Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा

क
क्रिप्ट
Tue, 02/27/2018 - 04:07
🗣 127 प्रतिसाद
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे. गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय? आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल. थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?

प्रतिक्रिया द्या
88615 वाचन

💬 प्रतिसाद (127)
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/01/2018 - 17:23 नवीन
राही, एकदा विसर्जित केलेली मूर्ती काही कारणाने पूर्णपणे विघटीत झाली नसेल तर तिचं पुनरपि विसर्जन करायला हरकत काय आहे? =============================================================== श्रीदेवीच्या प्रेताचं विधिवत दहन करायची काय गरज होती. टाकून द्यायचं कुठेतरी उकिरड्यावर. काय फरक पडतो. नाहीतरी जीव गेलेलाच आहे. उरलं ते केवळ मढं! ते श्रीदेवी थोडंच आहे! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही गुरुवार, 03/01/2018 - 18:20 नवीन
तुम्ही शास्त्राचा मुद्दा काढला, मी शास्त्र सांगितले. एकदा दहन केल्यावर पुन्हा दहनसंस्कार होत नाहीत. एकदा विसर्जन केल्यावर पुन्हा संस्कारपूर्वक विसर्जन होत नाही. तुम्हालाच शास्त्र हवे होते, तर आता "काय हरकत" असे विचारून स्वतःलाच खोडून काढत आहात. पार्थिव मूर्ती ही विसर्जनानंतर 'मूर्ती' उरत नाही. तिच्यावर मूर्तीचे सोपस्कार केले जात नाहीत. ती केवळ मृत्तिका असते. शिवाय, मूर्तीचे विसर्जन केल्यावर तिथलीच चिमूटभर माती घरी आणण्याची प्रथा आहे. ती त्या मूर्तीचाच अंश असे समजायचे असते कारण विसर्जनानंतर माती मातीशी एकरूप होते. सिंधुबिंदु न्यायाने. मूर्तीच्या मातीचे वेगळे अस्तित्व उरत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बिटाकाका गुरुवार, 03/01/2018 - 18:40 नवीन
शास्त्राचं म्हणाल तर, एकदा विसर्जित केलेली मूर्ती अशा भग्न स्वरूपात पाण्याच्या स्रोताबाहेर येणे शास्त्राला अपेक्षित आहे काय? सध्य परिस्थितीतील उपलब्ध स्रोतांमध्ये हे घडताना दिसत आहे म्हणून अशा भग्न मूर्तींचे परत विसर्जन करणे चुकीचे कसे काय? --------------------------------------- सद्य परिस्थितीत शास्त्रानुसार विसर्जन करणे शक्य नसल्याने घरच्या घरी विसर्जन करणे मी प्रशस्त मानतो, हे अवांतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 03/02/2018 - 03:48 नवीन
उत्तम कृति. खरे तर मातीच्या मूर्तीवर उत्तरपूजेच्या मंत्राक्षता पडल्या की पुढे विधी असे काही नसतातच. मूर्तीला जरासे हलवून स्थानभ्रष्ट किंवा विस्थापित केल्यावर ती केवळ माती उरते. मग त्याचे काहीही झाले तरी दोष किंवा अपशकुन नसतो. त्यामुळे मूर्तीची विटंबना, भावना दुखवणे हे मुद्दे उद्भवूच नयेत आणि कोणी त्यास खतपाणीही घालू नये. प्रतिष्ठापनेच्या आधी काही झाले तरी घाबरून जाण्यासारखे काही नाही. छोटीशी नवी मूर्ती बनवावी किंवा आणावी आणि प्राणप्रतिष्ठापना करावी. हे सर्व अर्थात शास्त्र वगैरे मानणाऱ्यासाठी. जो मानतच नाही त्याला काहीच दोष लागू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
र
राही Fri, 03/02/2018 - 05:58 नवीन
अपेक्षितच नव्हे तर नैसर्गिकही आहे. समुद्रात फेकलेल्या वस्तूंपैकी अनेक वस्तू , पोकळ आणि हलक्या तर सर्वच वस्तू किनाऱ्यावर येत असतात. प्लास्टिकच्या पिशवीतून फेकलेले निर्माल्य हमखास किनाऱ्यावर येते आणि कचऱ्याने किनारे भरून जातात. आम्ही जुहू चौपाटीवर कधीकधी चालायला जातो तेव्हा गणपतिउत्सवाच्या तिसऱ्या दिवसापासून अशा मूर्ती किनाऱ्यावर दिसतात. पूर्वी लोक त्या टाळून पुढे जात असत. आता काही लोक पावलोपावली नमस्कार करत जातात आणि ' किती ही विटंबना!' असा भाव चेहेऱ्यावर आणून भावना दुखवून घेतात. शाडू माती चिकट असते आणि विहिरी, तलावांमध्ये तळाला चिकटून बसून तळाच्या नैसर्गिक झऱ्यांचे स्रोतमुख बंद करते. त्यामुळे तीही बंदिस्त जलस्रोतांना हानिकारकच आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत अनेक नद्या खळखळून वाहत्या राहात नाहीत आणि मूर्ती वाहून जाव्यात म्हणून वरच्या बाजूच्या धरणातून नदीपात्रात थोडे थोडे पाणी सोडत राहावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/02/2018 - 06:18 नवीन
तुम्ही लिहिले आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत. ************************* शास्त्र वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे सांगते, इथे नदी अभिप्रेत असावी. शिवाय शाडूची माती म्हणजे नदी, तलावाकाठी सापडणारी माती, त्यामुळे या मातीने पाण्याच्या स्रोताला अडचण आहे हे पटत नाही. पीओपी वगैरे पर्याय घातक आहेत हे खरे. ************************ शास्त्रानुसार, गणपती हा साध्या मातीचा असावा आणि विसर्जन वाहत्या पाण्यात करावे असे आहे (यात काही चूक असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा). हे सध्य परिस्थितीत सहज शक्य नाही म्हणून माती आणून घरी जसा जमेल तसा गणपती बनवणे आणि घरच्या घरी विसर्जन करणे हा पर्याय उत्तम. ************************ संत एकनाथ म्हणाले तसे भाव तोचि देव, ये अर्थी संदेह धरू नका हे आचरणात आणणे काळाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अभिजीत अवलिया Fri, 03/02/2018 - 07:19 नवीन
शास्त्र वाहत्या पाण्यात विसर्जन करा असे सांगते, इथे नदी अभिप्रेत असावी.
हाच तर फरक आहे शास्र आणि विज्ञानात. विज्ञान आपले जुने निष्कर्ष बदलण्यास तयार असते.पण शास्र? ज्या काळी शास्रे लिहीली गेली तेव्हा इथली लोकसंख्या कितीशी असेल? त्यामुळे तेव्हा ते ठीक होते. पण आज १३० कोटी लोकसंख्या झाल्यावर हजारो वर्षापूर्वी लिहीलेल्या शास्राप्रमाणे सगळ्यांनी नदीत / तलावात विसर्जन केले तर ते नुकसानकारक होणार नाही का? मग शास्र सुध्दा काळानुरुप बदलले पाहीजे का नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/02/2018 - 08:29 नवीन
दोन मुद्दे - ************************ शास्त्र बदलण्यास तयार नसते हे कशाच्या आधारावर? शास्त्राने बदलायचे म्हणजे काय करायचं? विज्ञान बदलतं म्हणजे काय करतं? ************************ नुकसान होणारच, यात कोणाचं काही म्हणणं आहे का? पण काय आहे ना, हे जे नुकसान आहे ना ते रोज नदी नाले समुद्राचे नुकसान जे इतर कारणांनी होते होते ना त्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. म्हणून मग असली पर्यावरणाची कारणे लोकांना पटत नाहीत. उलट हे सगळे त्यांना त्यांच्या धर्मापासून, संस्कृतीपासून दूर करण्यासाठी आहे ही त्यांची समजूत पक्की होते. त्यापेक्षा, शास्त्राने सांगितलेले करणे सध्य परिस्थितीत कसे शक्य नाही, त्यामुळे शास्त्राने संगीतलेले अर्धे नुर्धे करण्यापेक्षा भाव तोचि देव मानून नवीन मार्गाने करणे कसे योग्य आहे हे पटवणे गरजेचे आहे. *********************** याशिवाय, माझा शास्त्रांचा दांडगा वगैरे अभ्यास नाही, पण शस्त्राने प्रत्येक गोष्टींना पर्याय सांगितलेला आहे. त्याने शास्त्र कसे बदलत नाही आणि विज्ञान कसे बदलते वगैरे म्हणणे अजिबात योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Fri, 03/02/2018 - 17:51 नवीन
शास्त्र बदलण्यास तयार नसते हे कशाच्या आधारावर? शास्त्राने बदलायचे म्हणजे काय करायचं? विज्ञान बदलतं म्हणजे काय करतं?
उदाहरण द्यायचे झाल्यास - प्लूटो चा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याला सूर्याचा नववा ग्रह अशी मान्यता मिळाली. पण नंतर जे वेगवेगळे संशोधन केले गेले त्याद्वारे निष्कर्ष काढून त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला. aethar मधून प्रकाश पास होतो असे पूर्वी समजले जात होते. पण १८८७ साली मिचेलसन आणि मोर्ले ह्या शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे aether ही केवळ एक कल्पना असल्याचे सिद्ध केले आणि aether थेअरी मागे पडून थेअरी ऑफ relativity सिद्ध झाली. शास्त्रात ते लिहिल्यापासून आतापर्यंत जी हजारो वर्ष गेलीत त्यात कोणते सद्य परिस्थितीला अनुरूप बदल केले गेलेत ?
नुकसान होणारच, यात कोणाचं काही म्हणणं आहे का? पण काय आहे ना, हे जे नुकसान आहे ना ते रोज नदी नाले समुद्राचे नुकसान जे इतर कारणांनी होते होते ना त्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. म्हणून मग असली पर्यावरणाची कारणे लोकांना पटत नाहीत. उलट हे सगळे त्यांना त्यांच्या धर्मापासून, संस्कृतीपासून दूर करण्यासाठी आहे ही त्यांची समजूत पक्की होते. त्यापेक्षा, शास्त्राने सांगितलेले करणे सध्य परिस्थितीत कसे शक्य नाही, त्यामुळे शास्त्राने संगीतलेले अर्धे नुर्धे करण्यापेक्षा भाव तोचि देव मानून नवीन मार्गाने करणे कसे योग्य आहे हे पटवणे गरजेचे आहे.
मान्य. पण हा नवीन मार्ग लोक कसे स्वीकारतील ? ते ज्या शास्त्रांना रेफरन्स मानतात त्यात वर्षानुवर्षे काही बदल झाला आहे का? म्हणजे शास्त्र जेव्हा लिहिले गेले असेल तेव्हा गणपती मूर्ती वाहत्या पाण्यात उदा. नदीत विसर्जित करावी असे लिहिले असेल. पण आजच्या काळात हे असे करणे योग्य नाही. मग शास्त्रात ह्याबाबत बदल कधी केला जाईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
शाम भागवत Fri, 03/02/2018 - 11:39 नवीन
शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा करावयाच्या मूर्तीची उंची ६ इंचापेक्षा जास्त नसावी. हा नियम पाळला तर अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
र
राही Fri, 03/02/2018 - 12:05 नवीन
अगदी हेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
र
राही Fri, 03/02/2018 - 12:04 नवीन
प्रत्येक गावाला नदीकिनारा असतो का? विहिरींतल्या, तलावातल्या पाण्यात विसर्जन होते. अगदी मुंबईला इतके किनारे असतानासुद्धा पूर्वापार अनेक तलाव गणेशविसर्जन तलाव म्हणून प्रसिद्ध होते. विहिरींचे-तलावांचे झरे चिकट शाडूने बुजू शकतात. या विषयी आपण अधिक माहिती मिळवावी. एकदा यथाविधी स्थानावरून हलवलेली (पाण्यात शिळवलेली(शांत केलेली)/बोळवलेली/पोचवलेली ही नंतरची गोष्ट) मूर्ती ही मृत्तिका म्हणूनच उरते. तिला मातीप्रमाणेच वागवावे. पुन्हा साग्रसंगीत बोळवण करू नये. तसे शास्त्रही नाही आणि परंपराही नाही. आणि ते निसर्गाला धरूनच आहे. आता, आपण शास्त्र जपतो आहोत, परंपरा जपतो आहोत, की शास्त्र-परंपरा तोडतो आहोत आणि शास्त्राला बाजूला ठेवून नव्या चांगल्या, समाजहिताच्या परंपरा निर्माण करतो आहोत हे एकदा लोकांनी मनाशी निश्चित करावे. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/02/2018 - 14:22 नवीन
तुम्ही दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत आहात. १. शास्त्र हे वाहत्या पाण्यातच सांगते. पूर्वापार म्हणजे कधी? माझ्या महितीतनुसार, आधी गावे ही फक्त नदीच्या काठीच असत. आणि आधी मूर्ती ह्या साध्या मातीच्या असत त्यामुळे त्या बाहेर येऊन भग्न अवस्थेत पडण्याचे कारण नव्हते. आता त्या बाहेर येऊन पडतात (कोणत्याही कारणामुळे) आणि तशा भग्न मूर्तींना परत सन्मानाने पाण्यात सोडले तर अडचण काय? याला तुम्ही परत विसर्जन/बोळवण का म्हणत आहात कळत नाहीये. २.आजकालच्या गणेश विसर्जनाने पाण्याचे नुकसान होते हे मान्यच पण शाडूची पण नुकसान होते हा दावा आपण का करत आहात ते कळले नाही. शाडूने पाण्याचे नुकसान होते याबद्दल आपल्याला जास्त माहिती असेल तर आपण ती इथे द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 03/01/2018 - 18:40 नवीन
कोणे एके काळी मी प्रचंड धार्मिक वृत्तीचा होतो. पण तुमच्या लेखाचे शीर्षक आहे त्याप्रमाणे स्वतःच पडताळून बघितले आणि नास्तिकतेकडे वळलो. आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की आपण एके काळी आस्तिक होतो ते स्वतःला काही देवाचा अनुभव आला म्हणून नाही. तर ह्याचे मुख्य कारण होते आई वडील (जे थोडेफार देव देव करत असत/करतात) आणि वारकरी मामा व आजी. म्हणजे आस्तिकता मी बाय डिफॉल्ट स्वीकारली होती. कारण आपण स्वतः कधी विचारच केला नाही. जोडीला टी.व्ही. वर धार्मिक मालिकांचा रतीब असे २०-२५ वर्षांपूर्वी तरी. जस जसे वय वाढत गेले तसे स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती निर्माण झाली. देवस्थानी जाताना किंवा तिथून परत येताना अपघात होऊन होणारे मृत्यू, देवस्थानी चेंगराचेंगरी होऊन जीव जाणारी माणसे, प्रसादातून होणारी विषबाधा हे पाहून, ऐकून, वाचून माझे मत बनले की देव असा काही अस्तित्वात नसावा. नाहीतर आपल्याच भेटीला येणाऱ्या भक्तांच्या जीवाचे त्याने रक्षण केलेच असते. (जर अपघात टाळायचा असेल तर आपण गाडी योग्य कंडिशन मध्ये ठेवणे, सर्व नियम पाळून चालवणे गरजेचे आहे. गाडीत देवाची मूर्ती ठेऊन कशीही गाडी दामटली तर अपघात हा होणारच ही वस्तुस्थिती आहे.) गावोगावच्या वार्षिक यात्रेला बळी दिले जाणारी कोंबडी, बोकड बघून मग प्रश्न पडू लागला जर सर्व प्राणी मात्र देवाची लेकरे आहेत असे मानले तर ह्या आपल्या लेकरांचे आपल्याच नैवेद्यासाठी केले जाणारे शिरकाण देव का थांबवत नाही? मंदिरातल्या दान पेट्या लांबवल्या जातात, कधी कधी तर प्रत्यक्ष देव मूर्तीच लांबवली जाते. मग जो देव स्वतःचेच रक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याचे काय करणार? ह्या सर्व घटनांनी मला देव ही संकल्पना फोल वाटू लागली. आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. जर कुणाला देव मानायचा असेल तर त्यांनी तो मानावा. माझ्यावर देव मानण्याची जबरदस्ती करू नये आणि रस्त्यावर उत्सव साजरे करून त्रास देऊ नये ही अपेक्षा आहे. अवांतर - कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे हे जनतेला समजले पाहिजे असे मनापासून वाटते. जवळपास १० वर्षांपूर्वी मी गडहिंग्लज तालुक्यातल्या एका खेडेगावात यात्रेला गेलो होतो. तिथल्या मंदिराचा गावकर्यांनी काढलेली वर्गणी आणि गडहिंग्लजचे तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर ह्यांनी दिलेली देणगी असे जवळपास एक कोटी रु. खर्चून जीर्णोद्धार करण्यात आला होता. गावात जायला धड रस्ता नाही, तुंबलेले सांडपाणी, प्रचंड धूळ, घाण आणि त्याच घाणीतून झोपत लोळण घेत मंदिरापर्यंत जाणारे भाविक हे पाहून फारच वाईट वाटले. मंदिरापेक्षा रस्त्यावर, गटारावर हा खर्च झाला असता तर जास्त योग्य झाले असते. लोकांचे जीवनमान सुधारले असते. पण .... असोच.
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 03/03/2018 - 11:37 नवीन
देवाबद्दल - निष्कर्षापर्यंत पोचलो नाही. विज्ञान - आजही मोठ्या शहरात सुध्दा अनेक लोकांचे आजारी असताना नेमके नीदान होत नाही, सुपारीचे खांडसुध्दा न खाणा-या व्यक्तीला घशाचा/जिभेच्या मागील बाजूचा कँन्सर झालेला बघितला आहे, अनेक डॉक्टर शारिरीक व्याधीनी कमी वयात जीव गमावतात, म्हणून विज्ञान नाही असे मानू शकत नाही तसेच देव आपल्या कल्पनेप्रमाणे नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असे म्हणणे चूकीचे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
र
राही Fri, 03/02/2018 - 03:35 नवीन
सुमारे आठ दहा वर्षांपासून ग्रामीण भागात भजनकीर्तनपारायण करण्याची लाट उसळली होती. लाखोकरोडो रुपये वर्गणी गोळा केली जाऊन धूमधडाक्याने घडवण्यात राजकीय पक्षही अहम् अहमिकेने सामील होत होते. अजूनही तेच चालू आहे. महादुष्काळाची तीन वर्षेसुद्धा अपवाद नव्हती. बाकी उकिरडे,धूळ,रस्ते पाणी, वीज, आरोग्यसेवा हे सर्व तसेच. देवळांच्या जीर्णोद्धाराविषयी लिहायचे तर जुने सुंदर घडीव पाषाणाचे मंदिर, कमानी पाडून त्या ऐवजी बटबटीत बाथरूम टाइल्स आणि सीमेंटचा भरमसाट वापर यामुळे विद्रूपीकरण होत आहे. सुशोभितीकरणाच्या नावाखाली.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/02/2018 - 14:39 नवीन
याबद्दलही आपल्याकडे काय आकडेवारी असेल ती द्यावी. *************************** सार्वजनिक वर्गणी/पैशाचा मुद्दा गैरलागू आहे असे मला वाटतं. शहरातही अनेक अडचणी तशाच पडून असताना बरीच सुशोभिकरणे होतात, लोक बऱ्याच वायफळ गोष्टींसाठी वर्गण्या जमा करतात, त्यामुळे त्याचा भजन/कीर्तन, मंदिर वगैरेशी संबंध अतार्किक आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 03/02/2018 - 15:43 नवीन
कीर्तन भजनसप्त्यांसाठी खूप मोठ्या वर्गण्या गोळा होतात आणि मोठमोठे खर्च केले जातात यात अतार्किक काय?असे होते हे तर्क करण्यापलीकडचे आहे काय? इतर कामांसाठी लोकांकडून तेव्हढा उत्साह दाखवला जात नाही हे विधान तर्क करण्यापलीकडचे किंवा तर्कशून्य किवा तर्करहित किंवा तर्क नसलेले कसे? महानगरांतून धार्मिक कारणासाठी अथवा सुशोभितीकरणासाठी अथवा पेव्हर ब्लॉक्स बदलण्यासाठी सरकारकडून अवाढव्य खर्च होत असेल तर जागरुक जनता जाब मागू शकते, मागते. धनाढ्यांचे लग्नादि जंगी खाजगी कार्यक्रम, संस्थांचे महायज्नादि खर्चिक सोहोळे चर्चेचा आणि टीकेचा विषय होतात. क्वचित कर आयुक्तांची वक्रदृष्टीही वळते. या सर्वांना उत्तरदायित्व असते. पाणीसाठ्यानजिकची वसती ते तीर्थ ( जिथे पाण्यावरून तरून जावे लागते) आणि दूर सपाटीवर वसलेले ते क्षेत्र (अर्थात शेतीची जागा) अशी देवस्थानांचीसुद्धा विभागणी आहे. जर महाराष्ट्रात गणपति उत्सव (पूजन नव्हे) कोंकणातून देशावर आला असेल, (आणि असे अनेकांचे मत आहे,) तर तिथे विपुल समुद्रकिनारे आहेत आणि समुद्रात सोडलेल्या वस्तू पुन्हा पुन्हा मागे येऊन शेवटी विलीन होण्याची प्रक्रियाही अनादि काळापासून आहे. (उत्सव अनादि काळापासून नाही) हे सर्व अगदी नैसर्गिक आहे. एकदा उत्सवाने पाण्यात सोडल्यावर पुन्हापुन्हा उत्सवप्रियतेने पाण्यात सोडण्याचे काय प्रयोजन? इथे शास्त्र नाही, परंपरा नाही. केवळ मनमानी आणि त्रासदायक उत्सवप्रियता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/02/2018 - 16:06 नवीन
शहरातल्या उत्तरदायित्व असलेल्या (म्हणजे सरकारी पैशातून झालेल्या) सुशोभीकरणांचा मुद्दा नाहीये, वर्गणी करून केल्या जाणाऱ्या गोष्टींचा मुद्दा आहे. तुम्ही प्रधान्याचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्याचा मंदिर, भजन, कीर्तन वगैरेशी काही संबंध नाही. गाव असो वा शहर, वर्गणी कशासाठी जमवायची आणि त्याचे काय करायचे हा त्या वर्गणी जमवणाऱ्यांचा प्रश्न आहे. सरकारी जबाबदाऱ्या असणाऱ्या गोष्टी ह्या वैयक्तिक वर्गाण्या जमवून कराव्यात असे आपले म्हणणे आहे काय? ********************************* भग्न मूर्ती बाहेर आल्यानंतर त्या परत पाण्यात सोडण्यात कसली आलीय उत्सवप्रियता? तुमचा नेमका मुद्दा काय आहे? त्या बाहेर आलेल्या भग्न मूर्तींचे नेमके काय करावे असे आपले म्हणणे आहे? ती गणपतीची मूर्ती आहे हे विसरून तो फक्त मातीचा गोळा आहे म्हणून त्याला कचरा समजावं? त्याने काय होणार? आणि त्याला गणपतीची मूर्तीच समजल्याने नेमका त्रास काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 03/02/2018 - 18:01 नवीन
अंतिम संस्कार झाल्यावर, पुनरागमनायच असे म्हटल्यावर मूर्ती ही मातीचा गोळाच उरते. एकदा ढोल ताशे, डीजे गुलाल पुष्पवृष्टीसकट मिरवणुकीने पाण्यात सोडल्यानंतर लाटांबरोबर किनाऱ्यावर आलेले अवयव गोळा करून रीसाय्क्लिंगसाठी वापरावे अथवा साधेपणाने पाण्यात सोडावे. (तरीही काही दिवस ते मागे येतच राहातात हे वेगळे). पुन्हा पूजा आरत्या, मिरवणुका ढोल ताशे नकोतच. कोणताही उपक्रम फार मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड आर्थिक उलाढालीनिशी घडत असेल तर त्याची योग्य ती दखल त्या त्या पातळीवरील अर्थतज्ज्न, नियोजनतज्ज्न, माध्यमे यांनी घेतली पाहिजे. समाजाच्या व्यापक हितासाठी प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. पैशाचा आयव्यय तपासला गेला पाहिजे. बॅंकेच्या कर्जाचा हप्ता चुकवून किंवा असे काही आवश्यक आणि उपयोगी व्यय टाळून पैसा इतर कामासाठी खर्च होत असेल तर प्राधान्यक्रमाच्या प्रबोधनाची गरज आहे असे म्हणावे लागेल. यावर पुरेसे स्पष्टीकरण देऊन झाले आहे. तेच तेच पुन्हा लिहिण्यात स्वारस्य नाही. तेव्हा या विषयावरचे लेखन इथे थांबवीत आहे. शुभेच्छा. सुप्राक्तन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sat, 03/03/2018 - 14:00 नवीन
तुम्ही पुनर्विसर्जनाचा आणि त्याच्या उत्सवाचा (अगदी ढोल वगैरे बडवून) मुद्दा पुन्हा पुन्हा मांडताय. हे पचनी पडत नाहीये. कृपया हा उत्सव कुठे आणि कसा साजरा केला जातो याचे काही संदर्भ द्याल का अभ्यास वाढवण्यासाठी? ***************************** प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यावर मीही धन्यवाद, करण मुद्दाच काही समजला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
संदीप-लेले Fri, 03/02/2018 - 17:17 नवीन
" देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा ..." ........... अगदी योग्य ! "अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा." .... देव असेल अथवा नसेल ... जे काय सत्य आहे ते कोणत्याही मार्गाने शोधले तरी मिळेलच. त्यामुळे पडताळा घेण्यासाठी तुम्ही सांगता ती एकमेव पद्धत वापरायचा हट्ट योग्य नाही. ज्याला जी पद्धत योग्य वाटेल ती वापरण्याची मुभा असायला हवी. विज्ञानातून याचे उत्तर मिळण्याची शक्यता [सध्या तरी मला दिसत] नाही. पण विज्ञानाची प्रगती अफाट आहे आणि त्यातून नवीन निरीक्षणे मिळून कदाचित उत्तर मिळेलही. विज्ञान आधी पडताळा देते आणि मग तो सिद्धांत मानला जातो. एखाद्या सिधान्तामागील विज्ञान कितीही क्लिष्ट असले तरी विज्ञान हा पडताळा सामन्यातील सामन्याला सुद्धा देते. मग तो माणूस बुद्धिवादी असो की सश्रद्ध किंवा अतिअंधश्रद्ध. मानवाच्या आकलनशक्तीतील मर्यादांमुळे सिद्धांत ठरवताना [घोड] चुका होतातही. पण चूक झाली हे विज्ञान मान्य करते. अध्यात्मात ह्या प्रांजळपणाला वावच नाही. जे सांगितले आहे ते बरोबरच आहे, त्याशिवाय दुसरे काही सत्यच नाही, हा पवित्रा त्यात आहे. अध्यात्माने उत्तरे दिली आहेत. पण पुनः त्याचा पडताळा घेण्याचा प्रश्न उरतोच. आणि तो मिळालाच, तरी त्याची अनुभूती प्रत्येकाला नाही आणि सारखीही नाही. समस्या अशी आहे की माणूस सश्रद्ध असेल, तर पडताळा मिळतोच मिळतो ! पण अध्यात्माची तर्कसंगती लावायला गेल्यास श्रद्धा बाजूला ठेवायला लागते. [वर म्हणल्याप्रमाणे कोणता मार्ग निवडायचा याची मुभा असायलाच हवी.] आणि श्रद्धा बाजूला ठेवली तर पडताळा नाही हे ही ठरलेले ! याचा अर्थ अध्यात्मात पडताळा मिळणार की नाही हे तो पडताळा घेण्याच्या पद्धतीवर पुर्णपणे अवलंबून आहे. म्हणजेच तो पडताळा आणि म्हणुन त्यातले सत्य [सध्यातरी] सापेक्ष आहे. विज्ञानातील पडताळ्याप्रमाणे निरपेक्ष नाही. मला वाटते प्रत्येक माणसाचा या बाबतीत काही एक कल असतो. हा कल अध्यात्मिक किंवा बुद्धिवादी अशा एकाच टोकाला झुकलेला असेल तर त्याला दुसरी बाजू पटणे अशक्यप्राय. एखादा मध्याजवळ असेल तर agnostic किंवा आधी सश्रद्ध नंतर नास्तिक [किंवा त्या उलट] असे होण्याची शक्यता. पण कोणत्याही एका वेळी, प्रत्येकाची एक भूमिका असते आणि ती प्रचंड ठाम असते. तस्मात ... यावर वाद घालू नये हेच उत्तम ! [लोकसत्ता मध्ये सध्या एक लेखमाला सुरु आहे. परंपरा आणि नवता. ज्यांनी वाचली नसेल त्यांनी जरूर वाचावी. https://www.loksatta.com/chaturang-category/parampara-ani-navata/]
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/02/2018 - 18:44 नवीन
फुत्कार,
अध्यात्मात ह्या प्रांजळपणाला वावच नाही. जे सांगितले आहे ते बरोबरच आहे, त्याशिवाय दुसरे काही सत्यच नाही, हा पवित्रा त्यात आहे.
हे साफ चूक आहे. उलट अध्यात्मात स्वत:शी प्रामाणिक राहावंच लागतं. जे काही सांगितलंय (महावाक्य वगैरे) त्याची अनुभूती घ्यायची असते. एका महावाक्याची अनुभूती आली तरी ती पुरेशी आहे. ज्ञानेश्वरीतली एकतरी ओवी अनुभवावी. सगळ्यांच्या मागे धावायची गरज नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/03/2018 - 16:32 नवीन
Anubhuti या व्हिडिओत भारतीय शिक्षणसंस्थेच्या संदर्भात लेखातील अनुभूती या शब्दाचा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/03/2018 - 16:33 नवीन
Anubhuti
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
R
rain6100 Sun, 09/30/2018 - 15:39 नवीन
देव आहेत ..नक्किच . श्रधा असेल तर नक्कि अनुभव येइल
  • Log in or register to post comments
ब
बापू मामा Mon, 01/20/2020 - 10:16 नवीन
मना सज्जना भक्ति पन्थेचि जावे| तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे| जनी निन्ध्य ते सर्व सोडूनी ध्यावे | जनी वंध्य ते सर्व भावे वदावे || या मनाच्या श्लोकातील दुसऱ्याच श्लोकात समर्थांनी सर्व (देव आहे की नाही इत्यादी) प्रश्नांचे उत्तर दिले आहे. देव मूर्तीत अथवा पोथ्यात नसतो. जेंव्हा मनुष्य एखाद्या देवाच्या भक्तीत रममाण होतो, म्हणजेच त्याच्या मनात व विचारात - पर्यायाने कृतीत तो दिसतो. (तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे). मनुष्याच्या मनी श्रीहरी वसतो म्हणजे - तो त्याच्या कृतीतून (भौतिक) ते सिद्ध करतो व जनी निन्ध्य ते सर्व सोडून देतो (अहंकार, क्रोध,लोभ,काम, असत्य ) व तो कृतीतून प्रेम,सेवा,निर्लोभ,निरहंकार, सत्य यांचा अंगीकार करतो. महात्मा गांधींनी नेहमी (अगदी मरतानाही) रामनामाचा अंगीकार केला व रामाप्रमाणेच त्यांनी सत्य, अहिंसा,निर्लोभ प्रेम,स्वच्छता,हे कृतीतून दाखविले. म्हणून आज आपण दररोज त्यांना पाहतोय (किमान नोटेवरती) याला खरी भक्ती म्हणावे. "देह त्यागील्या"वरही त्यांची कीर्ती मागे उरली आहे. हीच त्यांनी आयुष्यभर "क्रिया"केली आहे. श्रद्धा मनात असून चालत नाही. ती कृतीत आणावी. देव आपणाला दिसणार नाही, तर आपणच देवमय होऊत. या उताऱ्यावर "नीच बोलणे" जरी मिळाले तरी ते "सोशीत" जाण्याएवढे "श्रेष्ठ धारीष्ट्य" जीवी ठेऊ या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा