Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अ
अंतरा आनंद
Sat, 01/06/2018 - 06:53
🗣 327 प्रतिसाद
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया द्या
122881 वाचन

💬 प्रतिसाद (327)
प
पैसा Sun, 01/14/2018 - 12:07 नवीन
तीळगूळ घ्या आणि गोड बोला. तुम्ही लिहिलं म्हणून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. चलता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
A
arunjoshi123 Sun, 01/14/2018 - 10:44 नवीन
तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल.
तसा याचा नि विषयाचा काय संबंध आहे देव जाणो, पण इथले प्रतिक्रियावादी स्वतः दलित नाहीत, दलितांपैकी कोणाचा या उत्सवाला विरोध नसूच शकतो, प्रतिक्रियावाद्यांना दलितांचे विश्व माहित नाही इ इ गृहितके उगाच बनवत आहात. (तसा माझ्याकडेपण डेटा नाही, पण विचारून घेतलेलं बरं.). मी तुमच्या दलितवस्तीतील पुरोगामी फेरफटक्याला कमी लेखू इच्छित नाही, पण एक गोष्ट... मी लहानपणी कैकाडी, लमाणी, पारधी, महार, मांग यांच्या घरी राहिलो आहे. प्रतिक्रियावाद्यांनी कदाचित दलित साहित्यात जी भयानक बाजू पाहिली आहे त्याची एक दुसरी अत्यंत सुंदर बाजू मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मी ३० वर्षाचा होईपर्यंत माझी आई माझ्या बर्‍याच वागण्या बोलण्याला "महार मांगी लक्षणं" म्हणे इतकी माझ्यावर या पार्श्वभूमीची छाप होती. आता याचा देखील विषयाशी संबंध नाही. पण या उत्सवाला विरोध म्हणजे दलितांना विरोध या मानसिकतेतून तुम्ही बाहेर येत नाहियेत. त्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. ------------------- फाटे न फोडता बघा सांगता येतं का कि ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
ए
एमी Mon, 01/15/2018 - 03:20 नवीन
ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >> भीमा-कोरेगावला 'त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय' झाला हे तुम्हाला मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 01/15/2018 - 05:44 नवीन
अर्थातच. तिथे जाऊन विजयस्तंभाला नमन करतात लोक. --------------------------- आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्‍या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे. ------------------------------ त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 01/15/2018 - 23:14 नवीन
आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे. >> अगदी बरोबर! === त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? >> नक्की का? कारण मी जेवढं वाचलय त्याततरी त्याला स्मृतिस्तंभ म्हणत होते, विजयस्तंभ नाही. बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत. >> बरोबर. पराजयची स्मृती म्हणून कोणी २०० वर्षांपूर्वी ३५०००₹ खर्च करणार नाही आणि १०० वर्षांपासून लोक तिथे दरवर्षी जाणारपण नाहीत. पण मला वाटतं 'आपले पूर्वज शूर, लढवय्ये होते' याची स्मृती म्हणून लोक तिथे जातात; कोणाचाही जय/पराजय साजरा करायला नाही. === आता परत तुमच्या मूळ प्रश्नाकडे: ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >> इथे तुम्ही ब्रिटिश = परके आणि पेशवे = आपले म्हणताय. जर प्रत्यक्ष लढणारे महार आणि अरब पाहिले तर कोणाला आपले आणि कोणाला परके म्हणणार? किंवा केवळ दोन लढणारे गट असा विचार केला तर कोण शूर, लढवय्ये वाटतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
आ
आनन्दा Sun, 01/14/2018 - 19:38 नवीन
मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 वर्षे संघाच्या अगदी जवळ काढली. 2 वर्षात मला एकदाही संघाच्या माणसामध्ये दलित द्वेष दिसला नाही, किंबहुना आमच्या पंगतीला सर्व जातींचे लोक कायमच होते.. सगळ्याच उजव्या संघटना बऱ्यापैकी मुस्लिम द्वेष्ट्या आहेत, तात्विक लेव्हलला नसल्या तरी कार्यकारी लेव्हलला आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/14/2018 - 23:28 नवीन
आनन्दा,
पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही
हेच तर खरं दुखणं आहे तथाकथित दलित पुढाऱ्यांचं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ए
एमी Mon, 01/15/2018 - 03:28 नवीन
पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही >> उजव्या संघटनेचं माहित नाही पण 'इथे' बरीच उजवी लोकं सतत आरक्षण, RTE, त्याचा उपयोग करून घेणारे यांच्याबद्दल द्वेषाने बोलत असतात. इतर काहीना सतत जिथेतिथे ब्रिगेडीच दिसत असतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विशुमित Mon, 01/15/2018 - 04:01 नवीन
+11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
व
विशुमित Mon, 01/15/2018 - 04:02 नवीन
+१११११ पुरोगामी राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Mon, 01/15/2018 - 07:50 नवीन
पुरोगामी राहिले.
अजुन धर्माबाहेर प्रेम /लग्न करणाऱ्या, तथाकथित "मूर्ख" स्त्रिया राहिल्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
र
राही Mon, 01/15/2018 - 04:32 नवीन
इथे काही लोकांकडून सततच उजवे, दलित आणि पुरोगामी यांच्या विरोधात द्वेषाने, त्वेषाने आणि आवेशाने तलवारी उपसल्या जात असतात असे दिसते. धार थोडी बोथट असती तरी चालण्याजोगे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
प्रचेतस Mon, 01/15/2018 - 04:38 नवीन
काहीसा असहमत. उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते, सतत पेशवाईचे उल्लेख निघतात, अरे बाबांनो, तुम्ही ह्यावर काही वाचलंत काय? उगाच ब्रिगेडी लेखन वाचून हवेत गोळ्या माराव्यात. मी असल्या चर्चांत कधीच भाग घेत नाही पण हल्ली हे खूपच जाणवते म्हणून लिहावेसे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ए
एमी Mon, 01/15/2018 - 22:32 नवीन
उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते >> ब्राह्मणेतर आहेतच कितीजण येथे? आणि त्यातले ब्राह्मणांबद्दल अधिक द्वेष उघडपणे+सतत व्यक्त करणारे किती? फारच नगण्य. त्याकडे दुर्लक्ष करता येणे फार अवघड नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
A
arunjoshi123 Mon, 01/15/2018 - 08:39 नवीन
ऐतिहासिक काळात पेडस्टलाचा १००% एरीया व्यापायची असल्याने पुरोगाम्यांना आता सगळीकडेच त्वेष नि आवेश दिसतो. अन्य विचारसरणींसाठी तुम्ही लोकांनी जी टोमणेखोरगीरी केली नि जितक्या निर्लज्जपणे केली ती उलट ऐकून घ्ययची सवय मात्र नव्हती. अचानक ऐकूनही घ्यावं लागत आहे इतकाच फरक आहे. त्यात फार त्वेष इ नाही. तशास तशी भाषा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Mon, 01/15/2018 - 05:11 नवीन
आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही. इतकेच नव्हे तर माझ्यासारखे जे आरक्षण असावे पण ते खरोखर गरजवंत ( मागासवर्गातिलच ) यानाच असावे असे म्हणतात त्यांनाही दुजोरा देताना आढळत नाहीत. (म्हणजे जर १० जागा मागासवर्गाला असतील तर त्यातील क्रिमी लेयरला वगळले तर मागासवर्गातीलच खऱ्या १० गरजवंतांना त्या जागा मिळून त्यांचा अंत्योदय होईल) आम्ही आता वर आलो आणि सरकारी जावई झालो तरी आम्हाला फायदे मिळालेच पाहिजेत मग आमच्या (मागास) वर्गातील खरे मागास लोक मागे राहिले तरी चालतील. हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे. वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Mon, 01/15/2018 - 07:47 नवीन
सर, माझ्यामते सामाजिक मागासलेपणा साठी देण्यात येणारे आरक्षण व उत्पन्न आधारित क्रिमी लेयर याचा काही संबंध नाही. तुमच्या मताचा आदर आहे, पण मला मान्य नाही. मी तर तर म्हणतोय व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 Mon, 01/15/2018 - 08:42 नवीन
का, का म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 01/15/2018 - 08:52 नवीन
म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे ज्यांचे वडील आय ए एस अधिकारी आहेत (आणि त्यांनी बेस्ट मध्ये भरपूर माया केली अशी वदंता आहे) याना एम बी बी एस साठी आरक्षित सीट मिळाली आणि नंतर आय एफ एस साठी सुद्धा आरक्षण मिळाले हे तुम्हाला मान्य आहे म्हणा कि. जिचे वडील आय ए एस अधिकारी आहेत ती मागासलेली कशी? बरं मी असा अजिबात म्हणत नाही कि ती सीट खुली करा ती सीट मागासवर्गीयालाच द्या म्हणजे त्याच वर्गातील जो उमेदवार खरंच पीडित आहे त्याचा अंत्योदय होईल. मी जो दांभिकपणा म्हणतो तो हाच आहे. आता आम्ही सगळ्या सोयी घेऊन सरकारी जावई झालो तरी आमच्याच मुलाबाळांना आरक्षण उपलब्ध झालेच पाहिजे मग आमच्याच जातीतील खितपत पडलेले लोक खड्यात गेले तरी चालतील. मुखवटे काढले कि आतले खरे रूप बाहेर पडते ते असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 01/15/2018 - 08:57 नवीन
जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त इतर मागासवर्गीयांना आहे. (OBC) मागासवर्गीय (BC) ना नाही. तो सुद्धा ८ लाखापॆक्षा जास्त उत्पन्न असेल तर म्हणजेच महिना फक्त ६६ हजार म्हणजे फारच गरीब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पगला गजोधर Mon, 01/15/2018 - 09:17 नवीन
"सामाजिक मागासलेपणासाठी देण्यात येणारे आरक्षण" व "अर्थउत्पन्न आधारित क्रिमीलेयर" याचा काही संबंध नाही.
व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.
टंकनचुक झाली, obc असेच म्हणायचे होते मला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 01/15/2018 - 11:09 नवीन
मग या खोब्रागडे ताई ना आरक्षण सामाजिक मागासलेपणासाठी दिलं होतं की कशासाठी? एक सोडून तीन वेळेस-- MBBS MD &IFS. बाकी त्यांनी आपल्या जातीच्याच एका लायक उमेदवार डॉक्टरला नेत्रतज्ञ होण्यापासून वंचित केलं याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे प्रवेश तर घेतला आणि मध्येच सोडून विदेश सेवेत गेल्या आणि जागा फुकट गेली. वा रे सामाजिक मागासलेपण? नीच स्वार्थीपणा आणि दांभिकपणा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एमी Mon, 01/15/2018 - 22:51 नवीन
सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही. >> हे मला मान्य आहे. पण सरसकट म्हणजे सरसकटच ie ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवी === मी माबोवर एक पर्याय सुचवला होता: • सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%), मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%). • याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात. === हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे. वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही. >> इथे नक्की कोणकोण पुरोगामी, वाममार्गी वगैरे आहे याची यादी कुठे मिळेल का? मलातर एकही दिसत नाही :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 01/16/2018 - 07:05 नवीन
आपल्याला क्रिमी लेयरची संकल्पनाच समजलेली नाही आणि आपल्याला समानतेचीही संकल्पना समजलेली नाही. क्रिमी लेयर म्हणजे ज्यांना पगार ६६६६६/- रुपये महिना मिळतो अशा लोकांना मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या सवलती मिळणार नाहीत. याचा अर्थ असा नव्हे कि त्यांना खुल्या वर्गात प्रवेश घेता येणार नाही. खुल्या वर्गाला क्रिमी लेयर लावायचा म्हणजे काय करायचं? सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%) बाकी मुंबईच्या लोकल मध्ये महिलांना ६ डबे आणि पुरुषांना ६ डबे द्यायचे का? मग जर ४८ लाख पुरुष प्रवास करतात आणि १२ लाख महिला तर आपले हे "आरक्षण" मूर्खपणाचे आहेत एवढेच मी सांगू इच्छितो. या १२ लाख स्त्रियांना पुरुषांच्या डब्यात प्रवास करण्याची मुभा आहे शिवाय लेडीज स्पेशल गाड्या चालवतात. उद्या तुम्ही असेही म्हणाल कि आहे त्या पुरुषांना राजीनामा द्यायला लावा आणि त्यांच्या जागास्त्रीयानी भराव्या मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%). • याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात हे म्हणणारे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या मूलभूत विचाराच्या विरुद्ध असून सर्व जाती धर्मात भारत विभागून तुकडे करणाऱ्या "भारत तेरे टूकडे हो" वाल्यांची विचारसरणी दिसत आहे. आपल्या भंपक विचारसरणी बद्दल आपल्याला कोपरापासून नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 08:02 नवीन
क्रिमी लेअरची कन्सेप्ट लोकांना समजावून सांगण्याआधी , घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या. आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही. या दोन भिन्न बाबी आहेत. जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे. नरसिंहा राव सरकारने आर्थिक दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला पण न्यायालयाने, आर्थिक सद्य स्थितीवर दिलेले आरक्षण हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 01/16/2018 - 08:13 नवीन
आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही. वड्याचा तेल वांग्यावर काढू नका आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यायचे मी अजिबात म्हणत नाहीये. मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी . बाकी आपल्याही विचारसरणीतील "दांभिक"पणा "तरंगून वर" आलेला स्पष्ट दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 09:06 नवीन
मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी .
And do you propose to measure "मलई खाणे" ? What is the basis to identify "खरे पददलित" ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 09:08 नवीन
टंकन दुरुस्ती 1. And how do you propose to measure "मलई खाणे" ? 2. What is the basis to identify "खरे पददलित" ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 11:47 नवीन
मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक आहे. पण पददलित खालील पैकी सर्व अटी पूर्ण करत असावा. १. तो लिस्ट केलेल्या जाती नि उपजातीचाच असावा. २. तो ग्रामीण वा वनवासी असावा. (आरक्षणामुळे वा बिना आरक्षण शहरी क्षेत्रात गेलेल्या लोकांना आरक्षण देऊ नये.) ३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.) ४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. ५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत. ६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी. ७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत. ====================== याला खूप इलॅबोरेट करावं लागेल. बरेच उपनियम इ करावे लागतील. पण सर्वसाधारण पणे इतकं पुरेसं आहे. व्यक्तिगत नि कौटुंबिक स्तरावर कोणते किकष मोजायचे हे ठरवायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 11:59 नवीन
मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, म्हणूनच मी वर लिहिलंय , पण परत एकदा देतो "आरक्षण" व "आर्थिक -उत्पन्न" याचा संबंध लावणे, उचित नाही. कारण या दोन भिन्न बाबी आहेत. घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे. नरसिंहा राव सरकारने "आर्थिक" दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला, पण सर्वोच्च न्यायालयाने, "आर्थिक स्थितीवर" बेतलेले आरक्षण, हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.
३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.) ४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. ५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत. ६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी. ७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत.
या मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ? सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 12:16 नवीन
घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे.
हेच आणि हेच आहेत आणि अन्य काही असूच शकत नाहीत? असं कुटं लिवलंय? =========================== मग ते आर्मिवाले आणि अपंग लोक एका विशिष्ट जात/धर्म नि लिंगाचेच असतात का? ====================== घटना बदलायची गोष्ट आहे ना? ========================== आरक्षणाच्या फॉर्मॅटचे अनिष्ट परिणाम आहे तरी तोच फॉर्मॅट कवटाळणार का? ===================== सामाजिक मागासलेपणा कसा मोजतात म्हणे? त्याचे पॅरामिटर काय? संबंध लावायची तुमची पद्धत शिकून घ्यावी म्हणतो. उदा. स्त्रीलिंग असले कि मागासले पणा सिद्ध होतो बाकी काय बगायची गरज नाही असं असतं का? "फक्त" याच आधारावर पाटलाची बायको पुरुष तीनचाकी मानवी रिक्षावाल्यापेक्षा मागास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 13:10 नवीन
पगले, असल में तुझे इस प्रतिसाद पर उपप्रतिसाद देना है। =================== (ऑफेंन्स वाटल्यास क्षमस्व, पण तुमचा आयडी बघून असली वाक्यं सुचतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 13:40 नवीन
आणि हो अजून एक पुरवणी माझ्याकडून वर राहून गेली. - "आरक्षण" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य शब्द "प्रतिनिधीत्व" आहे. - "वरची / खालची जात" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य टर्मिनॉलॉजी "पुढारलेल्या / मागासलेल्या जाती" अशी आहे. स्त्रियांच्या प्रतिनिधित्वास कारण की "ढोल, पशु, शूद्र, नारी हैं ये सभी ताडन के अधिकारी " अशी अनेक शतकांची मेन्टयालीटी ... . स्त्रियांनाहि प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे (सर्व समाजातील स्त्रिया ) कोटा अंतर्गत कोटा मध्ये (समाजा स्त्रियांना ३३ % एकूण प्रतिनिधित्व असेल तर उदा २७ % ऑफ ३३ % ओ बी सी स्त्रियांना, या प्रमाणे विभागणी असावी, स्त्रियांच्या कोट्यातील मागास वर्गाच्या स्त्रियांच्या जागा भरल्या तर उरलेल्या जागी सक्षम स्त्रिया मग त्या ब्राम्हण किंवा पुढारलेल्या जातीतील असतील तरिसुद्धा , भरून काढाव्यात ) स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळाले तर स्त्रीभ्रूण हत्या वैगरे कमी होतील असा आशावाद माझ्यासारख्याला आहे .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ए
एमी Tue, 01/16/2018 - 13:47 नवीन
कोटा अंतर्गत कोटा मध्ये (समाजा स्त्रियांना ३३ % एकूण प्रतिनिधित्व असेल तर उदा २७ % ऑफ ३३ % ओ बी सी स्त्रियांना, या प्रमाणे विभागणी असावी >> असंच आहे सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 13:47 नवीन
आणि हो "स्त्री" ही "स्त्री" आहे, म्हणुन सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणी म्हणून तिला प्रतिनिधीत्व मिळावे. ... उगाच काही लोकं , "त्यांचा बँक बॅलन्स बघा , आम्ही तर आमचा सर्व पगार त्यांच्या ताब्यात देतो, मग प्रतिनिधीत्वाची गरज काय ?" अश्या कोमेंटी पास करतील व पुढे जाऊन , झाशीची राणी इंदिरा गांधी अशी उदाहरणे देऊन एक्सेप्शनला जनरलाईज करतील आपल्या विरोधासाठी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 14:08 नवीन
आणि हो "स्त्री" ही "स्त्री" आहे, म्हणुन सामाजिकदृष्ट्या मागास आहे, आणी म्हणून तिला प्रतिनिधीत्व मिळावे. ...
त्या ताडन के अधिकारी मधे ढोर का पशू पण आहे ना? त्यानं काय घोडं मारलंय? ====================================================== स्त्री ही स्त्री आहे इतकाच निकष असला आणि अन्य काहीच भेद करायचा नसेल तर एकतर ३.५ बिलियन किंवा शून्य इतक्या नोकर्‍या/अ‍ॅडमिशनं इ इ द्यायला लागतील. ======================= त्यांच्यात एक थोर झाला म्हणून आरक्षण काढू नये असं तुम्ही लिहित आहात. पण एक थोर झाल्यावर आरक्षण काढा असा मुद्दा मी मांडलाय का? ============== बाकी तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित होतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 12:22 नवीन
बाय द वे, १. आरक्षणाचे निकष जातीपासून दूर नेण्यात ते उच्च जातींनी पुढे हॅ़क करण्याचा धोका आहे हे मान्य. २. पण तुमचा प्रतिसाद अत्यंत क्रूर आहे. मी दुर्दैवी हा शब्द देखील टाळत आहे. तो बुद्ध्या क्रूर नाही, नकळत आहे, पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 12:58 नवीन
आणि हो अजून एक पुरवणी माझ्याकडून वर राहून गेली. - "आरक्षण" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य शब्द "प्रतिनिधीत्व" आहे. - "वरची / खालची जात" ही टर्मिनॉलॉजी प्रॉपर नाही, त्याजागी योग्य टर्मिनॉलॉजी "पुढारलेल्या / मागासलेल्या जाती" अशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुबोध खरे Tue, 01/16/2018 - 13:55 नवीन
गजोधर बुवा एक तर तुम्ही वेड पांघरून पेडगावला जात आहेत किंवा मोगा सारखी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करायला शिकला आहात (अजोंच्या मेगाबायटी प्रतिसादामुळे उगाच या वादाला फाटे फुटत आहेत जे फुटले नसते तर बरे झाले असते) 1. And how do you propose to measure "मलई खाणे" ? 2. What is the basis to identify "खरे पददलित" ? क्रीम चा शुद्ध मराठीत अर्थ मलई असाच होतो. शब्दशः अर्थ न घेताही ज्यांनी आरक्षणात सरकारी नोकऱ्या आणि बढत्या मिळवल्या आहेत आणि ज्यांना ६६,६६६/- रुपये महिना पेक्षा जास्त पगार मिळतो आहे अशा म्हणजेच सरकारी नोकरीत प्रथम आणि द्वितीय श्रेणी (क्लास वन आणि क्लास टू) मध्ये आहेत अशा मागासवर्गीयांच्या मुलांना आरक्षणातून वगळून तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा समकक्ष मागासवर्गीयांच्या मुलांनाच आरक्षण मिळाले पाहिजे. आय ए एस अधिकाऱ्याला सातव्या वेतन आयोगांनंतर पगार अडीच लाख रुपये महिना (वर्षाचा नव्हे) मिळतो आणि इतर सोयी सवलती वेगळ्याच. ( म्हणजे २००० रुपये घरभाड्यात बंगला मिळतो. स्वीय सहाय्यक आणि वैयक्तिक नोकर सरकारी वाहन इ. ( मी वरकड/ अनैतिक उत्पन्नाबद्दल तर बोलतच नाही.) अशा लोकांना सुद्धा स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी स्वतःच्याच जातिबांधवांच्या डोक्यावर उभे राहू नये असे वाटत नाही. आरक्षणाने आमचे कोटकल्याण झाले आता आमच्याच मुलाबाळांचे पण होवो मग आमचे इतर ज्ञातिबांधव गावाबाहेर झोपडीत राहिले तरी चालतील या वृत्तीचे हे सरकारी जावई झालेले आहेत. बाकी दलितांवर अत्याचार, मनुवाद्यांचे सरकार इ घोषणा आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी उत्तम आहेत.हि वृत्ती आहे. या सर्व गोष्टींमध्ये मी घटनेत असलेली कोणतीही गोष्ट बदलण्याचे सुचवत नाही हे हि लक्षात घ्या. केवळ आपले ज्ञात उत्पन्न हाच एकमेव निकष आहे. यात हा अधिकारी २५ व्य वर्षी आय ए एस झाला आणि लगेच त्याला मूल झाले हे गृहीत धरून १८ वर्षे नोकरी होऊन हा अधिकारी सह आयुक्त(जॉईंट कमिशनर) पदाला पोहोचला हे गृहीत आहे. इतके असूनही आपल्याला क्रिमी लेयर लावावा वाटत नाही हा एकतर स्वार्थीपणाचा किंवा दांभिकपणाचा कळस आहे. बाकी मनुवादी वगैरे शिव्या देणे पुरोगामीपणाचे लक्षण असेल पुरोगामी म्हणून दिखाऊ पणा पुष्कळ झाला. डॉ देवयानी खोब्रागडे यांचा आदर्श मध्ये पण फ्लॅट आहे ( ओशिवऱ्या ला एक फ्लॅट आहे हे श्री उत्तम खोब्रागडे याना माहीतच नव्हते असा त्यांनी दावा केला आहे). आदर्शमध्ये फ्लॅट हा कारगिल युद्धात विधवा झालेल्या स्त्रियांसाठी म्हणून मंजूर झाला होता. माउंट कार्मेलसारख्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांचे पती अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना आपल्या मोलकरणीला किमान वेतन न दिल्याबद्दल अमेरिकेत अटक झाली आणि त्यांनी आपल्या राजनैतिक इम्यूनिटीमुळे सरकारने आपल्याला या खटल्यातून बाहेर काढावे अशी विनंती केली होती. हे सामाजिक मागासलेपण नसून मानसिक मागासलेपण आहे या सर्व सामाजिक मागासलेपणामुले आपण "त्यांच्या" मुलांना सुद्धा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी शिफारस करीत आहात हा तुमच्या दांभिकपणाचा कळस झाला. आपले खरे रूप उघडे पडले. असो. यापुढे आपल्याशी कोणताही प्रतिवाद करण्याची इच्छा नाही. इति लेखनसीमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 01/16/2018 - 14:49 नवीन
मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, म्हणूनच मी वर लिहिलंय , पण परत एकदा देतो "आरक्षण" व "आर्थिक -उत्पन्न" याचा संबंध लावणे, उचित नाही. कारण या दोन भिन्न बाबी आहेत. घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे. नरसिंहा राव सरकारने "आर्थिक" दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला, पण सर्वोच्च न्यायालयाने, "आर्थिक स्थितीवर" बेतलेले आरक्षण, हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला. तुम्ही मांडलेल्या मलई-मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ? सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही. असो त्यामुळे कोणी कीतीही कांगावा करत, त्यांचा तिळपापड झाला तरी सद्यस्थिती बदलत नाही, त्रागा करून घेण्याचा फायदा काहीच नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/17/2018 - 05:10 नवीन
आपले खरे रूप उघडे पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 01/17/2018 - 05:25 नवीन
फक्त नावापुरता खरेपणा आम्ही ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/17/2018 - 05:26 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Tue, 01/30/2018 - 08:51 नवीन
समता आंदोलन समिती या अनुसूचित जाती आणि जमातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीने इतर नऊ मागासवर्गीयांबरोबर अनुसूचित जाती आणि जमातींना पण क्रिमी लेयर लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हिताची याचिका (PIL) दाखल केली आहे. त्यावर मलई खाणाऱ्यांचे(आपल्याच जातिबांधवांना वंचित ठेवून आपल्या पोळीवर तूप ओढणार्यांचे) काय म्हणणे आहे? http://www.livemint.com/Politics/yWnkJBYApSTkPygM4Zc98J/SC-to-hear-plea-seeking-exclusion-of-creamy-layer-from-SCST.html http://www.livelaw.in/sc-seeks-centres-view-plea-exclude-creamy-layer-among-sc-st-reservation-benefits-read-petition/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनुप ढेरे Tue, 01/16/2018 - 09:09 नवीन
घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या. ही गंडवा गंडवी आहे. घटनेत आरक्षण दलित आणि आदिवासीयांच्यासाठीच होतं. ओबीसी आरक्षणापासून आरक्षणाचं राजकारण सुरू झालं. ओबीसी आरक्षण घटनेत नाही. आणि क्रीमी लेयरचा नियम फक्त ओबीसी आरक्षणासाठी आहे. माझ्यामते ओबीसी आरक्षण हे केवळ राजकीय फायद्यासाठी आणलं गेलं आणि मेन प्राब्लेम तो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एमी Tue, 01/16/2018 - 12:52 नवीन
मी बऱ्याचदा तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असते पण नेहमी दंडवत आणि नमस्कार वगैरे वाचून कंटाळा आला... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
S
sagarpdy Tue, 01/16/2018 - 07:16 नवीन
ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवी
हे थोडं समजावून सांगा === अजून थोडं - अप्रेजल सिस्टीम बंद करा / जातीनिहाय अप्रेजल ठेवा. [थोडक्यात फक्त आपल्या जाती+लिंग यात स्पर्धा ठेवा, क्रॉस स्पर्धा करायची गरज नाही : वासरात लंगडी गाय...]
प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत
उत्तम उपाय. म्हणजे ग्राउंड लेव्हल ला वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलांना एकमेकांशी संबंधच येऊ द्यायचा नाही. हल्ली अस्मितांच्या कारणांवर मुलामुलांत भांडणे होऊ लागलीत. त्यावर बेस्ट उपाय. -- गांधीजींचा स्वतंत्र मतदारसंघाना विरोध का होता ते जरा वाचून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Tue, 01/16/2018 - 13:00 नवीन
मी तुम्हाला RTE धाग्यांवर बघितलंय का कधी आठवायचा प्रयत्न करतेय :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
पिलीयन रायडर Tue, 01/16/2018 - 10:11 नवीन
तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे. --–----------------------- लेखाबद्दल, लेख तळमळीने लिहिला आहे पण जानवे वगैरे आणून सगळी माती केली. तरी हेतू प्रामाणिक वाटला म्हणून पुढे वाचत गेले तर प्रतिसदातला आक्रस्ताळेपणा लेखाशी बराच विसंगत वाटला. तुम्ही जय भीम वाले म्हणून दलितांना टोचून बोलू नका म्हणताना आपण सुद्धा इतर जातींचा अकारण अपमान करतोय हे लक्षात आले नसेल असे वाटत नाही. मग मी ते विशिष्ट हेतू ने केले वगैरे ला अर्थ नाही. दुसऱ्याने केलेली चूक दाखवताना तुम्हाला तीच चूक करण्याची परवानगी मिळत नसते. कोरेगाव भीमाला नक्की काय झालं ह्याबद्दल माझ्या तरी मनात बराच संभ्रम आहे. माझ्यामते तरी हेतू राजकीय होते म्हणून दंगल घडवून आणली. सामान्य लोकांमध्ये काही असंतोष खदखदत होता आणि म्हणून हे घडले असे मला वाटत नाही. ही मुद्दाम लावून दिलेली भांडणं आहेत. ह्यात ब्राह्मण कसे ओढले गेले ते सुद्धा कळलं नाही. पेशव्यांना हरवलं,पेशवाई संपवली वगैरे तर आधी सुद्धा बोलल्या गेलं आहे. मी स्वतः 2 वर्षापूर्वी 1 जानेवारीला हे पाहिलं आहे. मग ब्राह्मण आज दगडफेक का करतील? जर त्यांनी केलीच नसेल तर ह्या वादात ब्राह्मण आले कसे? वगैरे प्रश्नामुळे मी कोणत्याही चर्चेत सहभाग घेतला नाही. मिपावर 100 लोकांनी 100 चूक बरोबर, चांगल्या वाईट गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचा मी निषेध वगैरे केला नाही. मुदलात ते सगळं मी वाचलच नाही. पण तरीही मला ह्या धाग्यावर मला हवं ते मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. "जाओ पहले उस आदमीसे..." टाईप प्रकाराला फाट्यावर मारण्यात येईल. प्रत्येकाला जातीचा माज नसला तरी ममत्व असतेच. दलितांना वाईट वाटतं तसं ब्राह्मणांना सुद्धा वाटतं. मला माझ्या पूर्वजनीं केलेल्या भेदभावाबद्दल लाज वाटते. पण म्हणून कुणीही यावं आणि समस्त ब्राह्मणांना बोल लावावे आणि स्वतः च moral high ground घ्यावं हे जमणार नाही. जसे सगळे दलित हे आजमितीला मागासलेले नाहीत तसंच सगळे ब्राह्मण जातीयवादी मनुवादी वगैरे नाहीत. आणि हे नेमकं कसं ते सिद्ध करत बसणार नाही. दहा उदाहरणं तोंडावर मारता येतील पण कुणाच्या सर्टिफिकेटची गरजच नाहीये. ब्राह्मणांच्या चालीरीती, बोलणे, खाणे पिणे ह्याची खिल्ली उडवताना आणी त्यांच्या बायकांविषयी काहीही लिहिले जात असताना लोक निषेध करायला आले होते का? बघावे लागेल. बादवे, चाली रितीवरून आठवलं, आपल्या जातीच्या सवयी असणं ही काही गिल्ट घ्यायची गोष्ट नाही. घेणारही नाही. लोक बाबासाहेब ह्यांचे नावही घ्यायला टाळतात असे कुठेतरी वाचले. कमाल वाटली. आम्ही घेतो बुवा. पण ह्याच चालीवर अस्पृश्यते विरुद्ध काम करणारे सावरकर काय दलितांना प्रत:स्मरणीय आहेत का? असे विचारावे वाटते.साध्या कायप्पा वरच्या मेसेज मध्ये रामदास, ज्ञानेश्वर, टिळक, आगरकर, सावरकर वगैरे नावं टाळलेली पहिली आहेत. जात सगळेच मानतात. झोडपायला ब्राह्मण दिसतात फक्त. ह्या बाबतीत समस्त भारतीय मूर्ख आहेत हेच सत्य आहे. कुणीच कुणाकडे बोट दाखवू नये. गेले 15 दिवस विषय पेटता ठेवेल असा धागा काढल्याबद्दल अभिनंदन. सध्याच्या वातावरणात हेच हवं होतं. तुम्ही जयभीम वाले आणि आम्ही जानव्यावाले. कुणाला काही विसरू देऊ नका. ( केवळ लेख वाचून हे बोलले नसते, प्रतिसादात जबरदस्त निराशा झाली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
A
arunjoshi123 Tue, 01/16/2018 - 12:06 नवीन
लेखिकेच्या प्रतिसादांचे उद्देश ब्राह्मणांना झाडणे होते असं वाटलं नाही. जानव्याचा वा तत्सम उल्लेख आला मंजे फार डिफेंसिव व्हायची गरज नाही. आणि कायप्पावाले वा संकुचित दलित ब्राह्मणांशी कसे वाईट वागतात त्याचे लेखिकेने समर्थन केलेले नाही. तिचा काय संबंध? लेखिकेचा सिमित उद्देश झालेला उत्सव योग्य आहे नि त्यावर सर्व प्रकारची टिका होत आहे ती अयोग्य आहे असं म्हणणं आहे. उत्सवाच्या औचित्याबद्दल फारच कमी चर्चा होत आहे, तुमच्या प्रतिसादात देखील विरोध वा समर्थन वा मत काही नाही. ================ लेखिका वा उत्सवसमर्थक गँग चांगले स्पष्टीकरण देण्यात फोल ठरली आहे. वारंवार नि अनेक प्रकारे विचारून. केवळ विरोध करणारांचे विरोधाचे प्रकार नि पद्धती कशा चूक आहेत हेच तिने सांगीतले आहे. पण तरी वरची तुमची सगळी टिका नि तिचा संबंध काय? मंजे ४-५% असेल, पण तो मुद्दा नाही. =================== अर्थात परंपरेनुसार आपण हा प्रतिसाद वाचणार नाही आहात, पण दुसरं कोणी हा आशय कॉपी पेस्ट करू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा