नक्की प्रॉब्लम काये ?
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्याशी आंतरजालीय ओळख आहे.
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.
____________________________________________
१. देवभोळे लोक :
जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.
देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.
देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ?
पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे.
श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला !
वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे.
आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे.
अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे.
देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही.
आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे.
प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.
सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात.
अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ?
परिणामी ते निरुत्तर होतात.
मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात.
थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो.
____________________________________________
२. नाम, जप, परिक्रमा.........
एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात.
पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत.
इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात.
त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात.
आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो.
कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ?
का त्याची देशाला गरजच नाही ?
___________________________________________
३. राजकारण
सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे.
प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे.
फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे.
सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे.
सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही.
पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे.
पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही.
पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि
सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे.
थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे.
सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे.
तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले,
तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य !
______________________________________
४. अध्यात्म
सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे
हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे.
त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही.
तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की......
लोक जाम पिसाटतात.
जर सर्वच सत्य आहे तर
इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो,
सत्यच आहे.
पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक,
आपण चुतिया आहोत असा काढतात !
मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा;
तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.
परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते.
संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर,
इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही.
______________________________________
५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन
स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो
प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं.
स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो.
परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो.
स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो.
कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु :
मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं.....
मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ?
मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?
___________________________________________________
६. व्यावसाय :
पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे.
व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे.
अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे.
जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे.
सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे
आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो.
तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार,
अमक्या अॅक्टमुळे दुकान बंद होणार....
जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.
काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?
अशा काहीही कमेंटस मारतात.
मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो.
__________________________________________
७. भग्व्दगीता :
हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे.
पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून
अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे.
त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही.
थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा,
अध्यात्मिक ग्रंथ नाही.
सांख्ययोगातले दोन श्लोक;
नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि
या निशा सर्व भूतानां, सोडले तर,
सामान्य साधकाला उपयोगी होतील,
असे कोणतेही श्लोक यात नाहीत.
यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा
कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे.
फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म....
अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे
बहुतेकांचा कल,
सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी;
नाईलाज म्हणून काम आणि
शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे.
गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम
भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे.
या निरर्थक प्रयासाबद्दल,
जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला
की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात.
नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं,
ज्यानं देशाचं भलं झालं ?
कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ?
यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा,
पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ?
_________________________
तर अशी सगळी परिस्थिती आहे.
मग कुणी खरडफळा रगडतोयं,
अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत
ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही
ते मला विचारतात
तीन वर्ष झक मारली का ?
आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज
मनोगतवर प्रकाशित झाली आहे.
अष्टावक्राच्या सांख्ययोगावर
लेखमाला लिहीली आहे.
निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर
लेख प्रकाशित झाले आहेत.
बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली
यांचावर तिथे लिहीलं आहे.
कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर
लोकोपयोगी भाष्य केलंय.
विवाह, उत्सव, भय, सजगता
अशा अनेकविध विषयांवर
लेखन केलंय....
कुणी तद्दन कविता टाकतो.
कुणी भंकस लेख लिहीतो....
गप्प करणारं उत्तर दिलं की मग
वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो !
काय साधतो आपण या सगळ्यातून ?
-----–---------------------–-----------------------------------
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन
----------------------------------------------------------------
- इतर जे काही करतात ते योग्य की अयोग्य हे तुम्ही अकारण मांडत बसता.
- दुसरे मार्ग असूच शकत नाहीत ही तुमची धारणा झालेली आहे. तेही स्वतःपुरतं असतं तर ठीके म्हणू. पण तुम्ही ते इतरांना पटवून देण्याच्या मागे लागता.
- ज्या ज्ञानाचा अनुभव आल्याबद्दल तुम्ही सांगता, ते तुमच्या कृतीत कुठंच दिसत नाही. "विद्या विनयेन शोभते" या वचनावर तुमचा दूरवरपर्यंत विश्वास नाही असंच दिसतं.
- तुमच्या म्हणण्यानुसार आद्य शंकराचार्य, श्रीज्ञानेश्वर महाराज, श्रीतुकाराम महाराज, श्रीसमर्थ वगैरे सगळेच भ्रमात होतेत. त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून साधन करण्याचा प्रयत्न करणारा आपसुक भ्रमातच आहे. त्यामुळे ते सर्व सोडून, तुमचा जो काही सिद्धांत आहे तो बरोबर आहे असं मानून, लोकांनी तेच आचरावं असा तुमचा अट्टाहास! अरे कोण तुम्ही? वर उल्लेखलेली सर्व मंडळी आणि असे अनेक लोकं ही "संत" पदी पोहोचलेल्या व्यक्ती आहेत. कशासाठी लोकांनी या सगळ्यांचं सोडून तुमचं ऐकावं?
हा अट्टाहास/दुराग्रह हेच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. तुमचा मार्ग/सिद्धांत जो काही असेल तो समजावून सांगण्यासाठी इतरांच्या पंच्याला हात घालण्याची काय गरज? तो मार्ग/सिद्धांत ज्याला पटेल, आचरावासा वाटेल तो करेल की तसं. पण नाही, तुम्हास ही अगदी साधी गोष्टही पटत नाही.. तुम्हाला ते पटवून घ्यायचंच नाही. हेच सगळं अनेक वेळा/अनेक पद्धतींनी/अनेकांनी पोटतिडिकीनं सांगूनही पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" हेच होत असतं. आणि त्याचमुळं तुमच्या ज्ञानाबद्दल जिथं आदर निर्माण व्हायला हवा, तिथं लोकं तुमचा तिरस्कार/द्वेष करतात. मला तर खरंच अशी दाट शंका आहे की, केवळ प्रतिवाद करून +/- प्रतिक्रिया मिळवत रहायच्या या एकाच उद्देशानं तुमची वाटचाल सुरु असावी! त्यामुळंच तुमच्या अध्यात्मिक विचारांवर तुम्हाला प्रतिक्रिया देणं मी कधीचंच बंद केलंय. हीसुद्धा शेवटचीच अशी प्रतिक्रिया.