Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

ह
हेमंतकुमार
Mon, 11/29/2021 - 10:18
💬 181 प्रतिसाद
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. सांगणाऱ्यांच्या अनुभवांचे धबधबे कोसळत होते आणि ऐकणारे त्यात न्हाऊन निघत होते ! मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ. मग मी सर्वांना म्हणालो, “तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” ! इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले, “मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” ! माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”. .. वाचकमित्रहो, असा हा आमच्या आप्तस्वकीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९% खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानीमनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो. तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? 😀 तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम ३ दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे. ….. तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते. तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतील नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर. मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला. तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता. मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे, की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची : “ सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”. ok याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते. मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले. हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो. जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते). विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते. परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली, “जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”. ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली. परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”. पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही. अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला. आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले. त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता. मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो). जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच. असो. लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील. ........................................................................................................................................................

प्रतिक्रिया द्या
54576 वाचन

💬 प्रतिसाद (181)
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Mon, 11/29/2021 - 10:26 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 11/29/2021 - 10:28 नवीन
एक अतिशयच वेगळा अनुभव आहे हा तर !
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 11/29/2021 - 10:50 नवीन
ही एका वेगळ्याच देशाची (शहराची) ऑफ बीट भटकंती म्हटली पाहीजे. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 11/29/2021 - 10:59 नवीन
मस्तच. अनुभव आवडला.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/29/2021 - 11:05 नवीन
उत्साहवर्धनाबद्दल आभार ! ..
ऑफ बीट भटकंती म्हटली पाहीजे.
>> होय, म्हणूनच फोटो, प्रेक्षणीय .... असे काहीही नाही. तेव्हा स्वतःकडे कॅमेराच नव्हता तर कसले काय !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 11/29/2021 - 11:28 नवीन
पकिस्तान , नेपाळ , भूतान हे शेजारी फिरायला हवेत (बांगलादेश बद्दल मात्र तसे मत नहिये)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 11/29/2021 - 12:42 नवीन
मला बांगलादेश ही फिरायला आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 11/29/2021 - 13:53 नवीन
कर्तारपूर कॉरीडॉर सुरू झाल्यावर तिथे जावे असे वाटायला लागले होते. पण नंतर कळले की तिकडे जायला २० डॉलर एन्ट्री फी आहे. ते बघितल्यावर तो विचार काढून टाकला. एन्ट्री फी नसती तर जायला नक्कीच आवडले असते. २० डॉलर देणे मला परवडणार नाही म्हणून नव्हे तर त्या देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत तेवढीही भर टाकायची अजिबात इच्छा नाही म्हणून. कॉरीडॉर सुरू झाल्यावर पहिले काही दिवस एन्ट्री फी नव्हती. तसे परत काही दिवस केल्यास बरोबर त्या दिवसात जाऊन यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ह
हेमंतकुमार Wed, 12/15/2021 - 12:37 नवीन
स्वतंत्र बांगलादेशची पन्नाशी : भारतानेच घातले बारसे, पण आता संबंध बरे नाहीत फारसे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Mon, 11/29/2021 - 12:18 नवीन
अतिशय रोचक लेखन. मस्तच. अनुभव आवडला. त्यावेळी हा अनुभव थरारकच असणार. कराची, मुंबईची भगिनी नगरी असा कुणाचा तरी (द्वारकानाथ संझगिरी ? चा ) लेख वाचल्याचा आठवतोय सध्या तिथं जायला काय परिस्थिती आहे, माहित नाही. ओळखीतले कुणी गेल्याचे माहित नाही, कधी दुसऱ्यांचे प्रवास वर्णन वाचले नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/29/2021 - 12:39 नवीन
कमु, +१ .. चौ को,
सध्या तिथं जायला काय परिस्थिती आहे, माहित नाही.
>> गेली अनेक वर्षे तिकडचा पर्यटन-व्हिसा मिळत नाही असे काही दर्दी लोकांनी सांगितले. (मला माहित नाही). वाघा सीमेवर पूर्वी रोज इकडच्या व तिकडच्या १० लोकांना पलीकडच्या हद्दीत २० पावले चालू देत. सध्या माहित नाही.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 11/29/2021 - 12:42 नवीन
मस्तच कपिलमुनींशी सहमत
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/29/2021 - 12:44 नवीन
अनुभव आवडला. तुमचे प्रत्यक्ष पाकिस्तानात जाणे फारच थरारक वाटले. मला जर्मनीत म्युनस्टर मधे एक पाकिस्तानी हॉटेल मालक भेटला होता त्याची आठवण झाली. त्याने पण मी भारतिय आहे हे समजल्यावर असेच आगत्य दाखवले होते. व माझे खाणे होई पर्यंत स्वतः गप्पा मारत बसला होता. नंतरही त्याने हॉटेल वर एकदोनदा फोन करुन चौकशी केली होती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 11/29/2021 - 12:44 नवीन
पाकिस्तानबद्दल मलाही अनेकदा कुतुहल वाटते. खरे तर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत खूप साम्य आहे. पुढे कधि काळी दोन्ही देशांचे संबंध सुधारलेत आणि "ऑस्ट्रेलिया -न्युझीलंड" वा "अमेरिका -कॅनडा" अशा शेजार्‍याप्रमाणेच "भारत-पाकिस्तान" हे पण अगदी एकोप्याने राहणारे शेजारी बनलेत तर काय बहार येईल ...!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 11/29/2021 - 13:14 नवीन
छान अनुभव. आतापर्यंत दोनवेळा पाकिस्तानला जाऊन आलो आहे (फक्त स्वप्नात). खरोखर कधी जायला मिळेल हे ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/29/2021 - 13:21 नवीन
पसंतीची पोच दिल्याबद्दल वरील सर्वांना धन्यवाद ! ........................ आपल्या नकळत आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाच्या पोतडीत काही ना काही साठलेले असते. मात्र यातील कुठल्या विषयावर आपल्याला लोकांना काही विशेष सांगण्यासारखे लिहिता येईल, हे मात्र अचानकच सुचते. तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा एखादा अनुभव लिहिताना आधी मनात थोडीशी धास्ती असते, की लोकांना हे फार जुने तर वाटणार नाही ना ? या लेखन विषयावर जेव्हा मी विचार केला तेव्हा मला 1980 च्या दशकातील पासपोर्टवरील ते दक्षिण आफ्रिकेसंबंधीचे वाक्य आणि अन्य एक दोन गोष्टी रोचक वाटल्या. तुमच्यापैकी ज्यांनी 1990 नंतर प्रथम पासपोर्ट काढलेला आहे त्यांना कोणाला या प्रकारांची कल्पनाही नसेल. अशा हेतूने पोतडीतून हा बराच जुना विषय बाहेर काढला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 11/30/2021 - 12:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 12:08 नवीन
मस्तच शोधून काढलंत !! अगदी मला छान स्मरणरंजन झाले .... नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका आणि त्या पुढचा सगळा इतिहास अगदी डोळ्यासमोर तरळून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 03:59 नवीन
तुम्ही दिलेला पासपोर्ट पानाचा फोटो अन्यत्र वापरला तर चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
त
तुषार काळभोर Wed, 12/01/2021 - 08:19 नवीन
१. फोटो माझा नाही, त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नाही. २. फोटो विकिपीडीयावरील असल्याने परवानगीची गरज नसावी. चुकभूल देणे घेणे. उत्तरदायित्वास नकार लागू अजून काही विसरलो असल्यास तसे अध्याहृत धरावे ;) ता.क. वरील प्रतिसाद ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 08:57 नवीन
:))) च घेतलाय... धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सौन्दर्य गुरुवार, 12/09/2021 - 19:44 नवीन
लेख आवडला. अगदी स्वच्छ, निर्मल मनाने लिहिलाय हे जाणवले. मी माझा पहिला पासपोर्ट १९७६ साली काढला होता त्यावर, 'Valid everywhere except colony of Rhodesia' असा स्टॅम्प असल्याचे आठवतेय. ऱ्होडेशिया म्हणजेच साऊथ आफ्रिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 12/10/2021 - 01:38 नवीन
आभार ! **ऱ्होडेशिया म्हणजेच साऊथ आफ्रिका. >>>वा ! रोचक माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
ज
जेम्स वांड Fri, 12/10/2021 - 02:58 नवीन
मला आजवर ऱ्होडेशिया म्हणजे झिम्बाब्वे वाटत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
ह
हेमंतकुमार Fri, 12/10/2021 - 03:49 नवीन
विकिपीडिया नुसार ऱ्होडेशिया हा दक्षिण आफ्रिके चा भाग होता. पुढे त्याचे विभाजन झाले : उत्तर ऱ्होडेशियाचा झाला झांबिया तर दक्षिणेचा झाला झिंबाब्वे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 12/10/2021 - 05:57 नवीन
हे मला नव्हतं माहिती, अपडेट करता धन्यवाद डॉ कुमार सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
B
Bhakti Mon, 11/29/2021 - 13:29 नवीन
भारीच की , बजरंगी भाईजान सिनेमा आठवला :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 11/29/2021 - 15:12 नवीन
मला भेटलेले सगळेच पाकिस्तानी, एक नंबरचे हरामखोर होते ...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 11/29/2021 - 18:06 नवीन
मला भेटलेले सगळेच पाकिस्तानी, एक नंबरचे हरामखोर होते ...
तुम्ही अखिल डोंबोलीकर हिंदू हृदयसम्राट आहात हे त्यांना अगोदरच कळाले असेल त्यामुळे ते तुमच्याशी असे वागले असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 12/01/2021 - 05:01 नवीन
पाकिस्तानी आणि चायनीज, म्हणजे मिठी छूरी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ग
गवि Mon, 11/29/2021 - 15:24 नवीन
अतिशय रोचक. वेगळेच. आगोदर वाटले की तांत्रिकदृष्ट्या कधीतरी नकळत बॉर्डर पार केली गेली. पण ही अगदी व्यवस्थित भेट आहे त्या देशाला.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 11/29/2021 - 16:31 नवीन
मी लहानपणी अहमदनगर आणि बीड येथे राहिल्यामुळे मुस्लिम समाजाबद्दल अकारण किंवा संस्कारातून आलेला आकस कधी नव्हता. नगरला हिंदू मुस्लिम समाज बराच मिळून मिसळून राहतो असा अनुभव आहे. देवीच्या पालखीच्या पलंगाला मुस्लिम खांदा देतात तर मिरावलीच्या दर्ग्याला हिंदू देखील नवस बोलतात असे किस्से आहेत. नंतर मुंबईमध्ये खुद्द डोंगरी परिसरात राहिल्यामुळे आणि मोहम्मद अली रोडवर रमझानच्या काळात फिरल्यामुळे तर उलट त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि योगदानाबद्दल जास्त माहिती मिळाली. पूर्वी तेल उत्पादनात आघाडीची असणारी अहमद मिल्स, हमदर्द अशा कंपन्या, छत्रीचा सर्वात जुना ब्रँड (बहुदा हरीण छाप) आणि बहुतेक कॉमेट हा स्टेशनरी ब्रँड वगैरे गोष्टी समजल्या. हे सर्व लिहीन्याचं कारण म्हणजे पाकिस्तान म्हटलं की मुस्लिम समाजाबद्दलचं आपलं कुतूहल किंवा दुस्वास या अपरिहार्य असणाऱ्या गोष्टी आहेत. शेवटी माझ्या प्रतिसादामुळे धाग्याचा काश्मीर होऊ नये ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/29/2021 - 16:39 नवीन
तिकडच्या लोकांचे कटू/ गोड अनुभव यासंबंधी आपण सर्वांनी व्यक्त केलेले विचार समजले. गुंतागुंतीचा विषय आहे खरा. ........................... लेखात ज्या परिक्षेचा उल्लेख केलेला आहे त्यातील अन्य काही वर्षांचे गैरप्रकारांचे किस्से पण ऐकिवात आहेत. माझ्या नंतर काही वर्षांनी माझ्या एका मित्राने मनिलाला जाऊन परीक्षा दिली होती. त्यावर्षी त्या परीक्षेचा पेपर अन्य केंद्रांवर फुटल्याचे लक्षात आले होते. असे काही झाले की ते संपूर्ण जगभरातील ती परीक्षा रद्द ठरवतात. मग त्या सर्व संबंधित डॉ चा परीक्षा खर्च पूर्ण पाण्यात जातो. अशा पेपरफुटी घडवणाऱ्या टोळ्या, पेपरफुटीचे हजारो डॉलर्स मधील भाव आणि एकंदरीत या सगळ्याच्या मागचे लाखो डॉलर्सचे अर्थकारण हा ही त्या परीक्षेचा एक चिंताजनक पैलू असायचा. काही ठराविक देश यासाठी कुप्रसिद्ध होते.
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Tue, 11/30/2021 - 03:03 नवीन
अरे वा! छानच आहे लेख. मी जपानमध्ये शिकायला आलो होतो तेव्हा हॉस्टेलवर बरीच पाकिस्तानी कुटुंबं होती. आल्या आल्या काहीच माहित नसल्यामुळे आणि मित्र वगैरे पण झाले नसल्यामुळे पहिले काही दिवस अत्यंत कंटाळवाणे जात होते. अशातच एकदा कॉलेजमधून खोलीवर परत येताना दोन जण हिंदी मध्ये बोलताना ऐकू आले. प्रचंड उत्साहात जाऊन मी त्यांना विचारलं, आप इंडिया से है ना? तेव्हा ते म्हटले नहीं,पाकिस्तान से. बरं आता एवढं ऐकून मी गप्पं बसावं तर तेही नाही 😛 मी त्यांना वर म्हटलं की, आप हिंदी में बात कर रहे थे ना, इसलिये लगा आप इंडिया से हो 😀 पण त्यांनी त्याचा काही इश्यू केला नाही. उलट मलाच म्हणत होते की कधी वाटलं तर आमच्याकडे ये चहाला वगैरे
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Tue, 11/30/2021 - 09:04 नवीन
नेहमी प्रमाणेच छान लेख! अनुभव कथन आवडले!! Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 10:09 नवीन
नज चांगला अनुभव आहे तुमचा अ आ नेहमीप्रमाणेच सुंदर चित्र धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 10:09 नवीन
नज चांगला अनुभव आहे तुमचा अ आ नेहमीप्रमाणेच सुंदर चित्र धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 11/30/2021 - 10:52 नवीन
अतिशय रोचक लिखाण. तुम्ही कितीही प्रवास आयुष्यात केले तरी पहिला लांबचा प्रवास हा खासकरून लक्षात राहण्यासारखा असतो. तुम्ही लिहिल्याप्रमाणे पाकिस्तान मध्ये प्रवास केलेली माणसे आता खूप क्वचितच मिळतील पण दोन्ही देशात तिढा असला तरी जेव्हा एखादा पाकिस्तानी भेटतो तेव्हा बोलण्यात तिरस्कार कधीच जाणवत नाही माझ्या इकडे कंपनीत पाकिस्तानी सहकारी आहे. पण आम्ही हिंदीमध्ये सामान्य गप्पा मारतो. असा वाटतच नाही कि वेगळ्या देशाचे आहोत ते. शेवटी माणूस कुठे कोणत्या देशात जन्माला आला तरी त्यावरून दुसऱ्या देशातल्या माणसाशी तिरस्कार करण्यात काही अर्थ नसतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 11/30/2021 - 12:08 नवीन
चंद्रसूर्यकुमारसाहेबांनी लिहिल्याप्रमाणे जायची इच्छा तर आहे पण आपले दोन रुपये तिकडच्या अर्थव्यवस्थेत सामील होऊ नयेत असं वाटतं. बाय द वे, साधारण १९८० पर्यंत पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा अधिक पुढे होता. दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक होतं. वातावरणात बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. हसन जहांगीरचं हवा हवा गाणं पाहताना १९८० चा बॉलिवूड सिनेमातील गाणं पाहिल्यासारखं वाटतं. तेच नाजिया हसनच्या गाण्यांचं. त्यामुळे त्यावेळी आपल्याच देशातील एखादा भाग किंवा आपल्यासारखे लोक, आपल्यासारखी जीवनपद्धती, आपल्यासारखा वेश असं तेव्हा वाटणं जास्त शक्य होतं. आता हा आपलेपणा वाटण्याची सुतराम शक्यता नाही. गुगल मॅप वर लाहोर , कराची या तुलनेने आपल्याला जवळच्या शहरातील शाळा, कॉलेज आणि हॉटेलचे फोटो पाहिले की फरक जाणवतो. यदाकदाचित जर कधी ते सुधारले तर जरूर एक भेट द्यायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 11/30/2021 - 14:13 नवीन
आपले दोन रुपये तिकडच्या अर्थव्यवस्थेत सामील होऊ नयेत असं वाटतं.
भारत पाकिस्तानकडून बर्याच गोष्टी आयात करतो. यात खाद्यतेल, कपडे, प्लास्टीक, सिमेंट, खेळाचे सामान अशा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत. https://tradingeconomics.com/pakistan/exports/india त्यामुळे इनडायरेक्टली आपले काही पैसे त्यांच्या अर्थव्यवस्थेत सामील होतातच. डिकॅथलाॅन मधे मेड इन पाकिस्तान सामान बरेच असते विक्रीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सर टोबी Tue, 11/30/2021 - 15:38 नवीन
बजाज ऑटो, महिंद्रचे ट्रॅक्टर, बॉलीवूड सिनेमे, भारतीय शेत माल अशी पाकिस्तानची बाजारपेठ भारतासाठी बरीच मोलाची असेल. आयातीच्या दृष्टीने देखील पाकिस्तानी कांदा गरजेच्या वेळेला भारतीयांना चालून जातो. २०२१ च्या उन्हाळ्यात तर पाकिस्तानने रुह अफजा भारताला निर्यात करण्याची तयारी दर्शवली होती. तीच गोष्ट बांगला देशच्या बाबतीतही लागू पडते. भारतातील सर्व नामांकित ब्रँडचे तयार कपडे बांगला देशात तयार होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 15:56 नवीन
अ अ + स टो या दोन्ही प्रतिसादांवरून असे म्हणता येईल : नकोशा शेजारी देशांमध्ये वस्तुंची देवाण-घेवाण चालून जाते. मात्र माणसांची देवाण-घेवाण झाल्यास कटकटी आणि धोके उत्पन्न होतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी Tue, 11/30/2021 - 16:27 नवीन
खरं तर त्रिकालाबाधित सत्य बोलल्यासारखी आपण जी विधानं करतो त्याला काही अर्थ नसतो. आता हेच पहाना. भारत पाकिस्तान दरम्यान काही जरी झालं तरी व्यापार आणि इतर आदान प्रदान थांबायला नको हे एके काळी चालून जायचं. तेव्हा पूर्वी सारखे दिवस येणारच नाही असं नाही परंतु आग्या मोहोळात दगड मारायला नको म्हणून मी तसं म्हणणं टाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 16:49 नवीन
सर, सहमत आहे. आता विषय निघालाच आहे तर अजून काही रोचक : भारत व पाकिस्तानचे भविष्यात कधी काळी एकत्रीकरण होईल का, किंवा व्हावे का ? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आपल्या सर्वांचे उत्तर अजिबात नको/ नाही असेच असते. आपण आहोत ते सुखात आहोत; त्यांना वेगळेच राहू देत, अशी सामान्य भारतीयाची धारणा असते. परंतु या संदर्भात एका आदरणीय व्यक्तीचे वेगळेच मत वाचले होते. ती व्यक्ती म्हणजे दिवंगत फील्ड मार्शल सॅम माणेकशा. जेव्हा त्यांच्या निधनाची मोठी बातमी पहिल्या पानावर आली होती, तेव्हा त्यांचे काही उद्गार विशेष चौकटीत प्रसिद्ध झाले होते. त्यापैकी एक यासंदर्भात होते : “
भारत व पाक हे भविष्यात कधी ना कधी एकत्र येऊन विलीन होतील(च)” अशी त्यांना आशा होती आणि त्यांची इच्छाही होती.
हे वाचल्यावर मला आश्चर्यही वाटले आणि काहीसा धक्काही बसला. परंतु हे म्हणणारी व्यक्ती खूप आदरणीय असल्यामुळे मी शांतपणे त्यावर फक्त विचार केला. जगाच्या इतिहासात जर्मनीचे एकीकरण ही ठळक घटना माझ्या नजरेसमोर आली. अर्थात त्यांची संस्कृती वेगळी आहे व आपली वेगळी. खूप विचार करता मला माणेकशांचा विचार काही झेपला नाही. असो. इतरांना काय वाटते याबद्दल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 11/30/2021 - 17:19 नवीन
इतरांना काय वाटते याबद्दल ?
विचारलेच आहे आणि विषय निघाला म्हणून लिहितो. माझे मत खरं तर तिकडची जमीन पाहिजे पण लोकं नकोत असे आहे. कोणाला त्या घाणीबरोबर राहायची इच्छा आहे? पण तसे करता येणे शक्य नसल्याने भारत-पाकिस्तान विलीनीकरण वगैरे व्हायला नको असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 11/30/2021 - 15:53 नवीन
साधारण १९८० पर्यंत पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा अधिक पुढे होता. दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक होतं.
हो. पाकिस्तानची जमीन सुपीक आहे. ब्रिटिश काळातच पश्चिम पंजाबमध्ये कालव्यांचे जाळे निर्माण केले गेले होते. सिंधमध्येही सिंधू नदीमुळे जमीन बर्‍यापैकी सुपीक आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला भरपूर मदत मिळाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून १९८० पर्यंतच नाही तर अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त होते. जागतिक बँकेच्या वेबसाईटवर पुढील विदा मिळाला
यदाकदाचित जर कधी ते सुधारले तर जरूर एक भेट द्यायची इच्छा आहे.
हे या जन्मी तरी शक्य होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Tue, 11/30/2021 - 17:04 नवीन
अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त होते. >> २००८ नंतर पाकिस्तानच्या दरडोई उत्पन्नात घट व्हायला सुरुवात झाली. किंवा ते कमी वेगाने वाढू लागले, तर भारताचे १९९६-९८ च्या आसपास वेगाने वाढू लागले. २००८च्या मंदी नंतर अमेरिकेची मदत कमी झाली. २०१०-११ मध्ये लादेन पाकिस्तानात सापडल्यावर तर ती झपाट्याने कमी झाली. उरलीसुरली कसर गेल्या वर्षी कोरोनाने भरून काढली. मध्यंतरी बांगलादेश सुद्धा पाकिस्तानच्या बराच पुढे गेलाय. बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय व्यापार (आयात+ निर्यात) पाकिस्तानच्या काही पट जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/01/2021 - 04:45 नवीन
बांग्लादेश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपल्याही पुढे आहे. त्यांच्या लोकसंख्येची घनता आपल्या अडीच-पावणेतीन पट आहे.
  • Bangladesh overtakes India in per capita income: Report
  • Bangladesh keeps outrunning India in per capita GDP race
विविध घटकांना व आव्हानांना गृहीत न धरता केवळ दरडोई उत्पन्नाची तुलना करणे बरोबर नसले तरी त्यांच्या प्रगतीचे कौतुक तर आपण करु शकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हेमंतकुमार Tue, 11/30/2021 - 12:16 नवीन
१. शेवटी माणूस कुठे कोणत्या देशात जन्माला आला तरी त्यावरून दुसऱ्या देशातल्या माणसाशी तिरस्कार करण्यात काही अर्थ नसतो. >>+११११ ... २.साधारण १९८० पर्यंत पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा अधिक पुढे होता >>रोचक ! एकदा अशीच भारत व पाक संबंधातील चर्चा चालू होती त्यावर एक अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणाले, " भारतात लोकांकडे पैसा भरपूर आहे पण सरकार गरीब आहे . तर पाकिस्तानात लोक गरीब आहेत आणि सरकारकडे पैसा बर्यापैकी आहे" (अर्थात या संदर्भात माझा काही अभ्यास नाही).
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 04/23/2022 - 19:42 नवीन
तर पाकिस्तानात लोक गरीब आहेत आणि सरकारकडे पैसा बर्यापैकी आहे"
किती साली हे म्हटले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा