसी पुरोगामी मार्गाने श्रीमंत होऊ नये. देश लुटत नव्हे तर वैध मार्गाने श्रीमंत व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 12/13/2017 - 09:56 नवीन
१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ? २. काँग्रेस, रावा , सेनेच्या कितीतरी लोकाना भाजपाने आपल्यात सारवासारव करुन समाविष्ट केलेले आहे. जर काँग्रेसवाले अवैध मार्गाने श्रीमंत होतात , तर भाजपा हे सर्व का करत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 10:57 नवीन
१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undeclared-income-from-sasikala-aides-jaya-tv-1775004 ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 11:00 नवीन
१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undeclared-income-from-sasikala-aides-jaya-tv-1775004 ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 11:07 नवीन
१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undeclared-income-from-sasikala-aides-jaya-tv-1775004 ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 12/13/2017 - 13:42 नवीन
नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ? शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ? काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 14:05 नवीन
नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ?
नोटबंदी मुळेच काळे पैसे ट्रेस झाले ना शशिकलाचे? का मनमोहनने केले? ---------------------------------------------- नोव्हेंबर १६ ते नोव्हेंबर १७ इतक्या काळातच शशिकलेने (पकडलेल्या नोटांइतका) भ्रष्टाचार केला आणि त्याच्या पूर्वी सावपणे बसली होती मनमोहनाच्या काळात? मस्तंय कि. ================================
शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ?
नक्की? मग सुब्बू नं कुणाचं सरकार कसं पाडलं? उगंच काहीही? =============================================
काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!
वेळेस नै हो, पूर्वी. आणि स्वस्फूर्त डिस्क्लोजर हा तर चिदंबरमचा आवडता आणि नेहमीचा धंदा होता ना? एकूण कितीदा हे झालंय हे माहित आहे? ------------------------ नोटबंदीत ३०% चलन एकट्या भिकारड्या पुरोगामी बंगालमधे डिपॉझिट झालंय. तिथं गुजराती नाहीत. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 15:39 नवीन
भिकारड्या पुरोगामी बंगालमधे ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अर्धवटराव Tue, 12/12/2017 - 00:57 नवीन
प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकांमधे पाक हस्तक्षेपाचे जे तुणतुणे लावले आहे ते लाजिरवाणे आहे. आता मोदि फोर्मली दिग्विजयसिंग प्रभृतींच्या मांदियाळीत जाऊन बसले. डिस्गस्टींग.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/12/2017 - 03:54 नवीन
छान छान! चला आता मिळून एका पक्षाच्या अधक्ष्यासमोर मान तुकवून उभे राहणार्यांना प्रधानसेवक करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 12/12/2017 - 06:07 नवीन
तर ते हि दिवस दिसतील. तसंही युवराजांचं आणखी ३० वर्षाचं राजकारण शिल्लक आहे. त्यात कमितकमी ६ लोकसभा निवडणुका होतील. त्यातली किमान एक तरी नक्की जिंकेल युवराज. पण ते दिवस आणायला मोदिंना इतकी घाई का झाली आहे कळत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 06:33 नवीन
४७ ते ७७ या ३० वर्षात असं काही झालं नव्हतं. हां २०३९ मधे मोदिंनी आणिबाणी लादली तर स्कोप आहे राहुलला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 12/12/2017 - 07:52 नवीन
इकडे आड तिकडे विहीर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/12/2017 - 16:30 नवीन
मोदींना नाही मोदीद्वेष्ट्याना/विरोधकांना घाई झाली आहे एवढे मात्र नक्की! त्यांनी अमुक असं भाषण केलं की २०१९ मध्ये ते जाणार वगैरे कल्पनाविलास सुरु झालेलेच आहेत. का बुआ? त्यांना लढू द्या ना निवडणूका जशा लढायचं आहेत तशा. जर त्यांच्या अशा वागण्याने त्यांना जनता हाकलणारच असेल तर बेष्टच की! जनतेने निवडणुकांबाबत असेच राहावे हीच तर अपेक्षा आहे. घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 12/13/2017 - 08:50 नवीन
घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?
तशी संधी देऊ नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
S
SHASHANKPARAB Wed, 12/13/2017 - 07:19 नवीन
मला वाटत पाकिस्तानी लोकांबरोबर कॉंग्रेसची मीटिंग झाली याचा मुद्दा बनविण्यात कॉंग्रेसचीच चुक आहे. मोदिन्चि नाही. कारण अशी बैठक झाली याचे कुठल्याही वृत्तपत्रात वृत्त नाही. मोदिन्नि जेव्हा अशी बैठक झाल्याचे सांगितले तेव्हा कॉंग्रेसने त्याचा त्वरित इन्कार केला. मुख्य म्हणजे तिथे काय चर्चा झाली हे कॉंग्रेसने अजूनही स्पष्ट केलेले नाही. मनमोहन सिंगंनी गुजरात बद्धल कोणतीही चर्चा झाली नाही असे सांगितले, पण ते त्यांच्या पुरते मर्यादित आहे. बाकीचे सर्वजण अजूनही गप्पच आहेत. मुळात अशा बैठकीत जाण्यासारखे त्या बैठकीत काय होते हे त्यानी स्पष्ट करायला हवे. मणिशन्करने पाकिस्तानकडे मोदिन्ना हटविण्यासाठी उघड मदत मागितली हेही "सत्यच" आहे. तर अशा बैठकीत काय झाले याचे वृत्त कुठेही प्रसिद्ध न झाल्यामुळे त्या बैठकीचा "अंदाज" बांधण्याला मोदिन्ना वाव मिळाला. आणि त्यानी त्याचा निवड्णुकिय मुद्दा बनविण्याची संधी का सोडावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 12/13/2017 - 08:44 नवीन
मोदिपण टिकवण्यासाठी, मोदिपण आणखी ग्लोरिफाय करण्यासाठी. मोदिंनी असले मुद्दे निवडणुकीत उचलणे त्यांचं स्वतःचं प्रतिमाहनन आहे (असं मला वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: SHASHANKPARAB
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा