Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुकटात विनासायास वेटलॉस

श
शाम भागवत
Tue, 07/03/2018 - 09:09
🗣 313 प्रतिसाद
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

प्रतिक्रिया द्या
162643 वाचन

💬 प्रतिसाद (313)
श
शाम भागवत Fri, 07/06/2018 - 15:53 नवीन
धन्यवाद. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुभां म.
श
शलभ Mon, 07/09/2018 - 12:10 नवीन
उत्तम लेख लिहिलाय. मी हे videos आधी बघितले होते आणि पटले पण होते. पण अंगभूत आळशी पणा मुळे आणि खादाडीची सवय असल्याने कधी जमले नाही. पण करायची इच्छा आहे. नाखू काकांनी लिहिलंय त्याला तंतोतंत सहमत. आधी विडिओ ऐका. सगळ्या शंका फिटतील.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/10/2018 - 18:42 नवीन
मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात. यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय? माझा हा पहिलाच धागा असल्यामुळे मला याबाबत काहीच माहित नाही.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/11/2018 - 09:31 नवीन
भागवत साहेब , पुन्हा एकदा शेअर मार्केट बद्दल लेख सुरू करा ना , माझी विनंती आहे . मिपावर कृषी,भटकंती, कला सगळे विभाग आहेत पण अर्थविषयक विभाग नाही .ती कसर तुमच्या सारखा जाणकार पूर्ण करू शकतो . ज्याला महत्वाचे वाटतयं तो वाचेल बाकीचे मरतील फाट्यावर .
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 07/14/2018 - 10:43 नवीन
तो मी नव्हेच. श्री. प्रसाद भागवत शेअरसंबंधी लेख लिहीतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
ज
जागु Wed, 07/11/2018 - 11:47 नवीन
उपयुक्त माहिती. व्हिडीओ वेळ काढून पहाणार.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 07/15/2018 - 17:22 नवीन
माझ्या आईने गेले एक आठवडा हा प्रयोग सुरू केला आहे. ती सकाळी आणि संध्याकाळी जेवतेय. काय जे खावं वाटतंय ते सगळं एकाच वेळी. मग दिवस भर फक्त ताक पिते. ते ही मीठ साखरेशिवाय. मी तिला आज एक आठवड्यानम्तर भेटले. ती खरंच बारीक दिसतेय. मध्यंतरी तिचं पोट वाढलं होतं आणि पोटाचे काही न काही बारीक आजार. पाय खूप दुखत होते. तिचं म्हणणं आहे की तिला हलकं हलकं वाटतंय, पोट साफ होतंय आणि पाय दुखणं कमी झालं आहे. तिला बाकी मधुमेह, बीपी वगैरे काहीही नाही. झेपत असेल तर करून बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/16/2018 - 05:55 नवीन
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. हे मी वरच लिहिले आहे. आजकाल सार्वजनिक न्यासांवर रेडिओ टीव्ही यावर इतक्या तर्हेचे प्रदूषण, बैठी जीवन पद्धती, व्यायामाचा अभाव, संकरित आणि जनुकीय बदल केलेले अन्न आणि या सर्वांचा परिणाम म्हणून किडलेली प्रजा, जुन्या जमान्यातील ऋषी मुनी आणि त्यांची शतायूषी जीवन पद्धती इ इ यावर इतके काही ऐकू येते किंवा लिहिलेले असते कि प्रत्येक माणसाला आपली जीवन पद्धती हि साफ चूक आहे असेच वाटत असते. त्यामुळे असे काहि नवीन ऐकले आणि वाचले कि ते करून पाहावे अशी प्रबळ आंतरिक उर्मी दाटून येते आणि लोक ते करून पाहतात. सुरुवातीला माणसाचा उत्साहच इतका असतो कि लगेच १० १५ दिवसात त्याला छान वाटायला लागते. (व्यायाम करण्यासाठी जिम जॉईन करणार्यांनी आपले अनुभव आठवायचा प्रयत्न करा) एखादा महिना उलटला कि माणसाला ती पद्धत कंटाळवाणी किंवा अवडंबर वाटू लागते आणि मग माणूस हळू हळू त्यातून मध्यम मार्ग काढायला लागतो आणि तीन एक महिन्यात गाडी मूळपदावर येते. यात कुणावरच टीका करणे हा उद्देश नाही पण आपण सर्वच आरंभशूर असतो. म्हणून मी सुरुवातीलाच लिहिले आहे कि हि जीवन पद्धती( फक्त दोन वेळेलाच खाणे आणि ४५ मिनिटे नियमाने व्यायाम करणे) किमान सहा महिने किती लोकांना जमणार आहे याबद्दल मला शंका वाटते. अन असे कोणी सतत किमान सहा महिने केले असतील तर त्यांच्या पडलेला फरक याचा अभ्यास करायला मला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
शाम भागवत Mon, 07/16/2018 - 11:48 नवीन
ही संधी मी तुम्हाला नक्की मिळवून देईन. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिलीयन रायडर Wed, 07/18/2018 - 16:26 नवीन
अगदी अगदी! ती हे किती दिवस करते हे मलाही बघायचं आहे. समजा तिने हे 6 महिने केलंच तर मी नक्की लिहीन इथे. बाकी सध्या पाणी कमी झाल्यामुळे ती बारीक दिसतेय असं मलाही वाटलं. बघू काय होतंय पुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माझीही शॅम्पेन Tue, 08/07/2018 - 16:12 नवीन
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. हे मी वरच लिहिले आहे.
नेहमी बरोबर असता तुम्ही , पण डॉक्टर साहेब ह्या वेळेस चुकत आहांत !! सहा महिने सोडाच , दीड वर्ष हे डाएट करून माझ्या एका मित्राचे वजन जवळ १६ किलो कमी झाले आहे , ६ महिन्यात ५-१० kg कमी झालेले सुद्धा मित्र-मैत्रिणी आहेत , तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर सांगा तुमची भेट घडवून देतो घडवून देतो , हि ऐकीव माहिती नाही याची देही याची डोळा पाहिलेला आहे , तेव्हा काय अप्पा करा मला रच्याकने मी तुम्हाला ह्या डाएट विषयी थेट विचारले असता तुम्ही मौन धारण केलं होत , जो अर्थात तुमचा स्टॅन्ड आहे , मी त्याचा आदर करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/07/2018 - 16:43 नवीन
माझा पहिलंच वाक्य हे आहे. लोकांचे वजन कधीच कमी होत नाही असे मी कधीही म्हटलेले नाही. आरंभशूर माणसांना अशा आहाराचा फायदा होत नाही. जे लोक चिकाटीने असे आहार पाळतात त्यांचे वजन नक्की कमी होते हे मी पाहिलेले आहे/ पाहतो आहे. पण हि संख्या एकंदर डाएट करणाऱ्या लोकांच्या १० % आहे. आणि या ९० % लोकांच्या जीवावर तर तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी इ. लोकांनी इमले उभारले आहेत. बाकी डाएट तयार करणे हा माझा विषय नाही किंवा व्यवसायही नाही. त्यामुळे एखाद्या माणसाला विस्तृतपणे असा आहार लिहून किंवा बनवून देणे याला फार काळ लागला असता. सबब मी त्या फंदात पडत नाही. आपण कोणत्याही चांगल्या आहार तज्ज्ञाला दाखवून योग्य सल्ला घेणे हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
स
सुबोध खरे Tue, 08/07/2018 - 16:43 नवीन

हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Tue, 08/07/2018 - 19:19 नवीन
खरे साहेब तुमचे म्हणणे खरे आहे. पण माझ्या अनुभवानुसार माशॅ ही चुकीचे बोलत नाही आहेत. तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी वगैरे लोकांचे प्लॅन वर्षानुवर्षे करत रहाणे किंवा जिवनशैली म्हणून स्विकारणे अवघड जाते. प्रत्येक वेळेस मोजून मापून व कॅलरीची गणिते करत खात रहाणे व त्यासाठी पैसे मोजत रहाणे हे काही काळाने तापदायक होते. विशेषकरून घरच्या गृहिणीला ते कष्टप्रद होत जाते. सुरवातीला जरी हे आपल्याला जमू शकेल असे वाटले तरी पुढे पुढे ते अवघड वाटायला लागते. या सगळ्याला एक ग्लॅमर असते व आपण काहीतरी लै भारी करतोय अशी आपली व आपल्याला जवळच्यांची समजूत झालेली असते. २००९ साली मी हे उद्योग केले आहेत. तीन महिन्यातच हा प्रयोग मी बंद केला होता. हा सगळा प्रकारच उच्च मध्यमवर्गीयांना साजेसा असाच आहे. तुमच्यासमोर अशा सगळ्या गोष्टी असल्याने सहा महिने टिकणे अवघड आहे असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक वाटते. या उलट दोन वेळा खाण्याची आहारपध्दती सुरवातीलाच खूप अवघड वाटते. पण जसजसे दिवस जातात तसतसे हे फारस अवघड नाहीये हे लक्षात यायला लागते. हाच मोठा फरक दोन्ही पध्दतींमधे आहे. पण हा फरक पटकन लक्षात येत नाही. जेव्हा मी या प्लॅनबद्दल मित्रमंडळी व नातेवाईकांशी बोललो तेव्हाच याची मला कल्पना यायला लागली. याला कोणतेही ग्लॅमर नाही. कोणतीही जिम नाही. कोणतेही वेगळे खास पैसे द्यायला लागत नाहीत. कोणत्याही महागाईच्या पावडरी नाहीत किंवा कोणत्याही जाहीराती नाहीत. इतकी ही पध्दत सामान्य असल्याने, या पध्दतीबद्दल पटकन विश्वासच बसत नाही. माझ्या बायकोला सुध्दा मी काहीतरी वेडेपणा आहे असेच वाटत होते. (पण त्यात तिला कोणताही त्रास नसल्याने किंवा नेहमीपेक्षा जास्त वेळ खर्चायला लागणार नसल्याने तिला कोणत्याही प्रकारे त्यात मोडता घालणेही जमले नाही.) इतकेच नव्हे तर ती पण आज या आहारशैलीत सहजपणे सामील झाली आहे. हा सगळा विचार करता. माशॅ पण बरोबर आहेत असे मला म्हणावेसे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/08/2018 - 06:20 नवीन
सहा महिने टिकणे अवघड आहे असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक वाटते. मी "नकार घंटा" वाजवली आहे असा बऱ्याच लोकांचा समज झाला आहे. स्थिती खरं तर उलट आहे. व्यवस्थित योगसाधना न करणारी माणसे योगाभ्यासाला बदनाम करत असतात. तसेच दीड दोन महिना डॉ दीक्षितांची पद्धती "वापरुन पाहू" म्हणणाऱ्या लोकांमुळे त्यांची पद्धती बदनाम होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी सर्व लोकांना सुरुवातीलाच सावधान करणे आवश्यक आहे म्हणून मी असे लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 08/08/2018 - 15:44 नवीन
खरे साहेब तुमच्या व माशॅ यांच्यातील चर्चेमुळे तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी यांच्या पध्दती व डॉ. दिक्षीत यांच्या पध्दतीतला फरक मला नोंदवता आला. किंवा मला आलेला अनुभव शब्दबध्द करता आला. तुमची टिपण्णी नकारात्मक आहे किंवा नाही यापेक्षाही, तुम्हा दोघांमुळे मला या जिवनशैलीच्या आणखी एका पैलूवर विचार मांडता आला याचेच जास्त महत्व वाटत आहे. तुम्हा दोघांना धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Fri, 08/10/2018 - 06:52 नवीन
माझे सध्या दीड महिन्यात ५ किलो वजन कमी झाले आहे. बाकी सविस्तर लेख गणपतीनंतर लिहेन. तोपर्यंत वाट बघ्तोय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Mon, 07/16/2018 - 11:47 नवीन
खरय. एनर्जी लेव्हल वाढल्यासारखी वाटते. पुढे पुढे आपोआप ताक पिण्याचे प्रमाणपण कमी होत जाईल. त्याची जरूरी भासेनाशी होते. फक्त इतके वाजले मग ताक प्यायचेच, अशी मानसिकता नको. जरूर वाटली तरच ताक प्यायचे हे भान ठेवणे आवश्यक. "काय जे खावं वाटतंय ते सगळं एकाच वेळी" मु़ख्य म्हणजे इतर प्रकारात सतत आपण उपाशी राहिल्यासारखे वाटते. आपण मनावर ताबा ठेवतोय, काहीतरी आपण गमावतोय असे वाटत रहाते. आपल्याला हे खायचे नाही ते खायचे नाही याचे दडपण वाटत रहाते. जिवनातला खाण्याचा आनंद आपण गमावतोय असे वाटायला लागते. थोडक्यात यामुळे इतर प्रकारात सातत्य ठेवणे जमत नाही. मात्र डॉ. दिक्षीतांच्या प्रकारात जेवणाचा आनंद मिळतो. जेवण झाल्यानंतर एक प्रकारची तृप्ति जाणवते. आपण कोणता तरी पदार्थ खाण्याचा आनंद गमावतोय असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे या प्रकारात सातत्य टिकवणे सोपे जाते. "मध्यंतरी तिचं पोट वाढलं होतं आणि पोटाचे काही न काही बारीक आजार. पाय खूप दुखत होते. तिचं म्हणणं आहे की तिला हलकं हलकं वाटतंय, पोट साफ होतंय आणि पाय दुखणं कमी झालं आहे." पुण्याजवळ उरळीकांचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पचनसंस्थेला सर्वात जास्त उर्जा लागते. त्यासाठी ते उपास करायला सुचवतात. त्यांचे म्हणणे असे की, त्यामुळे एकीकडे पचनसंस्थेला विश्रांती मिळते तसेच त्यामुळे वाचलेली उर्जा शरीर शुध्दतेसाठी वापरली जाऊन शरीरातील दोष कमी व्हायला लागतात. येथेही असेच होते असे माझे मत आहे. दोनदाच खाल्याने अतिरिक्त इन्शूलीनमुळे नविन दोष निर्माण होत नाहीत. तर पचनसंस्थेला विश्रांती मिळायला तर लागतेच पण त्यामुळे वाचलेली उर्जा शरीरातील दोष कमी करण्यासाठी वापरली जायला लागते. माणूस निरोगी व्ह्यायला लागतो. वरील सर्व थोडे अनुभवावर व थोडे तर्कावर आधारीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चामुंडराय Sun, 07/15/2018 - 17:46 नवीन
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. दिवसातून फक्त दोन वेळा खायचे / जेवायचे हे गृहीतक मुख्यतः दोन गोष्टींवर आधारित आहे असे दिसते. १/ इन्सुलिन हे फक्त खाल्ल्यावरच स्त्रवते आणि २/ इन्सुलिन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते या दोन गोष्टी खऱ्या आहेत का या बद्दल मिपा वरील डॉ. मंडळींनी मार्गदर्शन करावे. वरती एका प्रतिसादामध्ये डॉ. खरे यांनी वरील गोष्टींबद्दल शंका व्यक्त केली आहे. म्हणजे या बाबतीत डॉ. मंडळींमध्ये एकवाक्यता नाही असे दिसते आहे. हि फक्त दोन वेळा जेवायची पद्धत अंगिकारायची असेल तर वरील गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे असे वाटते. विशेषतः सध्याच्या प्रचलित थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे दिवसभर खात रहा या पद्धतीच्या अगदी विरुद्ध हि दोन वेळाच जेवायची पद्धत असल्याने हे कळणे गरजेचे आहे. तसेच फक्त दोन वेळा जेवायचे काही नकारात्मक साईड इफेक्ट्स होऊ शकतात का याबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे. म्हणजे सारासार विचार करून या बद्दल निर्णय घेता येईल. गोगल देवाला साकडे घालून बघितले परंतु या बद्दल काहीच ज्ञान नसल्याने फक्त कन्फ्युजन पदरात पडले ! कृपया मिपा वरील डॉ. मंडळी या बाबत मार्गदर्शन करतील काय?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/16/2018 - 13:07 नवीन
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. दिवसातून फक्त दोन वेळा खायचे / जेवायचे हे गृहीतक मुख्यतः दोन गोष्टींवर आधारित आहे असे दिसते. १/ इन्सुलिन हे फक्त खाल्ल्यावरच स्त्रवते आणि २/ इन्सुलिन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते.. इन्शुलीन हे फक्त खाल्यावरच स्त्रवते. हे सर्वांनाच मान्य आहे. याबाबत कोणत्याही आहारतज्ञांमधे मतभेद नसावेत. मुद्दा हा आहे की, इतर आहारतज्ञ खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात इन्शूलीन स्त्रवते असे समजतात. उलट डॉ. दिक्षीतांच्या मते प्रत्येक माणसामधे एका ठराविक प्रमाणातच इन्शूलीन स्त्रवते, खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात नव्हे. आणि इथेच डॉ. दिक्षीतांचे व डॉ. जिचकारांचे वेगळेपण आहे हे कोणी लक्षात घेत नाही. हा विचार मी मायबोलीवर मांडला होता. पण त्यावर चर्चा करायचे सोडून "भागवतसाहेब अभ्यास वाढवा" असे उत्तर आल्याने मी विषय तेथे जास्त वाढवला नाही. :) इन्शूलीन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते असे म्हणण्याऐवजी, इन्शूलीन ५५ मिनिटात फक्त एकदाच एका ठराविक मात्रेत स्त्रवते असे म्हणणे जास्त योग्य होईल. गोगल देवाला साकडे घालून बघितले परंतु या बद्दल काहीच ज्ञान नसल्याने फक्त कन्फ्युजन पदरात पडले ! डॉ. जिचकारांनी स्वतःवर प्रयोग करून हे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी इन्शूलीन लेव्हल वारंवार तपासली आहे. त्यांच्यामते ही सायकल ५५ मिनिटा॑पेक्षा जास्त आहे. पण डॉ. दिक्षीतांनी हेच प्रयोग स्वतःवर मोठ्या प्रमाणावर करून तसेच जवळच्या नातलगांवर करून ५५ मिनिटांची सायकल नक्की केली आहे तसेच खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात इन्शूलीन स्त्रवत नाही हे दाखवून दिले आहे. या सर्व प्रयत्नांचे त्यांनी योग्य ते दस्ताऐवजीकरणही केलेले आहे. आता याबाबत शंका निरसनाबद्दल मिपाकरांना या तीन पध्दती अवलंबवता येतील असे वाटते. १. स्वतःवर प्रत्यक्ष प्रयोग करून डॉ. दिक्षीतांची मते योग्य किंवा अयोग्य हे ठरवणे. म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगशाळेत वेगवेगळ्या स्थितीतील इन्शूलीनचे प्रमाण पडताळून पहाणे व डॉ. दिक्षीत बरोबर आहेत का चूक आहेत ते ठरवणे. २. मिपावरील तज्ञ लोकांनी डॉ. दिक्षीतांनी जे प्रबंध लिहिले आहेत त्याद्वारे माहिती मिळवणे. किंव प्रत्यक्ष भेटून शंका निरसन करून घेणे. (मला वाटते डॉ. श्रीहास हे काम उत्तम रितीने करू शकतील. कारण डॉ. दिक्षीतांचे बरेच कार्य हे औरंगाबादला झालेले असल्याने ते स्वतः त्यांना ओळखतही असतील.) ३. माझ्या सारख्या सामान्य लोकांनी डॉ. दिक्षीत योग्य तेच सांगत आहेत असे समजून त्याप्रमाणे वागून प्रत्यक्ष अनुभव घेणे. व ते अनुभव येथे मांडून चर्चेद्वारे मत बनवणे. मी हा लेख ऐसी अक्षरेवर पण लिहिला होता. पण तेथील प्रतिसाद चर्चेसाठी योग्य न वाटल्याने तेथील सहभाग थांबवला. पण त्यात मला एक विरोधी मुद्दा मिळाला तो येथे नमूद करतो. "वरील प्रकार, एकदा करुन पाहिला होता. पण त्यातून, दीर्घवेळ काही न खाल्ल्यामुळे मला ॲसिडीटीचा त्रास झाला. त्यानंतर, पुन्हा चार वेळा खायला सुरवात केल्यावर, पुन्हा तंदुरुस्त झालो. खवैय्या असल्यामुळे माझे वजन कमी होत नाही. पण रोजच्या व्यायामामुळे , स्थिर तरी रहाते, आणि मी त्यावरच खूष आहे." मला वाटते डॉ. दिक्षीतांचे व्याख्यान काळजीपूर्वक न ऐकल्याचा हा परिणाम असावा. याबाबतीत डॉ. दिक्षीतांच्या व्याख्यानात अ‍ॅसिडिटी कशी होते हे समजावून सांगितले आहे. तिकडे लक्ष वेधू इच्छितो. जर आपल्याला दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त आणखी काही खाण्याच्या वेळा असतील व त्यात बरीच वर्षे सातत्य असेल तर त्या वेळेस पाचक द्रव तयार केले जातात. अशा वेळेस काहीच खाल्ले नाही तर ते द्रव अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. यावर त्यांनी सुचवलेला मार्ग असा की, जेवणाच्या दोन वेळा व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखे वाटेल तेव्हा पाणि प्या. बर्‍याच वेळेस तहान लागलेली असते पण आपल्याला वाटते भूक लागलीय. पाणी पिऊनही समधान न मिळाल्यास दोन चमचे दह्यापासून बनवलेले ग्लासभर ताक प्या. नारळाचे पाणी प्या. म्हणजे अ‍ॅसिडिटीच्या त्रासातून तुम्ही वाचाल. (शरीराला जेवणाव्यतिरिक्त इतर वेळी खायची लागलेली सवय मोडेपर्यंत काही दिवस हे करावे लागेल. अस त्यांना यातून सुचवायचे असावे असा माझा तर्क आहे.) माझ्या आकलनानुसार मी मुद्दे मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
श
शाम भागवत Mon, 07/16/2018 - 13:13 नवीन
वरती एका प्रतिसादामध्ये डॉ. खरे यांनी वरील गोष्टींबद्दल शंका व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर हेही लिहिले आहे की, याबद्दल माझे वाचन चालू आहे. याच्या बाजूने किंवा विरुद्ध काही आढळले तर त्यावर अधिक वाचन केल्याशिवाय काही टिप्पणी करणे चूक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/16/2018 - 18:18 नवीन
वरील प्रकार, एकदा करुन पाहिला होता. पण त्यातून, दीर्घवेळ काही न खाल्ल्यामुळे मला ॲसिडीटीचा त्रास झाला. त्यानंतर, पुन्हा चार वेळा खायला सुरवात केल्यावर, पुन्हा तंदुरुस्त झालो. खवैय्या असल्यामुळे माझे वजन कमी होत नाही. पण रोजच्या व्यायामामुळे , स्थिर तरी रहाते, आणि मी त्यावरच खूष आहे." अस बोलणारा नक्कीच पुणेकर असणार ! स्वयंभू असतात ते !!! " भागवत साहेब , अभ्यास वाढवा " अशा प्रकारचे फतवे काढणारे मिपावर खूप वाढलेत हे मात्र नक्की .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 07/17/2018 - 14:01 नवीन
मी आता दोन नाही पण तीन वेळा खाण्यास सुरवात केली आहे. सकाळचा नाष्टा बंद केला नाही , त्याचवेळी दूध व दूधाचा चहा ई सुद्धा घेतो. असे सुरु केल्यावर तिसर्‍या -चौथ्या दिवशी मधल्या वेळेत बरीच भूक जाणवत होती, जेवण थोडेसे जास्तच घ्यावे याकडे कल होता पण नंतर अशी सतत जाणवत राहणारी भूक नाहीशी झाली. संध्याकाळी बिनासाखरेचा काळा चहा घेतो. आता सुमारे १०-१२ दिवसानंतर छान वाटते आहे. वजनात अजून फारसा फरक नाही. आणखी थोडे दिवसांनी आणखि काय परिणाम होतात ते लिहीन
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/17/2018 - 15:43 नवीन
झकास. कार्याला शुभेछा. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पिवळा डांबिस Tue, 07/17/2018 - 19:26 नवीन
हा माहितीपूर्ण धागा काढल्याबद्दल श्री. भागवत यांना धन्यवाद. मी त्यांच्या सल्ल्यानुसार डॉ. जिचकार आणि डॉ. दिक्षीत ह्या दोघांचीही व्याख्याने यू-ट्यूबवर पाहिली/ ऐकली. डॉ. जिचकारांना माझ्या लहानपणी व्याख्यानात व ते मंत्री असतांना टीव्हीवर पाहिलं होतं. हे एक निरलस आणि निस्पृह काम आहे यात शंका वाटत नाही. एक शंका उपस्थीत झाली ज्याचे निरसन भागवत कदाचित करू शकतील म्हणून हा लेखनप्रपंच. १. दोघेही डॉ. २४ तासांत दोन वेळा जेवण घ्या असं सांगतात. परंतु जिचकारांच्या भाषणात अधेमध्ये लागल्यास लो कॅलरी फूड (टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि) खा असा सल्ला देतात (असा माझा समज झालाय). ह्याउलट डॉ. दिक्षीत त्यांच्या भाषणात ह्या मुद्द्याचा उल्लेखही करीत नाहीत. नक्की सल्ला काय? अ‍ॅम आय मिसिंग समथिंग? २. कुठलाही कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ खाल्ला (मग तो कितीही कमी प्रमाणात असो) की ठराविक इन्शुलिन सीक्रीट होतं हे समजलं. पण व्हॉट अबाऊट शुगर सबस्टीट्यूट? त्यानेही इन्शुलिन सीक्रीट होत का? आणि असल्यास त्यामागे काय लॉजिक आहे? जर माहिती मिळू शकली तर आभार.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/18/2018 - 17:04 नवीन
१. दोघेही डॉ. २४ तासांत दोन वेळा जेवण घ्या असं सांगतात. परंतु जिचकारांच्या भाषणात अधेमध्ये लागल्यास लो कॅलरी फूड (टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि) खा असा सल्ला देतात (असा माझा समज झालाय). ह्याउलट डॉ. दिक्षीत त्यांच्या भाषणात ह्या मुद्द्याचा उल्लेखही करीत नाहीत. नक्की सल्ला काय? अ‍ॅम आय मिसिंग समथिंग? जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट वेळी काहीतरी खाण्याची वर्षानुवर्षांची सवय असेल तर त्यावेळेस शरीर पाचक रस तयार करते आणि त्यावेळेस जर काहीच खाल्ले नाही तर ती पाचक द्रव्ये अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे शक्य असते. अशावेळेस तो त्रास होऊ नये यासाठी डॉ. जिचकारांनी व डॉ. दिक्षीतांनी काही पदार्थ नाईलाजाने सुचवले आहेत, हा मुद्दा प्रथम लक्षात घेऊन मग पुढे जाऊ. थोडक्यात हे पदार्थ खाऊन तात्पुरती वेळ मारून न्या. तसेच हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी कमी करत जाऊन, शरीराला लागलेली सवय हळूहळू मोडून काढून दिवसातून फक्त दोनदाच जेवायचे इथपर्यंत कसे पोहोचायचे आहे, याबद्दल केलेले ते मार्गदर्शन आहे असे मला वाटते. डॉ. जिचकारांनी जेव्हा विचार मांडला तेव्हा वजन कमी करण्यासाठी पिष्टमय पदार्थामुळे वजन वाढते हे लक्षात आले होते. दोन वेळा जेवणाच्या मधे भूक सहन झाली नाही अगदी नाईलाज झाला तर काय करायचे? या प्रश्नाला त्यांनी त्यावेळी त्यांना माहित असलेली कमी कर्बोदके असलेले पदार्थ सुचवले. जेणे करून कमीत कमी ग्लुकोज तयार होईल. पण हळूहळू दोन जेवणाच्या मधे काही न खाण्यापर्यंत पोहोचा असे त्यांना सांगायचे आहे. कारण कमी कर्बोदके असली तरी पण त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते व ते अतिरिक्त असते हे त्यांना माहित होते. थोडक्यात टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि पदार्थ त्यांनी नाइलाजाने सुचवले होते. हा विचार पुढे नेण्यासाठी डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग केले व कोणते पदार्थ खाल्याने इन्शूलीन स्त्रवत नाही हे शोधून काढले. आणि नाइलाज झाला तर काय करा? ह्या प्रश्नावरील जिचकारांचे उत्तर आणखी शास्त्रशुध्द केले. हे प्रयोग त्यांनी कसे केले हेही त्यांनी सांगितले आहे. प्रथम रक्तातील इन्शूलीन तपासायचे. मग पदार्थ खायचा व त्यानंतर ५५ मिनिटांनी परत इन्शूलीन तपासायचे. ह्या पध्दतीने कोणालाही नवीन पदार्थ तपासता येऊ शकतो. थोडक्यात टरबूज/ खरबूज, काकडी या पदार्थांमूळे इन्शूलीन स्त्रवत असल्यामुळे डॉ. दिक्षीतांनी हे पदार्थ बाद केले आहेत. डॉ. दिक्षीतांनी सुचवलेले पदार्थ हेही नाईलाज झाला तरच खायचे आहेत. त्याबत ते म्हणतात. भूक लागल्यासारखे वाटले तर प्रथम पाणी पिऊन बघा. तेवढ्याने भागले तर उत्तमच. नाहीतर मग सुचवलेले पदार्थ खा. माझ्या मते डॉ. दिक्षीतांनी हे पदार्थ शोधून डॉ. जिचकारांचा विचार आणखी पुढे नेला असला तरी हे पदार्थ खाल्यामुळे ते पचवण्याचे काम पचनसंस्थेला करायलाच लागते. त्यात उर्जाही खर्च होते व तिला मिळणारी विश्रांतीही कमी होते. डॉ. दिक्षीतांनी जे प्रयोग केले ते डॉ. जिचकारही करू शकले असते. तेवढी बुध्दीमत्ता त्यांना नक्कीच होती. पण देवाने त्यांना लवकर बोलावले म्हणून ते काही करू शकले नाहीत. यासाठीच मी लेखात असे म्हणले आहे की, नियतीने बी लावायचे काम त्यांच्यावर सोपवले होते. डॉ. दिक्षीतांनी जरी प्रयोग केले असले तरीही ते सर्व श्रेय डॉ. जिचकारांना देतात. कृतज्ञता व्यक्त करतात. अध्यात्मामधे कृतज्ञता हा शब्द अहंकाराच्या विरोधार्थी शब्द मानला जातो. त्यामुळेच डॉ. दिक्षीतांची भाषा अभिनिवेशशून्य आहे. त्यातून समाजाचे भले होण्याची कळकळ जाणवते. असो. विषयांतर व्हायला लागले. थांबतो. :) २. कुठलाही कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ खाल्ला (मग तो कितीही कमी प्रमाणात असो) की ठराविक इन्शुलिन सीक्रीट होतं हे समजलं. पण व्हॉट अबाऊट शुगर सबस्टीट्यूट? शुगर सबस्टीट्यूट पदार्थ असला तरी त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते किंवा नाही हे महत्वाचे. त्यामुळे निव्वळ याच पध्दतीने केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे आहे. बाकी कोणत्याही इतर निकषांच्या आधारे केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 07/19/2018 - 00:40 नवीन
जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट वेळी काहीतरी खाण्याची वर्षानुवर्षांची सवय असेल तर त्यावेळेस शरीर पाचक रस तयार करते आणि त्यावेळेस जर काहीच खाल्ले नाही तर ती पाचक द्रव्ये अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे शक्य असते. अशावेळेस तो त्रास होऊ नये यासाठी डॉ. जिचकारांनी व डॉ. दिक्षीतांनी काही पदार्थ नाईलाजाने सुचवले आहेत, हा मुद्दा प्रथम लक्षात घेऊन मग पुढे जाऊ. थोडक्यात हे पदार्थ खाऊन तात्पुरती वेळ मारून न्या. तसेच हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी कमी करत जाऊन, शरीराला लागलेली सवय हळूहळू मोडून काढून दिवसातून फक्त दोनदाच जेवायचे इथपर्यंत कसे पोहोचायचे आहे, याबद्दल केलेले ते मार्गदर्शन आहे असे मला वाटते.
आय सी.
डॉ. दिक्षीतांनी जे प्रयोग केले ते डॉ. जिचकारही करू शकले असते. तेवढी बुध्दीमत्ता त्यांना नक्कीच होती........ डॉ. दिक्षीतांनी जरी प्रयोग केले असले तरीही ते सर्व श्रेय डॉ. जिचकारांना देतात. कृतज्ञता व्यक्त करतात. अध्यात्मामधे कृतज्ञता हा शब्द अहंकाराच्या विरोधार्थी शब्द मानला जातो. त्यामुळेच डॉ. दिक्षीतांची भाषा अभिनिवेशशून्य आहे. त्यातून समाजाचे भले होण्याची कळकळ जाणवते.
संपूर्ण परिच्छेदाशी सहमत आहे.
डॉ. दिक्षीतांनी सुचवलेले पदार्थ हेही नाईलाज झाला तरच खायचे आहेत. त्याबत ते म्हणतात. भूक लागल्यासारखे वाटले तर प्रथम पाणी पिऊन बघा. तेवढ्याने भागले तर उत्तमच. नाहीतर मग सुचवलेले पदार्थ खा.
हे डॉ. दीक्षीतांनी सुचवलेले पदार्थ कोणते? ते त्यांच्या भाषणात पाणी आणि दोन चमचे दह्यापासून केलेले ताक ह्याविषयी बोलतात. अन्य काही पदार्थ त्यानी सुचवलेले तुमच्या वाचनात/ऐकण्यात आलेले आहेत का? (कारण मला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यामुळे विचारतोय)
शुगर सबस्टीट्यूट पदार्थ असला तरी त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते किंवा नाही हे महत्वाचे. त्यामुळे निव्वळ याच पध्दतीने केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे आहे.
मान्य. माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट टेस्ट केले असणारच, मग त्यामुळे इन्शुलीन स्त्रवते असं त्यांना आढळून आलं का? खरोखर मनापासून विचारतोय. तुम्ही वेळात वेळ काढून आमचं शंकानिरसन करताय याबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/19/2018 - 09:22 नवीन
जिचकरांच्या भाषणात शुगस सबस्टिट्युट पण नको , त्यानेही इन्शुलिन स्त्रवते असा उल्लेख आहे बहूधा.. जमल्यास पुन्हा ऐकून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शाम भागवत गुरुवार, 07/19/2018 - 09:59 नवीन
तुमच्याकडून दुजोरा मिळाला. खूप बर वाटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पिवळा डांबिस Mon, 07/23/2018 - 21:37 नवीन
जिचकरांच्या भाषणात शुगस सबस्टिट्युट पण नको , त्यानेही इन्शुलिन स्त्रवते असा उल्लेख आहे बहूधा.. जमल्यास पुन्हा ऐकून बघा.
हम्म, माझ्या ऐकण्यातून निसट्लं असावं बहुतेक. कन्फार्मेशनसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
श
शाम भागवत गुरुवार, 07/19/2018 - 09:58 नवीन
माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट टेस्ट केले असणारच, मग त्यामुळे इन्शुलीन स्त्रवते असं त्यांना आढळून आलं का? शुगर सब्स्टीट्यूट आणि शुगर फ्री यात काय फरक आहे ते मला माहित नाही. पण शुगर फ्री सुध्दा नको. त्यानेही इन्सुलीन स्त्रवते हे त्यांनी स्पष्टपणे चहाच्या संदर्भात सांगितले आहे. त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट हा शब्द मात्र कुठेच वापरलेला नाही. जिचकारांनी तो शब्द वापरला आहे. शुगर सब्स्टीट्यूट वगैरे अस काही नसत असेही ते म्हणाले आहेत. मात्र हे वाक्य इन्शूलीन स्त्रवण्याच्या संदर्भात आहे. बाकी कोणत्या निकषाच्या बाबतीत ते म्हणालेले नसावेत. हे डॉ. दीक्षीतांनी सुचवलेले पदार्थ कोणते? ते त्यांच्या भाषणात पाणी आणि दोन चमचे दह्यापासून केलेले ताक ह्याविषयी बोलतात. अन्य काही पदार्थ त्यानी सुचवलेले तुमच्या वाचनात/ऐकण्यात आलेले आहेत का? (कारण मला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यामुळे विचारतोय) याबाबतीत त्यांनी दिलेला अग्रकम असा आहे. दोन जेवणाच्या मधे काहीही न खाणे हे सर्वोत्तम. त्याला पर्याय मम्हणजे १."पाणी" ह्याला प्रथम प्राधान्य. किंबहुना पाणी भरपूर प्या. २. ताक चालेल. पण ते सुध्दा २ चमचे दह्यापासून ग्लासभर बनवलेले पातळ ताक पाहिजे. बाजारच्या ताक दह्यात प्रिझर्व्हेटीव्ह्ज असल्याने ते चालणार नाही. दही शक्यतोवर घरीच बनवा. ३.ग्रीनटी आवडत असेल तर तो घ्या. ब्लॅक टी चालेल. पण दूध न घालता केलेला चहा आवडत नसेल तर २५% दूध व ७५%पाणी असा चहा तोही बिनसाखरेचा चालेल. यातही शुगर फ्री नको. ४. नारळाचे पाणी चालेल. पण त्यातील गर चालणार नाही. तो आवडत असेल तर तो काढून घ्या व जेवताना खा. ५. टोमॅटोच्या एक दोन फोडी चालतील मात्र दिवसभरात एक टोमॅटो ही मर्यादा आहे. डॉ. दिक्षीतानी स्वतःच्या खिशातून पंचेचाळीस हजार खर्च करून एकूण १८ पदार्थ तपासले. लोकांवर प्रयोग केले. त्यातून इन्सूलीन स्त्रवणारे पदार्थ वगळून ही लिस्ट बनली आहे. जर कोणाला एखादा पदार्थ खाल्यामुळे इन्सुलीन स्त्रवते किंवा नाही हे तपासायचे असेल तर त्याची पध्दत पुढील प्रमाणे आहे. शून्य मिनिटाला इन्सूलीन तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घ्या. पदार्थ खा. दहाव्या मिनिटाला दुसरा रक्ताचा नमुना घ्या. साठाव्या मिनिटाला तिसरा नमुना घ्या. पॅथेलॉजीस्टकडून इन्सूलीन मात्रा तपासून घ्या. इन्सूलीन चे प्रमाण वाढले नसेल तर तो पदार्थ खायला हरकत नाही. ही प्रयोगाची पध्दत अशीच का याबाबत मला काहीच माहित नाही. एकावेळचे रक्त तपासणीचा खर्च त्यावेळेस १२०० रूपये होता. त्यामुळे एक पदार्थ तपासायला ३६०० रूपये लागत असत. आता तो बर्‍याच ठिकाणी एकावेळेस ६०० रूपये झाला आहे. म्हणजे एका पदार्थाला १८०० रूपये खर्च येऊ शकतो. यातील १० व्या मिनिटांची तपासणी मला नीट समजलेली नाही. या अगोदर या तपासणीच्या बाबतीत लिहायला थोडी चूक झाली होती ती इथे दूरूस्त करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Mon, 07/23/2018 - 21:39 नवीन
बिनसाखरेचा चहा (हिरवा), नारळ्पाणी, टोमॅटो हे पदार्थ घेऊ शकतो. थॅन्क यू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/24/2018 - 20:37 नवीन
एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शाम भागवत Tue, 07/24/2018 - 20:43 नवीन
हा VDO फक्त ६ मिनीटे २ सेकंदाचा आहे हे सर्वात महत्वाचे लिहावयाचे राहूनच गेले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सुबोध खरे Fri, 07/20/2018 - 06:21 नवीन
पिडां साहेब Effects of stevia, aspartame, and sucrose on food intake, satiety, and postprandial glucose and insulin levels https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2900484/ This is the first study to directly test the effects of the natural sweetener, stevia, on food intake, satiety, and postprandial glucose and insulin levels in humans. The key finding was that participants did not compensate by eating more at either their lunch or dinner meal when they consumed lower calorie preloads containing stevia or aspartame compared to when they consumed higher calorie preloads containing sucrose. In other words, even after a lower calorie preload, food intake at subsequent lunch and dinner meals was not increased and discretionary food intake did not differ between the conditions. Thus, participants’ total caloric intake was lower in the stevia and aspartame conditions, compared to the sucrose condition, solely due to the difference in caloric amounts of the preloads used in this study. Our findings are consistent with previous studies, which have found that changing the energy density of a food does not result in an accurate compensation in energy intake at subsequent meals (Levitsy, 2001; Rolls, Hetherington, & Laster, 1988; Rolls, Laster, & Summerfelt, 1989). Other studies have also found that consumption of preloads an hour and a half before testing did not influence the amount consumed in the following meal (Rolls et al., 1991). Findings such as these suggest that the eating behavior of humans may not be strongly related to previous caloric intake, at least in the short-term. Other studies suggest that compensation may not occur even over relatively long time periods. For example, sucrose-sweetened food and beverages resulted in a 1.6 kg weight gain in overweight individuals whereas artificially sweetened foods and beverages resulted in a 1.0 kg weight loss over a 10 week period (Raben, Vasilaras, Moller, & Astrup, 2002). Consumption of stevia in preloads significantly lowered postprandial insulin levels compared to both aspartame and sucrose, as well as postprandial glucose levels compared to sucrose. Consumption of aspartame in preloads also reduced postprandial glucose compared to sucrose at twenty minutes following consumption of the preload. These effects on postprandial glucose levels are likely due in large part to the lower caloric and carbohydrate intake in the aspartame and stevia preloads compared to the sucrose preloads. However, these effects do not appear to be solely due to the lower calorie preloads in the stevia condition, as participants consumed identical calorie amounts in the preloads used in both the stevia and aspartame conditions. If future studies confirm these findings, then stevia may be helpful in managing postprandial hyperglycemia, which recent studies indicate is an important contributor to the development of insulin resistance and Type 2 diabetes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Mon, 07/23/2018 - 22:00 नवीन
थॅन्क यू फॉर द लिंक, डॉक. आर्टिकल वाचून जर काही शंका शिल्लक राहिल्यास विचारीन. मला हा मुद्दा समजायला अडचण येतेय की एकदा मॉलीक्युलर बायालॉजीचं शास्त्र वापरून (इन्शुलिन,रिसेप्टर वगैरे) विचार करायचा म्हंटल्यावर ताक वगैरे मधले शुगर मॉलिक्यूल्स बॉडीला रेकॉगनाईझ होत नाहीत आणि इन्शुलिन स्त्राव होत नाही पण स्ट्रक्चरली संपूर्णपणे वेगळे असलेले शुगर सबस्टिट्यूट मॉलीक्यूल्स बॉडी रेकग्नाईझ करून इन्शुलिन स्त्रवते हे कसं काय? अर्थात डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग केले म्हणतात त्यामुळे त्यावर शंका घ्यायचा हेतू नाही, पण कन्सेप्च्युअली समजायला मला जरा अवघड जातंय इतकंच. युवर थॉटस आर वेलकम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/24/2018 - 07:51 नवीन
दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा असते. त्याचे विघटन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये होते आणि यातील ग्लुकोजमुळे इन्स्युलिनचा स्त्राव होतो. पण गॅलॅक्टोज मुळे होणारा स्त्राव हा ग्लुकोजपेक्षा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे एकंदर लॅक्टोज मुळे इन्स्युलिनचा स्त्राव ग्लुकोजपेक्षा कमी होतो. दुधाचे जेंव्हा ताक होते तेंव्हा त्यातील लॅक्टोज चे लॅक्टिक ऍसिड (बारा कार्बन रेणूचे तीन कार्बन रेणूत) मध्ये रूपांतर होते. यामुळे मुळात त्यातील शर्करेचे प्रमाण कमी होते. शिवाय लॅक्टिक ऍसिड मुळे जठरातील अन्नपदार्थ लहान आतड्यात जाण्यास जात वेळ लागतो (Delayed gastric emptying). त्यामुळे रक्तातील साखरेचे आणि पर्यायाने इन्स्युलिनच्या स्रावाचे प्रमाण कमी होते. मूळ ग्लुकोजचे रेणू जसे असतात त्याचे आणि इतर साखरेचे रेणू यात साधर्म्य असल्याने त्यांचा स्वादुपिंडातील संवेदकावर (रिसेप्टर) ग्लुकोज इतका नाही पण थोडा कमी परिणाम होतोच. याच कारणाने काही अमिनो आम्ले यांचा पण स्वादुपिंडातील रिसेप्टर वर परिणाम होऊन इन्स्युलिनचा स्त्राव तयार होतो. उदा ग्लुटामिक आम्ल यातील अमाईन हा रेणुगट काढला तर त्याचे ग्लुटारिक आम्लात रूपांतर होते. हे पाच कार्बन असणारे संयुग ग्लुकोजशी साधर्म्य असणारे आहे ज्यामुळे इन्स्युलिनचा स्त्राव तयार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शाम भागवत Tue, 07/24/2018 - 10:22 नवीन
मस्त समजावून सांगीतल. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिवळा डांबिस गुरुवार, 07/26/2018 - 22:41 नवीन
तुमच्या प्रतिसादातून मला हे समजलं की कार्बोहायड्रेट्चे स्वरूप आणि कंझ्यूम केलेली क्वांटिटी यावर इन्शुलिनचा स्त्राव अवलंबून असावा असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ह्या मताशी मी सहमत आहे. पण मूळ लेख/उपचारपद्धतीमध्ये ह्याउलट इन्शुलिन स्त्राव हा नेचर ऑफ कार्ब इन्डिपेन्डंट आणि फिक्सड अमाउंट असतो असं प्रतिपादन केलं आहे. माझं क्न्फ्यूजन तिथे होतं. एनिवे, जर लोकांना ह्यातून टिकाऊ फायदा होत असेल तर मला ह्या उपचारपद्धतीला उगाच अपशकून करायची इच्छा नाही. कुठूनही समाजाला लाभ झाल्याशी कारण मग त्यामागचं विज्ञान काही का असेना... माझ्या शंकांची पेशंटली उत्तरे दिल्याबद्दल तुमचे, श्री भागवत, आणि मराठी कथालेखक यांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Wed, 07/18/2018 - 10:20 नवीन
आत्ता घराबाहेर आहे. संध्याकाळि लिहितो.
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Wed, 07/18/2018 - 11:34 नवीन
डॉ. जिचकारांचा विडियो बघीतला. सगळच खूप छान समजावून सांगीतले आहे. तुम्ही लींक दिलीत , हा धागा काढला , बरयाच वाचकांना याचा निश्चीतच लाभ होइल. मी तुमची अत्यंत आभारी आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/18/2018 - 15:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
श
शाम भागवत Wed, 07/18/2018 - 15:42 नवीन
तरीपण माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही डॉ. दिक्षीतांचा व्हीडीओ पण पहा. डॉ. जिचकारांचा विचारांच्या आधारे आणखी प्रयोग करून डॉ. दिक्षीतांनी तो विचार आणखी पुढे नेलाय. जास्त सोपा केलाय. त्या विचारात आणखी खोल जाऊन डॉ. जिचकारांच्या पध्दतीपेक्षा जास्त प्रभावी पध्दत मांडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
स
सुचिता१ गुरुवार, 07/19/2018 - 06:38 नवीन
निश्चीत च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 07/19/2018 - 08:15 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
अ
अमर विश्वास गुरुवार, 07/19/2018 - 15:41 नवीन
सध्या आमच्या घरातही डॉक्टर दीक्षितांच्या डाएटचे प्रयोग चालू आहेत . मी स्वत: यापूर्वी (७-८ वर्षांपूर्वी) क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाने १० किलो वजन कमी केले होते .. आता पुन्हा सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत ८ किलो वजन कमी करायचे टार्गेट आहे .. बघूया डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला यश मिळते कि माझ्या क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाला
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/19/2018 - 18:30 नवीन
डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला तसेच तुमच्या क्लीन डाएट + व्यायाम या दोन्ही मार्गांना यश मिळो. फिटनेस महत्वाचा. त्याचबरोबर निवडलेल्या मार्गावर कोण जास्त काळ टिकून राहते आहे ते पण नोंदवा. जी पध्दत सोपी असते ती सहजपणे जास्त काळ टिकण्याची शक्यता असते. त्यादृष्टीनेही काही नवीन माहिती मिळू शकेल. तुमचे अनुभव जरूर मांडत रहा. तसेच तुम्ही राबवत असलेल्या क्लीन डाएट + व्यायाम मार्गाबद्दलपण येथे माहिती दिली तर फार बरे होईल. तेवढीच ज्ञानात भर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास गुरुवार, 07/19/2018 - 19:39 नवीन
क्लीन डाएट ... हा शब्द खूप नंतर वाचनात आला ... पूर्वी याचाच स्वरूप जंक फूड नको असं होत ... मी स्वतः खाद्य प्रेमी असल्याने बाहेरचे खाणे भरपूर व्हायचे ... त्यामुळे सध्या खालील गोष्टी पूर्णपणे बंद आहे १. बिस्किटे २. भेळ / मिसळ / वडे ३. पंजाबी डिशेस ४. रोटी ५ हॉटेलचे खाणे ६ सॉफ्ट ड्रिंक्स सध्याचे डाएट साधारणतः असे आहे सकाळी उठल्यावर १ ग्लास दूध (बोर्नव्हिटा सह) १ तास व्यायाम नाश्ता : दूध व सिरल्स + एक फळ (केळे / पेरू / सफरचंद ) किंवा १ अंडे + १ पोळी दुपारी १ वाजता : २/३ पोळ्या + भाजी + कोशिंबीर (घरून डबा नेतो) ५ वाजता : एक अंडे किंवा सुकामेवा + एक फळ रात्री जेवण : भाकरी + भाजी + सलाड आठवड्यातून किमान दोनदा तरी वरण भात तूप पोळीवर तूप आवर्जून घेतो ... लोणी टाळतो . पाणी भरपूर पितो व्यायाम : आठवड्यातील ३ दिवस स्पिननिंग + स्ट्रेचिंग + ऍब्स ३ दिवस : स्ट्रेंथ ट्रेंनिंग सध्या असे शेड्युल आहे. यात सर्वात अवघड जिभेवर ताबा ठेवणे व आग्रहाला बळी न पडणे . एकदा हे जमले कि बाकी काही प्रॉब्लेम नाही महिन्यातून एक पार्टी करण्याची परवानगी (स्वतःच स्वतःला दिलेली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
अ
अमर विश्वास गुरुवार, 07/19/2018 - 19:42 नवीन
आणि हो... वीकएंड ला चिकन वगैरे खावेसे वाटले तर घरी बनवतो ... बाहेरचे टाळतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
श
शाम भागवत Fri, 07/20/2018 - 03:56 नवीन
धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा