जे न देखे रवी...
आतल्या आत
Primary tabs
संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांतराचा धरला अलगद हात
मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ
अन् ओसंडून सांडलो आतल्या आत
धगधगून निखारे विझून गेले तेव्हा
मी हिमपातावर कसून केली मात
मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो
अन् लखलख तेजाळलो आतल्या आत
भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा
मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात
जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो
उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत
आपणाच आपल्याला उलगडतोय ही भावना खूपच मजेदार असते.
भारी लिहिली आहे
आवडली
पैजारबुवा,
उलगडली ही कविता म्हणताहात,
मग विचार कसला.. उचला अपुला टाक
विडंबनाचे यात्री आपण आहात
पाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात!
(मूळ कविता आवडली आहेच हो कविराज)
सुरेख रचना!
प्रत्येक कडव्यातील शेवटच्या ओळीत स्वतंत्र कविता आहे.
प्रयत्न केला, नाही समजली ब्वॉ.
जरा रचनेमागची विचारप्रक्रिया "उलगडून" दाखवाल? :-)
व कविता वाचणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद