Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूलभूत नीतितत्त्वे

य
यनावाला
Sat, 03/03/2018 - 12:22
🗣 128 प्रतिसाद
मूलभूत नीतितत्त्वे : यनावाला [ईश्वरवादी--निरीश्वरवादी या दोघांतील प्रश्नोत्तररूपी संवाद . प्रश्न आस्तिकाचे, उत्तरे नास्तिकाची.] प्रश्न :- तुम्ही म्हणता की, "आजच्या प्रगत युगात समाजाला देवा-धर्माची आवश्यकता नाही. पुरातनकाळीं अज्ञानयुगातील माणसाला सुचलेल्या आणि रुचलेल्या या संकल्पनांचे आता काही प्रयोजन उरलेले नाही. सर्वांनी त्या डोक्यातून काढून टाकल्या पहिजेत" असे करणे योग्य होईल का ? उत्तर :- हो निश्चितच. इथे "धर्म" या शब्दात जगातील सर्व प्रचलित धर्म (उपासना पद्धती) समाविष्ट आहेत. तसेच देव हा शब्द जगातील सर्व देव-देवतांविषयीं आहे. इथे उपासनेचा देव (पर्सनल गॉड) --म्हणजे पूजा, प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, परम दयाळू देव हा अर्थ घ्यायचा. धर्म म्हणजे जे कांही रूढी परंपरांनी धर्माचरण चालू आहे , कर्मकांडे होत आहेत, ते सर्व. या देव-धर्मांमुळे जगभरातील अनेकांवर अन्याय-अत्याचार झाले आहेत. धर्मावरून भीषण युद्धे झाली आहेत. रक्ताचे पाट वाहिले आहेत. सर्व समाजांची अतोनात हानी झाली आहे. आणि होत आहे. धर्मगुरू, पुरोहित अशा कांही हितसंबंधी लबाडांना मात्र मोठा लाभ झाला आहे आणि होत आहे हे खरे. म्हणून समाजाच्या हितासाठी या देव-धर्माच्या संकल्पनांचे उच्चाटन होणे योग्य आहे. सुधारककार आगरकर लिहितात, "मानवी समाजाला यापुढे धर्माची आवश्यकता नाही. कारण धर्माचा मूळारंभ अज्ञान आणि भीती यांतून झालेला आहे. धर्मविषयक कल्पना या वस्तुस्थितीच्या अज्ञानातून आणि अज्ञात संकटाच्या भीतीतून आलेल्या आहेत." प्रश्न :- धर्मग्रंथातून माणसाला नीतितत्त्वांची शिकवण मिळते. आपल्या हातून काही दुष्कृत्य, कुकर्म घडल्यास पाप लागेल, देव शिक्षा करील, अशी माणसाला भीती असते. तसेच सद्धर्माने वागल्यास पुढच्या जन्मी सुख मिळेल अशी आशाही त्याला वाटते. देव-धर्माचे उच्चाटन झाल्यास माणसाला नीतिबोध कसा होईल? देवाची भीती नसेल तर माणूस अनिर्बंध, अनैतिक वागणार नाही काय ? त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढणार नाही काय ? उत्तर :- म्हणजे देव-धर्म मानणारी, धार्मिक परंपरा पाळणारी माणसे नीतीने वागतात, तर नास्तिक लोक नीतिभ्रष्ट असतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे. प्रश्न :- होय. असे वाटते खरे. त्यात काय चूक आहे ? उत्तर :- ठीक आहे. आपण वास्तवाचा, म्हणजे आजच्या सत्य परिस्थितीचा विचार करू. आपल्या देशात ८५% हून अधिक लोक आस्तिक आहेत. आपला देश ऋषी-मुनींचा, संन्यासी-योग्यांचा, बुवा-बाबांचा, आहे. इथे असंख्य मंदिरे आहेत. अगणित देव-देवता आहेत. उत्सव-सोहळे, भजने-कीर्तने, वार्‍या-तीर्थयात्रा, पर्वण्या-कुंभमेळे असतात. देवाचा उद् घोष, धर्माचा उदो उदो, अखंड चालतो. तुम्ही म्हणतां त्या अनैतिक नास्तिकांची संख्या इथे नगण्य आहे. या सत्य परिस्थितीचा विचार करता आपल्या देशाचा नैतिक स्तर अति उच्च असला पाहिजे ना ? पण वास्तव काय आहे? भ्रष्टाचार, भूखंड घोटाळे, आर्थिक लुबाडणूक, बॅंकांतील थकित कर्जे, अशा अनेक अवैध गोष्टीत हा देश आकंठ बुडालेला आहे. स्रियांवरील बलात्कार, बालिकांवरील अत्याचार, अनेक विकृत गुन्हे, यांत आपला देश जगात अग्रेसर आहे. अनैतिकतेत भारताचा क्रमांक पहिल्या दहात आहे. या वास्तवावरून काय समजते ? यावरून तर्कसंगत निष्कर्ष निघतो की देव- धर्म- धर्मग्रंथ यांचा नीतीशी काही संबंध नाही. पूजा-प्रार्थना-भजने -आरत्या,कथा-कीर्तने यांनी नीती वाढत नाही. व्रत-वैकल्ये,अभिषेक-अनुष्ठाने, होम-हवने करून नीती उन्नत होत नाही. वा‍र्‍या, पालख्या, छबिने, प्रकटदिनसोहळे यांनी नीतिमत्ता उद्भवत नाही. तसेच तुम्ही समजता की देवा-धर्माचे उच्चाटन झाले तर गुन्हेगारी वाढेल ! त्याविषयी वस्तुस्थितीचा विचार करू. आज देशात बाराही महिने देवा-धर्माचा एवढा दुमदुमाट असताना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रचंड आहे. देवाधर्माच्या उच्चाटनाने आणखी किती वाढणार ? युरोपीय देशांतील सर्वेक्षणांवरून असे दिसते की जिथे आस्तिकांची संख्या थोडी आहे त्या देशांत गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. यावरून दिसते की बहुसंख्य नास्तिक लोक हे स्वयंप्रेरणेने नीतितत्त्वे पाळतात. प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ? उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी : १) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये. या नीतितत्त्वांचा देवा-धर्माशी काही संबंध नाही. ही साधी तत्त्वे जर जगातील प्रत्येक माणसाने पाळली तर सर्वजण सुखी होतील. विश्वशांती नांदेल. प्रत्येक माणसात ही तत्त्वे स्वाभाविक (नैसर्गिक) म्हणजे उपजतच असतात. ती कुणी शिकवावी लागत नाहीत. कुठल्या ग्रंथातून वाचावी लागत नाहीत. इथे सद्गुरू, स्वामी, बुवा, बापू, अशा कुणाचीही आवश्यकता नाही. सत्संग, आध्यात्मिक प्रवचने, भजने, कीर्तने अशा गोष्टी इथे निरुपयोगी ठरतात. प्रत्येक सुजाण माणसाच्या बुद्धीत ही तत्त्वे असतातच. प्रश्न :- तुमचे विधान धार्ष्ट्याचे आहे. ही मूलभूत तत्त्वे स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक असतील असे वाटत नाही. काहींही करून जीव वाचवणे, अन्न मिळवणे, आणि जनुक सातत्य टिकण्यासाठी पुनरुत्पत्ती करणे या प्रत्येक सजीव प्राण्याच्या नैसर्गिक प्रेरणा ( नॅचरल इन्स्टिंक्ट) आहेत असे वाचले आहे. ते पटते. म्हणजे माणसासाठी सुद्धा या नैसर्गिक ऊर्मी आहेतच. त्याला जिवंत राहण्यासाठी अन्न लागते. ते वैध मार्गांनी मिळणे अशक्य झाले तर प्रसंगी जीव वाचविण्यासाठी माणूस चोरी करील. जीव वाचविणे ही नैसर्गिक प्रेरणा आणि चोरी करू नये हे मूलभूत नीतितत्त्व यांची सांगड कशी घालता येईल ? उत्तर :- हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नीतितत्त्वे सज्ञान माणसासाठीच आहेत, अन्य सजीवांसाठी नाहीत हे उघड आहे. उत्क्रांत होता होता माणसाच्या डोक्याच्या कवटीत नव्या मेंदूचा (निओकॉर्टेक्स चा ) उद्भव झाला. हा नवा मेंदू अधिक विकसित झाला. या नवमेंदूमुळे माणूस सुसंस्कृत झाला. अन्य माणसांचा, समाजाचा, विचार करूं लागला. तेव्हा त्याच्या मेंदूत ही मूलभूत नीतितत्त्वे उद्भवली. पुढे विकसित झाली. आता जनुकीय प्रेरणांवर माणूस आपल्या बुद्धीने नियंत्रण ठेऊं शकतो. माणूस हे जनुकीय यंत्र असले तरी बर्‍याच प्रमाणात माणूस स्वतंत्र आहे. जिवंत राहाण्यासाठी चोरी करणे भाग आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर माणूस म्हणेल ," प्राण गेला तरी चालेल पण मी चोरी करणार नाही." हे जनुकीय प्रेरणेच्या विरुद्ध आहे. पण तत्त्वनिष्ठ माणूस ती प्रेरणा झिडकारून असा निश्चय करू शकतो. तसे वागू शकतो. तो स्वतंत्र आहे. प्रश्न :- ठीक आहे. हे समजले. पण प्रसंगी जगण्याविरुद्ध असलेले हे नीतितत्त्व त्याच्या नव्या मेंदूत मुळात उद्भवलेच कसे ? उत्तर : - योग्य प्रश्न विचारला. माणूस हा जाणीवेची जाणीव असलेला (होमो सेपियन्स् सेपियन्स्) प्राणी आहे. आपल्याला जाणीव असते याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे दुसर्‍या माणसालासुद्धा जाणीव असणार , मला भावना आहेत तशा त्यालाही भावना असणार हे माणसाला समजते. तसेच माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी म्हणून विकसित झाला आहे.(त्या तर्कनिष्ठतेमुळे तो एवढी आश्चर्यकार प्रगती करू शकला.) या दोन गोष्टींमुळे माणसाला पुढील युक्तिवाद कळतो आणि पटतो. किंबहुना त्याला स्वत:लाच तो सुचू शकतो. :- " * कोणी मला काही खोटे सांगितले तर ते मला आवडणार नाही. माझ्याशीं कोणी खोटे बोलू नये असे मला वाटते. म्हणून मी सुद्धा कुणाशी खोटे बोलता नये. नाहीतर -मला कोणी कांही खोटे सांगू नये--अशी अपेक्षा मी करणे योग्य होणार नही." "* जी वस्तू माझी आहे., जिच्यावर माझा अधिकार आहे ती कोणी पळवली तर ते मला आवडणार नाही. मला दु:ख होईल. म्हणून मीसुद्धा कोणाची वस्तू चोरता नये. चोरणार नाही." अशा तर्‍हेने ही पाच मूलभूत तत्त्वे माणसाच्या बुद्धीत उद्भवली. प्रश्न :- हे सगळे तत्त्वत: ठीक आहे. पटण्यासारखे आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय अनुभव येतो ? * खोटे बोलणारी माणसे पदोपदी भेटतात. * चोरी, घरफोडी, दरोडा यांविषयींच्या बातम्या वृत्तपत्रांत सतत येत असतात. * फसवणुकीची प्रकरणे इतकी असतात की जो तो दुसर्‍याला फसवायला टपला आहे असे वाटावे. * बळजबरी, अत्याचार यांविषयी तर बोलायलाच नको. बलात्काराच्या बातमीविना एक दिवस जात नाही. असे असता ही नीतितत्त्वे मानवी बुद्धीत उपजतच असतात असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? उत्तर :- हा प्रश्न अपेक्षित होताच. तुम्ही म्हणता ते खरे आहे. हेतुत: खोटे बोलणारी, दुसर्‍याला फसवणारी, अन्याय अत्याचार करणारी, हिंसक असणारी माणसे समाजात आहेतच. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. यात शंका नाही. पण मला असे म्हणायचे आहे की, जो अनेकदा हेतुत: असत्य कथन करतो, त्यालासुद्धा "खोटे बोलणे वाईट असते. खोटे बोलू नये. " हे समजते. पटलेले असते. समजा तो एक कथा वाचतो आहे. त्या कथेत शेवटी असत्याचा विजय होतो असे दाखवले आहे. तर त्या खोटारड्या माणसालासुद्धा तो शेवट आवडणार नाही. कारण अंतिम विजय सत्याचा व्हावा असेच त्याला वाटत असते. मग तो खोटे का बोलतो ? त्याची कांही कारणे असतात. आपल्या असत्य बोलण्याचे तो समर्थन करतो. तो म्हणतो ," खोटे बोलू नयेच. पण माझा निरुपाय असतो. मला खोटे बोलावे लागते. असत्य बोलण्याने लागलेले पाप मी पुण्य कृत्य करून धुऊन काढीन." धर्मात असे पापक्षालनाचे उपाय ठायीं ठायीं आहेत. प्रश्न :- असे कोणते उपाय आहेत ? उत्तर :- तुम्ही धार्मिक ग्रंथात वाचले नाही काय ? अशा प्रत्येक ग्रंथाच्या फलश्रुतीत ते सापडतील. सत्यनारायणकथेच्या दुसर्‍या अध्यायात आहे, "एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: । सर्वपापविनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमाप्‍नुयात् । --हे सत्यनारायणाचे व्रत करून सर्व पापांतून मुक्त झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण अंतीं दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला."-- समजा एक गुंड.... प्रश्न :- यात पापक्षालनाचा कोणता मार्ग सांगितला आहे ? उत्तर :- अहो असे काय विचारता ? सत्यनारायणाची पूजा घातली की माणूस सर्व पापांतून मुक्त होतो असे स्पष्ट म्हटले आहे ना ? प्रश्न :- हो हो. आले लक्षात. तुम्ही एका गुंडाविषयीं काय सांगत होता ? उत्तर :- समजा एक गुंड चित्रपट बघायला गेला. खलनायक आणि त्याची टोळी यांची नायक पिटाई करतो असे दृश्य आहे. त्यावेळी हा गुंड प्रेक्षक टाळ्या वाजवतो. शिट्ट्या मारतो. गुंडांची पिटाई होते हे त्याला मनापासून आवडते. त्याचा धंदा धमक्या देऊन खंडणी वसूल करणे हा असतो. हे वाईट आहे. दुष्कृत्य आहे. हे त्याला ठाऊक असते. पण त्याला ते निरुपायाने करावे लागते. असे तो आपल्या दुष्कृत्याचे स्वत:शीच समर्थन करतो. खंडणीतील काही रक्कम मी सत्कृत्यासाठी खर्च करीन, पुण्य मिळवीन मग माझे पाप धुऊन जाईल असे तो आपले समाधान करून घेतो. मग शिरडीला किंवा बालाजीला जाऊन तिथल्या पेटीत मोठे दान टाकतो. गणपतीला चांदीचा उंदीर अर्पण करतो. अष्टविनायक यात्रा करतो. कुंभमेळ्यात स्नान करतो. पापक्षालनासाठी असे कितीतरी उपाय आहेत. माझे पाप धुऊन गेले या समजुतीने त्याच्या मनाला समाधान वाटते. पाप केल्याची जी टोचणी मनाला लागलेली असते ती संपते. त्याला पापक्षालनाचा मार्ग सापडलेला असतो. मग तो निर्ढावतो. उत्साहाने नवी दुष्कृत्ये करायला लागतो. गीतेत भगवानुवाच आहे :- ".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :। "[ ( कृत दुष्कृत्यांची) चिंता करू नकोस. मला शरण ये. मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.] प्रश्न :- नास्तिक माणसे अनैतिक काम करतात का ? केल्यास त्यांच्या मनाला टोचणी लागते का ? उत्तर :- सगळेच नास्तिक नीतिमान असतात असे नाही. तसेच सगळे नास्तिक अनैतिक असतात असेही नाही. कांही निरीश्वरवाद्यांच्या हातून अनैतिक गोष्टी घडत असतील. दुष्कृत्य केल्यावर मनाला सदसद्विवेक बुद्धीची टोचणी लागणे, मनात खुपत-सलत राहणे ही सर्व माणसांच्या बाबतीत स्वाभाविक गोष्ट आहे. ही खुपणी संपविण्यासाठी, मानसिक समाधानासाठी पापक्षालनाचे मार्ग धर्मग्रंथांत आहेत हे आपण पाहिले. समजा चित्रपटाला गेलेला खंडणीगुंड नास्तिक आहे, तरी केलेल्या दुष्कृत्याची टोचणी त्याच्या मनाला लागणारच. कारण मूलभूत नीतितत्त्वे स्वाभाविक आहेत. त्यांचा आस्तिक-नास्तिकतेशी संबंध नाही. पण मनाच्या समाधानासाठी, मनाची टोचणी घालवण्यासाठी नास्तिकाला कोणताच मार्ग उपलब्ध नाही. नास्तिक असल्यामुळे तो बालाजीला, साईबाबाला, कुंभमेळ्याला जाणार नाही. असल्या गोष्टींवर त्याची श्रद्धाच नाही. दुष्कत्य केल्याची खंत त्याच्या मनात सतत सलत राहील. त्यामुळे आणखी पापे करायला तो प्रवृत्त होणार नाही. परिणामत: तो गुंडगिरीतून मुक्त होईल. सन्मार्गाला लागेल. अशी शक्यता अधिक आहे. म्हणून गुन्हेगारांमध्ये निरीश्वरवाद्यांचे प्रमाण अत्यल्प असते. हे अनेक सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. प्रश्न :- तुम्ही सांगता त्यावर थोडा विचार केला तर काही पटण्यासारखे आहे. तरीपण मला प्रश्न पडतो की माणसासाठी ही नीतितत्त्वे जर उपजत असतील , तर माणूस अनैतिक गोष्टी करतोच कसा ? "त्याचा निरुपाय असतो " असे सांगून उत्तर पूर्ण होते काय ? उत्तर :- तुमची अडचण लक्षात आली. माणूस जर जन्मत:च नीतिमान आहे तर तो अनैतिक कृत्ये करण्यास कसा प्रवृत्त होतो? असा तुमचा प्रश्न आहे. असे पाहा मानवी मेंदू हे जगातील सर्वांत आश्चर्यकारक, अत्यंत गुंतागुंतीचे , व्यामिश्र असे इलेक्ट्रो-केमिकल (विद्युत्-रासायनिक) यंत्र आहे. माणसाची बुद्धी आणि मन या अमूर्त गोष्टी आहेत. त्या मेंदूत उद्भवतात. मेंदू वस्तुरूप आहे. आनंद, नैराश्य, राग, लोभ, मोह, दंभ, मत्सर, प्रेम, श्रद्धा इत्यदि भावना आहेत. अशा सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, इ. नऊ घटकांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी. एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेताना बुद्धी आणि मन यांच्यात द्वंद्व निर्माण होऊ शकते. (प्रत्येक वेळी होतेच असे नाही.) बुद्धीने घेतलेला निर्णय मनाला (म्हणजे भावनेला) नको असतो. तर मनाचा निर्णय बुद्धीला मान्य नसतो. खरे तर अंतिम निर्णय बुद्धीने घ्यायला हवा. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. मनसस्तु परा बुद्धि:।[मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे.] असे गीतेत म्हटले आहे. ते योग्य वाटते. मनाने जर बुद्धीवर कुरघोडी केली तर माणूस अनैतिक कृत्य करतो. (मूलभूत नीतितत्त्वे बुद्धीत असतात. मनात नसतात.) उदाहरणार्थ चोरी करू नये हा बुद्धीचा निर्णय असतो. पण मनातील लोभ, अभिलाषा, या भावना जर वरचढ झाल्या तर बुद्धीचा निर्णय झुगारून देऊन माणूस चोरी करतो. तसेच हिंसा करू नये हा बुद्धीचा नियम असतो. पण क्रोध, मद, मत्सर, या मनोभावना प्रबळ झाल्या तर माणूस हिंसक बनतो. याप्रमाणे बुद्धीतील नीतितत्त्वांपेक्षा एखादी मनोभावना प्रबळ झाली तर त्या भावनेच्या प्रभावाखाली माणूस अनैतिक कृत्य करतो. प्रसिद्ध तत्त्वज्ञानी इमॅन्युएल कांट यांनी म्हटले आहे, "अगणित तारकांनी भरलेली ही आकाशाची अथांग पोकळी आणि मूलभूत नीतितत्त्वे मानणारी मानवी बुद्धी या दोन गोष्टींवर मी जों जों विचार करतो तों तों माझे मन आश्चर्याने भरून येते." जनुकीय प्रेरणांच्या विरुद्ध असलेली मूलभूत नीतीची संकल्पना मानवी बुद्धीत कशी उद्भवते ? कोठून येते ? अनैतिक आचरण केल्यावर मनाला टोचणी का लागते ? या प्रश्नांची उत्तरे कांही अंशीं देण्याचा इथे प्रयत्‍न केला आहे. या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे मी देऊ शकत नाही. याची मला जाणीव आहे. ***************************************************************
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
64968 वाचन

💬 प्रतिसाद (128)
य
यनावाला Tue, 03/06/2018 - 16:15 नवीन
रामायण नव्हे महाभारत ! अठरा अक्षौहिणी सैन्य राम-रावण युद्धात नव्हते. भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर होते. .....यनावाला.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/06/2018 - 16:38 नवीन
अठरा अक्षौहिणी सैन्य राम-रावण युद्धात नव्हते. भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर होते. एक अक्षौहिणी सेना नौ भागों में बटी होती थी- १. पत्ती- 1 गज + 1 रथ + 3 घोड़े + 5 पैदल सिपाही २. सेनामुख (3 x पत्ती)- 3 गज + 3 रथ + 9 घोड़े + 15 पैदल सिपाही ३. गुल्म (3 x सेनामुख)- 9 गज + 9 रथ + 27 घोड़े + 45 पैदल सिपाही ४. गण (3 x गुल्म)- 27 गज + 27 रथ + 81 घोड़े + 135 पैदल सिपाही ५. वाहिनी (3 x गण)- 81 गज + 81 रथ + 243 घोड़े + 405 पैदल सिपाही ६. पृतना (3 x वाहिनी)- 243 गज + 243 रथ + 729 घोड़े + 1215 पैदल सिपाही ७. चमू (3 x पृतना)- 729 गज + 729 रथ + 2187 घोड़े + 3645 पैदल सिपाही ७. अनीकिनी (3 x चमू)- 2187 गज + 2187 रथ + 6561 घोड़े + 10935 पैदल सिपाही ९. अक्षौहिणी (10 x अनीकिनी)- 21870 गज + 21870 रथ + 65610 घोड़े + 109350 पैदल सिपाही (संदर्भ : http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80 १८ अक्षौहिणी = १८० अनकिनी इतक्या मोठ्या संखेने सैन्य असण्याइतकी लोकसंख्या त्यावेळेस होती आणि इतके मोठे सैन्य बाळगण्याइतके प्रबळ राजे त्यावेळेस होते, यावर आपला विश्वास बसला आहे, म्हणजेच पर्यायाने रामायण-महाभारत घडले यावरही आपला विश्वास आहे. हे वाचून धन्य धन्य होण्यात आले आहे ! "यक पे रेहना, या घोडा बोलो या चतुर", हे आठवले =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Tue, 03/06/2018 - 16:21 नवीन
रामायण नव्हे महाभारत ! अठरा अक्षौहिणी सैन्य राम-रावण युद्धात नव्हते. भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर होते. महाभारताला कोणी काल्पनिक म्हणत नाहीत. ...यनावाला
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/06/2018 - 16:56 नवीन
अशा प्रतिसादांनी आपल्याच धाग्याचे गांभीर्य कमी होते आहे. महाभारताला फारसे कुणी काल्पनिक मानत नसले तरी ते अतिशयोक्त मात्र निश्चितच आहे. भारतीय युद्धाचा कुठलाही पुरातत्त्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी, वसाहतींची उत्खनने) हे आपणास नक्कीच माहीत असावे. आपण मताप्रमाणे महाभारताला जर कुणी काल्पनिक मानत नसतील तर त्यांचे अस्त्रे, शस्त्रे, सर्पसत्र, अक्षय्य भाते, सुदर्शन चक्र, गीता, विराटरूप, सौप्तिकपर्वातील रात्रीतला सर्वंकष संहार आणि असंख्य गोष्टी खऱ्याच मानाव्या लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/06/2018 - 18:35 नवीन
याला "प्रायव्हेट लॉजिक" म्हणतात ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
A
arunjoshi123 Tue, 03/06/2018 - 17:55 नवीन
महाभारताला कोणी काल्पनिक म्हणत नाहीत.
काय मंता राव? ------------------ बाय द वे, कृष्णजन्मभूमीला तुमचा पाठींबा दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
च
चामुंडराय Tue, 03/06/2018 - 16:56 नवीन
बाकी काहीका असेना परंतु त्या काळी ३,९३,६६० हत्ती आणि ११,८०,९८० घोडे युध्दाला जुंपले होते म्हणजे भारतातील प्राणी जीवन किती समृद्ध असावे याची खात्री पटते आणि भारतभू मुख्यत्वे अरण्याने व्यापलेली असावी हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 03/06/2018 - 17:57 नवीन
आपण सुधारक आहोत याची अप्रश्ननीय अनुभूती झाली तर अशी व्यक्ति स्वतः सुधारणातीत बनते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/06/2018 - 18:38 नवीन
पूर्णज्ञानी असलेल्याला अजून ज्ञानाची आवश्यकता ती काय ? पूर्ण विकसित असलेल्याला अधिक सुधारणेची गरज ती काय ? ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुबोध खरे Wed, 03/07/2018 - 07:23 नवीन
यनावस्था प्रसंग हहपुवा मिपा ला २० लाखांचा ट्रक सारखे अजून एक शाब्दीक भावंड दिल्याबद्दल आपले अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
य
यनावाला Wed, 03/07/2018 - 09:24 नवीन
महाभारत खरे मानतो यावरून महाभारतातील प्रत्येक विधान सत्य मानतो असा निष्कर्ष काढणे अज्ञानमूलक आहे. ...जे विधान सत्य असणे शक्य असते ते तत्त्वत: सत्य मानावे. ( मात्र त्या विधानात कोणाचे चारित्र्यहनन नसावे.) पूर्वी हे इथे लिहिले आहे असे स्मरते.) महाभारतातील "नरो वा कुंजरो वा। " हा प्रसंग खरा असण्याची शक्यता आहे. म्हणून तो तत्त्वत: सत्य मानतो. "हा सूर्य हा जयद्रथ । " हा प्रसंग खरा असणे संभवनीय नाही म्हणून सत्य मानत नाही. कौरव शंभर होते. पण गांधारेय शंभर असणे असंभवनीय. धार्तराष्ट्र शंभर असतील. कुरुक्षेत्री कौरव-पांडव युद्ध झाले. त्यात फार मोठा नरसंहार झाला. डॉ. इरावतीबाई कर्वे याला युगान्त म्हणतात. भारतीय युद्ध झाले असणे शक्य आहे. म्हणून ते तत्त्वत: सत्य मानतो. ते वस्तुत: सत्य आहे की नाही हे ठरविण्याचे काम इतिहास संशोधकांचे आहे. ...यनावाला
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/07/2018 - 14:12 नवीन
परत एकदा अज्ञानमुलक ! लोल !! यनाविषयी आमचा आदर त्यांचा पहिलाच लेख वाचुन संपलेला, पण त्यांचे हे असले बाळबोध प्रतिसाद पाहुन भारी वाटते, आमच्या मित्रांना त्यांच्या विषयी वाटणारा आदर किती पोकळ आहे हे लवकरच लक्शात येईल अशी आशा आहे ! यनावालाने विज्ञानाचा अब्राहमिक धर्मासारखा अर्थ काढयला सुरुवात केलीये, म्हणजे कसे की " मी म्हणतो तेवढेच खरे, जेवढे मला कळते तेवढेच सत्य , बाकीचे असत्य. बाकीची मते मांडनारे असमंजस , अन्द्यानमुलक " वगैरे वगैरे ! लोल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रचेतस Wed, 03/07/2018 - 15:25 नवीन
दुर्दैवाने यनावालांचे महाकाव्यांवरील प्रतिसाद फारच गंडलेले आहेत हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एस Wed, 03/07/2018 - 16:39 नवीन
दुर्दैवाने सहमत आहे. श्री. वालावलकरसाहेबांची याबाबतीतली विधाने तर्कशुद्ध आणि ठाम नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Wed, 03/07/2018 - 17:49 नवीन
पूर्वांचल भागात (सप्तकन्या) २५ वर्षे लागली पहाट व्हायला इथं इतकं थांबावे लागणार नाही!!!! अज्ञ मूढ अडाणी नाखु वाचकांची फक्त पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Wed, 03/07/2018 - 18:32 नवीन
अगदी द्वापारयुगापासूनच त्यांची मतं तर्कहिन होती. केवळ आम्ही (तथाकथित उजवे, अस्तिक) विरोध केल्याने ते एका लॉबीचे कंठमणी बनले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Wed, 03/07/2018 - 18:35 नवीन
पण गांधारेय शंभर असणे असंभवनीय.
दत्तक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मारवा गुरुवार, 03/08/2018 - 04:16 नवीन
यनावालांच्या भुमिकेवर नेमका कुठे आक्षेप आहे ? १- यनावाला म्हणताहेत भारतीय युद्ध झाले असणे शक्य आहे. म्हणून ते तत्त्वत: सत्य मानतो. ते वस्तुत: सत्य आहे की नाही हे ठरविण्याचे काम इतिहास संशोधकांचे आहे. एक इतिहास संशोधक म्हणुन इरावती कर्वे चे च उदाहरण घेतले तर Yuganta - The End Of An Epoch या त्यांच्या ग्रंथात अगदी सुरुवातीलाच त्या खालील शब्दात त्यांच्या मते महाभारत हे प्रत्यक्षात लढलेले युद्ध होते आणि त्याचा काळ साधारण ख्रि.पु. १००० होता असे विधान त्या करतात. What is Mahabharata? Mahabharata is the name of a book in the Sanskrit language telling in very simple verse form the story of a family quarrel ending in a fierce battle. According to this author and to Indians in general this is not an imaginary, made-up story, but represents a real event which took place about 1000 B.C. आता जे युद्ध झाले असे इतिहास संशोधिका इरावती कर्वे काळाचा ही स्पेसीफीक संदर्भ देउन ख्रि.पु.१००० ला झाले. असे म्हणतात ते त्याहुनही अधिक काळजीपुर्वक विधान करुन यनावाला केवळ तत्वतः मान्य करतात तर यात त्यांच्या भुमिकेत नेमकी चुक काय आहे ? २ यनावाला जरी तत्वतः महाभारत युद्ध प्रत्यक्षात झाले असावे असे मान्य करीत असले तरी म्हणून महाभारतातील प्रत्येक अतिशयोक्त गोष्ट त्यांना मान्य नाही. हे यनावाला वेगवेगळी उदाहरणे देउन त्यांनी स्पष्टपणे प्रतिसादात मांडलेले दिसतेय. (त्यांच्या या एकंदर भुमिकेवरुन ते १८ अक्षोहीणी सैन्याचे अस्तित्वही कदाचित मानत नसावेत अर्थात तसा त्यांनी त्या संदर्भात खुलासा केल्यास शंकेला जागा राहणार नाही) वर प्रतिसादात ते इतकच म्हणताना दिसतायत की अक्षौहिणी सैन्याचा उल्लेख रामायणात नसुन महाभारतात आहे. एखादी व्यक्ती इतकच म्हणत असेल की " रामसेतु" चा उल्लेख "कुराणात" नसुन रामायणात आहे. याचा अर्थ ती व्यक्ती "रामसेतु" असण्याला खरे मानत आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. ( यनावालांची आतापर्यंतची भुमिका पाहता ते केवळ निर्देश करत आहेत असे म्हणण्यास अधिक वाव आहे. त्यांच्या एकंदर मितप्रतिसादी शैलीने गैरसमज करुन घेण्याचे प्रमाण जास्त दिसते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मारवा गुरुवार, 03/08/2018 - 04:59 नवीन
१८ अक्षौहीणी ची नेमकी "व्याख्या" वा आकडेवारी किती कशी जी म्हात्रे यांनी प्रतिसादात सविस्तर दिलेली आहे ती यनावालांना माहीत नसावी. इतकी नेमकी आकड्यात किती मणजे १८ अक्षौहीणी असते असे फारच कमी जणांना माहीत असते हे वास्तव आहे. या १८ अक्षौहीणी म्हणजे त्यांना शक्यतेच्या पातळीतली वाटणे असण्याचा संभव अधिक आहे. (त्यांचा आजपर्यंतचा तार्किक इतिहास पाहता हे त्यांच्य व्याख्येच्या अज्ञानातुन आलेले विधान असावे. किंवा निर्देश असावा खरे खोटे देव जाणे ! ) मात्र आता जेव्हा व्याख्या स्पष्ट समोर आहे तेव्हा यनावालांनी स्पष्टीकरण देऊन आपली १८ अक्षौहीणी संदर्भातली नेमकी भुमिका स्पष्ट केली पाहीजे. माहीत नव्हते तर ते प्रांजलपणे मान्य करुन आता यावर त्यांचे काय मत आहे ते स्पष्ट केल्यास गैरसमज दुर होण्यास मदत होइल. असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/08/2018 - 09:21 नवीन
जे यनावाला स्पष्टपणे लिहायचे टाळत आहेत असे ते विचार त्यांच्या मनात असावेत असे सांगून त्यांची बाजू सावरण्याचा कनवाळू प्रयत्न मनोरंजक वाटला तरी खचितच् कौतुकास्पद आहे :) ;) दौर्बल्याबद्दल सहानुभूती असणे ही एक चांगली मानवी प्रवृत्ती आहे... मात्र, दौर्बल्याच्या भौतिक प्रकारात अश्या कृतीचे परिणाम बहुदा सकारात्मक असतात, पण वैचारिक/तात्विक प्रकारात बहुदा तशी खात्री नसते, असे म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 06:54 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
न
नाखु गुरुवार, 03/08/2018 - 07:03 नवीन
(त्यांचा आजपर्यंतचा तार्किक इतिहास पाहता हे त्यांच्य व्याख्येच्या अज्ञानातुन आलेले विधान असावे. किंवा निर्देश असावा खरे खोटे देव जाणे ! ) तुम्ही प्रतिसादात देव आणलात आता प्रत्यक्ष देवही तुम्हाला वाचवू शकणार नाही.(यनावाग्बाणांपासून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रचेतस गुरुवार, 03/08/2018 - 07:43 नवीन
भारतीय युद्ध झाले असणे शक्य आहे. म्हणून ते तत्त्वत: सत्य मानतो. ते वस्तुत: सत्य आहे की नाही हे ठरविण्याचे काम इतिहास संशोधकांचे आहे.
यनावाला तत्संबंधी काहीही पुरावे देत नाहीत, तत्त्वतः सत्यांमधली तत्त्वे नेमकी कोणती ह्याविषयी त्यांनी काहीही सांगितलेले नाही. केवळ मला वाटते भारतीय युद्ध झाले असावे म्हणून मी ते तत्ततः सत्य मानतो अशा विधानांना काहीही आधार नाही. बाकी इरावती कर्वेंबाबत म्हणाल तर ह्या विदुषी असूनही इतिहास संशोधक किंवा पुरातत्त्व संशोधक नव्हेत हे त्यांचे ज्ञान, अधिकार बघूनही म्हणावेसे वाटते. कुरुंदकरांनी व्यासांचे शिल्प ह्या पुस्तकात युगांतवर टीका लिहिलेली आहे जी वाचनीय आहे. युगांतमधील बाईंच्या अनेक समजांचे त्यांनी खंडन केले आहे. अर्थात कुरुंदकर देखील प्रखर बुद्धीवादी असून तेही इतिहास संशोधक नव्हेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
स्वधर्म गुरुवार, 03/08/2018 - 09:04 नवीन
तुंम्ही यना यांचं बरंचसं काम केलं अाहे, पण ते स्वत:च जर त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यांच्यावरच्या अाक्षेपांना योग्य उत्तर मिळेल. नेहमीप्रमाणे अजो त्यांची वाक्ये अतिमहाफार ताणून विनोद निर्मिती करत अाहेत, पण यनांची भूमिका समजून घ्यायची असेल, तर अजोंना मुळीच अवघड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 09:56 नवीन
कमाल आहे राव. मी यना आणि मारवा यांच्या बाजूनं सहमत आहे असा (प्रथमच उपरोधी नसलेला) प्रतिसाद दिला. ========== किमान तेवढ्या प्रतिसादात मारवा यांना दिसतं त्याला हो म्हटलं जाऊ शकतं असंच लिहिलं आहे राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म गुरुवार, 03/08/2018 - 11:55 नवीन
वर सहमत म्हणता, पण खाली सुदामा काय, कुंभाचा फटकारा काय, देवाला यज्ञवेदीत गाडणे काय, पुराण वाचण्याची यना पध्दत इ.इ. किती ताणाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 09:59 नवीन
यनांची प्रत्येकच गोष्ट चूक असते असं मी मानत नाही. काही लोकांची काही विषयांवरची काही मतं चूक असतात. त्यात काही चूक मतं 'माझ्या मते' 'न जाऊ देण्याइतकी' चूक असतात. तिथे मी माझ्या पद्धतीनं हस्तक्षेप करतो. अर्थातच कधी कधी लोक चूक करणारा व्यक्ति आहे म्हणून त्यानं चूक केलेली नसताना त्यानं चूक केली आहे असं मानायला आणि म्हणायला लागतात. इथे जे माझ्या मते संभव ते सत्य असू शकतं, इतिहासकारांनी ते अ‍ॅक्च्यूअली आहे कि नाही ते सिद्ध करावे, मी फक्त सत्य असू शकतं असं मानण्याचं स्वातंत्र्य घेतो असं म्हणाले ते योग्य आहे नि कोणी ते चूक आहे म्हणायचा प्रश्न नव्हता. पण सवयीने लोक म्हणाले. त्याला कोणीतरी काउंटर केलं आणि यनांची बाजू मांडली. मी सहमत आहे म्हणालो. काय चुकलं? ======================= इथे स्वतःला लै झंड समजणारी अनेक नास्तिक मंडळी असणार जे मी काय लिहिलंय ते वाचत नसणार, त्यांना ते कळत नसणार, पण तरीही मधे मधे येऊन काहीतरी असंदर्भ, बेअक्कल, रसभंग करणारं लिहून जाणार. माझ्या प्रतिसादांना मिळणार्‍या उत्तरांचा दर्जा, कंटेंट आणि लॉजिक पाहून मंडळी माझी स्वाभाविक प्रतिमा बनवण्यातच वा माझ्या अकलेच्या मर्यादा मोजण्यातच अधिक उर्जा मोजतात हे स्पष्ट दिसतं. असं न करणारे खूप आहेत आणि मी त्यांना तितक्याच सन्मानाने उत्तर लिहितो. अनेक नास्तिकांचा उद्देश, अभ्यास, भाषाकौशल्य उच्च दर्जाचं आहे त्यांना मी वेगळी यार्डस्टीक लावतो. सामाजिक संवादामधे सहिष्णूता अनावश्यक आहे, परस्परसन्मान आवश्यक आहे. व्यत्यय मर्यादित ठेवण्यासाठी जागा दाखवून देणारे प्रतिसाद देणे आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
य
यनावाला Wed, 03/07/2018 - 09:35 नवीन
रामायणाविषयी- "दशरथ नावाचा राजा होता. त्याच्या तीन राण्या होत्या." "हो" "दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला." "हो" "यज्ञातून देव प्रकटला. त्याने पायसाचा कुंभ दशरथाच्या हाती दिला." "नाही. नाही." "कुंभातील पायस प्राशन केल्याने राण्यांना गर्भधारणा झाली." "नाही." "कौसल्येला एक, सुमित्रेला एक, कैकेयीला दोन असे चार पुत्र जन्मले." "होय."
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 03/07/2018 - 14:03 नवीन
असं हो नाही हो नाही करत अख्खं रामायण आणि महाभारत वाचून काढणं भयंकर अवघड आहे बाबा. ======================= आपण सुदाम्याची गोष्ट घेऊ. तो जितके दिवस कृष्णाकडे होता तितक्या दिवसात अख्खे शहर बांधून काढणे, ते ही द्वारका पाहिलेल्या सुदाम्याचे डोळे दिपवणारे, शक्य आहे का? "नाही." (साधा ताजमहाल बांधायला २२ वर्षे लागतात. तर पाहुणा घरी आला तर त्या चार दिवसांत गुपचुप त्याच्या घरात अधिकची एक खोली बांधणं देखील शक्य नाही. त्याचं नुसतं टेंडर बनवायलाच ३० दिवस लागतात.) मग तो मूर्ख सुदामा आणि त्याचे घरचे इतके कृतज्ञ कसे झाले त्या लबाड कृष्णाबद्दल कथेअंती? असं हो नाही हो नाही करत गेलं तर आपला एक वेगळाच सुदामायण बनतो. त्या कथेचा शेवटच बदलतो. ======================= एवढं १८ अध्यायी पाल्हाळ दोन व्यक्तिअ लावेपर्यंत कौरवांनी शत्रूसेनेला ठेवलं असेल का? "नाही." (अहो तुम्हाला ज्या काय गपाट्या करायच्या त्या आदल्या रात्री करा ना. एवढं लांबलचक कवन सांगत बसलात तर बाणाने काय दाटून आलेल्या लघवीनेच अर्धे सैनिक मूर्च्छित होतील.) मग याच्यानं तर महाभारताचाही निकाल, अर्थ बदलतो. ========================= जस्ट इमॅजिन करतोय, यनांना असे प्रश्न पडतात का? ते ते कसे सोडवतात? त्यांची नक्की काय काय झालं बद्दलची "सद्य" आयडीया काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Wed, 03/07/2018 - 18:29 नवीन
"यज्ञातून देव प्रकटला. त्याने पायसाचा कुंभ दशरथाच्या हाती दिला." "नाही. नाही."
इथे दोन नाही लिहिलेत. अन्यत्र एक. एक कल्पनाचित्र डोळ्यासमोर आलं. समजा खुद्द यनावाला तिथे असते नि चूकून माकून यज्ञातून देव प्रकट झालाच असता, तर यनांनी त्या कुंभाला एका फटकार्‍यानिशी जमीनीवर सांडला असता नि त्या देवाला डोके दाबून यज्ञवेदीत परत गाडून टाकला असता. मंडळी यनावालांच्या काल्पनिक सोबतीत, म्हणजे त्यांनाही तिथले पात्र बनवून, भारतीय महाकाव्ये नि पुराणे वाचणे एक अत्यंत मनोरंजक प्रकल्प असेल. आणि त्यांची सोबत सोप्पी असेल - जोपर्यंत यनावालांची नास्तिकी, वैज्ञानिक नि अश्रद्ध संमती मिळत नाही तोपर्यंत पात्रांनी दुसरं काहीतरी करायचं. ही एक भयंकर पोटेंट साहित्यिक थीम होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Wed, 03/07/2018 - 18:56 नवीन
https://www.facebook.com/dnyanesh.deshpande.96/posts/10216255001590890
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 03/07/2018 - 19:16 नवीन
मुसलमान किती क्रूर ... ठार करत होते .. ख्रिस्चन् किती क्रूर ... गुलाम बनवत होते. कम्युनिस्ट किती क्रूर ... छळ करत होते . .... ठारणे , गुलामगिरी , छळणे ... हे 'इथे' आस्तित्वातच नव्हते की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Wed, 03/07/2018 - 22:30 नवीन
नव्हतेच मुळी. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 03/08/2018 - 02:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे गुरुवार, 03/08/2018 - 05:31 नवीन
हि सेल्फी का पाठवली इथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/08/2018 - 09:27 नवीन
ठ्ठोsss =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 06:23 नवीन
प्रिय मंगू, परके आहेत, आपले नाहीत, आपल्यासारखे नाहीत म्हणून इथेही मारले गेले, नाही असं नाही. पण, ते असं काही.... १. भारताचं सेक्यूलरीकरण झाल्यावर हिंदूंनी पाककडे जाणारे मुस्लिम मारले. नि ते २-वे होतं. जे काय १० लाख मेले त्यात फक्त मुस्लिमच मेले असं नाही. २. भारतात स्वातंत्र्यानंतर आजवर ज्या दंगली झाल्यात त्यात नेहमीच ८०% ते ९०% मुस्लिमच मेलेले असतात. (भाजपच्या सत्तेत झाला म्हणून २००२ चा दंगा जास्त चर्चिला जातो. हे चर्चिणारे एकतर तर मूर्ख आहेत नैतर फ्रॉड आहेत.) याचं कारण काड्या करायची सवय. कट्टरता. सबल मेजॉरीटी समोर पंगा घेऊ नये याची जाण नसणे. पण तरीही एकूणात सामान्य मुस्लिमावर हिंदूंचं प्रेमच आहे. अगदी संघाचं देखील 'तकरार है पर प्यार है' असंच काहीतरी प्रकरण आहे असं वाटतं. ३. १९८४ चा दिल्लीचा दंगा हा हिंदूंनी केलेला नव्हता, तो काँग्रेस स्पाँसर्ड होता. पण ते काँग्रेसवाले हिंदू आहेत हे सत्य आहेत. ४. नक्षली सगळे जन्मतः हिंदू आहेत पण त्यांचं जेएनयूकरण, पुरोगामीकरण झाल्यामुळे ते दंगे करत असतात. ५. जगात झालेल्या संहारांच्या तुलनेत इथले संहार (म्हणजे हिंदूंनी केलेले) नगण्य आहेत नि अजिबात भीषण नाहीत. ============== थोडक्यात, स्वतःला फार अक्कल आहे असं समजून बाहेरचं उचलल्यानं इथे काही उचापती झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 06:51 नवीन
इथे ख्रिश्चनांना मधे ओढणे चूक आहे. ते बिचारे आपल्यासारखेच होते. ========================== १. जगात ज्या नालायकांनी क्रौयाचा धिंगाणा घातला ते फक्त जन्माने ख्रिश्चन होते. विचारसरणीने, जीवनपद्धतीने, धार्मिकतेने नव्हते. २. ज्याला आपण 'तुरळक अन्याय' म्हणू शकू असा दोन्ही कडे होता. आपल्याकडे सती नि त्यांच्याकडे विचहंट असे. आपण जसे तत्त्वज्ञानाची चर्चा करतो तसे ते पण करतो. उदा. नास्तिकांचे महामेरू डार्विन यांचा अभ्यास चर्च पुरस्कृत होता. तो चर्चच्याच विश्वाच्या शोधाचा भाग होता. तो मरेपर्यंत चर्चचा मेंबर होता. ३. जगात खरे हत्यारे नास्तिक, कम्यूनिस्ट, पुरोगामी, आधुनिक, विवेकी, वैज्ञानिक इ इ नावे स्वतःला लावणारे लोक होते. चर्च "या लोकांना मारायचं कशाला? आपण यांना ख्रिश्चन बनवू." असं म्हणे. नि हे म्हणत हे "शुद्ध मानव" नाहीत. यांचा जगावरचा भौतिक अधिकार आपल्यापेक्षा हिन प्रतीचा आहे. तेव्हा यांचा ताप नको, संसर्ग नको, संकर नको म्हणून यांना अख्खं संपवून टाकू. या विचारसरणीतून यांनी जी नृशंस कृत्यं केली ती अंगावर काटा आणतात. आजही तीच मानसिकता आहे, पण शोषणाचा तरीका त्यांनी नवा अडॉप्ट केलाय: सर्व पारंपारिक व्यवस्थांचं रिकाँफिगरेशन. ============================= व्यावहारिक प्रतलावर एके काळी मुस्लिम धर्म सुद्धा अत्यंत महान होता. तो प्रत्येक गोष्टीचं नालायल इंटरप्रिटेशन करणारांच्या हातात कसा गेला याचा इतिहास मला व्यक्तिशः माहित नाही. ===================================== नास्तिक म्हणजे बोक्यांच्या भांडणात लोणी वाटणार्‍या माकडांसारखे असतात. त्या बोक्यांच्या लोण्याच्या स्वामित्वाचा त्यांना प्रचंड अनादर असतो. त्या वादाचं पावित्र्य त्यांच्यालेखी तुच्छ असतं. म्हणून कधीही दोन धर्मांची तुलना करणार्‍या नास्तिकाचं म्हणणं ऐकू नये. त्याला त्याच्या धर्मरहित, ईश्वररहित जीवनाच्या एकूणतेच्या विचारांचं दर्शन द्यायला सांगावं. मग आपलं सांगावं. पण दोन धर्मांची तुलना ऐकू नये. दोन अनस्तित्वांची तुलना अर्थहीन संकल्पना आहे. ============================== ईथे युद्धे झाली, त्यात प्रचंड जिवितहानी होत असे. तरीही कलिंगचे युद्ध सोडले तर क्ष ठिकाणी य घराण्याचा उदय आणि नंतर काही शे काळाने अ ठिकाणी ब घराण्याचा उदय असाच भारतात इतिहास ग्रीक, इस्लाम, इंग्रज पूर्व काळात राहिला आहे. ===================== वरील माहीतीत अनेक त्रुटी असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जानु गुरुवार, 03/08/2018 - 06:30 नवीन
सारांश एकदम चपखल.
  • Log in or register to post comments
य
यनावाला गुरुवार, 03/08/2018 - 09:10 नवीन
धार्मिक युद्धे, धर्माधारित रक्तपात, धार्मिक अत्याचार *क्रुसेडस् : मुख्यत: ख्रिश्चन वि. मुस्लिम. अशी नऊ धर्मयुद्धे झाली. ती ११ व्या शतकापासून १४व्या शतकापर्यंत चालू होती. पहिले १०९५ते १०९९. यांत र्‍हाईन प्रदेशातील सहस्रावधी निरपराध ज्यूंची कत्तल झाली. ख्रिश्चनांचे हे पहिले मोठे धर्मकृत्य. या नऊ धर्मयुद्धांत लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले. *पवित्र धर्मस्थळातील धर्मयुद्धे: ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या तीन धर्मांचे पवित्र स्थळ असलेल्या जेरुसलेममध्ये प्रथम मूळ रहिवासी वि.ज्यू, नंतर ज्यू वि.रोमन, रोमन वि.ख्रिश्चन, ख्रिश्चन वि.मुस्लिम आणि आता मुस्लिम (अरब) वि.ज्यू असे विध्वंसक लढे हजारो वर्षे चालू आहेत. *दीड हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेला इस्लाम धर्म आज धार्मिकांच्या संख्ये अनुसार जागातील दुसर्‍या क्रमांकाचा धर्म आहे. त्यांनी तलवारीच्या आधारे जगभर धर्मप्रसार केला. लक्षावधी काफ़िरांना ठार मारले. तैमूरलंगाने १३९८ साली दिल्लीवर स्वारी करून एक लाख हिंदूंची मस्तके उडवली. * रामदेवराव यादव याची देवगिरी ही राजधानी. इ.स.१२९४ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले. या विषयी स्वा.सावरकरांनी लिहिले आहे, -- "अल्लाउद्दिन खिलजी अवघ्या पंधराहजार सैन्यानिशी कोट्यवधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिणेत, बकर्‍यांच्या कळपात लांडगा घुसावा तसा, घुसला. रामदेवराव यादवाच्या अफाट सेनेचा त्या यवनाने चक्काचूर उडवला. हिंदुरज्य बुडवले. परमशूर सेनापती शंकरदेवास जिते धरून अंगाचे कातडे सोलून ठार मारले."..देवगिरीचे दौलताबाद झाले. या विजयाने उन्मत्त झालेल्या यावनी सेनेने हिंदूंवर किती अनन्वित अत्याचार केले असतील याची आपण कल्पना करू शकतो. * ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक वि.प्रोटेस्टंट अशी अनेक युद्धे युरोपात झाली. फ्रान्समध्ये सर्वाधिक युद्धे झाली. त्यात लक्षावधी बळी गेले. * मुस्लिम धर्मातील शिया वि.सुन्नी या संघर्षात अनेकजण मृत्युमुखी पडले. अजूनही बॉम्बस्फोट होतच असतात. .... धार्मिक अत्याचार : * विधवाकेशवपन:- पतिनिधनानंतर स्त्रियांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनविण्याची हिंदुधर्मातील प्रथा. * सतीची चाल : पतीच्या चितेवर त्याच्या पत्नीला जिवंतपणी भाजून, जाळून मारण्याची हिंदुधर्मातील अत्यंत क्रूर रूढी. राजा राममोहन राय यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या सततच्या प्रयत्‍नांमुळे ग.ज.बेंटिंगने ही चाल कायद्याने बंद केली. धर्ममार्तंडांनी या सुधारणेला शेवटपर्यंत विरोध केला. * बालविवाह * चातुर्वर्ण्य समाजपद्धती : शूद्रांना अस्पृश्य ठरवून, हजारो वर्षे शिक्षण नाकारून अज्ञानात ठेवले. अत्यंत अपमानास्पद, दीनवाणे जीवन जगणे भाग पाडले. हिंदु धर्मावरचा हा सर्वात मोठा कलंक आहे. * देव-धर्माच्या नांवे पूजापाठ, एकादष्णी, लघुरुद्र, महारुद्र, होमहवन, अभिषेक,वास्तुशांती, अशी नाना कर्मकांडे, तसेच अंत्यसंस्कार विधी--दहावे, अकरावे, बारावे, असे अनेकानेक विधी करायला लावून त्यांतून श्रद्धाळू धार्मिकांची लुबाडणूक *ख्रिश्चन धर्मातील विचहंटिंग: अनेक (३५ ते ४० हजार) स्त्रियांना चेटकिणी ठरवून, त्यांचा छळ करून त्यांना जाळून ठार मारले. * धर्मगुरूंचा गिरिजाघरांतील (चर्चमधील) व्यभिचार, मुलांचे लैंगिक शोषण * मुस्लिम धर्मातील तलाक पद्धतीमुळे स्त्रियांवरील अन्याय अजूनही चालू आहे. देव-धर्माचा कोळसा उगाळावा तितका काळाच.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 10:36 नवीन
https://www.quora.com/Which-religion-is-responsible-for-the-greatest-number-of-deaths-of-infidels-over-its-entire-history ==================== यनावाला थेट माझ्या प्रतिसादाखाली का नसेना पण प्रतिसाद देऊ लागले आहेत. ======================== मी डकवलेल्या धाग्यात प्रश्न आहे - "कोणता धर्म सर्वाधिक जिवितहानीस कारणीभूत आहे?". त्याची १८ उत्तरं आलीत. लक्षात घ्या यना, प्रश्न असा नाही - "कोणती कारणे सर्वाधिक जिवितहानीस कारणीभूत आहेत?" तरीही सर्वत्र जे प्रातिनिधिक उत्तर आहे ते देत आहे
Atheism, by far! The Communist Regime—which was the world’s first atheist regime—led to between 85 million and 100 million deaths just in establishing itself across the USSR, China, Ethiopia and Yugoslavia. That makes any of the other numbers quoted here related to organised religion seem like peanuts. However, the most astonishing (and sickening) fact about deaths under Communist atheism was the short amount of time over which that killing occurred—mostly in its first 3 to 4 decades of its existence, within a given country. Thus, regardless of whether you believe Islam killed 2 million or 20 million (and either of those numbers are gross underestimates, given the 1500 year long Islamic Slave Trade and the Arab Conquest, neither of which kept records of the civilisations they annihilated), atheism is still the “winner” in terms of dishing out violent death—at least as far as we know. Moreover, atheist killing did not end with the fall of the Iron Curtain or the demise of Chinese Communism. The legacy of Communism, even in China, before WTO, led to child trafficking, abject poverty, women-trafficking and prostitution (which led to untold deaths), as well as abortions in all these countries. And, regardless of how you might feel politically about abortion, it is factual that abortion has negatively affected population growth throughout the former Iron Curtain—which makes abortion a material killer of the population, even to atheists and Pro-Choicers who might believe the unborn are not “lives”. Abortion rates in Russia, in particular, were astounding until Putin’s official support of reviving the Orthodox Church and (with Abramovich’s help) Orthodox Judaism—both of which have actively and successfully reduced abortion among Christian and Jewish Russians. Before this, for example, there were (see Wikipedia links): Around 5.6 million abortions (or about 5% of the population) in 1965 2.11 Million in 2001 (about 2 % of the population) 1.6 million in 2005 380,000 as of 2010 and now declining, but 380,000 was the world’s highest number and rate at the time And all these numbers are just in the last 50 years. Before that, Russia became the first European country to legalise abortion in 1920, and in that first year over 4.2 million abortions occurred, with many being forced. Those numbers remained around 3 to 4 million EACH year, with 1965 being the peak year. At an average of 3.5 million abortions a year, that comes to over 280 million deaths between 1920 and 2001, not including the 2 million of 2001! So, if you’re looking for a “religious” culprit to claim as history’s greatest ideological killer, look no further than the religion of non-belief!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 11:03 नवीन
अल्लाउद्दिन खिलजी अवघ्या पंधराहजार सैन्यानिशी कोट्यवधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिणेत, बकर्‍यांच्या कळपात लांडगा घुसावा तसा, घुसला. रामदेवराव यादवाच्या अफाट सेनेचा त्या यवनाने चक्काचूर उडवला. हिंदुरज्य बुडवले. परमशूर सेनापती शंकरदेवास जिते धरून अंगाचे कातडे सोलून ठार मारले.".
यना, खिलजी सर्व हिंदूंना मारून, धर्मांतरित करून नंतर अल्लाचा जप करत मशिदीत आयुष्य काढू लागला असं सावरकरांना अभिप्रेत होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला गुरुवार, 03/08/2018 - 09:47 नवीन
तात्त्विक आणि व्यावहारिक सत्य या संकल्पना समजण्यात कांही अडचण आली असावी असे दिसते. म्हणून अधिक स्पष्टीकरण:-- समजा "अ" म्हणाला की त्याच्यापाशी वीस लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. वरील "अ" चे विधान तत्त्वत: खरे मानता येते. कारण वैयक्तिक मालकीचा हिरा असतो हे आपण जाणतो. प्रत्यक्षत: "अ" च्या मालकीचा हिरा असो वा नसो. "अ" ला तो हिरा विकायचा असेल आणि "ब" ला घ्यायचा असेल तर "ब" त्या हिर्‍याविषयीच्या व्यावहारिक सत्याची सर्व चौकशी करील. आता समजा "क" म्हणाला की त्याच्यापाशी परीस आहे. तर ते विधान तत्त्वत:सुद्धा सत्य मनायचे नाही.(म्हणजे मानता येतच नाही.) कारण ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असा स्पर्शमणी अस्तित्वात असणे शक्य नाही हे आपण जाणतो. [कोणतेही विधान कुणाच्या चरित्र्य हननाविषयी असेल तर ते तत्त्वत: खरे असण्याची शक्यता असूनही पुराव्याविना सत्य मानायचे नाही.] कुठल्याही ग्रंथातील विधानांविषयी असेच आहे. जे खरे असण्याची शक्यता असेल ते तत्त्वत: सत्य मानायचे. विधान वाचल्यावर त्याचा अर्थ कळतो, त्याच क्षणी त्याची तात्त्विक सत्यासत्यताही समजते. त्यासाठी वेळ लागत नाही. ...यनावाला
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 03/08/2018 - 10:59 नवीन
आता समजा "क" म्हणाला की त्याच्यापाशी परीस आहे. तर ते विधान तत्त्वत:सुद्धा सत्य मनायचे नाही.(म्हणजे मानता येतच नाही.) कारण ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असा स्पर्शमणी अस्तित्वात असणे शक्य नाही हे आपण जाणतो.
न्युक्लिअर क्रियांनी दुसर्‍या द्रव्यांचं सोनं बनतं. तर क कडे अशी परीस नाव ठेवलेली मशिनरी नाहीच हे यनावालांना कसं माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/08/2018 - 15:10 नवीन
यनावाला, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. शीर्षकावरून तो धार्मिक युद्धे, रक्तपात व हिंसाचाराशी निगडीत असेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यातही हिंदू धर्माचं नाव आलेलं पाहून आश्चर्य वाटलं. मी हिंदू धर्मावरच्या आक्षेपांचं माझ्या परीने निराकरण करतो आहे. १.
* विधवाकेशवपन:- पतिनिधनानंतर स्त्रियांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनविण्याची हिंदुधर्मातील प्रथा.
ही हिंदू धर्मातली प्रथा नाही. ही केवळ ब्राह्मणांतली चालरीत होती. उच्चकुलीन विधवेवर अत्याचार करण्यासाठी मुस्लिमांना विशेष आनंद होई. केशवपनामुळे विधवा अनाकर्षक दिसावी इतकाच माफक हेतू होता. २.
* सतीची चाल : पतीच्या चितेवर त्याच्या पत्नीला जिवंतपणी भाजून, जाळून मारण्याची हिंदुधर्मातील अत्यंत क्रूर रूढी. राजा राममोहन राय यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या सततच्या प्रयत्‍नांमुळे ग.ज.बेंटिंगने ही चाल कायद्याने बंद केली. धर्ममार्तंडांनी या सुधारणेला शेवटपर्यंत विरोध केला.
बंगालमध्ये अठराव्या शतकात मृत नवऱ्याची मालमत्ता हडपता यावी म्हणून त्यांच्या विधवांना जाळून ठार मारण्यात येत असे. याचा सतीशी कसलाही संबंध नाही. महाराष्ट्रात फक्त उच्चवर्णीयांत ही चितागमनाची रीत होती. पेशव्यांनी ती इतर जातींत सुरू करायला स्पष्टपणे परवानगी नाकारली. ३.
* बालविवाह
आता बालविवाह कायद्याने बंद केले आहेत. यापूर्वी अनेक सुधारकांनी हे बंद व्हावेत म्हणून कार्य केलेलं आहे. ४.
* चातुर्वर्ण्य समाजपद्धती : शूद्रांना अस्पृश्य ठरवून, हजारो वर्षे शिक्षण नाकारून अज्ञानात ठेवले. अत्यंत अपमानास्पद, दीनवाणे जीवन जगणे भाग पाडले. हिंदु धर्मावरचा हा सर्वात मोठा कलंक आहे.
भारतात अस्पृश्यता इ.स. चौथा शतकानंतर सुरू झाली असं आंबेडकरांचं मत होतं. त्यामुळे तुमचा हजारो वर्षांचा युक्तिवाद शेकडो वर्षांवर आणायला हवा. आता प्रश्न आहे शिक्षणाचा. भारतात निरक्षर उत्पन्न झाले ते इंग्रजी काळांत. त्याचं खापर हिंदू धर्मावर फोडणे बरोबर नाही. इंग्रजांच्या अगोदर प्रत्येकाला क्षमतेनुसार शिक्षण मिळंत असे. इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण आणून कारकून तयार करायला सुरुवात केली. कारकुनी शिक्षणाचे निकष हिंदूंच्या पारंपरिक शिक्षणास लावणे अयोग्य आहे. ५.
* देव-धर्माच्या नांवे पूजापाठ, एकादष्णी, लघुरुद्र, महारुद्र, होमहवन, अभिषेक,वास्तुशांती, अशी नाना कर्मकांडे, तसेच अंत्यसंस्कार विधी--दहावे, अकरावे, बारावे, असे अनेकानेक विधी करायला लावून त्यांतून श्रद्धाळू धार्मिकांची लुबाडणूक
हे विधी ज्यांना करायचे असतात त्यांनी खुशाल करावेत. किंवा करवून घ्यावेत. तुम्ही त्याला लुबाडणूक कोणत्या आधारे म्हणता? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 03/08/2018 - 17:19 नवीन
एक विनंती आहे जमल्यास या विषयावर एक सविस्तर लेख लिहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Fri, 03/09/2018 - 06:23 नवीन
तुमच्या राजीव सान्यांच्या लिंका ऐकल्या. ==================================== तो म्हणतो गीतेमधे फ्लो नाही. म्हणून मी श्लोकांच्या फ्लॅश्कार्डस बनवले. एका थिमचे एकत्र ठेवले. नि मला दिसलं कि सगळं/बरंच विरुद्ध विरुद्ध, परस्पर विरुद्ध लिहिलंय. अर्थहिन. तथ्यहिन. ----------- ठिके. आता सान्यांनी ७ दिवसांत अरुण जोशी काय काय म्हणाले याचं संकलन केलं नि त्याचे असे फ्लॅशकार्ड्स बनवले तर काय होइल. सोमवारी सकाळी अजो म्हणाले - मी भयंकर भुकेजलो आहे. बुधवारी संध्याकाळी - मला अजिबात भूक नाही. म्हणून अरुण जोशीला अक्कल नाही. ========================================== सर्वाधिक सान्यांच्या शाणेपणाची किव करावी वाटली जेव्हा ते म्हणाले कि कृष्णानं थेट ज्ञानी माणसानं ज्ञान आपल्याजवळ ठेवावं, ते सांगू नये नि सामान्यांसोबत सामान्यांसारखं वागावं असं लिहिलंय ते अत्यंत हिणकस आहे. सान्यांसारख्या नास्तिकाचा सर्वात पहिला पूर्वग्रहदोष मंजे सर्वांत स्वार्थ पाहणे. अरे बाबा, कृष्णाचा नि ज्ञानी माणसाचा काय संबंध? कृष्णाला ज्ञानी माणसाच्या व्यक्तिगत स्वार्थाचं का पडलं असावं? स्वार्थी कृष्ण आणि स्वार्थी ज्ञानी अशी युती आहे असं समजून सान्यांचा अर्थ का ऐकावा? तुम्ही सगळे नास्तिक ज्ञानाची खैरात वाटतच आहात नं केव्हापासून? कुठं पोचला आहात? किती लोकांना 'विज्ञानानं उघड केलेलं' आणि यनांचे मते ' सुस्पष्ट दिसत असलेलं' सत्य दिसत आहे? आता नास्तिकांच्या नास्तिकांत पहा. किती पंथ निर्मिले इतक्यात? असं जरी मानलं कि "ईश्वर नाही" यात तुम्हा सर्वांची एकवाक्यता आहे तरी समाज कसा याबद्दल काहीतरी एकमत? कुठे स्टॅलिनसारखा क्रूरकर्मा ते दाभोळकरांसारखे ध्येयप्रेरित सहिष्णू सज्जन! प्रत्येकानं काय 'नास्तिकी दार्शनिक' असावं कि काय? थोरांनी घालून दिसलेल्या फ्रेमवर्कवरच लहानांनी आपापला अल्पसा विवेक लावायचा असतो. ज्ञानी लोक जे काय जगत्कारणाचं समग्र चिंतन करतात ते काय शेतकर्‍यानं शेतात जाता जाता करावं कि काय? ====================================== जगातली प्रत्येकच गोष्ट ही स्वार्थनिहित असते हे नास्तिकी दृष्टीकोणाचं गमक आहे. जे नास्तिकी नाही तेच काय जे नास्तिकी आहे ते देखील केवळ स्वार्थप्रेरित असतं हीच जर अर्थनिर्णयनाची पद्धत असेल तर कृष्णच काय त्याचा बाप देखील हिणकसच वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पुंबा Fri, 03/09/2018 - 08:21 नवीन
साने नास्तिक आहेत हे कुणी सांगितले तुम्हाला? की बळंच आपलं बडबडण्याच्या ओघात कुणालाही काय वाट्टेल ते अ‍ॅट्रिब्युट करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 03/09/2018 - 11:37 नवीन
साने (आणि शाणे) नास्तिक आहेत हे मला माहित आहेच. त्यांचे लै चहेते ऐसी अक्षरे वर आहेत आणि मधून मधून सानेगूटी तिथे उगळत असतात. ती वाचायचा मला २०११ पासूनचा अनुभव आहे. =========================== साने नास्तिकांचेही एक अडव्हान्स्ड वर्जन आहे - असम्यकतावादी (मंजे सारा निसर्ग, सारे ब्रह्मांड, सारे अस्तित्व बेबंद आहे असं मानणारे लोक) - हे देखील माहीत आहे. या ब्रह्मांडात स्वतः साने सोडून दुसरं काही सम्यक नाही असं त्यांचं मत आहे/निघतं. ======================== नास्तिक असूनही ते भाजपेयी/ उजवे आहेत तेव्हा त्यांना टार्गेट करू नये असं मानणारे ढोंगी अस्तिक देखील जालावर आहेत. =================== बघा, मला कित्ती काही माहीत आहे त्यांच्याबद्दल!!!! (हा हा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Fri, 03/09/2018 - 13:51 नवीन
ते इहवादी आत्मविद्या वादी आहेत असे मी त्यांना विचारले असता सांगितले. एखाद्याला विशिष्ट कळपातला स्वत:च ठरवून निव्वळ मारझोड करायची असेल केवळ तर चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा