Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा

क
क्रिप्ट
Tue, 02/27/2018 - 04:07
🗣 127 प्रतिसाद
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे. गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय? आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल. थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?

प्रतिक्रिया द्या
88615 वाचन

💬 प्रतिसाद (127)
स
सखाराम_गटण्या Sun, 09/30/2018 - 08:58 नवीन
हे काहीतरी नवीनच वाचतो आहे. ह्याबद्दल ऐकले किंवा वाचले नव्हते काही पुरावा आहे का कुठल्या लेखात वा त्यांनीच कुठल्या पुस्तकात असे लिहिले आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:59 नवीन
सध्याला आनंदी दिवस चालू असतील तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 11:07 नवीन
देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य.
देव बीव काय नसतं मंता? वास्तव आणि तुम्ही स्वत: काय शून्यातून टपकले? चांगल्या विचारांची कास धरा (जनरली आधुनिक विचार घाण असतात). पुरोगाम्यांच्या नादी लागू नका. असतील दिवस चांगले तर माजू नका, तेही दिवस निघून जाऊ शकतात. दिवस काही चांगले वाईट नसतात. ईश्वराला भजून सारे दिवस आनंदात राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/28/2018 - 17:22 नवीन
भाषेवर कण्ट्रोल ठेवा काका. देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते, देवा बीवांचं खुळ सोडा. व्यक्तिगत रोखाची भाषा सोडून लिहिता आलं तरी तुमचा देव तुम्हाला पावला असे म्हणू या....बाकी तुमचं चालू द्या.....शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:29 नवीन
बहुतेक तुम्हाला माजू नका असं म्हटलेलं आवडलेलं दिसत नाही. ठिक आहे , ते मातू नका असं वाचा किंवा तुम्हाला जे काय शिष्ट वाटतं ते वाचा. तुम्ही जे काय नास्तिकी डोस दिलेत त्याचं मी अस्तिकी रुपांतरण केलं आहे. स्वतःचं काहिही बोललेलो नाही. मूळ उद्देश तुमच्याइतकाच चांगला आहे.
देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,
नास्तिकांना वठणीवर आणण्यासाठी ईश्वराशीही पंगा घेणं वर्थ आहे. आधुनिकतेच्या नावाखाली नास्तिकांनी अपप्रचार करून सगळ्यांची अस्तिकता खोखली गेली आहे. आमचा ग्रह नासवला. आमची मूल्यं नासवली. आमची जीवनशैली नासवली. आमची मनं नासवली. ============================= जे काही लिहिलं आहे ते "नास्तिकांना" उद्देशून लिहिलं आहे (जसं यनावाला वैयक्तिक लिहित नाहीत म्हणता तसं.). आपला व्यक्तिगत आदर आहे. ते तुमच्या विधानाचं उत्तर असल्यानं गैरसमज होऊ शकतो हे समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बिटाकाका गुरुवार, 03/01/2018 - 18:13 नवीन
आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,
अर्रे देवा! म्हणजे अजून संशय आहेच तर! मला वाटलं कन्फर्म झाले असेल आतापर्यंत देव नाहीये ते. माणसाने कसं सुबुद्ध नास्तिक असावं, निर्बुद्ध तर....असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 12:17 नवीन
म्हणेल जग आम्हास मद्यपि परवा कसली मग त्याची ! परसुनि त्याचे शब्द रूढीचे दास झणी ते खवळू द्या देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शरद Wed, 02/28/2018 - 05:13 नवीन
(1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. (2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये (1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे व (2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत हे स्पष्ट केलेत तर माझ्या सारख्याला अभ्यास करणे सोपे जाईल. उपनिषदाचे नाव, अध्याय, मंत्र असे दिल्यास वाचणे सोपे होईल. जर वरील (1) व (2) प्रमाणे स्वच्छ उल्लेख नसतील तर कोणत्या श्लोकांवरून आपल्याला तसे वाटले हे जरी सांगितले तरी उपयोग होईलच. (हातात समिधा घेऊन प्रश्न विचारणारा नम्र जिज्ञासू) शरद
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/28/2018 - 09:26 नवीन
माझा स्वतःचा उपनिषदांचा अभ्यास नगण्य आहे. पण जो काही आहे तो या पुस्तकावरूनच आहे - "उपनिषदांचा अभ्यास". लेखक - के. वि. बेलसरे. तुमच्या प्रश्नाचं सरळ उत्तर त्यात आहे की नाही हे मला माहित नाही. अजून तेवढा अभ्यास झालेला नाही. पण कदाचित तुम्हाला फायदा होईल म्हणून सांगितले. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
क
क्रिप्ट Wed, 02/28/2018 - 13:42 नवीन
शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु शंकराचार्यांनी १० उपनिषदांवर टीका लिहिली आहे त्यामुळे ते महत्वाचे मानले जातात. त्यांची नावे येथे देतो ईश, केन, कठो, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्य बाकी वर दिल्याप्रमाणे उपनिषदे वाचलीत तरी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. Youtube वर रामकृष्ण मिशन चे स्वामी सर्वप्रियानंद यांचे मांडुक्य उपनिषद वर खूप छान व्याख्यान आहे IIT मध्ये दिलेले. तेही पहा. https://www.youtube.com/watch?v=eGKFTUuJppU&t=436s आणि जमल्यास त्यांची बाकी व्याख्याने पण ऐका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
श
शरद Sat, 03/03/2018 - 15:01 नवीन
माननीय श्री. क्रिप्टजी, मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा. तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे. मला पाहिजे असलेली माहिती इथे परत एकदा लिहतो. त्याबद्दल लिहा ही नम्र विनंती. (1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. (2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये (1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे व (2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत ? हे संबंधित उपनिषदाचे नाव, अध्याय (वल्ली) मंत्र क्रमांक या क्रमाने सांगा. आपला नम्र, शरद,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
क
क्रिप्ट Sun, 03/04/2018 - 23:48 नवीन
"मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा" शरदजी, मला वाटते मी तुम्हाला उत्तर आधीच दिलेले आहे. तसेच आपल्या विधानामध्ये विरोधाभास दिसत आहे. एकीकडे विचारता कोणत्या उपनिषदात विचारलेले लिहिले आहे आणि दुसरीकडे म्हणता मी नाव विचारले नाही. पुन्हा सांगतो मी सांगितलेली १० उपनिषदे वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल (वाचली नसल्यास निदान सुरुवात तरी करा). आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर २३९ उपनिषदे असतील तर मी तुम्हाला १० च सांगितली आहेत यावरूनच समजले पाहिजे होते की मी तुम्हाला २३९ मधून निवडक १० सांगितली आहेत ते केवळ संख्या आणि नावे देण्याकरिता नाही तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यात दडले आहे म्हणून. असो. "तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे." -- तुम्ही व्याख्याने ऐकलीत का? कदाचित त्यामधून तुम्हाला तुमचे उत्तर मिळू शकले असते. न ऐकताच ते असंबंधित आहे असे म्हणणे बरोबर नाही. आता याही १० मधून जर तुम्हाला हवे असेल मांडुक्य उपनिषद आणि केनोपनिषद वाचा. केनोपनिषद प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. आणि शेवटी उत्तर म्हणून जे सांगितले आहे ते कसे प्राप्त करावे याचेही मार्गदर्शन आहे. मांडुक्य उपनिषदात ओम वरील ध्यान सांगितले आहे (मंत्र क्रमांक मुद्दामच देत नाही (माहित असूनही). थोडे कष्ट तुम्हीही घ्या :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
र
राही Wed, 02/28/2018 - 11:12 नवीन
आध्यात्मिक ग्रंथ शेकडो आहेत. कपाटांत तर आहेतच पण जालावरही आहेत. अनेक जण ते वाचत असतील. (खरे )संतसुद्धा अनेक आहेत. त्यांचे हजारोंनी सच्छिष्य आहेत. या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते. कोsहम् , मी कोण आहे, मी काय आहे, माझे गुण कोणते, दोष कोणते, माझी क्षमता किती, या सगळ्याला जोखून मी किती उड्या माराव्यात अथवा शांत राहावे, सुखदु:खांना कसे सामोरे जावे हेच मुख्यतः शिकायचे असते. स्थिरचित्त होऊन विवेकबुद्धी धारदार करायची असते. हे घडले की 'लीलया भवजलं तरणीयम्' ही पायरी गाठायला कितीसा वेळ? असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात. पण परमसंतांच्या सर्वच शिष्यांना हे आत्मदर्शन होईलच असे नव्हे. 'वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां,यथैव तथा जडे, न तु खलु तयोर्ज्ञाने वृद्धीं करोति, अपहरति वा'. पण सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर मणि चकाकतो, मातीचा गोळा नव्हे. 'मणि:, न मृदां चयः' याचे कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आणि क्षमता वेगळ्या आहेत. जेव्हढे दान मिळाले आहे, ते पुरेपूर वापरणे इतकेच आपल्या हातात असते. आणि तेच शिकायचे असते. तुझा तूच उद्धारकर्ता असेही संत सांगतातच. देव म्हणजे शब्दशः ' one who shines forth'. असे तेजस्वी, ओजस्वी बनण्यासाठी चित्तस्थैर्य आणि विवेकाची जरूरी असते. मग आपणच देव आणि आपला देह हेच देवाचे मंदिर.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 11:27 नवीन
या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते.
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 12:07 नवीन
राम राम अवघे जन म्हणती कोणी न जाणती आत्माराम ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 12:41 नवीन
देव नाहीच देव्हार्यात देव नाही देवालयी कुथे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी शोधीशी मानवा राउळी मंदिरी. नांदतो देव हा आपल्या अंतरी नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी. देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे. आमची आजी म्हणत असे " देव आपल्यावर काही घेत नाही "आजोबा म्हणत .. लग्नाच्या मंत्रात बे चा पाढा घुसडला तरी ते कुणाला कळणार नाही इतकेच त्याकडे लोकांचे लक्ष असते. मी गीतेचा पंधरावा अध्याय अस्खलित म्हणून दाखवल्यावर मामा म्हणाला " अर्थ किती श्लोकांचा उलगडला ? " आजीने आईला आई लहान असताना बजावले होते " दुधावरची साय खाल्ल्याने आई मरते. " माझी आई प्रयोग करून मत बनविनारी होती. तिने दुधाची साय खाऊन पाहिली. त्यानंतर माझी आजी सुमारे ४० वर्शानी मरण पावली. मी एका धार्मिक घरात जन्माला आलो. उतरवून टाकलेल्या लिंबाचे सरबत करून ही पिऊन बघितले . आज ६५ व्या वर्शीही कोणत्याही भुताला मला हात लावायला जमले नाही.भावाच्या अंत्या विधीला जानवे लागेल ते नव्हते म्हणून पुडी च्या दोर्याचे जानवे करून घातले गायत्री मम्त्र न म्हणता. काही बिघडले नाही. माझे आजोबा गणपती बनवीत व न खपलेले गणपती सहज मोडून टाकीत . म्हणत " अरे त्या तर मातीच्या मूर्ती ! " म्हणूनच मी म्हटले आहे तुम्ही किती प्रयोगमार्गी आहात यावर तुमचे पुढील जीवनात तत्चज्ञान ठरत असते. आजही भू: ..... या सात पातळ्या गायत्री मम्त्रात सांगितलेल्या आहेत त्याचा अर्थ किती भक्ताना माहीत आहे मला शंका आहे. एक तरी ओवी अनुभवावी हेच खरे ! पण तथाकथित भक्त ती तरी अनुभवून पहातात का .. हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे. हे सांगायला कोणाही संताची गरज काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
र
राही Wed, 02/28/2018 - 13:57 नवीन
अतिशय आवडला. संपूर्ण सहमत. उरलेल्या गणपतिमूर्तींच्या विल्हेवाटीचा किस्सा तर अगदी रॅशनल विचार दाखवतो. अलीकडे मुंबईत विसर्जन झालेल्या मूर्तींची विटंबना होते अशी हाकाटी असते. काही स्वघोषित स्वयंसेवक अशा मूर्ती समुद्रातून 'वाचवतात'. म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्याला लागल्या तर त्यांची भग्न अंगे गोळा करून हारीने ठेवतात. पूजाबिजा आरतीबिरती होते आणि साग्रसंगीत पुन्हा विसर्जन होते. आता ही उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या? पुढच्या भरतीच्या वेळी जे काही व्हायचे ते होईलच ना? फार तर मोठ्या ट्रकमधून नेऊन त्या श्रेडर किंवा तत्सम यंत्रामध्ये घालाव्यात. एरवी किनाऱ्यावर घाण साचते ती उचलायला कोणी नाही. नको तिथे उत्सव आणि टाळ चिपळ्या कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/28/2018 - 17:29 नवीन
प्रतिसाद आवडला...!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:47 नवीन
सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे.
+१. अशा अन्य अनेक उपासना आहेत. ======================
देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.
संकल्पना एंटीटी नसते हि एक विचित्र आणि अर्धवट थेरी आहे. चलनातील मूल्याला मूर्त रुप देण्यासाठी नाणे बनवले जाते. मग काय मूल्य ही एक संकल्पनाच आहे, ती एक एंटीटी नाही असं म्हणणार? प्रत्येक संकल्पना ही एक एंटिटी असते. भौतिकशास्त्रातील उर्जा ही देखील थेट मोजता येत नाही. थेट डिटेक्ट करता येत नाही. म्हणून काय उर्जा हि एंटिटि नसते म्हणता? मग द्रव्यात रुपांतर तिचंच होतं ना? कृपया ज्या शब्दांचं मूलभूत आकलन नाही ते वापरून जी विचारधारा तुमची नाही तिकडे विक्षिप्त मते देऊ नकात. ==============================
हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे.
नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा गुरुवार, 03/01/2018 - 02:57 नवीन
नास्तिक माणसाविषयी आपल्या कल्पना भलल्याच रंजक आहेत. तुम्हाला कोणी सांगितले की नास्तिक माणूस मनाचे अस्तित्व नाकारतो म्हणून. तुम्हाला कोणी सांगितले त्याला दैव ही पूर्ण पणे सम्कल्पना अमान्य आहे म्हणून. ? तुम्हाला कोणी सांगितले की तो कंप्लिट अश्रद्ध असतो म्हणून? देव नाही ही देखील त्याची श्रद्धाच असते. ती प्रयोगाअंती, चिंतना अन्ती, अनुभवा अंती, निरिक्षणाअंती झाली आहे ही नाही हे महत्चाचे. जसे जानवे हे ब्रहम्गाठीचे कवच असणारे दिव्य असे काही नाही तो एक साधा दोरा आहे. हे मी प्रयोगाअन्ती मान्य केले आहे. नास्तिक माणूस हा फक्त हैड्रो कार्बन व कर्बो हैद्रेट ची भाषा जाणतो असा आपला कयास असला तर तो दुरूस्त करून घ्या ! ( आता यावर असा माझा कयास आहे हे तुम्ही गृहित कसे धरले असा तुमचा प्रश्न मला व इथे इतराना ही अपेक्शित आहेच ! हेवेसानल ! ) असो. नास्तिक माणूसही कलाकार, आस्वादक, रसिक असू शकतो बरे ! त्याचा अस्तित्व मानण्याला देखील विरोध नाही. त्याचा प्रश्न एकच आहे तो निगोशिअबल आहे की नाही ? आणि जर असेल तर त्याला अनुरणिया थोकडा की आकाशा एवढा हे कसे समजायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 06:40 नवीन
नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.
उत्तम विनोद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
च
चौथा कोनाडा Wed, 02/28/2018 - 16:51 नवीन
असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात.
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
क्रिप्ट Wed, 02/28/2018 - 13:57 नवीन
देव ही एक संकल्पनाच आहे.---- असे तुम्हाला वाटते कारण तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाही आणि तो यावा म्हणून तुम्ही खास असा प्रयत्नही केला नाही. विवेकानंदांनी एक खूप छान कथा सांगितली आहे. एकदा एका डबक्यात राहणाऱ्या बेडकाला मोठ्या तलावातून एक बेडूक भेटायला येतो. तलावातील बेडूक म्हणतो- अरे या डबक्यात कसला राहतोय, चल मी तुला माझं मोठ घर दाखवतो. तिथे खूप पाणी आहे आहे. राहून तुला खूप आनंद मिळेल. तो बेडूक कधी डबक्याबाहेर राहिलेला नसतो त्यामुळे तो विचारतो तुझं घर किती मोठं आहे? या माझ्यापेक्षा दुप्पट, तिप्पट? तलावातला बेडूक म्हणतो अरे त्यापेक्षा खुप मोठं आणि खूप सुंदर. तू चल तर खरं ...फक्त तिथं जायची वाट थोडी कठीण आहे. पण काळजी नको मी आहे. डबक्यातल्या बेडकाला मात्र यावर विश्वास बसत नाही. उलट तो तलावातल्या बेडकालाच मूर्ख, बावळट, आणि खोटारडा समजतो आणि पुन्हा डबक्यातच उरलेलं जीवन कसंबसं कंठतो. आपल्या सगळ्यांचेही असेच आहे (त्यात मीही आलोच म्हणा)....आपण डबक्यातले बेडूक बनून राहतो. अनेक संत पुरुष, द्रष्टे मंडळी वेळोवेळी येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात , लिखित स्वरूपात त्यांचे ज्ञान सोडून जातात आणि फक्त म्हणतात- या वाटेवर तू चालायला तरी लाग...मी तुझ्या सोबत आहे आणि तुला तलावापर्यंत (स्वरूपापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत) नक्की घेऊन जाईन. परंतु आपण त्या डबक्यातल्या बेडकासारखे आपण फक्त शंका घेऊन, बाहेर पडायचा प्रयत्न सुद्धा न करता त्याच डबक्यात पूर्वग्रहदूषित बनून राहतो.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 02/28/2018 - 14:30 नवीन
असहमत. जे आणि जिथे जीवन व्यतीत करायचे आहे तिथे त्या त्या सभोवतालात पूर्ण क्षमतेनिशी आणि आंतरिक समाधानाने ते व्यतीत व्हावे हेच जन्माला आलेल्याचे इतिकर्तव्य आहे. लाखोकरोडो लोकांसाठी हेच योग्य आहे. ईश्वराचा साक्षात्कार त्यांच्यासाठी वेगळा असा काही नसतो. ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात. ते बिचारे सुखात असतात. हे सुख म्हणजे माया, भ्रम , अज्नान असे म्हणणारे म्हणोत बापडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
म
मारवा Wed, 02/28/2018 - 15:51 नवीन
ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात. हे फार भारी हे अजुन एक लगेच आठवलेला किस्सा एका कल्ट चा गुरुजींचा कोर्स सुरु होता. जीवनाची कला वगैरे तेव्हा लाईट गेली. आणि हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या. सभोवताली झाडे होती. वार्‍याची एक छानशी झुळुक आली काय नी लगेच.. "देखो गुरुजीने आपके लिए हबा भेजी है " बोलो जय गुरुदेव म्हणज सांगायच तात्पर्य की कुठल्याही पातळीवर श्रद्धा जाऊ शकते. मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ? अस विचारायच नसत ( आणि तुम्ही जरी विचारलच तरी मग तुम्हाला गुरु शक्तीची प्रचिती कशी आली असती ? च्या प्रतिप्रश्नावर डोक फोडुन घ्यायची तयारी हवी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
इ
इरसाल गुरुवार, 03/01/2018 - 08:05 नवीन
भारीच. ह्या लोकांची कॅपॅसिटी अक्षरशः शुन्यातुन जग निर्माण करण्याची असते, असले प्रतिप्रतिप्रति प्रश्न विचारुन भंडावुन सोडण्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 08:37 नवीन
मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ?
एवढा झंड असेल तर मूळात ईश्वरानं पर्फेक्ट, परिपूर्ण असं विश्व का निर्माण केलं नाही असा तो प्रश्न आहे. ------------------ समजा ईश्वरानं लै भारी जग बनवलं असतं; समजा प्रत्येकाला ईश्वरानं अनादी अनंत असं अस्तित्व दिलं असतं; अमर/निरोगी असा देह दिला असता; संपूर्ण भूतकाळ, वर्तमानकाळ यांचं ज्ञान दिलं असतं; विश्वाचं सगळं ऐहिक, अध्यात्मिक स्वरुप स्पष्ट करून सांगीतलं असतं, हे दाखवायला वेगवेगळ्या प्रयोगशाळा नि विद्यापीठे काढली असती; दु:ख दिलं नसतं, शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण करायला हवं ते सर्व दिलं असतं नि त्यात कष्टाचा काही भाग काहीही ठेवला नसता; प्रबल, सुदृढ मानसिकता दिली असती; सर्व तंत्रज्ञाने नि त्यांनी बनू शकणार्‍या गोष्टी आयत्या बनवून दिल्या असत्या; कोणत्याही शारीरिक मर्यादा दिल्या नसत्या (श्वास घ्यावाच लागणे, इ); नैसर्गिक स्रोत हवे तेवढे ठेवले असते; बुद्धी, तर्क, आणि सार्वभौम इच्छा अफाट दिली असती; ईश्वरत्व दिलं असतं..... ................ तरी हा प्रश्न पुन्हा आलाच असता. कारण अशा तगड्या माणसाचं डोकं चालतच राहिलं असतं नि काय कमी आहे याचा अजून एक मोठ्ठा नन्नाचा पाढा बनवला गेला असता. ==================== सबब पहिले अगोदर काय काय कमी आहे त्याची एक्झॉस्टीव लिस्ट बनवायचे सामर्थ्य आणा. मग ईश्वराला परिपूर्णतेचे सल्ले देऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:55 नवीन
जे आणि जिथे जीवन व्यतीत करायचे आहे तिथे त्या त्या सभोवतालात पूर्ण क्षमतेनिशी आणि आंतरिक समाधानाने ते व्यतीत व्हावे हेच जन्माला आलेल्याचे इतिकर्तव्य आहे. लाखोकरोडो लोकांसाठी हेच योग्य आहे.
पुरोगामी मंडळी भारतीय लोक असेच समाधानाने जगले त्याला त्यांचा ऐतिहासिक मूर्खपणा म्हणतात. प्रगती करायची म्हणजे हालचाल करावी लागणार, डबक्यातनं बाहेर यायला लागणार. आता हे लेखक अध्यात्मिक प्रगतीसाठी हालचाल करा म्हणाले कि बाजू पलटली. यावेळेस आहोत तिथे सुखाने राहावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
क्रिप्ट Wed, 02/28/2018 - 19:21 नवीन
+१. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांना डबक्यातच सुख मानून राहायला आवडत. बर त्याबाहेर काहीतरी आहे याचा शोध घ्या म्हंटलं तरी ते त्यांना नको असतं आणि तरीही डबक्याबाहेर काहीतरी आहे यावर विश्वास ठेवायलाही ते तयार नसतात. श्रीकृष्णाने गीतेमध्ये उगाच नाही म्हंटल की हजारातून एखादाच माझ्यापर्यन्त पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि अश्या हजार प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला येऊन मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रचेतस गुरुवार, 03/01/2018 - 02:02 नवीन
भगवद्गीता प्रक्षिप्त आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 19:04 नवीन
ईश्वराचा साक्षात्कार त्यांच्यासाठी वेगळा असा काही नसतो.
http://www.swamivivekanandaquotes.org/2013/04/swami-vivekananda-quotes-on-god.html
Every man must develop according to his own nature. as every science has its methods, so has every religion. The methods of attaining the end of religions are called yoga by us, and the different forms of yoga we teach, are adapted to the different natures and temperaments of men. We classify them in the following way, under four heads: Karma-Yoga— The manner in which a man realizes his own divinity through works and duty. Bhakti-Yoga— The realization of the divinity through works and duty. Raja-Yoga— The realization of the divinity through the control of the mind. Jnana-Yoga— The realization of a man;s own divinity through knowledge. There are all different roads leading to the same centre— God.
विवेकानंद वैगेरेच्या ईश्वराबद्दलच्या, ईश्वरप्राप्तीबद्दलच्या विचारांबद्दल आपलं हेच मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मूकवाचक गुरुवार, 03/01/2018 - 04:40 नवीन
मार्कस यांनी यनावाला यांच्या एका धाग्यावरच्या प्रतिसादात आत्मप्रचिती, गुरूप्रचिती वगैरेचा उल्लेख केला होता. अशी प्रचिती घेतलेल्यांसाठी देव (किंवा अधिदैविक तत्व) ही निव्वळ संकल्पना उरत नाही. प्रचिती ही व्यक्तिनिष्ठच असते, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही. व्यक्तिनिष्ठ प्रचिती घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले कायमचे परिवर्तन सश्रद्ध व्यक्ती अग्राह्य धरत नाहीत आणि त्यामुळे जे जे वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही ते सारे थोतांड असा अट्टाहास धरणार्‍या इहवादी लोकांशी त्यांचा सुखद संवाद संभवत नाही हे यातले त्रांगडे आहे. असो. (श्रद्धाच नव्हे तर अश्रद्धा देखील तर्कदुष्ट आणि हास्यास्पद पातळीवर जाउन अभिव्यक्त होउ शकते हे मिपाकरांसाठी वेगळे सांगायची गरज नाही. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मूकवाचक गुरुवार, 03/01/2018 - 04:40 नवीन
मार्कस यांनी यनावाला यांच्या एका धाग्यावरच्या प्रतिसादात आत्मप्रचिती, गुरूप्रचिती वगैरेचा उल्लेख केला होता. अशी प्रचिती घेतलेल्यांसाठी देव (किंवा अधिदैविक तत्व) ही निव्वळ संकल्पना उरत नाही. प्रचिती ही व्यक्तिनिष्ठच असते, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही. व्यक्तिनिष्ठ प्रचिती घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले कायमचे परिवर्तन सश्रद्ध व्यक्ती अग्राह्य धरत नाहीत आणि त्यामुळे जे जे वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करता येत नाही ते सारे थोतांड असा अट्टाहास धरणार्‍या इहवादी लोकांशी त्यांचा सुखद संवाद संभवत नाही हे यातले त्रांगडे आहे. असो. (श्रद्धाच नव्हे तर अश्रद्धा देखील तर्कदुष्ट आणि हास्यास्पद पातळीवर जाउन अभिव्यक्त होउ शकते हे मिपाकरांसाठी वेगळे सांगायची गरज नाही. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
च
चौकटराजा गुरुवार, 03/01/2018 - 09:35 नवीन
देव ही एक संकल्पनाच आहे.---- असे तुम्हाला वाटते कारण तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाही आणि तो यावा म्हणून तुम्ही खास असा प्रयत्नही केला नाही. हे कसे काय म्हणता बुवा ? तुम्ही तरी " देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा ? मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे . डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल ? तुमचा निर्णय हाचा तुम्हाला सांगेल की तुम्हाला खरेच देवा च्या अस्तित्वाचा अनुभव आला आहे का ? लवकर अनेक दिवस मनांत असलेला" नास्तिकांचा देव" हा लेख लिहीन म्हणतो .आपल्याला अनेक उत्तरे त्यात मिळतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 09:38 नवीन
जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे देव कसा आहे असे म्हटले की गप्प बसतात किंवा सत्पुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात. स्वतः काही सांगत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 10:25 नवीन
तुम्ही मोघम प्रश्न विचारू नका. ---------------- गावडे सायेब - आंबा कसा आहे? अजो - गोड गावडे सायेब - अहो, तो पिवळा आहे. ======================================
देव आहे म्हणणारे देव कसा आहे असे म्हटले की गप्प बसतात किंवा सत्पुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात.
आम्ही इलेक्ट्रॉन कसा आहे वा प्रकाश कसा आहे हे असंच विचारतो तेव्हा तुम्ही आम्हाला अशीच पायपीट करायला लावतात. फटू दाखवायचा ना सरळ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 14:40 नवीन
आंबा कसा आहे ते सांगितलंत तसेच आता देव कसा आहे सांगून टाका. इलेक्ट्रॉन आणि प्रकाशाबद्दल मी कसलाच दावा केलेला नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/01/2018 - 10:33 नवीन
आम्ही सांगून पटत नाही म्हणून सत्पुरुषांकडे जायला सांगतो किंवा स्वत: शोध करायला सांगतो. साखरेची चव कशी आहे हे चिमूटभर साखर तोंडात टाकली की लगेच समजते. देवाचा अनुभव तसाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 18:57 नवीन
रूढार्थाने मी नास्तिक असलो तरी मला देव संकल्पनेची किंवा देवभोळ्या लोकांची एलर्जी नाही. मी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षांपर्यंत सश्रद्ध किंवा देवभोळा होतो. अगदी माझ्या कोकणातल्या गावी आजूबाजूला दाट झाडी, स्मशान आणि नदी असलेल्या निर्मनुष्य शिवमंदिराच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात मी समई लावून बसत असे. तेव्हा वाटायचे तो इथे आहे. मी त्याच्याशी बोलायचो कारण तो माझं बोलणं ऐकतोय याची खात्री असायची. कोणत्याही देवभोळ्या माणसाच्या मनात असणारी "परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम" अशी जी देवाची प्रतिमा असते तीच प्रतिमा माझ्या मनात होती. आपण देवाचं काही केलं (म्हणजे भक्ती पूजा अर्चा वगैरे) की देवही संकटात आपल्या पाठीशी उभा राहील ही भावना मनात दृढ होती. पुढे एका घटनेने मला काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे भाग पडले. हा शोध जवळपास पाच वर्षे सुरु होता. त्या पाच वर्षांच्या प्रवासात मनातील अनेक धारणा गळून गेल्या. त्यातली एक होती देव. माझ्या मनातील "सज्जनांना तारणारा आणि दुर्जनांना मारणारा" , "भक्तीने प्रसन्न होणारा, संकटकाळी धावून येणारा" देव अस्तित्वात नाही ही जाणीव नाझ्यासाठी धक्कादायक होती. जेव्हा त्रयस्थाच्या नजरेने माझ्या भोवताली पाहू लागलो तेव्हा माझ्या मनातील देवाच्या अस्तित्वाचा कसलाच पुरावा दिसत नव्हता. लोकं मरत होती, आजारी पडत होती, अपघातात जात होती, कुणी त्यांचा खून करत होता तर कुणावर बलात्कार होत होता, कुणाच्या घरी जबरी चोरी होत होती तर कुणी दारिद्रयात खितपत पडला होता. मग देव काय करत होता? काहीच नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्याकडून कृती कशी होईल? देवभोळ्या घरात जन्म आणि संगोपन झाल्याने मी वर उल्लेख केलेल्या कल्पनेतील देवाच्या अस्तित्वाविषयी पुसटशी शंकाही कधी मनाला शिवली नव्हती. आपल्या देशात देवभोळ्या घरात जन्माला आलेल्या, वाढलेल्या बहुतेक लोकांचे हेच होते. आता पुढचा प्रश्न होता (माझ्या मनातील) देव जर अस्तित्वात नसेल तर ही सृष्टी घडवली कुणी? (प्रत्येक गोष्टीचा निर्माता अस्तित्वात असायला हवा हे आपले लाडके गृहीतक. या गृहितकाने दहावीच्या मराठी भाषेच्या बोर्डाच्या पेपरालाही सोडले नाही. तो जगप्रसिद्ध परिच्छेद "उताऱ्यावरुन प्रश्नोत्तरे" साठी. सृष्टी देवाची निर्मिती पण देव मात्र स्वयंभू. असो.) या प्रश्नाचे काहींनी दिलेले उत्तर: तुमचा तो पावणारा वगैरे देव सामान्य लोकांसाठी. खरा देव त्या पलीकडे आहे. निर्गुण निराकार. साऱ्यापासून अलिप्त. तो जर साऱ्यापासून अलिप्त आहे तर त्याला हिशोबात धराच कशाला? प्रवास चालूच होता. या प्रवासात पुढे भेटला डार्विन. आणि त्याचा तो वर्ल्डफेमस उत्क्रांतीचा सिद्धांत. अजून थोडा पुढे चालत राहीलो तर भेटला रिचर्ड डॉकिन्स. त्यानेही खुप काही सांगितले. तरी पुढे प्रश्न होताच. हे भाऊ जे सांगत आहेत तेच चिरंतन सत्य आहे कशावरुन. उद्या अजून काही नवीन शोध लागून हे जे काही म्हणत आहेत ते खोटं ठरणार नाही कशावरून. प्रश्न कायम असल्याने तसाच पुढे चालत राहीलो. पुढे एक आश्रम दिसला . काहीसा नाखुषीनेच आश्रमात शिरलो. एक वयोवृद्ध साधू बोवा बसले होते. म्हटलं यांना आपले प्रश्न विचारुन पाहू. विचारला प्रश्न. साधू बोवा म्हणाले, "ते देव आणि सृष्टी वगैरे सोड. तू तुझं बघ" त्या साधू बोवांचे नांव होते रमण महर्षी. तेव्हापासून मला देवाच्या अस्तित्वाविषयी आणि सृष्टीच्या निर्मितीविषयी प्रश्न पडत नाहीत. मात्र कुणी तावातावाने देव आहे किंवा नाही यावर काही बोलत असेल किंवा लिहीत तर मला त्याची मौज वाटते. आणि मग मी त्या व्यक्तीला प्रश्न विचारतो, "तुमचा देव कसा आहे?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 10:44 नवीन
मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे .
भाजपचे सरकार असताना देखील एक उन्मत सेक्यूलर असलो तरी रोज भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतो नि तरीही आरामात जगतो हेच भाजपचे सरकार भारतात नसल्याचा पुरावा आहे! ......एतत्सम काहीतरी ऐकत असल्याचा भास झाला. ======================= देवाला जर एवढी हौसच असती स्वतःला मानायला लावायची तर त्यानं मानण्या न मानण्याची स्वायत्तता जीवांना दिलीच नसती ना. बाय डिफॉल्ट सगळे अस्तिकच ठेवले असते. ================================ आता चौकटराजा मिसळपाववर असेपर्यंत मिसळपाववर अस्तिकांना, त्यांच्या अनुभवांना वा त्यांच्या तर्कांना प्रमाणत्वाची प्रतिष्ठाच नसेल असे तुमचे मत असेल तर तत्सम मत अन्य सर्व विश्वाचे असावे हे आवश्यक नसावे. ============================== देव हा दयाळू असतो. त्याच्याकडे कम्यूनिस्ट नजरेने पाहू नये. दुनिया नि लोक बनवण्यात देवाचा काहीतरी "अर्थिक" वा तत्सम स्वार्थ होता, नि असला कोणता स्वार्थ असल्याशिवाय कोणी काही करतच नाही ही कम्यूनिस्ट विचारसरणी नास्तिकांची डिफॉल्ट विचारसरणी असते. ईश्वराचे नि जगाचे नाते, दोहोंचे प्रयोजन यांत हिरण्यकश्यपूपणा करत सुटणे हे एकच उत्तर कसे असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 11:07 नवीन
असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल ?
काय विचित्र प्रश्न आहे. तुमची धडक ही देवाची लीला आणि त्यावर ज्याला धडक दिली त्याची प्रतिक्रिया ही देवाचीच लिला असं तो धडक खाणारा अस्तिक मानेल. ============== एका प्रतिसादात म्हणता नाही मानलं तर देव सुखानं जगू देणार नाही, दुसर्‍यात म्हणता धडक दिली तरी देव माफ करा म्हणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
क्रिप्ट Fri, 03/02/2018 - 02:11 नवीन
"" देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा "" ---चौकटराजा, शोध हा देव आहे की नाही याचा घ्यायचा आहे....आधीच नाही असे समजून शोध घेण्याला फारसा अर्थ नाही. लेखाचा उद्देश्य ही तोच आहे. " मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे" --- नास्तिक असूनही मस्त आयुष्य जगायचा आणि देव नसल्याचा काय संबंध? तुम्हाला असे म्हणायचे आहे की जर देव असलाच तर तुम्ही त्याला मानत नाही म्हणून त्याने तुम्हाला शिक्षा केली पाहिजे आणि तुम्ही मस्त आयुष्य जगले नाही पाहिजे? हा संबंध हास्यास्पद आहे. असे असेल तर तुम्ही यनावाला यांचा 'निरीश्वरवाद्यांना देव शिक्षा का करीत नाही" हा धागा पुन्हा वाचा. उत्तर मिळेल. "डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? "-- पडते ना. मी नाही म्हणलेलंच नाहीये. फक्त फरक एवढाच आहे की डबक्यातून बाहेर पडायचा प्रयत्न स्वसामर्थ्याने आस्तिक करतात आणि नास्तिक तेही करीत नाहीत. "देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल?" याचा या लेखाशी/विषयाशी काही संबंध नाही. कृपया मुद्याला धरून प्रश्न विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
क्रिप्ट Fri, 03/02/2018 - 02:11 नवीन
"" देव नाही " याचा शोध घेण्याचा काय पद्धतशिर प्रयत्न केलात बुवा "" ---चौकटराजा, शोध हा देव आहे की नाही याचा घ्यायचा आहे....आधीच नाही असे समजून शोध घेण्याला फारसा अर्थ नाही. लेखाचा उद्देश्य ही तोच आहे. " मी तरी असे म्हणू शकतो की मी नास्तिक असताना अजूनही मस्त आयुष्य जगत आहे हाच देव नसल्याचा अगदी महान नाही तरी लहानसा पुरावा तरी आहे" --- नास्तिक असूनही मस्त आयुष्य जगायचा आणि देव नसल्याचा काय संबंध? तुम्हाला असे म्हणायचे आहे की जर देव असलाच तर तुम्ही त्याला मानत नाही म्हणून त्याने तुम्हाला शिक्षा केली पाहिजे आणि तुम्ही मस्त आयुष्य जगले नाही पाहिजे? हा संबंध हास्यास्पद आहे. असे असेल तर तुम्ही यनावाला यांचा 'निरीश्वरवाद्यांना देव शिक्षा का करीत नाही" हा धागा पुन्हा वाचा. उत्तर मिळेल. "डबक्यातील गोष्ट अस्तीकानाही तात्विका दृष्टा लागू पडते की नाही ? "-- पडते ना. मी नाही म्हणलेलंच नाहीये. फक्त फरक एवढाच आहे की डबक्यातून बाहेर पडायचा प्रयत्न स्वसामर्थ्याने आस्तिक करतात आणि नास्तिक तेही करीत नाहीत. "देव नसल्याचेही विशव मोठेच आहे. असं पहा - जरा मी मोटारसायकल घेउंन तुम्हाला धडक दिली तर तुम्ही मला मारायला याल की देवाची लीला मानून मला माफ कराल?" याचा या लेखाशी/विषयाशी काही संबंध नाही. कृपया मुद्याला धरून प्रश्न विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सस्नेह गुरुवार, 03/01/2018 - 07:25 नवीन
अतिशय मुद्देसूद व उत्तम लेख ! योग ज्यांनी ज्यांनी आचरणात आणला त्या स्वामी विवेकानंद, रमणमहर्षी इ. प्रभृतींना कधी ईश्वर, आस्तिक नास्तिक इ. प्रश्न पडले नाहीत. त्यांनी कधी पूजा अर्चा कर्मकांडे यावर भर दिला नाही पण ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा अट्टाहासही धरला नाही. त्यांच्या सहज सरल वर्तनातून ईश्वर स्वाभाविकरित्याच प्रकट होई. तस्मात मिपावर लेख पाडत बसण्यापेक्षा जिज्ञासूंनी योग, उपनिषदे धुंडाळावीत हे पटले.
  • Log in or register to post comments
क
क्रिप्ट Fri, 03/02/2018 - 02:18 नवीन
"तस्मात मिपावर लेख पाडत बसण्यापेक्षा जिज्ञासूंनी योग, उपनिषदे धुंडाळावीत हे पटले" ---- धन्यवाद स्नेहांकिता. लेखाचा मूळ उद्देश खरंतर तोच होता परंतु इतर लेखातील प्रतिक्रियेप्रमाणे याही धाग्यावरच्या प्रतिक्रिया आस्तिक आणि नास्तिक यांच्या वादात अडकल्या. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
म
मूकवाचक Fri, 03/02/2018 - 16:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अभ्या.. गुरुवार, 03/01/2018 - 10:55 नवीन
मस्त.. फुल्ल टाईमपास आहेत पब्लिक. च्यायला... इतकं रेगुलरली त्याच त्याच विषयावर लिहून वादविवाद घालायची खुमखुमी असणारे शिलेदार आहेत आपल्याकडे. अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 14:44 नवीन
वेळ असेल तर बाहेरुन मजा न बघता आखाड्यात उतरा. अजून जास्त मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/01/2018 - 15:42 नवीन
राही,
उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या?
मूर्ती पाण्यात विरघळून तिची विल्हेवाट लावली जावी असं शास्त्र आहे. ज्यांना पाळायचं नसेल त्यांनी पाळू नये. ज्याण्य्ते पाळायची शक्ती आहे त्यांनी ते पाळलं तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 03/01/2018 - 16:45 नवीन
सर्जन म्हणजे निर्मिती. विसर्जन म्हणजे विघटन. विघटित किंवा भग्न मूर्तीची पूजा करू नये, त्यातील प्राणतत्त्व निघून गेलेले असते. फक्त पार्थिव उरते ते पृथ्वीमध्येच मिसळून जाणे हेच योग्य आणि शास्त्रशुद्ध आहे. पूजाअर्चा करून गाजावाजाने ते पुन्हा विसर्जित करणे हे शास्त्रसंमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा