देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत.
भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल.
थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है''मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा