Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुकटात विनासायास वेटलॉस

श
शाम भागवत
Tue, 07/03/2018 - 09:09
🗣 313 प्रतिसाद
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

प्रतिक्रिया द्या
162643 वाचन

💬 प्रतिसाद (313)
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 19:50 नवीन
सुरक्षीततेला नेहमीच प्रथम प्राधान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ए
एकुलता एक डॉन Tue, 07/03/2018 - 23:22 नवीन
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. he 2001 la hote ,mi swatha attend kele hote
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 15:45 नवीन
खूप खूप धन्यवाद. १९९७ नंतर कधीतरी एवढेच लक्षात होते. शशिकांत सुतार त्यावेळेस फॉर्मॉत होते. कदाचित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अस काहीस आठवत होत. त्यामुळे पुण्यातला कार्यक्रम केव्हा झाला ते शोधून काढून मग एक वाक्य मधे घुसडायचेही ठरवले होते. पण ते सगळ राहूनच गेले. त्यामुळे जिचकारांचा कार्यक्रम १९९७ साली तो कार्यक्रम झाला असा अर्थ निघतोय खरा. प्रत्यक्षात १९९७ साली प्रथम नागपूरला याची सुरवात झाली. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पण हा विचार पुण्यात पोहोचायला ४ वर्षे लागली. अस ते वाक्य पाहिजे होते. असो. त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 07/04/2018 - 19:35 नवीन
teva khup gardi hoti baher tv lavla hota balgandarachya mala baher ubhe rahun bagahva laglahota
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
श्वेता२४ Wed, 07/04/2018 - 08:17 नवीन
अशा माहितीची आवश्यकताच होती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/04/2018 - 10:04 नवीन
हा उपाय केल्याने १५ किलोने कुणाचे वजन कमी झाले तर त्यांनी आपले अनुभव जरूर येथे लिहा. ( बहुसंख्य लोक हे दुसऱ्याची उदाहरणे देताना आढळतात स्वानुभव फार कमी) वैयक्तित रित्या मुळात मी न्याहारी केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. त्यामुळे केवळ दोनच जेवणे घेणे हे मला स्वतःला जमण्यासारखे नाही. मला दोन जेवणांच्या मध्ये काहीच न खाणे अजिबात जमणार नाही. मला सतत काहीतरी खात राहायला अतिशय आवडते. त्यामुळे याचा स्वानुभव असणारे( दोन वेळा जेवणारे नव्हे तर १५ किलो किंवा अधिक वजन कमी केलेले) कुणी असेल तर त्याचा अभ्यास, निरीक्षण आणि विश्लेषण करायला मला आवडेल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 10:36 नवीन
खर आहे तुमचे म्हणणे. तुम्ही प्रामाणिक चिकित्सक आहात. त्या अर्थाने पण तुम्ही तुमच्या आडनावाला जागत असता. त्यातून वैद्यकीय क्षेत्रातले असल्यामुळे तुम्हाला असा माणूस भेटावा अशी माझी मनापासून खूप इच्छा आहे. तुम्हाला जर डॉ. दिक्षीतांचे विचार पटल्याचे कळले तर मिसळपाववरील लोकांना खूपच हायस वाटेल हे नक्की. तुमच्यावर खूप जणांचा विश्वास आहे. माझा सुध्दा. त्यांच्या फेसबुक पेजवर बरीच उदाहरणे सापडतात. फोन नंबरही दिलेले असतात. यांच्यापैकी कोणी मिसळपावर आल तर किती बहार येईल. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 10:49 नवीन
माझ्या बायकोच्या एका चेपु ग्रुप वर आहेत टेस्टिमोनिअल्स डायबेटिस गेल्याचे. ( HbA1c) माझ्या शेजारी एकाचे १० किलो कमी झाले आहे २ महिन्यात. त्याच्या बायकोची थायरोईड १६ चि ६ झाली. माझे झाले की सांगतो. आधी ३ महिने जाऊ देत. वाखु साठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 11:24 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गवि Wed, 07/04/2018 - 10:26 नवीन
अनेकदा उद्देश चांगला असूनही कोणत्याही लहान सहान शंकेवरसुद्धा एकवाक्यी खुलासाही न देता किंवा पूर्ण स्पष्टीकरण न देता फक्त टीजर देऊन त्याऐवजी सगळा रोख केवळ "ते भाषण एकदा ऐका, ते भाषण पूर्ण ऐका", "अमुक इतकेच तास /मिनीटं तर द्यायची आहेत चांगल्या आरोग्यासाठी"..... असा सर्वांना एका टारगेटकडे रिडायरेकट् करण्याचा दिसला की प्रचारकी भास व्हायला लागतात. इतर काही उदाहरणं: "एकदा आमचे शिबिर अटेंड करा" "एकदा आमच्या सेमिनारला या" "एकदा त्यांची सीडी / डीव्हीडी पहा" "सत्संगाला उपस्थित राहा" त्याशिवाय (म्हणजे दोन तास किंवा चार तास वेळ काढून ते एकदाचं पूर्ण ऐकेपर्यंत, किंवा सेमिनार, शिबीर इत्यादी यात आधी वेळ गुंतवल्याखेरीज) फार काही प्रश्न चर्चा नको. उत्तर एकच, "एकदा ते पूर्णपणे करा / अटेंड करा/ ऐका / उपस्थित राहा" तिथेच सगळी उत्तरं मिळतील, काहीच शंका उरणार नाही. निरामय दीर्घआयुष्याची गुरुकिल्ली. हा अप्रोच टाळला तर नवा विचार प्रसृत करण्याचा उद्देश आणखी जास्त चांगला परिणामकारक होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 10:45 नवीन
ह्म्म.. असा समज होऊ शकतो खरा. पण मूळ भाषण प्रचारकी नाहीये. म्हणजे मूळ भाषणात अभिनिवेशच नाहीये. मी मोठा मी मोठा वगैरे पण नाहीये. (माझ्या अस्ले लोक जाम डोक्यात जातात, पण मी हे भाषण शेवटपर्यंत आवडीने ऐकलय) खरच छान व्याख्यान आहे ते. जरूर ऐका. बाकी भक्त वात आणतात यात नवल ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/04/2018 - 10:53 नवीन
म्हणूनच तर अशी शंका येऊ देऊ नये. उलट अनेक लोक इतका वेळ सलग ऐकण्याचा कंटाळा करताहेत असं निरीक्षण (किंवा कंटाळा करू शकतील अशी अटकळ) असेल, पण विचार प्रसृत व्हावा अशी इच्छा असेल तर त्यातले मुद्दे लेखरूपात / संक्षिप्त करून / प्रश्नोत्तरे रुपात असे रूपांतरित करून दाखवण्याने लोक अधिक आकर्षित होतील. मग खरंच अनेकजण मूळ सोर्स आपणहून ऐकतीलही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 11:20 नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे. या पध्दतीने जाळ्यात ओढण्याच्या आणि पैसे कमावण्याचे प्रयोग फार चालतात हे मान्य. त्यामुळे कोणी असे करू लागला की शंका येणे अजिबात चुकीचे वाटत नाही. मुळात माझे वजन योग्य असून पोट वगैरे अजिबात सुटलेले नाही. रक्तदाब किंवा मधुमेह वगैरे काही नाही. त्यामुळे या कुढल्या हेतूने मी याची सुरवात केलेली नाही. मला डॉ. दिक्षीतांचे विचार कळले आहेत. पटले आहेत. म्हणून मी जिवनशैली म्हणून याचा स्विकार केलेला आहे. तरीपण मी या क्षेत्रातला तज्ञ नाही याचे मला भान आहे. अन्यथा मीच इथे सविस्तर लेखन केले असते. डॉ. दिक्षित व डॉ. जिचकार यांचे व्याख्यानाबद्दल उत्सुकता वाटावी ह्या मूळ हेतूनेच मी हा लेख लिहिला आहे. मला असे सारखे वाटते की, माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या तोंडून काहीतरी ऐकण्यापेक्षा त्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसाच्या मुखातून लोकांनी सगळे ऐकावे. यासाठी ही धडपड मी करत आहे. यात माझा कोणताही स्वार्थ नाही. मात्र एक मिपा कुटुंबातला सदस्य या नात्याने मी एक खात्री नक्की देतो. या मधे डॉ. दिक्षीतांचा एक नया पैशाचाही फायदा नाही. उलट डॉ. दिक्षीत व्याख्यानातच हे स्पष्ट करतात की मी तुम्हाला सगळ सांगितलेले आहे. आता मला पुन्हा भेटू नका. माझा कुठेही दवाखाना नाही. मी प्रॅक्टिस करत नाही. मी अध्यापक व प्रामाणिक संशोधक वृत्तीचा माणूस आहे. मला तुमच्या कडून एक पैसाही नको. तरीपण एखादी शंका आली तर त्याचे निराकरण कसे करायचे हा प्रश्न उरतोच. यासाठी ते सांगतात की, काही अडचण असेल तर तुम्हाला काही डॉक्टरांचे फोन नंबर देतो. पण त्यांना फोन करू नका. त्यांना व्हॉटअ‍ॅपवर कळवा. ते तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतील. पण हे लक्षात ठेवा की हे डॉक्टर त्यांचा व्यवसाय सांभाळून या अभियानात विनामुल्य सेवा देत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या सवडीने उत्तर देतील. लागलीच उत्तराची अपेक्षा करू नका. तरीही २४ तासांच्या आत तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. तुमच्या शंकेला जेवढे खुलासेवार उत्तर देता येईल तेवढे दिले आहे. याउप्पर ती भाषणे ऐकायची की नाही याबाबत निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात. माझ्या या उत्तरामुळे तुमची शंका फिटली नसेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. कारण आता याबाबत सांगण्यासारखे माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. असो. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/04/2018 - 11:22 नवीन
सविस्तर प्रतिसाद देऊन शंका क्लियर केल्याबद्दल धन्यवाद. वेळ मिळाल्यावर नक्की ऐकले जाईल. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 11:26 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मराठी कथालेखक Wed, 07/04/2018 - 12:07 नवीन
दीक्षीतांचे भाषण मी अजून ऐकलेले नाही (लवकरच ऐकण्याचा प्रयत्न करेन) तसेच मी या विषयातला तज्ञ नाही, पण वर पिरा , आनन्दा यांचे प्रतिसाद वाचत असताना मला माझ्या तर्काच्या आधारावर सुचलेले लिहावेसे वाटत आहे. मला वाटते की ज्या व्यक्तीचे वजन जवळपास योग्य प्रमाणात आहे , रोजच्या आहारातून मिळणारे उष्मांक आणि व्यय होणारे उष्मांक यांत समतोल आहे त्यांच्याकरिता दिवेकरांची आहारशैली जास्त योग्य ठरेल. तर ज्यांच्याकडे चरबीचा अतिरिक्त साठा आहे त्यांच्याकरिता दीक्षीतांची आहारशैली आणि जीवनशैली उपयोगी पडेल. कारण चार पाच वेळा खायचं म्हंटलं तरी प्रत्येक वेळा माणसाचा कल त्यावेळची भूक पुर्णतः भागवण्याकडे असेल. आता शरीराला सवयच लागली की आपल्याला (रक्ताला) साखर हवी असेल वा शरीराला उष्मांक हवे असतील तर 'भूक लागली' मागणी नोंदवायची आणि अशी मागणी नोंदवली की लवकरच ती पुर्ण केली जाते आणि हवी तितकी साखर/उष्मांक (खरे तर जास्तच) सहज मिळतात तर शरीर चरबीतून साखर/उष्मांक विरघळत बसण्याचे कष्ट घेणार नाही. इथे मला ऑपरेशन्स मॅनेजमेंट मधली जस्ट इन टाईम या संकल्पनेशी तुलना करायला आवडेल. जस्ट इन टाईम संकल्पनेत कोणताही साठा (इंन्वेंटरी) हि जवळपास शून्य असते , सध्या फक्त कच्च्या मालाच्या साठ्याचा विचार करु. तर या कच्या मालाचा पुरवठादार (वेंडर) कारखान्याच्या जवळपासच असतो आणि तो दिवसातून अनेक वेळा कच्च्या मालाचा लागेल तसा पुरवठा करतो. त्याच्याकडे ही मागणी दिवसातून अनेकदा नोंदवली जाते. साधारणपणे एका दिवसाची वा पाळीची निकड आणि झालेला पुरवठा शक्यतो समानच असतो. पण आधीच कच्च्या मालाचा प्रचंड साठा असलेल्या कारखान्याने जस्ट इन टाईम राबवले तर आधीचा साठा तसाच पडून राहील आणि कारखान्यातील शॉप , स्टोअर ई मधील लोकांची मानसिकता /कामाची पद्धत बदलली नसेल तर कदाचित हा साठा अजूनच वाढत जाईल म्हणजे असे की "काल अमूकतमूक भाग ११०० लागलेत पण आपण पुरवठादाराकडून फक्त १००० च मागवले होते... एक काम करु ... थोडे जास्त मागवत जावू नाही तर ऐनवेळी पंचाईत होईल" मग या मानसिकतेतून दिवसाची/पाळीची जितकी निकड आहे त्यापेक्षा जास्त भाग मागवण्याची सवय पडते आणि आधीचा साठा (इंन्वेटरी) वाढतच राहते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 12:54 नवीन
मस्त सांगितलेत.. दीक्षितांच्या पद्धतीमध्ये वजन कमी होत जाइल तसेतसे हळूहळू तुम्हाला लागणारे उष्मांक आणि जेवणातून मिळणारे उष्मांक समान होत असावेत. तसेही आपले सामान्य जेवण १००० उष्मांकांच्या वर जात नसावे, त्यामुळे २ वेळा म्हणजे अगदी २०००, तेव्हढे सामान्य माणसाला लागतातच. असो. मी तज्ज्ञ नाही यातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 07/04/2018 - 14:57 नवीन
दीक्षितांच्या पद्धतीमध्ये वजन कमी होत जाइल तसेतसे हळूहळू तुम्हाला लागणारे उष्मांक आणि जेवणातून मिळणारे उष्मांक समान होत असावेत.
जेवणातून मिळणार्‍या उष्मांकापेक्षा खर्च होणारे उष्मांक काहीसे जास्त असावेत (जेणेकरुन चरबी जळावी) याकरिता तो ४५ मिनटांचा व्यायाम सांगितला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
P
palambar Wed, 07/04/2018 - 16:00 नवीन
युट्युब वर ज्या लोकांनि वजन कमि केले त्यांच्या गोष्टि आहेत. मि त्यांना मा़झे अहवाल( साखरेचे ) पाठ्वले , त्यांनि मला त्यांच्या गटात अ‍ॅड केले, त्यावर अनेक श्ंका विचारता येतात, ज्यांना फायदा झाला ते डिटेल्स् टाकतात.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 11:16 नवीन
व्वा. छान. शुभं भवतु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
स
सुबोध खरे Wed, 07/04/2018 - 16:09 नवीन
डॉ दीक्षितांचे भाषण मी संपूर्ण ऐकले होते. त्यांचे काही विचार मला पटले नाहीत पण तो वैद्यकीय शास्त्राचा भाग आहे. उदा. इन्स्युलिन सायकल ५५ मिनिटांचें आहे. आम्ही शिकलेल्या पुस्तकात याचा कुठे उल्लेख आलेला नाही . हे बहुधा अद्ययावत ज्ञान असावे.( कारण मी वाचलेले नाही आणि मी मधुमेह तज्ज्ञ किंवा लठ्ठपणावर उपचार करणारा डॉक्टर नाही) याबद्दल माझे वाचन चालू आहे. याच्या बाजूने किंवा विरुद्ध काही आढळले तर त्यावर अधिक वाचन केल्याशिवाय काही टिप्पणी करणे चूक ठरेल. डॉक्टर दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे दोन वेळेस खाणे आणि ४५ मिनिटे व्यायाम करणे हि गोष्ट आरोग्यकारक आहे याबद्दल मला अजिबात शंका नाही. परंतु एका वेळेस घरचे जेवण असेल तर लोक २००० कॅलरी खातात पण तेच पार्टी असेल तर एका बैठकीत ५००० कॅलरीज खातात. उदा. रमजानच्या रोजा नंतर बरेच लोक चार ते साडे चार हजार कॅलरीज खाताना आढळले. ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला काहीच म्हणायचे नाही कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या आज बरोबर उलटे त्या सांगत असतात. शेवटी एक गोष्ट वस्तुस्थिती आहे कि E =MC वर्ग. यात ऊर्जा आणि वस्तुमान हे सम प्रमाणात आहेत म्हणजेच एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ (किलो) कॅलरी तुम्ही ४५० कॅलरी जाळल्या तर ५० ग्राम ने वजन कमी होईल आणि ४५० कॅलरी जास्त खाल्ल्या तर वजन ५० ग्राम ने वाढेल असा हिशेब आहे. ज्यांना दोनच वेळेस जेवणे आणि मध्ये काही न खाणे अधिक ४५ मिनिटे व्यायाम करणे शक्य आहे त्यांचे वजन कमी नक्कीच होईल. (मला हे शक्य नाही त्यामुळे मी मधून मधून खात राहतो परंतु माझे खाणे प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही एवढी काळजी मी घेत आलो आहे. पण दोन वेळ च्या जेवणात तुम्ही सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर डॉ दीक्षितांना खोटे पाडाल यातही शंका नाही. असे खाणे मी १९९० मध्ये केल्याने ८ महिन्यात माझे वजन ९ किलोने वाढले होते ५६ किलोचे ६५ किलो झाले यानंतर मी थांबलो त्यामुळे गेल्या २८ वर्षात माझे वजन ३ किलोने वाढले आहे. आता ६८ किलो आहे. उंची ५ फूट १० इंच.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 07/04/2018 - 16:19 नवीन
ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला काहीच म्हणायचे नाही कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या आज बरोबर उलटे त्या सांगत असतात. ह्याबद्दल अजून लिहाल का? कारण मी जितकी पुस्तकं वाचली आहेत तिची त्यात मला असं काही वाटलं नाही. पण अर्थात तुमच्या एवढा खोलात विचार केला नसेल. मी तिची बरीच मोठी फॅन आहे, म्हणून उत्सुकता वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 07/04/2018 - 17:07 नवीन
एके काळी त्यांनी लिहिले होते तूप खाऊन नका आता म्हणतात रोज भरपूर तूप खा. बाकी आता फारसं काही आठवत नाही आणि त्यांचं पुस्तक परत वाचण्याची सध्या तरी इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 07/04/2018 - 17:53 नवीन
तूप खाऊ नका असं लिहिलेलं आठवत नाही. तिची सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे. पहिल्या पासून ती तूप खा असंच म्हणतेय. असो... सध्या खा म्हणतेय. आणि त्याहून मोठा काही आक्षेप नाही ना.. मग ओके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 06:14 नवीन
पहिल्याच पुस्तकात( जे माझ्या बायकोने भक्तिभावाने विकत आणले होते) त्यांनी इतके अतिशयोक्त आणि अशास्त्रीय दावे केले होते कि पुढची पुस्तके वाचण्याची इच्छाच राहिली नाही आणि आता त्यात काय दावे केले आहेत ते आठवत नाहीत आणि ते खोडून काढण्यासाठी परत वाचावे अशी फारशी इच्छा होत नाहीये. त्यामुळे त्यावर माझा पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 07/06/2018 - 21:31 नवीन
किंवा इन जनरल भारतीय आहार संस्कृतीत बसणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत दिवेकर बाई नेहमीच पॉझिटीव्ह राहिल्यात असेच त्यान्च्या ब्लॉग अन पुस्तकांमधुन आढळले आहे. अर्थात त्याविषयी त्यांनी काही लिहीलंय तर मला ठाउक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 17:40 नवीन
"पण दोन वेळ च्या जेवणात तुम्ही सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर डॉ दीक्षितांना खोटे पाडाल यातही शंका नाही" हे एकदम पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 19:27 नवीन
बाकी ठीक आहे, एक अनुभवाचा भाग सांगतो.. 12तास उपास झाला की 4 पोळ्या पण जात नाहीत. मी 2 नाश्ता 2 जेवणे आणि बरेच चहा यावरून 2 जेवणे यावर आल्यावर मला हे जाणवले की पूर्वी मी 4 पोळ्या आणि थोडासा भात सहज खायचो, आता मला 3 प्लॉय खाल्या की पॉट भरते.. अर्थात हा सार्वत्रिक अनुभव आहे, उपाशी पोटी तितके जेवण जात नाही, त्यासाठी तुम्ही पट्टीचे जेवणार असायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 06:12 नवीन
याचे कारण आपण वजन कमी करायचं आहे हा तुमच्या अंतर्मनाने निश्चय केला आहे म्हणून. हा निश्चय "सर्वात महत्त्वाचा" आहे अन्यथा बहुसंख्य लोक कोणताही आहार / उपचार घेताना "करून तर बघू" अशा साशंक मनाने करतात. शिवाय सहा दिवस मी "डाएट" करतोय आता एक दिवस मला मनसोक्त खाऊ दे या विचाराने तेन्व्हा दाबून खातात म्हणून वजन कमी होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 11:10 नवीन
तुम्ही अंतर्मना मनाबद्दल बोलताय म्हणून हे लिहितोय. अन्यथा याला पूरक असे कोणतेही विज्ञान मला माहित नाही. आणि म्हणून मी कदाचीत याबाबत काही लिहिलेही नसते. पण याच बरोबर हेही स्पष्ट करतो की, याचा अर्थ मी मानसशास्त्रातला तज्ञ आहे असा नसून माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारीत हे लिहित आहे असा घ्यावा. या बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे आहे. पोट भरल्याची संवेदना नेहमीच येते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व नंतर नंतर ती संवेदना बोथट होऊन जाते. यालाच जिभेसाठी खाणे असे म्हणतात. जेव्हा फक्त दोनदाच जेवायला सुरवात होते तेव्हा संपूर्ण पचनसंस्थेलाच विश्रांती मिळायला लागते आणि उर्जा वाचायला लागते. माझ्या मते या विश्रांतीच्या काळात झीज भरून काढणे या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त, जे काही चुकताय ते दुरूस्त करणे, एकूणच पचनसंस्थेतील त्रुटी भरून काढणे यासाठी वाचलेली उर्जा वापरली जाते. यातच पोट भरल्याची संवेदनापण खूप तिव्र होते. दोन जेवणाच्या मधे काही न खाणे हे जिभेवर नियंत्रण ठेवण्याचीच सुरवात आहे. म्हणजेच हा प्रवास जिभेसाठी खाण्याकडून, पोटासाठी किंवा भूकेसाठी खाण्याकडे होत असतो. त्यामुळे ही तिव्र संवेदना आणखीनच जास्त जाणवायला लागते. एक दोन वर्षाचे मूल जसे पोट भरल्यावर एक घास सुध्दा खायला नकार देते त्या स्थितीला आपण हळू हळू येत जातो असे मला वाटते. अपवाद फक्त एकाच गोष्टीचा. ज्यावेळेस जेवणात आपल्याला आवडता पदार्थ केला असेल तर थोडेसे जास्त खाल्ले जाते पण पोटाला तडस लागेल इतके नक्कीच खाल्ले जात नाही. आता मात्र बास बॉ असे काहीतरी वाटून आपण थांबतो. यालाच भूक भागण्यासाठी खाणे, किंवा थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे असेही म्हणता येईल. किंवा डॉ. दिक्षीत यांच्या शब्दात अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा. मी अगोदरच हे स्पष्ट केले आहे की वजन कमी करण्यासाठी मी ही जिवनशैली स्विकारलेली नाही. डॉ. दिक्षितांच्या पध्दतीनुसार माझ्या उंचीप्रमाणे माझे वजन सत्तर किलो पेक्षा जास्त नसले पाहिजे. आणी माझे वजन हे एकसष्ठ ते बासष्ठ या दरमान असते तरीही श्री. आनन्दा यांच्यासारखाच अनुभव मलाही येतो आहे. त्यामुळे वजन कमी करायचा अंतर्मनाचा निश्चय एवढे एकच कारण असेल काय? याबाबत शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 16:30 नवीन
पोट भरल्याची संवेदना नेहमीच येते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व नंतर नंतर ती संवेदना बोथट होऊन जाते. यालाच जिभेसाठी खाणे असे म्हणतात. १०० % बरोबर डॉ अभय बंग यांनी हेच लिहिले आहे. आपले शरीर आपल्याला सूचना देत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करायला "शिकतो" दोन जेवणाच्या मधे काही न खाणे हे जिभेवर नियंत्रण ठेवण्याचीच सुरवात आहे. अगदी बरोबर. यालाच भूक भागण्यासाठी खाणे, किंवा थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे असेही म्हणता येईल. किंवा डॉ. दिक्षीत यांच्या शब्दात अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा. अगदी बरोबर. आयुर्वेदात आपल्या भुकेच्या तीन चतुर्थांश खा म्हणून लिहिलेले आहे. आपण मात्र चार तृतीयांश खातो. त्यामुळे वजन कमी करायचा अंतर्मनाचा निश्चय एवढे एकच कारण असेल काय. माझे बाकी सर्व उत्तम आहे पण दोन जेवणाच्या मध्ये काहीच खायचे नाही हेच तर मला जमत नाहीये म्हणूनच म्हणतोय. मला मधुमेह नाही माझे वजन आदर्श वजनाच्या पेक्षा आयुष्यभर कमीच राहिले आहे. पचनाची किंवा कोणत्याही अवयवाची हृदयाची रक्तदाबाची तक्रार नाही. पण मनोनिग्रह होत नाहीये. म्हणून तर तुमच्या सारख्या लोकांना सलाम आहे. --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 16:40 नवीन
तुम्ही जिचकारांचा ऑडिओ ऐकला आहे का? पेशींचे विभाजन व त्यावर किती वर्षे आपण जगू याच संबंध. आणि त्याचा संबंध त्यांनी आपण किती वेळा खातो त्याच्याशी जोडलाय. जो कमी वेळा खातो तो जास्त जगतो असे काहीसे लॉजिक आहेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 17:13 नवीन
नाही पण मिताहार घेतल्याने आयुर्मर्यादा वाढते असे बरेच संशोधन लेख आहेत. सर्वात ताजा खालील प्रमाणे https://www.newscientist.com/article/2164602-calorie-restriction-may-extend-lifespan-by-changing-your-sleep/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 17:56 नवीन
मग मात्र मिताहारवाले तज्ञ श्रेष्ठ का डॉ. जिचकार/डॉ. दिक्षीत, हे ठरविण्यासाठी तुम्हाला डॉ. दिक्षीतांची पंच्चावन्न मिनिटांची इन्शूलिनची सायकल बाबत नक्की मत बनवायला लागेल. जर ती सायकल खरी असेल तर चार पाच वेळा मिताहार ही थिअरी धोक्याची वाटते. जर ती सायकलची कल्पना बरोबर नसेल तर दिक्षितांचे सगळ व्याक्यानच बाद करायला लागेल. मग प्रश्न उरेल की दोन वेळा भूक भागेस्तोवर काहीही खाल्ल तरी यश कशामुळे मिळतेय. थोडक्यात पंच्चावन्न मिनिटांची सायकल हा कळीचा मुद्दा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/05/2018 - 08:36 नवीन
बाकी सगळं ठीक आहे पण E =MC वर्ग चा संदर्भ अप्रस्तुत वाटतो. आपले शरीर वस्तूमानाला उर्जेत रुपांतरीत करीत नाही (थोडक्यात अण्विक उर्जेवर) चालत नाही. पण तरीही
ऊर्जा आणि वस्तुमान हे सम प्रमाणात आहेत
हे मान्य. पण काय जळते त्यावर किती उर्जा निर्माण होणार हे ठरते. उर्जा = वस्तूमान x विशिष्ट उष्मा (की उष्मांक) पण प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उष्मा भिन्न असल्याने १०० ग्रॅम कोळसा जळून मिळणारी उर्जा व १०० ग्रॅम पेट्रोल जळून निर्माण होणारी उर्जा यात तफावत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गवि गुरुवार, 07/05/2018 - 08:51 नवीन
E =MC वर्ग चा संदर्भ
होय. हे सूत्र वस्तुमान खरोखरच "नष्ट" होणाऱ्या प्रक्रियांना लागू आहे. या प्रक्रिया सबअटॉमीक लेव्हलवरच्या आहेत आणि यात ऊर्जा फारच मोठया प्रमाणात निर्माण होते. इथे वस्तुमान नष्ट होऊन ऊर्जा निर्माण होते. तेव्हा हे गुणोत्तर उलट बाजूने लावल्यास सात जन्म सतत पळत राहून जेवढी ऊर्जा निर्माण होईल तितक्याने शरीरातले काही अणुसुद्धा कमी होणार नाहीत. तेव्हा त्या अर्थाने e = mc वर्ग हे अप्रस्तुत, पण.. डॉक्टरांचा मुद्दा पूर्ण योग्य. फक्त फॉर्म्युला बदलला की झालं. आणि मुख्य मुद्दा फॉर्म्युला नसून ठराविक ऊर्जा निर्माण केली (आपण जाळली म्हणतो) की ठराविक ग्राम चरबी वापरली जाऊन शरीरातून बाहेर पडणार हा आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सुबोध खरे गुरुवार, 07/05/2018 - 09:28 नवीन
E = MC वर्ग हे सामान्य लोकांना सहज लक्षात राहणारे सूत्र आहे म्हणून दिले आहे. म्हणजे आपण कोणताही चरबी युक्त पदार्थ खाल्ला तर आपले वजन सम प्रमाणात वाढणार. मग ते गाईचे तूप आहे किंवा एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणून वजन वाढणार नाही असे नाही. ऊष्मागतिकीचा पहिला सिद्धांत(FIRST LAW OF THERMODYNAMICS) याला खरा तर लागू होईल पण तो जास्त गुंतागुंतीचा आहे पण कोळसा आणि पेट्रोल यांचं तुलना बरोबर नाही. कारण १ ग्रॅम चरबी जाळल्यावर ९ कॅलरी निर्माण होतात मग ती तुम्ही तूप खा तेल खा किंवा मलई खा तसेच १ ग्राम कर्बोदके म्हणजे ४ कॅलरी मग तुम्ही पोळी खा भात खा नाही तर ओट्स खा. वजनाच्या दृष्टीने सर्व सारखेच. ( मधुमेहाच्या दृष्टीने नाही हा फरक लक्षात घ्या). किंवा ४५० कॅलरी जाळल्या तर आपल्या शरीरातील चरबी ५० ग्राम ने कमी होईल. यासाठी एका ९० किलोच्या माणसाला ४० मिनिटात ५ किमी धावावे लागते. You burned 466 calories on your 5-kilometer run. At that pace, your calorie burn rate is 93 calories per kilometer and 699 calories per hour. https://www.runnersworld.com/training/a20801301/calories-burned-running-calculator/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/05/2018 - 11:21 नवीन
E = MC वर्ग हे सामान्य लोकांना सहज लक्षात राहणारे सूत्र आहे म्हणून दिले आहे.
तुमचा उद्देश जरी योग्य असला तरी हे सूत्र संभ्रम निर्माण करणारे होईल म्हणून मी ते निदर्शनास आणून दिले , गैरसमज नसावा. झालंच तर १ ग्रॅ वस्तुमानापासून या सुत्राने निर्माण होणारी उर्जा ही 21,510,540,000 किलो कॅलरीज इतकी प्रचंड असेल (काही गल्लत आढळल्यास कृपया सुधारणा सुचवावी), त्यामुळेही गैरसमज टाळणे योग्य असे मला वाटते.
कारण १ ग्रॅम चरबी जाळल्यावर ९ कॅलरी निर्माण होतात मग ती तुम्ही तूप खा तेल खा किंवा मलई खा
बरोबर आहे कारण आपण जे खाल्ले त्यातून आपले शरीर एकाच प्रकारची चरबी बनवत असेल. पण कोणत्या पदार्थातुन किती चरबी बनेल यात फरक असणार. पण तरी "१ ग्रॅ चरबी जळून ९ कॅलरी" हे सूत्र मला ढोबळ सरासरी असेल वाटते. एकाच व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या भागात असलेली चरबी (जसे पोट, मांड्या, कंबर ई) अचूकपणे सारख्याच उष्मांकाची असेल का याबद्दल साशंक आहे. त्याच प्रमाणे दोन माणसांच्या शरीरातील चरबीचा विशिष्ट उष्मांक अचूकपणे सारखाच असेल काय ? टीप : दहावीनंतर माझ्या शिक्षणाचा जीवशास्त्राशी संबंध नाही.. वरील मुद्दा मी केवळ तर्काच्या आधाराने लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ल
लई भारी Wed, 07/04/2018 - 18:34 नवीन
या विषयाबद्दल एका सहकाऱ्याकडून ऐकलं होत त्यामुळे उत्सुकता होतीच. माहितीपूर्ण चर्चा व्हावी ही अपेक्षा या धाग्यामुळे पूर्ण होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/05/2018 - 04:16 नवीन
युट्युबवर दिलेल्या लिंकमध्ये सवा दोन तासांचा कार्यक्रम आहे शिवाय आणखी एक - एक तासाची भाषणाची क्लिपसुद्धा आहे. त्याची फक्त ओडिओ क्लिप - भाषणाचा ओडिओ ( एक तास, 21 MB)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 10:22 नवीन
जरा आणखी शोधा. डॉ. दिक्षीतांचा एक व्हि डिओ व तो सुध्दा फक्त ६ मिनिटांचा मिळून जाईल. पण मी तो मुद्दामहून सुचवलेला नाही. कारण चिकित्सक माणसाच्या शंका त्यातून फिटणार नाहीत आणि त्यामुळे हा माणूस काहीही फेकतो आहे असे वाटले तर काय घ्या. दुसरे असे की, असा सहा मिनिटांचा व्हिडीओ पाहून तो माणूस धाग्यावर प्रश्न विचारून माझ्या कडून उत्तराची अपेक्षा करणार. खरच सांगतो या विषयाचा मी तज्ञ नसल्याने माझ्याकडून चुकीचे सांगितले जाऊ नये असे मनापासून वाटते. म्हणून योग्य व्यक्तिकडून समजावून घ्या अस मी म्हणतो आहे. उदा. श्री. अनिरूध्द वैद्य व आनन्दराव यांच्यात चाललेल्या चर्चेत भाग घेऊन डॉ. दिक्षीत याबाबत काय सांगतात हे सांगितले. त्यावर लागलीच ममां नी प्रश्न विचारला. आता याला उत्तर द्यावे की नाही या संभ्रमात पडलोय. शेवटी मला विषय समजला आहे असे वाटतेय. पण ते तरी खरे कशावरून? :) असो. ज्याची त्याची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/05/2018 - 14:19 नवीन
चर्चा चालू द्या , आम्ही रसग्रहण करतोय .
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/06/2018 - 01:20 नवीन
मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. दीक्षितांचा विडीओ दोन वेळा ऐकला. त्यांच्या भाषणाचा विषय सोडून इतर गोष्टीत मला काय वाटले ते मी व्यक्त करतो. या दोन डॉक्टरांच्या अभ्यासाविषयी कुठलीही शंका नाही. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. हि दोन्ही डॉक्टरांची भाषणे वजन कमी करणे, मधूमेह आदी विषयांवरील जरी नसती किंवा इतर कोणत्याही विषयांवर असती तरी ती केवळ ऐकायला आनंद मिळाला असता इतकी त्या विषयांना धरून असणारी आहे. डॉ. जिचकार तर सर्वज्ञ होते. कदाचित देवांनाही हा असा तज्ञ, अभ्यासू, विवेकशील, सच्छील माणूस पृथ्वीवर का ठेवावा असा हेवा वाटला असावा म्हणून ते अकाली आपल्यातून गेले. डॉ. जिचकारांचा आणि डॉ. दीक्षित हे मराठी भाषाप्रेमी आहेत. त्यांच्या भाषणातून ते सिद्ध होतेच. आरोग्यविषयक संज्ञांसाठी इंग्रजीची भरमार केलेली त्यांच्या भाषणात दिसत नाही. डॉ. जिचकारांच्या तोंडून तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांचा विनोदाने उल्लेख येतो, त्याचप्रमाणे सदरहू भाषण चालू असतांनाच त्यांचे लक्ष अखंड महाराष्ट्रवादी जनता परिषदेच्या चर्चेला जाण्याकडेदेखील असते. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी अशी वृत्ती. एकाच वेळी डॉ. जिचकार एका डॉक्टराच्या, समाजसेवीच्या आणि राजकारणी व्यक्तीच्या भुमीकेत उभे राहून भाषण देत होते. दोन्ही डॉक्टरांना भाषणाची कला चांगलीच अवगत आहे. भाषेचे, विषयाचे सखोल ज्ञान, अभ्यासामुळे आलेले पोक्तपण, आवाजातील चढउतार, मधून मधून विनोदाची पेरणी, सभाधीटपणा, प्रसंगावधान आदी गूण त्यांच्या भाषणात ठाई ठाई दिसतात. डॉक्टर जिचकारांचा विडीओ हा विडीओ नसून ऑडीओ रेकॉर्डींग आहे. कदाचीत त्या काळी विडीओ निट न आल्याने केवळ ऑडीओच्या स्वरूपात डॉक्टर ऐकायला भेटतात आणि भाषणभर डॉक्टरांचा आश्वासक हसरा चेहेरा दिसत असतो. भाषणात त्यांना मध्येच पाण्याची तहान लागते तेव्हा अगदी घरगूती आवाजात पाणी मागणे, बसायला जागा न भेटणार्‍यांना सुचना करणे, पुण्याच्या पुणेरीपणावर आणि नागपुरच्या नागपुरीपणावर टिका करणे, वेळोवेळी तक्ते लावण्याच्या सुचना करणे आदी कृती डॉक्टर जिचकार मधून मधून करत असतात. वर डॉक्टर जिचकारांच्या भाषणाबाबत जे जे काही आहे ते ते डॉक्टर दीक्षितांच्या बाबतीत लागू होते. डॉ. दीक्षितांनी आपल्या भाषणाच्यावेळी आधूनिकतेचा समावेश केलेला आहे. वेळोवेळी योग्य त्या ठिकाणी स्लाईडस पडद्यावर दाखवणे, मधूनच एखादे व्यंगचित्र दाखवून श्रोत्यांना तांत्रीक भाषणातून विरंगुळा देणे आदी पद्धतींचा यथोचित वापर त्यांनी केलेला आढळतो. आणि हे सर्व करतांना या कृती कृत्रीम नाही तर अगदी नैसर्गीक पद्धतीने केल्याचे जाणवते. ओघवती संभाषणशैली, श्रोत्यांना मुळ मुद्याकडे पुन्हा ओढून आणणे हे त्यांना अगदी सहजपणे जमलेले आहे. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्यातून व्यापारी नफा कमावण्याचा त्यांचा हेतू नाहीच. जे जे आपल्याला ठावे, शहाणे करावे सकळ जन या वृत्तीने ते आपले ज्ञान इतरांना वाटत आहे. डॉक्टर जिचकार आज हयात नाहीत. डॉक्टर दीक्षित आपल्या मार्गदर्शकाच्या रुपात डॉक्टर जिचकारांना ठेवतात. आपल्या संशोधनाचे श्रेयदेखील ते डॉ. जिचकारांना देतात. आपल्या देशाला मधूमेह, लठ्ठपणा आदींपासून मुक्ती मिळाली पाहीजे असा आशावाद ते भाषणाच्या अंती जागवतात. डॉ. जिचकार आणि डॉ. दीक्षित यांच्या भाषणातून हे दोन देवदूतच आपल्याला भेटतात. एक आदर्श भाषण कसे असावे याचा वास्तूपाठ म्हणजे हि दोन भाषणे आहेत असे मला वाटते. सर्वसामान्यांविषयी कळकळ कशी प्रामाणीक असते आणि ती बाहेर कशी जाणवते ते दोन्ही डॉक्टरांनी सप्रमाणात व्यक्त केले आहे. मला जे वाटते ते मी लिहीले. या लेखनाच्या निमीत्ताने डॉक्टर जिचकारांच्या स्मृती जागवील्या गेल्या. त्यांना भावपुर्ण आदरांजली. डॉक्टर दीक्षितांना या विषयावर तसेच त्यांच्या आवडीच्या विषयांवर आणखीपुढे संशोधन करण्यास वेळ मिळो आणि समाजाची सेवा करण्यास दिर्घायू लाभो या सदिच्छा! ज्यांनी ज्यांनी हि दोन्ही भाषणे अजून ऐकली नाहीत किंवा मोठी भाषणे असल्याने दुर्लक्ष केले आहे त्यांना त्यांना माझी विनंती आहे की भाषण ऐकण्याचा हा अनमोल ठेवा आपण गमावू नका. हि काही राजकीय भाषणे नाहीत. एका राजकीय-संशोधक व्यक्तीमत्वाकडून आणि एका संशोधक व्यक्तिमत्वाकडून दिली गेलेली भाषणे आपण वेळ काढून जरूर ऐका आणि श्रवणानंद घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/06/2018 - 03:24 नवीन
___/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 07/06/2018 - 21:41 नवीन
कसे का होईना, पण सर्वे: संतु निरामया: झाले की झालं.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 07/06/2018 - 21:42 नवीन
कसे का होईना, पण सर्वे: संतु निरामया: झाले की झालं.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
श
शाम भागवत Fri, 07/06/2018 - 12:53 नवीन
मी हा लेख मायबोलीवरपण प्रसिध्द केला आहे. एका प्रतिसादात पूनम यांनी लिहिले आहे की, "डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे याच विषयावर व्याख्यान आहे- ८ जुलै, सकाळी १० वाजता, टिळक स्मारक मंदिर, पुणे इथे. प्रवेश विनामूल्य आहे, पण प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रस्ता इथे मिळणार आहेत. ही जाहिरात आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेली आहे. इथे माहितीकरता दिली. पुण्यातले इच्छुक लोक जाऊ शकतील, म्हणून. माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्स येत नसल्याने कुणीतरी खात्री करावी. बातमी खरी असेल तर पूनम यांना धन्यवाद द्यायचे आहेत.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Sun, 07/08/2018 - 04:54 नवीन
मला काळ रात्री उशिरा कळलं, म्हणून इथे प्रतिसाद डकवायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
क
कंजूस Fri, 07/06/2018 - 14:21 नवीन
डॅाक्टर दीक्षित पाच मिनिट भाषणाचा ओडिओ mp3, size 2 MB. डॅाक्टर जिचकर दोन तास कार्यक्रमाचा ओडिओ mp3, size 42 MB. हे mp3 ओडिओ युसी ब्राउजरमधून ओफलाईन save करून कधीही ऐकता येतात. ( युसी >>डाउनलोड>>बॅकग्राउंड डाउनलोड.)
  • Log in or register to post comments
श
शुभां म. Fri, 07/06/2018 - 15:22 नवीन
http://www.akshardhara.com/en/ http://www.akshardhara.com/imgupload/imgupload21april/DIXIT%20PROGRAM%208%20JULY.jpg
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा