जे न देखे रवी...

कळले तुजला?

Primary tabs

कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...

विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?

मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??

श्वास रोधुनी उत्सुक मी रे काही घडण्या..
मिसळून गेली शब्दांमध्ये चित्रे झरझर..
काय बोलले किंवा हसले काही स्मरेना
आठवते ती अनोळखीशी नाजूक थरथर..
कळले तुजला???

किती मनाला आवरले तू...
आणि मलाही सावरले तू..
कळले मजला..

पण कळले मजला, हे कळले तुजला????

प्रचेतस

क्या बात है...!
एकदम सुरेख.

किती मनाला आवरले तू...
आणि मलाही सावरले तू..
कळले मजला..

पण कळले मजला, हे कळले तुजला????

हे तर जबरीच.

गोंडस कविता आवडली, फारच आवडली

पण कळले मजला, हे कळले तुजला????

हाच तर खरा प्रॉब्लेम असतो

पैजारबुवा,

श्वेता२४

अतिप्रचंड आडली!
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?

हे खास आवडलं!

कवीतेचा वास्तवाशी संर्दभ लावताना का कुणास ठावूक दुर्गम क्षेत्रात तैनात आसलेल्या सैनिकाला मिळणाऱ्या पत्रा बरोबर उचंबळणार्या भावना आणी कवीता यात कुठेतरी साम्य असल्याचे दिसले.

बाकी कवीता सुंदर आणि सहज, आवडली.

राघव

सहज आणि सुंदर, नेहमीप्रमाणेच! :-)

श्रीगणेशा

खूप छान चित्र उभं केलं आहे शब्दांतून!

वळूनी मागे पाहता, मी डोळ्यात तुझ्या
गवसली का रे, तुझीच अक्षरे तुजला