Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मतमोजणीपूर्व धागा: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Tue, 12/12/2017 - 10:05
🗣 109 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरातमध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान १४ डिसेंबरला होईल. हिमाचलमध्ये मतदान नोव्हेंबर महिन्यातच पार पडले आहे. दोन्ही राज्यात मतमोजणी १८ डिसेंबरला होईल. एक्झिट पोलचे निकाल १४ (किंवा १५) तारखेला येतील. ते निकाल यायच्या आत नेहमीप्रमाणे मतमोजणीपूर्व धागा प्रकाशित करत आहे. एक्झिट पोलचे निकाल यायच्या आतच हा धागा प्रकाशित करत आहे कारण नाहीतर एक्झिट पोलचे निकाल बघून काही प्रमाणात बायस्ड व्हायची शक्यता आहे. माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. तर हिमाचल प्रदेशात भाजप ४० ते ४५ तर काँग्रेस २० ते २५ जागा जिंकेल. मी निवडणुकांच्या निकालांचे अंदाज गेल्या अनेक वर्षांपासून वर्तवत आलेलो आहे. काही वेळा ते बरोबर आले आहेत. तर काही वेळा ते चुकलेही आहेत. तेव्हा या धाग्यात सर्वच शक्यतांचा विचार करून त्याचे नक्की काय परिणाम होतील यावर माझे मत मांडणार आहे. गुजरात गुजरातमधील निवडणुक ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता मार्च १९९५ पासून सतत भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे लोकांमध्ये 'भाजप फटिग' आला असल्यास त्याचा उपयोग करून निवडणुक जिंकायची यापेक्षा मोठी संधी काँग्रेसला मिळणार नाही. तरीही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एकूणच देहबोली आणि त्यांनी केलेल्या गोष्टी यावरून काँग्रेसला ही निवडणुक जिंकायची खात्री नाही असे वाटायला लागले आहे. राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्ष बनणार ही बातमी गेल्या साडेचार-पाच वर्षात कित्येक वेळा आली होती. पण प्रत्येकवेळी या बातम्या म्हणजे वावड्याच सिध्द व्हायच्या. पण यावेळी मात्र राहुल गांधी दिवाळीच्या आसपास नक्कीच अध्यक्ष बनणार असे काँग्रेसच्या नेत्यांनीही म्हटले. राहुल गांधींनी गुजरात निवडणुकांची तयारी बर्‍याच आधीपासून सुरू केली होती. अशावेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा व्हायच्या आधीच त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेऊन मग गुजरातमध्ये विजय मिळाल्यावर लोकांनी राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारले असा प्रचार करायची नामी संधी काँग्रेसकडे होती. तसे त्यांनी केले नाही. याचे कारण तसे करणे ही एक दुधारी तलवार होती. जर निवडणुकांपूर्वी राहुल अध्यक्ष झाले असते आणि पराभव झाला असता तर मग राहुलचे नेतृत्व लोकांनी नाकारले असे म्हणायलाही जागा राहिली असती. अध्यक्षपद नंतर स्विकारायचे तर जर गुजरातमध्ये पराभव झाल्यास त्यानंतर लगेच अध्यक्षपद स्विकारणेही अप्रशस्त होईल. आता राहुल गांधींची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांनी अध्यक्षपद स्विकारायची तारीख १६ डिसेंबर म्हणजे गुजरातमधील मतदान झाल्यावर पण निकाल लागायच्या आधी अशी ठरवली गेली आहे. यावरून मला तरी वाटते की मुळातच काँग्रेसला निवडणुक जिंकायची खात्री नाही. अन्यथा आधी अध्यक्षपद स्विकारून विजय झाल्यावर त्याचा अर्थ राहुल गांधींचे नेतृत्व लोकांनी स्विकारले असा प्रचार करायची संधी काँग्रेसनी नक्कीच सोडली नसती. दुसरे म्हणजे गुजरात काँग्रेसकडे स्वतःचा खमका नेताच राहिलेला नाही. एक शंकरसिंग वाघेला होते. ते कितपत लोकप्रिय होते, पूर्ण राज्यात मते ते फिरवू शकले असते का वगैरे प्रश्न आहेतच. पण त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करायचा उदंड अनुभव होता आणि संघटना कौशल्यही त्यांच्याकडे होते. त्यांची मागणी होती की पंजाबमध्ये अमरिंदरसिंगांना जसे स्वातंत्र्य दिले गेले तसे आपल्याला द्यावे. पण तसे केले असते तर इतर नेते-- अर्जुन मोडवाढीया आणि भरत सोलंकी नाराज झाले असते.त्यामुळे वाघेलांना स्वातंत्र्य दिले गेले नाही. त्यातूनच ते नाराज झाले आणि पक्षाबाहेर पडले. आजही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिलेला नाही. विरोधी पक्षांनी लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर भाजपचा जोरदार पराभव करता येतो हे दिल्ली आणि बिहारच्या अनुभवावरून समजतेच. पण काँग्रेसकडे असा कोणी लोकप्रिय चेहराच नाही ही समस्या आहे. आणि आता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ कॉंग्रेसवर आली आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचा एकही नेता मिळू नये आणि बाहेरच्या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असो. आता बघू विविध परिस्थितींमध्ये काय परिणाम होऊ शकतील. परिस्थिती १: भाजप १५०+, काँग्रेस २० ते २५ अमित शहा भाजपला १५० पेक्षा जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास देशाच्या राजकारणावर भाजपपेक्षाही नरेंद्र मोदी यांची पकड किती घट्ट झाली आहे याचे ते द्योतक असेल. डिसेंबर २०१३ मधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी योगेन्द्र यादव म्हणाले होते: "१९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याला आपला पंतप्रधान निवडायचा आहे असे समजून मतदार विधानसभा निवडणुकांमध्ये मत देत असत. पण १९८० च्या दशकाच्या शेवटापासून आपल्याला आपला मुख्यमंत्री निवडायचा आहे असे समजून लोकसभा निवडणुकांमध्ये मत द्यायला मतदारांनी सुरवात केली." म्हणजे १९५२ पासून १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारतीय राजकारणाचा पहिला टप्पा होता आणि १९८० च्या दशकाच्या शेवटपासून दुसरा टप्पा सुरू झाला. मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात मोदींनी सर्व विरोधकांना एकहाती झोपवल्यानंतर आपण परत एकदा पहिल्या टप्प्याकडे जात आहोत का हा प्रश्न नक्कीच उभा राहिला. एप्रिल २०१७ मध्ये दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालावर परत एकदा योगेन्द यादव यांनीच म्हटलेली एक गोष्ट द्यायचा मोह आवरत नाही. ते म्हणाले होते: "मतदार घराबाहेर पडले त्यांचा स्थानिक नगरसेवक निवडायला. पण त्यांनी प्रत्यक्षात मते दिली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूने". गुजरातमध्ये भाजपने १५०+ जागा जिंकल्या तर आपण परत भारतीय राजकारणातील पहिल्या टप्प्याकडे गेलो आहोत असे म्हणायला हवे. त्या परिस्थितीत मोदींची अगदी 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा बनेल. राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अगदी सुरवातीलाच 'प्रथमग्रासे मक्षिकापात:' होईल. तसेच निवडणुक जिंकायची असेल तर लोकांना विकता येण्याजोगा (सेलेबल) एक कार्यक्रम आणि एक लोकप्रिय नेता पुढे आणणे गरजेचे आहे, आपले नेते सोडून आयत्या वेळी बाहेरच्या त्रिकूटाला बरोबर घेऊन निवडणुक जिंकता येऊ शकणार नाही हे राहुल गांधींना समजायला हवे. शेवटी अशी जातीपातींवर आधारीत आवाहने करून निवडणुक जिंकणे हे १९९० आणि २००० च्या दशकातले गणित झाले. मोदी-शहांनी गेल्या काही वर्षात हे सगळे गणित बदलून टाकले आहे.तेव्हा या बदललेल्या गणिताला सामोरे जाऊन निवडणुकांसाठी आखणी करायला हवी हा धडा राहुल गांधींना मिळेल. भाजपला असा जोरदार विजय मिळाला (म्हणजेच हार्दिक प्रभृतींचा पराभव झाला) तर त्याचा एक फायदा चांगला होईल. इतर राज्यांमध्ये असे कोणी हार्दिक उभे राहणार असतील तर लोक त्यांना महत्व देत नाहीत हे लक्षात येऊन त्या प्रक्रीयेला पायबंद बसायला मदत होईल. भाजपने (खरे तर मोदींनी) गुजरातमध्ये एवढा मोठा विजय मिळवला तर त्याचे २०१९ वर काय परिणाम होऊ शकतील? एक तर मोदींना हरवायला म्हणून सगळे विरोधक एकत्र यायची शक्यता वाढेल. त्या विरोधकांच्या आघाडीला मोदींचे भाजपमधील पक्षांतर्गत विरोधक (यशवंत सिन्हा, अडवाणी इत्यादी) खुलेपणाने किंवा पडद्याआड मदत करतील. १९७१ ची लोकसभा निवडणुक इंदिरा गांधी विरूध्द इतर सगळे अशी झाली होती. त्याप्रमाणेच २०१९ ची लोकसभा निवडणुक नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे अशी होईल ही शक्यता आणखी वाढेल. सगळे विरोधक एकत्र आले तर त्या आव्हानाला मोदी कसे परतवून लावतात हे बघायचे. (त्या दृष्टीनेच बिहारमध्ये नितीशकुमारांना विरोधी पक्षांमधून फोडून आपल्या बरोबर घ्यायची खेळी हा एक मास्टरस्ट्रोक होता असे मला वाटते). २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या आधी पुरस्कारवापसी, वाढती असहिष्णुता वगैरे गोष्टींवरून पुरोगाम्यांनी मोठा हलकल्लोळ उठवला होता. आता ती शस्त्रे बोथट झाली आहेत त्यामुळे परत ती शस्त्रे वापरता येणार नाहीत. पण पुरोगामी दुसरा कुठलातरी मार्ग शोधून सर्वत्र-- मिडिया, सोशल मिडिया वगैरे ठिकाणी मोठा आवाज उठवतील हे नक्कीच. तसेच काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी ऐन डोकलाम प्रश्न जोरात असताना चीनी वकिलाला भेटले होते. मागच्या आठवड्यात मनमोहन सिंग आणि मणीशंकर अय्यर पाकिस्तानी हायकमिशनरला भेटले. ही चिन्हे बरी दिसत नाहीत. आपले मोदींपुढे चालत नाही हे बघून काँग्रेसने पाकिस्तान, चीन असल्या परकीयांची मदत घ्यायचा प्रयत्न अधिक जोरात केला तर ते फारच धोक्याचे ठरेल. असा मोठा विजय मिळाल्यास भाजपच्या दृष्टीने आणखी एक धोक्याची घंटा वाजेल. तशी ती आधीपासूनच वाजायला लागली आहे पण त्या घंटेचा आवाज आणखी मोठा होईल. भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी चंडीगडमध्ये हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विकास बराला नामक दिवट्या चिरंजीवाने एका मुलीचा पाठलाग करायची घटना घडली होती. मी भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे, माझे कोण काय वाकडे करणार असा काहीसा आविर्भाव त्याचा होता. लोकांचे मोदींविषयीचे मत चांगले असले तरी अशा घटना वारंवार व्हायला लागल्या तर लोक मोदी या एका नावावर किती वर्षे मत देणार हा प्रश्नही उभा राहिलच. काहीही झाले तरी 'लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलीटी' कधी चुकत नसतो. ती मार्जिनल युटीलिटी अधिक वेगाने कमी करायचे काम असले माजलेले लोक करायला लागले तर ती भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. तसेच भाजप जिंकत आहे म्हटल्यावर इतर पक्षांमधली फालतू मंडळी भाजपमध्ये येऊ बघतील. आसामात सरबानंद सोनोवाल या चांगल्या माणसाला पक्षात घेतले हे चांगलेच झाले. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या लोकांना, उत्तराखंडमध्ये विजय बहुगुणासारख्यांना पक्षात घेण्याविषयी तेच बोलता येणार नाही. अटकपूर्व जामीन असतो त्याप्रमाणे 'अटकपूर्व भाजप प्रवेश' हा घातक पायंडा पडायला नको. अशा लोकांना पक्षात घेतल्यामुळे नंतर अडचणी वाढतील आणि लोकांचा विश्वास कमी होईल. परिस्थिती २: भाजप ११५-१५०, काँग्रेस २०-६० ही दुसरी परिस्थिती म्हणजे भाजपला राज्यात मागच्या वेळेपेक्षा मोठा विजय मिळेल ही आहे. या परिस्थितीत वर दिलेल्या पहिल्या परिस्थितीप्रमाणेच परिणाम (काहीशा कमी तीव्रतेने) होतील. परिस्थिती ३: भाजप ९५ ते ११५ , काँग्रेस ६० ते ८५ आणि परिस्थिती ४: भाजप ६० ते ८५ , काँग्रेस ९५ ते ११५ यातील तिसर्‍या परिस्थितीत भाजपला विजय मिळेल पण तो मागच्या वेळेपेक्षा कमी असेल. तांत्रिकदृष्ट्या भाजपच जिंकेल पण भाजपची 'ऑथोरिटी' मात्र नक्कीच कमी झाली आहे असे चित्र उभे राहिल. आणि चौथ्या परिस्थितीत तर भाजपचा पराभवच होईल. तरीही मोदींची लोकप्रियता या परिस्थितीतही कायम असेलच आणि त्याचा भाजप २०१९ मध्ये फायदा करून घेईलच. युपीए-१ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसचा उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगाल, बिहार या राज्यांमध्ये पराभव झाला होता पण २००९ मध्ये परत युपीएचेच सरकार सत्तेत आले होते. आतापर्यंत मोदी सरकारच्या कार्यकाळात भाजपने अनेक विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. तेव्हा एका राज्यात यश कमी मिळाले किंवा अगदी पराभव जरी झाला तरी २०१९ मध्ये त्याचा फार फरक पडणार नाही. तरीही मोदींच्या राज्यातच भाजपचा पराभव करणे ही काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांसाठी मोठी उत्साहवर्धक घटना असेल. काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांना मात्र मोदी आता परतीच्या मार्गावर आहेत असा प्रचार करायची संधी मिळेल. काँग्रेसने या निवडणुकांमध्ये स्वतःचा नेता पुढे न आणता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर आणि त्यांच्या जातीपातींच्या गणितावर विसंबून राहून काँग्रेसने यश मिळवले तर ती धोक्याची घंटा असेल. कारण इतर राज्यांमध्येही असेच जातीपातींचे राजकारण खेळायचा प्रयत्न केला जाईल. भविष्याकडे वाटचाल करताना जातीपातींचे राजकारण मागे सोडायचे सोडून जर त्यावरच भर देण्यात येणार असेल तर आपण परत १९९० च्या दशकातील घाणेरड्या राजकारणाकडे वाटचाल करू हा सगळ्यात मोठा धोका या परिस्थितीत उद्भवेल. चौथ्या परिस्थितीत जर भाजपचा पराभव झाला तर तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल. पण त्यातूनच काँग्रेसला आपण पुनरागमन करायच्या मार्गावर आहोत असा समज होऊन २०१९ मध्ये सर्व विरोधकांची आघाडी उभी करायच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अधिक आक्रमकपणे बार्गेन करेल आणि त्यातून प्रस्तावित आघाडीपुढे संकट उभे राहू शकेल ही पण शक्यता आहेच. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १९७ जागा जिंकल्या होत्या त्यावेळी तो काँग्रेसचा मोठा पराभव मानला गेला होता. पण २००९ मध्ये त्यापेक्षा थोड्याच जास्त म्हणजे २०६ जागा जिंकल्यावर तो काँग्रेसचा नेत्रदीपक विजय वगैरे मानला गेला होता. तेव्हा थोडेसे यश मिळाले तर आपले आभाळाला हात टेकले आहेत हा समज काँग्रेसचा व्हायची शक्यता आहेच. तसेच या निवडणुकांमध्ये काँग्रेसने काही प्रमाणात सॉफ्ट हिंदुत्व वापरले. राहुल गांधींनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. जर तिसर्‍या किंवा चौथ्या परिस्थितीप्रमाणे निकाल लागले तर या सॉफ्ट हिंदुत्वाचा उपयोग होतो असा अर्थ काढला जाऊन १९८० च्या दशकात इंदिरा आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे 'हिंदू अपीजमेन्ट' करायचा प्रयत्न केला होता त्याची पुनरावृत्ती काँग्रेसकडून व्हायची शक्यता आहे. यातून पुढे मुस्लिम मते समाजवादी पक्ष, राजद यांच्यासारख्यांकडे जातील ही शक्यता आहे. ती एम.आय.एम कडे जाणार नाहीत हीच इच्छा आणि अपेक्षा. हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय व्हायची शक्यता त्यामानाने बरीच कमी आहे. तर भाजपच जिंकायची शक्यता जास्त. फक्त जागा किती मिळणार हा प्रश्न असेल. तेव्हा हिमाचलमध्ये मी वेगवेगळ्या शक्यता न घेता एकच शक्यता--- भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव ही ध्यानात घेत आहे. काँग्रेसनेही हिमाचलकडे फार लक्ष दिले नव्हते आणि सगळी शक्ती गुजरातवरच केंद्रित केली होती. तेव्हा हिमाचलमध्ये जिंकू ही अपेक्षा स्वतः काँग्रेसवाल्यांची नाही असे दिसते. हिमाचल हे फार मोठे राज्य नाही आणि देशाच्या राजकारणावर त्याचा विशेष परिणाम होतही नाही. तरीही हिमाचलमध्ये पराभव झाल्यास काँग्रेसच्या हातात केवळ पंजाब आणि कर्नाटक (आणि गुजरातमध्ये जिंकल्यास गुजरात) ही मोठी (१० पेक्षा जास्त लोकसभा जागा असलेली) राहतील. त्यातही गुजरातमध्ये विजय झाल्यास काँग्रेसला मोठाच दिलासा मिळेल. पण गुजरातमध्येही जिंकता आले नाही आणि हिमाचलही गेले ही परिस्थिती काँग्रेससाठी फार उत्साहवर्धक नसेल. भाजपच्या दृष्टीने हिमाचलमध्ये विजय मिळाला (किंवा मिळाला नाही) तरी त्याचा फार फरक पडणार नाही. दोन्ही राज्यांमधील एकत्रित परिस्थितीवर भाष्य वर म्हटल्याप्रमाणे माझ्या मते भाजपला गुजरातमध्ये १३० ते १३५ तर हिमाचलमध्ये ४० ते ४५ जागा मिळतील. म्हणजे माझ्या मते दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव होणार आहे. वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने सगळी शक्ती गुजरातवर केंद्रित केली होती आणि हिमाचलकडे त्यामानाने दुर्लक्ष केले होते. गुजरातमध्ये राहुल गांधींनी जो प्रचार केला त्यात नोटबंदी आणि जी.एस.टी विरूध्द त्यांनी रान उठवले होते. जी.एस.टी ला गब्बर सिंग टॅक्स असेही राहुल गांधी म्हणाले होते. जर काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला तर नोटबंदी आणि जी.एस.टी या मुद्द्यांचा फार उपयोग होणार नाही हे स्पष्ट होईल. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत जी.एस.टी च्या अंमलबजावणीमधील अडचणी नक्कीच दूर झाल्या असतील. तेव्हा अजून १६-१७ महिन्यांनी या मुद्द्यांचा रेलेव्हन्स काहीही राहणार नाही. असहिष्णुतेच्या मुद्द्यात टीव्हीवर चर्चा करणारे, मोठेमोठे विचारवंत इत्यादी मूठभर मंडळी सोडली तर ९९% भारतीयांना फार रस होता असे वाटतही नाही. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळी ते शस्त्र आधीच वापरून झाले आहे. आता त्याचा परत उपयोग करायला गेले तर तो प्रयोग नक्कीच फसेल.तेव्हा २०१९ मध्ये मोदींना नक्की कोणत्या मुद्द्यावरून घेरायचे हा प्रश्न विरोधकांपुढे नक्कीच पडेल. आपले या मुद्द्यांवर मत काय? तसेच माझ्या हातून कुठचा मुद्दा निसटला असल्यास तो लक्षात आणून द्यावा ही विनंती. असो. आता वाट बघत आहे १८ डिसेंबरची.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
22190 वाचन

💬 प्रतिसाद (109)
म
महेश हतोळकर Tue, 12/12/2017 - 11:29 नवीन
माझे पैसे गुजरातच्या पहिल्या शक्यतेवर. प्लॅन बराच पुढचा वाटतोय.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 12/12/2017 - 11:37 नवीन
निकाल काहीही लागो, कृपया भावनेच्या भरात वैयक्तिक कमेंट्स टाळा, दोन्ही राष्ट्रीय पक्षांना शुभेच्छा... माझा अंदाज बीजेपी 95, काँग्रेस+ 85 जयहिंद
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Tue, 12/12/2017 - 12:01 नवीन
निकाल काय लागेल तो लागेलच, पण भाजप गुजरात मधे हरलेले मला बघायला आवडेल. आवडणार्‍या प्रत्येक गोष्टी होतच नाहीत म्हणा. पण मोदींचे केंद्रातले आणि फसवणिसांचे महाराष्ट्रातले सरकार कुठल्याच आघाडिवर जमिनीवर दिसतील असे बदल करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांना धक्का बसणे गरजेचे आहे, कदाचित उरलेल्या दिड वर्षात काम करतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडुन यायचे आणि केंद्रात, राज्यात पूर्ण सत्ता असताना काहिही कारवाई न करणे हे समजण्यापलिकडे आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/15/2017 - 13:13 नवीन
शेअर मार्केटमध्ये थोडी पडझड होईल पण त्याकडे "गुंतवणू़क वाढवायची संधी असं"ही बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
इ
इरसाल Tue, 12/12/2017 - 12:24 नवीन
कॉग्रेसजनांची रॅली जात होती, त्यात उभे असलेल्या उमेदवाराचे घोषवाक्य होते" मारा वडोदरा मने पाछु आपो". बडोद्याचे जुन्याकाळातील वैभव ( ???) परत मिळवण्यासाठी मलाच मत द्या. अस पण अजुन काय बदल करणार दोन्ही पक्ष कोण जाणे. बडोद्यामधे भाजप आणी कॉग्रेस यांना व्यवस्थितरित्या ट्क्कर देवु शकेल असा एक (राष्ट्रीय समाज पक्ष) उमेदवार आहे राजेश आयरे म्हणुन, बाकी काही असो, माणुस कोणालाही कधीही अडल्यानडल्या वेळी मदतीला उभा असतो. (स्वानुभव नाही, पण प्रत्यक्ष पाहिलेले.)
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 12/12/2017 - 12:26 नवीन
माझ्या मते गुजरात भा.ज.पा - १०५-११० काँग्रेस - ७०-७५ हिमाचल प्रदेश भा.ज.पा - ४०-४५ काँग्रेस - २०-२५
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 12/12/2017 - 12:37 नवीन
हिमाचल प्रदेशला राहुल द्रवीडसारखं वाटत असेल असा जोक आलेला कायप्पावर.
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 12/12/2017 - 12:54 नवीन
भाजपा १०० जागा का जिण्कणार यापेक्षा काँग्रेस हरण्यास कशी योग्य आहे , यावरच पूर्ण लेख उभा आहे. असो. काँग्रेस शंभरी गाठावी आणि भाजपाच्या शंभरीची सुरुवात व्हावी . ही आमची अपेक्षा.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:46 नवीन
पावनं, तुमी भाजपला ८२ जागा दिवलालाव. आक्रितच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 12/13/2017 - 13:56 नवीन
काँग्रेस शंभरी जिंकून तिथेच उभे रहावी, असे कुठे म्हटले मी ? त्यापलीकडेही जाईल की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 14:11 नवीन
किती पुडं? डायरेक १८२? का अजूनही पुढं? भाजप ०? समद्याचं डिपॉझिट जप्त? भाजपवर बॅन? कमळ एंडेंजर्ड स्पेसिसमधे? निर्वाचन आयोग काँग्रेसमधे सामील? ====================== जरा नक्की कुठे थांबायचं आहे ते सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Wed, 12/13/2017 - 14:13 नवीन
इतकं याक्युरेट सांगायला मी दातार भटजी किंवा साळगावकर गुरुजी वाटलो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 14:18 नवीन
पारावरचा ममद्या बोलायचं मनून कायबी ठोकून देतो तसं ठोकून द्या. ते त्येला बी माईत र्‍हातंय आन गन्याला बी माहित र्‍हातंय कि बेफाल्तूक हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/12/2017 - 14:14 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण ! १. भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयापासून विरोधकांपेक्षा जास्त याच लोकांचे बोलणे-चालणे मोदी/भाजप साठी मोठा धोका ठरला आहे. अश्या लोकांचा बंदोबस्त करणे हेच मोदींसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. २०१९ च्या निवडणूकीसाठी, नाठाळ लोक टाळून, योग्य उमेदवार निवडण्याइतकी ताकद जमा झाल्याशिवाय या मानसिकतेचा बिमोड होण्याची शक्यता दिसत नाही. सद्यातरी भाजपला (उप्र सोडून) बहुतेक ठिकाणी आकडेमोडीचे राजकारण करणे भाग पडते आहे असे दिसत आहे... गुजरातसारख्या मोदींच्या घरच्या आणि म्हणूनच मानाच्या राज्यामध्ये तरी ते करायला लागू नये असा त्यांचा जोरदार प्रयत्न असणारच. २. भारताचे उघड शत्रू/विरोधक असलेल्या पाकिस्तान/चीन/फुटीरतावाद्यांशी सतत गुप्त घरोबा करणे, प्रथम ते माध्यमांत छातीठोकपणे नाकारणे आणि एकदोन दिवसांत माध्यमांत ते उघडपणे स्विकारायला भाग पडणे... कितीही हताशपणा (डेस्परेशन) आला तरी असले आतताई उद्योग काँग्रेस का करत आहे हे, तेच सांगू शकतील ! असे वागणे त्यांच्या अंगाशी आल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण, या वागण्याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होत असेल हे सांगायला फार बुद्धिमत्तेची गरज नाही. ३. काँग्रेसने सुरुवात चांगली केली होती. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाच्या मदतीने आणि जीएसटीबद्दलच्या असंतोषाचा फायदा घेऊन काँग्रेस भाजपावर मात करू शकेल असे वातावरण निर्माण केले होते. मात्र, नंतर युतीतील रुसवेफुगवे उघड्यावर आल्यने त्यातली हवा कमी झाली. तसेच वरच्या मुद्दा क्रमांक २ आणि इतर काँग्रेसी नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांनी (या बाबतीतही भाजपशी चढाओढ ?!) वातावरण बरेच गढूळ केले आणि स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारण्याचे काम केले. ४. रागांची मंदीरयात्रा पाहून इंदीराजींच्या बालाजीमंदीरभेटींची आठवण आली... मोठा फरक असा की त्यांच्या भेटी केवळ निवडणूकींपुरत्या नव्हत्या ! शिवभक्त आणि जानवेधारी रागांच्या माध्यमातल्या प्रसिद्धीने चांगलीच करमणूक केली. "जनता उल्लू आहे आणि तिला काहीही स्टंट करून आपण फसवू शकतो" ही मानसिकता राजकारण्यांच्या मनात अजूनही घट्ट रुजलेली आहे हेच याने दिसून आले. जनता राजकारण्यांपेक्षा जास्त विकसित आहे आणि राजकारण्यांनी "सद्यकाळात जागे व्हायची" गरज आहे. :) ५. गेल्या काही दिवसांत, विशेषतः काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती येणार याची खात्री झाल्यानंतर, रागांच्या बोलीत आणि देहबोलीत लक्षणिय सकारात्मक फरक दिसत आहे. तो टिकवून ठेवला तर, हा केवळ भाषणचे लेखक आणि सार्वजनिक भाषणांचे प्रशिक्षक बदलल्याचा परिणाम नाही असे होईल... आणि काँग्रेससाठी ते सकारात्मक होईल. ६. एकंदरीत पाहता, भाजपला बहुमती विजय (११७+) मिळेल असे वाटते. पण काही काळ (आणि अजूनही निकाल लागेपर्यंत) काँग्रेसने भाजपची हवा टाईट केली आहे/होती, आणि तीही मोदींच्या गृहराज्यात, यात वाद नाही ! याकरताच, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची माध्यमातली दिखाऊ वक्तव्ये सोडता, इतर कोणीच छातीठोकपणे निकालाची खात्री देत नाही. (या लेखातही निकालाच्या तीन शक्यता द्याव्या लागल्या आहेत.) दोलायमान होत राहिलेली ही निवडणूक दोन्ही पक्षांना जड गेलेली आहे आणि मोठे धडे देऊन गेलेली आहे... व तिच्यापासून घेतलेले बोध (घेतलेच तर !) त्यांना भविष्यात केवळ गुजरातच्याच नव्हे तर भारतभरच्या राजकारणात उपयोगी ठरतील.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/12/2017 - 16:33 नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब.
१. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयापासून विरोधकांपेक्षा जास्त याच लोकांचे बोलणे-चालणे मोदी/भाजप साठी मोठा धोका ठरला आहे.
नक्कीच. अजून पर्यंत मोदींवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांची लोकप्रियता टिकून आहे असे चित्र आहे. पण असले उपटसुंभ लोक मात्र त्यात अडचणी निर्माण करू शकतील.
२. भारताचे उघड शत्रू/विरोधक असलेल्या पाकिस्तान/चीन/फुटीरतावाद्यांशी सतत गुप्त घरोबा करणे, प्रथम ते माध्यमांत छातीठोकपणे नाकारणे आणि एकदोन दिवसांत माध्यमांत ते उघडपणे स्विकारायला भाग पडणे
काँग्रेस जे काही करत आहे ते संशयास्पद आहे हे नक्कीच. राहुल गांधी डोकलाम प्रकरण जोरात असताना चीनी वकिलाला भेटले. सुरवातीला काँग्रेस पक्षाने अशी कुठलीही भेट झाल्याचेच नाकारले. पण नंतर चीनी दुतावासानेच अशी भेट झाल्याचे उघड झाल्यावर त्यांना मान्य करावेच लागले. तीच गोष्ट मनमोहनसिंगांच्या बाबतीत झाली. अशी कोणती भेट झाल्याचे सुरवातीला काँग्रेसने नाकारले पण नंतर मात्र मान्य करावे लागले. मुळात असे गुप्तपणे भेटणे, अशी भेट झाल्याचे नाकारणे आणि मग स्विकारणे आणि वर 'मग त्यात काय झाले' असा आविर्भाव आणणे यात काही संशयास्पद आहे हेच अनेक सुशिक्षित मंडळींना मान्य असल्याचे दिसत नाही. बहुदा मोदीद्वेषात ते पुरते आंधळे झाल्यामुळे या प्रकरणी काँग्रेसची चूक आहे हे लक्षात न घेता उलटा मोदींना प्रश्न विचारत आहेत. आपल्या नशीबाने भारतात सुशिक्षित लोकांची संख्या त्यामानाने कमी आहे. सुशिक्षित समाजातून अशा अनाकलनीय प्रतिक्रिया सोशल मिडियावर (फेसबुक, ट्विटर इत्यादी) येत आहेत त्यामुळे भविष्यात मोदीही इंदिरा गांधींप्रमाणे सुशिक्षित लोकांना हिंग लावून विचारणार नाहीत हा धोका गेल्या वर्ष-दिड वर्षापासूनच जाणवायला लागला आहे.
३. काँग्रेसने सुरुवात चांगली केली होती.
याविषयी भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवर जनरल जानेवारी आणि फेब्रुवारी हा एक जबरदस्त लेख आला आहे. भाऊंनी दुसर्‍या महायुध्दातील रशियाचे उदाहरण दिले आहे. सुरवातीला हिटलरच्या सैन्याने रशियात बरीच खोलवर मजल मारली होती. पण नंतर रशियातील हाडे गोठविणार्‍या थंडीमध्ये जर्मन सैन्याचे हाल झाले. इतक्या आत घुसलेल्या जर्मन सैन्याला रसदपुरवठा करणे कठिण होऊन बसले आणि जर्मन सैन्याचा पराभव झाला त्यात हे मोठे कारण होते. हिटलरने रसदपुरवठा कसा होणार याची तजवीज न करता रशियात आतपर्यंत मजल मारली ही त्याची चूक झाली. भाऊंच्या मते राहुल गांधींनी बर्‍याच आधीपासून गुजरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आणि गुजरातमध्ये दौरे आणि सभांचा धडाका लावला पण मोदींच्या गोटातून फार हालचाल झाली नाही याचे कारण मोदी-शहांनी राहुल गांधी आणि टिमला अती उत्साहात चुका करून स्वतःलाच गोत्यात आणायची संधी दिली. मग ते युथ काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलवरून मोदींना चायवाला म्हणणे असो, मणीशंकर अय्यरनी मोदींना नीच म्हणणे असो की मनमोहनसिंगांनी पाकिस्तानी राजदूताला भेटणे असो. प्रतिस्पर्धी व्हल्नरेबल झाला असे दिसल्यावर मोदींनी मोठा हल्ला चढवला. या डावपेचांचा उपयोग काय होतो हे १८ तारखेलाच समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
रामदास२९ Tue, 12/12/2017 - 16:42 नवीन
गॅरी ट्रुमन, डॉ सुहास म्हात्रे - सुन्दर आणि माझ्या मते तरी निष्पक्ष, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण माझ्या मते, राहूल गान्धीन्नी मुद्दे प्रथम बरोबर उठवले होते पण नन्तर जी.एस.टी मधे सरकारने सुधारणा करून त्यातील हवा काढून टाकली. राहूल गान्धीन्चा ग्रुहपाठ नेहमीप्रमाणे कमी पडला, त्यामुळे त्यान्नी प्रथम आरोपान्ची राळ उठवली पण भा.ज.पा ने शेवटी सोमनाथ भेटीची नोन्द, जानवेधारी हिन्दू, अय्यर, पाकिस्तानी उच्चायुक्ताशी गुप्त भेट असे मुद्दे ऐरणी वर आणून कुम्पणावरचे मतदार आपल्याकडे वळतील अशी तजवीज केली. मुळात हार्दिक आणि अल्पेश यान्चे आन्दोलन एकमेकान्च्या विरोधात होते आणि जिग्नेश (ऊना हल्ल्यामुळे माध्यमान्नी मोठा केलेला असल्यामुळे) त्यान्चा प्रभाव किती पडेल यात साशन्कता आहे. कोन्ग्रेस कडे कार्यकर्त्यान्चा बळ नाही त्यामुळे उसने लोका त्यान्ना किती यश देऊ शकतील. सर्वात महत्वाचा म्हणजे गुजरात सरकार कडून लोकान्च्या अपेक्षा पूर्ण जरी होत नसतील तरी सरकार च्या विरोध जाण्याएव्हढी नाराजी नक्कीच नाही. माझ्यामते , भा.ज.पा १०५-११० आणि काँग्रेस ७०-७५ पर्यन्त जातील
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 15:37 नवीन
गॅरी ट्रुमन, डॉ सुहास म्हात्रे - सुन्दर आणि माझ्या मते तरी निष्पक्ष, समतोल, सारासार विवेकी विश्लेषण +१०० भाजप जिंकले तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये घोटाळा केल्यामुळे असेल आणि काँग्रेस जिंकली तर तो लोकशाहीचा विजय असेल हे सर्वानी पक्के ध्यानात ठेवावे. पण धर्मनिरपेक्ष , पुरोगामी, डावे इ इ लोक सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबद्दल सावध पवित्रा घेत आहेत. कारण न जाणो आज इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये घोटाळा आहे असे म्हटले आणि उद्या काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या तर तोंडघशी पडावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/12/2017 - 17:14 नवीन
गुजरातमधील सर्वच १८२ विधानसभा मतदारसंघांच्या निकालांमध्ये मला रस आहे. पण त्यातल्या त्यात खालील मतदारसंघांमध्ये विशेष रस आहे: १. जमालपूर-खाडिया अहमदाबाद रेल्वे स्टेशनजवळच्या परिसरातला हा मतदारसंघ आहे. २००८ च्या पुनर्रचनेपूर्वी हा मतदारसंघ खाडिया या नावाने ओळखला जात होता. मतदारसंघ पुनर्रचनेत खाडिया मतदारसंघामध्ये जवळचा काही भाग जोडला गेला आणि हा मतदारसंघ 'जमालपूर-खाडिया' या नावाने ओळखला जाऊ लागला. खाडिया मतदारसंघातून १९८० ते २००७ दरम्यानच्या ७ निवडणुकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भट निवडून गेले होते. त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचा पुत्र भूषण भट जमालपूर-खाडियामधून निवडून गेला. पुनर्रचना झाल्यानंतर जमालपूर-खाडियामध्ये ६०% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. या मतदारसंघात २०१२ मध्ये भाजपचा विजय झाला पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार किरीट सोळंकी या मतदारसंघातून पिछाडीला होते. जर या मतदारसंघातून भाजपचा परत विजय झाला तर पुरोगाम्यांच्या नाकाला नक्कीच मिरच्या झोंबतील हे नक्कीच. उत्तर प्रदेशातही देवबंदसारख्या मुस्लिमबहुल मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय झाला होता.पण देवबंदमध्ये सपा-बसपा उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली त्यामुळे ४३% मते मिळून भाजप उमेदवाराचा विजय झाला. तशी परिस्थिती जमालपूर-खाडियामध्ये नाही. तिथे भाजपचे भूषण भट आणि काँग्रेसचे इमरान खेडावाला यांच्यात थेट लढत आहे. २. राजकोट (पश्चिम) या मतदारसंघातून भाजपकडून मुख्यमंत्री विजय रूपाणी उमेदवार आहेत तर काँग्रेसने २०१२ मध्ये राजकोट (पूर्व) मधून जिंकलेल्या उद्योगपती इंद्रनील राजगुरू यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ पूर्वी राजकोट-२ या नावाने ओळखला जायचा. या मतदारसंघातून भाजपचे हेवीवेट उमेदवार निवडून आले आहेत. १९८५ ते २०१२ या ६ निवडणुकांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते वजुभाई वाला निवडून गेले होते. ते अनेक वर्षे गुजरातचे अर्थमंत्री होते. सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. २००१ मध्ये त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देऊन नव्याने मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्र मोदींना पोटनिवडणुक जिंकून विधानसभेत जायचा मार्ग मोकळा केला होता. या मतदारसंघातून फेब्रुवारी २००२ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिली निवडणुक जिंकली होती. वजुभाई वाला यांची कर्नाटकच्या राज्यपालपदावर नियुक्ती झाल्यावर त्यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तिथे सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय रूपाणी निवडून गेले. ३. विरमगाम अहमदाबाद जिल्ह्यातील या मतदारसंघात हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांचेही वास्तव्य आहे. त्यामुळे या दोघांचा काँग्रेसला कितपत फायदा झाला आहे याचे या मतदारसंघातील निकाल हा बर्‍याच प्रमाणात दर्शक असेल. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला वगैरे नाही. काँग्रेसचे उमेदवारही इथून निवडून गेले आहेत. २०१२ मध्ये काँग्रेसकडून डॉ.तेजश्री पटेल निवडून गेल्या होत्या. मध्यंतरी बरेच आमदार भाजपमध्ये आले त्यात या डॉ.तेजश्री पटेलही भाजपमध्ये आल्या. यावेळी त्या भाजपच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांच्याविरूध्द निवडणुक लढवत आहेत. डॉ. तेजश्री पटेल विरमगाममधील एक नामांकित गायनॉकोलॉजिस्ट आहेत. त्यांचे नावही त्या परिसरात चांगले आहे. त्याचा फायदा त्यांना झाला आणि विजय झाला तर तो हार्दिक पटेलला बरोबर घेणार्‍या काँग्रेसला तो धक्का बसेल हे नक्कीच. हार्दिकचे घर असलेल्या मतदारसंघात एक पटेल उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडून जाणे हार्दिकसाठी तितकेसे चांगले नसेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 10:27 नवीन
२०१२ मध्ये भाजपने ११५ जागा जिंकल्या होत्या. भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्षाने २ जागा जिंकून अजून ८ जागांवर भाजपचे नुकसान केले होते. त्यांचा पक्ष नसता तर भाजपने १२५ जागा जिंकल्या असत्या. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजप १२५+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ६८ पैकी ५०+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. गुजरातमध्ये काँग्रेस जिंकणे किंवा काँग्रेसची परिस्थिती सुधारणे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. तसे झाले तर १९८० च्या दशकात गुजरातमध्ये खाम या जातीयवादी प्रकाराची पुनरावृत्ती होईल. तसेच ९० च्या दशकात वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या बाटलीचे बूच उघडल्यामुळे त्यातून उ. प्र., बिहारमध्ये मुलायम, लालू, काशीराम इ. जातीयवादी भुते बाहेर पडली याचीच पुनरावृत्ती अल्पेश, जिग्नेश इ. मुळे होईल व तसे होणे देशाला परवडणारे नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 10:27 नवीन
२०१२ मध्ये भाजपने ११५ जागा जिंकल्या होत्या. भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्षाने २ जागा जिंकून अजून ८ जागांवर भाजपचे नुकसान केले होते. त्यांचा पक्ष नसता तर भाजपने १२५ जागा जिंकल्या असत्या. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजप १२५+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ६८ पैकी ५०+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. गुजरातमध्ये काँग्रेस जिंकणे किंवा काँग्रेसची परिस्थिती सुधारणे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. तसे झाले तर १९८० च्या दशकात गुजरातमध्ये खाम या जातीयवादी प्रकाराची पुनरावृत्ती होईल. तसेच ९० च्या दशकात वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या बाटलीचे बूच उघडल्यामुळे त्यातून उ. प्र., बिहारमध्ये मुलायम, लालू, काशीराम इ. जातीयवादी भुते बाहेर पडली याचीच पुनरावृत्ती अल्पेश, जिग्नेश इ. मुळे होईल व तसे होणे देशाला परवडणारे नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 13:23 नवीन
भाजपाच्या बाटलीतून यक्ष , किन्नर आणि अप्सरा येतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:51 नवीन
एकटा मोदी मोप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:53 नवीन
ह्या गांधी लोकांना हाकलून देत नाहीत तोवर काँग्रेस सर्वत्र आपटो. नंतर आलटून पालटून सत्तेत येवो.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 12/13/2017 - 15:21 नवीन
शिवसेना आणि आप पक्षां विषयी कोणी भाकीत करेल काय ? हे पक्ष एखादी जागा जिंकतील असे वाटत नाही. पण ते किती जागांवर डिपॉझीट घालवतील या बद्दलचे भाकीत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/14/2017 - 05:44 नवीन
गुजरातमध्ये सुरुवातीला भाजप बॅकफूटवर वाटत होता पण त्याचे कारण राहुल गांधीचा धडाका नव्हे तर काहीसे विरोधात गेलेले पटेल समाजाचे मत होते. काँग्रेसचे लोक ज्या प्रमाणात सेल्फ गोल करत आहेत ते बघून खरे तर वाईट वाटते. एकूण अधिक उणे बघता फार मोठी उलथापालथ होईल असे वाटत नाही. महागाईच्या मुद्द्यावर निवडणूक निकाल बदलू शकतात पण त्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष का केले हे अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 12/14/2017 - 06:18 नवीन
उदा. एका बंद खोलीमधे काँग्रेस आणी भाजपाला बंद करुन, तिथे, १ रु. ते २००० र. च्या खुपसार्‍या नोटा उधळल्या, काँग्रेस- जास्तीत जास्त नोटा जमा कराव्या म्हणुन तुटुन पडली नोटांवर भाजप- कोपर्‍यात उभी राहुन आधी अंदाज घेतला की जास्त मुल्य असलेल्या नोटा कुठे कुठे पडल्यात मग जमा करायला तुटुन पडली. या भानगडी मुळे त्यांना कुठला मुद्दा घेवु कुठला नको असे झाले असल्याने महागाईचा मुद्दा निसटला असेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/14/2017 - 06:33 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/14/2017 - 07:59 नवीन
गॅरी भाऊ व डॉक्टर साहेब उत्तम विश्लेषण ... माझ्या काही गुजराती मित्रांचे (गुजरात मध्ये राहणारया) मत : इंग्लिश मीडिया दाखवते तेव्हडी भा ज पा ची स्थिती वाईट नाही .... लोक भाजपा वर नाराज आहेत पण ते काँग्रेस ला पर्याय मनात नाहीत ... माझे स्वतःचे अंदाज गुजरात : भाजप ११० ते १२० काँग्रेस ६० तो ७० हिमाचल : भाजपा ४५+ बघूया काय होतंय ते ... जाताजाता .... शेवटी गुजरात मध्ये हिंदूंचे सरकार येणार ... फक्त ते "जनेऊधारी" हिंदुचे असेल का राममन्दिरवाल्या हिंदूंचे ते तरखेलाच कळेल
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 09:19 नवीन
फक्त ते "जनेऊधारी" हिंदुचे असेल
मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते काशीमधे पुजा करू लागले. त्यामुळे पुरो लोक भयभीत झाले आयुष्यात हिंदू हजारदा शीवपूजा करत पाहायची सवय असलेल्या मुस्लिमांना सुद्धा कंप सुटावा अशी अपेक्षा करू लागले. तरी तो ओबीसी देवाची पूजा करतोय असा होता. आता चक्क जानवं-फ्लाँटींग भुटोर्गामी नेते पूजांचा सपाटा लावत आहेत आणि पुरोगामी लोकांना कौतुकाचं पेव फुटलंय.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 09:42 नवीन
३.५ % मध्ये एक डोके वाढले .. आनंद नाही का झाला तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/14/2017 - 09:52 नवीन
बाबु आलू ची फॅक्टरी लावणारे डोके काय कामाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 10:24 नवीन
अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ? एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे. तसेच ह्यान्नाही क्षणभर घातलेले जानवे फळेल अन मग तुमास्नी कळेल ! त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 11:02 नवीन
त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !
अहो, वाट्टेल ते वर देणं ही एक सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. त्यात देव, दानव सर्व आले. आता नै का पुरोगामी दिग्विजय सिंगांनी ओसामाजींना त्यांच्या जिवितकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ==========================
अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ?
त्याच्या डोक्यावर. ==============================
एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे.
हे देखील सामान्य मानवी के जीवन में ( ते मोदीसायेब मानव न मंता मानवी का मंतात देव जाणो) कॉमन आहे. आपल्याकडे दिल्लीत प्रचंड प्रमाण व्याध्रकार होते नि ते म्हणे खुर्च्यांवर बसून पुरोगामी पिंडींवर (वृत्त)पत्रेच (व्रुत्त)पत्रे अपर्ण करायचे म्हणे. मग त्यांना पुरो नेते प्रसन्न होत. मस्त गाड्या, बंगले, बायका (वा पुरुष), विदेशवार्‍या, इ इ भेट देत. फुक्कट. चालायचंच हो. कुठेपण पत्रे वाहा, कोणी ना कोणी प्रसन्न होतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 11:02 नवीन
त्यात तुमचे देव तर राक्षस , दैत्य , भुताखेतानाही वाट्टेल ते वर देवून बसतात !
अहो, वाट्टेल ते वर देणं ही एक सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. त्यात देव, दानव सर्व आले. आता नै का पुरोगामी दिग्विजय सिंगांनी ओसामाजींना त्यांच्या जिवितकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ==========================
अविश्वास कुणावर दाखवताय ? त्यांच्या डोक्यावर , जानव्यावर की देवावर ?
त्याच्या डोक्यावर. ==============================
एक व्याध शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता , टाइमपास म्हणून वरनं पानं तोडून टाकत होता . खाली शंकराची पिंडी होती म्हणे आणि त्यामुळे त्याला शंकर पावला म्हणे.
हे देखील सामान्य मानवी के जीवन में ( ते मोदीसायेब मानव न मंता मानवी का मंतात देव जाणो) कॉमन आहे. आपल्याकडे दिल्लीत प्रचंड प्रमाण व्याध्रकार होते नि ते म्हणे खुर्च्यांवर बसून पुरोगामी पिंडींवर (वृत्त)पत्रेच (व्रुत्त)पत्रे अपर्ण करायचे म्हणे. मग त्यांना पुरो नेते प्रसन्न होत. मस्त गाड्या, बंगले, बायका (वा पुरुष), विदेशवार्‍या, इ इ भेट देत. फुक्कट. चालायचंच हो. कुठेपण पत्रे वाहा, कोणी ना कोणी प्रसन्न होतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 10:51 नवीन
बा बु ब राव, खालच्या लिंकेत तुम्हा पुरोंची लोकसंख्या कशी आक्रस्ताळेपणाने वाढते आहे हे कळेल. त्याने तुम्हाला हर्षवायू होईल. https://en.wikipedia.org/wiki/Growth_of_religion#Growth_of_religious_groups खालची बातमी वाचून तर नवस फेडायला नक्कीच जावे लागेल पुरोगाम्यांना. https://www.theatlantic.com/international/archive/2015/04/islam-could-become-the-worlds-largest-religion-after-2070/389210/ ============================== तसा राहुल बाबाने बाप मरते वेळी जानवे घालून फिर्‍या मारल्या होत्या अग्नि देण्यापूर्वी. त्यामुळे त्यात नविन आनंददायक काही नाही. त्यावेळेस ते ३.५% +१ डोके धरले होते. मग ते ३.५% + १ कवटी असे निघाले. ================================ http://www.firstpost.com/politics/woo-brahmins-to-win-prashant-kishor-tells-congress-ahead-of-uttar-pradesh-state-polls-2692556.html यावेळी मात्र (विकृत) आनंद झालेला. पुरोगाम्यांनी ब्राह्मणांची चाटूगिरी करावी असे त्यांचा सल्लागार म्हणतो. अरे काय वेळ यावी तुमच्यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
त
तर्री गुरुवार, 12/14/2017 - 10:34 नवीन
भा. ज.पं. १५० जागा ( सहज) जिंकेल. मी उत्तर प्रदेश आणि गुजराथ च्या निवडणुकी दरम्यान अमित शहाना ( मोदिन्पेक्षा) जास्त ऐकले आहे. जवळ जवळ सगळी हिंदी भाषणे आणि मुलाखती. त्या माणसाला जनतेची मानसिकता , सांखिकी , रणनीती , जातीपातीची समीकरणे यांचे चांगली समज आहे. ( २००० च्या आणि विशेषत: २००७ च्या गुजरात भाजपच्या विजयात मोदिन्पेक्षा शहा ची रणनीती चा मोठा आहे ( जेरीमानडरिंग आणि anti इनकमबन्सी झेलणे) ) उत्तर प्रदेश निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजप ३०० जागा जिंकेल असे सांगितले होते पण त्याचा पुढचे वाक्य महत्वाचे होते , एकदा तीनशे जागा जिंकल्या कि वर कितीही जागा येवू शकतात. ( अमित पूर्वी शेअर ब्रोकर होते असे ऐकण्यात / वाचण्यात आले आहे)आणि ती निवडणूक गुजरात पेक्षा खूप कठीण आणि जिकिरीची होती. पठ्ठ्या ४ महिने तळ ठोकून होता. असेच मत त्यांनी आसाम निवडणुकीत केले होते आणि तेथील मुस्लीम मतदाराचा टक्का पाहता हे भाकीत अचूक येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही , कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याची खेळीही नाही. आता मी आज ते सोमवार पर्यंत काय ( आणि कसे) बोलतात त्यावर लक्ष ठेवून आहे. पण त्यांच्या अप्रोच मध्ये काही बदल होईल असे वाटत नाही. गुजरातच्या घरच्या मैदानात त्यांचे भाकीत चुकल्यास तो त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाला , मोदींना , भाजपला एक सेट back असेल असे मी मानेन. येथे १५० म्हणजे १४१ तो १५१ ही रेंज पकडली आहे. माझा वैयक्तिक अदमास - १६०+
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 12/14/2017 - 12:18 नवीन
बहूतांशी प्रतिसाद पटला.. सगळ्यात हे वाक्य खूप महत्वाचे आहे. """भाजपच्या विजयात मोदिन्पेक्षा शहा ची रणनीती चा मोठा हात आहे""" या धाग्यावर नेमके शहांना जास्त श्रेय दिले गेलेले दिसत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 13:38 नवीन
भाजपाचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात पोलादी पुरुष खायला अन कविवर्य दाखवायला होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/14/2017 - 13:57 नवीन
खायचे दात पूर्वाश्रमीचे ब्रोकर होते म्हणे. सुपा एवढ्या काना मागच्या डेडळात लय मोठे खेळाडू बसलेत. त्यांचा पैसे हे ब्रोकर दाखवायच्या दातावर लावत आहेत. बाकी काही नाही. हे लोकांना आता नाही समजणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
M
mayu4u Fri, 12/15/2017 - 07:44 नवीन
डेडळ म्हणजे? वऱ्हाडी शब्द आहे का हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/14/2017 - 16:29 नवीन
हा तुमच्या द्वेषाचा मुद्दा असू शकतो काय? किंवा...अच्छा हा तुमच्या द्वेषाचा मुद्दा आहे होय?..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 17:49 नवीन
भाजपाचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात पोलादी पुरुष खायला अन कविवर्य दाखवायला होते.
काँग्रेसचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात. पुर्वीच्या काळात मोगरागजरा पुरुष खायला अन पंचापुरुष दाखवायला होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/14/2017 - 19:07 नवीन
जबरी! अजून एक उत्तुंग षटकार!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 19:09 नवीन
तुम्ही एकच बॉल खेळून गायबलेत की ! पहिल्या हॅपी बर्ड्डेनंतर तुम्ही पुन्हा खेळायला आलेच नै गुरुजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/14/2017 - 19:19 नवीन
पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना जिंकल्यावर पुढे खेळण्याची गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
B
babu b Fri, 12/15/2017 - 02:35 नवीन
अग्गोबै ! खरं की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 06:49 नवीन
तुम्ही एकच बॉल खेळून गायबलेत की !
प्रिय बंधू बाबू बी, तुमची खेळायची सगळी हौस पूर्ण करायला मी आहे की. माझ्यामधे अघोरी पेशंस आहे. ------------- बाकी तुमच्यासोबत एकच बॉल खेळून जाणं हे गुरुजींचं जैविकदृष्ट्या असममितीय वर्तन मला देखील विचित्र वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 08:07 नवीन
जन्मजात निर्लज्जपणाला हरविण्यासाठी अघोरी पेशन्स पुरा पडेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
शाम भागवत गुरुवार, 12/14/2017 - 11:13 नवीन
३:०० नंतर मार्केटने उसळी मारली. भाजपाला भिती नसावी. ट्फ फाईट झालेली दिसत नाहिय्ये. भा जपाच्या मागच्यावेळेपेक्षा जागा वाढल्या असाव्यात.. किती ते मात्र नाही सांगता येणार. कारण तेवढा अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 11:53 नवीन
बाय ऑन रूमर सेल ऑन न्यूज सोमवार लालेलाल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा